Tuesday, December 02, 2008

वैऱ्याची रात्र

गुरवारचा दिवस. आठवडा संपायच्या जवळ घेऊन जाणारा. म्हणजे चांगलाच.

पण त्याच्या जीवाला ह्या विकेंडला उसंत असणार नव्हती. नव्या घरात तो शनिवारी शिफ्ट होणार होता. किती सामान पॅक करायचं राहिलंय, किती झालंय, मूव्हर्सना फोन करून कन्फर्म करायचंय, क्लीनरचा अजून फोन आला नाहीये. जुन्या घराच्या इमारतीचं मागचं गेट अजून उघडत नाहीये, ते नाही उघडलं तर वॉशिंग मशीन बाहेर कसं काढायचं? शनिवारी नाही जमलं तर पुन्हा पन्नास डॉलर्सचा भुर्दंड. घराला नावही अजून ठरलं नाहीये. एक ना अनेक शेकडो विचारांनी त्याचं डोकं भारून गेलेलं. काही चांगले तर काही त्रासदायक.

विचारांच्या गुंत्यात गुंतूनच त्याने आपला कॉम्प्युटर सुरू केला.

तो आल्याची चाहूल त्याच्या बॉस ला लागली.

" काय रे? तू मुंबईला चाललायस ना? तिथे भयानक घटना घडलेय"

गोऱ्यांना वाटलेली भयानक घटना म्हणजे एखादा ऍक्सिडेंट किंवा अजून काहीही छोटी मोठी घटना असू शकते म्हणून बॉसचं म्हणणं मनावर न घेता, त्याने न्यूज चॅनलची वेबसाइट सुरू केली.

-------------

"हॅलो"
" कोण? "
" बाबा, मी बोलतोय"
" हं"
" सगळं ठीक आहे ना? "
" हो. इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. सगळे सुखरूप आहेत. आम्हाला रात्री कळलं. उशीरापर्यंत आम्ही टीव्ही बघत होतो मग झोपलो. अजून चालूच आहे. किती वाजले?"
" इथे साडेआठ म्हणजे तुमचे तीन"
" बरं उद्या सकाळी फोन कर. मग बोलू. आता झोपतो"

एक निःश्वास.

------------

गुरवारची रात्र.

रात्रीचे दोन वाजलेले. समोर लॅपटॉप चालू. तो कानाला इअरफोन लावून. मराठी बातम्या चालू. तो अर्धवट झोपेत. अतिरेकी अजूनही तिथेच. बातम्यांत सांगतात की अजून एक दोन तासात ऑपरेशन संपेल.

त्याची बायको रात्री कधीतरी कानाचे इअरफोन काढून लॅपटॉप उचलून ठेवते.

त्याच्या डोक्यात त्याचं हाउस, की नरीमन हाउस, अतिरेकी, क्लीनर, मूव्हर, खोके, बंदुका, समुद्र, गेट वे ऑफ इंडिया, ताज, गॅरेज, न उघडणारा गेट, असं काहीसं.

-------

शुक्रवारची दुपार. ऑफिसात सगळं सुस्तावलेलं. आठवडा संपलेला. प्रत्येकाला घरी जायची घाई. मुंबई कुणाच्याच बापाची नसल्यानं, अडकलेल्या चार गोऱ्यांसाठी अर्धा एक अश्रू गाळून लोकं आपापल्या कामाला लागलेली.

पण त्याच्यासाठी मुंबई घर होती. ऑफिसातही मराठी बातम्या अव्याहत. अजूनही अतिरेकी तिथेच. गूगल चॅटवर एक मित्र.

" हाय"
" हाय. कसा आहेस? "
" ठीक आहे. "
" घरचे? "
" ठीक. "
" लेटेस्ट काय आहे"
" मारामारी चाललेय"
" भयानक आहे हे"
" तुला काय जातंय बोलायला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तू बसलायस तिथे दूरवर जाऊन. इथे काही का होईना तुझं काय नुकसान? घरचे ठीक आहेत एवढं कन्फर्म केलं की तुझं काम संपलं"
" हं"

गूगल टॉक ऑफ. त्याचं डोकं भणभणायला लागतं. कॉफी. मूव्हरचा फोन येतो तेवढ्यात.

हुश्श. ह्याच्या लक्षात आहे. क्लीनरला फोन करून बघूया.

मराठी बातम्या. अजून धुमश्चक्री चालूच.

---------

" हॅलो"
" बोल"
" बाबा, कसं काय तिथे आता? "
" अजून चाललंय पण बाकी सगळं नॉर्मल आहे. आज आईही कामावर गेलेय. मीपण सकाळी फिरायला गेलो होतो. एअर इंडिआपर्यंतच जाऊ देतायत. पुढे पोलिस आहेत सगळे. "
" हं"

------------

" हे"
" हे"
" जाणारेस अजूनही इंडिआला"
" हो"
" भीती नाही वाटत? "
" स्वतःच्या घरी जायची कसली भीती? "
" टेक केअर अँड हॅव अ गूड वीकेंड. गुड लक विथ युअर मूव्हींग"

बायकोचा एसेमेस. क्लिनरने टाइम कन्फर्म केलाय.

--------

शुक्रवार संध्याकाळ. शेवटचं पॅकिंग चाललेलं. त्याचं सगळं लक्ष बातम्यांत. अचानक बातम्या बंद. तो काय झालं ते बघतो. इंटरनेट चं कनेक्शन स्विच ऑफ केलं बहुतेक. आता नव्या घरी तीन दिवसांनी सुरू होईल. टी. व्ही. पण काढून ठेवलेला. बातम्या कळायच्या कशा?

बॉक्सेस, सामान, धूळ, फर्निचर, मूव्हर्स, क्लीनर्स, जुनं घर सोडायचं दुःख, आणि मध्येच कुठेतरी आठवणीतली मुंबई, समुद्र, कबुतरं, अतिरेकी वगैरे वगैरे

---------

शनिवार दुपार.

सगळं काही वेळच्या वेळी झालेलं. मूव्हर्स वेळेवर आले. मदतीला सगळे मित्र त्याचे. सगळं सामान न तुटता न फुटता नव्या घरात येऊन पोचल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर.

एका मित्राचा फोन वाजतो.

" मारले. शेवटी मारले"
" काय? "
" अतिरेकी मारले. संपलं"
" किती लोक मेले असतील निरपराध? "
" दीडशेच्या आसपास."
" हं"
" बरं झालं बुवा आपण इथे आहोत. मुंबईचं लाईफ म्हणजे काय लाईफ राहिलं नाही. सकाळी बाहेर गेलेला माणूस संध्याकाळी घरी परत येईल की नाही ह्याची खात्री नाही."
" अरे पण"
" दहा अतिरेकी एवढा दारुगोळा बंदुका घेऊन होड्यांनी येतात एवढ्या लोकांना मारतात, पोलिसांना मारतात, काय डिफेन्स आहे की तमाशा? "
" .... "
" बरं ते जाऊदे. घर झकास आहे हं तुझं. फक्त बागेची जरा काम आहे तेवढंच"

उरलेला दिवस पोचलेलं सामान लावण्यात जातो.

नव्या घरातला पहिला दिवस संपतो. नव्या घरातल्या पहिल्याच रात्री झोपी जाण्याच्या प्रयत्नात असताना तो विचार करत राहतो. तो आनंदी आहे की दुःखी. स्वतःच्या घरात जाणं ही आयुष्यातली फार मोठी घटना. पण मुंबईवरचा हमला. त्यात मेलेले दोनशे लोकं. हे सगळं होत असताना जगाच्या दुसऱ्या भोकात सुरक्षित ठिकाणी वैयक्तिक सुखाचं सेलेब्रेशन करणं चांगलं की वाईट?

विचारांच्या गुंगीने झापड यायला लागते. आजूबाजूच्या निरव शांततेतून आलेला एखादा आवाज दचकवून जाग आणतो. घर आठवतं, मुंबई आठवते, ताज आणि ओबेरॉयही आठवतं. आणि दचकून उठल्यावर आपण अखेरीस आपल्या स्वतःच्या घरात येऊन पोचलो हेही आठवतं.

वैऱ्याची रात्र सरत जाते.

-------

Wednesday, November 05, 2008

मित्रा हॅप्पी दिवाळी

दोन अडीचशे लोकं जमलीत. बाया माणसांनी ठेवणीतल्या साड्या, दागिने बाहेर काढलेत. पुरुषांनीसुद्धा ठेवणीतले कपडे. पोरा टोरांना ह्या दिखाऊपणाशी काहीही देणं घेणं नाही. ती आपली इकडून तिकडे सैरावैरा पळण्यात गुंतलेली आहेत. बाया नसलेले बाप्ये आणि बाप्ये नसलेल्या पोरी एकमेकांना शोधणाऱ्या नजरा भिरभिरवतायत.

टेबला टेबलावर दिवाळीचा फराळ मांडून ठेवलाय. कडाक करून मोडणारी पण जिभेवर विरघळणारी चकली. रव्या बेसनाचे लाडू, खमंग चिवडा ह्यांचे बकणेच्या बकणे भरले जातायत. सुखावलेल्या जिभा बनवणाऱ्या हातांचं कौतुक करतायत.

मध्येच कुठंतरी, कुणाच्यातरी साडीचं कौतुक. कुठेतरी जगाच्या खिशाची चिंता. कुठे काय अन कुठे काय?

एकंदरीतच दिवाळी जोरात साजरी होतेय.

दिवाळीनंतरच्या शनिवारी.

होय शनिवारीच. कारण इथे सुट्टी कुठे असते लोकांना दिवाळी साजरी करायला? मग सवडीने करायची. शनिवारी हक्काची सुट्टी ना. मग बनवायचं एक आपलं विश्व. म्हणायचं एकमेकांना शुभ दीपावली. खायचा फराळ अन वाजवायचे फटाके.

लाथ मारीन तिथं पाणी काढीन, म्हणत परदेशी येऊन राहिलेली ती सगळी, हव्या त्या दिवशी दिवाळी नाही साजरी करू शकत? नक्कीच. म्हणून दिवाळीनंतरच्या शनिवारीही दिवाळी होतेय साजरी.

दिवाळी बिवाळी सब झूट आहे मित्रा. आपण दिवे लावू तेव्हा दिवाळी आणि आपण फटाके वाजवू तेव्हा दिवाळी. काउन्सिल ची परमिशन घेतली का राव? नाहीतर फुकट खिशाला भुर्दंड. लाथ मारीन तिथं पाणी काढीन पण ते त्या मूर्ख इनिस्पेक्टरला कोण समजावणार. त्याला काय माहीत आम्ही फटाके लावतो तेव्हा दिवाळी असते ते.

जरा थंड घे मित्रा. नाहीतर हा लाडूच खा ना. बघ कसं मस्त वाटेल. एकदम देशात गेल्यासारखं. देशातल्या नरक चतुर्दशीची पहाट उगाचच अंगावर काटा आणेल मित्रा, कुठंतरी गुदमरत घेतलेला फटाक्याचा वास आठवेल मित्रा. घे हा लाडू खाच.

मनामनात चाललेला हा मित्रा मित्रांचा खेळ. खेळ मांडियेला वाळवंटी बाई, नाचती वैष्णव भाई रे. खेळ मांडियेला वाळवंटी बाई, नाचती वैष्णव भाई रे.

मित्रा चकली? मित्रा चिवडा? मित्रा शुभ दीपावली. मित्रा हॅप्पी दिवाळी. मित्रा रांगोळी. भिजवलेल्या तांदळाच्या पिठाची रांगोळी माणूस मेल्यावर घालतात भोसडीच्यांनो. लाडू खा मित्रा. थंड घे मित्रा.

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया....

मेंटल मास्टरबेशन. काल्पनिक मैथुन आहे हा सगळा. जे अस्तित्वातच नाही ते असल्याचा आभास निर्माण करायचा आणि सांगत राहायचं. सुख मिळतंय मला, सुख मिळतंय.

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती ह्या. नाचती वैष्णव भाई रे. लाडू, चिवडा, फटाके, कंदील, भुईनळे, कौन्सिलची परवानगी, मैथुन, दिवाळी.

अरे हट. हा एक लाडू खातोच.

मित्रा हॅप्पी दिवाळी.

हॅप्पी दिवाळी.

Sunday, September 14, 2008

चिऊ आणि काऊ

ती - किती उशीर?

तो - उशीर? मी वेळेवरच आलोय. माझ्या वेळेवर.

ती - मग तुझी वेळ सांगायची की मला. मीही त्याच वेळेवर आले असते.

तो - बरं.

ती - फक्त बरं?

तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम? मी जर सांगितलं असतं की ट्रॅफिक खूप होता, किंवा बस उशिरा आली, किंवा बॉसने सोडलाच नाही, तरीही तुला पटलं नसतं. हो की नाही? म्हणून बरं म्हणालो.

ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू?

तो - म्हणजे कसा?

ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो.

तो - डोकं फिरलंय त्याचं?

ती - त्याचं की तुझं?

तो - त्याचंच. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला?

ती - हो रे बाबा. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब होतं?

तो - नाही.

ती - मग? दोन वर्ष झाली आपण भेटतोय, पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस? अगदीच हा आहेस तू.

तो - हा? मी? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये लागणार.

ती - इ.... असा कसा रे तू? पंचवीस रुपयात हल्ली एखादं फुल येतं, गुच्छ नाही.

तो - हो का? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये.

ती - अरे देवा

तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट. त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार.

ती - बरं

तो - असं काय गं चिऊ. चिडतेस काय?

ती - मग काय? मलाही असं वाटतं की माझ्या बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं.

तो - अगं मला जमत नाही ना. तू मला सांग, पार्काला पंचवीस फेऱ्या मार, मारीन. सिंहगड दिवसात दोन वेळ चढून उतर. उतरीन. पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां.

ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार.

तो - आता?

ती - हं आता.

तो - बरं जातो.

ती - ए काऊ थांब रे.

तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब.

ती - हं. तू ना गाढव आहेस. मी गंमत गेली रे.

तो - बरं तू गाढवी आहेस. अशी गाढवासारखी गंमत कशी केलीस. मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या.

ती - काऊ तू मला खूप आवडतोस.

तो - मला माहितेय.

ती - काव्या! तुला किती वेळा सांगितलं, मी तू मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं.

तो - बरं.

ती - अरे आता म्हण.

तो - चिऊ तू मला खूप..... शी! हे असं कृत्रिम वाटतं. असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं? तुला माहितेय की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही, मग पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस.

ती - असं काय रे काऊ. म्हण ना रे.

तो - बरं.

ती - ...

तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस. इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच सुचत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही. आता सुचलंच आहे तर ऐकून घे.

ती - ऐकलं. काऊ, तूही मला खूप आवडतोस.

तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया.

ती - चल.


- कोहम

Wednesday, August 27, 2008

दहीहंडी

एक छोटासा मुलगा.

नखशिखान्त भिजलेला. दिवस पावसाचे आहेत, पाऊस अधून मधून आपलं अस्तित्व दाखवून देतोय. पावसाच्या पाण्याने तर तो भिजलाच आहे, पण दोन्ही बाजूंनी अंगणात भरभरून पडणाऱ्या पाण्याने जास्त भिजलाय. कुडकुडतोय. सूर्याला झाकणारे ढग तात्पुरते बाजूला होतात, आणि अंगणात पाण्याऐवजी ऊन सांडतं. पाऊस थांबलाय पण वरच्या मजल्यांवरून पडणारं पाणीपण कमी झालंय.

अंगणात मांडी ठोकून बसलेला एखादा टग्या पटकन ओरडतो, "घरात नाही पाणी घागर उताणी रे उताणी". त्याच्या अवती भवतीने बसलेली सगळी मुलं, त्याचा कित्ता गिरवतात. तोही जोरात ओरडतो. मोठ्या मुलांच्या आरडाओरडीत त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही. पण केलेल्या आवाहनाला जागून पुन्हा एकदा पाण्याचा आणि पाण्याच्या फुग्यांचा मारा सुरू होतो. पुन्हा थंडी वाजायला लागते, पण तो तसाच बसून राहतो.

त्याचं लक्ष डोक्यावर बांधलेली हंडी असते. मनातल्या मनात तो पुन्हा उजळणी करतो. ह्यावेळी आपणंच हंडी फोडायची. आपणंच पुढे व्हायचं. तो पुढे पुढे करणाऱ्यातला नाही, त्याच्यामुळे दुसरीच मुलं दर वर्षी हंडी फोडून जातात. ह्या वर्षी मात्र त्याने ठरवलंय की तोच हंडी फोडणार.

तळ मजल्यावरच्या काकू एक मोठी पाण्याची बादली घेऊन घराबाहेर येतात. त्याचं लक्ष नाहीये पण काकूंना बघितल्यावर एकदम त्याची ट्यूब पेटते. तळ मजल्यावरच्या काकू म्हणजे गरम पाणी नक्की. अंगणात बसलेली अर्ध्याहून अधिक मुलं, काकूंच्या पुढ्यात असतात आणि काकू तपेलीने गरम पाणी ओतत असतात. थंडीत कडकडल्यावर कढत पाणी अंगावर काय सही वाटतं. तोही घाईघाईने उठतो. धावत गर्दीपाशी पोचतो. मोठ्या मुलांचा राडा चाललेला असतो आणि काकूंची तपेली फारच छोटी. गरम पाणी त्याच्यापर्यंत पोचतंच नाही. समोरची मुलं शेवटी बादलीतलं उरलं सुरलं पाणी आपल्या डोक्यावर ओतून घेतात आणि रिकामी बादली काकूंच्या हवाली करतात.

पोरांपैकी कुणीतरी दुसऱ्या कुणालातरी भजन म्हणायचा आग्रह करतं. नाही हो करता करता भजन सुरू होतं

चंद्रभागेला पूर आला, पूर आला पाणी लागले वडाला
रुक्मिणी म्हणते अहो विठोबा पुंडलिक माझा बुडाला.

गाणाऱ्या मागोमाग सगळी पोरं, "बुडाला, बुडाला, बुडाला..." चा घोष करतात. त्याचं लक्ष हंडीकडेच असतं. आपण कसं पुढे व्हायचं, कसं झटक्यात चढायचं आणि कशी हंडी फोडायची, डोक्याने फोडायची का? नको मोठ्या मुलांची हंडी ते डोक्याने फोडतात. आपण लहान मुलांची हंडी नारळाने फोडायची, पण नारळ शिंकाळ्यातून बाहेरच नाही आला तर? गेल्या वर्षी झालं होतं. नारळ अडकून बसला आणि सगळे कोसळले. नाही नाही. असं होता कामा नये. तसं आपल्या हातून झालं आणि दुसऱ्या वेळी आपल्याला दिलीच नाही फोडायला तर? नाही निघाला नारळ तर सरळ डोक्याने फोडायची.

कुठूनतरी आलेला पाण्याचा फुगा खाडकन त्याच्या डोक्यावर बसला आणि तो पुन्हा जागा झाला.

आता मुलांनी गोल रिंगण केलं. एका टग्याला आत घेतलं आणि खुंटण मिरची सुरू झाली. सगळ्यांनी हात धरले. रिंगणातल्या मुलाने कडं तोडून बाहेर पळायचं असा खेळ.

"खुंटण मिरची" रिंगणातला मुलगा ओरडला.
" जाशील कैशी? " कड्यातल्या मुलांचा आवाज
" आई बोलावते" मुलगा.
" भरं करिते" कड्यातली मुलं.

मग आतल्या मुलाने मुसंडी मारून कडं तोडायचा प्रयत्न करायचा. खेळात त्याचं लक्षच नव्हतं. त्याचं लक्ष्य एकच. हंडी.

पुन्हा पाऊस सुरू झाला. मुलांच्या खेळालाही जोर चढला, फुगड्या, पाठी मारणं, किती किती, एकामागून एक खेळ खेळले गेले. मग कुणीतरी ओरडलं. चला रे, लहान मुलांची हंडी फोडून टाकूया. उशीर होईल नाहीतर दुसऱ्या हंडीला. चला चला म्हणून सगळी पोरं सरसावली. त्याची उत्कंठा अतिशय वाढली होती. कधी एकदा मी हंडी फोडतो असं त्याला झालं होतं.

त्यातल्या त्यात धिप्पाड मुलांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून गोल केला.

हा झाला खालचा थर. त्याच्यावर दोन मुलांचा अजून एक थर आणि त्यांच्या खांद्यावर मी. की फुटलीच हंडी. त्याने पुन्हा एकदा उजळणी केली.

खालचा थर तयार झाला. त्यांच्या खांद्यावर दोन मुलं चढली. ह्यावेळी कोण फोडणारे हंडी? कुणीतरी काका ओरडले. तो पटकन पुढे झाला. दोघांनी त्याला वर चढवला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता आपण हंडी फोडणार ह्या कल्पनेने त्याला जोष चढला. दुसऱ्या थरातली मुलं एकमेकाचे खांदे धरून तळातल्या थरावर उकिडवी बसली होती. त्याने सराइतासारखा एक पाय एकाच्या खांद्यावर ठेवला.

दुसरा पाय दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवायचा. एका हाताने एकाचं आणि दुसऱ्या हाताने दुसऱ्याचं डोकं पकडून ठेवायचं. उकिडवे बसलेले ते हळूहळू उभे राहणार ते उभे राहिले की हळू हळू त्यांची डोकी सोडायची आणि सावकाश उभं राहून हंडीच शिंकाळं पकडायचं. हंडीवरचा नारळ काढायचा आणि हंडी फोडायची. एकच गिलका होईल, गुलालाने गुलाबी झालेलं, घरा घरातून जमा केलेलं दूध, दही, ताक, लोणी सगळ्यांच्या अंगावर पसरेल, हंडीला लावलेली केळी, काकड्या जमिनीवर पडतील. हंडीतली नाणी खळकन जमिनीवर पडतील, मग ती वेचायला धावपळ होईल. सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोर आलं.

दुसरा पाय उचलून तो दुसऱ्या मुलाच्या खांद्यावर ठेवणार इतक्यात दोघांपैकी एकाचा पाय घसरायला लागला. त्याच्याबरोबर खालचा थरही डळमळायला लागला आणि सगळीच पोरं घसरली. त्याला वरचेवर अलगद कुणीतरी झेलला. पोरांना चेव चढला. "गोविंदा" चा गजर झाला. पोरं बेभान होऊन नाचायला लागली. तोही. कारण आता त्याला हंडी फोडायला मिळणार होती.

नाचानाच थांबल्यावर पुन्हा पोरं एकत्र झाली. आता हंडी फोडायचीच असं एकमेकांना बजावत खालचा थर लागला. त्याच्यावर दुसऱ्या थराची दोन मुलं चढली. हंडी कोण फोडणार हा प्रश्न विचारायच्या आतच. मागच्या वर्षी ज्याने हंडी फोडली त्याला कुणीतरी वर चढवला. तो वर चढला. पाण्याचा वर्षाव सुरू झाला, फुगे अंगावर फुटायला लागले. कशालाही न बधता त्या मुलाने हंडी पकडली, आतला नारळ काढून हंडी फोडलीसुद्धा. पावसाच्या पाण्यात त्याच्या डोळ्यात उतरलेला एक अश्रू कुणालाच दिसला नाही.

पोरं पुन्हा बेभान झाली. लाल लाल दही दुधाने माखलेली पोरं जमिनीवर पडलेली हंडीतली नाणी मिळवण्यासाठी झोंबायला लागली. तोही पुढे सरसावला. एक रुपया त्यालाही मिळाला. जमिनीवर पडलेली हंडीची एक खापरी त्याने आजीसाठी उचलली. हंडीची खापरी स्वैपाकघरात ठेवली की वर्षभर दूध दुभतं भरून राहतं घरात, आजी सांगायची.

रुपया आणि खापरी खिशात ठेवून त्याने दही भाताचा प्रसाद घेतला आणि तो घरी निघाला. पायऱ्या चढता चढता त्याने मनाशी ठरवलं, पुढच्या वर्षी हंडी आपणंच फोडायची.

Monday, August 25, 2008

खो खो

हा खो खो चा खेळ एकदम आवडला. संवेद हा खेळ सुरू केल्याबद्दल धन्यवाद. खेळ आवडला अशासाठी की खेळ एकदम सोपा आहे. मागे "आपण का लिहितो?" चा खो खो सुरू झाला होता. तो जरा कठीण होता. आपण कोणत्या गोष्टी का करतो हे शोधून काढणं भलतंच कठीण आहे. त्या मानाने आपल्याला आवडलेलं चिकटवणं एकदम सोपं.

जास्वंदी खो दिल्याबद्दल थँक्स. सहसा खो खो मध्ये माझा वेळ मला कुणी कधी खो देईल ह्याची वाट बघण्यात जायचा. मी ब्लॉगीय खो खो बद्दल बोलत नाहीये. मैदानी खो खो बद्दल बोलतोय. तेव्हा ब्लॉगवर का होईना, खो मिळाल्यामुळे भरपूर धावून घ्यायचं ठरवलंय.

दोन कविता पटकन सुचल्या. पहिली भाऊसाहेब पाटणकरांची आहे. ती आवडण्याचं कारण म्हणजे विनोदी ढंगाने जाणारी ही कविता पटकन जीवनाचं, की मृत्यूचं सत्य सांगून जाते. दुसरी कुसुमाग्रजांची आहे. ही कविता बहुतेक सर्वांना माहीत असेलच, पण माझ्या आवडत्या कवितांच्या यादीत हिचा नंबर खूप वरचा आहे म्हणून चिकटवतोय.

----- X -----

मृत्यू

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.

- भाऊसाहेब पाटणकर

----- X -----

कणा

‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी..,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी....

क्षणभर बसला, नंतर हसला... बोलला वरती पाहून
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’...

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी ? बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले...,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!

- कुसुमाग्रज

----- X -----

माझा खो गायत्री आणि संवादिनीला

गायत्रीला आधीच खो मिळालेला असल्याने मी माझा खो बदलत आहे. माझा खो दीपाला. तिच्या स्वतःच्या कविता खूप छान असतात. तिला आवडणाऱ्या कविता नक्कीच सुंदर असणार.

Wednesday, July 02, 2008

पार्टी

तो - पार्टी कधी?

ती - कसली?

तो - कसली काय? प्रमोशन कुणाला मिळालं? मला की तुला?

ती - मला.

तो - मग पार्टी कुणी द्यायची? मी की तू?

ती - तू.

तो - कसली कंजूस आहेस तू. अगं तोंडावर तरी हो म्हण. माझ्या ऍड ऑन कार्डावरून पैसे भर हवंतर. म्हणजे मलाही समाधान आणि तुलाही.

ती - म्हणजे मी मारल्यासारखं करते तू लागल्यासारखं कर.

तो - चालेल.

ती - अरे? चिडतोस काय? देईन मी पार्टी.

तो - नको.

ती - चिडका बिब्बा.

तो - मी? तूच चिडकी बिब्बी. उगाच नाही हिंदीत बायकोला बिब्बी म्हणत.

ती - प्रॉब्लेम काय आहे? तोंड का वाकडं तुझं? खूश व्हायला पाहिजेस तू.

तो - कुठे काय? सगळं छान तर आहे. मला चांगली नोकरी. तुला चांगली नोकरी. मला प्रमोशन तुला प्रमोशन. मला गाडी, तुला गाडी. मला..

ती - हे रे काय? तुझं माझं, तुझं माझं. आपलं म्हण.

तो - बरं आपलं.

ती - मग छानच तर आहे सगळं. तू असा का झालायस? स्वतःची शेपटी पकडण्यासाठी गोलगोल फिरणाऱ्या भूभू सारखा?

तो - हं. झालोय खरा.

ती - पण का?

तो - लग्नानंतर माणसाचं असंच होतं.

ती - बरं. मग नव्हतं करायचंस लग्न? का केलंस?

तो - शादी के लाडू. खाये तो पचताये न खाये तो पचताये. म्हटलं, पचतवायचंच आहे तर खाऊन पचतवा.

ती - तुझं लाडकं वाक्य आठवलं.

तो - कोणतं?

ती - खाऊन माजा पण टाकून माजू नका.

तो - इथे थोडं उलटं आहे. शादी चे लाडू खाणारा कधीच माजत नाही. ज्याच्या नावाने लाडू खातो ते माजतात.

ती - म्हणजे मी?

तो - मी तसं म्हटलेलं नाहीये.

ती - न म्हणता, दुसऱ्याला जे ऐकायला आवडत नाही ते म्हणण्याची कला तूच जाणे. तुला काय वाटलं? मला पचतवायला होत नाही?

तो - तुझ्याकडे बघून तरी तसं वाटत नाही.

ती - अरे मी म्हणून तुला सहन करते. दुसरी कुणी असती ना, मग कळलं असतं तुला.

तो - काय कळलं असतं ते कळलं असतं. पण आता काय उपयोग? हे सगळं आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं असं आहे. आता कसं काय कळणार? कितीही कळावं असं वाटलं तरी.

ती - ओ काका विथ मिशा. तुमचं स्वप्नरंजन बंद करा. आणि तुमचा असा स्वतःची शेपटी पकडणारा कुत्रा का झालाय ते सांगा?

तो - कुत्रा? आता खरा शब्द बाहेर निघाला. सुरवातीला भूभू म्हणाली होतीस. आता एकदम कुत्रा झालो काय मी?

ती - हे बघ हा वाक्प्रचार आहे.

तो - आता बघा कशी मराठी तांडवनृत्य करायला लागलेय जिभेवर? एरवी एक वाक्य सरळ बोलता येत नाही. मला शिव्या द्यायला मात्र मराठी.

ती - असं काही नाहीये?

तो - मग कसं आहे?

ती - तुला मी कुठल्याही भाषेत शिव्या देऊ शकते.

तो - इथेच प्रूव्ह झालं की तू मला शिव्या देतेस.

ती - त्यात प्रूव्ह करण्यासारखं काय आहे? मी खुलेआम हे मान्य करते.

तो - पण का?

ती - का म्हणजे? तू जर शिव्या देण्यासारखं वागलास तर मी शिव्या देईन नाहीतर काय ओव्या म्हणीन? तुझ्या सन्मानार्थ.

तो - हे अती होतंय.

ती - बरं होवूदे. अर्धा तास झाला मी तुला विचारतेय प्रॉब्लेम काय आहे? असं तोंड वाकडं करून बसायला काय झालं तर तू उत्तर देत नाहीयेस. कोण करतंय अती? मी की तू?

तो - मी.

ती - हं. मग काय झालं तरी काय?

तो - कुठं काय?

ती - तोंड.

तो - ओह ते. दात दुखतोय.

ती - अरे माणसा, मग हे पहिल्या वाक्याला सांगितलं असतंस तर इतकं भांडण कशाला झालं असतं.

तो - भांडण? कसलं भांडण?

ती - अत्ता आपण केलं ते?

तो - नाही दात जास्तच दुखत होता. लक्ष उडवायचं होतं त्याच्यावरून म्हणून. असं म्हणतात की कसला त्रास होत असेल, आणि त्यापेक्षा अधिक त्रासदायक काही घडलं की पहिल्या त्रासाचा विसर पडतो. म्हणून.

ती - टू मच.

तो - थ्री मच.

ती - बस बोंबलत आता दात घेऊन. पार्टी बिर्टी काही नाही.

तो - अगं गंमत केली.

ती - मीही गंमतच करणारे आता. ज्या दिवशी तो दात उपटून घेशील ना,त्याच दिवशी माझी पार्टी.

तो - अगं पण.

ती - ...

तो - बरं.

----------------------------------------------------------
चिकटवा चिकटवी करणाऱ्यांसाठी तळटीप. कृपया कुठून उचललेत त्याची लिंक द्यावी. मलाच माझं गेलं पोस्ट निनावी फॉरवर्ड म्हणून आलं. आता बोला?
http://nileshgadre.blogspot.com
----------------------------------------------------------

Wednesday, May 21, 2008

शिकरण

तो - झाल्या का पोळ्या? खूप भूक लागलेय.

ती - झाल्या ना. मलाही भूक लागलेय पण पोळ्या करायला वेळ लागतो.

तो - म्हणूनच सांगत होतो, लवकर स्वैपाकाला लाग.

ती - आणि तू काय करशील? सोफ्यावर बसून टी. व्ही. बघशील?

तो - तसं नाही गं. जरा जास्तच भूक लागली होती म्हणून जरा. ते जाऊदे. कसली भाजी आहे.

ती - नाही

तो - ही कोणती नवी भाजी? नाही?

ती - म्हणजे भाजी नाही.

तो - भाजी नाही? मग काय नुसत्याच पोळ्या खायच्या काय आज?

ती - हे बघ मला स्वैपाक करायला वेळ लागतो. सवय नाही. आणि तुला भात, भाजी, आमटी, पोळी सगळं लागतं. आज भाजी चिरायला वेळच मिळाला नाही.

तो - मला सांगायचं

ती - सांगितलं. पण कॉम्प्युटर समोर बसलास की तुझ्या कानाची होते फुंकणी. नळी फुंकिली सोनारे. इकडून तिकडे गेले वारे.

तो - मी फुंकणी आणि तू सोनार? जरा जोरात फुंकायचं ना. ऐकू आलं असतं.

ती - जेवायचंय ना? की फुंकर मारू अजून एक? माझ्या ऑफिसमधल्या लोकांना मी केलेल्या पोळ्या खूप आवडतात. तुला नसतीलच खायच्या तर ते खातील.

तो - नको. एवढं अन्नदान नको.

ती - कंजूस.

तो - मुद्दा तो नाही आहे. तू आज पोळ्या केल्यास म्हणून तुझे जाहीर आभार. पण आता त्या पोळ्या पाण्याबरोबर खायच्या का?

ती - नाही.

तो - हवेबरोबर?

ती - शिकरण केलंय. ते वाढून घे आणि गीळ किती गिळायच्यात त्या पोळ्या.

तो - शिकरण केलंय? अरेरेरे, काय ही भाषा. शिकरण स्त्रीलिंगी. ती शिकरण, ते शिकरण नाही.

ती - ई.... ती शिकरण काय. ते शिकरणच बरोबर आहे. ते केळं आणि त्याचं ते शिकरण.

तो - फालतू लॉजिक सांगू नकोस हं. तुला गाणं आठवतं का ते? केळ्याची शिकरण करायला गेली धुपकन पडली आत?

ती - आठवतं.

तो - मग मान्य कर की चूक झाली.

ती - चूक तुझी होतेय. मला आठवतंय, केळ्याचे शिकरण करायला गेली धुपकन पडली आत. चुकलायस तू मी नाही.

तो - हे बघ तू मला बाकी कशाचंही लेक्चर दे, पण मराठीचं देऊ नकोस.

ती - का बरं का? मी तुला कसलंही काही सांगायला लागले की तुझं हेच. हा विषय सोडून दुसरं कशाचंही लेक्चर दे. असे काय दिवे लावलेस रे तू मराठीत? पु. ल. देशपांडेच की नाही तू? की आचार्य अत्रे?

तो - अगदी तितका नसलो तरी थोडं फार लिहितोच की मी

ती - कुठे? ब्लॉगवर? काळं कुत्रंतरी वाचता का रे तुझा तो ब्लॉग? अरे ब्लॉग लिहिण्यापेक्षा जरा घरातली कामं कर, म्हणजे शिकरण खायची वेळ येणार नाही. मी एकटीने काय काय म्हणून करायचं.

तो - मुद्दा मी कुठे काय लिहितो हा नाहीये. मुद्दा हा आहे की माझं मराठी तुझ्यापेक्षा चांगलं आहे.

ती - हे आपलं तुझं मत. तुझ्या मताला मी किंमत देत नाही.

तो - ते माहितेय मला. आजचं का आहे ते. पण हे माझं मत नाही. दहावीत मला मराठीत ऐंशी मार्क मिळाले होते.

ती - मला एटीटू मिळाले होते.

तो - अगंपण माझी फर्स्ट लँग्वेज होती मराठी.

ती - लँग्वेज होती ना? मग तर झालं. मार्क कुणाला जास्त होते? मला. मग मराठी कुणाला जास्त येतं? मला? मग ती शिकरण का ते शिकरण? ते.

तो - च्यायला. तुला शिकवणारे धन्य आणि तुला मार्क देणारे त्याहून धन्य.

ती - ए. जास्त बोलू नकोस हां. माझी आईच शिकवायची मला. आणि तिला तिच्या आईने शिकवलं.

तो - तरीच.

ती - लाज नाही वाटत माझ्या माहेरच्यांना नावं ठेवायला?

तो - नावं ठेवायची नाहीत म्हणूनच तर लग्नात तुझं नाव नाही बदललं.

ती - फार उपकार केलेस हं. बदललं असतंस तर बदडलं नसतं तुला?

तो - पुन्हा विषयांतर करू नकोस. मुद्दा वेगळाच आहे.

ती - ते शिकरण

तो - ती शिकरण

ती - मी जेवतेय तुला हवंय?

तो - हो.

ती - पोळीबरोबर ते..... शिकरण देऊ का?

तो - मला ती शिकरण दे तू ते शिकरण खा.

ती - आता कसं शहाण्या मुलासारखं बोललास.

तो - थांब पोळ्या थंड झाल्यात मायक्रोव्हेव करून आणतो.

ती - शहाणा माझा बाळ.

तो - हं.

------------------------

हा फॉर्म (मला) भलताच आवडला असल्याने अजून एक संवाद

------------------------

Wednesday, April 16, 2008

नातं

"हा"मी - एक छानसं नातं.

"तो"मी - नातं?

"हा"मी - नात्याला नाव काय? नावंच नाही? शब्दकोश धुंडाळले तरी सापडलं नाही.

"तो"मी - नातं कसलं?

"हा"मी - एक तो. भारतातून श्रीलंकेत कामानिमित्त आलेला. एक ती. श्रीलंकन. तो ज्यासाठी आला त्या कामाचा आणि तिचा दूरान्वयेही संबंध नाही.

"तो"मी - बरोबर, मग कसलं नातं? कसलंच नाही.

"हा"मी - नाही कसं? तो आणि त्याची टीम जिथे बसतात त्याच मजल्यावर ती बसते.

"तो"मी - मी बसतो त्या माझ्या ऑफिसच्या मजल्यावर शंभर लोकं बसतात. काही नातं नाही माझं त्यांच्याशी. कुठल्याही ऑफिसच्या एखाद्या मजल्यावर कित्येक लोकं बसतात. त्यांच्यात कसलं आलंय नातं?

"हा"मी - हं बरोबर. पण तरीही नातं आहे. तो तिला काचेच्या खिडकीतून पाहतो आणि तीही कधीकधी. पण तिने त्याला पाहताना, त्याने जर तिला पाहिलं, तर मात्र ती पटकन आपलं डोकं कामात खुपसते.

"तो"मी - नीटसं कळलं नाही. पण नक्की दाल मे कुछ काला है. प्रेम वगैरे?

"हा"मी - नाही नाही. प्रेम नाही. तिचं तर लग्न झालंय.

"तो"मी - त्याचं?

"हा"मी - नाही. त्याचं नाही झालं.

"तो"मी - मग? विवाहबाह्य संबंध?

"हा"मी - काय शब्द पण शोधलाय? विवाहबाह्य संबंध. मऊ भात खाताना खडा दाताखाली यावा असा हा शब्द. विवाहबाह्य संबंध. नाही. तसलं काही नाही. तसा बाह्यात्कारी आतला बाहेरचा कसलाही संबंध नाही.

"तो"मी - म्हणजे नातंदेखील नाही.

"हा"मी - अंहं. नातं आहे. पण तोच तर लोचा आहे ना. ह्या नात्याला म्हणायचं काय?

"तो"मी - नुसतं एकमेकांकडे बघणं हे कसलं आलंय नातं?

"हा"मी - पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. कभी शाम जवाँ थी. मिल बैठे थे यार, आप मै और... तोच तो. बघ ना दारू देशांच्या सीमा जाणत नाही. कुठल्याही देशातले लोक कुठेही एकत्र येऊन टून होऊ शकतात. तसा तो आणि त्याच्या ऑफिसमधले श्रीलंकन मित्र. तमिळ इलम वरून घसरत घसरत गाडी पोरी बाळींवर येते. त्याचे श्रीलंकन मित्र त्याला विचारतात, आणि केवळ त्यांनी विचारलं, म्हणून आणि म्हणूनंच तो सांगतो. की त्या ऑफिसमधली सर्वात सुंदर मुलगी तीच.

"तो"मी - मग त्यात कसलं आलंय नातं? ऐश्वर्या राय सुंदर आहे. हे एक माझं मत मी दहा मित्रांना दहादा सांगितलं. मला खरं आवडलं असतं, पण माझं आणि ऍशचं नाही बुवा कसलं नातं.

"हा"मी - नाही. ऐश्वर्या राय ला सुंदर म्हणणारे एकटेच नसतो ना आपण. आणि आपण तिला सुंदर म्हटलं, हे तिला कळतही नाही. इथेच तर सगळी गंमत झाली. म्हणजे तो तिला ऑफिससुंदरी म्हणाला हे तिला कुणीतरी सांगितलं.

"तो"मी - मग काय त्यात घाबरायचं? सांगितलं तर सांगितलं.

"हा"मी - हं. पण इथेच तर नातं तयार झालं ना.

"तो"मी - कसलं नातं?

"हा"मी - सगळे शब्दकोश धुंडाळले तरी नाव नाही मिळालं.

"तो"मी - बरं पुढं? ती चिडली?

"हा"मी - नाही. ती नाही चिडली. त्याला वाटलं ती चिडेल. पण नाही चिडली.

"तो"मी - नक्की. विवाहबाह्य....

"हा"मी - नाही रे. तसलं काहीच नाही. तिला तिच्या ऑफिसख्या चिडवायच्या त्याच्यावरून. आणि त्याला त्याचे ऑफिसवंगडी तिच्यावरून. पण सगळं गमती गमतीत.

"तो"मी - असं गमतीत काही नसतं. कुणीतरी कुणालातरी कुणावरूनतरी चिडवत असेल आणि त्या कुणालातरी त्याचा राग येत नसेल ते ज्यांना चिडवतायत आणि ज्यांच्यावरून चिडवतायत त्यांचं प्रेम झालं असं समजावं.

"हा"मी - प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. डोंबलाचं प्रेम? ती शादीशुदा आणि तिच्या संसारात समाधानी. तो त्याच्या देशातल्या मुलींवर समाधानी. प्रेम बीम काही नव्हतं रे.

"तो"मी - अरे मग होतं काय?

"हा"मी - तोच तर ओरिजिनल प्रश्न आहे, की होतं काय?

"तो"मी - बरं मग पुढे काय झालं?

"हा"मी - काही नाही. त्याचा प्रोजेक्ट संपला. ते शहर सोडायची वेळ आली. सगळ्यांना भेटला तसा तो तिलाही भेटला जायच्या आधी. तिने त्याला ऑल द बेस्ट केलं. त्याने थँक यू म्हटलं. जसं तो उरलेल्या चार लोकांशी बोलला तसंच तो तिच्याशी बोलला. ते बोलून झाल्यावर आणखी बोलायचं काही शिल्लकच राहिलं नाही. तो वाक्य शोधत राहिला, पण मिळाली नाहीत. त्यामुळे त्याला जावंच लागलं. तिलाही वाटत होतं की त्याने अजून दोन वाक्य बोलावीत, पण ती त्याला सुचली नाहीत आणि तो गेला. दोन डोळ्यांच्या कडा, हलकेच ओल्या झाल्या.

"तो"मी - बरोबर. त्याला वाईट वाटलं असणार.

"हा"मी - त्याला नाही. तिलाही वाटलं. म्हणून दोन डोळे म्हटलं. एक तिचा, एक त्याचा.

"तो"मी - मग?

"हा"मी - मग काय? ईमेल मधून ते बोलत राहिले मधून मधून.

"तो"मी - सुचलं.

"हा"मी - काय?

"तो"मी - नात्याला नाव सुचलं.

"हा"मी - कोणतं?

"तो"मी - इ-मित्र.

"हा"मी - नाही रे. मित्र नाही. मित्र म्हणजे वेगळं, हे वेगळं.

"तो"मी - हे बघ, बुवा आणि बाई हे जर एकमेकांचे नातेवाईक नसतील, तर आपल्याला फक्त दोनंच नाती कळतात. प्रेम नसेल तर मैत्री आणि मैत्री नसेल तर प्रेम. ऍक्च्युअली मैत्री वगैरे सुद्धा झूटंच आहे. खरंतर प्रेम किंवा नथिंग.

"हा"मी - पण हे प्रेम नाही, मैत्री नाही आणि नथिंगही नाही. सगळे शब्दकोश धुंडाळले पण नाव नाही सापडलं.

"तो"मी - संपली स्टोरी?

"हा"मी - नाही. मग पुढे त्याचं लग्न झालं. त्याने तिला लग्नाला बोलावलं. ती आली नाही. शक्यच नव्हतं.

"तो"मी - संपली?

"हा"मी - जाऊदे. तुला ऐकायचंच नाही तर ...

"तो"मी - हं बरोबर, झालं सगळं रामायण आणि म्हणे रामाची सीता कोण? तुला त्यांचं नातं नक्की कोणतं हे कळलं की मला कळव.

"हा"मी - अजिबात नाही. प्रेम किंवा नथिंग ही दोनच नाती तुझ्यासाठी ठीक आहेत.

"तो"मी - मग सांग ना त्यांचं नातं कोणतं? प्रेम की नथिंग?

"हा"मी - नथिंग.

Friday, April 04, 2008

का?

रात्रीचे साधारण अकरा वाजलेले. नुकताच ऑफिसमधून परतलेला मी. दिवसभराच्या कामाने जीव कंटाळलेला. पण एक अनामिक समाधान. काहीतरी पूर्णत्वाला जात असल्याचं. खरंच आपण काम कशासाठी करतो? पगार मिळावा, पैसा मिळावा म्हणून की कामातून एक समाधान मिळतं म्हणून? कुठे आपलं कौतुक होतं, कुठे आपला अहं सुखावतो, म्हणून?

तितक्यात आतून ललित येतो. ललित म्हणजे इथल्या कंपनीने आमच्या मदतीला दिलेला हरकाम्या. गंमत म्हणजे आम्हाला तो हरकाम्या वाटतंच नाही. मित्रच वाटतो. त्याला इंग्लिश येत नाही, आम्हाला सिंहली येत नाही, त्यामुळे बराचसा व्यवहार खाणाखुणांनीच चालतो. तो खरंतर झोपेतूनच उठलाय, पण चेहऱ्यावर कंटाळा नाही. का करत असेल हा काम? समाधान मिळतं म्हणून? लोकांची धुणी धुण्यात कसलं आलंय समाधान?

त्याला आता आम्ही काही इंग्रजी शब्द शिकवलेत. तो मला डिनर आणि पाठी प्रश्नचिन्हात्मक उद्गार एवढंच विचारतो. मी त्याला मान हालवून नाही सांगतो. तो त्याची नाराजी सिंहलीतून ऐकवतो. मला काहीच कळत नाही. बहुतेक त्याने जे काय बनवलंय ते फुकट जाणार असा काहीसा त्याचा सूर. मी त्याला डिनर येस म्हणून सांगतो.

तो मस्त केळ्यासारखं ह्या गालापासून त्या गालापर्यंत हसतो. देवाची रंगसंगती बघा. काजळासारखा काळा त्याचा रंग आणि मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात. झटकन आत जाऊन तो जे काही बनवलेलं असतं ते घेऊन येतो. मला देतो आणि निघून जातो. खुणेनेच ताट किचनमध्ये ठेवून जा, हे सांगायला विसरत नाही.

मी नको असलेलं ते अन्न चिवडत बसतो. आपण नको असलेल्या गोष्टी का करतो? पैशासाठी? स्वतःच्या समाधानासाठी की दुसऱ्याच्या समाधानासाठी? जसा मी आज हे नको असलेलं विचित्र श्रीलंकन जेवण जेवतोय, पोटभर जेवण झालेलं असतानाही?

आम्ही दिवसभर काम करून दमतो, म्हणून आमच्या समाधानासाठी ललितने जेवण बनवायचं, आम्हाला पोटभर जेवल्याचं समाधान मिळावं म्हणून. आणि बाहेर पोटभर जेवण झाल्यावर आम्ही घरी यायचं आणि त्याने केलेलं न रुचणारं जेवायचं, त्याचं समाधान व्हावं म्हणून. का नाही मी सांगत त्याला? की बाबारे नाही आवडत तू जे काय बनवतोस ते. नको बनवू?

सगळंच मोठं विचित्र आहे. भारताच्या चार कोपऱ्यातून आलेले आम्ही चार श्रीलंकेत येतो काय, आणि हा त्याच्या गावाबाहेर सुद्धा कधी न पडलेला ललित आम्हाला येऊन मिळतो काय. जर शक्यता बघितल्या तर अशा पाच व्यक्ती एकत्र येण्याची शक्यता किती? नगण्य. पण अशा व्यक्ती एकत्र येतात. नुसत्या येतच नाहीत तर मैत्री होते त्यांची. तो नोकर आम्ही मालक असं कधी वाटतंच नाही. तोही आमच्यातलाच एक होतो. खुणांनी गप्पा मारतो, प्रसंगी ओरडतो, आम्हाला सिंहली शिकवतो आणि आम्ही त्याला इंग्लिश शिकवतो.

नको असलेलं जेवण कसंबसं पोटात ढकलून मी बाहेर हॉलमध्ये येतो आणि बाल्कनीत जाऊन उभा राहतो. बाहेरचा दमटपणा मुंबईची आठवण करून देणारा. रस्ते दिशाहीन वाटतात. परके वाटतात. मध्येच एखादी गाडी शांततेचा भंग करीत जाते. झोप डोळ्यात पेंगत असते पण तरीही झोपावंसं वाटत नसतं.
हातातल्या फोनवरून मी कॉलिंग कार्डाचा नंबर फिरवतो. समोरून एक यंत्रबाई पाचशे रुपये बॅलन्स आणि दहा मिनिटं वेळ असल्याचं सांगते. बराच वेळ कंटाळवाणं संगीत ऐकल्यावर एंगेज टोन. पुन्हा नंबर, पुन्हा बॅलन्स, पुन्हा संगीत, पुन्हा एंगेज टोन.

मी माझ्या घराला सोडून इकडे येऊन राहिलो कशासाठी? पैशासाठी कदाचित. कदाचित सेल्फ ग्रॅटिफिकेशनसाठी, कदाचित अहं कुरवाळण्यासाठी. आणि ललित का इथे येऊन राहिला? कदाचित त्याच कारणांसाठी. त्याचं घर त्याच्या गावात, आमचं घर भारतात. मिस करत असू का आम्ही सगळे आमचं घर? तो त्याचं, आम्ही आमचं. आणि मग त्यातूनच होत असेल का एक प्रयत्न. आपलं घर सिम्युलेट करण्याचा. नाती सिम्युलेट करण्याचा. आपण कुणासाठीतरी काहीतरी करतो हे समाधान ढापण्याचा किंवा कुणीतरी आपल्यासाठी काही करतो ह्यात समाधान मानून घेण्याचा?

पुन्हा नंबर, पुन्हा बॅलन्स, पुन्हा संगीत, पुन्हा एंगेज टोन. मी फोन बंद करतो आणि झोपायला जातो.

Wednesday, March 19, 2008

भीती

रात्रीचा तीनाचा सुमार. त्याच्या आलिशान बंगल्यातल्या स्विमिंग पुलामधलं पाणी वाऱ्याच्या झुळकेसरशी चुळुक चुळुक वाजत होतं. स्विमिंग पूलच्या शेजारीच दोन माणसं पेंगत बसली होती. बंगल्याच्या दरवाज्यापाशी आणखी दोघं होते. ते मात्र सावध होते. आपल्या अजस्र बेडरूममध्ये बिछान्यावर तो पडला होता. सगळीकडे साखरझोपेची बेदरकार शांतता पसरली होती आणि त्या प्रचंड बंगल्यातल्या कुठल्याश्या कोपऱ्यात असणाऱ्या घड्याळाने तीनाचे टोल दिले.

पहिला टोल पडून दुसरा पडायच्या आतच तो चपापून जागा झाला. नकळत हात उशीखाली गेला. तीक्ष्ण नजरेने त्याने आजूबाजूला पाहिलं. कुठंच काही हालचाल दिसली नाही. तसाच तो खिडकीपाशी गेला. स्विमिंग पुलापाशी पेंगत बसलेले ते दोघे तसेच डुलक्या देत बसले होते. एकदा जोरात ओरडून त्यांना उठवावं असं त्याला वाटलं. हेवा वाटला त्याला त्यांचा. सगळं शांत आणि आपल्याच कोशात गुरफटलेलं वाटलं. तरीही तो दबकत गॅलेरीपर्यंत गेला. बाहेरच्या दरवाज्यावरचे दोघं दबक्या आवाजात बोलत होते. त्याने डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहिलं. पहिला दुसऱ्याच्या सिगारेटवरून स्वतःची सिगरेट पेटवून घेत होता. एकंदरीत सगळं नेहमीसारखंच होतं. हृदयाची धडधड कमी झाली. तो तसाच बिछान्याकडे परत आला.

... भोसडीच्यांना हजार वेळा सांगितलं ते घड्याळ काढून टाका म्हणून. साला एक ऐकेल तर शपथ.....

झोपायच्या आधी तो बिछान्यावर कडेला बसला. टेबलावर ठेवलेली झोपेच्या गोळ्यांची बाटली उघडून एक गोळी त्याने तोंडात टाकली. एक आवंढा गिळून ती तशीच गिळून टाकली आणि बाजूला ठेवलेली बाटली तोंडाला लावून त्यातलं पाणी तो गटागट प्यायला. झोपेच्या गोळीचा परिणाम होईल की नाही होईल ह्याचा विचार करत करत तो बिछान्यावर पडला. डोळे टक्क उघडे होते आणि छताला लटकवलेलं उंची झुंबर त्याच्याकडे दुर्लक्ष करून झोपलंय असं त्याला वाटलं.

... बाप झुंबराच्या कारखान्यात काम करायचा. काचेच्या भट्ट्या, लाल बुंद तापलेली काच. सगळीकडे गरमी भरून राहिलेली. जिंदगीभर तिथेच सडला साला. लोकांच्या घरातली छतं सजवत राहिला आणि स्वतःच्या घरी? घर कसलं, झाटभर झोपडी साली.....

झोप न येणाऱ्या डोळ्यांत नको त्या जुन्या आठवणी जाग्या व्हायला लागल्या.

.... झोपडपट्टीच्या बाजूला असलेली रेल्वे लाइन, रात्री बेरात्री धडधडत जाणाऱ्या गाड्या, पहाटेच्या वेळी दिवस उगवायच्या आत ट्रॅकवर छत्र्या घेऊन हगायला बसलेल्या बायका. साला काय घर म्हणायचं त्याला. संडास होता संडास. एक भला मोठा संडास. तो उकिरडा म्हणजेच शाळा, म्हणजेच खेळायचं मैदान. तो राजा, किश्या आणि तो मी. दहा दहा दिवस अंघोळ न केल्याने त्यांच्या शरीराला येणारी घाण. केसांच्या जटा. त्यावर राजरोस फिरणाऱ्या उवा. ती रोजची भांडणं, मारामाऱ्या. पाच वर्षाचा मी आणि माझ्यापेक्षा मोठी ती पोरं. मारायची मला. बेदम कुदकायची आणि मी जायचो घरी रडत. बाप म्हणायचा, भडव्या मुलींसारखा घाबरतोस त्या पोरांना. वर मलाच मारायचा. एक दिवस खोपडीच सणकली साला आपली, घेतला एक दगड आणि घातला किश्याच्या डोक्यात. साला रडायला लागला. म्हटलं, भेंचोत रडतोस काय मुलीसारखा? घाबरतोस काय मला? आपण बघ. आपण कुणाला घाबरत नाही. कुणाच्या बापाची भीती नाही आपल्याला. धडधणाऱ्या ट्रेनच्या आवाजात त्याचं रडू हरवलं होतं नाही? ......

आपल्या पराक्रमाचं कौतुक त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. पण अजूनही झोप लागली नसल्याचं त्याला लक्षात आलं.

...... आईघाल्या साला. एक औषध बरोबर देईल तर शपथ. साला झोप येण्याची गोळी आहे का झोप जाण्याची? आणि वर म्हणे दारू पिऊ नका. अरे दारू प्यायची नाही तर झोपायचं कसं. ह्या तुझ्या झुरळाच्या लेंड्यांसारख्या दिसणाऱ्या गोळ्या खाऊन?....

पाण्याच्या बाटलीशेजारी असलेली दारूची चपटी बाटली त्याने तोंडाला लावली. पुन्हा टक्क डोळ्यांनी तो झुंबराकडे पाहायला लागला.

..... असंच एक झुंबर होतं रहमानच्या ऑफिसमध्ये. हुशार होता साला. मला सांगायचा पाकीट घेऊन जा आणि अण्णाकडे पोचतं कर म्हणून. आपल्याला काय माहीत आत काय आहे ते. पंधरा वर्षाचा छोकरा होतो तेव्हा मी. पण तिथला तो छोकरा, तंबी म्हणायचे त्याला. चुणचुणीत होता साला. त्यानेच मला पहिली सुपारी मिळवून दिली ना. रहमानची. अजून आठवतं. दोघांनी मिळून बेदम चोपलं रहमानला. साला हरामी माफ करो माफ करो म्हणून रडायला लागला. तंबीने मला घोडा दिला. म्हणाला मार. पिस्तूल हातात घेतली. पण घोडा ओढायचा धीर होईना. तंबी म्हणाला चुत्या मार. अभी इसको नही मारा तो वो तेरी मारेगा. मार भडवेको. तो मला मारणार? चड्डी ओली होते की काय वाटायला लागलं. प्रचंड भीती वाटायला लागली. हा भोसडीचा मला मारणार? नाही. नाही. मीच ह्याला मारणार. एकदम रग डोक्यात गेली. चाप ओढला. गोळी बरोबर रहमानच्या डाव्या बाजूला छातीत लागली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रहमान तडफडत तडफडत मेला. मेंदू हल्लक झाला. तंबी केव्हाच तिथून सटकला होता. पोलिसांच्या सायरनचा आवाच झाला. मी घाबरलो धावत सुटलो. धावलो. धावलो. किती वेळ कुणाला माहीत. तेवढ्यात पोटात एक गुद्दा बसला. पोलिसच. मायझंवे. बदडून काढला साल्याला. अरे आपण पोलिसाला पण भीत नाही......

सायरनच्या आवाजाने तो भानावर आला. आता? पोलिस? सायरनचा आवाज जसा जसा जवळ यायला लागला तसा मनातून तो घाबरला. पण सायरनचा आवाज जसा जवळ जवळ आला तसाच लांब लांब निघून गेला. अजूनही त्याला झोप लागली नव्हती. पुन्हा तो स्वतःच्या विचारांच्या गुंत्यात गुंतत गेला.

...... रहमानला मारून आणि पोलिसांना चकवून आपण किती दिवस काढले. पुढे गफूर भेटला. गफूरच साला. हरामजादा. रंडीबाजीचा नाद साल्याला. तोच घेऊन गेला मला कमाठीपुऱ्यात पहिल्यांदा. म्हटलं आपण हे असलं काही करत नाही. तर म्हणाला बाईला घाबरतोस साल्या. छक्का आहेस का? पुरूष असून बाईला घाबरतोस. भीती? मला? त्याला म्हटलं, साल्या मी कुणालाही भीत नाही. डोक्यात खून चढला. समोर दिसली ती पहिली रांड उचलली आणि ओरबाडून काढली रात्रभर. मी घाबरतो म्हणे .....

आवेगाने बिछान्यात त्याने कूस बदलली. गुडघ्याची जखम चादरीवर घासली आणि डोक्यात एकच कळ गेली आणि तो कळवळला.

...... आईगं. आईची लहानपणापासून भीती वाटायची. चूक केली की तिच्या लक्षात येणार माहीत होतं. पहिला राडा केला तेव्हापण वाटलं आई घरी गेल्यावर ओरडेल. भीती वाटली. तंबीला सांगितलं तर तंबी म्हणाला आईला घाबरतोस? दुधपीता बच्चा है क्या तू? मी कुणालाच घाबरत नाही. त्यानंतर आईसमोर गेलोच नाही. अगदी शेवटपर्यंत. ती गेली तेसुद्धा महिन्याने कळलं........

पांघरूण घेऊनसुद्धा कुडकुडायला होत असल्याचं त्याला जाणवलं. बेडरूमच्या भिंतीवर एसी घुमत असलेला त्याने ऐकला. एवढा वेळ एसीचा आवाज त्याला जाणवला पण नव्हता पण आता तोच आवाज त्याला त्रासदायक वाटायला लागला. तो बिछान्यातच पडलेला एसीचा रिमोट कंट्रोल उचलून तो एसी बंद करायचा प्रयत्न करू लागला. एसी बंद झाला. त्याला हायसं वाटलं. आता खुट्ट झालं तरी त्याला ऐकू येणार होतं. काही केल्या झोप मात्र येत नव्हती. गेले काही दिवस असंच चाललं होतं.

..... साला दिवस फिरले की काहीच चालत नाही. माझ्या पैशावर जगणारे, माझी पायताणंसुद्धा डोक्यावर घेऊन नाचायला तयार असणारे मंत्री. सगळे सगळे फिरले. छोटा मासा आणि मोठा मासा. कालपर्यंत मी मोठा मासा होतो. आज मी छोटा मासा म्हणून सगळे माझ्या मागे. नाही पण हेही दिवस जातील. म्हणून तर इथे आलोय. कुणालाच माहिती नाहीये हे ठिकाण. फक्त मला आणि......

बाजूच्या मशीदीतली अजान अचानक सुरू झाली आणि तो भानावर आला. सकाळ होत आली म्हणून त्याला बरंही वाटलं आणि झोप लागली नाही म्हणून वाईटही. तो बिछान्यावर उठून बसला. आणि तो बिछान्यातून उठणार इतक्यात सायरनचा आवाज ऐकू यायला लागला. नक्कीच पोलिसांचा सायरन होता तो. चारी बाजूंनी आवाज यायला लागला. खिडकीपाशी जाऊन त्याने पाहिलं तर खरंच पोलिसांच्या गाड्या समोर दिसत होत्या. मागच्या बाजूच्या खिडकीशी तो गेला तिथेही पोलिस दिसत होते. गोळ्यांचा आवाज यायला लागला धुमश्चक्री सुरू झाली. तो मटकन खाली बसला. समोरची खिडकीची काच खळकन फुटून त्याच्या समोर पडली. चकचकीत पांढऱ्या फरशीवर बंदुकीची गोळी टकटक आवाज करीत शांत झाली. तो तसाच रांगत पलंगाकडे गेला. उशीखाली हात घातला. त्याचं पिस्तूल तिथेच होतं. ते त्याने हातात घेतलं. क्षणभर सुन्न होऊन तो तसाच बसून राहिला. बाहेरून गोळ्यांचे आवाज येतंच होते. खिडक्यांच्या काचा फुटत होत्या. आजूबाजूला काचांचा सडा पडला. घाबरून तो पलंगाखाली शिरला. थोड्या वेळाने बंदुकांचा आवाज थांवला.

..... गेले. चारही गेले. मागचे दोन आणि पुढच्या दरवाज्याकडचे दोन. आता मी एकटा आणि पोलिस......

पलंगाखालून तो बंदूक घेऊन बाहेर आला. बेभान होऊन तो खोलीभर फिरू लागला. पायाला लागणाऱ्या काचांचीसुद्धा जाणीव त्याला होत नव्हती. अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. तो थरथर कापत होता.

..... मरण. माझं मरण. मरणाची भीती? कुणाच्या बापाला घाबरत नाही मी साल्यांनो. या. एकेकाचा मुडदा पाडतो की नाही ते बघा. हरामखोर साले. खाल्ल्या अन्नाला जागा कुत्र्यांनो. मला पकडणार? मला मारणार? मला भीती घालता? अरे जा रे जा. नाही हात हालवत परत जायला लागलं तुम्हाला तर नाव नाही सांगणार. मरण माझं मरण. नाही. नाही. नाही. अग आईगं .....

जिन्यावर बुटांचा खडखडाट झाला. पोलिस त्याच्या बेडरूममध्ये घुसले. काचा इतस्ततः विखुरल्या होत्या आणि त्यांचा मध्ये तो आडवा पडला होता. डोक्यातून रक्ताची धार लागली होती आणि हातात पिस्तूल होतं. त्याचे डोळे सताड उघडे होते आणि डोळ्यात दिसत होती फक्त भीती. आयुष्यभराची साठून राहिलेली भीती.

Thursday, January 24, 2008

ठोका - पडलेला आणि चुकलेला

रात्रीच्या मिट्ट काळोखात, अमावास्येच्या चंद्राच्या नसलेल्या अस्तित्वाला शोधत तो एकटाच गॅलेरीत बसला होता. समोरचं लाल मातीचं अंगण, अंगणापलीकडे अंगात आल्यासारखे वाऱ्यावर बेभान होऊन नाचणारे माड. किंचित करड्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर, त्यांचा काळाकभिन्न झावळ्या आणि ह्या अघोरी नृत्याला साथ म्हणूनच की काय, वाऱ्यावर तरंगत त्याच्यापर्यंत येणारी समुद्राची गाज.

तो तिथे एकटाच बसला होता कारण तो एकटाच होता. अगदी एकटा. सरकारी नोकरीमागे ह्या आडगावात तो कसा येऊन पोचला, त्याचं घर, मित्र, आई वडील सगळं सगळं त्याला आठवलं. तशी आठवण त्याला रोजच येई पण आजच्या दिवशी ह्या वेळी खासच. त्यात साडेअकरा होऊन गेलेले, बाराचा ठोका जवळ येत चाललेला, जुन्या आठवणींचा महापूर आला, दिव्याजवळच्या भिंतीवर काजळीची पुटं चढावी तशी निराशेची पुटं त्याच्या मनात चढायला लागली. सोबतीला अमावास्येची काळी रात्र, घोंघावणारा वारा आणि समुद्राची गाज.

तो एकटा आणि त्याच्यासाठी असलेला हा डाक बंगला. दोघेही एकटेच. गावाबाहेर असलेला हा अवाढव्य डाक बंगला खरंतर त्याला नको होता पण दुसरा पर्यायच नव्हता. आताशा त्या डाक बंगल्यासारखीच त्यालाही एकटेपणाची सवय झाली होती. दिवसाचा प्रश्न नव्हता, पण रात्री खायला उठतं, त्यात अशी अमावास्येची भयाण रात्र.

राहून राहून एकच दिलासा होता, तो म्हणजे फोन. अजून कसा आला नाही फोन? त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने हातातल्या रिस्ट वॉच मध्ये पाहिलं. घड्याळ दहा ची वेळ दाखवत होतं. दिवाणखान्यातून तो त्या झाडाला विळखा घातलेल्या सापासारख्या गोलाकार जिन्याच्या पायऱ्या चढून वर आला तेव्हा तर साडे अकरा वाजले होते. म्हणजे घड्याळानं ऐन वेळेला दगा दिला होता.

पण एव्हाना बारा वाजायला पाहिजे होते. अजून कसा फोन आला नाही. खाली जाऊन वेळ पाहून येण्याची त्याची इच्छा नव्हती. त्या गोलाकार जिन्याचा तर त्याला तिटकाराच होता. शिसवी जिना तो पण पुरता खिळखिळा झाला होता. आणि भयानकही. अगदीच नाईलाज होता म्हणून तो जिना वापरात होता. खरंतर हा बंगलाच.

गेल्या वर्षी ह्याच दिवशी त्याने तिला आपलं मनोगत सांगितलं होत. गोरखगडावरची ती गुहा, आजूबाजूला असलेली मित्र मंडळी, त्यातच तिला भर रात्री तो वरती अवघड वाटेने देवळाच्या इथे घेऊन गेला होता. सगळं सगळं त्याला आठवलं. ते खाली आल्या नंतरचं सेलेब्रेशन. सगळे मित्र त्याचं अभिनंदन करीत होते, पण कुणालाच त्यांचं गुपित माहीत नव्हतं. त्याचं मित्रांच्या बोलण्याकडे नसलेलं लक्ष, त्यावरून पडलेल्या शिव्या. सगळं सगळं. तिला आपल्या मनातलं सांगण्याआधी झालेली हृदयाची धडधडही आता स्पष्ट आठवली.

आठवली की ऐकू आली? क्षणभर तो गोंधळला. काय ऐकलं मी? कसली धडधड. मनातले विचार आणि आणि सत्य ह्याची त्याच्या मनात गफलत तर नाही ना झाली? अचानक त्याच्या मेंदूला कोडं सुटलं, आवाज त्या शिसवी जिन्याचा होता. पण मी इथे असताना कोण? आवाज तर नक्की ऐकला. नक्की. की धडधड? माझ्याच हृदयाची? मी घाबरलोय? कोणाला? जोरात ओरडावं असं त्याला वाटलं. पण ओरडून उपयोग नव्हता कारण ऐकायला कोण होतं?

मनाचा हिय्या करून तो आत जिन्याच्या दिशेनं गेला. आत शिरताच जिन्याजवळच्या दिवा लावायला बटणाकडे त्याचा हात गेला. बटण हाताला लागताच तो चपापला कारण दिव्याचं बटण चालू होतं, पण दिवा बंद होता. गेले वाटतं दिवे? त्याने कारण शोधलं. पण मी गॅलेरीत येताना दिवा बंद करून आलो नेहमीप्रमाणे. मग हा दिवा चालू कसा? गॅलेरीच्या दरवाज्यातून गारवा आत सांडत होता, पण त्याचा सदरा मात्र घामाने भिजून गेला.

समोर खाली तो अवाढव्य दिवाणखाना पसरला होता. अमावास्येच्या अंधारात घरातल्या वस्तू विचित्र दिसत होत्या. भिंतीवर लावलेल्या वाघाच्या कातडीला पाहून तो चपापला, बाजूचं तरसाचं तोंड हालतंय की काय असं त्याला वाटायला लागलं. त्याने जरा निरखून पाहिलं. तो सावलीचा खेळ होता. सगळ्या वस्तू ठेवल्या जागी होत्या. जिनाही आपल्याच गुर्मीत वेटोळे घालून पडला होता. त्याला थोडं हायसं वाटलं.

वाजले असतील का बारा? गॅलेरीत ठोके ऐकू येत नाहीत पण वाजायचे असतील अजून तर बाराचे ठोके नक्की ऐकू येतील. फोन पण आला नाही, पण एव्हाना वाजायला हवे होते बारा. तो हळू हळू जिना उतरून खाली आला. शेवटच्या पायरीलगत असलेल्या खांबावर सिंहाचं तोंड कोरलं होतं, तिथे त्याने घट्ट पकडलं आणि भिंतीवर तो खालच्या दिव्याचं बटण शोधायला लागला. हाताला बटण लागलं आणि तो घाबरलाच. कारण हेही बटण चालू होतं. वीज गेल्येय. मघाशीही त्याला हे लक्षात आलं होतं? मग? पण मी वर येताना दिवा नक्की बंद केला होता, कुणी चालू केला? चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी घाम गळायला लागला. त्या घामाच्या थेंबांच्या चेहऱ्याला झालेल्या स्पर्शानेसुद्धा तो दचकला.

तेवढ्यात स्वयंपाकघरातून काहीतरी पडल्याचा आवाज झाला. त्याही अवस्थेत, खिशात विजेरी असल्याचं त्याला लक्षात आलं. त्याने विजेरी चालू केली आणि तो स्वयंपाकघरात घुसला. जमिनीवर चाकू पडला होता. हा माझ्या हातून इथं पडणं शक्यच नाही. तितक्यात बाहेरून कसलासा आवाज आला. तो बाहेर धावला. बाहेर सगळं सामसूम होतं. त्याने विजेरी मारून इथे तिथे पाहिलं, काही हालचाल नव्हती.

नक्की ऐकला, वरूनच आला हा आवाज. तो विजेरी घेऊन पायऱ्या चढायला लागणार इतक्यात किचन मधून आवाज आला. तो होता त्या जागी थबकला. दुसऱ्या खोलीच्या दिशेनेही आवाज आला. मग तिसऱ्या खोलीतून, पुन्हा वरून, किचनमधून. घामाची अंघोळ झाली, मनातला ताण असह्या झाला आणि तो जिवाच्या आकांताने ओरडला आणि कानावर हात ठेवून खाली वाकला. क्षणभर सन्नाटा पसरला. त्या शांततेला उभा आडवा कापत एक आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला. तो कसला हे कळायला त्याला दोन क्षण लागले. त्याचा फोन वाजत होता. त्याही अवस्थेत फोन आला ह्याचं त्याला बरं वाटलं.

तो हळू हळू फोनच्या दिशेने निघाला. पुन्हा मगाचचे आवाज सुरू झाले, तो प्रचंड घाबरला. आवाज अधिकाधिक वाढायला लागले, आता तो खोलीच्या मध्यावर पोचला. फोन वाजायचा बंद झाला आणि दिवाणखान्यातल्या घड्याळाने बाराचे टोल द्यायला सुरवात केली. टोल सुरू होताच मगाचचे ते आवाज बंद झाले, बाराचा बारावा टोल झाला आणि साटकन घरातले सगळे दिवे लागले, एकदम डोळ्यावर आलेल्या प्रकाशाने त्याने डोळे मिटून घेतले आणि मटकन तो खाली बसला.

Haappy Birth Day to You!!!

सगळ्यांनी एकच गिलका केला. त्याची सगळी गँग मुंबईहून खास त्याच्या वाढदिवसासाठी आली होती. साने, बाल्या, अंडू, पराग, काणी, मृदुल सगळे होते. त्याला वास्तवात यायला थोडा वेळ लागला. तितक्यात किचनमधून तीही आली, हातात केक घेऊन आणि तो कापायला मघाशी जमिनीवर पडलेला सुरा. साल्यांनो फाटली ना माझी, म्हणत तो उठला, फोन बघितला. मिस्ड कॉल फ्रॉम आई बाबा. सगळ्यांचे वाढदिवस बरोबर बारा वाजता साजरा करायची त्यांच्या ग्रुपची परंपरा अशा प्रकारे चालूच राहिली.

पडलेल्या बाराच्या ठोक्याला त्याच्या छातीचा ठोकाही चुकला होता. पण त्याला आता परवा नव्हती. आता तो वाढदिवस झोकात साजरा करणार होता.

Saturday, January 05, 2008

पुन्हा मी

जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने पाहिल्या की वेगळ्या वाटतात का? गोष्टी बदलतात की आपण बदलतो? कदाचित संदर्भ बदलतात.
तेच रस्ते, त्याच गल्ल्या, तीच माती, तीच धूळ पण कदाचित तोच नसलेला मी.

लबाड मांजरासारखा मी डोळे मिटून राहिलो
समोरचं दूदू गटागटा प्यायलो.

मांजरं मूर्ख असतात, त्यांना वाटतं कुणीच त्यांना पाहत नाही.
पण खरंच मला कुणीच पाहत नाही
कारण आजूबाजूला सगळीच मांजरं आहेत
त्यांनाही वाटतं त्यांना कुणीच पाहत नाही आणि खरंच कुणीही पाहत नसेल,
कारण इथे सगळीच लबाड मांजरं आहेत.

पण मी मात्र माझा वेगळा बाणा दाखवतो
हळूच पापणी किलकिली करून एका डोळ्याने पाहातो.

दिसतात मला साजरे नसलेले डोंगर
कसे बरं दिसले होते स्वप्नात? स्वप्नवत

अचानक समोरचा सिग्नल सुटतो,
जो तो मीठासारखा पेटतो आणि हॉर्न मारत सुटतो.

ती रिक्षा, ती टॅक्सी, तो जडावलेला ट्रकही सरसावतो,
जाता जाता सायकलावलाही मला दरडावतो

आवाजाचा कलकलाट असह्य होतो,
समोरची धुळवड असह्य होते

मी लगेच उघडलेले डोळे बंद करतो
तडक उठतो आणि एका मॉलमध्ये जातो.

आतली गार हवा मला शांत करते, सगळा शीण सरतो
आतमधला झगमगाट माझा खिसा रिकामा करतो.

तृप्त मनाने मी बाहेर येतो,
सगळा इंडिया शायनिंग होतो

माझ्या वातानुकुलित गाडीत बसून मी पुन्हा डोळे मिटून घेतो
गार गार हवेत मी स्पिरिचुअल इन्स्पिरेशन शोधतो

सेल्फ ऍक्चुअलायझेशन होऊन पुन्हा डोळे उघडतो
सताड डोळ्यांनी थंड काचेपलिकडे पाहतो

रस्त्याच्या बाजूला लोक करू नये ते करीत असतात

भिकारणीच्या गळ्यात सोन्याचा साज
हगत्या लाज का बघत्या लाज?

मनातले मांडे मनातच राहतात, आणि नको ते घडतं
उतरलेलं विमान पुन्हा आकाशात उडतं

गर्दी विलोभनीय वाटायला लागते, धुळीला मृद्गंध सुटतो
दुरून डोंगर साजरे हा फॉर्म्युला पुन्हा मनाला पटतो

दर वर्षी मी येतो दर वर्षी असं होतं
हातात असतं ते नेहमीच मला नकोसं होतं

मग मी पुन्हा डोळे मिटून घेतो
आणि लबाड मांजरासारखं दूदू चटाचटा पितो.

कुणीच मला पाहत नाही, मला अजिबात संशय नसतो
मांजरं खरंच मूर्ख नसतात, मी मात्र नक्कीच असतो.