Friday, July 13, 2007

तोलोलिंग

आजची रात्र कालच्यासारखी वादळी नाहीये. वारा साफ पडलाय. आभाळही निरभ्र आहे. काल इथेच ढगांची भाऊगर्दी झाली होती हे कोणाला खरं वाटेल? रात्र असूनही समोरची बर्फाच्छादित शिखरं स्पष्ट दिसतायत. चांदण्या रात्री चमचमणारा बर्फ म्हणजे डोळ्यांना मेजवानीच नाही का? पण आज? नाही. आज ही शिखरं ढगांच्या आड जातील तर बरं असंच वाटतंय.

आकाशातली ही ताऱ्यांची आरास नजरेआडच राहिलेली बरी. कधी केली होती माझ्या घराला मी अशी आरास? दिवाळीत? होय, गेल्या दिवाळीतच. दारात काढलेली रांगोळी, त्या रांगोळीच्या शेजारी ठेवलेल्या पणत्या, फराळाचे पदार्थ? नकोच तो फराळाचा विचार. मेलेली भूक पुन्हा जिवंत व्हायची. आणि काय बरं केलं होतं गेल्या दिवाळीत? शकूबरोबर उडवलेले फटाके. होय फटाकेच. हा फटाक्यांचा आवाज कुठून येतोय? इथे? फटाके?.....

आजूबाजूच्या डोंगरमाथ्यावरून कव्हर फायरिंग सुरू झालं वाटतं? म्हणजे आमची दुसरी तुकडी जवळ आली असणार. किती जवळ? खालच्या रिज पाशी? नाही शक्य नाही नाहीतर डोक्यावरून गोळ्यांचा पाऊस पडताना दिसला असता. बरेच दूर असावेत. थांबलं फायरिंग. नसतीलच जवळपास. नाहीतर फायरिंग थांबलं नसतं लगेच. किती शांत वाटतंय आता? जसं काही शांततेनेच आपली बंदूक त्या फायरिंग करणाऱ्याच्या कानशिलाला लावून चाप ओढला. काश....

आम्ही सगळे एकमेकांशी नजरेनेच बोलतोय. टोकाचे दोघे वाकून कोणी जवळ नसल्याची खात्री करतात. खरंतर तिथून काहीच दिसत नाही. पण खात्री केलेली बरी म्हणून. नक्कीच फायरिंग आजूबाजूच्या डोंगरातून झालं. डोक्यावर तोलोलिंग शांतपणे निद्रिस्त झाल्यासारखा वाटतोय. टोकाचे दोघे मध्ये येऊन बसतात. मी एक रिकामा झालेला कोपरा पकडतो. मोठी विचित्र परिस्थिती आहे. आम्ही तोलोलिंगच्या एवढे जवळ आहोत, पण तिथे पोहोचू शकत नाही. ना खाली परतू शकत. शत्रूच्या बंदुकींना माहितेय आम्ही इथे आहोत. पण त्यांना आमच्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. मागच्या खडकाचा भक्कम आधार आणि समोरचा फ्री फॉल आम्हाला सुरक्षित ठेवतायत. गेले दोन दिवस.

आज तारीख किती? चोवीस का पंचवीस? चौदा मे ला बातमी आली की कारगिलमध्ये घुसखोरी झाली म्हणून. मग १२१ ब्रिगेडच्या कमांडरनं दिलेली माहिती की फक्त सात आठ घुसखोर आहेत तोलोलिंगवर, त्यांना बखोटीला पकडून खाली खेचून आणा. फक्त सात आठ? मग शिवशिवणारे हात, सळसळणारं रक्त आणि एवढं एवढंसं होणारं मन. मग निघताना घरच्यांसाठी लिहिलेलं पत्र. समजा आपण परतलोच नाही तर घरी पाठवायला. पोहोचलं असेल का आता ते पत्र? नसेल पाठवलं. मिसिंग म्हणजे नॉट नेसेसरीली डेड. पण अजून किती दिवस मिसिंग? किती दिवस? अजून दोन, चार? का कायमचा?

घोंघावू लागलेला वारा मला भानावर आणतो. समोरच्या डोंगरातून फायरिंगचे आवाज येतातच आहेत. सगळ्या गोळ्यांचा उद्देश एकच. तोलोलिंग. तोलोलिंग, सोळा हजार फूट उंचीवर असलेलं. कारगिल जिल्ह्यातील एक शिखर. भारताच्या उन्हाळी चौक्या इथे बसत. हिवाळ्यात रिकाम्या केल्या जात. मीही आलो होतो ह्या भागात. पण आज? एक वेगळंच ध्येय, एक वेगळीच कामगिरी. इथून समोरचा श्रीनगर लेह मार्ग नजरेच्या आणि तोफांच्याही पट्ट्यांत.

पायात घातलेले बूट लागत होते कालपर्यंत. चालून चालून झालेल्या जखमा. बर्फदंश. आज मात्र सगळंच बधिर झालंय. सोळा हजार फूट उंची. -५ ते -११ डिग्री तापमानात चढायचं म्हणजे हट्ट्या कट्ट्या जवानालाही अकरा तास लागणार कमीत कमी. आम्हाला किती वेळ लागला? सगळी गणतीच खुंटलेय. कुठे सुरवात केली, कसे इथे पोहोचलो, काही काही आठवत नाहीये. आठवतायत फक्त वरून रोखलेल्या बंदुका, माझा वेध न घेता गेलेल्या गोळ्या, वरून येणारे हातबाँब, कोसळणारे दगड. आठवतायत माझे आईवडील, बायको आणि हो शकू. गोळ्या इथे बरसत होत्या. ते माझ्या गावात सुरक्षित आहेत. पण दोघांचं लक्ष्य एकच. मी. आणि हो. आठवतायत तोलोलिंगवर मरून पडलेले माझे साथीदार. त्या माझा वेध न घेता गेलेल्या गोळ्यांसाठी, माझ्या घरच्यांसाठी आणि तोलोलिंगवर पडलेल्या माझ्या साथीदारांच्या शवांसाठी मला जगायचंय, मला लढायचंय, मला तोलोलिंग जिंकायचंय.

बाजूलाच माझा बॅकपॅक पडलाय. काहीतरी घडण्याची वाट पाहतोय बिचारा. निघालो तेव्हा पंचवीस किलोचा होता. आता किती? नक्कीच कमी झाला असणार. अन्न, पाणी, हातबाँब, सगळं संपलंय. ऍकॅडमीत शिकवलं होतं. चालायला सुरवात केल्यावर थोडा वेळ बॅकपॅकचं वजन वाटतं. थोड्या वेळाने मात्र तो शरीराचाच एक भाग होऊन जातो. खरंच. पण किती विरोधाभास आहे त्यांतसुद्धा? खालून निघताना कमीत कमी वजन असावं असं वाटतं. आता इथे वाटतंय पंचवीस किलोपेक्षा थोडं जास्त घेता आलं असतं तर? अजून थोडं अन्न? पण शेवटी ट्रेड ऑफ करावा लागतो. दोन किलो अन्न की शंभर बुलेटस? अन्न नसेल तर भुकेने मरणार, गोळ्या नसतील तर शत्रूच्या गोळीने मरणार. कसं मरायचं? उघड्या बॅकपॅकमधल्या गोळ्यांकडे मी बघत राहतो.

पोटातले कावळे आता ओरडण्याच्या पलीकडे गेलेत. किंवा ते गारठून मेले असतील. पण मला मरायचं नाहीये. नाही मरायचं मला. नकळत हात खिशाकडे जातो. मी एक सिगरेट काढून शिलगावतो. वाह! काय हल्लक वाटतंय. आता हेच अन्न आणि हीच करमणूक. मी जर ह्या सिगरेटच्या धुरासारखा असतो तर? असाच हल्लक होऊन वरपर्यंत गेलो असतो. तोलोलिंगवर. त्या भडव्यांच्या डोक्यात गोळ्या घालूनच शांत झालो असतो. शेजारचा सिगरेटचा झुरका मागतो. मी पुन्हा भानावर येतो. पुन्हा एकदा आजूबाजूला कोणी नाही ह्याची खात्री करून घेतो. आमच्या बंदुकींचा सामना केल्याशिवाय इथे पोहोचणं अशक्य आहे. शक्य असतं तर दोन दिवसात एकदातरी आलेच असते.

आजूबाजूला प्रकाश वाढत चालल्यासारखा वाटतोय. अजून एक सकाळ. अजून एक रात्र. किती वेळ थांबायचं? वाटतं सरळ ह्या खोपच्यातून बाहेर पडावं, झेलाव्यात छातीवर शत्रूच्या गोळ्या आणि संपवून टाकावा हा उंदीर मांजराचा खेळ. जाता जाता शत्रूच्या दोघा तिघांनाही घेऊन जावं. माझ्यासारखेच असतील का ते दोघं तिघं? देशासाठी मरायला तयार असलेले पण तरीही मरायला तयार नसलेले? असतील का त्यांची घरं माझ्यासारखी? त्यांचे परिवार माझ्यासारखे? नक्कीच असतील. मग कशासाठी हे सगळं? त्यांनी मला मारलं तर माझ्या लोकांचे शिव्याशाप त्यांना. मी त्यांना मारलं तर त्यांच्या लोकांचे शिव्याशाप मला. हे असंच व्हायला हवं का?........

..... सर .... आमच्या पाठीशी दोन दिवस संरक्षक म्हणून उभ्या असलेल्या खडकाच्या भेगेतून आवाज येतो. हा खडक सरळ वरपर्यंत एकसंध आहे आणि त्यात ही भेग वरपर्यंत..... हमारे पास हथियार नही है. आप उपर आके आपके ऑफिसरकी बॉडी ले जाईये ........ पाठीमागून छद्मी हसण्याचा आवाज. आवाजातला खुनशीपणा स्पष्ट जाणवतोय. आमच्या हतबलतेला हसतोय साला. अरे गांडीत दम असेल तर ये ना खाली...... हम सिर्फ अपने ऑफिसरकी नही, तुम्हारीभी बॉडी लेकर जायेंगे...... आमचा कॅप्टन गरजतो. गोठलेलं रक्त पुन्हा सळसळू लागतं. थकलेले बाहू पुन्हा स्फुरण पावू लागतात, कारण मला लढायचं असतं. त्या हुकलेल्या गोळ्यांसाठी, माझ्या घरच्यांसाठी आणि तोलोलिंगवर बेवारस पडलेल्या माझ्या मित्रांच्या शवांसाठी. माझ्या देशासाठी. आणि हो माझ्यासाठी.

सकाळ आता चांगलीच भरात येत असते. आणखी एक रात्र, आणखी एक सकाळ, आणखी एक युद्ध. शत्रूशी नि स्वतःच्या मनाशी. तोलोलिंग, तोलोलिंगसाठी.

-----------------

१३ जून १९९९ रोजी तोलोलिंग भारतीय सेनेने पुन्हा जिंकलं. कारगिल युद्धात कामी आलेल्या एकूण जवानांपैकी अर्धे जवान तोलोलिंग घेताना मृत्युमुखी पडले. ही लढाई ३२ दिवस चालली. सुरवातीच्या लढाईत तेवीस वर्षीय कॅप्टन सचिन निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माघार घेत, तीन दिवस, एका अशा ठिकाणी आश्रय घ्यावा लागला होता, की जिथे, समोर खोल दरी आणि पाठी कडा होता. ह्या ठिकाणाहून आपले जवान आणि शत्रू एकमेकाला बघू आणि बोलूही शकत होते. त्या प्रसंगावरून बेतलेले हे लिखाण आहे. पण मूळ संकल्पनेशिवाय बाकी सर्व लिखाण हे काल्पनिक आहे.

------------------