Friday, June 29, 2007

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल (भाग २)

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल (भाग 1)

परदेशात गाडी चालवण्याचा अनुभव नगण्य होता. त्यामुळे मनावर नाही म्हटलं तरी थोडंसं दडपण होतंच. आज गाडी भाड्याने घ्यायची आणि उद्या परीक्षा द्यायची आणि उद्या संध्याकाळी गाडी परत करायची असं ठरलं. मी ऑफिसातून निघता निघताच धो धो पाऊस पडायला लागला. छत्री बाळगणं हे मी लहानपणापासून कमीपणाचं लक्षण मानत आलेलो आहे. त्यामुळे भिजत भिजतच मी त्या भाड्याने गाड्या देणाऱ्या स्वस्तोत्तम कंपनीच्या दुकानात शिरलो.

आतमधला कर्मचारी चिनी होता. त्याने माझ्या अवताराकडे बघून एक तुच्छतादर्शक कटाक्ष टाकला. बहुदा या आधीची नोकरी त्याने पुण्यात केली असावी. किंवा माझ्या अवताराकडे बघून एकंदरीत ह्या माणसाची लायकी फार फार तर गाडी धुण्याची असू शकेल असा त्याचा समज झाला असावा. मी बुकींग केलेले आहे हे मी त्याला सांगू लागलो. ते त्याला समजेपर्यंत, आणि मी सांगतोय ते त्याला समजलंय, हे मला समजेपर्यंत, थोडा वेळ गेला. आपण कितीही हिंदी चिनी भाई भाई असं म्हटलं, तरी हे भाई जेव्हा एकमेकांशी इंग्रजीत बोलायला लागतात, तेव्हा ह्या भाईचं त्याला आणि त्या भाईचं ह्याला काही कळत नाही. आम्हा बांधवांची परिस्थिती ह्याहून अधिक वेगळी नव्हती.

शेवटी हो नाही करता करता, सोपस्कार पार पडले. त्याने माझ्याकडे पैसे मागितले. ते बहुदा बरेच डॉलर आणि पंधरा सेंट असे काहीतरी होते. पैसे भरण्याकरता मी त्याला माझं बँकेचं कार्ड दिलं. त्या कार्डाला इथे EFTPOS असं म्हणतात. ते कार्ड पाहून हा भाई "एपॉ" "एपॉ" असं काहीतरी बरळायला लागला. मला काहीच कळेना. शेवटी त्याच्या उच्चारांवरून आणि हावभावांवरून तो वरचे पंधरा सेंट सुटे मागतो आहे असा माझा समज झाला. म्हणून मी सुटे पंधरा सेंट काढून त्याच्या हातावर ठेवले. ते पाहून तर तो शब्दशः वैतागला. आम्हा एकमेकांना इंग्रजी अजिबात येत नसल्याचा, आमच्या दोघांचाही समज झाला आणि तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

शेवटी तो ते कार्ड EFTPOS आहे हे का Credit हे मला विचारत होता हे मला कळले. गैरसमजाचा आट्यापाट्या संपून मी त्याला पैसेही दिले. त्याने मला गाडीची चावीही दिली आणि मी जाणार, इतक्यात मला त्याने, मी गाडी कुठे घेऊन जाणार असं विचारलं. आपण पडलो "सत्याजीराव". खरं काय ते सांगितलं. त्यावर त्याने "कसं पकडलं" अशा आशयाचे काहीतरी भाव चेहऱ्यावर आणत चावी माझ्या हातातून घेतली. पैसे परत केले आणि मी लायसन्स च्या परीक्षेला त्यांची गाडी घेऊन जाऊ शकत नाही हे जाहीर केलं.

परीक्षा दुसऱ्या दिवशी होती म्हणून बचावलो. लगेच घरी गेल्यावर इंटरनेटवर दुसरी एक स्वस्तोत्तम कंपनी निवडली आणि गाडी बुक केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच परीक्षेच्या दिवशी मी जाऊन ती माडी भाडं भरून घेतलीसुद्धा. ह्यावेळी माझ्या, तिथल्या कर्मचाऱ्याशी झालेल्या संभाषणात मी परीक्षेचा "प" देखील येऊ दिला नाही. सोबत शहराचा नकाशाही मागून घेतला. इंटरनेटवरून, त्या दुकानापासून परीक्षेच्या ठिकाणापर्यंतचा, मार्गही काढून घेतला. एकदम सोपा रस्ता होता. तुरक रोडवरून फ्रीवेला लागायचं आणि मग वारिगल (Warrigal) रोडला डावीकडे वळायचं. वर तिथे पोहोचायला अर्धा तास लागेल अशी माहितीही मिळवली.

गाडी मी चालवणार असल्याने आणि माझा रस्ते आणि दिशा ह्यांचा अंदाज वादातीत वाईट असल्याने, मी दीड तास आधीच निघालो. तुरक रोड येईपर्यंत सगळं सुरळीत होतं. फ्रीवेला लागलो. पहिली पाटी दिसली त्यावरच "वारागल" (Warragul) असं लिहिलेलं दिसलं आणि बाण सरळ दाखवला होता. म्हटलं चला आता पाट्या बघत बघत योग्य ठिकाणी पोहोचू. जरा हायसं वाटलं. दहा मिनिटं झाली, पंधरा झाली, अर्धा तास झाला. तरी आपलं वारागल सरळ दिशेने असल्याच्या पाट्याच येत होत्या. हळूहळू काहीतरी चुकत असल्याचा संशय यायला लागला. कारण फ्रीवेवर फक्त दहा मिनिटं जायचं होतं आणि अर्धा तास होवून गेला होता. पुन्हा एक पाटी आली आणि पुन्हा तेच. वारागल सरळ दिशेने. काहीच कळेना. शेवटी मी मोबाईल फोनवरून एका मित्राला फोन केला आणि त्याला विचारलं. त्याच्या म्हणण्यानुसार मला ज्या रोडवर (Warrigal) जायचं होतं तो बरीच योजने मागे राहिला होता. आणि मी मूर्खासारखा वारागल (Warragul) च्या दिशेनं चाललो होतो.

त्याच्या सूचनेप्रमाणे मी गाडी वळवली आणि विरुद्ध दिशेने परतू लागलो. थोड्या वेळाने मला अपेक्षित असलेला वारीगल रोड आला. येताना वारीगल रोडवर डावीकडे वळा असं इंटरनेटच्या सूचनांमधे लिहिलेलं होतं. त्यामुळे उलट दिशेने येताना उजवीकडे असा विचार करून मी उजवीकडे वळलो आणि परीक्षेचं ठिकाण दिसतं का ते पाहू लागलो. पुन्हा तेच. जी जागा पाच मिनिटात यायला हवी होती, ती जागा पंचवीस मिनिटं झाली तरी येईना. तितक्यात मी वारीगल रोडला क्रॉस होणाऱ्या एका रस्त्याचं नाव पाहिलं. त्या रस्त्याचं नाव वाचून तर मला चक्करच यायची बाकी राहिली. कारण तो रस्ता दुसरा तिसरा कुणीही नसून ज्या रस्त्याने मी फ्रीवेला लागलो तो तुरक रोड होता. म्हणजे गेला तासभर ड्रायव्हिंग करत मी जिथून निघालो होतो तिथेच परत पोचलो. परीक्षा तीन वाजता सुरू होणार होती आणि आता सव्वा तीन वाजले होते.

पुढच्या गल्लीत गाडी वळवली आणि थांबवली. मित्राला पुन्हा फोन करायचा प्रयत्न केला. पण हाय रे दैवं. हॅलो म्हणताक्षणी माझ्या फोनच्या बॅटरीने मान टाकली. आता झाली का पंचाईत. बोंबला. आता करायचं तरी काय? शेवटचा प्रयत्न म्हणून गाडीबरोबर घेतलेलं नकाशाचं पुस्तक उघडलं. ते कसं वाचायचं हे समजल्यावर मी वारीगल रोडवर डाव्या बाजूला वळण्याऐवजी उजव्या बाजूला वळलो हेही समजलं. घड्याळात साडेतीन झाले होते. खरंतर परीक्षेचेच बारा वाजले होते. पण मनात विचार केला, जाऊन तर बघू.

शेवटी चार ला पाच मिनिटं असताना मी परीक्षेच्या ठिकाणी पोचलो. मला माहीत होतं की चूक माझी होती त्यामुळे पुन्हा परीक्षेची वेळ घेणं क्रमप्राप्त होतं. माझं गाडी भाड्यानं घेण्याचं आणि स्वस्तात परीक्षा देण्याचं गणित चांगलंच चुकलं होतं. एक शेवटचा प्रयत्न म्हणून माझ्या अभिनयक्षमतेचा पुरेपूर वापर करायचं मी ठरवलं. आतमध्ये जाऊन, अधिकाधिक भारतीय ऍक्सेंट काढत, मी माझी आता ड्रायव्हिंगची परीक्षा असल्याचं सांगितलं. समोरचा माणूस माझ्याकडे "आ" करून बघायलाच लागला. तो म्हणाला की दिवसाची शेवटची परीक्षा तीन वाजता होते आणि साडेचार वाजता आमचं ऑफिस बंद होतं.

आता "आ" करायची वेळ माझी होती, कारण आता माझी परीक्षा होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. तितक्यात मला एक नवकल्पना सुचली. मी परीक्षेची वेळ फोनवरून घेतली असल्याने, मला फोनवर चाराची वेळच देण्यात आली, अशी चक्क मी लोणकढी थाप ठोकली. हे करताना मी जड भारतीय ऍक्सेंटचा पुरेपूर वापर करण्याची काळजी घेतली. वर जितका शक्य आहे तितका केविलवाणा चेहरा केला. बहुतेक समोरच्या माणसाला माझी दया आली. मला बहुदा इंग्रजी नीट समजत नसल्याने माझा घोटाळा झाला असावा असा बहुदा त्याने समज करून घेतला. चक्क त्याने मला आजची वेळ बदलून उद्या दुपारची दिली (म्हणजे गाडी परत करायच्या वेळेआधीची). उपकृत भाव चेहऱ्यावर घेऊन मी तिथून बाहेर पडलो.

दुसऱ्या दिवशी तासभर आधीच तिथे पोचलो. परीक्षा झाली. माझ्या अंगभूत हुशारीमुळे म्हणा किंवा माझ्या गाडी चालवण्याच्या कौशल्यामुळे म्हणा, शंभरी पंचाण्णव होतात तसा मीही पास झालो. लायसन्स मिळालं.

तात्पर्य. इंटरनेटवरून पत्त्यापर्यंत पोचवणाऱ्या सूचना घेऊ नयेत. घेतल्यास त्या तंतोतंत पाळाव्यात. विशेषतः रस्त्यांच्या नावांची स्पेलिंग्ज काळजीपूर्वक पाहावीत. नाहीतर "वारी"गल च्या ऐवजी "वारा" गल च्या पाठी लागून आमच्यासारखी हवा टाइट होते. तेही जमले नाही, तर आपली अभिनयक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा.

Friday, June 22, 2007

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल

समजा आपण चालवत असलेलं वाहन, सिग्नल लाल झाल्यावरही न थांबता पुढे गेलं. म्हणजे अशी चूक आपल्याकडून होणं शक्यच नसतं, पण गाडीच वेळेत थांबू शकली नाही (चूक नेहमी गाडीचीच असते) आणि आडवळणाला बसलेला समस्त वाहनचालकांचा मामा, हातवारे करत आपल्याला थांबवायला लागला, (आणि आपण थांबलोही) तर तो आपल्याकडे सर्वप्रथम कोणती वस्तू मागेल? अचूक ओळखलंत. ड्रायव्हिंग लायसन्स.

भारतात असेपर्यंत ते लायसन्स मिळवणे आणि ऐच्छिकरीत्या ते जवळ बाळगणे किंवा न बाळगणे ह्यात कठिण असं काही नव्हतंच. त्या सर्वातलं काठिण्य "चिरी मिरी" ह्या एका संकल्पनेनं नष्ट करून टाकलं होतं. पण भरताबाहेर अशी संकल्पना अस्तित्वात असल्याची खात्री नव्हती आणि असलीच तरी ती आपल्या खिशाला परवडणार नाही ह्याची खात्री होती. त्यामुळे इथे माझ्या किंवा गाडीच्या चुकीने सिग्नल तुटलाच, इथल्या मामाने (खरंतर अंकलच म्हणायला हवं) थांबवलंच, तर त्याला भारतीय लायसन्स कसं दाखवायचं?

मुळात तसं मी ते दाखवलंच तर ते लाल रंगाचं पुस्तक म्हणजेच लायसन्स असल्याचं त्याला पटवून द्यावं लागेल. समजा त्याला ते पटलंच आणि त्याने ते उघडून वाचलं, तर आत लिहिलेली अगम्य लिपी त्याला समजावी तरी कशी? आणि समजा ती लिपी रोमन असून भाषा इंग्रजी आहे, हेही मी त्याला पटवलं. तरी काय लिहिलंय हे फक्त लिहिणाऱ्यालाच कळावं (बहुदा त्यालासुद्धा कळू नये) अशा सांकेतिक पद्धतीने लिहिलेलं असल्यामुळे, ते वाचणं किंवा वाचून दाखवणंही अशक्य कोटीतलं होतं.

राहून राहून माझा फोटो मात्र त्या अंकलला दिसला असता. पण तो अठराव्या वर्षी काढलेला असल्याने, आणि माझ्या आणि त्या फोटोच्या वयोमानात आणि माझ्या आकारमानात आणि वस्तुमानात बराच फरक झालेला असल्याने, त्या फोटोतला तो मीच हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा माझ्याजवळ नसल्याने, इथे नवं ड्रायव्हिंग लायसन्स काढावं हे उत्तम, हे मी ठरवलं.

त्या अनुषंगाने मी माहिती काढायला सुरवात केली. काही अनुभवी व्यक्तींनी मला ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून लायसन्स काढायचं सुचवलं. पण मला गाडी चालवता येत असताना, असल्या कोणत्याही स्कूलचा विद्यार्थी होणं माझ्या तत्त्वात बसणारं नव्हतं. आणि ते ड्रायव्हिंगचे धडे आणि परीक्षेकरता आकारत असलेली फी बघून, मी ही फी वाचवली तर तेवढ्यात एक सेकंड हँड खटारा गाडी येऊ शकेल, हे माझ्यातल्या एकारांताने बरोबर ताडलं. त्यामुळे मिशन लायसन्स स्वतःच पूर्ण करण्याचं मी ठरवलं.

पुढे अशी माहिती हाती आली की लायसन्स मिळवण्याकरता तीन परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. देशात लायसन्स मिळवण्यासाठी द्यावयाच्या परीक्षेशी तुलना करता, बहुतेक इथे लायसन्स म्हणून बॅचलर ऑफ ड्रायव्हिंगची पदवी देत असावेत असा एक विचार मनात येऊन गेला आणि मी काळी कोट टोपी घालून लायसन्सदान समारंभात माझं लायसन्स स्वीकारतोय वगैरे बाष्कळ विचार माझ्या मनात तरळायला लागले. अपुरी स्वप्न अशी नको तिथे डोकं वर काढतात बघा.

मग पुढे असं कळलं की पहिली परीक्षा म्हणजे थिअरी. म्हणजे सगळे नियम वगैरे पाठ करून जायचे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची संगणकावर उत्तरं द्यायची. म्हणजे करोडपती कार्यक्रमाप्रमाणे काँप्युटरजी आपल्याला एक प्रश्न आणि चार उत्तरं देणार आणि आपण त्यातून योग्य पर्याय निवडायचा. फक्त दुर्दैवाने लाइफलाइन्स उपलब्ध नव्हत्या. दुसरी परीक्षा म्हणजे ड्रायव्हिंग सिम्युलेशनची. तुम्ही कधी गाडीचा व्हिडिओगेम खेळलायत का? तसाच व्हिडिओगेम समजा. फक्त हा गेम खेळायला घसघशीत रक्कम फी म्हणून भरायला लागते आणि पहिल्या प्रयत्नात चांगला खेळता आला नाही. म्हणजेच खेळता खेळता आपलाच गेम झाला, तर पुन्हा पुन्हा खेळावा लागतो, पुन्हा पुन्हा ऐसे भरून.

तर अंगभूत हुशारीमुळे म्हणा किंवा बालपणापासून व्हिडिओगेम्स खेळायच्या सवयीमुळे म्हणा, शंभरातील नव्याण्णव लोकांप्रमाणे मी पहिल्या दोन परीक्षा उत्तीर्ण झालो. म्हणजे खेळाडू जसे मुख्य सामान्याआधी सराव करतात तसा हा मुख्य ड्रायव्हिंगच्या परीक्षेचा सराव होता.

आता ड्रायव्हिंगची परीक्षा द्यायची म्हणजे पहिली सोय गाडीची करायला हवी. गाडी नाही तर मी मरायला लायसन्स का काढत होतो असा क्षुद्र विचार काही अतिउच्च बुद्धिमत्तेच्या वाचकांना पडल्यावाचून राहणार नाही. पण गंमत अशी होती, की माझे भारतीय लायसन्स इथे चार महिन्यावर चालत नाही, त्यामुळे गाडी नसली तरी घाईघाईने लायसन्स काढणे आवश्यक होते. पुन्हा तुम्ही अतिउच्च बुद्धिमत्ता असलेले वाचक असाल, तर तुम्हाला प्रश्न पडेल की, जर हाती गाडीच नाही, तर भारतीय लायसन्स नाही चालले तर बिघडते कुठे?

पण इथेच तर खरी गोम आहे. जर माझे भारतीय लायसन्स निरुपयोगी झाले असते तर ड्रायव्हिंगची परीक्षा देण्याकरता मला शिकाऊ म्हणजेच लर्निंग लायसन्स काढून महिनाभर चिपळ्या वाजवत बसावे लागले असते आणि मगच परीक्षा देता आली असती. शिवाय ह्या सगळ्या प्रकाराला बरेच पैसेही जास्त पडले असते. मी पडलो गरीब बिचारा नवखा स्थलांतरित (मायग्रंट) आणि त्यात एकारांत (म्हणजे आधीच मर्कट तशातही मद्य प्याला अशी अवस्था), म्हणूनच पैसे वाचवण्याकरता ही सगळी घाई. काहींना का कंजूषपणाही वाटू शकेल. पण बऱ्याचशा परदेशस्थ देशी आणि एकारांत अतिउच्च बुद्धिमत्तेच्या लोकांची समजूत पटली असेल. कारण शेवटी हे पटायला, तेथे पाहिजे जातीचे.

आता संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी ह्या न्यायाने माझ्या लायसन्ससाठी गाडीपासून तयारी सुरू करणे आवश्यक होते. इंटरनेटवर बरीच शोधाशोध करून स्वस्तोत्तम अशी एक गाडी भाड्याने देणारी कंपनी शोधून एक गाडी परीक्षेच्या दिवसापुरती भाड्यावर घेण्याचे ठरवले. त्या कंपनीला तसे कळवले. परीक्षेसाठी फी भरली आणि वेळ घेतली. आता सगळी तयारी झाली. दिवसामागून दिवस गेले आणि शेवटी परीक्षेचा दिवस उद्यावर येऊन ठेपला.



(क्रमशः)

Friday, June 08, 2007

राम नाम सत्य है

ogaराम राम पाव्हणं. काय म्हनता? आज इथं कुणीकडं वाट चुकलात जणू? आता आलात तसे बसा थोडायेळ. अहो, हिरीत कशाला डोकावून बघताय? पाणी असतं होय हल्ली तिथं? उडी मारलीत तर डोस्कं फुटंल राव उगा. पण गुडघापण डुबणार न्हाई तुमचा. इस्वास नाही माज्यावर? हे बगा. डोकीला जखम दिसत्येय न वं? कालच उडी मारली होती हिरीत. खूप लागलंय बगा. अहो राव, पुन्हा हिरीत बगाया लागला तुम्ही? किती वार सांगू पानी न्हाई इथं.

हां पण एक येळ व्हती जेव्हा ही हिर पाण्याने तुडुंब भरायची. माझा बाप मोट मारायचा आणि मी पाणी चारायचो ऊसाला. दुपारच्याला सगळे लोक इस्वाटयाला पडले मी हळूच हिरीत उतरायचा. पवायला. ह्या हिरीनंच आपल्याला पवायला शिकिवलं. बाहेर रणरणतं ऊन असलं तरी आत गारेगार वाटायचं. इथंच अख्खा दिवस पडून राहावंसं वाटायचं. पण पुन्हा ऊनं उतरली की परत पाण्याला लागायचं. बाप पुन्हा मोटंला भिडायचा, मी माझ्या हीरीचं थंडगार पाणी ऊसाला चारायचा.

मंग? काय सोपं हुतं का राव? जरा हाताबुडी आलो, तसा मोट माराया शिकिवली बापानं. पयल्यांदा लै मजा यायची. वाटायचं, आता आपण बापया मानूस झालो. मोट माराया लागलो. हळुहळू त्याचाही कट्टाळा यायला लागला. पण बामनाला पोट अन मळेकऱ्याला मोट कधी चुकलेय का? न्हाई न वं? मग मोट मारता मारताच मी माझ्या हीरीवर पंप बसवून घ्यायची सपान बघायचो. घरात बिजली, हीरीवर बिजली, आताच्या डबल टेपल रान. बराचसा ऊस, थोडी पालेभाजी, कधी रानं फिरवायला टमाटं. एकदम पाटलाच्या रानावानी सगळं फुलल्यालं दिसायचं. बैलं हिसडा द्याया लागली की माजी तार मोडायची.

मंग एक दिवस ह्या हीरीसमोरच्या खोपीत बसल्यालं असताना माय म्हणाली, लगीन ठरावलंय माजं. काय सांगू पाव्हणं? गुदगुल्याच झाल्या जणू. शेताच्या बांधाव पाय सोडून बसल्यावर पायाशी एकदम मांजराचं पिलू बिलगावं तशा गुदगुल्या. गावंदरीजवळचं रान करणाऱ्या महादू जाधवाची लेक, चंद्राक्का. काय लाजाया झालं मला? तसाच उठून हिरीकडे आलो. आपल्याला कुठलं जीवलग दोस्तं? ही हिर आणि दोन बैलं हीच आमची दोस्तं. त्यांनाच पहिली सांगिटली ही बातमी. मी न्हवरा अन चंद्री नव्हरी. पुढं चंद्राशी भांडाण झालं की हिरीलाच सांगायचो की मी. मग माझी चूक असंल, तर दुपारची भाकरी चंद्री कोणाबरोबर तरी लावून द्यायची रानाकडं. तिची चूक असंल तर मात्र सवता याची रानाकडं बुट्टी घेऊन. ती रांड, शाळंत शिकलेली. विंग्रजीत सोरी म्हणायची. मग मिरचीच्या ठेच्याबरोबर भाकरी ग्वाड ध्वाड लागायची. वर मी माझ्या हिरीचं पाणी गटागटा प्यायचा.

अशीच एकदा नांगरणीची धावपळ चालली होती. आभाळ उतराया झालं होतं. बरंच काम अडून राहिलेलं. दुपारच्याला खोपीत मी भाकरी खाऊन इस्वाट्याला पडलेला. पाण्याला म्हणून हीरीकडं आलो. माय तेव्हा शेवंतीकडं गेली होती शेवगावाला. शेवंती म्हणजे थोरली बहीण माझी. तर चंद्री हीरीपाशी आली नि म्हणाली मायला बलवून घ्या, अन येताना चिच्चा, बोरं घेऊन या. मी धाडलं बलवणं. हे चिच्चा, बोरं काय मला समजेनात. मग एकदम डोक्यात बिजली चमकली. कालपर्यंत पोरया असलेला मी आता बाप व्हणार होतो.

मोट मारता मारता परत इचार सुरू व्हायचे. मुलगा झाला तर बरं हुईल. त्याला मी शाळंत घालेन आमच्या चंद्रीवाणी. मग तो हाताबुडी येईल. शिकून सायब हुईल. हां, पण तो रान करायचा सोडणार नाही. शेतीपण करेल. हिरीवर पंप बसवेल. मंग मला मोट नाही माराया लागणार. मग पंप पाणी खेचेल, मी शेताला पाणी पाजेन आणि तो गावाची सगळी कामं बघेल. नांगरणी, पेरणीला आम्ही दोघं झटक्यात रान उरकून टाकू. सोबतीनं कुळव हाणू, बैलांना पाला कापू, शेणं भरू. जीवाला थोडा इस्वाटा पडेल. पण कसचं काय राव? झाली पहिली बेटीच. पण फुलासारखी नाजूक, मोगरीच्या फुलासारखी. आणि मधावानी ग्वाड लेक. पण हिच्या आईला काय धाड भरली जणू. रांडेनं दगडू नाव ठिवलं पोरीचं. नजर लागाया नगं म्हणून.

मग एकापाठोपाठ एक पाच पोरं झाली. चार लेकी आणि योक ल्योक. घरचं रान कमी पडाया लागलं मंग शेजारचं रान फाळ्यावर घेतलं. तरीपण पैसं कमी पडाया लागलं. वाटलं पोरांची शाळा काही हुईत नाही. पण हिमतीनं पोरींना चवथी केलं. मंग काय करायची त्यांना शाळा. दुसऱ्याचं धन ते. पोराला मात्र फूडच्या शाळंत घातलं. येगळं मास्तर लावलं शिकवणीला. पोरगा शिकिवला पायजे. मग तो हीरीवर पंप आणेल. माझं कंबरडं तर पार मोडून गेलं की हो जलमभर मोट मारून मारून.

हळूहळू साठवणीचं पैसं संपाया लागलं. घरच्या रानातबी काही राम राहिला नाही. त्येच्या आईला त्येच्या, पूर्वीसारखं पीक देईना झालं. शेजारच्या रानाच्या मालकाने रानाचा फाळाबी वाढावला. त्या रानाच्या पिकात वरीसाचा फाळाबी निघेना झाला. मंग करावं तरी काय? बरं पावासाचं पण पूर्वीसारखं राहिलं नाही. खतं, चांगलं बी बियाणं आणाया पैसं नाहीत. आलेलं पीक शेरातला दलाल म्हणेल त्या भावाला इकायचं. शेवटी हातात काही उरायचंच नाही.

फार घोर लागून राहिला बघा जीवाला. घर ढांकंला लागलं जणू. अन हा घोर सांगणार तरी कोणाला? हल्ली मी माझं घोर या हिरीला सांगायचं बी बंद केलाय. ती बिचारी काय करनार? तेव्हा शेजारच्या रानातला शिरपा तिथं आला हुता. म्हणाला मायबाप सरकार कर्ज देणार आहे मळेकऱ्यांना. निविडणुका आल्या हुत्या ना तेव्हा. ईजबी फुकाट मिळणार म्हणून सांगत होता. पाटलाला म्हणे तेव्हा फुकाट रकमेचं बिल मायबाप सरकारनं पाठिवलं होतं. कितीबी ईज वापरा पैसं द्याया लागनार न्हाई. त्येच्या आयला त्येच्या ह्या शिरप्याच्या बेणं नको त्या वाटंनं घिवून गेलं मला. आणि सुक्कळीचं हे मायबाप सरकार, निविडणुका सरल्याव फुकाट इजबी बंद करून टाकली.

मग शिरप्यासंगं मी ब्यांकेत गेलो. कर्ज मिळिवलं. एक सपान पुरं झालं. मी पंप घातला हिरीवर. इजेची लाईनबी घीतली. फुकाट इज म्हणून खोपीत, हीरीवर पण झगमाग दिवं लावलं. बरे दिवस आले. जीवाला थोडा इस्वाटा पडायला लागला. ल्योकबी हाताबुडी आला. त्याची शाळा तर बंद झालीच हुती. त्येच्या आयला त्येच्या, बेणं शाळंत जायला मगायचंच न्हाई. पळून जायचं उकिरडा फुकायला. त्यालाबी रानात घेतला. त्या वरसी पीकपण चांगलं झालं. पंपाचं पाणी पिऊन पिऊन ऊस तरारला. वाटलं जीवन रांकेला लागलं.

पुढच्या सालापासनं पावसाने दडीच मारली जणू. त्यात एकापाठोपाठ एक पाच पोरींची लग्न. खर्चाचा मेळ जुळविता जुळविता कंबर खचली. त्यात मायबाप सरकारनं इज फुकाट द्येणार न्हाई म्हणून सांगिटलं. आता झाली का पंचाईत. इथून तिथून, सावकाराकडून कर्ज काढून बिलं भरली. पण हितं आभाळंच फाटलं तिथं ठिगळंतरी किती मारायची अन कशी?

त्यात मागल्या महिन्यात चंद्री आजारी पडली. दवाखाने झाले. भगत झाले. सगळं झालं. इथं दातावर माराया पैसा उरला नाही, औशिदासाठी पैसं आणणार कुठून? मुलगा इथं तिथं रोजावर काम करून पैसं मिळवित होता. गांड खंजाळायला बी कुणाला सवड हुईत न्हवती, तिथं हिच्याकडं बघायचं तरी कोनी? पिकाचा सगळा पैसा तर कर्जाचे हप्ते देण्यात जात होता. आणि ल्योकाची बेगारी हिच्या औशिदात. शेवटी गेल्या हफ्त्यात रान इकायचं ठरिवलं. निदान चंद्रीला शेरात चांगल्या डागदर ला दाखिवता येईल. परवाच रानाचं पैसं मिळालं. पोराला अन चंद्रीला शेराकडे लावून दिलं. त्याना म्हटलं तुम्ही हे पैसे घेवा आन तिथेच ऱ्हावा. मी मागचं सगळं आवरून येतो.

अहो पाटील मघाधरनं एवढं बोलून राहिलोय तुम्ही लक्षच देईना झालाय? सकाळधरनं पाहतोय जे बेणं येतंय ते सुक्कळीचं पहिलं हिरीत बघतंय चुक चुक करतंय अन वाटेला लागतंय. मी एवढं बोलतंय तर बोला की वाईस.....

............हे कोणाचं मढं निघालं आणिक. अरे, ही चंद्री का रडून राहिल्येय तिथं. रांड मी मेल्याव रडावं तशी रडतिय.....................


राम नाम सत्य है. राम नाम सत्य है...................

Thursday, June 07, 2007

भाग्यश्री

Internet वर मी World Vision नावच्या एका संस्थेची website बघतोय. ही संस्था गरीब देशातील मुलांसाठी पैसे गोळा करते. "Sponsor a Child" ही त्यांची योजना मला खूपच आवडते. म्हणजे अमुक एक मुलासाठी आपण काही रक्कम देणगी म्हणून द्यायची. पण ते पैसे त्या मुलाला थेट न मिळता, त्याच्या Community च्या भल्यासाठी वापरले जातात. माझ्या मनात एकाएकी परोपकाराची भावना जागृत होते. आणि जोषातच मी कुणातरी बालकाला "sponsor" करण्याचा निर्णय घेतो.

थोडावेळ ती website surf केल्यावर मला असं कळतं की आपण आपल्याला हव्या त्या प्रदेशातील बालक निवडू शकतो देणगी देण्यासाठी. ह्यावर अचानक माझा देशाभिमान जागृत होतो. पैसे द्यायचेच तर निदान भारतातल्या मुलासाठी तरी द्यावेत, असा विचार करून मी अधिक गरजवंत दिसणाऱ्या आफ्रिकन मुलांच्या फोटोंना बाजूला सारतो आणि भारतीय मुलांकडे वळतो.

भारतातील मुलांचे फोटो बघताना, माझ्या असं लक्षात येतं की दक्षिण भारतीय मुलांची संख्या अधिक आहे. मग अचानक माझा भाषाभिमान आणि महाराष्ट्राभिमान जागृत होतो. त्या सुनामीग्रस्त दक्षिण भारतीय मुलांना मी बाजूला सारतो आणि मराठी मुलांचा शोध घ्यायला लागतो. मुलांची भाषा तिथे लिहिलेली नसते, पण शहर मात्र लिहिलेलं असतं. त्यामुळे महाराष्ट्रातलं शहर आणि त्यातल्या त्यात मराठी वाटेल असं नाव असलेल्या बालकासाठी देणगी द्यायचं मी निश्चित करतो.

शोध घेता घेता, एक इटुकल्या पिटुकल्या मुलीचा फोटो माझ्यासमोर येतो. "भाग्यश्री" नाव असतं तिचं. पुण्याची मुलगी आणि नावावरून मराठी वाटतेय आणि काही महिन्यांचीच आहे, एवढ्या भांडवलावर, मी तिला "Sponsor" करण्याचा निर्णय घेतो. तेवढ्यात website च्या तळाला "World Vision is a Christian Organisation" अशी टीप दिसते. अचानक माझा हिंदू धर्माभिमान जागृत होतो. पैसे सरळ वनवासी कल्याण आश्रमाला द्यावेत का असा एक विचार मनात येतो. मनाची चलबिचल होते. पण पुन्हा तो भाग्यश्रीचा हसरा फोटो मला लाइन वर आणतो.

तरीही पैसे भरण्याच्या आधी मी भरलेल्या पैशांवर आयकरातील ८०जी सवलत मिळेल की नाही ह्याची खात्री करून घेतो. आता तर माझा निर्णय अधिकच पक्का होतो. देशाभिमान, भाषाभिमान यांची गोंजारणी, आयकरात सवलत आणि कुणा गरजूला मदत केल्याचं पुण्य, ह्यापेक्षा आणखी काय हवं? मी भराभर माझं नाव, पत्ता, देणगीची रक्कम, भरतो आणि "Sponsor Bhagyashree" वर click करतो. आपण एक अतिशय परोपकारी काम केल्याच्या जाणीवेनं माझा ऊर भरून येतो.

पुढच्याच screen वर पैशाच्या भराण्याबाबत माहिती भरायची असते. ते करता करता माझ्या असं लक्षात येतं की माझं Credit Card वापरून पैसे भरायची सोय ह्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. थोड्या दिवसांनी प्रयत्न करा, अशी सूचनासुद्धा screen वर येते. तेवढ्यात बायको भजी आणि चहा घेऊन येते. देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती आणि भाग्यश्री, सगळेच चहाच्या कपात विरघळून जातात......

........माझ्या नावाचं जाडजूड पाकीट Letter Box मध्ये पाहून मला आश्चर्यच वाटतं. कुतूहलाने मी ते पाकीट उघडतो. त्यात World Vision ने मला पाठवलेलं आभारप्रदर्शनाचं पत्र असतं, मी भाग्यश्री ला "sponsor" केल्याबद्दल. सोबत तिचा एक छानसा हसरा फोटो. मी चक्रावूनच जातो. पैसे न भरता हे पत्र कसं काय आलं असावं? पुन्हा देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती डोकं वर काढायला लगतात. भाग्यश्रीचा हसरा फोटो मनाला टोचणी लावतो. तातडीने मी World Vision ची web site उघडतो. पण आता तिथे sponsor करण्यासाठी तिचा फोटो नसतो.

पत्रातून त्यांचा फोन नंबर समजतो. मी फोन लावतो पण त्यांचं कार्यालय आता बंद झालेलं असतं. आता काय करावं? असा विचार करता करताच मी ती कागदपत्र आणि तिचा फोटो पाकिटात टाकतो. टी. व्ही. वर क्रिकेटचा सामना सुरू होतो. ते पाकीट मी कपाटाच्या एका कोपऱ्यात सरकवतो आणि सचिनची फटकेबाजी बघायला टी. व्ही. समोर बसतो. दुसऱ्याच चेंडूवर सचिन बाद. सचिनला, त्याच्या जाहिरातींना आणि भारतीय संघाला दिलेल्या शिव्यांमध्ये पुन्हा एकदा देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती आणि भाग्यश्री विरून जातात......

...........मी माझा E Mail उघडतो. World Vision कडून मला एक E Mail आलेला असतो. विषय - "Your ID 1047587" मजकूर,

"Its very unfortunate that your sponsor child, Bhagyashree had high fever and fell sick. Failing to recover from her sickness, the girl passed away last week"

माझ्या मेंदूला झिणझिण्या येतात. डोळ्यासमोर भाग्यश्रीचा चेहरा येतो. डोळ्याच्या कडा क्षणभर पाणावतात. फोन खणखणतो. पालीकडून मित्र मला "फुटबॉल खेळायला येतोस का?" म्हणून विचारतो. देशाभिमान, भाषाभिमान, परोपकारी वृत्ती हे सगळे, फुटबॉल ला मारलेल्या लाँग किक सारखे दूरवर जाऊन पडतात.

पण भाग्यश्री मात्र कपाटात ठेवलेल्या त्या पाकिटातील फोटोमधून माझ्याकडे बघून हसत असते. तशीच. कायमची.