Saturday, May 26, 2007

कौन कम्बख्त...

स्मॉल लाटे घेऊन ऑफिसच्या कँटिनमधून बाहेर पडताना पाऊस पडत असेल तर काय झकास दिसतो. आज छान पाऊस पडतोय. छान म्हणजे कसा? छत्री सोबत घ्यायला लागणार नाही इतका. पडतोय नाही पडतोय असा. मुसळधार पाऊस मला आवडतो. मनापासून. तो नुसते रस्तेच नाही मनाची मरगळही धुऊन काढतो. पण हा पाऊस कसा? कारंज्याच्या बाजूला उभं राहिलं तर तुषार उडतात ना तसा. आल्हाददायक. जावं का थोडं पावसात? भिजायला होईल. होऊदे ना. सगळी दुनियाच तर भिजलेय. हातातला थर्माकोलचा कप सांभाळत सांभाळत मी गच्चीत शिरतो.

खरंतर किती डिप्रेसिंग वाटतं ना? संघ्याकाळची अंधारत चाललेली वेळ, असा थेंबटलेला पाऊस. पण आज नाही वाटत. का? करड्या स्वेटरवर आता थेंबांचं डिझाइन झालंय. ते डिझाइन न बिघडवण्यासाठी का होईना, मी आत येतो. सगळं ऑफिस रिकामं झालंय. का बरं? घरी गेलेले लोकं जाता जाता आपलं रिकामपण सोडून गेले की काय? मी माझ्या डेस्क वरचं माझं सामान उचलतो आणि चालता होतो. विसरलो का काही? असूदे, सोमवारी बघू. तसंही आपलं कोण काय घेणार?

खरंतर मी सायकलने जायला हवं घरी. पण आज नको. पाऊस आहे ना. आज ट्रॅम. ऑफिसचा मागचा जिना उतरून मी रस्त्यावर येतो. खांद्यावर बॅग, एका हातात कॉफी आणि दुसऱ्या हातात छत्री. नकोच ती उघडायला. पण भिजायला झालं तर? अरे इथे दुनिया भिजलेय, मग आपण का नाही? चालत चालत मी पोरांच्या स्केट पार्कपाशी येतो. एरवी माझं त्यांच्याकडे जराही लक्ष नसतं. पण आज मी मुद्दाम बघतो. वाटतं आपणही एकदा स्केट बोर्डिंग करून बघावं. पडेन च्यामारी. पाऊस म्हणून आज कोणी नाहीये. नही. एक आहे सायकलवर. घसरून पडायचंय का रे तुला? लागेल लेका. मी मराठीत बोलल्याने त्याला काहीच कळत नाही. तो तिथून हात करतो. आपल्याला काय? आपण इथून करतो. हात करायला काय पैसे पडतात होय?

त्याला हात दाखवत दाखवतच मी मुख्य रस्त्याच्या फुटपाथवर येतो. हा रिव्हर्सडेल रोड. काय छान नाव आहे ना? डेल म्हणजे टेकडी. रिव्हर्सडेल म्हणजे नदीसमोरची टेकडी. नदी नाही दिसत म्हणा इथून आता. पण नाव झकास आहे. कुणा मूर्खानं समोरच्या इमारती बांधल्या इथे? कधीतरी दिसत असेल नदी इथूनही. शांत, संथ हिरवी "यारा". आणि आता तर काय अप्रतिम दिसली असती. पावसाच्या थेंबांचं डिझाइन घेऊन. मरूदे. आपण ट्रॅमदेवीची आराधना करावी हे बरं.

स्टॉपवर पण कोण दिसत नाही आज. पाऊसामुळे असेल. तेवढ्यात एक आजीबाई हातातली छत्री सांभाळत सांभाळत येतात. मला विचारतात की मी छत्री विसरलो का? मी त्यांना हातातली छत्री दाखवतो. त्या हसतात. पण त्यांच्या हसण्यात खिन्नतेची झाक दिसतेय का? कदाचित कधीतरी त्याही फिरल्या असतील पावसात, छत्री हातात घेऊन. भिजण्याची चिंता न करता, कारण साला सगळी दुनियाच भिजत असेल तेव्हा. लांबून ट्रॅम येताना दिसते. अंधारलेल्या वातावरणात तिचे उघड मीट होणारे दिवे अधिकच छान दिसतात. हातातली कॉफी सांभाळत मी ट्रॅममध्ये चढतो. चार पाचच टाळकी असतात. मी खिडकीजवळ जाऊन बसतो.

जगाची चिंता नसते नाही ह्या ट्रॅम ला? आपल्या वेगाने जात असते. रस्ता ठरलेला, स्टॉपही ठरलेले. वेगवेगळ्या आचारांची विचारांची माणसं गुडुप पोटात घेऊन स्थितप्रज्ञासारखी चाललेली असते. अव्याहत. हातात लाटे असली की माझ्या विचारांना पाय फुटतात वाटतं? मी ट्रॅमचे धक्के एन्जॉय करत राहतो. छान डुलकी काढावी असं वाटून जातं. पण तेवढ्यात माझा स्टॉप येतो.

साला ही ट्रॅमपण माझ्यासारखीच आहे. भिजत चाललेय. बरोबर आहे, तिला जगाची चिंताच नसते. आणि आज तर अख्खी दुनिया भिजलेय. मी आणि ट्रॅमने काय घोडं मारलंय मग? असो. मी उतरतो. एखाद्या जीवाभावाच्या मैत्रिणीला करावा तसा तिला आच्छा करावा असं वाटत राहतं. ती मात्र निघून जाते. भिजत. स्थितप्रज्ञासारखी. पुन्हा. गेली तर गेली. ती काय एकटीच आहे. घरी पोहोचायला अजून दोन ट्रॅम बदलायच्यात. त्यांना आच्छा करू.

नकोच ती ट्रॅम. साधा अच्छा पण करत नाही. जावं का चालत? नको. भिजायला होईल. पण तेच तर हवंय. हातातल्या निवत चाललेल्या कॉफीचा अजून एक घोट घेऊन मी चालायला लागतो. स्वॉन स्ट्रीट वर उतरतो. राजहंसासारखीच आहे ती. लांबूनच ती यारा नदीवर डोळा ठेवून असते. दोघीही अशाच शहरापर्यंत जातात. रेल्वे लाइन ओलांडून मी बर्नली ब्रिज च्या दिशेनं चालायला लागतो. रेल्वे फाटकांना रेल्वे फाटक न म्हणता रस्ता फाटक म्हटलं पाहिजे. रेल्वेचा रस्ता सदोदित मोकळाच असतो. च्या मारी, फाटक आम्हा रस्त्यावरच्या लोकांना. असो.

हा रस्ता थोडासा कंटाळवाणा आहे. पण तेवढ्यात समोरून एक सुंदर तरुणी जॉगिंग करत येते. कशाला मरायला धावतेय पावसात? नाही. आज शुक्रवार आहे. आज उद्याकडे डेट असेल तिची. धावूदे. रोल्स रॉईसला जायला खटारा अँबॅसेटर ने जागा द्यावी तशी मी तिला जागा देतो. ती टाळू आणि दात ह्यांच्या बरोबर मध्ये जीभ लावून "थँक यू" म्हणते. सुभानल्ला. गुदगुल्याच होतात जणू.

आता समोर "यारा" दिसायला लागते. संथ वाहते यारा माई. तिरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही. तिच्या शेजारून ऍलेक्झांड्रा ऍव्हेन्यू वाहतोय. यारा आणि ऍलेक्झांड्रा, एकमेकीत जीव गुंतलेल्या बहिणीच जश्या. यारा वळते म्हणून ऍलेक्झांड्रा वळते का ऍलेक्झांड्रा वळते म्हणून यारा वळते हेही कळू नये. फक्त एकच फरक आहे. एक वन वे आहे आणि दुसरी बोथ वेज. अशा ह्या दोन सुंदर बहिणींनी बखोटीला धरून दोन्ही बाजूंनी उचलावा असा त्यांच्या मध्ये बाइक ट्रॅक आहे. मी इथूनच जातो रोज. सायकलने. पण आज चालत.

समोरून एक सायकल स्वार येतोय. दमलाय लेकाचा. घामाघूम झालाय. वर पावसात भिजलाय. अरे भिजूदे ना. इथे तर सगळी दुनिया भिजलेय. ह्याला थोडावेळ सायकल चालवून देऊ का? नको. कॉफीच्या शेवटच्या काही घोटांपैकी एक घेऊन मी तो विचार उडवून टाकतो. खरंतर कॉफी संपलेलीच आहे, पण घरी पोहोचेपर्यंत पुरवायचेय. उगीचच मी एका लाकडी बाकावर बसतो. बाक ओलाच असतो. मरूदे फार फारतर काय? ओला पार्श्वभाग बघून लोक हसतील. हसूदेत लेकाचे. आपल्याला काय त्याचं. आज साला ही दुनिया भिजलेय तिथे माझ्या पार्श्वभागाची काय कथा?

नदीच्या बाजूला असलेल्या एका धक्क्यावर जाऊन मी उभा राहतो. वाटतं अशीच पाण्यात उडी मारावी. पोहत राहावं. नदी संपेपर्यंत. मग समुद्र येईल. तरीही थांबू नये. एक ते सात एका पाठोपाठ पोहावेत. पृथ्वी गोल आहे. इथेच परत पोहोचू. समजा नाही पोचलो, तर सिद्ध होईल, पृथ्वी गोल नाहीये म्हणून.

चेहरा वर करून मी आकाशाकडे बघतो. चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडतात. एकदम सकाळच्या दव पडलेल्या फुलागत वाटत. सपशेल. अररररर स्पेशल. तसाच मी चालत राहतो घर येईपर्यंत. रस्ते वळत असतात त्यांना हवे तसे. पण मी मात्र रस्ता चुकत नाही. मला जिथे वळायचं तिथे मी पण वळतो. शुक्रवार संध्याकाळ चढायला लागलेली असते. शुक्रवारी संध्याकाळी रस्त्यावरच्या सिग्नलचे लाइट पण डिस्कोत लावल्यासारखे वाटतात नाही? विल्यम्स रोडचा चढ पार करता करता माझे पाय दुखायला लागतात.

घर येतं. मी बरोबर दोन जिने चढून माझ्याच घराची बेल वाजवतो. कोणीच दार उघडत नाही, मग मी माझ्याकडच्या चावीने दरवाजा उघडतो. टेबलावर कागदावर काहीतरी खरडून ठेवलेलं असतं. "ऑफिसच्या ड्रिंक्समुळे तुला उशीर होणार आहे हा निरोप मिळाला. मोबाईल नेहमीप्रमाणे सायलेंट वर ठेवून आपण कुठेतरी भटकत असाल. म्हणून ही चिठ्ठी. मी मैत्रिणीकडे जात आहे. यायला उशीर होईल." अरेच्च्या? खरंच की. आज ड्रिंक्स होती ऑफिसमध्ये. पण मला तर अजिबात चढल्यासारखी वाटत नाहीये.

जानदो. कौन कंबख्त नशेकेलीये पीता है? हम तो पीतेहै क्यों की?........ क्यों की?........ काहीच सुचत नाहीये. जानदो.

Saturday, May 05, 2007

मी CD Player आणि मी

अवघा चौदा वर्षाचा मी, स्टेजवरून जादूचे प्रयोग करतोय. माझ्या माकडचेष्टांना ऊत आलाय. लोकं जादू सोडून मला पोट धरधरून हसतायत आणि मी ही ते सगळं enjoy करतोय. आजच्या बरोबर अर्ध होतं नाही माझं वय तेव्हा? समोरच्या T.V. वर जुन्या रेकॉर्डिंगमध्ये मलाच स्वतःला बघताना काय मजा वाटतेय? Time Freeze की काय म्हणतात ते हेच असावं. जुने मंतरलेले दिवस झर्रकन डोळ्यासमोरून उडून गेले. एक नाही दोन नाही उणीपुरी चौदा वर्ष झाली. पण तो स्टेज, तो उत्सव आणि आमची चाळ तशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहते............

माझी चाळ. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत नाहीयेच मुळी. खरंतर हे नातं वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे. कधी आईच्या मायेचं, कधी आजीच्या प्रेमाचं, कधी वडिलांच्या धाकाचं, जीवाभावाच्या मित्राचं आणि कधीकधी शत्रूचंसुद्धा. पण तरीसुद्धा हवंहवंसं वाटणारं. शेवटी ज्या नात्याच्या आठवणीनं टचकन डोळ्यांत पाणी येतं ते खरं नातं. त्याला नाव देण्याची गरजच काय?

अजूनही आठवतो चाळीच्या स्टेजवरचा माझा पहिला Stage Appearance. मी सांगितलेली लाकुडतोड्याची गोष्ट. खूपच लहान होतो तेव्हा, पण मी असे काही माकडचाळे केल्येयत की काय सांगू? पण माझा उत्साह वाढवण्यासाठी किती बक्षिसं दिली होती लोकांनी? नुसतं तेव्हाच नाही, पण कधीही चाळीत कोणत्याही कार्यक्रमात भाग घ्या, चांगला झाला तर कौतुकाची थाप मिळायचीच. पण वाईट झाला तर सूचनांबरोबर प्रोत्साहनपर कौतुक व्हायचंच. वडिलधाऱ्या मंडळींनी दिलेलं ते प्रोत्साहन तेव्हाच नाही तर आजही उपयोगी पडतं.

मग माझी दहावीची परीक्षा. सगळ्या घरांघरांत जाऊन नमस्कार करून आलो होतो. मी परीक्षेला निघालो तेव्हा अर्धी चाळ माझा धीर वाढवत होती. खरंतर कोण होतो मी त्यांचा? ना नात्याचा ना गोत्याचा. खरंतर कुणीच नाही. चौपन्न बिऱ्हाडातल्या एका बिऱ्हाडातला मुलगा. आणि मी तरी कशाला केला त्या सर्वांना नमस्कार? ते काही माझे नातेवाईक नव्हते. पण कधीकधी त्याहीपेक्षा जवळचे होते. पडलो तर हात द्यायला येणारे, चुकलो तर पाठीत धपाटा घालणारे.

अजूनही घरी सुट्टीवर गेलो की परतताना अगदी सगळ्या चाळीच्या नाही पण मजल्यावरच्या वडिलधाऱ्या मंडळींना नमस्कार केल्याशिवाय घर सोडत नाही. शक्यच नाहीये ते. उद्या आमच्या पुढच्या पिढीतली मुलं "All the Best" च्या गजरात परीक्षेला जातील, पण त्यांना नमस्कार करायला आणि आशीर्वाद द्यायला कोण असतील? मुळात ती आपल्या पालकांनातरी नमस्कार करतील का?

प्रत्येक माणसात काहीनं काही गुण आढळून येईल. गुणांची खाण होती आजूबाजूला फक्त पाहण्याला नजर हवी, नळावरच्या भांडणांच्या आणि common संडासांच्या पलीकडे जाऊन बघायची. कुणी माझ्यात शास्त्रीय संगीताची आवड निर्माण केली, तर कुणी गणितं घालून माझ्या मेंदूला कामाला लावलं. कुणी ओरडलं, भांडलं, पण आम्ही मुलांनी चांगलं वागावं असाच त्यांचा हेतू होता. कोणत्या आजींनी त्यांच्याकडे गेल्यावर न चुकता खाऊ दिला. अगदी अजूनही देतात. माझी आजी आज हयात नाही. पण तीच पाठीवरून हात फिरवतेय असं वाटतं.

आणि चाळीतले मित्र, त्यांचं तर काय सांगावं? अजूनही परत गेल्यावर, काय गद्रे, काय म्हणताय? अशी जोरदार हाक कुठूनतरी ऐकू येते. जुने दिवस आठवतात. किती ते खेळ. लंगडी, हुतुतू, खो खो, क्रिकेट. घरात अभ्यास नसेल तर आम्ही अंगणातच असू. भांडणं होत. मारामाऱ्यासुद्धा होत. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी पहिले पाढे पंचावन्न. आज चाळीत एवढ्या गाड्या झाल्यायत की मुलांना खेळायला अंगणच नाही. ही परिस्थिती पाहून चाळीला नक्की दुःख होत असेल.

तुम्ही बाहेर कितीही मोठे असाल. तो सगळा मोठेपणा बाजूला ठेवून वावरायची नम्रता चाळीने शिकवली. कोण डॉक्टर, आपला सगळा मोठेपणा बाजूला ठेवून उत्सवात अंगणंच झाडेल. कुणी मोठ्या पगारावर आणि हुद्द्यावर असलेली मुलगी किंवा सून, सार्वजनिक हळदीकुंकवासाठी सतरंजी घालण्यापासून तयारी करेल. असे धडे घेत घेत आम्ही मोठे झालो. पुढच्या पिढीचं शिक्षण हे त्यांच्या घराच्या चार भिंतीत computer च्या साहाय्याने होईल. जगाची सगळी माहिती त्यांना उपलब्ध असेल. पण पालकांच्या अपरोक्ष आगाऊपणा केल्याबद्दल टपलीत मारणारे हात असतील का त्या computer ला?

आताशा चाळीतदेखील बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सगळ्या चाळी पाडून उंच इमारतींचं complex बांधायचं चाललंय. माझ्यासारखी मुलंच त्यात पुढाकार घेतायत. आता आम्हाला चाळीच्या common संडासांची लाज वाटायला लागलेय. कोणतीही पूर्वसूचना न देता, काय वहिनी आज पाव भाजी वाटतं असं म्हणत स्वैपाकघरापर्यंत घुसणारे शेजारी आता आम्हाला Intruding वाटायला लागलेत. आमच्या गाड्यांसाठी चाळीचं अंगण अपुरं पडायला लागलंय आणि चाळीच्या सार्वजनिक कामांत भाग घेणं आम्हाला आता Below Dignity वाटायला लागलंय. कुणी विचारला कुठे राहत होता मुंबईत तर आम्ही शिताफीने चाळीत राहत होतो हे सांगायचं टाळू लागलोय.

चाळही आत थकलेली आहेच. म्हाडाचे टेकू लावून लावून तिला तरुण ठेवण्याचा अट्टहास अपुरा पडत चाललेला आहे. त्यामुळे ती स्वतःहून जरी कोसळली नाही तरी आमच्यातलाच कोणीतरी तिच्यावर बुल्डोझर फिरवणार हे निश्चित आहे. उद्या तिथे sky scrapper उभी राहील. आणि काल चाळीच्या अंगणात खेळणारी आम्ही मुलं आमच्या Flat चे दरवाजे बंद करून आमच्या मुलांना computer बरोबर खेळायला बसवू. शेजाऱ्यांकडे जाताना पूर्वीसारखं थेट घरांत घुसणं तिथे असभ्यपणाचं लक्षण मानलं जाईल. तुम्ही आमच्या घरातले नाही, परके आहात असं सांगणारे जाळीचे दरवाजे आणि दरवाज्यावरच्या घंटा तिथे असतील. सगळं काही छान छान आणि आनंदी असेल. पण आमच्या त्या उंच इमारतीखाली चाळीचं थडगं तिच्याच संस्कारांची होळी पाहून अश्रू गाळीत असेल.

अजूनही आठवतं. नोकरीसाठी घर सोडायची वेळ आली, रात्री उठून एकट्यानेच चाळ बघून घेतली होती. उगाचच लहान मुलासारखा कठड्यावर हात ठेवून ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गॅलेरीत फिरलो होतो. जिन्याच्या पायऱ्यांवर बसून एकटाच रडलो होतो. पुन्हा कधी परत येईन माहीत नव्हतं. गाडीत बसताना गॅलेरीत उभ्या असलेल्या लोकांना अच्छा करताना मनातल्या मनात चाळीलाही अच्छा केला होता. मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारताना मनातला आवंढा गिळला होता.

ह्या आठवणी येतात, मन एवढं एवढंसं होतं. वाटतं सोडून द्यावे जिंकलेले सारे किल्ले, परत जावं. चाळीच्या अंगणातल्या सगळ्या गाड्या केराच्या टोपलीत टाकाव्यात. सगळ्या मित्रांना परत अंगणात बोलवावं. एक जोरदार फटका मारून तळ मजल्यावरच्या काकूंच्या तावदानांची काच फोडावी. काकूंनी चेंडू विळीवर कापून द्यावा. संध्याकाळी त्याच काकूंचं दळण मी त्यांना आणून द्यावं. त्यांबद्दल त्यांनी मला खाऊ द्यावा आणि पुन्हा काच फोडणार नाही असं वदवून घ्यावं. गोकुळाष्टमीला यथेच्छ खेळावं, होळीला जीव तोडून रंगावं. उत्सवात लहान मूल होऊन हुंदडावं. पुन्हा एकदा चाळकरी व्हावं. पुन्हा एकदा चाळकरी व्हावं.

..........CD Player मधली CD संपलेली असते. बायको मला जेवण्यासाठी बोलावते. आज जेवण नीटसं जात नाही. ती का म्हणून विचारते. मी निरुत्तर होतो..........

Wednesday, May 02, 2007

रोहिंग्या आणि डान्सिंग विथ द स्टार्स...

एक घाणीने बरबटलेलं गटार, खरंतर रस्ताच. बाजूला झोपडपट्टी. समोर थोडी मोकळी जागा. निळ्या गणवेषातला एक पोलिस काठी आपटंत येतो. मोकळ्या जागेत खेळणारी मुलं उधळून पळतात. एक पांगळं मूल मागेच रखडतं. पोलिस त्याच्यावर काठी उगारून त्याला धमकावतो. कदाचित पोलिसालाही त्या मुलाची दया येते. त्या मुलाला तसंच सोडून तो पुढे जातो. ते पांगळं मूल तसंच गटारात पडून रहातं. त्याचे टपोरे डोळे पाण्याने भरतात. अश्रू नाही, ते संताप, दुःख, असहायता, अपमान ह्याने भरतात. कोणी लहानपणीच मोठं केलं ह्या लहान मुलांना?

.......रोहिंग्या. बांग्लादेश आणि बर्मा ह्यांच्यातल्या एका वादाचं कारण. बर्मामधल्या एका मुस्लिम जमातीला रोहिंग्या म्हणतात. ते आश्रित म्हणून बांग्लादेशात रहातात. Official Number बावीस हजार. विस्थापित, आश्रित, Refugee......

शाळा. शाळेत मुलं काहितरी घोकतायत. काहितरी नाही, English आहे ते. "I am something" असं काहिसं. एक पोरगेलसा शिक्षक शिकवतोय. चक्क लूंगी लावून. कारणंच तसं आहे. तो Refugee असल्याने त्याने Pant घालणं त्याच्या दर्जाला साजेसं नाही. लुंगी ऎवजी Pant घातल्यामुळे खाव्या लागलेल्या माराचे व्रण अजूनही त्याच्या पाठीवर ताजे आहेत.

......मुसलमान म्हणून ते बर्मामधे वेगळे काढले जातात. लोकशाही नाही, व्यक्तीस्वातंत्र्य नाही. बांग्लादेश मुसलमान देश, लोकशाही देश म्हणून रोहिंग्यांचे लोंढेच्या लोंढे बांग्लादेशात येतात. पण त्यांच्यासाठी तरी कुठे ते आपले आहेत? उपरे म्हणून त्यांच्यावर लोकांचा आणि system चा सुद्धा राग आहे.......

एक धडधाकट माणूस चक्क ढसाढसा रडतोय. त्याच्या बायकोसमोर, मुलांसमोर. मुलांना दोन वेळेला जेवायला पण मिळत नाही असं डोळ्यात आर्जव आणून आणून सांगतोय. तो एक भांडं दाखवतो. त्यात जेवण म्हणून बनवलेलं काहीतरी असतं. हे मिश्रण आणि भात. सकाळ संध्याकाळ हेच खायचं. तेसुद्धा जर पुरेशी धनधान्याची मदत मिळाली तर. वर पोलिसांचा मार आहेच. आता त्याच्या बायकोलाही रडू येतंय. पोरगं मात्र मातीशी खेळण्यात दंगलंय. एक बचाकभर माती उचलून ते सरळ तोंडात टाकतं.

......बावीस हजार रोहिंग्या बांग्लादेश बर्मा सीमेवरच्या Refugee Camp मधे रहातात. संयुक्त राष्ट्रांकडून हे Camps चालवले जातात. पण अनधिकृतपणे बांग्लादेशात रहाणार्‍या रोहिंग्यांची संख्या एक लाखाहूनही अधिक आहे. त्यांना Refugee Camp मधे ज्या काही तुटपुंज्या सोयी मिळतात त्याही मिळंत नाहीत......

एक बाई आपल्या झोपडीसमोर बसलेय. तिची मुलं कसलासा पाला समोरच्या रानातून तोडून आणतात. तोच पाला ती शिजवतेय अन्न म्हणून. सात मुलं आहेत तिला. नवर्‍याला बर्मा मधे मारलं म्हणून ती मुलांना घेवून बांग्लादेशात पळून आली. पण ती अनधिकृत Refugee आहे. मुलं अधाशासारखी त्या पाल्याकडे बघतायत. ती बाई डोळ्यात असवं आणून सांगतेय. तिला आणि तिच्या नवर्‍याला बर्मिज सॆनिकांनी कॆदेत टाकलं. सतत बलात्कार. सातातली किती मुलं नवर्‍याची आणि किती दुसर्‍यांची हे सांगणंदेखील तिला शक्य नाही. तिला तिच्या मुलीची अशी अवस्था करायची नाहीये. चवदा वर्षाची आहे तिची मुलगी. पण तिला ती कुठेही जावू देत नाही. आजूबाजूचे लोक अचकट विचकट बोलतात, घरापर्यंत येवून तिला पाठव म्हणून धमकावतात.

.....रोहिंग्या लोकांविरुद्ध बांग्लादेशींमध्ये असंतोष खदखदतोय. ते स्वस्तात कामं करतात आणि स्थानिकांचा रोजगार पळवतात. ह्यामुळे स्थानिकांकडून त्यांना काही मदत मिळणं अशक्य आहे. सरकारही ते उपरे असल्याने त्यांच्यासाठी काहीही करू इच्छित नाही. बर्मा सरकारने तर त्यांचं राष्ट्रियत्व नाकारलंय. हा तिढा इतक्यात सुटण्याची चिन्ह नाहीत म्हणून मदत देणार्‍या देशांनीही हात आखडता घ्यायचं ठरवलंय. पण तरीही एक आशेचा किरण अद्याप आहे......

एका छोट्या hall मधे अनेक लहान लहान मुलं आणि त्यांच्या आया बसल्यायत. प्रत्येकीच्या हातात एक चंदेरी पिशवी आहे. ती एका बाजूने फोडून त्यातलं चाटण आया मुलांना खायला घालतायत. Medecins Sans Frontieres (MSF) अर्थात Doctors without Borders ह्या संस्थेचा एक स्वय़ंसेवक सांगतोय की रोहिंग्या विस्थापितांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे. कारण कुपोषण. म्हणून MSF तर्फे हे पोषक अन्न बालकांना दिलं जातंय. ते बालकांना तर आवडतंच आणि त्याचा पुरवठा करणंही तितकसं अवघड नाही. हळूहळू इथल्या बालकांचं पोषण ह्यामुळे सुधारेल.

......असा आहे हा तिढा. ना घरका न घाटका. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. एकोणिसशे नव्वद सालापासून लोक Refugee म्हणून रहातायत. पंधरा वर्ष झाली. लहानांचे तरूण झाले. त्यांनी बाहेरचं जग पाहिलंच नाही. तरूण उताराला लागले उद्याच्या आशेवर. म्हातारे मेले चांगल्या कबरीची स्वप्न पहात. पण बांग्लादेश, बर्मा आणि त्यांच्यातला हा तिढा आहे तसे आहेत. आणि रोहिंग्या आहेत कायमस्वरूपी Refugee......

निवेदक आपलं निवेदन संपवतो. श्रेयनामावली सुरू होते. आम्ही बघणारे मात्र सुन्न. कशा अवस्थेत लोकं रहातात? आणि आपण फालतू कारणांसाठी रडत असतो. हे विषय पण गुंतागुंतीचे. रोहिंग्या बांग्लादेशात refugee. बांग्लादेशी भारतात refugee. आणि भारतीय पश्चिमी देशांत. Refugee नसले तरी तसलंच काहीतरी. विचारांची वावटळ मनात सुरू होते.

इतक्यात श्रेयनामावली संपून जाहिराती सुरू होतात. मी चटकन भानावर येतो. घड्याळाकडे लक्ष जातं. साडेसात. मी जवळ जवळ किंचाळतोच बायकोच्या अंगावर. अगं "Dancing with the stars" सुरू झालं असेल. तार्‍यांच्या भाऊगर्दीत रोहिंग्या अस्पष्ट होत जातात.