Friday, April 04, 2008

का?

रात्रीचे साधारण अकरा वाजलेले. नुकताच ऑफिसमधून परतलेला मी. दिवसभराच्या कामाने जीव कंटाळलेला. पण एक अनामिक समाधान. काहीतरी पूर्णत्वाला जात असल्याचं. खरंच आपण काम कशासाठी करतो? पगार मिळावा, पैसा मिळावा म्हणून की कामातून एक समाधान मिळतं म्हणून? कुठे आपलं कौतुक होतं, कुठे आपला अहं सुखावतो, म्हणून?

तितक्यात आतून ललित येतो. ललित म्हणजे इथल्या कंपनीने आमच्या मदतीला दिलेला हरकाम्या. गंमत म्हणजे आम्हाला तो हरकाम्या वाटतंच नाही. मित्रच वाटतो. त्याला इंग्लिश येत नाही, आम्हाला सिंहली येत नाही, त्यामुळे बराचसा व्यवहार खाणाखुणांनीच चालतो. तो खरंतर झोपेतूनच उठलाय, पण चेहऱ्यावर कंटाळा नाही. का करत असेल हा काम? समाधान मिळतं म्हणून? लोकांची धुणी धुण्यात कसलं आलंय समाधान?

त्याला आता आम्ही काही इंग्रजी शब्द शिकवलेत. तो मला डिनर आणि पाठी प्रश्नचिन्हात्मक उद्गार एवढंच विचारतो. मी त्याला मान हालवून नाही सांगतो. तो त्याची नाराजी सिंहलीतून ऐकवतो. मला काहीच कळत नाही. बहुतेक त्याने जे काय बनवलंय ते फुकट जाणार असा काहीसा त्याचा सूर. मी त्याला डिनर येस म्हणून सांगतो.

तो मस्त केळ्यासारखं ह्या गालापासून त्या गालापर्यंत हसतो. देवाची रंगसंगती बघा. काजळासारखा काळा त्याचा रंग आणि मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात. झटकन आत जाऊन तो जे काही बनवलेलं असतं ते घेऊन येतो. मला देतो आणि निघून जातो. खुणेनेच ताट किचनमध्ये ठेवून जा, हे सांगायला विसरत नाही.

मी नको असलेलं ते अन्न चिवडत बसतो. आपण नको असलेल्या गोष्टी का करतो? पैशासाठी? स्वतःच्या समाधानासाठी की दुसऱ्याच्या समाधानासाठी? जसा मी आज हे नको असलेलं विचित्र श्रीलंकन जेवण जेवतोय, पोटभर जेवण झालेलं असतानाही?

आम्ही दिवसभर काम करून दमतो, म्हणून आमच्या समाधानासाठी ललितने जेवण बनवायचं, आम्हाला पोटभर जेवल्याचं समाधान मिळावं म्हणून. आणि बाहेर पोटभर जेवण झाल्यावर आम्ही घरी यायचं आणि त्याने केलेलं न रुचणारं जेवायचं, त्याचं समाधान व्हावं म्हणून. का नाही मी सांगत त्याला? की बाबारे नाही आवडत तू जे काय बनवतोस ते. नको बनवू?

सगळंच मोठं विचित्र आहे. भारताच्या चार कोपऱ्यातून आलेले आम्ही चार श्रीलंकेत येतो काय, आणि हा त्याच्या गावाबाहेर सुद्धा कधी न पडलेला ललित आम्हाला येऊन मिळतो काय. जर शक्यता बघितल्या तर अशा पाच व्यक्ती एकत्र येण्याची शक्यता किती? नगण्य. पण अशा व्यक्ती एकत्र येतात. नुसत्या येतच नाहीत तर मैत्री होते त्यांची. तो नोकर आम्ही मालक असं कधी वाटतंच नाही. तोही आमच्यातलाच एक होतो. खुणांनी गप्पा मारतो, प्रसंगी ओरडतो, आम्हाला सिंहली शिकवतो आणि आम्ही त्याला इंग्लिश शिकवतो.

नको असलेलं जेवण कसंबसं पोटात ढकलून मी बाहेर हॉलमध्ये येतो आणि बाल्कनीत जाऊन उभा राहतो. बाहेरचा दमटपणा मुंबईची आठवण करून देणारा. रस्ते दिशाहीन वाटतात. परके वाटतात. मध्येच एखादी गाडी शांततेचा भंग करीत जाते. झोप डोळ्यात पेंगत असते पण तरीही झोपावंसं वाटत नसतं.
हातातल्या फोनवरून मी कॉलिंग कार्डाचा नंबर फिरवतो. समोरून एक यंत्रबाई पाचशे रुपये बॅलन्स आणि दहा मिनिटं वेळ असल्याचं सांगते. बराच वेळ कंटाळवाणं संगीत ऐकल्यावर एंगेज टोन. पुन्हा नंबर, पुन्हा बॅलन्स, पुन्हा संगीत, पुन्हा एंगेज टोन.

मी माझ्या घराला सोडून इकडे येऊन राहिलो कशासाठी? पैशासाठी कदाचित. कदाचित सेल्फ ग्रॅटिफिकेशनसाठी, कदाचित अहं कुरवाळण्यासाठी. आणि ललित का इथे येऊन राहिला? कदाचित त्याच कारणांसाठी. त्याचं घर त्याच्या गावात, आमचं घर भारतात. मिस करत असू का आम्ही सगळे आमचं घर? तो त्याचं, आम्ही आमचं. आणि मग त्यातूनच होत असेल का एक प्रयत्न. आपलं घर सिम्युलेट करण्याचा. नाती सिम्युलेट करण्याचा. आपण कुणासाठीतरी काहीतरी करतो हे समाधान ढापण्याचा किंवा कुणीतरी आपल्यासाठी काही करतो ह्यात समाधान मानून घेण्याचा?

पुन्हा नंबर, पुन्हा बॅलन्स, पुन्हा संगीत, पुन्हा एंगेज टोन. मी फोन बंद करतो आणि झोपायला जातो.

14 comments:

Aparna Pai said...

Kiti samarpak aahe ! Ya kaa cha uttar mi dekhil shodhat aahe..

हरिप्रसाद said...

झकास रे मित्रा, मस्त लिहले आहेस ...
एकदम टच करून गेले.
मलापण वाटते कधीतरी "कशासाठी हा अट्टाहास ?". जास्त करून ही भावना आपण ८ दिवस सुट्टी घेउन जेव्हा घरी जातो तेव्हा हटकून मनात येते. पण पुन्हा २-४ दिवसात मला "प्रोजेक्ट चे काय झाले असेल?" हा विचार मनात येतो आणि मन पुन्हा तिकडे ओढ घेते. शेवटी काय तर "JOB IS JOB" करना पडता है !!!

Anand Sarolkar said...

Hach "Ka?" gele 2 varsh mala chhalato ahe ani me te sahan karto ahe...Ka?...tar mala uttar sapdat nahi mhanun.

Samved said...

सही रे मित्रा....आपलंच शेपुट पकडु पाहाणारया कुत्र्यासारखे गोलच्गोल फिरतो आहोत झालं...
आणि नौकराचं नाव ललित? रसिक घरातला गब्रु दिसतोय!

HAREKRISHNAJI said...

मी यंदाची सफर श्री लंकेला काढण्याचा विचार करत आहे. कसा काय हा देश आहे ?

Monsieur K said...

why? tell me why?
guess, each one keeps asking this same Q to oneself...

स्नेहा said...

का? कशासाठी? या प्रश्नाच उत्तर कोणालाच कदाचित सापडत नाही... मला गेल्या एक वर्षात तो खुप भेडसावतो आहे...
उत्तर समाधनकारक नाही मिळत .. आणी परत आपल काम सुरु होत.ं. नंबर, पुन्हा बॅलन्स, पुन्हा संगीत, पुन्हा एंगेज टोन. फोन बंद करुन प्रत्येकजण झोपी जातो... (?)

vinayak pandit said...

कोहम!
खूप छान लिहिता तुम्ही!
मला आपला ब्लॉग,त्यावरचं सगळ्या प्रकारचं लिखाण खूप आवडलं!
ब्लॉगही मस्त डिझाईन केला आहात!उत्तम!
मला पाठवलेल्या कॉमेंटबद्दल मन:पूर्वक आभार!
विनायक पंडित

प्रशांत उदय मनोहर (Prashant Uday Manohar) said...

nice one.

me said...

good one, khup real lihitos mitra,malahi ha prashna bhedsawto ahech pan maza problem thoda wegla aahe ka mi ghetle 20 warsha shikshan ? ani kay milalay hatat tya mule? ka tarihi me te continue katey? kay honar aahe yane futur cha mazya? kaahi kalat nai.... shodh jaari aahe!

Shraddha Bhowad said...

कोहम..
ब्लॉगला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद...तुमच्या पोस्ट मधलं ’तो मस्त केळ्यासारखं ह्या गालापासून त्या गालापर्यंत हसतो’..हे वाक्य डोक्यात गेलं बरं का..मी ही उपमा frequently वापरायच्या विचारात आहे...what say???
श्रद्धा...’शब्द-पट’वाली

<--sahdeV-- said...

Ani he ek barobbar opposite post!

(Maza nahiyye, so m not advertising! :P)

Vidya Bhutkar said...

Khup divasani comment lihitey. Hi post vachun tujhe june posts athavale. Remember, Bhagyashri?,रोहिंग्या आणि डान्सिंग विथ द स्टार्स...
Its good to see u back. :-) 'This' is ur unique style of writing, keep it up.
-Vidya.

shinu said...

खुप छान जमलंय.