Thursday, January 24, 2008

ठोका - पडलेला आणि चुकलेला

रात्रीच्या मिट्ट काळोखात, अमावास्येच्या चंद्राच्या नसलेल्या अस्तित्वाला शोधत तो एकटाच गॅलेरीत बसला होता. समोरचं लाल मातीचं अंगण, अंगणापलीकडे अंगात आल्यासारखे वाऱ्यावर बेभान होऊन नाचणारे माड. किंचित करड्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर, त्यांचा काळाकभिन्न झावळ्या आणि ह्या अघोरी नृत्याला साथ म्हणूनच की काय, वाऱ्यावर तरंगत त्याच्यापर्यंत येणारी समुद्राची गाज.

तो तिथे एकटाच बसला होता कारण तो एकटाच होता. अगदी एकटा. सरकारी नोकरीमागे ह्या आडगावात तो कसा येऊन पोचला, त्याचं घर, मित्र, आई वडील सगळं सगळं त्याला आठवलं. तशी आठवण त्याला रोजच येई पण आजच्या दिवशी ह्या वेळी खासच. त्यात साडेअकरा होऊन गेलेले, बाराचा ठोका जवळ येत चाललेला, जुन्या आठवणींचा महापूर आला, दिव्याजवळच्या भिंतीवर काजळीची पुटं चढावी तशी निराशेची पुटं त्याच्या मनात चढायला लागली. सोबतीला अमावास्येची काळी रात्र, घोंघावणारा वारा आणि समुद्राची गाज.

तो एकटा आणि त्याच्यासाठी असलेला हा डाक बंगला. दोघेही एकटेच. गावाबाहेर असलेला हा अवाढव्य डाक बंगला खरंतर त्याला नको होता पण दुसरा पर्यायच नव्हता. आताशा त्या डाक बंगल्यासारखीच त्यालाही एकटेपणाची सवय झाली होती. दिवसाचा प्रश्न नव्हता, पण रात्री खायला उठतं, त्यात अशी अमावास्येची भयाण रात्र.

राहून राहून एकच दिलासा होता, तो म्हणजे फोन. अजून कसा आला नाही फोन? त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने हातातल्या रिस्ट वॉच मध्ये पाहिलं. घड्याळ दहा ची वेळ दाखवत होतं. दिवाणखान्यातून तो त्या झाडाला विळखा घातलेल्या सापासारख्या गोलाकार जिन्याच्या पायऱ्या चढून वर आला तेव्हा तर साडे अकरा वाजले होते. म्हणजे घड्याळानं ऐन वेळेला दगा दिला होता.

पण एव्हाना बारा वाजायला पाहिजे होते. अजून कसा फोन आला नाही. खाली जाऊन वेळ पाहून येण्याची त्याची इच्छा नव्हती. त्या गोलाकार जिन्याचा तर त्याला तिटकाराच होता. शिसवी जिना तो पण पुरता खिळखिळा झाला होता. आणि भयानकही. अगदीच नाईलाज होता म्हणून तो जिना वापरात होता. खरंतर हा बंगलाच.

गेल्या वर्षी ह्याच दिवशी त्याने तिला आपलं मनोगत सांगितलं होत. गोरखगडावरची ती गुहा, आजूबाजूला असलेली मित्र मंडळी, त्यातच तिला भर रात्री तो वरती अवघड वाटेने देवळाच्या इथे घेऊन गेला होता. सगळं सगळं त्याला आठवलं. ते खाली आल्या नंतरचं सेलेब्रेशन. सगळे मित्र त्याचं अभिनंदन करीत होते, पण कुणालाच त्यांचं गुपित माहीत नव्हतं. त्याचं मित्रांच्या बोलण्याकडे नसलेलं लक्ष, त्यावरून पडलेल्या शिव्या. सगळं सगळं. तिला आपल्या मनातलं सांगण्याआधी झालेली हृदयाची धडधडही आता स्पष्ट आठवली.

आठवली की ऐकू आली? क्षणभर तो गोंधळला. काय ऐकलं मी? कसली धडधड. मनातले विचार आणि आणि सत्य ह्याची त्याच्या मनात गफलत तर नाही ना झाली? अचानक त्याच्या मेंदूला कोडं सुटलं, आवाज त्या शिसवी जिन्याचा होता. पण मी इथे असताना कोण? आवाज तर नक्की ऐकला. नक्की. की धडधड? माझ्याच हृदयाची? मी घाबरलोय? कोणाला? जोरात ओरडावं असं त्याला वाटलं. पण ओरडून उपयोग नव्हता कारण ऐकायला कोण होतं?

मनाचा हिय्या करून तो आत जिन्याच्या दिशेनं गेला. आत शिरताच जिन्याजवळच्या दिवा लावायला बटणाकडे त्याचा हात गेला. बटण हाताला लागताच तो चपापला कारण दिव्याचं बटण चालू होतं, पण दिवा बंद होता. गेले वाटतं दिवे? त्याने कारण शोधलं. पण मी गॅलेरीत येताना दिवा बंद करून आलो नेहमीप्रमाणे. मग हा दिवा चालू कसा? गॅलेरीच्या दरवाज्यातून गारवा आत सांडत होता, पण त्याचा सदरा मात्र घामाने भिजून गेला.

समोर खाली तो अवाढव्य दिवाणखाना पसरला होता. अमावास्येच्या अंधारात घरातल्या वस्तू विचित्र दिसत होत्या. भिंतीवर लावलेल्या वाघाच्या कातडीला पाहून तो चपापला, बाजूचं तरसाचं तोंड हालतंय की काय असं त्याला वाटायला लागलं. त्याने जरा निरखून पाहिलं. तो सावलीचा खेळ होता. सगळ्या वस्तू ठेवल्या जागी होत्या. जिनाही आपल्याच गुर्मीत वेटोळे घालून पडला होता. त्याला थोडं हायसं वाटलं.

वाजले असतील का बारा? गॅलेरीत ठोके ऐकू येत नाहीत पण वाजायचे असतील अजून तर बाराचे ठोके नक्की ऐकू येतील. फोन पण आला नाही, पण एव्हाना वाजायला हवे होते बारा. तो हळू हळू जिना उतरून खाली आला. शेवटच्या पायरीलगत असलेल्या खांबावर सिंहाचं तोंड कोरलं होतं, तिथे त्याने घट्ट पकडलं आणि भिंतीवर तो खालच्या दिव्याचं बटण शोधायला लागला. हाताला बटण लागलं आणि तो घाबरलाच. कारण हेही बटण चालू होतं. वीज गेल्येय. मघाशीही त्याला हे लक्षात आलं होतं? मग? पण मी वर येताना दिवा नक्की बंद केला होता, कुणी चालू केला? चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी घाम गळायला लागला. त्या घामाच्या थेंबांच्या चेहऱ्याला झालेल्या स्पर्शानेसुद्धा तो दचकला.

तेवढ्यात स्वयंपाकघरातून काहीतरी पडल्याचा आवाज झाला. त्याही अवस्थेत, खिशात विजेरी असल्याचं त्याला लक्षात आलं. त्याने विजेरी चालू केली आणि तो स्वयंपाकघरात घुसला. जमिनीवर चाकू पडला होता. हा माझ्या हातून इथं पडणं शक्यच नाही. तितक्यात बाहेरून कसलासा आवाज आला. तो बाहेर धावला. बाहेर सगळं सामसूम होतं. त्याने विजेरी मारून इथे तिथे पाहिलं, काही हालचाल नव्हती.

नक्की ऐकला, वरूनच आला हा आवाज. तो विजेरी घेऊन पायऱ्या चढायला लागणार इतक्यात किचन मधून आवाज आला. तो होता त्या जागी थबकला. दुसऱ्या खोलीच्या दिशेनेही आवाज आला. मग तिसऱ्या खोलीतून, पुन्हा वरून, किचनमधून. घामाची अंघोळ झाली, मनातला ताण असह्या झाला आणि तो जिवाच्या आकांताने ओरडला आणि कानावर हात ठेवून खाली वाकला. क्षणभर सन्नाटा पसरला. त्या शांततेला उभा आडवा कापत एक आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला. तो कसला हे कळायला त्याला दोन क्षण लागले. त्याचा फोन वाजत होता. त्याही अवस्थेत फोन आला ह्याचं त्याला बरं वाटलं.

तो हळू हळू फोनच्या दिशेने निघाला. पुन्हा मगाचचे आवाज सुरू झाले, तो प्रचंड घाबरला. आवाज अधिकाधिक वाढायला लागले, आता तो खोलीच्या मध्यावर पोचला. फोन वाजायचा बंद झाला आणि दिवाणखान्यातल्या घड्याळाने बाराचे टोल द्यायला सुरवात केली. टोल सुरू होताच मगाचचे ते आवाज बंद झाले, बाराचा बारावा टोल झाला आणि साटकन घरातले सगळे दिवे लागले, एकदम डोळ्यावर आलेल्या प्रकाशाने त्याने डोळे मिटून घेतले आणि मटकन तो खाली बसला.

Haappy Birth Day to You!!!

सगळ्यांनी एकच गिलका केला. त्याची सगळी गँग मुंबईहून खास त्याच्या वाढदिवसासाठी आली होती. साने, बाल्या, अंडू, पराग, काणी, मृदुल सगळे होते. त्याला वास्तवात यायला थोडा वेळ लागला. तितक्यात किचनमधून तीही आली, हातात केक घेऊन आणि तो कापायला मघाशी जमिनीवर पडलेला सुरा. साल्यांनो फाटली ना माझी, म्हणत तो उठला, फोन बघितला. मिस्ड कॉल फ्रॉम आई बाबा. सगळ्यांचे वाढदिवस बरोबर बारा वाजता साजरा करायची त्यांच्या ग्रुपची परंपरा अशा प्रकारे चालूच राहिली.

पडलेल्या बाराच्या ठोक्याला त्याच्या छातीचा ठोकाही चुकला होता. पण त्याला आता परवा नव्हती. आता तो वाढदिवस झोकात साजरा करणार होता.

Saturday, January 05, 2008

पुन्हा मी

जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने पाहिल्या की वेगळ्या वाटतात का? गोष्टी बदलतात की आपण बदलतो? कदाचित संदर्भ बदलतात.
तेच रस्ते, त्याच गल्ल्या, तीच माती, तीच धूळ पण कदाचित तोच नसलेला मी.

लबाड मांजरासारखा मी डोळे मिटून राहिलो
समोरचं दूदू गटागटा प्यायलो.

मांजरं मूर्ख असतात, त्यांना वाटतं कुणीच त्यांना पाहत नाही.
पण खरंच मला कुणीच पाहत नाही
कारण आजूबाजूला सगळीच मांजरं आहेत
त्यांनाही वाटतं त्यांना कुणीच पाहत नाही आणि खरंच कुणीही पाहत नसेल,
कारण इथे सगळीच लबाड मांजरं आहेत.

पण मी मात्र माझा वेगळा बाणा दाखवतो
हळूच पापणी किलकिली करून एका डोळ्याने पाहातो.

दिसतात मला साजरे नसलेले डोंगर
कसे बरं दिसले होते स्वप्नात? स्वप्नवत

अचानक समोरचा सिग्नल सुटतो,
जो तो मीठासारखा पेटतो आणि हॉर्न मारत सुटतो.

ती रिक्षा, ती टॅक्सी, तो जडावलेला ट्रकही सरसावतो,
जाता जाता सायकलावलाही मला दरडावतो

आवाजाचा कलकलाट असह्य होतो,
समोरची धुळवड असह्य होते

मी लगेच उघडलेले डोळे बंद करतो
तडक उठतो आणि एका मॉलमध्ये जातो.

आतली गार हवा मला शांत करते, सगळा शीण सरतो
आतमधला झगमगाट माझा खिसा रिकामा करतो.

तृप्त मनाने मी बाहेर येतो,
सगळा इंडिया शायनिंग होतो

माझ्या वातानुकुलित गाडीत बसून मी पुन्हा डोळे मिटून घेतो
गार गार हवेत मी स्पिरिचुअल इन्स्पिरेशन शोधतो

सेल्फ ऍक्चुअलायझेशन होऊन पुन्हा डोळे उघडतो
सताड डोळ्यांनी थंड काचेपलिकडे पाहतो

रस्त्याच्या बाजूला लोक करू नये ते करीत असतात

भिकारणीच्या गळ्यात सोन्याचा साज
हगत्या लाज का बघत्या लाज?

मनातले मांडे मनातच राहतात, आणि नको ते घडतं
उतरलेलं विमान पुन्हा आकाशात उडतं

गर्दी विलोभनीय वाटायला लागते, धुळीला मृद्गंध सुटतो
दुरून डोंगर साजरे हा फॉर्म्युला पुन्हा मनाला पटतो

दर वर्षी मी येतो दर वर्षी असं होतं
हातात असतं ते नेहमीच मला नकोसं होतं

मग मी पुन्हा डोळे मिटून घेतो
आणि लबाड मांजरासारखं दूदू चटाचटा पितो.

कुणीच मला पाहत नाही, मला अजिबात संशय नसतो
मांजरं खरंच मूर्ख नसतात, मी मात्र नक्कीच असतो.