Saturday, February 28, 2009

नशीब

ब्याऐंशीतली कोणतीतरी संध्याकाळ. अगदी आज असते तशीच असणार तेव्हाही. चौपाटी, रस्त्याच्या बाजूला असलेले भेळवाले, त्यांच्या पलीकडे थोड्या अंतरावर लोकमान्य टिळक. करडा समुद्र आणि दूरपर्यंत पसरलेली वाळू. रस्त्यावरून वाहनांची गर्दी, चौपाटीवर माणसांची गर्दी. त्या गर्दीत एक तो. तीन वर्षाचा छोटा. चौपाटी त्याला खूप आवडायची.

वाळूचे डोंगर बनवायचे आणि स्वतःच ते तोडून टाकायचे हा तिथला त्याचा आवडता खेळ. वेगवेगळ्या लोकांबरोबर चौपाटी वेगवेगळी दिसायची. सकाळी आजीबरोबर फिरायला गेल्यावर, तिच्या सगळ्या मैत्रिणींच्या गोतावळ्यात बसून ऐकायच्या गप्पांची मजा वेगळी. घरी परतताना उचललेली बदामाची फुलं आणि चाफ्याच्या फुलाची आजीने बनवून दिलेली अंगठी, त्याची मजा वेगळी. आणि आई बाबांबरोबर रविवारी संध्याकाळी चौपाटीवर जाऊन केलेली मजा वेगळी.

पण आजची संध्याकाळ जरा वेगळी होती. त्याच्याबरोबर त्याची आजी नव्हती आणि आई बाबाही. चाळीतल्या दोन काकूंनी त्यांच्या मुलांसोबत इतरही मुलांना चौपाटीला नेण्याचा घाट घातला होता. सगळ्या मित्रमंडळींबरोबर खूप खेळायला मिळणार ह्या आनंदातच तो चौपाटीला गेला.

रोज खेळतात तसाच कुठलातरी खेळ सगळे खेळायला लागले. इथे मुलांचा खेळ रंगला तशा तिथे काकूंच्या गप्प रंगायला लागल्या. कसला खेळ कोण जाणे पण खेळता खेळता आपल्या ह्या छोटूच्या पायातनं त्याची चप्पल सटकली. धावता धावता म्हणा किंवा कसंही म्हणा पण त्याच्या ते लक्षात आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याला त्याची चप्पल मिळेना.

छोटूच्या एकदा मनात आलं की आपण जाऊन काकूंना सांगावं की चप्पल हरवली. पण मग त्याला वाटलं नकोच सांगायला. चप्पल काय इथेच कुठे असेल. आपले मित्र आणि काकू कुठे आहेत हे छोटूनं एकदा नीट बघून घेतलं. एका काकूंनी निळी साडी घातली होती आणि दुसऱ्या काकूंनी पिवळी साडी घातली होती. त्याने मनात हे नक्की लक्षात ठेवलं आणि तो चप्पल शोधायला लागला.

चालत चालत कुठे गेला कोण जाणे. चप्पल तर त्याला मिळाली नाहीच पण आता काकू आणि मित्रही दिसेनासे झाले. आता काय करायचं? छोटू एकदम रडकुंडीला आला. पण त्याने अजिबात धीर सोडला नाही. त्याने स्वतःला समजावलं की एका काकूंनी पिवळी साडी आणि दुसऱ्या काकूंनी निळी साडी घातली आहे. आपल्याला त्या नक्की दिसतील. त्यानी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. दूर कुठेतरी त्याला निळ्या पिवळ्याचं काँबिनेशन दिसलं. जितक्या वेगात शक्य होतं तितक्या वेगात तो त्या दिशेने गेला. आपले मित्र काकू भेटणार म्हणून खूश झाला. पण जवळ जाऊन पाहातो तो काय? ते कुणी दुसरेच होते.

असं करत करत तो एका निळ्या पिवळ्या काँबिनेशन कडून दुसऱ्या कडून तिसऱ्या करत करत कुठे गेला कोण जाणे. इथे काकूंच्या लक्षात अलं की छोटू कुठे दिसत नाहीये. त्यांनी आजूबाजूला शोधलं, तरी मिळाला नाही. तीन वर्षाचा गोरा गोमटा छोटू हरवला तरी कुठे? आता छोटूच्या आईबाबांना उत्तर काय द्यायचं? ह्या प्रश्नाने काकूंनापण रडू आलं. पण तिथे वेळ दवडण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण शोधूनही छोटू सापडला नव्हता. त्या तशाच चाळीत परत आल्या. झाला प्रकार त्यांनी छोटूच्या आईबाबांना, सगळ्यांनाच सांगितला. लगेच सूत्र हलली. कुणी पोलिसात फोन केला. आई बाबा तसेच छोटूला शोधायला निघाले. अख्खी चाळ छोटूला शोधायला बाहेर पडली. आजी तेवढी घरी राहिली.

सगळ्यांनी शोध शोध शोधला. कुठे गेला कोण जाणे संध्याकाळ सरून अंधार पडायला लागला, तरी छोटूचा पत्ता लागला नाही. सगळे हवालदिल झाले. चौपाटीवर फिरून फिरून पाय दुखले तरी छोटूचे आई बाबा हार मानायला तयार नव्हते. मनात वाईट साईट विचार येत होते पण तरीही ते छोटूला शोधत होते. शोधणार होते.

-----------

एक माणूस खुर्चीत बसलेला. त्याच्यासमोर एक मुलगा उभा. माणूस मुलाला, त्याच्या आवडीचं सुरदासाचं भजन म्हणायला सांगतो. मुलगा आनंदाने "दर्शन दो घनशाम" हे त्याला शिकवलेलं भजन म्हणायला लागतो. खुर्चीत बसलेल्या माणसाला आपलं भजन आवडलं तर आपलं कल्याण होईल म्हणून मुलगा मनापासून गात असतो. मुलाचं भजन खरंच चांगलं होतं. खुर्चीत बसलेल्या माणसालाही ते आवडतं. तो टाळ्या वाजवत उठतो आणि मुलाचं कौतूक करता करताच बाजूला उभ्या असलेल्या माणसाला खूण करतो. इशारा मिळताच उभा असलेला माणूस कसलासा फडका मुलाच्या नाका तोंडाला लावतो. मुलगा बेशुद्ध पडतो. त्याला आडवा झोपवला जातो. त्याचा एक डोळा उघडून तापतं तेल त्याच्यावर ओतलं जातं. मुलाचा एक डोळा कायमचा जातो.

आता जन्मभर मुलगा आंधळा भिकारी म्हणून जगणार असतो.

-------------

ब्याऐंशीच्या त्याच संध्याकाळी एक मारवाडी कुटुंब मलबार हीलच्या बाजूला चौपाटीवर बसलेलं. दोघं नवरा बायको आणि त्यांची मुलगी. थोड्या अंतरावरंच एक मुसलमान कुटुंब बसलेलं असतं. त्या दोन्ही कुटुंबांच्या मधल्या जागेत एक गोरा गोमटा लहान मुलगा काहीतरी करत असतो. मारवाडी बाई आपल्या नवऱ्याला म्हणते की बहुतेक हा मुलगा हरवल्यासारखा वाटतोय. नवरा, बायकोकडे दुर्लक्ष करतो. म्हणतो ते मुसलमान कुटुंव आहे, त्यांच्यातलाच असेल तो.

बाईचं समाधान होत नाही. ती त्या मुलाला निरखत राहते. तितक्यात काहीतरी तिला एकदम लक्षात येतं. ती तिच्या नवऱ्याला म्हणते की हा मुसलमान असणं शक्यच नाही. त्याचे कान टोचलेले आहेत.

आता नवऱ्याला बायकोचं म्हणणं पटतं. जवळ जाऊन तो मुलाची चौकशी करतो. खरंच तो मुलगा हरवलेला असतो. आपल्या बोबड्या भाषेत तो आपला पत्ताही सांगतो, पण त्या मारवाडी माणसाला त्याचं बोलणं नीटसं कळत नाही. थोडा वेळ नवरा बायको कुणी शोधायला येतं का ह्याची वाट पाहायचं ठरवतात. मुलगा त्यांच्या मुलीबरोबर खेळण्यात रमतो. मारवाडी मुलांना गंडेरी घेऊन देतो. मुलगा आपण हरवलोय हे पूर्णपणे विसरून जातो. थोडा वेळ वाट पाहूनही कुणीच येत नाही. ते मुलाला पोलिसात घेउन जायचं ठरवतात. ती बाई नवऱ्याला स्पष्ट सांगते की ह्याचं कुणी सापडलं नाही तर त्याला आपण वाऱ्यावर सोडायचा नाही, सरळ घरी घेऊन जायचा.

...........

छोटूच्या शेजाऱ्यांचा फोन खणखणतो. फोन पोलिसांचा असतो. छोटू सापडल्याचा. चाळीत एकच जल्लोश होतो. छोटूला आणायला घरी असलेली त्याची आजी पोहोचते. कुणीतरी चौपाटीवर निरोप घेऊन जातो छोटूच्या आईबाबांसाठी. मोठ्या खुशीतच छोटू घरी परत येतो.

...........

"स्लमडॉग मिलेनेअर" पाहताना एकदम ह्या छोटूची खूप आठवण आली.

ते मारवाडी कुटुंब नसतं, तर काय झालं असतं छोटूचं? गरम तेलाने अधू झालेला डोळा घेऊन जन्मभर त्याला भीक मागत फिरावं लागलं असतं का?

नशीब चांगलं होतं......

छोटूचं.