Monday, April 30, 2007

माझी दुचाकी आणि कंसातलं विंग्रजी.

माझ्यासारखीच तुमच्या डोक्यात "खुळं" येतात का? मला तर हमखास अशी खुळं पछाडतात. आणि एकदा का मला अशा भूतांनी पछाडलं, की त्यांचा पुरेपूर वीट येइपर्यंत, त्या भूतांना माझ्या मानगुटीवर धरून ठेवतो. जातील कुठे पठ्ठी?

तर सांगायचा मुद्दा हा की सालाबादप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात (ज्याला परदेशात summer म्हणतात तो) मला कचेरीला दुचाकीने (ज्याला विंग्रजीमध्ये Push Bike म्हणतात ती) जाण्याच्या खुळाने पछाडलं. तसं हे खूळ जुनं नाही. लहानपणापासूनचं आहे. अगदी तिचाकी चालवत होतो तेव्हापासूनचं आहे. आता फक्त त्याने उचल खाल्ली एवढंच.

आणि त्याला कारणंही तसंच मिळालं. आमच्या कचेरीमधे अमुक एक दिवस "कचेरीला दुचाकीने दिन" (नाही कळलं ना? ज्याला आमच्या Office मधे "Ride to work Day" म्हणतांत तो) म्हणून घोषित झाला. पूर्वी दुसरीकडे काम करत असताना, मी कचेरीला दुचाकीने जायचो, ही गोष्ट मी उगाचंच सर्वांना सांगून ठेवली होती, प्रभाव (ज्याला युवा मराठीत "इम्प" म्हणतात तो) पाडायला. त्यामुळे दुचाकीने कचेरीला जाण्याची नॆतिक जबाबदारी (जिला लोकसभेत राजिनामा मागताना "Moral Responsibility" म्हणतात ती) सर्वाधिक माझ्यावर येवून पडली.

जुनी सायकल फडताळातून बाहेर काढली. तिला तेल-पाणी, वेणी-फणी करून, हवा-बिवा भरून ती कचेरीपर्यंत न डगमगता, न भिरभिरता चालेल ह्याची खात्री करून घेतली. प्रातःकाळी अर्धा तास लवकरंच निघालो. सुरवातीचा प्रवासही झकास झाला. नदीकडून वार्‍याची झुळूक अंगावर घेवून जाताना फार बरं वाटत होतं. आता नदी बाजूचा रस्ता संपून मुख्य रस्त्याला लागायचं होतं. खडा चढ होता, जोरजोरांत दुचाकीपाद (ज्याला मी सोडून बाकी अख्ख जग "Paddle" म्हणतं ते) मारायला सुरवात केली. पण हाय दॆवा, निम्म्या रस्त्यावरच दुचाकी ढिम्म. अर्थातच थोडक्या विचारांती, उरलेला चढ, तिने आणि मी, आपापल्या पायांवर चढावा, असा निर्णय मी घेतला. चतुरपणे दुचाकीला काहीतरी झाल्यामूळे मी अर्ध्या अंतरातून उतरून चालतो आहे, अशा आशयाचा अभिनय मी तिथे उपस्थित लोकांना करून दाखवला. हाच प्रसंग पुढे येत असलेल्या तीनही टेकड्या चढताना आला. अभिनेता तोच होता, प्रेक्षक फक्त वेगळे होते.

"पुन्हा पुन्हा करा आणि परिपूर्ण व्हा" (मी केलेलं "Practice makes man perfect" चे दुर्दॆवी भाषांतर), त्यमुळे मी तिसर्‍या वेळी केलेला अभिनय एवढा सुंदर होता, की तिसरी टेकडी चढताना (ती तिच्या पाय़ांनी आणि मी माझ्या पायांनी) खरंच माझ्या दुचाकीला काहीतरी झालंय असं वाटून, मला एका माणसाने काय झालं असं विचारलं. दिलं काहीतरी ठोकून.

सांगायचं तात्पर्य काय? तर "कचेरीला दुचाकीने दिन" चा मला फार काही आल्हाददायक अनुभव आला नाही. मी मनाशीच ठरवलं, दुचाकी जुनी झाली, नवी घेतली पाहिजे. तत्परतेने मी के मार्ट (ह्याला काय बरं मराठी प्रतिशब्द असेल?) मधे जावून नवी दुचाकी घेवून आलो. आता इथे तयार दुचाकी महागात पडते म्हणून "जोडणीसाठी तॆय्यार" (जिला के मार्टमधील कर्मचारी "Ready to Assemble" म्हणतात ती) दुचाकी घेवून आलो. ती जोडता जोडता माझी स्वतःचीच जोडणी परत करून घ्यावी लागते की काय? अशी शंका मला चाटून गेली. कधी सुकाणू (हा कोणता जीवाणू किंवा विषाणू न्हवे. दुचाकी चालवताना, आपले हात ज्या "Handle" वर असतात ते) बॆठकीच्या (दंड बॆठकातली बॆठक नव्हे. जर तुम्ही बर्‍याच दिवसांनी दुचाकी चालवलीत, आणि एकच दिवस नव्हे तर पुन्हा दुसर्‍या दिवशीही चालवलीत, तर सर्वात आधी जीची जाणीव व्हायला नको, तिथे हमखास होते ती ही "Seat") जागी, तर कधी बॆठक सुकाणूच्या जागी. कधी पुढच्या चाकाच्या जागी मागचं चाक, तर कधी मागच्या चाकाच्या जागी काहीच नाही. ह्यापेक्षा पळत कचेरीत जाणं परवडलं. पण नाही. एकदा मानगुटीवर भूत बसलं म्हणजे मग याचिका (ज्याला न्यायालयात "Appeal" म्हणतात ते) नाही. सुकाणू बॆठक करता करता एकदाची दुचाकी तयार झाली.

पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी स्वारी निघाली. पहिला चढ पार झाला, अंगावर मूठभर मांस चढलं (हाय दॆवा, ते कमी व्हावं म्हणून ना दुचाकीने जायचं?). दुसरा चढ सुरू होणार एवढ्यात सुकाणूने असहकार पुकारला. दुचाकीपाद तेवढे गोल गोल फिरणार मग आम्ही का नाही? असं म्हणून ते चक्क उलटं झालं. मनात आणलं असतं तर ते देखील मी गोल गोल फिरवू शकलो असतो इतकं ते ढिलं झालं. ह्या प्रसंगी माझी हुषारी कामी आली. मी पकड बरोबर ठेवलीच होती. जोडणी माझी होती ना? अर्थात दुरूस्तीही मीच केली असल्याने शेवटपर्यंत सुकाणू आपला हट्ट करीतच राहिलं. फिरलं सुकाणू हातात की काढ पकड, असं करत करत शेवटच्या टेकडीपर्यंत पोचलो. पण म्हणतात ना "दॆव जाणिले कुणी" (मुद्दाम मराठीच म्हण घेतली, उगाच भाषांतराचा लफडा नको, काय?). टेकडी पार होता होताच, नव्या दुचाकीची नवी कोरी साखळी (दुचाकीच्या दुकानात जिला "Chain" म्हणतात ती) करकचून ताणली गेली आणि कचाकचा तुटली. झालं पुन्हा के मार्ट मधे जावून ती परत करून तिचे पॆसे परत मिळवण्याची कामगिरी नशिबात आली.

दरम्यानच्या काळात माझ्या मित्रांनी मला दुचाकीचं वंगणीकरण ( वांग्याचा इथे काहीही संबंध नाही, मी "Oiling" बद्धल लिहितोय) करण्याचा सल्ला दिला. सगळे उपाय केले (उपास तापास नवस सायास सोडून) पण सापाला पाहून थबकणार्‍या घोड्यासारखी, चढ आला की माझी दुचाकी थांबलीच म्हणून समजा. मला हळूहळू पटायला लागलं की चूक सायकलची नाहिये. बहुदा मझीच शक्ती कमी पडत असावी. उगाच आपल्या नसलेल्या शक्तीचं प्रदर्शन कशाला? म्हणून दुचाकी आली तशी फडताळात परत गेली.

मधे एक मित्र घरी आला होता. तेव्हा त्याला ती बिचारी धूळ खात पडलेली दिसली. तो मला म्हणाल की ती जुनी असली तरी चांगल्या स्थितीत आहे, तेव्हा मी ती विकू बिकू नये. मी त्याला मागची सगळी कहाणी सांगितली. म्हंटलं ती काही मला उपयोगी पडेल असं वाटत नाही. तो म्हणाल की मग खालच्या गतीअनुकूलकात (मझ्यासह सगळे लोकं ज्याला "Gear" म्हणतात तो. तो कसा गतिअनुकूलक म्हणेल, हे आपलं मी अत्ता म्हणतोय) चालव. मी म्हंट्लं, खालच्या गतीअनुकूलकात पण ती वर चढत नाही. तो म्हणाला की मी कधी गतिअनुकूलअक बदलतो का दुचाकी चालवताना. मी म्हंटलं की मी कष्ट नको चालवताना म्हणून आधीच सर्वाधिक खालच्या गतिअनुकूलकामधे टाकून ठेवलेय. तो म्हणाला मूर्खा हा सगळ्यात खालचा नव्हे, सगळ्यात वरचा आहे, दुचाकी चढ चढेलच कशी?

झालं. पुन्हा माझ्या मानगुटीवरचं दुचाकीचं भूत कार्यरत झालं. पुन्हा तेल-पाणी, वेणी-फणी, हवा-बिवा करून मी सकाळी निघालो. पहिला चढ आणि उरलेल्या तीनही टेकड्या आरामात गेल्या. माझा दुचाकी वरचा आणि स्वतःवरचा विश्वास द्विगुणित झाला. आता खरंतर ह्यापूढे and they happily rode everafter असं मराठीत लिहून (आणि त्याचं विंग्रजी भाषांतर कंसात लिहून) हा लेख संपायला हवा होता. पण असं काही असतं का?

दोन आठवड्यापूर्वीच मी आणि ती (पण आता मी माझ्या पायावर आणि ती तिच्या पायवर नाही. आता दोघंही तिच्याच पायांवर) संध्याकाळी घरी परतत असताना ट्रामच्या (ह्याला मराठी प्रतिशब्द माहित असेल तर कळवा. अपनी उतनी पहुच नही) रुळावरून घसरून पडलो. पडली ती आणि लागलं मला (असं मी लग्नाआधी बायकोबद्धल म्हणायचो. काय समीकरणं बदलतात नाही काळाबरोबर). त्यामुळे ती बसलेय घरी आणि मी माझा खांदा सांभाळत फिरतोय. पण काय आहे, इतक्या जोरात पडूनसुद्धा मानेवरचं भूत आहे तिथे आहे. त्यमूळे आम्ही कधी पुन्हा एकत्र आनंदाने विहरतो हया प्रश्नाचं उत्तर काळंच देवू शकेल. (मला "Its a matter of time" म्हणायचं होतं. भलतंच काहीतरी वाटेल म्हणून हा खुलासा).

शोध

कितीतरी वेळ तो देवयानीकडे टक लावून बघत होता. अगदी एखाद्या लहान मुलाने फुलावर बसलेल्या फुलपाखराकडे पहावं तसा. आणि आपल्या किंचितश्यासुद्धा हालचालीने फुलपाखरू उडून जाऊ नये म्हणून लहान मुलाने स्तब्ध उभं रहावं तसा तो स्तब्ध उभा होता. त्याच्या किंचितश्यासुद्धा हालचालीनं तिची समाधी भंग पावेल असं त्याला वाटत होतं. किती निरागस दिसत होती देवयानी? सकाळी बांधलेल्या अंबाड्यातून निसटलेले चुकार केस चेहेर्‍यावर पसरले होते. त्या काळ्याभोर बटांखाली तिची गौर त्वचा अधिकच खुलून दिसत होती. वसंतच्या आगमनाबरोबर फुललेल्या कळीसारखी गालावरची खळी खुलली होती. मूर्तिमंत सौंदर्य वगैरे जे काय म्हणतात ते हेच असावं असं त्याला वाटलं. तो असाच तिच्याकडे बघत राहिला असता पण पानांच्या सळसळीनं त्याला जागं केलं.

अंगात शर्ट न चढवताच तो गॅलरीत आला. दुपारचा चार साडेचाराचा सुमार असेल पण नावालासुद्धा ऊन दिसत नव्हतं. सगळीकडे हिरवा रंग विखुरला होता आणि त्या हिरवाईतून एक तांबडी वाट फुरशासारखी नागमोडी वळणं घेत गेस्ट हाऊसपर्यंत येत होती. सौंदर्याचे दोन भिन्न आविष्कार तो अनुभवत होता. देवयानी अधिक सुंदर का हे दृश्य अधिक सुंदर? विचारांच्या वावटळीत तो गुरफटत असताना एकाएकी कोणीतरी ओरडलं. क्षणार्धात त्याला लक्षात आलं की दुसरं तिसरं कुणी नाही तर तो स्वतःच ओरडला होता. हाताला चिकटलेल्या लालबुंद मुंगळ्याला सोडवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि शेवटी खेचलाच. मुंगळ्याचे दोन तुकडे झाले. हाताला चिकटलेला भाग तसाच वळवळत राहिला. निष्प्राण झाल्यावर त्याने तो हलकेच दूर केला. मेलेल्या मुंगळ्याचं अस्तित्व त्याच्या हातावर उतरलं.

त्याच्या ओरडण्यानं जागी झालेली देवयानी धावतंच बाहेर आली. तिच्या चेहेर्‍यावर चुकार बटांबरोबर काळजीही पसरली. नकळत त्याने त्याचा हात पुढे केला.

- अरे काय झालं रे हे?
- काही नाही. मुंगळा चावला झालं.
- पण एवढा मुंगळा चावेपर्यंत थांबावंच का माणसाने. आधीच त्याला दूर करावं.
- अगंपण कळायला तर हवं ना मुंगळा हातावर आहे ते?
- वा, म्हणजे झोपला बीपला होतास की काय?

तिच्या लाडिक प्रश्नावर त्याने तिला जवळ घेतली.

- हा समोरचा निसर्ग पाहतेस? विचार करत होतो की तो जास्त सुंदर का तू? आणि तेवढ्यात हा मुंगळा कडमडला. आता मला सांग, ह्याला काय म्हणावं? एका क्षणी मी समोरच्या दृश्याने बेभान झालो होतो, आणि मला भानावर आणलं कोणी? एका यःकश्चित मुंगळ्याने? आणि ह्या क्षणी मला ह्या नितांतसुंदर निसर्गापेक्षा हा मुंगळा अधिक वास्तव वाटतो आहे. अंतिम अस्तित्व कोणाचं असावं तर एका मुंगळ्याचं?

क्षणभर तिने त्याच्या बोलण्यावर विचार केला. अशा बोलण्याचं तिला नेहमीच आव्हान वाटत असे.

- अंतिम अस्तित्व त्या मुंगळ्याचं नाही, तुझंही नाही आणि माझंही नाही. खरंतर तुला जाणवणारं त्याचं अस्तित्व ही फक्त संवेदना आहे. ह्या क्षणी तुला त्याची संवेदना अधिक म्हणून त्याचं अस्तित्व तुला जाणवतं. आणि एखादी गोष्ट आपल्याला तीव्रतेने जाणवली की दुसर्‍या क्षणी आपण तिच्या अस्तित्वाचा शोध घेत राहतो. जसा तू ह्या मेलेल्या मुंगळ्याच्या अस्तित्वाचा घेतोयस.

तो ह्या उत्तरावर विचार करत असतानाच,

- चल हो तयार आपल्याला बाहेर जायचंय ना?

असं तिने Crash Landing केलं. शब्दांच्या भरार्‍या मारून अचूक क्षणी जमिनीवर यायची देवयानीची ही अदा त्याला अतिशय प्रिय होती. त्याच्याशी बोलून ती आत निघूनही गेली. पण हा मात्र अजून तिच्या बोलण्यावर विचार करत होता.

- खरोखरच देवयानी मला सापडलेय का? की मी अजूनही तिचा शोध घेत आहे?

थोड्या वेळाने दोघं बाहेर पडले. मघाच्याच त्या नागमोडी वाटेवरून तो देवयानीबरोबर चालला होता. मघाशी पाहिलेल्या वाटेवर ते दोघं कसे दिसत असतील ह्याचा तो विचार करू लागला. त्या विचारात मुंगळ्याचं अस्तित्व कुठच्या कुठे नाहीसं झालं.

- एक प्रश्न विचारू? तो तिला म्हणाला.
- विचार ना.
- नेहमी मनात विचार येतो की देवयानी मला खरंच समजली का? की अजूनही मी तुझाच शोध घेत असतो?
- असं का वाटावं तुला?
- माहीत नाही. पण सतत मी तुलाच शोधतोय असं वाटतं.
- हे बघ, काही गोष्टी न शोधताच समजतात. तो मुंगळा तुला क्षणात समजला की नाही, मग मला तू किती दिवस ओळखतोस?
- हो. मुंगळ्याने ज्या पद्धतीनं ओळख पटवली त्या पद्धतीने नक्कीच ओळख पटकन पटते. तुझी पण पटव ना. असं म्हणून त्याने आपला हात तिच्यापुढं केला.
- चल काहीतरीच.

लाजतंच तिने त्याचा हात दूर केला. मनातल्या मनांत ती मुंगळा झाली.

चालत चालत दोघंजणं देवळात पोहोचली. त्याचा देवावर कधीच विश्वास नव्हता पण देवयानीचा होता. त्याने तिच्याबरोबर देवळात यावं असा तिचा आग्रहही नव्हता. अजून अर्ध्या तासाने बरोबर सात वाजता देवळासमोर भेटायचं ठरलं.

पूर्णपणे अंधार झाला नव्हता. पण ऊनही नव्हतं. सगळा परिसर संधिप्रकाशांत नाहून निघाला होता. पश्चिमेकडे चाललेली रंगपंचमी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. त्या पार्श्वभूमीवर काळ्या पत्थरातून घडलेला डोंगर अधिकच काळा दिसत होता. पायवाट त्याला डोंगराच्या दिशेनं नेत होती. डोंगर तसा उंच नव्हता आणि पायवाटही मळलेली होती. तसाही कुठेतरी अर्धा तास घालवायचाच होता. त्याने डोंगर चढायचं ठरवलं. पायवाट घट्ट पकडून तो डोंगर चढायला लागला. पंधरा मिनिटांतच तो डोंगर माथ्यावर पोहोचणार होता. मळलेली वाट अधिकाधिक कोरी होत होती. श्वासाचा भाता अधिकाधिक फुलत चालला होता. पायांबरोबरच विचारांनीही गती घेतली होती.

विचारांच्या सोबतीनं तो डोंगरमाथ्यावर कधी पोहोचला हे त्याचं त्यालासुद्धा कळलं नाही. क्षणभर श्वास घेण्यासाठी तो तिथेच बसला. परत फिरण्याअगोदर पलीकडल्या बाजूला काय आहे ते पाहण्यासाठी तो गेला आणि त्याने जे दृश्य पहिलं त्याने त्याचं भानच हरपलं.

सुमारे शंभर सव्वाशे पायर्‍या त्या काळाकभिन्न डोंगरातून थेट समुद्रात उतरत होत्या. देवळाकडून डोंगरावर येण्यास पायर्‍या नसाव्यात, पण डोंगरातून पाण्यात उतरणार्‍या पायर्‍या असाव्यात ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्या पायर्‍या डोंगरातून कोरलेल्या होत्या. फेसाळ समुद्राच्या पार्श्वभूमीवर त्या अधिकच उदास आणि एकट्या वाटत होत्या. त्याच्या नकळतच तो पायर्‍या उतरायला लागला. आपण एका खोल खोल विहिरीत उतरत आहोत असा त्याला भास होवू लागला. तिन्ही बाजूने काळा डोंगर आणि समोर समुद्र.

पायर्‍या जिथे समुद्रात उतरत होत्या तिथे एक विचित्र कोपरा तयार झाला होता. एकच भरतीची लाट आणि त्या कोपर्‍यात असलेल्या कशाचीही समुद्राहूती घडणार होती. पाणी अजून तेथे पोचलं नव्हतं. भरतीला अजून अवकाश होता. पायर्‍या उतरून तो त्या कोपर्‍याच्या डोंगराकडच्या भागात जाऊन उभा राहिला. त्या पार्श्वभूमीचं वर्णन रौद्र ह्या एकाच शब्दाने करण्याजोगं होतं. पण त्या रुद्रतेतही सौंदर्य होतं, जे खिळवून ठेवणारं होतं, आकर्षक होतं, खेचणारं होतं. पाण्याचे अगणित तुषार येणार्‍या प्रत्येक लाटेसरशी त्याच्या अंगावर उडत होते. तरीसुद्धा त्याचं समाधान होत नव्हतं. अजून थोडं पुढे जाणं धोक्याचं असणार होतं, तरीदेखील त्याला पुढे जाण्याचा मोह झाला.

तो पुढे होणार इतक्यात समोर त्याला काही हालचाल दिसली. एक तरुणी काळ्या पत्थराला पाठ टेकून समुद्राकडे एकटक पाहत असलेली त्याला दिसली. खरंच कोणी तिथे आहे का आपल्याला भास होतोय, हेही त्याला कळेना. आता अंधारही पडायला लागला होता. नीट काहीच दिसत नव्हतं. अस्पष्ट ते स्पष्ट होण्यासाठी म्हणून त्याची पावलं तिथेच थबकली. सागराकडे खेचली गेलेली पावलं आता तिच्याकडे खेचली जाऊ लागली.

तो तिच्या दिशेने वळणार इतक्यात कुणीतरी त्याला हाक मारलेली त्याने ऎकली. तो आवाजच्या दिशेनं वळला. देवयानी शेवटच्या पायरीवर उभी होती. खरंतर ती शेवटची पायरी नव्हती. त्या पायरीखाली अजून दोन पायर्‍या होत्या पण वाढलेल्या भरतीच्या पाण्यात त्या हरवल्या होत्या. देवयानी चिंब भिजली होती आणि त्याच्या लक्षात आलं की तोही चिंब भिजलाय. हरवलेल्या जाणीवा परत आल्या आणि त्याचा लक्षात आलं की तो गुडघाभर पाण्यात उभा आहे.

जीवाच्या आकांताने तो पायर्‍यांच्या दिशेनं धावला. पाण्याबाहेर आल्यावर त्याला हायसं वाटलं, पण मघाशी पाहिलेली तरुणी अजूनही पाण्यातच असल्याचं त्याचा लक्षात आलं. तो तिला पाहण्यासाठी वळला. त्याची नजर तिथे पोहोचेपर्यंत एक अजस्र लाट त्या कोपर्‍यात येऊन धडकली. आवेगाने तो देवयानीकडे वळला. देवयानीने त्याला मिठीत घेतलं. तिच्या मिठीत खूप सुरक्षितता वाटली. लहान मूल होवून तो तिच्या मिठीत रडला........

- अरे ऊठ आपल्याला बाहेर जायचंय ना? उशीर होईल नाहीतर. लहान मुलाने निरागसपणे आईच्या कुशीत झोपावं तसं तिच्या कुशीत झोपलेल्या त्याला ती म्हणाली.

............ तो दचकून जागा झाला. स्वप्नाची सीमा ओलांडून तो सत्याच्या साम्राज्यात आला. क्षणभर आपण कोण आहोत, कुठे आहोत, ह्याचं त्याला भानंच राहिलं नाही. हळूहळू सगळं लक्षात आलं. ती तीच होती पण तो मात्र अजूनही स्वप्नातल्या देवयानीला शोधत होता. ती मात्र काळाच्या लाटेबरोबर कधीच खूप खूप दूर निघून गेली होती. खरंच बराच उशीर झाला होता...........

Sunday, April 22, 2007

बरखा बॆरी भयो.....

बरखा बॆरी भयो.....सजनवा....गॊड मल्हार रागातील हा ख्याल बाई गायला लागतात. बाईंचा फुरशासारखा गिरकी लागलेला आवाज, सुरवातीच्या ताना आणि समेवर बरोबर... बॆरी भयो सजनवा....लाजवाब. त्या तानांमधे, गॊड मल्हारामध्ये आणि त्रितालाच्या साथीमध्ये मी बुडून जातो. बरखा बॆरी भयो....क्या बात हॆ...बरखा बॆरी भयो......

संध्याकाळचा सुमार आहे पण रात्रीलाही लाजवेल असा अंधार झालाय. पाऊस धुवांधार कोसळतोय. समोरच्या रस्त्याचा तलाव झालाय. गटारं चुकवण्यासाठी मी रस्त्यामधल्या divider वर चालतोय कारण रस्ता दिसतंच नाहीये. मीच नाही माझ्याबरोबर असंख्य लोकं चालतायत. मुंग्यांची रांग लागावी तशी माणसांची रांग लागलेय. पाऊस कोसळतोच आहे. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर फक्त एकच भाव आहे. चिंता.

अहाहा! बॆरी भयो.....बरखा बॆरी भयो.......क्या बात हॆ....वाह......बहोत खूब...

कुणाचीतरी किंवा स्वतःची चिंता. घरी पोहोचायचं कसं? माझं बाळ घरी एकटं असेल. एक आई तडफडून सांगतेय. सगळ्यांचीच अवस्था थोड्याफार फरकाने सारखीच आहे. कुणाची पिल्लं घरी, तर कुणी पिल्ल स्वतः रस्त्यावर, घरट्यापासून दूर. Mobiles चालत नाहीयेत, दिवे चालत नाहियेत, ट्रेन, बसेस, गाड्या काहीच चालत नाहीये. चालतायत फक्त पाय. पाण्यातून रस्ता काढत काढत आपापल्या घरांकडे निघालेले लाखो पाय.

......जाने न देत मोहे पी की नगरिया.......जाने न देत.....वाहवा........समेवर परत बॆरी भयो.......बरखा बॆरी भयो........

कोणीतरी ओरडतं. पाय, पाय. पांव. समोरच्या तळं झालेल्या रस्त्यातून दोन पाय तरंगताना दिसतात. रांगेतली एखादी धीट मुंगी पाण्यात उडी मारते. चार हात मारून त्या पाय़ांपर्यंत पोहोचते. पोचल्यावर कळतं. ते पाय चालायचे कधीच थांबलेत. उलटं तरंगणारं प्रेतच हाताला लागतं. पोरंसोरं घाबरतात. आयामायांचे हात हुंदका आवरण्यासाठी तोंडाकडे जातात. मी मात्र चालत राहतो. मुंगीसारखा रांगेमध्ये. हूं की चू न करता.

......काय तान आहे.....सुरेख....बरखा बॆरी भयो.......सजनवा.....

नऊशे चव्वेचाळीस मि.मि. पाऊस अवघ्या काही तासांत. चारशेसहा लोकं त्या पावसांत गेली. कायमची. बुडून, वाहनात अडकून. रेटारेटीत. चारशे पन्नास करोड रुपयांचं नुकसान. पाण्यात. मी मुंग्यांची रांग सोडून माझ्या वारुळाकडे चालायला लागतो. तळ मजल्यावरच्या वारुळातल्या मुंग्या वरच्या मजल्यांवर सरकल्यायत. त्यांची घरं पाण्याने भरलेयत. कसा बसा मी माझ्या वारुळात पोहोचतो.

......बरखा बॆरी भयो......बाई पुढच्या ओळींना हात घालतात. गरज गरज बरसे बदरिंया......चमकन लागी पापी बिजुरिया, जाने न देत मोहे पी की नजरियां........बरखा बॆरी भयो.........बरखा बॆरी भयो......सजनवा......

आमची गाडी डोंगरावरून खाली उतरतेय. समोरचा विस्तीर्ण परिसर फक्त एकाच रंगात माखलाय. तांबड्या. हिरवा रंग नावालाही नाही. गाडी डोंगर उतरते. रस्त्याच्या कडेला पिवळं, वाळून गेलेलं गवत दिसतंय. झाडांचे नुसते वठलेले बुंधे आणि फांद्या. पानं कधीतरी असावीत अशी शंकासुद्धा येत नाहीये. तहानेने घसा कोरडा झालाय. समोरच्या धुराळलेल्या गावात गाडी शिरते. गावठाणातली एक विहीर. गाडी थांबते. उतरून बघतो तो कोरडी ठणठणीत. बाजूला टॅंकरच्या वेळा लिहिल्यायत. शेजारच्या दुकानातून मी बिस्लेरी ची बाटली आणि थोडं खाणं विकत घेतो.

......बरखा बॆरी भयो......आता बाईंचा आवाज चांगलाच तापलाय. मुडात येऊन तो सुंदर हरकती घेतोय. त्रितालाची लय वाढायला लागली आहे. एक जोरकस तान मारून बाई समेवर अलगद....बॆरी भयो...... वर येतात.......

गाडी पुढे जाते. मधे कुठे पाण्याचा हातपंप दिसतोय. मुलं त्याच्यावर काहीतरी खेळतायत. त्या पंपाचं तोंडच समोरच्या मातीच्या ढिगार्‍यात बुडलंय. आजूबाजूला मोकळी जमीन. जमीन नव्हे, शेत आहे ते. उन्हाने रापलेली. मोकळी ढाकळी ढेकळं डोळ्यात भरून राहतात. शेताच्या बांधावर एक शेतकरी उकिडवा बसलाय. आभाळाकडे डोळे लावून. त्याच्या डोळ्यांत रडायलासुद्धा पाणी नसावं.

.......बरखा बॆरी भयो.......सुभानल्ला......काय हरकती....वाहव्वा.....वाह्व्वा....जाने न देत मोहे.......

गावातून बाहेर पडताना शेवटी गावदेवीच असावं असं एक देऊळ आहे. त्याच्यापुढे गावाची वेस आणि वेशीच्या बाहेर एका मेलेल्या बॆलाचं धूड पडलंय. चारा नाही, पाणी नाही. रोगामुळे कसाईसुद्धा गिर्‍हाईक नाही. गिधाडं त्याच्या अंगाचे लचके तोडतायत. माझ्या हातांत गावात विकत घेतलेल्या खाण्याच्या पदार्थाची पुडी आहे. त्या पुडीला बांधणार्‍या वर्तमानपत्रावर दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्ज, जवाहर रोजगार योजना ह्यांबद्दल काही लिहिलंय. मघाशी घेतलेली बिस्लेरीची बाटली फोडून आता मी पाणी पितोय. आता कसं थंडगार वाटतंय.

.....बॆरी भयो........क्या बात हॆ.......तबल्याची गत....झकास......शेवटच्या अणुकुचिदार ताना घेऊन बाई शेवटची तिहाई घेतात. बरखा बॆरी भयो........बरखा बॆरी भयो........बरखा बॆरी भयो.......

Sunday, April 15, 2007

नशा...

ह्या रिक्षावाल्याचा काय problem आहे कळंत नाही. मझ्या आणि मंजूच्या का असा मागे लागलाय? सूखाने जगू देत नाही साला. ह्याला बरोबर वठणीवर आणला पाहिजे. पण सहजशक्य आहे का ते? युद्धच पुकारावं लागेल.

टेह्ळणी करा, टेहळणी करा, शत्रू केव्हा नेम साधेल सांगता येत नाही. चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त हवा..... पण कसा बंदोबस्त ठेवणार? सामान तरी कितीसं आहे इथे? सहज माझी नजर खुर्चीकडे जाते. मी झटकन जावून खुर्ची उचलतो आणि खिडकीसमोर ठेवतो. इथूनच दिसतो साल्यचा रिक्षास्टॅंड. पण नुसत्या खुर्चीनं भागणार नाही. मी परत टेबलाजवळ जातो आणि त्यच्यावरची पुस्तकं खुर्चीवर रचतो......... हं, आता झाली भिंत चिरेबंद. आता ये म्हणावं साल्याला. आणि बरं का रे साल्या, मी काही रंगांधळा नाही. तुमचे खाकी कपडे बरोबर ओळखतो मी.

अजून काय बरं हवं होतं.......... हं, दुर्बिण. दुर्बिण कुठे ठेवलीत बहिर्जी?....... मिळत कशी नाही? मी टेबलावरचं वर्तमानपत्र घेतो, त्याची गुंडाळी करतो. झाली दुर्बिण. खुर्चीवर पाय ठेवून आता मी दुर्बिणीतून खिडकीबाहेर बघतो....... हं. हा रस्ता, हा रस्त्यावरचा विजेचा खांब, ह त्याला तेकून पथारी पसरून बसलेला चांभार आणि हा बसस्टॉप. हा रिक्षास्टॅंड, आणि ही मंजू. ही कशाला मरायला चाललेय तिथे? हजार वेळा सांगितलं रिक्षाने जावू नको म्हणून. ए, तो फसवेल तुला, गटवेल तुला. Thank God वाचलो. ती बस स्टॉपवर जावून उभी राहिली.

हा कुणी मला धक्का मारला? अरे, हा रिक्षावाला इथे काय करतोय? आणि साला मला बाजूला ढकलून माझ्याच दुर्बिणीतून बघतोय. बाहेरचं वर्णन मला ऎकायचं नाहिये रे. कोण बाई? आपल्या बाई? हरामखोरा ती बायको आहे माझी. आपल्या बाई म्हणू नकोस साल्या........... हिला पण आत्ताच गॅस संपल्याची वर्दी द्यायचेय. घरात स्टोव्ह आहे, रॉकेल आहे. .........माझं त्याच्याकडे लक्ष जातं. तो अजूनही माझी दुर्बिण वापरतोय. मी त्याला पुन्हा बजावतो. ऎकत नाही म्हणजे काय? मझा राग अनावर होतो. मी त्याला जीवाच्या आकांताने ढकलतो.

साला तो चिडला बहुतेक. उठून अंगावर येतोय. ढकलतोय. अरे साल्या जबरदस्ती करतोस काय? अजून मला तो पाठी ढकलतोय. सुशिक्षित म्हणून माज आला का असं विचारतोय. अरे बाबा माझा तसा हेतू नव्हता. शी. काय ही भाषा..... म्हणे बायको राखायची जमत नाही तुम्हाला आणि सुशिक्षित म्हणून चांगले नग उचलता? तुमच्यासारख्या छक्क्यांनी खरंतर लग्नच नाही केली पाहिजेत. म्हणे गरज असेल तर अशा बायकांशी लग्न करा ज्यांना पाहून पुरुषांच्या माना खाली गेल्या पाहिजेत. गांडीत दम नाही तर आणली कशाला बायको? का पाहू नये आम्ही वाईट नजरेने तुमच्या बायकांकडे? आम्हाला माहितेय तुम्ही झाट वाकडं करू शकत नाही आमचं....... अरे जा ना साल्या आता बोललास तेवढं पुरे नाही का? परत का येतोय हा? शी, पुन्हा गलिच्छ भाषा.......... म्हणे बाईंना स्कर्ट का काय ते घालायचा आग्रह करा. ते क्रीम बीम पायाला लावून केस झाडायचं.

गेला साला. पण काय ही घाणेरडी भाषा. त्याचे शब्द माझ्या कानांत वावटळीसारखे घुमतायत. असह्य. असह्य होतंय सगळं. अगतिकता का नपूंसकत्व? त्याचा आवाज चारही बाजूंनी माझ्यावर हल्ला करतोय. सहनशक्तीपलिकडे आहे माझ्या हे सगळं. असहाय होवून मी जोरात किंचाळतो. गेले, त्याचे घुमणारे आवाज गेले. आता फक्त नीरव शांतता.

मी थरथरतोय. थरथरतच मी खिशातली सिगरेट काढतो. पेटवतो. .........आम्ही तुमचं झाट वाकडं करू शकत नाही काय? आम्हीही तुमचं वाकडं करू शकतो.......... हातातली सिगरेट जमीनीवर आपटून मी ती चिरडतो........... असा चिरडेन मी तुला साल्या. शिपाईगिरी रक्तात आहे आमच्या. थोरल्या आबांचे वारस उगीच नाही आम्ही. ही सगळी पृथ्वी रिक्षारहित करेन आणि मगच प्राण सोडेन. अरे, ह्या छोट्या मोठ्या लढाया? ह्या हरल्या म्हणून काय झालं. The ultimate Victory is ours. माझ्यासारखी अठ्ठावीस वर्षाची कोवळी पोरं गंडवता?

हे मला एकट्याला झेपेलसं वाटत नाही. आबा आणि थोरल्या आजोबांची मदत घ्यायला हवी. पण ते तर मृत आहेत. मग? प्लॅंचेट. प्लॅंचेट करून त्यांना बोलावता येईल. मी टेबलावरचा खडू उचलतो आणि एका बाटलीचं झाकण घेतो. जमीनीवर एक गोल काढून त्याच्या मध्यभागी ते झाकण ठेवतो. आता पूर्वजांना मदतीचं आव्हान करायला हवं.

.......हे स्वर्गस्थ पूर्वजांनो, तुमच्या ह्या भाग्यशाली कुळातला नव्या दमाचा शिलेदार तुम्हाला आवाहन करीत आहे. या, आणि तुमच्या ह्या कुलदीपकाला तुमच्या दिव्य शक्तिस्रोताने भारून टाका. शक्ती द्या मला लढण्यासाठी कारण हे युद्ध साधंसुधं नाही. हे महायुद्ध आहे. नाही हे दोन व्यक्तींतलं, नाही वर्गातलं, हे महायुद्ध आहे दोन प्रवृत्तींतलं. एकीकडे आपला म्हणून मी तर दुसरीकडे त्यांचा म्हणून तो. रिक्षावाला. उन्मत्त, उद्दाम, उथळ, उलट्या काळजाचा रिक्षावाला. ज्याच्या नसानसांत भरलेय गुंडगिरी, दादागिरी. मिटरप्रमाणे पॆसे घेत नाही साला.

हा रुद्राचा आवज कुठून येतोय? प्रकाशही कमी झालाय. प्लॅंचेटचा परिणाम? .............या आबा, या थोरले आजोबा तुम्हीही या. शक्ती द्या मला लढण्यासाठी शक्ती द्या मला Please शक्ती द्या मला. Oh Its moving टोपण हललं प्लॅंचेट्ने येणार असा कॊल दिला. ते येणार शक्तीचे घट भरून आणणार, ते येणार, ते आले, ते आले, ते आले........... हा कसला आवाज? कोण टाळ्या वाजवतंय? छे.

रुद्राच्या मंत्रोच्चारात काही क्षण कसे गेले कळंत नाही. प्रकाशही पूर्ववत होतोय असं वाटतंय. सारं कसं शांत शांत वाटतंय........ मंजू, माझी मंजू. किती स्वप्न होती आपल्या दोघांची. कॉलेज संपण्याआधी लग्न केलं ते ही सगळी स्वप्न. प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच. वेळ कमी पडू नये म्हणून. पण प्रत्यक्षात मात्र, प्रत्यक्षात मात्र मी असा विचित्र वागायला लागलो. पण मी तरी काय करणार मंजू. त्याने आपल्याला जगूच द्यायचं नाही असं ठरवलं होतं ना. आपल्या प्रत्येक सुखाच्या आड येत होता तो रिक्षावाला. घरी, ऑफिसात, बाजारात, दुकानात. पण आता तू काळजी करू नकोस. आज त्या रिक्षावाल्यचा पुरता बंदोबस्त झालाय.

हरामखोरा, आम्ही चांगले नग उचलतो म्हणून तुमचं फावतं. आज थोरले आबा उभे आहेत तिच्या परतीच्या वटेवर. मंजूच्या. पाय बघायचेत काय तुला साल्या तिचे? पाय बघायचेत? बघ म्हणावं किती बघतो लुळे पाय ते. तिला कमरेखाली निकामी करण्याचं आश्वासन दिलंय थोरल्या आबांनी. कुबड्या देणारेत तिच्या हातांत. मंजूच्या. हो, काहीही करू शकतात ते. स्वर्गस्थ आहेत ते. आणि यदानकदा नाही जमलं, तर आबांनी गॅस सिलेंडर एवढ्यात मिळणार नाही ह्याची व्यवस्था केलेय. अरे, आबा म्हणजे आजोबा, वडील नाहीत मठ्ठा. ते अजून स्वर्गस्थ नाहीत. आणि मी इथे स्टोव्ह ला रॉकेल ची आंघोळ घालून ठेवलेय. पेटवला की भडका. आता सिलेंडर मिळाला नाही म्हणजे बाई स्टोव्ह पेटवणारच ना? बाई चांगल्या दिसतात म्हणून माना वळतात ना तूमच्या? आता वळवा माना, आता दाखवा हिम्मत मान वर करून बाईंकडे बघायची. मांजरासारखे सरळ व्हाल रे. ढुंगणाला पाय लावून पळूनंच जाशील तू.

विजयाचा कॆफ आता माझ्या नसानसांतून भिनलाय. रिक्षावाल्याचा पुरता बंदोबस्त झालाय. आबा आणि थोरल्या आबांनी मिळून त्याची पुरती वाट लावलेय........... सहा नंबरचा प्रतिकार काय आमचा? आता पहा आमची शिपाईगिरी............. शिपाई सावधान म्हणून मी सावधान पवित्रा घेतो. कोणी दरवाजा वाजवतंय का? असेल. आता कोणीही दरवाजा वाजवूदे. लढाई महत्त्वाची. शिपाईगिरी महत्त्वाची. युद्ध, महायुद्ध महत्त्वाचं.

..........ही मंजू माझ्या शेजारी येवून काय बरळतेय? सिलेंडर वर उचलून आणायला रिक्षावाल्याने मदत केली म्हणून सांगतेय. काय डोकं बिकं फिरलं का हिचं? ती बेअक्कल आहे. आपण आपली कवायत करावी. .......मी जोरात घोषणा देत कवायत करतो आणि मंजूच्या समोर येवून तिला एक salute ठोकतो impression मारायला. ती का रडतेय? आपला विजय झालाय मंजू. आपण जिंकलोय..... ती रडत रडत घराबाहेर निघून जाते...........

आला का हा रिक्षावाला पुन्हा. साल्या तुझं म्हणजे कुत्र्याच्या शेपटासारखं आहे. वाकडं ते वाकडंच. बायको सोडून गेली म्हणून मला डिवचू नकोस हरामखोरा. तुझ्या कुजकट बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मी एक दहा रुपायाची नोट त्याच्या अंगावर भिरकावतो आणि त्याला get out चा आदेश देतो. तो जवळ्जवळ घाबरूनच निघून जातो.......... हं, आता मी शांतपणे शिपाईगिरी करू शकेन. शिपाई salute कर. असं म्हणून मी एक salute ठोकतो.

समोरून एक लाल प्रकाश माझ्यावर एकवटतो. बिगुल वाजल्याचं पार्श्वसंगीत सुरू होतं. प्रकाश कमीकमी होत जातो, तसे समोरचे प्रेक्षक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करतात. पडदा हळू हळू बंद होतो. टाळ्यांचा कडकडाट चालूच रहातो. मी माझ्या नशेमेधे धुंद तिथेच उभा असतो. मघाशी मला धमकावणारा रिक्षावाला विंगेतून धावत येतो. मला आलिंगन देतो. नाटक संपलेलं असतं, मी भानावर येत असतो. पण नाटकाची ही नशा मात्र अधिकाधिक चढत जात असते.

___________________________________________________________________

हे वर्णन डॉ. चंद्रशेखर फणसळकर ह्यांच्या "रिक्षावाला" ह्या एकांकिकेतील शेवटच्या प्रवेशाचे आहे. वर्णनात असलेली संवादात्मक वाक्य ही त्या प्रवेशातून थेट उचलली आहेत.

___________________________________________________________________