Wednesday, September 02, 2009

वेटिंग रूम

लांबच्या लांब पसरलेला रेल्वेचा प्लॅटफॉर्म. त्यच्या दूरच्या टोकाला असलेला पिवळ्या रंगाचा आणि काळ्या अक्षरांनी लिहिलेला स्टेशनच्या नावाचा बोर्ड. डोक्यावर काळंभोर आकाश आणि आकाशाच्या काळ्या रंगाला लागलेली पौर्णिमेच्या चंद्राची तीट. एकदम छोटंसंच पण टुमदार स्टेशन. स्टेशनमध्ये शिरायच्या ठिकाणी असलेली पत्र्याची शेड. त्या शेडच्या वरच्या बाजूला असलेलं स्टेशन मास्तरचं घर कम ऑफिस. पुढची गाडी सकाळीच यायची असल्याने तिथेही सामसूमंच. शेडच्या एका कोपऱ्यात बिरजू भंगी अंगाची मुटकुळी करून झोपलेला.

त्याच्या उजव्या अंगाला वेटिंग रूम. "प्रतीक्षा कक्ष" अशी पाटी वर लिहिलेली. आत मिणमिणता उजेड. स्टेशनच्या बाहेरून पावलांचा आवाज. कोल्हापुरी वाहणा करकरवत एक माणूस स्टेशनच्या आत शिरला. हातात एक छोटीशी बॅग. स्वच्छ धुतलेला पांढरा शुभ्र सदरा, काळी विजार. डोळ्याला लावलेला जाड काळ्या फ्रेमचा चश्मा.

बिरजूच्या डोक्यावर तेवत असलेला साठ डीग्रीचा बल्ब सोडला तर बकी सगळा अंधारच. वेटिंग रूम कुठे आहे ते बिरजूला विचारण्यासाठी तो बिरजूकडे गेला.

" अहो शुक शुक" त्याने हळूच पुकारलं. बिरजूचं पूर्ण दुर्लक्ष.
" माफ करा तुम्हाला झोपेतून उठवतोय, पण तेवढी वेटिंग रूम कुठे आहे ते सांगता का? " बिरजू तसाच पडलेला.
" अहो मिस्टर, तुमच्याशी बोलतोय मी." ह्याचा आवाज थोडासा चढा. बिरजू एकदम घोरायला लागलेला.

घोरणाऱ्या बिरजूकडे निराश होऊन पाहत माणूस स्टेशनात शिरला. बाजूलाच "प्रतीक्षा कक्ष" असल्याचं त्याला समजलं. पण प्रतीक्षा कक्ष उघडून द्यायला स्टेशन मास्तर कुठे शोधायचा ह्या विचारात असतानाच त्याला दरवाजा उघडा असल्याचं दिसलं. कुणीतरी दुसरंही तिथे आहे ह्याचं त्याला आश्चर्यच वाटलं. पण स्टेशन मास्तरला धुंडायचा त्रास वाचला म्हणून बरंही वाटलं.

तो घाईघाईने आत शिरला. अख्या रूममधला एकमेव दिवा आपल्यापरीनं उजेड पाडण्याच्या प्रयत्नात. दिव्याच्या खालच्या आरामखुर्चीत कुणीतरी बाई.तिच्या तोंडावर पुस्तक ठेवलेलं. बहुतेक दिव्याच्या प्रकाशाला अडथळा करून झोपण्याचा तिचा प्रयत्न. कमीत कमी आवाज करीत तो समोरच्या बकड्यावर आपली बॅग टाकतो आणि बाजूच्या खुर्चीत जाऊन बसतो. कुठल्या काळातली ती खुर्ची त्याच्या वजनासारशी कडकन मोडते. पडता पडता तो वाचतो पण आवाजाने बाई एकदम जागी होते.

" काय झालं? कोण आहे? " ती ओरडली.
" कुणी नाही मी आहे"
" कोण तुम्ही? "
" तुमच्यासारखाच. वेटिंग फॉर नेक्स्ट ट्रेन"
" ओह, माफ करा. आवाजाने एकदम दचकले आणि ओरडले"

मोडलेल्या खुर्चीवरचं लक्ष त्याने तिच्याकडे नेलं. मघा बाई वाटलेली ती बाई म्हणण्याएवढीही मोठी नव्हती. फार फार तर पंचविशीच्या आत बाहेरचं वय. कोवळा चेहरा, कपाळावरची काळी टिकली. तोंडावर ठेवलेल्या पुस्तकाने विस्कटलेले केस. आणि अतिशय भावपूर्ण तरल डोळे. आपल्या निम्म्या वयाच्या असलेल्या मुलीकडे असं पाहणं बरं नाही हे लक्षात येईपर्यंत बरेच क्षण गेले. चटकन स्वतःला सावरत तो दुसऱ्या खुर्चीकडे गेला. ती भक्कम असल्याची खात्री करून बसला.

" माफ करा, माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली" तो म्हणाला
" नाही हो. तशीही झोप येणार नव्हतीच म्हणून वाचत बसले होते. वाचायचा कंटाळा आला म्हणून डोळ्यावर पुस्तक घेऊन शांत बसलेले. झोपले नव्हते. विचार करत होते, सकाळपर्यंत वेळ कसा काढायचा? "
" कुठे निघालात"
" तुम्ही मला अहो जाहो नका हो करू, प्लीज"
" अहो पण असं... "
" प्लीज काका"

तिने काका म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आलेली निराशा अंधारात झाकायचा असफल प्रयत्न त्याने केला

" बरं नाही अहो जाहो करणार. पण मला काका नाही म्हणायचं"
" ... "
" हो हो मला माहितेय मी तुझ्या काकाच्या वयाचा नक्की आहे. पण उगाच कशाला आठवण करून द्यायची म्हाताऱ्याला वयाची"
" बरं. काका नाही म्हणत. मग म्हणू काय पण? "
" धोत्रे म्हण"
" धोत्रे? "
" हो धोत्रे. माझं नाव धोत्रे"
" छान नाव आहे हं.... धोत्रे"
" कर चेष्टा कर म्हाताऱ्याची"
" धोत्रे. चेष्टा नाही. पण एकदम अनपेक्षित नाव होतं बाकी काही नाही"
" हं"

धोत्र्यांनी उगाचंच आपली बॅह उघडली, बॅगेतलं सामान इथे तिथे केलं. डोक्याला तेल लावावं म्हणून ते तेलाची बाटली शोधत राहिले. पण ती काही त्यांना मिळाली नाही. मग तसेच ते खुर्चीत पुन्हा येऊन बसले. त्यांच्या सगळ्या हालचली ती बघत राहिली.

" रात्री कशी तू इथे? "
" काय सांगू काका.... सॉरी सॉरी धोत्रे, रात्रीची मेल गाठायची होती, ती चुकली. मग काय करते? बसलेय सकाळच्या गाडीची वाट पाहत. आणि तुम्ही? "
" माझं काय? रेल्वेने फुकट पास दिलाय. फिरत असतो इकडून तिकडे. आपली एक बॅग असते सोबत. मिळाली तर गाडी नाहीतर वेटिंग रूम. आहे काय अन नाही काय"
" असा बरा तुम्हाला फुकट पास दिला. आम्हाला नाही कधी दिला तो"

निरागसपणे तिने विचारलं. धोत्र्यांना तिच्या प्रश्नाचं हसूच आलं. भुवयांचं धनुष्या झालेलं. नाकपुड्या थोड्याशा फुगलेल्या.

" हो मग तुला का देतील ते फुकट पास?"
" पण तुम्हाला तरी का देतील ते"
" हं"
".... "
" आगगाडी पाहिल्येस? "
" हो"
" त्याला एक इंजीन असतं. कधी कधी दोनही असतात. कधी कोळशाचं असतं, कधी डिजेलवर चालणारं असतं, कधी विजेवर, तर कधी... "
" धोत्रे, मला इंजिनाचे प्रकार सांगू नका. तुम्हाला फुकट पास का मिळाला ते सांगा"
" हा. सांगतो. तर ते इंजीन जो ड्रायव्हर चालवतो... "
" ड्रायव्हर काय हो. मोटरमन"
" हं मोटरमन. तो होतो मी. म्हणून मला फुकट पास"
" अय्या, तुम्ही मोटरमन होता धोत्रे? मला एकदा तरी इंजिनात बसून जायचं होतं, नाही नेलं कुणी. "
" मी नेलं असतं"
" अजूनही नेऊ शकाल मनात आणलंत तर"
" नाही. आता मी नाही चालवत इंजिन"
" का? "
" बस. नाही चालवत सांगितलं ना?" धोत्र्यांचा आवाज किंचीत चढला.

तिने माघार घेतली. उगिचंच तिने आपलं डोकं पुस्तकात खुपसलं. वाचनात तिचं लक्ष नव्हतं. हा माणूस एकदम का भडकला हेच तिला कळेना. पण उगाच आगीत तेल नको म्हणून ती गप्प बसली. धोत्र्यांनी आपला जाड काळ्या फ्रमच्या चश्मा काढला आणि शर्टाच्या टोकाने तो ते साफ करायला लागले.

" एवढा स्वच्छ शर्ट खराब होईल ना" काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली
" स्वच्छ शर्ट खराब होतात पण परत धुता येतात. आठवणी.. "
" हो मान्य. तुम्हाला नसेल लागत धुवायला पण बायकोला लागत असेलच ना"
" नाही. आता नाही लागत. मी असा भटक्या. शर्ट धुवायला घरी जाऊ का? "
" .... "
" आणि तू गं? तुझं घर? "
" ..... "
" काय झालं? बोल की? "
" ..... "
" कट्टी आहे का? "
"...... "
" ..... "
" सासर ह्याच गावात आहे माझं"
" अच्छा म्हणजे माहेरी निघालीस. कुठे? "
" ...... "
" अगं सासर ह्याच गावात आहे म्हणतेस मग वेटिंग रूममध्ये कशाला?"
" माझी मर्जी" तिने उत्तर झटकलं आणि विषय संपवला.

धोत्रे तिच्याकडे बघत राहिले. अतिशय कुलीन शालीन असं सौंदर्य. अशा ह्या मुलीला आपल्या घरी न राहता वेटिंग रुममध्ये रात्र काढाविशी का वाटावी? तिच्याकडे बघता बघता त्यांची तंद्री लागली.

" पळून आलेय" ती म्हणाली.
" पळून? का? "
" माझी मर्जी"
" बरं"
" बरं नाही. नवरा म्हणाला माहेरी चालती हो"
" तुला? शक्यच नाही. अगं पोरी भांडणं सगळ्याच नवरा बायकोची होतात. रागाच्या भरात बोलून जातं माणूस. पण म्हणून काही कुणी.... "
" रागाच्या भरात नाही"
" मग"
" मग काय मग धोत्रे? नशिबाचे भोग दुसरं काय? "
" मला वाटायचं नशिबाचे भोग फक्त आमच्यासारख्यांच्याच वाट्याला येतात. पण... "
" हं. दृष्ट लागण्यासारखा संसार होता माझा. जिवापाड प्रेम करणारा नवरा. घर आवार शेजार सगळं सगळं होतं"
" मग? "
" जाऊदे हो माझं. तुम्ही सांगा. तुम्ही का घर सोडून भटकताय असे? "
" मी? माझंही घर होतं. संसार होता. साधी का असेना नोकरी होती. रेल्वेचा फुकट पास वर. काळजी घेणारी बायको"
" .... "
" अचानक सगळं बदललं बघ. नोकरीवरून सस्पेंड केलं. अगदी वेड लागायची पाळी आली"
" का? "
" ऍक्सिडेंट"
" कुणाचा? "
" सकाळी सकाळी स्टेशनात शिरतानाच एक मुलगी गाडीखाली आली. सरळ सस्पेंड केलं. निग्लिजन्स म्हणून. नोकरीचं काही नाही पोरी, पण आपल्यामुळे कुणाचा जीव गेला, ह्याच दुःखाने वेडापिसा झालो आणि एक दिवस..."

धडधड धडधड करीत एक मालगाडी स्टेशनात शिरली आणि तिचा एकेक डबा वेटिंग रुमसमोरून जाऊ लागला. जवळ जवळ पाचेक मिनिटं ती लांबच लांब डब्यांची माळ जात राहिली. दोघंही निःशब्द होऊन तिच्याकडे पाहत बसले. आगगाडी गेली तसे धोत्रे भानावर आले. तिची तशीच तंद्री लागलेली.

" मालगाडीही चालली असती. पण नेमका डोळा लागला आणि सकाळपर्यंत.. " ती म्हणाली.
" काय? काय म्हणालीस"
" नाही काही नाही. मालगाडी स्टेशनवर थांबली असती तर त्यानेही जायची तयारी होती माझी"
" अगं पण असं झालं तरी काय? चांगला नवरा आहे म्हणतेस"
" हं"
" मग? "
" काही नाही धोत्रे, कशाला जुन्या आठवणी?"
" ... "
" सगळं सुरळीत चाललं होतं, आणि कुणाची दृष्ट लागली माहीत नाही धोत्रे, पण पाठीवर बरोबर मध्यभागी एक पांढरा डाग उमटला. कोड होता तो. हळू हळू, पाठीवरून तो इतरत्रही पसरला, अगदी चेहऱ्यावरही"

अंधारातही चेहऱ्याची एक बाजू तिने केसांनी झाकलेय हे धोत्र्यांच्या लक्षात आलं

" पहिल्यांदा नवऱ्याने सहानुभूती दाखवली. डॉक्टर केले, वैदू केले. घोरी अघोरी सगळे उपाय केले. देवाचं केलं. पण काहीही होईना कोड वाढतंच चाललेलं. शेवटी त्याचा संयम सुटला. म्हणाला अशी बायको मला नको. तू हे घर सोडून जा"
" ... "
" मी खूप विनवण्या केल्या धोत्रे, गया वया केली कशाचाही परिणाम झाला नाही. एक दिवस रात्री उठले इथे आले. रात्रीची गाडी हुकली. इथेच ह्या वेटिंग रूममध्ये रात्र काढली. सकाळची गाडी आली तशी समोर रुळावरच उडी मारली. गाडी सरळ अंगावरून गेली. सगळा खेळच संपला. धोत्रे"

शॉक लागल्यासारखे धोत्रे ताडकन उभे राहिले.

" काय झालं धोत्रे? घाबरलात? "
" नाही"
" मग? "
" ज्या ऍक्सिडेंटने माझी नोकरी गेली, मी जवळ जवळ वेडा झालो आणि वेडाच्या भरात बेगॉन पिऊन आत्महत्या केली, तो ऍक्सिडेंट ...."

धडधड करीत गाडी स्टेशनात शिरली. गाडीच्या आवाजासरशी बिरजू जागा झाला. गाडी गेल्यावर रोजच्या शिरस्त्याप्रमाणे वेटिंग रूममध्ये शिरला. समोरची मोडकी खुर्ची पाहिली. रातभर कुत्र्यांनी ओरडून ओरडून जीव हैराण केला. बहुतेक इथेच येऊन धुमाकूळ घातला असणार अशी मनाची समजूत करून घेऊन तो खोली झाडायला लागला.

Wednesday, July 29, 2009

कॉफी

पावसाची रिपरिप चाललेली. रस्त्याच्या दुतर्फा झाडं. ओला डांबरी रस्ता. ओल्या रस्त्याच्या काळा रंग आणि रस्त्याच्या बाजूला दाटलेला हिरवा रंग ह्याचं सुंदर काँबिनेशन. रस्त्याच्या मधोमध ती दोघं चाललेली. एक तो आणि एक ती. दोघांकडे मिळून एकच छत्री. छत्री रंगीबेरंगी आहे. म्हणजे त्याची नक्कीच नाही. तिचीच असणार. तो उंचापुरा, लांबून तरी दिसायला देखणाच. पांढरा शुभ्र शर्ट, त्याच्यावर साहेबी झोक दाखवणारा टाय. तीही बहुतेक ऑफिसमधूनच येत असणार. ठेंगणी ठुसकी, पण हिल्स च्या शिड्या लावून उंच झालेली, तरीही सुंदर. साधारण पस्तिशीच्या आसपास वाटणारी ती दोघं. चालत चालत कडेच्या पंधरा मजली बिल्डिंगच्या समोर येऊन पोचली.

" घर आलं." ती जरा निराशेनेच म्हणाली
" हं"
" .... "
" छत्री शेअर केल्याबद्दल थँक्स"
" थँक्स काय त्यात? तू भिजणार त्यापेक्षा एक छत्री दोघांत काय वाईट आहे? "
" हं. इथे राहतेस तू"
" हो"
" तू? "
" ...... "
" बरं थँक्स फॉर द कंपनी"
" थँक्स फॉर द अंब्रेला"
" नुसतं थँक्स चालणार नाही"
" मग? "
" हाऊ अबाउट अ कॉफी? "
" डन. पण एका अटीवर"
" शूट"
" थँक्स फॉर अंब्रेला जसं नुसतं चालत नाही, तसं थँक्स फॉर द कंपनी पण नुसतं चालणार नाही"
" बरं. मग?"
" हाऊ अबाउट अ कॉफी? "
" डन. पण एका अटीवर"
" शूट"
" मी आता कॉफी देईन, आणि तीसुद्धा इथेच माझ्या घरी"
" ..... "

दोघंही खळखळून हसले. तिथे तिची छत्री बंद केली. ती दोघं बिल्डिंगमध्ये शिरली. मिटलेल्या छत्रीतून सांडणाऱ्या पावसाने त्यांचा पाठलाग केला. दोघं लिफ्टमध्ये शिरली. तिचा मजला आला. त्याने स्त्रीदाक्षिण्य दाखवत तिला प्रथम बाहेर जाऊ दिलं. लिफ्टचं दार लावून तोही तिच्यामागे चालू लागला. तिच्या हिल्सचा खालच्या लादीवर होणारा आवाज तेवढाच काय तो ऐकू येत होता. लिफ्टच्या दुसऱ्या टोकाला बरोब्बर समोर असलेल्या अपार्टमेंटचा दरवाजा तिनं तिच्याकडच्या चावीनं उघडला.

" ये ना" ती त्याला म्हणाली
" थँक्स"
" ये बस" सोफ्याकडे हात दाखवत ती त्याला म्हणाली. तिच्या डाव्या हाताच्या बोटातल्या अंगठीचा हिरा चमकलेला त्याने पाहिला.
" पाणी आणू? "
" नको. पावसात अखंड भिजलोय आपण. मी सोफ्यावर बसत नाही. तुझा सोफा खराब होईल"
" अरे बस. त्यात काय? पाणीच तर आहे. वाळेल. तू बस. मी आलेच पटकन कॉफी घेऊन"

सोफ्यावर बसण्याआधी पुन्हा तो दाराजवळ गेला. तिथे पायपुसणं होतं, त्याला खसखसून पाय पुसूनच तो आत आला. सोफ्यावर बसला. घराची सजावट खूप सुंदर केली होती तिने. कलात्मक वृत्ती जिथे तिथे दिसून येत होती. अगदी भिंतीवर लावलेलं चित्र असो किंवा शोकेसमधली गणपतीची मूर्ती असो. सगळ्या घरात असणाऱ्या ह्या गोष्टी तिच्या घरात मात्र वेगळ्या दिसत होत्या. टेबलावरच्या फ्रेमनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. तिचा फोटो. काळेभोर केस. मोठे जिवंत डोळे, अगदी आरशासारखे नितळ आणि खरे. डाव्या गालाला पडलेली खळी. आणि तिचं ते दिलखेचक हास्य. फोटो पाहून त्याच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं.

" काय रे कुठे हरवलास? " तिच्या प्रश्नानं तो भानावर आला.
" काही नाही. सहजच. घर खूप छान आहे तुझं"
" मग असायलाच हवं. माझं आहे ना? "
" हं. बरोबर. छान लोकांचं सगळंच छान असलंच पाहिजे. "
" .... "
" बरं झालं भेटलीस नाहीतर भिजलो असतो मी"
" अजून भिजायचं काही राह्यलंय का? थांब मी तुला टॉवेल आणून देते"
" अगं नको आय ऍम ऑल राईट"
" असं कसं थांब."

त्याला तसंच बसवून ती आतमध्ये गेली. कपाट उघडून टॉवेल शोधत राहिली. मग काहीतरी आठवल्यासारखं कपाट तसंच सोडून बाथरुमकडे गेली. बाथरुममध्ये आतल्या हुकला टॉवेल लावला होता. टॉवेल घेऊन ती बाहेर गेली. त्याला टॉवेल दिला. तिच्या घरी ओपन प्लॅन किचन होतं. तशीच ती किचनमध्ये कॉफी कुठपर्यंत आली ते पाहायला गेली. कॉफी मगांत ओतताना तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं. टॉवेलने पुसल्याने केस उभे राहिले होते. पावसाचं पाणी तसंच वाळल्यावर येते तशी पांढरट झाक चेहऱ्यावर होती. घारे डोळे, धारधार नाक. कॉफी ओतता ओतता तिने सगळं डोळ्यात साठवून घेतलं. त्याच्या हातात कॉफी देत ती त्याच्या समोर जाऊन बसली

" थँक्स" तो म्हणाला
" पुन्हा थँक्स? "
" सॉरी... कॉफी छान झालेय"
" .. "
" तू काय करतेस. म्हणजे आमच्या ऑफिसच्या इथे कशी काय? "
" कुणालातरी भेटायचं होतं. आधी ठरलं होतं. म्हणून आले होते"
" मग झाली का भेट? "
" हो झाली ना आणि मी कॉपीरायटर आहे. ऍड एजन्सीत"
" हं. इंटरेस्टिंग"
" तू"
" मी नथिंग इंटरेस्टिंग. मी आयटी मध्ये आहे. प्रोजेक्ट मॅनेजर बट नथिंग लाइक बीइंग अ कॉपीरायटर. टोटल बोअर"
" असं काही नाही. मला असं वाटतं, लोकांना सांभाळणं आणि त्यांच्याकडून काम करून घेणं इज इक्वली क्रिएटिव्ह"
" असेलही. पण मला नाही आवडत. माझा ओढा क्रिएटिव्ह फिल्डकडं जास्त आहे"
" लाइक? "
" लाइक एनिथिंग क्रिएटिव्ह. काहीही म्हणजे रेडिओ जॉकी पासून फॅशन डिझाइनिंग पर्यंत काहीही. पण नॉट प्रोजेक्ट मॅनेजमेंट"
" दूरून डोंगर साजरे. आपल्याकडे नाही ते आपल्याला नेहमीच हवंसं वाटतं"
" असेलही. पण जे नाही ते एकदा मिळवून पाहायला काय हरकत आहे? "
" अग्रीड. पण हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलं आणि तेही नाही मिळालं आणि होतं तेही हातचं निसटलं तर?"
" हं"

पुढे काय बोलायचं ह्यावर दोघंही विचार करत बसले.

" कॉफी छान झालेय" तो काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला.
" मगाशी सांगून झालं तुझं. आता दुसरी काहीतरी काँप्लिमेंट दे. इथे काँप्लिमेंट देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आहेत की नाही?"
" हो. बरं. ते पेंटिंग खूप छान आहे"
" आणि? "
" आणि तुझं घर छान आहे"
" आणि? "
" ती फ्रेम छान आहे"
" फक्त फ्रेम की आतला फोटोही"
" फोटोच म्हणजे"
" माझा आहे"
" समजलं"
" मग? "
" मग? मग रिकामा झाला. कॉफी संपली"
" हो माझीही"
" बरं नाऊ माय टर्न. तशीही माझ्याकडून एक कॉफी ड्यू आहेच. मी बनवू? "
" बनव की. त्यात काय. फक्त कॉफी साखर सापडली म्हणजे झालं"
" सापडेल. डोंट वरी"

तो किचनमध्ये शिरला. तिने केलेल्या कॉफीच भांडं तसंच ओट्यावर होतं. गॅस सुरू करेपर्यंत तरी काही अडचण आली नाही. धडपडत त्याने कॉफी बनवलीच. संपूर्ण वेळ ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्याची प्रत्येक हालचाल डोळ्यात साठवून ठेवत होती. तो परत येऊन टेबलावर ठेवलेले मग किचनमध्ये घेऊन गेला. तिच्या आणि त्याच्या दोघांच्या मगांत त्यानं कॉफी ओतली आणि परत बाहेर आला.

" हं कॉफी इज रेडी. आयला पण एक प्रॉब्लेम झाला. तुझा मग कोणता आणि माझा कोणता हे मी विसरलो"
" विसरलास? " तिने उसनी काळजी आणून विचारलं.
" हो"
" बरं. मी नाही विसरले. उजव्या हातातला तुझा आणि डाव्या हातातला माझा"
" कशावरून? "
" मी बघत होते अख्खा वेळ मगांकडे."
" ... "
" अरे चालेल रे. एवढं काय उष्ट्या मगाचं."
" मला चालेल गं. पण तुला चालेल नाही चालणार माहीत नव्हतं"
" चालेल"

तिला मग देऊन तो पुन्हा आपल्या जागी जाऊन बसला

" तुला कॉफी आवडते" तिने विचारलं
" विशेष नाही. पण चालते"
" अरे मग सांगायचं की चहा केला असता"
" नको चालतं. तुला आवडते?"
" भरपूर. कॉफीवर मी दिवस दिवस काढू शकते. नव्हे काढतेच. अरे ऑफिसमध्ये कधी कधी काही सुचतंच नाही. आमचं काम म्हणजे एकेका ओळीसाठी झगडायला लागतं दिवस दिवस. मग काय? काही सुचत नसलं की मी आणि कॉफी, कॉफी आणि मी"
" हं. मला कॉफी आवडत नाही असं नाही. पण चांगली कंपनी असेल तर आवडते. एकट्याला फारशी आवडत नाही. "
" माग आज आवडतेय की नाही? "
" कोण? "
" कॉफी? "
" हो. नक्कीच. "
" गूड. आता मला सांग आधी कधी आवडली होती आजच्या. कॉफी? "
" जाऊदे गं. कॉफीचं काय? कधी आवडते कधी नाही आवडत"

दोन क्षण शांतता पसरली. हातातला मग सावरत तो उठला आणि उगाचच खिडकीकडे गेला. बाहेर पाऊस पडतच होता. निसर्गवृत्ती मोहरून आल्या होत्या. ती त्याच्या बाजूला कधी येऊन उभी राहिली त्याला कळलंही नाही. पण जेव्हा कळलं, तेव्हा तिचं नुसतं त्याच्या बाजूला असणंही त्याला भयंकर उष्ण वाटलं. आणि तिलाही.

" आर यू सिंगल? " त्याने विचारलं
" ... "
" आर यू? "
" आय ऍम मॅरिड"
".... "
" तू?"
" तो आहे कुठे?"
" ... "
" ... "
" असेल ऑफिसात. तुमच्या आयटीवाल्यांचं काही सांगता येतंय का? अमेरिकेत बसलेल्या लोकांचे तुम्ही बांधलेले. त्यांच्या वेळांवर तुमची कामं चालायची."
" हं"
" तू सांगितलं नाहीस? "
" काय? "
" आर यू सिंगल? " तिने विचारलं
" नो. आय ऍम मॅरिड टू. पण तुझ्याकडे बघून वाटत नाही की तुझं लग्न झालं असेल म्हणून"
" हं. तुझ्याकडेही"
" रिअली?"
" ... "
" तुझी बायको कुठाय? म्हणजे काय करते"
" काम करते. तिचं सगळं विचित्रच आहे. एकदा का ती कामात बुडली की दिवस दिवस बुडलेली राहते. खरंतर आज आमची ऍनीव्हर्सरी आहे"
" मग आज तिच्याबरोबर-"
" नाही. छत्री तुझ्याकडे होती ना? मग तुझ्याबरोबर आणि वर कॉफीही सो"
" .... "
" .... "
" एक सांगू? आज माझीही ऍनिव्हर्सरी आहे" ती म्हणाली
" ...... " तो काहीच बोलला नाही
" आर यू अनहॅपी? " तिने विचारलं.
" नो नाही. अगं आय ऍम नॉट अनहॅपी बट-"
" यू कॅन बी हॅपीअर, राइट? "
" बरोबर. तू?
" अरे मीपण. आय ऍम नॉट अनहॅपी. बट आय कॅन बी हॅपीअर"
" आवडतो तो तुला"
" मनापासून. आहे मनोहर तरी वाचलंयस? "
" नाही. मला मराठी पुस्तकं वाचायला आवडत नाहीत पण ती मात्र आवडते"
" मला तो आवडतो. तुला ती आवडते, पण तरीही आपण दोघं असे इथे? "

तो आणि ती एकमेकांकडे बघतात. ती एक पाऊल पुढे होते. तोही एक पाऊल पुढे होतो. दोघांचे डोळे एकमेकांच्या डोळ्यात गुंतलेले. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढतो. एकमेकांचा श्वासातला कॉफीचा वास एकमेकांचा नाकात जातो. आवेगाने तो आपले ओठ तिच्या ओठांवर टेकतो. तीही प्रतिसाद देते. आजूबाजूचं जग क्षुल्लक बनतं. कैक क्षणांनी त्यांची ती समाधी भंग पावते. तिच्या डोळ्यात नजर रोखून तो म्हणतो

" हॅपी ऍनिव्हर्सरी"
" हॅपी ऍनिव्हर्सरी" ती म्हणते
" यू कॅन बी हॅपिअर हे सरळही सांगता आलं असतं"
" तुलाही. पण कधी कधी अनोळखी होऊन पाहिलं की ओळखीची माणसं अधिक चांगली समजतात असं नाही वाटत तुला?"
" नक्कीच. अब इस बात पे एक कॉफी हो जाये"
" ओके. बनवतोस?"
" मॅडम. तुमची टर्न"
" ओके"

Tuesday, July 14, 2009

बदल

जेव्हा मी आरशात बघतो तेव्हा समजतच नाही मला हा कोण? की समजतंच नाही मला मी कोण? साहेब, दिवसा दिवसाला, तासा तासाला, सेकंदा सेकंदाला माणूस बदलत असतो? मी बदलत असतो बहुतेक साहेब. कालचा मी मला आज ओळखू येत नाही, साहेब. अनोळखी वाटतो.

पहिली ते दहावी प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर प्रतिज्ञा होती. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, कसली तरी परंपरा आणि कसला तरी पाइप, अरे पाइप नाही साहेब, माफी करा, पाईक, पाईक. परंपरेचा पाईक वगैरे होण्याची पात्रता कुणाच्यातरी अंगी यावी म्हणून कुणीतरी सदैव प्रयत्न करणार होता. कोण करणार होता प्रयत्न, साहेब? आयला एक वेळ अशी होती की प्रतिज्ञा एकदम तोंडपाठ होती. अर्थाचं माहीत नाही, पण प्रतिज्ञा तोंडपाठ होती. आज आता इथे ती लिहावीशी वाटली साहेब, पण आठवली नाही. आठवली नाही म्हणून गूगल केली, तरी मिळाली नाही. कोणत्यातरी साहेबाने पहिल्या दोन ओळी लिहून ठेवल्यात कुठेतरी तेवढ्या मिळाल्या, पण पुढचं काय? साहेब, दहा वर्ष जेव्हा जेव्हा पुस्तक उघडलं तेव्हा तेव्हा दिसली होती ती. नाय आठवत तरीही. नाही साहेब, पाठ होती, पण म्हटलं ना माणूस सेकंदा सेकंदाला बदलत जातो, पुढचं पाठ आणि मागचं सपाट तसंच काही तरी झालं असणार साहेब.

कधीतरी कुठेतरी मराठ्यांचा इतिहास वगैरे वाचला होता. नाही नाही, तेव्हा मराठ्यांना आरक्षण नव्हतं साहेब, तेव्हाची गोष्ट सांगतोय. मुसलमानांना तेव्हा गनीम वगैरे म्हणायचे. पुरंदरे बिरंदरे असे कुणीतरी होते लेखक. त्यांनीच लिहून ठेवलं होतं कुठेतरी, गनीमांनी आपल्या मराठी मुलखावर आक्रमण वगैरे केलं, घरांवरून गाढवांचे नांगर फिरवले साहेब, गाढवांचे, पैसा अडका लुटलाच, पण आपल्या पोरी बाळींची अब्रूपण लुटली साहेब. काटा यायचा अंगावर, वाटायचं आता उठावं आणि ती भवानी तलवार, का भाला, का धनुष्य घ्यावं, जे काही म्हणतात ना साहेब, ते घ्यावं आणि छाटावीत मुंडकी त्या गनीमाची. नशीब साहेब. माझं आणि गनीमांचं. तेव्हा आम्ही कधी समोरासमोर आलो नाही. पण माणूस सेकंदा सेकंदाला बदलत असतो साहेब. काटा बिटा येणं कधीच बंद झालं साहेब. हल्ली आम्ही पेपरात आलेल्या बलात्काराच्या बातम्या मिटक्या मारत वाचतो साहेब.

सेकंदा सेकंदाला माणूस बदलतो साहेब, सेकंदा सेकंदाला. म्हणूनच आरशात स्वतःला पाहिलं तर वाटतं हा कोण? कोण हा? एकदा रस्त्यात चालताना दोन रुपयाची नोट मिळाली होती. ओ, आश्चर्य वाटून घेऊ नका साहेब. तेव्हा दोन रुपयांची नोट होती, तेव्हाचा काळ, इथे तिथे पाहिलं, रस्त्यावरची नोट हळूच उचलली आणि दोन रुपयाची चॉकलेटं आणून एकट्याने खाल्ली साहेब. खाल्ली पण पचली नाहीत. कुणाचे तरी दोन रुपये आपला हक्क नसताना आपण उचलले आणि वापरले ह्याचंच मोठं गिल्टी फीलिंग येऊन राहिलं होतं साहेब, पण हल्ली बघा, नोट दिसली की आपण उचलतो साहेब, माझी, ह्यांची की त्यांची ह्याचा विचारच करत नाही साहेब, नोट फेको तमाशा देखो असं कुठेतरी कुणीतरी न शिकवतासुद्धा शिकलो साहेब. आता आपण नोटा फेकतो आणि तमाशा देखतो साहेब, आणि दुसऱ्या कुणी नोटा फेकल्या की आम्हीही तमाशा दाखवतो साहेब,

काय झालं काही कळलं नाही साहेब. कधी कधी वाटतं साला मी एक अमिबा आहे. एकपेशीय पण चित्र विचित्र आकारात बदलणारा एक हिडीस प्राणी. कधी काळी असं नव्हतं साहेब. एक नाकासमोरचा म्हणतात ना तसा रस्ता होता, आणि सरळ म्हणतात ना तसं वळण होतं. जीवन फार साधं होतं. आम्ही सरळ वळणाने नाकासमोरचा रस्ता चालत होतो साहेब. पण काय आहे की माणूस सेकंदा सेकंदाला बदलत असतो साहेब. आयुष्यभर नाकासमोरच्या रस्त्यावरच्या सरळ वळणावर मुक्काम करून राहिलेले लोक पाहिले साहेब. रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटारांतल्या किड्या मुंग्यांसारखं त्यांचं आयुष्य. त्यांच्याकडे बघता बघता माझा रस्ता कधी वळला मला कळलंच नाही साहेब,

सुंभ गेला तरी पीळ जळत नाही म्हणतात. तसंच काहीसं कधीतरी होतं साहेब. कुठेतरी एखादी बातमी पाहून मेंदूच्या सांदीकोपऱ्यात "वास्तवाच्या भाना"ची दुलई पांघरून बसलेला शिवाजी खडबडून जागा होतो साहेब. कुठलीतरी डॉक्युमेंट्री पाहून साहेब, कधी काळी घेतलेल्या कुठल्यातरी शपथा आठवतात साहेब, कुणाच्यातरी दुःखासाठी अजूनही डोळ्याचा एक बारीकसा कोपरा कणभर ओला होतो साहेब.

पण माणूस सेकंदा सेकंदाला बदलत असतो. असं काही झालं की हल्ली बाजारात एक उत्तम औषध मिळतं. त्या औषधाचे दोन घोट मारतो साहेब. खवळून उठलेल्या शिवाजीला झोप अनावर होते साहेब, तो त्याची काय ती भवानी का काय म्हणतात ना सुरंदरे, ती म्यानात घालतो नि खुंटीला टांगून खुशाला "वास्तवाच्या भाना"त गुरफटून झोपी जातो साहेब. घोकून घोकून कोरलेल्या शपथा पुसट होत जातात साहेब, ओलावलेले डोळ्याचे कोपरे कोरडे ठाक होतात साहेब.

म्हणून साहेब, म्हणून आरसा हल्ली बघवत नाही. आणि जेव्हा मी समोरच्या आरशात बघतो तेव्हा समजतच नाही मला हा कोण? की समजतंच नाही मला मी कोण? म्हणजे खरंच एक मोठं कंफ्युजन आहे.

Wednesday, May 06, 2009

आम्ही मतकरी.

नाही. मतकरी हे आमचं आडनाव नाही.

खरंतर मतकरी ही व्यक्ती नसून मतकरी ही एक प्रवृत्ती आहे असं एक टाळ्या खेचणारं वाक्य टाकायची आम्हाला तीव्र इच्छा झाली होती, पण ती आम्ही दाबली. सांगायचा मुद्दा हा की मतकरी म्हणजे येता जाता, इथे तिथे, हगल्या पादल्या, आमच्यासारख्या, ज्या लोकांना आपल्या मताची पिंक टाकायची सवय असते ती लोकं. पिंक ह्या शब्दाचा राम सेनेच्या मुतालिकांना स्त्रीवर्गाने पाठवलेल्या चड्ड्यांच्या रंगाशी काहीही संबंध नाही हा खुलासा करणं आवश्यक आहे. पिंक म्हणजे पान खाऊन टाकल्याने जिच्यामुळे भिंती छान रंगवून काढता येतात ती.

असो नमनालाच घडाभर तेल झालेलं आहे. मूलस्थान पुणे असल्याने आणि आपल्याला सगळं कळतं असा आमचा समज (गैरसमज नव्हे) असल्याने येता जाता मतांच्या पिंका टाकणं हा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. पण मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आपली मुंबई स्वच्छ मुंबई ह्या नाऱ्याला ( नारा म्हणजे घोषणा. ह्या वाक्याचा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांशी काहीही संबंध नाही हा खुलासा) जागून, आम्ही पिंका टाकून भिंती रंगवणं थांबवलेलं आहे, आणि आमच्या मतांच्या वैचारिक इ-पिंका टाकून समस्त मराठी इ-वाचकवर्गाला इ-रंगवण्यासाठी ह्या ब्लॉगचा वापर सुरू केलेला आहे.

तर अशा ह्या आमच्या मताला कुणीही अजिबात किंमत देत आलेलं नाही. लहान असताना आमची मुलं देत असत. पण आपल्या आईने (पक्षी आमच्या हिने) रुपयाच्या अवमूल्यनाला स्पर्धा म्हणून चालवलेल्या, माझ्या मताच्या अवमूल्यनाने, प्रभावित होऊन, त्यांनीही आमच्या मताला किंमत देणं सोडलं. तसं आमच्यासारख्या चिरगूट माणसाच्या मतात किंमती काही नसतंच असा आमच्या एव्हाना समज होऊन गेलेला.

पण अचानक काय झालं कळलं नाही. जादूची कांडी फिरावी तसे दिवस फिरले. कालपर्यंत आमचा यथेच्छ बाजा बजावणारे लोकं आम्हाला राजा म्हणू लागले. कारणही तसंच झालं, निवडणुका जाहीर झाल्या. उभ्या देशाचा पंतप्रधान निवडायची जबाबदारी कुणीतरी आमच्यावर टाकली. आमच्या मतांच्या पिंका झेलायला अचानक बड्या बड्या आसामी (पक्षी मोठी माणसं. ह्या शब्दाचा आसाम राज्याशी काहीही संबंध नाही हा खुलासा) पिकदाण्या घेऊन कंबरेत वाकून अजिजीने उभ्या असलेल्या दिसायला लागल्या.

आम्हाला तर चक्क लॉटरी लागल्यासारखंच बाटू लागलं. पण आमच्या डोक्यावरचा ताण एकदम वाढला. देशाचा पंतप्रधान निवडण्यारासखं अवघड काम आमच्या खांद्यावर येऊन पडलं. मुळातच चिरगूट माणूस असल्याने आमचे खांदे पडलेले. त्यात हे मणामणाचं ओझं येऊन पडल्याने आमचे खांदे अधिकच पडल्यासारखे दिसू लागले. कशा कशात म्हणून लक्ष लागेना. रात्र रात्र झोप लागेना आणि रात्री झोप न लागल्याने दिवसा झोपा काढण्याची वेळ आली. अर्थात आम्ही वर्षानुवर्ष आमच्या कार्यालयात हेच करत आलोय असं आपलं आमच्या हिचं मत.

असो तर एकंदरीत परिस्थिती गंभीर झाली. असं काही झालं, आणि आम्हाला काहीही सुचलं नाही की आम्ही चक्क दूरचित्रवाणीकडे वळतो. नाही, नाही. आमच्या चाळीच्या कोपऱ्यावर असलेल्या वाण्याचं नाव "दूरचित्र" असं नाहीये. ज्याला आपण शुद्ध मराठीत टीव्ही म्हणतो त्याला अतिशुद्ध मराठीत दूरचित्रवाणी असे म्हणतात. असो, तर सांगायचा मुद्दा हा की तिथे आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. आमच्या एका लाडक्या अभिनेत्याने आम्हाला चक्क मुद्द्यांवर मतदान करायचं आवाहन केलं.

झालं. उत्तर मिळालं. आमच्या खांद्यावरचं मणामणाचं ओझं उतरलं आणि आम्ही झोकात आमची पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी पार पाडतोय, अशी स्वप्न बघत, आम्ही निवांत झोपी जातो न जातो तोच, प्रकरण मुद्द्यावरून गुद्द्यावर आलं. सकाळी न अलेल्या पाण्याने, आणि भारनियमनाने बंद पडलेल्या पंपामुळे, तोंडाचं पाणी पळालेली आमची ही, भयंकर संतापली आणि आम्हाला झोपलेलं पाहून चांगलीच खवळली, आणि गुद्द्यावर गुद्दे हाणून आम्हाला जागं करायला लागली. जनता मुद्द्यावरून गुद्द्यावर इतक्या पटकन का उतरते ह्याचा थोडासा खुलासा आमच्या चिरगूट बुद्धीला झाल्याचा आम्हाला भास झाला. पण झोपल्याला जागं करता येते, झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही, हे आम्ही चाणाक्षपणे शिकून घेतल्यामुळे आम्ही गुद्दाप्रहार सहन करत मुद्द्यांचा विचार करता करता पडून राहिलो.

पण हे मुद्दे शोधायचं काम भलतंच कठीण निघालं हो. अर्थात आमच्यासारख्या चिरगूट माणसाच्या बुद्धीची झेप ती किती? ह्या आपल्या अभिनेत्यांना आणि त्यांच्यापेक्षाही अधिक चांगला अभिनय करणाऱ्या आपल्या नेत्यांना समजणाऱ्या गोष्टी. तरीही आम्ही बातम्यांतून, भाषणातून, वर्तमानपत्रांतून मुद्दे शोधत राहिलो. ते काही आम्हाला मिळाले नाहीत. हे लपलेले मुद्दे हुडकून काढण्यासाठी करमचंद किंवा परमवीर वगैरे छापाचा एखादा हेर नेमावा असंही आम्हाला वाटलं, पण आमच्यासारख्या चिरगूट माणसाला ते परवडण्यासारखं नसल्याने तो विचार आम्ही सोडून दिला.

दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय नेतृत्व असलेल्या एका पक्षाला आम आदमीचा पुळका आला. आम्हाला मराठी सोडून कुठलीही भाषा कळत नाही. त्यात निवडणुका एप्रिल मेच्या महिन्यात. आंब्यांचा सीझन. त्यामुळे हा पक्ष निवडून आला तर सर्व आदम्यांना आम वाटणार असा समज करून घेऊन आमच्या तोंडाला पाणी सुटलं. पण फुकटचे आम खाण्याचे मनातले मांडे मनातच राहिले. ह्या आमचा त्या आमशी काही संबंध नाही हे कळताच आमचा हिरमोड झाला.

दुसऱ्या एका धर्मपरायण आणि गेल्या काही वर्षात मनमिळाऊ झालेल्या पक्षाला रामाचं मंदिर आठवलं. अयोध्येत रामाचं मंदिर बांधायच्या विचाराने ते एकदम भगवेच झाले. पण आम्ही गिरगावातल्या राम मंदिरात गेलो तरी हे गोऱ्या रामाचं का काळ्या रामाचं ह्याचा खुलासा आमच्या बालबुद्धीला मूर्तीचा रंग पाहिल्याशिवाय होत नाही. त्यात अयोध्येत बांधलं जरी ह्यांनी राम मंदिर तरी तिथे सहकुटुंब सहपरिवार रामरायाचं दर्शन घेऊन येण्याचीही ऐपत आम्ही आयुष्यभरात कमावली नसल्याने त्या राममंदिराचा आम्हाला फायदा कोणत्या खात्यावर लिहिणार?

इतरही काही निळे, लाल, हिरवे, पिवळे आणि अलीकडेच भगव्यातून जन्याला आलेले रंगीबेरंगी पक्ष होते. कुणी आम्हाला मराठी म्हणत होता, कुणी मराठा म्हणत होता, कुणी कुणबी, कुणी कोळी, आग्री, भय्या, मुसलमान, शीख आणि कुणी अजून काही म्हणत होता. पण वेगवेगळ्या जातीचा त्यांना आलेला पुळका सोडला तर एकजात कुणाकडेही कसलाही मुद्दा शोधूनही सापडला नाही.

आता मात्र आमची पंचाईत झाली. मतदानाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. उद्या आम्ही चुकीचा पंतप्रधान तर निवडणार नाही ना ह्या विचाराने रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. चुकून माकून लागलीच डुलकी तर कमळात बसलेल्या हत्तीवर सायकल चालवत एका हाताने धनुष्य पेलून दुसऱ्या हाताने इंजिनावर बाण मारणाऱ्या माणसाची भयानक स्वप्न मला पडायला लागली.

होता होता मतदानाचा दिवस उजाडला. आमच्या मित्रवर्यांना घेऊन मतदानास जावे म्हणून आम्ही त्यांच्या घरी पोचलो तर त्यांची सामानाची आवरा आवर चाललेली. चार दिवस सलग सुटी म्हणून ते फिरायला म्हणून बाहेर निघालेले. फार आनंदात दिसत होते. आम्हालाही एकदा वाटलं की झटकून द्यावी जबाबदारी आणि पळून जावं कुठेतरी.

पण ते शक्य नव्हतं. मनाची चलबिचल लपवत लपवत आम्ही मतदान केंद्राकडे चालायला लागलो. चालीत एक वेगळाच आत्मविश्वास आलेला. चिरगूटपणाचं लक्षण असलेले आमचे पडेल खांदे वर आलेले. एका राजासारखे आम्ही भारदस्त चालत केंद्राकडे जायला लागलो. वाटेत दिसणारे सगळेच आपल्या काह्यात आहेत असं वाटायला लागलं. कोणे एके काळी तरुण बिरुण असताना लाथ मारीन तिथे पाणी काढीन असं वाटायचं, तसंच आज वाटायला लागलं. त्या तंद्रीतच आम्ही केंद्रावर पोचलो. केंद्रावरचे सरकारी अधिकारीही कधी नव्हे ते अदबीने वागत असल्याचं जाणवलं.

ज्याचसाठी केला होता अट्टहास हाच तो दिवस. आमच्या पत्रिकेत राजयोग होता तो असा मतदानाच्या दिवशी सिद्ध झाला. आम्ही आडोशाला गेलो. आम्हाला राजासारखं आधीच वाटू लागल्याने आम्ही एकदम खूश होतो, आता कुणीही निवडून आला तरी काय फरक पडणार होता? आम्ही कुठलंसं बटण दाबलं आणि धुंदीतच बाहेर पडलो.

जसे आम्ही बाहेर पडलो तसे आमचे खांदेही पूर्ववत पडले. गेले काही दिवस माझ्या मताची पिंक झेलायला पिकदाण्या घेऊन आतुरतेने उभे असलेले लोकं कुत्ता जाने आणि चमडा जाने अशा आविर्भावात माझ्याकडे पाहत होते. घरी पोचलो. आजही पाण्याची बोंब होती, विजेचा लपंडाव चालला होता. नळाला न आलेलं पाणी आमची ही आमच्या डोळ्यात काढणार अशी सगळी परिस्थिती होती.

पण मघा मला लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा आत्मविश्वास वाटला होता, त्या भरातच आम्ही घरातल्या नळाला एक जोरदार लाथ हाणली आणि पाठीत जळकं लाकूड मारून हाकलवलेल्या कुत्र्यासारखं केकाटलो.

तेवढाच एक निरर्थक केकाटण्याचा आवाज कानात राहिला.

बाकी सारं कसं शांत शांत होतं.

Wednesday, April 22, 2009

कसं काय बरं हाय आय ऍम मुंभाय

मुंबई? बंबई? बॉम्बे? की मुंबाय?

कॉलिडोस्कोप.

ओबेरॉयच्या एकविसाव्या मजल्यावरच्या काचेतून रात्रीचा झगमगाट दाखवणारी, धारावीच्या गल्ल्यातून वाळणाऱ्या चामड्याच्या चळतीमधून नाक दाबून श्वास घेणारी, मलबार हिलच्या टुमदार टेकड्यांमधल्या आलिशान घरातून झोपेशिवाय तडफडत जागणारी किंवा रस्त्याच्या कडेला डोक्यावर टोपली घेऊन घनघोर पावसात निवांत झोपलेली.

फोर्ट फाउंटनमधली जुन्या इमारतींनी सजलेली ब्रिटिश मुंबई, उंचच उंच इमारतींनी विद्रूप झालेली मुंबई. धरण फुटल्यासारखी वाहणारी मुंबई, उष्ण रक्ताचा अभिषेक करून घेणारी मुंबई आणि समुद्राच्या थंड वाऱ्याने गपगार झालेली मुंबई, बॉलीवूडची मुंबई आणि एनसीपीए पृथ्वी वाली मुंबई.

अफाट पैशाने पोट फुटेस्तोवर भरलेली मुंबई, मध्यममार्गी मध्यमवर्गियाची बिचकत जगणारी मुंबई, पोटाची खळगी भरण्यासाठी ओठाला रंग लावून पाय पसरणारी मुंबई, सर्वस्व लुटणारी मुंबई आणि सर्वस्व लुटवणारी मुंबई. रेल्वे लाइनच्या कडेला शरीरधर्म उरकणारी निर्लज्ज मुंबई, लोकल ट्रेन्मधून रेल्वे लाइनच्या कडेला बसलेल्या लोकांना नाकं दाबून शिव्या देणारी मुंबई, आश्वासनं देणारी मुंबई आणि आश्वासनं न पाळणारी मुंबई.

मुंबईत राहणाऱ्यांच्या मनातून उतरलेली मुंबई आणि मुंबईत न राहणाऱ्यांचा मनात भरून राहिलेली मुंबई.

मुंबईचा जावई, बाँबे बॉइज, जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान. मुंबई नगरी बडी बाका. बंबईसे आया मेरा दोस्त, मुंबई तुमची भांडी घासा आमची, मुंबई माझी लाडकी, मी मुंबईकर.

अल्ला हो अकबर, गणपती बाप्पा मोरया, आवाज कुणाचा? जय भीम. जो बोले सो निहाल, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराजकी जय.

केम छो? कैसन हो?

कसं काय बरं हाय आय ऍम मुंभाय.

मुंबई इज फ्युजन. बट मुंबई इज ऑल्सो अ हेल लॉट ऑफ कनफ्युजन.



------------------------

इन्स्पिरेशनबद्दल धन्यवाद....

-----------------------

Saturday, February 28, 2009

नशीब

ब्याऐंशीतली कोणतीतरी संध्याकाळ. अगदी आज असते तशीच असणार तेव्हाही. चौपाटी, रस्त्याच्या बाजूला असलेले भेळवाले, त्यांच्या पलीकडे थोड्या अंतरावर लोकमान्य टिळक. करडा समुद्र आणि दूरपर्यंत पसरलेली वाळू. रस्त्यावरून वाहनांची गर्दी, चौपाटीवर माणसांची गर्दी. त्या गर्दीत एक तो. तीन वर्षाचा छोटा. चौपाटी त्याला खूप आवडायची.

वाळूचे डोंगर बनवायचे आणि स्वतःच ते तोडून टाकायचे हा तिथला त्याचा आवडता खेळ. वेगवेगळ्या लोकांबरोबर चौपाटी वेगवेगळी दिसायची. सकाळी आजीबरोबर फिरायला गेल्यावर, तिच्या सगळ्या मैत्रिणींच्या गोतावळ्यात बसून ऐकायच्या गप्पांची मजा वेगळी. घरी परतताना उचललेली बदामाची फुलं आणि चाफ्याच्या फुलाची आजीने बनवून दिलेली अंगठी, त्याची मजा वेगळी. आणि आई बाबांबरोबर रविवारी संध्याकाळी चौपाटीवर जाऊन केलेली मजा वेगळी.

पण आजची संध्याकाळ जरा वेगळी होती. त्याच्याबरोबर त्याची आजी नव्हती आणि आई बाबाही. चाळीतल्या दोन काकूंनी त्यांच्या मुलांसोबत इतरही मुलांना चौपाटीला नेण्याचा घाट घातला होता. सगळ्या मित्रमंडळींबरोबर खूप खेळायला मिळणार ह्या आनंदातच तो चौपाटीला गेला.

रोज खेळतात तसाच कुठलातरी खेळ सगळे खेळायला लागले. इथे मुलांचा खेळ रंगला तशा तिथे काकूंच्या गप्प रंगायला लागल्या. कसला खेळ कोण जाणे पण खेळता खेळता आपल्या ह्या छोटूच्या पायातनं त्याची चप्पल सटकली. धावता धावता म्हणा किंवा कसंही म्हणा पण त्याच्या ते लक्षात आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याला त्याची चप्पल मिळेना.

छोटूच्या एकदा मनात आलं की आपण जाऊन काकूंना सांगावं की चप्पल हरवली. पण मग त्याला वाटलं नकोच सांगायला. चप्पल काय इथेच कुठे असेल. आपले मित्र आणि काकू कुठे आहेत हे छोटूनं एकदा नीट बघून घेतलं. एका काकूंनी निळी साडी घातली होती आणि दुसऱ्या काकूंनी पिवळी साडी घातली होती. त्याने मनात हे नक्की लक्षात ठेवलं आणि तो चप्पल शोधायला लागला.

चालत चालत कुठे गेला कोण जाणे. चप्पल तर त्याला मिळाली नाहीच पण आता काकू आणि मित्रही दिसेनासे झाले. आता काय करायचं? छोटू एकदम रडकुंडीला आला. पण त्याने अजिबात धीर सोडला नाही. त्याने स्वतःला समजावलं की एका काकूंनी पिवळी साडी आणि दुसऱ्या काकूंनी निळी साडी घातली आहे. आपल्याला त्या नक्की दिसतील. त्यानी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. दूर कुठेतरी त्याला निळ्या पिवळ्याचं काँबिनेशन दिसलं. जितक्या वेगात शक्य होतं तितक्या वेगात तो त्या दिशेने गेला. आपले मित्र काकू भेटणार म्हणून खूश झाला. पण जवळ जाऊन पाहातो तो काय? ते कुणी दुसरेच होते.

असं करत करत तो एका निळ्या पिवळ्या काँबिनेशन कडून दुसऱ्या कडून तिसऱ्या करत करत कुठे गेला कोण जाणे. इथे काकूंच्या लक्षात अलं की छोटू कुठे दिसत नाहीये. त्यांनी आजूबाजूला शोधलं, तरी मिळाला नाही. तीन वर्षाचा गोरा गोमटा छोटू हरवला तरी कुठे? आता छोटूच्या आईबाबांना उत्तर काय द्यायचं? ह्या प्रश्नाने काकूंनापण रडू आलं. पण तिथे वेळ दवडण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण शोधूनही छोटू सापडला नव्हता. त्या तशाच चाळीत परत आल्या. झाला प्रकार त्यांनी छोटूच्या आईबाबांना, सगळ्यांनाच सांगितला. लगेच सूत्र हलली. कुणी पोलिसात फोन केला. आई बाबा तसेच छोटूला शोधायला निघाले. अख्खी चाळ छोटूला शोधायला बाहेर पडली. आजी तेवढी घरी राहिली.

सगळ्यांनी शोध शोध शोधला. कुठे गेला कोण जाणे संध्याकाळ सरून अंधार पडायला लागला, तरी छोटूचा पत्ता लागला नाही. सगळे हवालदिल झाले. चौपाटीवर फिरून फिरून पाय दुखले तरी छोटूचे आई बाबा हार मानायला तयार नव्हते. मनात वाईट साईट विचार येत होते पण तरीही ते छोटूला शोधत होते. शोधणार होते.

-----------

एक माणूस खुर्चीत बसलेला. त्याच्यासमोर एक मुलगा उभा. माणूस मुलाला, त्याच्या आवडीचं सुरदासाचं भजन म्हणायला सांगतो. मुलगा आनंदाने "दर्शन दो घनशाम" हे त्याला शिकवलेलं भजन म्हणायला लागतो. खुर्चीत बसलेल्या माणसाला आपलं भजन आवडलं तर आपलं कल्याण होईल म्हणून मुलगा मनापासून गात असतो. मुलाचं भजन खरंच चांगलं होतं. खुर्चीत बसलेल्या माणसालाही ते आवडतं. तो टाळ्या वाजवत उठतो आणि मुलाचं कौतूक करता करताच बाजूला उभ्या असलेल्या माणसाला खूण करतो. इशारा मिळताच उभा असलेला माणूस कसलासा फडका मुलाच्या नाका तोंडाला लावतो. मुलगा बेशुद्ध पडतो. त्याला आडवा झोपवला जातो. त्याचा एक डोळा उघडून तापतं तेल त्याच्यावर ओतलं जातं. मुलाचा एक डोळा कायमचा जातो.

आता जन्मभर मुलगा आंधळा भिकारी म्हणून जगणार असतो.

-------------

ब्याऐंशीच्या त्याच संध्याकाळी एक मारवाडी कुटुंब मलबार हीलच्या बाजूला चौपाटीवर बसलेलं. दोघं नवरा बायको आणि त्यांची मुलगी. थोड्या अंतरावरंच एक मुसलमान कुटुंब बसलेलं असतं. त्या दोन्ही कुटुंबांच्या मधल्या जागेत एक गोरा गोमटा लहान मुलगा काहीतरी करत असतो. मारवाडी बाई आपल्या नवऱ्याला म्हणते की बहुतेक हा मुलगा हरवल्यासारखा वाटतोय. नवरा, बायकोकडे दुर्लक्ष करतो. म्हणतो ते मुसलमान कुटुंव आहे, त्यांच्यातलाच असेल तो.

बाईचं समाधान होत नाही. ती त्या मुलाला निरखत राहते. तितक्यात काहीतरी तिला एकदम लक्षात येतं. ती तिच्या नवऱ्याला म्हणते की हा मुसलमान असणं शक्यच नाही. त्याचे कान टोचलेले आहेत.

आता नवऱ्याला बायकोचं म्हणणं पटतं. जवळ जाऊन तो मुलाची चौकशी करतो. खरंच तो मुलगा हरवलेला असतो. आपल्या बोबड्या भाषेत तो आपला पत्ताही सांगतो, पण त्या मारवाडी माणसाला त्याचं बोलणं नीटसं कळत नाही. थोडा वेळ नवरा बायको कुणी शोधायला येतं का ह्याची वाट पाहायचं ठरवतात. मुलगा त्यांच्या मुलीबरोबर खेळण्यात रमतो. मारवाडी मुलांना गंडेरी घेऊन देतो. मुलगा आपण हरवलोय हे पूर्णपणे विसरून जातो. थोडा वेळ वाट पाहूनही कुणीच येत नाही. ते मुलाला पोलिसात घेउन जायचं ठरवतात. ती बाई नवऱ्याला स्पष्ट सांगते की ह्याचं कुणी सापडलं नाही तर त्याला आपण वाऱ्यावर सोडायचा नाही, सरळ घरी घेऊन जायचा.

...........

छोटूच्या शेजाऱ्यांचा फोन खणखणतो. फोन पोलिसांचा असतो. छोटू सापडल्याचा. चाळीत एकच जल्लोश होतो. छोटूला आणायला घरी असलेली त्याची आजी पोहोचते. कुणीतरी चौपाटीवर निरोप घेऊन जातो छोटूच्या आईबाबांसाठी. मोठ्या खुशीतच छोटू घरी परत येतो.

...........

"स्लमडॉग मिलेनेअर" पाहताना एकदम ह्या छोटूची खूप आठवण आली.

ते मारवाडी कुटुंब नसतं, तर काय झालं असतं छोटूचं? गरम तेलाने अधू झालेला डोळा घेऊन जन्मभर त्याला भीक मागत फिरावं लागलं असतं का?

नशीब चांगलं होतं......

छोटूचं.

Friday, January 30, 2009

निर्णय

ती मीटिंग रूम मधून बाहेर पडली. डोक्यात नुसता विचारांचा गलका झाला होता. गेल्या महिन्यातली सुखीलाल ची कॅंपेन, त्यातलं तिचं आर्टवर्क, ते कौतुक, ती प्रसिद्धी, रात्र रात्र जागून केलेली डिझाइन्स, बॉसने अचानक पाठवलेला इ-मेल, आताची मीटिंग आणि बेंगलोरच्या ऑफिसमध्ये चालून आलेली, भरभक्कम पगाराची बढती. क्षणभर तिचा कानांवर विश्वासच बसला नाही की तिला ही संधी देण्यात आलेय.

अवघ्या दीड वर्षात एवढी प्रगती? बेला होण्याआधी नोकरी सोडली. जरा कुठे नोकरीत बस्तान बसत होतं, पण बेलाचा जन्म ही पण गरजच होती. ती टाळता येण्यासारखी नव्हती. लहान मुलगी आईवाचून नको म्हणून चांगली तीन वर्ष घरी राहिली. मग ही नोकरी. लहान मुलगी, घर सगळं सांभाळून केलेली नोकरीची कसरत. सगळं, सगळं तिला आठवलं. कामाचं चीज झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलं.

आपल्या डेस्क पाशी येताच तिने तिचा मोबाईल पाहिला. घरून तीन वेळा फोन आला होता. अचानक तिला वास्तवाची जाणीव झाली. हातातल्या घड्याळात तिने नजर टाकली. सात वाजून गेले होते. म्हणजे बेला घरी पोचली असणार आणि अनीषही. घाईघाईने तिने आपला काँप्यूटर बंद केला आणि ती जिने उतरू लागली.

मुंबईच्या फोर्ट एरिआमधलं कोणतंही ऑफिस असावं तसंच तिचंही होतं. आतून चकचकीत पण जिने मात्र कळकट. त्यात जिन्यातला बल्ब फुटला होता. लाकडी कठड्याला घट्ट धरून एकेक लाकडी पायरी ती उतरायला लागली. उगाचच जिनाभरल्या अंधारानं तिला घाबरायला झालं. कठड्यावरची पकड अजूनही घट्ट झाली. एकटेपणाची जाणीव अधिकच वाढली. डोळ्यासमोर आई उभी राहिली. नेहमी ओरडायची आई, एकटीने उशीरापर्यंत बाहेर राहू नको म्हणून. कारण मुलीची जात. त्या क्षणीही तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. उगीच का कोणी बाहेर राहतं उशीरापर्यंत? काम असतं, गरज असते, म्हणून राहायला लागतं. आईला काही शेवटपर्यंत पटलं नाही आपलं.

शेवटची पायरी उतरून ती इमारतीच्या बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला मोकळं वाटलं. समोरच फ्लोरा फाउंटन पसरलं होतं. हुतात्मा चौक. हुतात्मा चौकात अनाहूत आत्म्यांची गर्दी. स्वतःचीच कोटी आठवून तिला हसायला आलं. चालत चालत ती पासष्ट नंबरच्या बस स्टॉपवर पोहोचली. कोपऱ्यावर फुटपाथवरंच पुस्तकं मांडून विक्री चालली होती. तिला वाटलं, जरा जावं, दोन पुस्तकं चाळावीत, एखादं घ्यावं, एखादं बेलासाठी, एखादं अनीषसाठी. बेला आणि अनीषचा विचार आल्यावर मात्र पटकन घरी पोहोचायला हवं हे तिच्या ध्यानात आलं.

टॅक्सीनं जावं का? नकोच. बसनेच जाऊ. पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल. डबल डेकर बसचं तिला भयंकर आकर्षण होतं. लहान असताना ठीक होतं पण अजूनही? ती आपल्याच तंद्रीत होती. बस समोर थांबल्यावरच तिच्या लक्षात आलं. गर्दी नसेल असं वाटलं होतं पण बस खच्चून भरली होती. आजूबाजूच्या शरीरांना चुकवत ती वरच्या डेक वर पोहोचली. तिथंही बसायला जागा नव्हती. वरच्या काळ्या दांडीला धरून ती तशीच लोंबकळत राहिली.

बस सुरू झाली आणि पुन्हा तिला तिची मीटिंग आठवली. बंगलोरला बढती, मोठा पगार. पण कसं शक्य आहे? इथे अनीषची नोकरी, बेलाची शाळा. कसं जमणार हे सगळं? नाहीच होणार शक्य. पण अशी संधी पुन्हा मिळणार नाही. माझ्यासाठी तो त्याची नोकरी सोडून किंवा बदलीही मिळवून बेंगलोरला कसा येणार? हजार कारणं सांगेल. मग करायचं तरी काय? एकटीने काही दिवस तिथे काढले तर, बेलाला घेऊन? मग नंतर पुन्हा इथे येता येईल, पण ही संधी हातची जाता कामा नये. माझंच असं का होतं? आधीची नोकरी ऐन भरात आलेली असताना बेलासाठी सोडावी लागली. तेव्हा मी नाही म्हटलं नाही. तीन वर्ष घरी वसून राहिले. बाई म्हणून एवढं पडतं घेतलं. नाही घ्यावंच लागलं. पण अजूनही..

बसने जोरात ब्रेक दाबला आणि ती भानावर आली. बस गर्दीनं खच्चून भरली होती आणि तिच्या मागे असलेला माणूस तिच्या जास्तच चिकटून उभा असल्याचं तिला जाणवलं. तिचा स्टॉपही जवळ येत होता. ती पटकन जिन्याच्या दिशेने निघाली. त्या माणसाचा निसटता घाणेरडा स्पर्श तिला चुकवता आला नाही. क्षणभर तिला तिचीच कीव आली. स्वतःची. एक बाई म्हणून, एक स्त्री म्हणून.

सुखीलाल ची कॅंपेन तिला आठवली. काहीही जाहिरात करा पण त्यात एक बाई पाहिजे. कशाला? बाईचं काम फक्त सुंदर दिसणं, घर सांभाळणं एवढंच आहे का? चूल आणि मूल म्हणे. अरे बाईकडे एक माणूस म्हणून बघा ना. फक्त मादी म्हणून, पुनरुत्पादनाचं यंत्र म्हणून का बघता? तिलाही काही आकांक्षा असतील, अपेक्षा असतील, त्यांची काळजी कोणी घ्यायची. एकेक विचारासरशी तिच्या डोक्यात घणाचे घाव बसायला लागले. आजूबाजूचं सगळं जग पुरुषांनी भरलंय आणि ते सगळेजण आपल्याकडे माना वेडावून हसतायत आणि आपल्याला "स्त्री", "स्त्री" म्हणून हिणवतायत असं तिला वाटलं.

तंद्रीतच ती आपल्या स्टॉपवर उतरली, घराकडे चालायला लागली. घर जसं जवळ येऊ लागलं तसं तिला बरं वाटायला लागलं. चावीने तिने घराचं लॅच उघडलं आणि ती आत शिरली. अनीष, म्हणून तिने हाक मारली. सुखीलाल च्या कॅंपेनबद्धल तिचं झालेलं कौतुक, आजची मीटिंग, सगळं, सगळं तिला त्याला सांगायचं होतं. चपला उचलून तिने स्टँडवर ठेवल्या आणि ती बेडरूमकडे गेली. तीही रिकामीच होती.

ती बेलाच्या खोलीत शिरणार, इतक्यात अनीष तिथूनच बाहेर आला. मघाशी पडणारे घणाचे घाव कधीच थांबले होते. आता तिला त्याला सगळं सांगायचं होतं. ती काही बोलणार इतक्यात त्याने खुणेनेच तिला शांत राहायला सांगितलं आणि तो तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेला.

आत शिरताच ती काही बोलणार इतक्यात अनीषच सुरू झाला

"कुठे होतीस इतका वेळ. अरे, काही घर, दार, नवरा, मुलगी ह्यांची आठवण आहे की नाही? का त्या फर्मला पूर्ण वाहून घेतलंयस तू? मोबाईल कशाला दिलाय? कधीही फोन करता यावा म्हणून ना? मग तो बंद का असतो नेहमी?"
"अरे पण मीटिंग...."
"मीटिंग गेली खड्ड्यात. कधीही फोन करा ही आपली मीटिंगमध्ये. काय चालवलंयस काय तू हे. मी घरी आलो, तर बेला पाय धरून बसलेली, खेळताना पडली, पायातून भळभळा रक्त येत होतं. म्हणाली आईला फोन केला पण आई फोन उचलत नाही. अरे हजारदा सांगितलंय तिला एकटं ठेवणं बरोबर नाही. उद्या तिला काही झालं तर काय करशील? त्यात तो फोन नुसता नावाला घेतलाय, कधी उचलतच नाहीस..."
"अनीष, सुखीलाल ची......"
"ए, आता त्या सुखीलाल चं नाव काढू नको हं. फार दिवस ऐकतोय. बघायलाच पाहिजे एकदा हा कोण सुखीलाल आहे ते. साला, माझ्यापेक्षा माझी बायको ह्याचंच नाव जास्त घेते."
"अनीष...."
"तुला काय वाटलं, मी न बोलता सगळं सहन करतो म्हणजे मला हे सगळं मान्य आहे? लग्नानंतर मी तुला नोकरी करू दिली. तुझ्या आशा आकांक्षा, तुझं करिअर, तुझ्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, ह्याची कल्पना होती म्हणून. प्रत्येक गोष्टीत तुला साथ दिली. एकटीला तुला परदेशी पण पाठवलं. पण बेला झाल्यावर तरी तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव नको का व्हायला? आता ती महत्त्वाची की तुझा सुखीलाल महत्त्वाचा?"
"अरे पण लग्न झाल्यावर तीन वर्ष होते ना मी घरी?"
"काय उपकार केलेस? आई म्हणून तुझं कर्तव्यच आहे ते. खरंतर मला हे असं तिला एकटं ठेवणं अजिबात मान्य नाही. तासाभरासाठी का होईना, ती एकटी राहता कामा नये. तू लवकर का नाही येत ऑफिसमधून?"
"अनीष, जेव्हा शक्य असतं तेव्हा येतेच ना?"
" हे बघ, जेव्हा शक्य असतं तेव्हा नाही. रोज यायला हवं. आता तूच ठरव बेला की तुझी नोकरी आणि काय तो निर्णय घे. तिथे ऑफिसात बॉसची कटकट आणि इथे घरी आल्यावर तुझी. नकोसं झालंय सगळं"

तिलाही सगळं नकोसं झालं होतं. आपण अजून बेलाला पाहिलंच नाही हे तिच्या ध्यानात आलं. अनीषला तिथेच सोडून ती बेलाच्या खोलीत गेली. बाजूचा दिवा जळत होता. आणि तिच्या छोट्याश्या बेडवर बेला झोपली होती. पायाला बँडेज लावलेलं दिसत होतं, पण चेहऱ्यावर मात्र हास्य होतं.

...कसली स्वप्न बघत असेल ही. चॉकलेटच्या बंगल्याची, चमचमणाऱ्या चांदण्यांची, ढगांच्या दुलईची आणि राजकुमाराची आणि राजकन्येची. आहेच माझी बेला राजकन्येसारखी. अगदी माझ्यासारखीच दिसते नाही. मोठी झाली की माझ्यासारखीच... नको. माझ्यासारखी नको. पण तिही एक स्त्रीच ना. मी तिला सांगणारच, एकटी उशीराने घराबाहेर राहू नको. सातच्या आत घरात ये. तिलाही लग्न करावं लागणारंच, मुलं होणार, मग ती, ती राहणारच नाही. मग ती होणार एक बाई, बायको, मादी, आई. हे सगळं पहिलं. तिची स्वप्न, तिच्या आशाआकांक्षा हे सगळं दुय्यम. सतत दुसऱ्यांचा विचार....

नकळत तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. दिवसभर जगाबरोबर भांडायचं, आणि घरी आल्यावर नवऱ्याशी. काय आयुष्य झालंय आपलं. हाताला झालेल्या कुणाच्यातरी स्पर्शाने ती भानावर आली. बेलाने तिचा हात हातात घेतला होता. तिच्या डोळ्यातही अश्रू उतरले होते.

"रडू नको ना आई. काय झालं?"

बेलाच्या ह्या एका प्रश्नानं तिच्या रडक्या चेहऱ्यावर हसू फुटलं. आवेगाने तिने बेलाला जवळ घेतलं.

"नाही रडणार हं बाळा. तुला लागलं ना म्हणून मला रडायला आलं. मी नव्हते ना घरी तेव्हा, माझ्या बाळाची काळजी घ्यायला"
"आई, मी तुला फोन केला तीनदा. तू उचलाच नाहीस. मला इतका राग आला होता ना तेव्हा. तितक्यात बाबा आला. मला डॉक्टर काकांकडे घेऊन गेला. मी त्याला सांगितलं मला आईचा राग आला म्हणून. पण तो म्हणाला, आईवर असं रागावायचं नाही, आईला खूप काम असतं ना म्हणून नाही घेता येत तिला फोन. त्याने मला तुझी नवी ऍडपण दाखवली पेपरमधली. मस्त आहे हं फोटो. मग माझा राग कुठल्या कुठे पळून गेला"

तिच्याकडे बोलायला काही उरलंच नव्हतं. इतक्यात मागून अनीष आला. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणाला

"सॉरी. मघाशी जरा जास्तच बोलून गेलो. खरंच सॉरी. राग तुझ्यावर नव्हता. पण तुझ्यावर निघाला. शेवटी मला हक्काची तूच आहेस ना? सॉरी."

तिने डोकं त्याच्या हाताला टेकलं. खूप खूप बरं वाटलं तिला. अनीष आणि बेला असे जवळ असताना आणखी काय पाहिजे? मनात एकदा आलं की अनीषला सुखीलालचं कौतुक, बॉसने दिलेली ऑफर सांगावी. पण ही वेळ तिला योग्य वाटली नाही.

तिला दोन्ही हवं होतं. चांगलं करिअर आणि सुखी संसार. आणि तिच्या बाबतीत तरी दोन्ही एकाच वेळी घडणं शक्य नव्हतं. आता खरंच तिला निर्णय घ्यायचा होता. खरंच ती निर्णय घेऊ शकणार होती का? की सतत असं शक्यतांच्या झोपाळ्यांवर झोके घेत राहणार होती? कोणताही निर्णय न घेता?

Wednesday, January 07, 2009

फॉरमेशन इन केऑस

१३ डिसेंबर २००८, मुंबई.

मुंबई विमानतळावर विमानातून बाहेर शिरतानाच हवा जड झाल्याचं जाणवतं. प्रदूषण. हा प्रदूषणाचाच परिणाम. विमानतळातून बाहेर पडता पडता समोर पसरलेली अस्ताव्यस्त गर्दी दिसते. केवळ समोर लावलेल्या बॅरिकेडसमुळेच त्या गर्दीला काहीसा आकार आलेला. विस्कटलेल्या गर्दीतून आपली माणसं शोधताना डोळ्यांची दमछाक होते. पॉप्युलेशन एक्स्प्लोजन.

दुपारच्या उन्हात रापलेली धूळ आकाशात अस्ताव्यस्त उडत असतानाच आमची टॅक्सी आम्हाला दिसते. आडवा झालेला टॅक्सीवाला उठून सामान टपावर चढवतो आणि आम्ही मार्गस्थ होतो. केवळ वाहनं जातायत म्हणून त्याला रस्ता म्हणायचं. शिस्त नाही. लेन आखूनही पाळायच्या नाहीत. भरपूर हॉर्न वाजवायचा. ड्रायव्हिंग मॅनर्स अजिबात पाळायचे नाहीत. लोकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचतात हेच आश्चर्य आहे.

गल्लीत पोचतो तर तिथे सार्वत्रिक गोंधळ. रस्त्यावर एक माणूस बेंबीच्या देठापासून ओरडून बोलतोय. मुलं दंगा करतायत. त्यांची मारामारी चाललेय, एक भाजीवाला गाडी लावून रस्ता अडवतोय.

व्हॉट अ केऑस.

२ जानेवारी, २००९, मुंबई.

विमानतळावर जाण्यासाठी मी घर सोडतो. सुट्टी संपल्याचं दुःख आणि प्रियजनांपासून दूर जाण्याचं दुःख.

गल्लीत नेहमीची दुपारची शांतता पसरलेय. भाजीवाला आपली गाडी तशीच सोडून कुणाचीतरी भाजी पोचवायला बिल्डिंगमध्ये शिरलाय. रस्त्याच्या तोकड्या जागेत मध्ये नेट लावून मुलं बॅडमिंटन खेळतायत. तिसऱ्या मजल्यावरच्या लिमयांच्या मुलाशी त्याचा मित्र रस्त्यावरून अभ्यासाबद्दल बोलतोय.

त्या गडबडीतच मी गाडीत बसतो गाडी चालवायला लागतो. गल्लीच्या तोंडापर्यंत पोचायलाच चार पाच हॉर्न्स होतात. रस्त्यावर गाड्यांची गर्दी ओसंडून वाहतेय. प्रत्येकालाच आपल्या ठिकाणी पोचायचंय. रस्ते थोडे वाहनं फार झालेयत. पण सगळं कसं शिस्तीत चाललंय. लोकं लेन बदलतायत रेटारेटी करतायत मध्येच गाड्या घुसवतायत आणि मीही.

मजल दरमजल करत आम्ही एअरपोर्टला पोचतो. गर्दी ओसंडून वाहतेय. आपापल्या लोकांना निरोप देऊन लोकं चालू पडतायत. आणि मीही.

४ जानेवारी २००९, मेलबर्न.

जगाच्या कुठल्यातरी भोकात जाऊन मी वर्षभर बसलो की परत भारतात आल्यावर सार्वत्रिक गोंधळ असल्यासारखं वाटतं खरं, पण दिवस जातात आणि त्या गोंधळाच्या पडद्याआड लपलेली एक संघटना दिसायला लागते.

India is a beautiful formation in the midst of chaos.

.