Wednesday, November 02, 2011

जळ (१)

तो दिवस सुरू तरी झाला एखाद्या अगदी अतिसामान्य, रूटीन, त्याचत्या दिवसासारखा. सकाळी सकाळी मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये येऊन बसलो होतो. काम काही विशेष नव्हतंच. माझ्या पोरांना कामाला लावून मी ऑफिसात आराम करायचं ठरवलं होतं. रात्रीपासूनच पावसानं जरा जोर धरला होता. जास्तच लागला पाऊस तर सरळ ऑफिस बंद करून घरी जायचा बेत होता. खिडकीतून बाहेर पाहिलं तर सगळं भिजलं वातावरण होतं. कौलाच्या पन्हाळ्यांचं काम राहिल्याचं तेव्हाही माझ्या डोक्यात आलं. तुटक्या पन्ह्याळ्यातून पावसाच्या पाण्याचा पुन्हा एकदा पाऊस होण्याचा खेळ चाललेला होता. एकंदरीत मुंबापुरीला सक्तीची विश्रांती देण्याचं काम पाऊस करणार असं वाटायला लागलं. 

कॉम्प्युटर सुरूच होता. बाजूला फोनही होता. पण आज त्यानंही विश्रांती घ्यायची ठरवलेली होती. चाळा म्हणून कॉम्प्युटरवर इंटरनेट सुरू केलं. फोन का निपचीत पडला होता ह्याचं कारण समजलं. फोन लाइन डेड झालेली होती. तातडीने खिशातला मोबाईल काढून पाहिला. तो अजून जिवंत होता. उगाचच जरा बरं वाटलं. फोन परत खिशात ठेवणार इतक्यात तो वाजलाच. डोक्यावरची चाळीशी नाकावर ओढून नाव पाहिलं. विद्याचं होतं. 

" बोल" मी म्हणालो.
" अहो, हॅलो, ऐकू येतंय का? " बहुतेक तिला बाहेरच्या पावसाच्या आवाजात फोनवरचं काही ऐकू येत नसावं.
" होय येतंय. बोल" मी जरा आवाज चढवूनच बोललो. बहुतेक तिच्या ते लक्षात आलं असावं.
" अहो. लवकर घरी येताय ना? मुंबई तुंबलेय सगळी. लोकल बंद आहेत, रस्ते पाण्यानं भरलेत." मी वाकून खिडकीबाहेर पाहिलं. पाऊस पडत होता पण रस्त्यावर पाणी साठल्यासारखं वाटलं नाही.
" लोकलचं सांगू नकोस. मध्य रेल्वेवर चिमणी मुतली तरी पाणी साचतं. इथे काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. " मी उगाचच फार वेळा उगाळलेला विनोद पुन्हा उगाळला.
" अहो. तुम्ही ताबडतोब या, नाहीतर ऑफिसातच राहावं लागेल. " प्रकरण गंभीर होतं तर.
" प्रिया आली का घरी?" 
" ती गेलीच नाही कॉलेजला पाऊस आहे म्हणून. लक्ष कुठे असतं हो तुमचं? " प्रिया घरीच होती. खरंच. चला मुलगी सेफ म्हटल्यावर मला बरं वाटलं.
" बरं बरं मी बघतो. येतो. फोन करतो. " मी फोन ठेवला.

नक्कीच काहीतरी गडबड होती. मी लगबगीनं टी. व्ही लावला. बातम्यांत तेच चाललेलं होतं. ऑफिसेस सोडून दिलेली होती. मी ताबडतोब मुलांना फोन केले. ही पोरं लांब लांब राहणारी उगाच नको तिथं अडकून पडतील आणि जीवाला घोर सगळ्यांच्या. सर्व मुलं हुशार असल्याने त्यांनी कामं कधीच आटोपती घेतलेली होती. कुणाचा धाक नाहीये ह्या पोरांना असं मला तेव्हाही वाटलो. घाई घाईने सगळं आवरलं. दिवे, ए. सी. बंद केला. अजूनही रस्त्यावर पाणी साठलेलं दिसत नव्हतं. मनातल्या मनात गाडी कुठच्या रस्त्यावरनं काढावी ह्याचा विचार करीत मी ऑफिसचा दरवाजा बंद केला. खिशातनं चावी काढणार इतक्यात फोन पुन्हा वाजला. विद्याला मनातल्या मनात शिव्या देत मी फोन घेतला.

" हॅलो" मी तिरसटपणे म्हणालो.
" काका, मी बोलतेय, अभ्रा" पलीकडून वेगळाच आवाज. 
" ओह अभ्रा, बोल बोल. मला वाटलं विद्याचाच फोन आला पुन्हा. बोल, काय काम काढलंस? " खांदा आणि मान ह्याच्यात फोन पकडून बोलत असताना दुसऱ्या हातानं मी दाराला कुलूपदेखील घातलं.
" काका, कुठे आहात तुम्ही? घरी की ऑफिसात? "
" मी ऑफिस बंद करून घरीच जायला निघतोय. काय झालं? तू कुठे आहेस? "
" निघालात का तुम्ही? मग असूदे. "
" अगं पण काय झालं ते तर सांग. " स्त्री दाक्षिण्य.
" काका अहो मी पावसात अडकलेय. तुमच्या ऑफिसच्या दिशेला आहे. मेन रोडवर. तुफान पाणी साचलंय. ट्रेन बंद आहेत म्हणे. ह्या भागात माझं ओळखीचंही कुणी नाही, म्हणून फोन केला. पण तुम्ही जात असाल तर जा. मी मॅनेज करीन. " आली का पंचाईत.
" तू खूप लांब आहेस का? "
" नाही साधारण अर्धा तास लागेल. "
" बरं मी थांबतो तू ये. मग आपण दोघं घरी जाऊ. "

बंद ऑफिसाचं कुलूप मी पुन्हा उघडलं आणि आतमध्ये जाऊन बसलो. 

अभ्रा. साधारण तिशीच्या आतबाहेरचं वय असेल हिचं. मला काका म्हणते. मला विशेष आवडत नाही ते. पण वय चोरूनही पन्नाशीच्या खाली ज्याला आपलं वय सांगता येत नाही त्याला तिनं म्हणावं तरी काय? आमची भेट कुठं झाली असावी? रेल्वेच्या डब्यात. बडोद्याला ऑडिटसाठी गेलो होतो, मुंबईला परत येताना सेकंड एसीच्या डब्यात माझ्या समोर ही बसलेली. बडोदा कायमचं सोडून मुंबईला चाललेली. नोकरीसाठी. कुठल्याश्या कंपनीत सेल्स मध्ये आहे म्हणे ती. मरीन ड्राइव्हला ते सावित्रीबाई फुले महिला वसतिगृह आहे ना तिथे राहते.

मी पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहिलं. बाहेर पाऊस पडत होता पण तरीही ऑफिसात एसीशिवाय उकडतंच होतं. मी खिडकी बंद केली आणि एसीची घरघर पुन्हा सुरू केली. डोक्यावर गार वाऱ्याचा झोत आल्यावर जरा बरं वाटलं. तर सावित्रीबाई फुले वसतिगृह. तिथे ही राहते. लग्न झालेलं आहे पण नवऱ्याशी पटत नाही. म्हणूनच बडोदा सोडलं. मूल, बाळ काही नाही. मुंबईत एकटी आहे. ओळखीचंही कुणी नाही. ट्रेनमध्ये बोलता बोलता तिनं हे सगळं सांगितलेलं. खरा मी असा अनोळखी पोरींना माझा नंबर वगैरे देणाऱ्यातला नाही. पण तिला दिला. एकटी मुलगी, अनोळखी शहर, काय गरज लागेल सांगता येत नाही.

मी खिडकीतून डोकावून पाहिलं, रस्त्यावर पाणी तुंबायला लागलेलंच होतं. लवकर इथून बाहेर पडणं गरजेचं होतं. तितक्यात फोन वाजला. विद्याचा होता. मी उचललाच नाही. मी ड्राइव्ह करताना फोन उचलत नाही, त्यामुळे मी बहुदा रस्त्यातच आहे असं ती समजणार. ट्रॅफिकची बोंब असेलच म्हणजे अजून अर्धा पाऊण तास तरी विद्याचा फोन येणार नाही, तोपर्यंत मी खरंच गाडीत असेन. मी मनाशी हिशेब केला. ही पोरगी अडकली तरी कुठे?

मी अभ्राला माझा नंबर दिला. बऱ्याच दिवसांनी तिचा फोन आला. ती कोण हे कळायलाच मला बराच वेळ लागला पण आठवलं. चांगली सेटल झाली होती. नोकरी, हॉस्टेल. काही मित्र, मैत्रिणीही झाले होते म्हणे. मैत्रिणी ठीक आहे. पण ही अशी एकटी मुलगी, नवरा सोबत नाही, मित्राबित्रांपासून जरा दूर राहिली तर बरी असं आपलं माझं मत पडलं. फोना फोनी चालूच राहिली. ऑफिसच्याकामानिमित्त तिच्या घराच्या कामाच्या बाजूला गेलो की भेटायला लागलो. तिचंही काम तसं फिरतीचं त्यामुळे अधून मधून तीही चक्करटाकायला लागली ऑफिसात. 

ही अभ्रा का आली नाही? मी घड्याळात पाहिलं. अर्धा तास होऊन गेलेला होता. खिडकीबाहेरच्या रस्त्यावर पाणी वाढायला लागलेलं होतं. तेवढ्यात इतका वेळ मला न सुचलेली गोष्ट मला सुचली. मी तिला फोन लावला. तिला बहुदा पावसाच्या आवाजात फोनचा आवाज ऐकू गेला नसावा. बरं कुठून येतेय हेही सांगितलं नव्हतं त्यामुळे तिला शोधायला बाहेर जाणंही शक्य नव्हतं. काय करावं अशा विचारात असतानाच रस्त्यावरून जवळजवळ गुडघाभर पाण्यातून चालत येताना ती मला दिसली. तिच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं. म्हणजे फूटभर तरी नक्कीच होतं.

घरी कसं जायचं ह्याचा विचार मी करत करतंच ऑफिसाच्या बाहेर पडलो. कुलूप लावलं आणि जिना उतरायला लागलो. आमच्या बिल्डिंगच्या जिन्यातपण तळाला पाणी भरलेलं. त्या पाण्यात उतरण्याचं टाळून मी तिची वाट पाहत तसाच उभा राहिलो. पाण्याच्या लाटा आधी आत आल्या आणि पाठोपाठ ती आली. नखशिखान्त भिजलेली, पांढरी ओली कुर्ती दंडाला चिकटलेली. ओले केस आणि त्यातून पडणारा पाऊस, चाफेकळी नाक, जिवणीवरचा पाण्याचा थेंब, मोठाले डोळे, एका खांद्यावर लॅपटॉपची बॅग आणि दुसऱ्या हातात कसलंतरी फुलाफुलाचं डिझाइन असलेली छत्री. 

" काका" तिनं मला हाक मारली आणि मी भानावर आलो.
" अगं अभ्रा किती वेळ लावलास, मला काळजी वाटत होती फार. तुला पाहायलाच मी खाली उतरत होतो" खोटं का? मी मनातच विचार केला.
" काका किती काळजी करता तुम्ही माझी. उगाचच मी तुम्हाला थांबवलं. "
" बरं आता थांबवू नको. कारण विद्याला जर कळलं की मी अजून इथेच आहे तर माझं काही खरं नाही. आणि माझ्यावर एक उपकार करा. तू मला रस्त्यात दिसलीस असं सांग. नाहीतर माझी चोरी पकडली जायची. "
" होय काका. " ती हसून म्हणाली. तिचे पांढरे शुभ्र दात दिसले. मोत्यांचा सरीसारखे.
" चला" 

आम्ही दोघंही पाण्यातून वाट काढत पार्किंगपर्यंत गेलो. गाडीचे टायर थोडे पाण्यात होते. पण अजून गाडीच्या तळापर्यंत पाणी पोचलेलं नव्हतं. आम्ही दोघं गाडीत बसलो. मी देवाचं नाव घेतलं आणि गाडी सुरू केली. कंपाउंडमधनं गाडी बाहेर काढली आणि दाणदिशी कसलातरी आवाज झाला मी तशीच गाडी पुढे रेटली एखाद मीटर ती पुढे गेली आणि बंद पडली. गाडी सुरू करण्याचा मी निरर्थक प्रयत्न केला पण गाडी दाद देईना. शेवटी मी विद्याला फोन केला आणि झाला प्रकार सांगितला. विद्याचं असं मत पडलं की मी उगाच अभ्राला घेऊन पावसातनं चालत वगैरे येऊ नये. ऑफिसातच थांबावं, संध्याकाळी पाऊस उतरला की मग दोघांनी घरी यावं. मलाही ते पटलं.

- क्रमशः -