Tuesday, September 25, 2007

Happy Birth Day Koham....

"कोहम चा शोध घेत रहायचं. हा शोध घेताना, जगाच्या प्रयोगशाळेत आयुष्याचे प्रयोग करत रहायचे, आणि निरिक्षणं ह्या ब्लॉगमध्ये नोंदवायची. फारफारतंर अनुमान नोंदवायचं. निष्कर्श मात्र काढायचे नाहीत. कुणी वाचंलाच हा ब्लॊग, तर त्यांचा निष्कर्श काढायला ते मोकळे असतील......."

ह्या मिशन स्टेटमेंट ने बरोबर एक वर्षापुर्वी हा ब्लॉग सुरू केला.

ह्या मिशन स्टेटमेंटला मी किती जागलो माहित नाही.

दर आठवड्याला लिहायचंच असं म्हणून सुरू केलेला हा प्रयत्न. हळूहळू आठवड्याचे दोन झाले आणि सध्या गाडी तीनवर अडकलेय. पण चालू आहे, थांबली नाही.

एक मी होतो. कधीकधी लिहायचो. लिहिता येईल असं वाटायचं. पण चांगलं लिहू अशी खात्री नव्हती. आळस होता, कंटाळा होता. थोडी भीतीही होती. मग त्या "मी" ने लिहायची जबाबदारी "त्या"च्यावर टाकली आणि त्याच्या नावाचा ब्लॉग सुरू केला. लिहिलेलं वाईट उतरलं तर त्याच्या नावावर. पण चांगलं उतरलं तर?

अर्थात मी कधी लपून नव्हताच. ब्लॉग त्याच्या नावावर असला तरी कमेंट्स बघायला मी पुढे. सुरवातीला एक-दोनही समाधान द्यायच्या. हळूहळू आकडा वाढत गेला. कोणीच वाचत नव्हतं तोपर्यंत काहीही लिहिलेलं चालणार होतं. जास्त लोकं वाचायला लागले आणि मग थोडा ताण यायला लागला. अर्थात "त्या"ला. म्हणूनच तर त्याच्या नावचा ब्लॉग.

अपेक्षांचं ओझं वाटायला लागलं. लिहावं ते स्वानंदासाठी असं म्हणण्याचे दिवस गेले. लिहावं ते अधिकाधिक कमेंट्स मिळवण्यासाठी. म्हणजे जाहीरपणे मी काही हे स्वीकारणार नाही पण आपलं खाजगीत म्हणून सांगतोय.

स्पर्धा, असूया निर्माण व्हायला लागली. नकळतच (मी नव्हे) तो इतरांचे ब्लॉग्स बघताना पहिल्या कमेंट्स किती हे पाहायला लागला. तूलना करायला लागला. मला एवढ्याच, त्याला इतक्या का? तिला इतक्या का? असं काय छान लिहिलंय त्यांनी?

मग काही ट्रिक्स कळायला लागल्या. एक कमेंट दो. एक कमेंट लो. त्याने तेही करून पाहिलं.

पुढे ते व्यसनही कमी झालं. पण नंबर्सची अपरिहार्यता काही कमी झाली नाही. बहुदा होणारही नाही.

पण एक नियम मात्र पाळला. आवडलेल्या लिखाणाला मनापासून दाद दिली मग ती सदतिसावी असो नाहीतर पहिली. न चुकता. कितीही असूया वाटली तरीही. अर्थात त्याने.

काय आहे? कधीकधी रुढींच्या झुली न पांघरता मन मोकळं करावंसं वाटतंच. कधी कधी खरं बोलावसं वाटतंच. आज बोललो. आपण केलेल्या गोष्टींची बिलं दुसऱ्यांच्या नावावर तरी किती फाडायची? कुठेतरी स्वतः बील भरलं पाहिजेच की. आता हे सगळं खाजगीत म्हणून बरका? कुठे बोलू नका

मधुनच कधी माझा पहिला पोस्ट बघतो. वाटतं की खरोखरच आपण आपल्या मिशन स्टेटमेंटला जागतोय का? माहीत नाही. माहीत नाही असं म्हणायचं कारण खरं उत्तर तितकसं आनंददायी नाही.

वाटतं थांबावं. जोपर्यंत पुन्हा स्वानंदासाठी लिहू शकत नाही तोपर्यंत थांबावं. But what about numbers' obsession? स्वतःचा अहं पोसायची सवय सोडायची?

कळतं पण वळत नाही.

Happy Birth Day Koham......

Friday, September 14, 2007

बाजार

कालचा अख्खा दिवस सततच्या पावसाने भिजून गेला. घरी असताना छान छान वाटणारा पाऊस बाहेरगावी फिरायला गेल्यावर मात्र नकोसा होतो.

पण "आज" तसा नव्हताच. सकाळी सकाळी सूर्यनारायणानं दर्शन दिलं आणि आज त्याचंच राज्य असल्याची ग्वाही दिली. चला, म्हंटलं आल्या उनाचं सोनं करून घेऊया, म्हणून सकाळी लवकरच घराबाहेर पडलो.

खरंतर होबार्ट हे गाव असं आहे, की सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळा सोडल्या तर इथे गर्दी म्हणून दिसत नाही. इथे सगळे दर्दीच. अगदी मला आवडतं तस्सं गाव. शांत, सुंदर आणि स्वच्छ. म्हणजे निरभ्र आभाळाच्या कॅनव्हासवर हिरवे डोंगर, निळं पाणी. निसर्गाची भव्यता आणि यःकश्चित आपण. त्यामुळे शनिवारी सकाळी बाहेर पडल्यावर फार लोक दिसतील अशी अपेक्षाच नव्हती. पण होबार्टने एक सुखद धक्का दिला. होबार्टचं शनिवारी भरणारं सालामांका मार्केट लोकांनी तुडुंब भरलं होतं.

बऱ्याच लोकांना गर्दी आवडत नाही. मला मनापासून आवडते. कारण गर्दीत मिळतो तसा एकांत कुठेच मिळत नाही. डोकं विचारांनी भणभणलं की सरळ मुंबई व्ही.टी. च्या गर्दीत स्वतःला झोकून द्यावं. इतके लोक असतात तिथे की तुम्ही एक समुद्राचा थेंब होऊन जाता. क्षुल्लक, यःकश्चित. मग तुमचा चेहेरा काळजीने किती का लंबा चौडा होईना. नोबडी बॉदर्स. किंवा अत्यानंदाने तुम्ही स्वतःशीच हसलात आणि तुमचं हास्य तुमच्या चेहेऱ्यावर उमटलं, तरी कोणी विचारत नाही, काय वेड्यासारखा हसतोयस म्हणून.

गर्दीतलाच एक बनून गेलो. समोर पसरला होता एक रंगीबेरंगी बाजार. काय नव्हतं तिथे? उदबत्तीपासून हत्तीपर्यंत सर्व गोष्टी मिळतात अशीच ती जागा. विचारांचं विमान उडायला ह्यापेक्षा चांगला रन-वे कुठचा असणार. कुठे शोभेच्या वस्तू होत्या, कुठे मेणबत्त्या, कुठे जुनी पुराणी पुस्तकं, खाण्याच्या वस्तू, पिण्याच्या गोष्टी, पिशव्या, फोटो, पेंटिंग्ज, कपडे, खेळणी, दागिने. म्हणाल ते समोर हजर.

आणि माणसांच्या फक्त दोनच जमाती तिथे होत्या. विकणारा आणि विकत घेणारा. काळा असो वा गोरा, पिवळा असो वा सावळा. सगळे ह्या दोन जमातीत मोडणारे.

काही दुकानं गर्दीनं भरून चालली होती. इतकी लोकं की गर्दी आवरत नव्हती. काही दुकानं उदासवाणी रिकामी रिकामी होती. आलाच एखादा वाट चुकलेला तरी त्यालाही दूर पळवेल असा रिकामपणा. आणि सगळ्यांची धावपळ एकच. काहीतरी विकायचंय, काहीतरी विकत घ्यायचंय. विकणाऱ्याला अधिकाधिक किंमत हवी. विकत घेणाऱ्याला कमीत कमी किंमतीत ती वस्तू हवी.

आपण तरी दुसरं काय करतो म्हणा. माझी पहिली नोकरी सोडून मी दुसरी नोकरी पकडली तेव्हाचा इंटरव्ह्यू आठवला. घासाघीस. अगदी कोथींबिरीची जुडी विकत घेताना व्हावी इतकी घासाघीस. मी सांगायचं मी किती चांगला आहे, त्यांनी सांगायचं तू चांगला आहेस पण तितकाही नाहीस. कशाचा बाजार? कोण विकतोय आणि कोण विकत घेतोय? काय विकलं जातंय? वेळ? गुणवत्ता? छ्याट. मी विकल्या होत्या माझ्या प्रायॉरिटीज. माझ्यासाठी त्या लाख मोलाच्या होत्या. म्हणून मी मागत होतो लाखाचं मोल त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या दृष्टीने माझ्या प्रायॉरिटीज ची किंमत शून्य. म्हणून ते करत होते घासाघीस. काय विकून बसलो? रात्री नाटकांच्या तालमींच्यावेळी न झाडलेल्या स्टेजवरून नाकातोंडात जाणारी धूळ, गणपतीच्या गर्दीत आलेला वीट. मागच्याच महिन्यात आजीशी बोललो. ती बोलवत होती गणपतीला. यंदा पन्नासावं वर्ष आहे गणपतीचं मामाकडे. माझ्या आयुष्यातलं मामाच्या गणपतीचं पन्नासावं वर्ष विकून बसलो ना मी? बाजार. विकायचं आणि विकत घ्यायचं.

रस्त्यावरच आपली पंधरा वाद्य घेऊन बसलेल्या एकानं आपलं काम सुरू केलं आणि नकळत पावलं तिथं वळली. माणूस एक आणि वाद्य बरीच. आणि आळीपाळीनं तो एकटाच सगळी वाद्य वाजवत होता. बरीच लोकंही जमली तिथे. नकळत पायांनी ठेका धरला.

किती वाद्य वाजवतो हा एकटा? आपल्याला एकतरी आलं असतं तर काय बहार आली असती ना? शाळेत असताना तबला शिकायला जायचो. सर म्हणायचे हात चांगला बसतोय. रियाज करत राहा. मधे दहावी आली. दहावीला चांगले मार्क हवेतच. मग बारावी, आय. आय. टी., आय. आय. एम. आणि शेवटी अमेरिका, ह्या सगळ्यासाठी दहावी महत्त्वाची. तबला काय कधीही शिकता येईल. आय. आय. टी., आय. आय. एम. आणि अमेरिका ढगातच राहिले आणि तबला तेवढा हातचा गेला. काय कमावण्यासाठी काय विकलं? कसला बाजार?

त्या अवलियाला तिथेच सोडून मी पुढच्या दुकानाकडे वळलो. पुस्तकांचं दुकान. म्हणजे माझं आवडतं ठिकाण. आत बाबा आदमच्या काळातली काही पुस्तकं ठेवली होती. काही उगाचच चाळून बघितली. जुनी पुस्तकं बघताना माझी एक खोड आहे. पुस्तकाचं शेवटचं कोरं पान आणि पहिलं नाव घालायचं पान बघायचं. पहिल्याच पानावर लिहिलं होतं "सोमी" कडून "गोम्या" ला. आता सोमी कोण आणि गोम्या कोण? शेवटचं पान पाहिलं त्यावर बदामातून गेलेला बाण, पुढे सोमीचं नाव. बहुदा गोम्या सोमीच्या प्रेमात पागल झाला असणार. पुस्तकाचं नाव "घोस्ट टाऊन्स ऑफ ऑस्ट्रेलिया". बहुतेक सोमीचा दुसरा कोणीतरी सोम्या असणार.

प्रत्येक पुस्तकाला स्वतःचा असा इतिहास असेल नाही? अगदी इतिहासाच्या पुस्तकाला देखील. कुठल्या पानात एखादं मोरपीस, कुठे वर्षानुवर्ष ठेऊन विरलेलं पिंपळपान, कुठे सांडलेला पदार्थ. माझी शाळेची पुस्तकं कुठे असतील आता? असतील माझ्या कपाटात असतील अजूनही. म्हणजे आहेतच. ब्राऊन पेपर्स ची कव्हर्स. माझं नाव सांगणारं लेबल. घरी गेल्यावर चाळून पाहिली पाहिजेत एकदा. बरं झालं ठेवलीत नाहीतर कधीच त्यांचा बळी देऊन खाऱ्या दाण्याच्या पुड्या बांधल्या असत्या कुणीतरी.

चालत चालत पुढे आलो तर एक "स्कॉटिश बँड" आपले बॅगपाईपर्स लावत बसला होता. तबल्या तंबोऱ्यासारखे बॅगपाईपर्सही सुरात लावत असावेत. त्यांच्या बँडला पैशाची गरज होती. ही कला टिकवण्यासाठी. त्या वाद्यात काही वेगळीच मजा आहे. म्हणजे जुनं पण आवेशपूर्ण असं काहीतरी.

एक छोटा मुलगा आणि त्याच्या समोर त्याच्या बापाच्या वयाचा असावा असा माणूस. एकमेकांकडे तोंड करून बॅगपाईपर वाजवायला लागले. नजर एकमेकांच्या डोळ्यात. मानेच्या शिरा तट्ट फुगलेल्या. तो बापच असणार त्याचा. त्याच्या डोळ्यात कौतूक ओसंडून वाहत होतं. मुलाबद्दलचा अभिमान. आणि मुलाच्या चेहेऱ्यावर बापाच्या तोडीचं आपण वाजवू शकतो ह्याचं समाधान. शाळेत स्कॉलरशीप मिळाल्यावर माझ्या बाबांच्या चेहेऱ्यावर पण असेच भाव उमटलेले अजुनही आठवतात.

नकळत खिशाकडे हात गेला. जी सुटी नाणी हाताला लागली ती सगळी त्यांनी ठेवलेल्या टोपीत टाकली. मदत. मदत कसली? मी थोडं समाधान विकत घेतलं तिथे पैसे टाकून. माझ्या मनाला सुखावणारं समाधान. कदाचित माझा अहं कुरवाळणारं समाधान. मी काहीतरी परोपकारी केलं ह्याचं समाधान विकत घेतलं मी. शेवटी बजारच होता तो.

तासभर कधी निघून गेला कळलंच नाही. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत आलो. शेवटचं दुकान मागे पडलं. मी परत एकदा वळून बाजाराकडे पाहिलं. पुन्हा तीच माणसांची गर्दी दिसली. दोन जमातींत मोडणारी. विकणारी किंवा विकत घेणारी. घासाघीर करणारी. मी त्यांच्या खिजगणतीतही नव्हतो. मला मीच दिसत होतो त्यांच्यात. विकणाराही आणि विकत घेणाराही.

माझ्या पाठीमागेच एक रस्ता होता. रस्त्याच्या कडेला बाक होता. बाकावर एक आजीबाई बसल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला त्यांची चार-पाच वर्षाची नात. दोघींच्या काहीतरी गप्पा चालू होत्या.

तो बाजार त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. एक बहुदा त्यातून बाहेर पडली होती आणि एकीला अजून आत शिरायचं होतं.

- कोहम