Wednesday, July 02, 2008

पार्टी

तो - पार्टी कधी?

ती - कसली?

तो - कसली काय? प्रमोशन कुणाला मिळालं? मला की तुला?

ती - मला.

तो - मग पार्टी कुणी द्यायची? मी की तू?

ती - तू.

तो - कसली कंजूस आहेस तू. अगं तोंडावर तरी हो म्हण. माझ्या ऍड ऑन कार्डावरून पैसे भर हवंतर. म्हणजे मलाही समाधान आणि तुलाही.

ती - म्हणजे मी मारल्यासारखं करते तू लागल्यासारखं कर.

तो - चालेल.

ती - अरे? चिडतोस काय? देईन मी पार्टी.

तो - नको.

ती - चिडका बिब्बा.

तो - मी? तूच चिडकी बिब्बी. उगाच नाही हिंदीत बायकोला बिब्बी म्हणत.

ती - प्रॉब्लेम काय आहे? तोंड का वाकडं तुझं? खूश व्हायला पाहिजेस तू.

तो - कुठे काय? सगळं छान तर आहे. मला चांगली नोकरी. तुला चांगली नोकरी. मला प्रमोशन तुला प्रमोशन. मला गाडी, तुला गाडी. मला..

ती - हे रे काय? तुझं माझं, तुझं माझं. आपलं म्हण.

तो - बरं आपलं.

ती - मग छानच तर आहे सगळं. तू असा का झालायस? स्वतःची शेपटी पकडण्यासाठी गोलगोल फिरणाऱ्या भूभू सारखा?

तो - हं. झालोय खरा.

ती - पण का?

तो - लग्नानंतर माणसाचं असंच होतं.

ती - बरं. मग नव्हतं करायचंस लग्न? का केलंस?

तो - शादी के लाडू. खाये तो पचताये न खाये तो पचताये. म्हटलं, पचतवायचंच आहे तर खाऊन पचतवा.

ती - तुझं लाडकं वाक्य आठवलं.

तो - कोणतं?

ती - खाऊन माजा पण टाकून माजू नका.

तो - इथे थोडं उलटं आहे. शादी चे लाडू खाणारा कधीच माजत नाही. ज्याच्या नावाने लाडू खातो ते माजतात.

ती - म्हणजे मी?

तो - मी तसं म्हटलेलं नाहीये.

ती - न म्हणता, दुसऱ्याला जे ऐकायला आवडत नाही ते म्हणण्याची कला तूच जाणे. तुला काय वाटलं? मला पचतवायला होत नाही?

तो - तुझ्याकडे बघून तरी तसं वाटत नाही.

ती - अरे मी म्हणून तुला सहन करते. दुसरी कुणी असती ना, मग कळलं असतं तुला.

तो - काय कळलं असतं ते कळलं असतं. पण आता काय उपयोग? हे सगळं आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं असं आहे. आता कसं काय कळणार? कितीही कळावं असं वाटलं तरी.

ती - ओ काका विथ मिशा. तुमचं स्वप्नरंजन बंद करा. आणि तुमचा असा स्वतःची शेपटी पकडणारा कुत्रा का झालाय ते सांगा?

तो - कुत्रा? आता खरा शब्द बाहेर निघाला. सुरवातीला भूभू म्हणाली होतीस. आता एकदम कुत्रा झालो काय मी?

ती - हे बघ हा वाक्प्रचार आहे.

तो - आता बघा कशी मराठी तांडवनृत्य करायला लागलेय जिभेवर? एरवी एक वाक्य सरळ बोलता येत नाही. मला शिव्या द्यायला मात्र मराठी.

ती - असं काही नाहीये?

तो - मग कसं आहे?

ती - तुला मी कुठल्याही भाषेत शिव्या देऊ शकते.

तो - इथेच प्रूव्ह झालं की तू मला शिव्या देतेस.

ती - त्यात प्रूव्ह करण्यासारखं काय आहे? मी खुलेआम हे मान्य करते.

तो - पण का?

ती - का म्हणजे? तू जर शिव्या देण्यासारखं वागलास तर मी शिव्या देईन नाहीतर काय ओव्या म्हणीन? तुझ्या सन्मानार्थ.

तो - हे अती होतंय.

ती - बरं होवूदे. अर्धा तास झाला मी तुला विचारतेय प्रॉब्लेम काय आहे? असं तोंड वाकडं करून बसायला काय झालं तर तू उत्तर देत नाहीयेस. कोण करतंय अती? मी की तू?

तो - मी.

ती - हं. मग काय झालं तरी काय?

तो - कुठं काय?

ती - तोंड.

तो - ओह ते. दात दुखतोय.

ती - अरे माणसा, मग हे पहिल्या वाक्याला सांगितलं असतंस तर इतकं भांडण कशाला झालं असतं.

तो - भांडण? कसलं भांडण?

ती - अत्ता आपण केलं ते?

तो - नाही दात जास्तच दुखत होता. लक्ष उडवायचं होतं त्याच्यावरून म्हणून. असं म्हणतात की कसला त्रास होत असेल, आणि त्यापेक्षा अधिक त्रासदायक काही घडलं की पहिल्या त्रासाचा विसर पडतो. म्हणून.

ती - टू मच.

तो - थ्री मच.

ती - बस बोंबलत आता दात घेऊन. पार्टी बिर्टी काही नाही.

तो - अगं गंमत केली.

ती - मीही गंमतच करणारे आता. ज्या दिवशी तो दात उपटून घेशील ना,त्याच दिवशी माझी पार्टी.

तो - अगं पण.

ती - ...

तो - बरं.

----------------------------------------------------------
चिकटवा चिकटवी करणाऱ्यांसाठी तळटीप. कृपया कुठून उचललेत त्याची लिंक द्यावी. मलाच माझं गेलं पोस्ट निनावी फॉरवर्ड म्हणून आलं. आता बोला?
http://nileshgadre.blogspot.com
----------------------------------------------------------