Tuesday, December 02, 2008

वैऱ्याची रात्र

गुरवारचा दिवस. आठवडा संपायच्या जवळ घेऊन जाणारा. म्हणजे चांगलाच.

पण त्याच्या जीवाला ह्या विकेंडला उसंत असणार नव्हती. नव्या घरात तो शनिवारी शिफ्ट होणार होता. किती सामान पॅक करायचं राहिलंय, किती झालंय, मूव्हर्सना फोन करून कन्फर्म करायचंय, क्लीनरचा अजून फोन आला नाहीये. जुन्या घराच्या इमारतीचं मागचं गेट अजून उघडत नाहीये, ते नाही उघडलं तर वॉशिंग मशीन बाहेर कसं काढायचं? शनिवारी नाही जमलं तर पुन्हा पन्नास डॉलर्सचा भुर्दंड. घराला नावही अजून ठरलं नाहीये. एक ना अनेक शेकडो विचारांनी त्याचं डोकं भारून गेलेलं. काही चांगले तर काही त्रासदायक.

विचारांच्या गुंत्यात गुंतूनच त्याने आपला कॉम्प्युटर सुरू केला.

तो आल्याची चाहूल त्याच्या बॉस ला लागली.

" काय रे? तू मुंबईला चाललायस ना? तिथे भयानक घटना घडलेय"

गोऱ्यांना वाटलेली भयानक घटना म्हणजे एखादा ऍक्सिडेंट किंवा अजून काहीही छोटी मोठी घटना असू शकते म्हणून बॉसचं म्हणणं मनावर न घेता, त्याने न्यूज चॅनलची वेबसाइट सुरू केली.

-------------

"हॅलो"
" कोण? "
" बाबा, मी बोलतोय"
" हं"
" सगळं ठीक आहे ना? "
" हो. इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. सगळे सुखरूप आहेत. आम्हाला रात्री कळलं. उशीरापर्यंत आम्ही टीव्ही बघत होतो मग झोपलो. अजून चालूच आहे. किती वाजले?"
" इथे साडेआठ म्हणजे तुमचे तीन"
" बरं उद्या सकाळी फोन कर. मग बोलू. आता झोपतो"

एक निःश्वास.

------------

गुरवारची रात्र.

रात्रीचे दोन वाजलेले. समोर लॅपटॉप चालू. तो कानाला इअरफोन लावून. मराठी बातम्या चालू. तो अर्धवट झोपेत. अतिरेकी अजूनही तिथेच. बातम्यांत सांगतात की अजून एक दोन तासात ऑपरेशन संपेल.

त्याची बायको रात्री कधीतरी कानाचे इअरफोन काढून लॅपटॉप उचलून ठेवते.

त्याच्या डोक्यात त्याचं हाउस, की नरीमन हाउस, अतिरेकी, क्लीनर, मूव्हर, खोके, बंदुका, समुद्र, गेट वे ऑफ इंडिया, ताज, गॅरेज, न उघडणारा गेट, असं काहीसं.

-------

शुक्रवारची दुपार. ऑफिसात सगळं सुस्तावलेलं. आठवडा संपलेला. प्रत्येकाला घरी जायची घाई. मुंबई कुणाच्याच बापाची नसल्यानं, अडकलेल्या चार गोऱ्यांसाठी अर्धा एक अश्रू गाळून लोकं आपापल्या कामाला लागलेली.

पण त्याच्यासाठी मुंबई घर होती. ऑफिसातही मराठी बातम्या अव्याहत. अजूनही अतिरेकी तिथेच. गूगल चॅटवर एक मित्र.

" हाय"
" हाय. कसा आहेस? "
" ठीक आहे. "
" घरचे? "
" ठीक. "
" लेटेस्ट काय आहे"
" मारामारी चाललेय"
" भयानक आहे हे"
" तुला काय जातंय बोलायला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. तू बसलायस तिथे दूरवर जाऊन. इथे काही का होईना तुझं काय नुकसान? घरचे ठीक आहेत एवढं कन्फर्म केलं की तुझं काम संपलं"
" हं"

गूगल टॉक ऑफ. त्याचं डोकं भणभणायला लागतं. कॉफी. मूव्हरचा फोन येतो तेवढ्यात.

हुश्श. ह्याच्या लक्षात आहे. क्लीनरला फोन करून बघूया.

मराठी बातम्या. अजून धुमश्चक्री चालूच.

---------

" हॅलो"
" बोल"
" बाबा, कसं काय तिथे आता? "
" अजून चाललंय पण बाकी सगळं नॉर्मल आहे. आज आईही कामावर गेलेय. मीपण सकाळी फिरायला गेलो होतो. एअर इंडिआपर्यंतच जाऊ देतायत. पुढे पोलिस आहेत सगळे. "
" हं"

------------

" हे"
" हे"
" जाणारेस अजूनही इंडिआला"
" हो"
" भीती नाही वाटत? "
" स्वतःच्या घरी जायची कसली भीती? "
" टेक केअर अँड हॅव अ गूड वीकेंड. गुड लक विथ युअर मूव्हींग"

बायकोचा एसेमेस. क्लिनरने टाइम कन्फर्म केलाय.

--------

शुक्रवार संध्याकाळ. शेवटचं पॅकिंग चाललेलं. त्याचं सगळं लक्ष बातम्यांत. अचानक बातम्या बंद. तो काय झालं ते बघतो. इंटरनेट चं कनेक्शन स्विच ऑफ केलं बहुतेक. आता नव्या घरी तीन दिवसांनी सुरू होईल. टी. व्ही. पण काढून ठेवलेला. बातम्या कळायच्या कशा?

बॉक्सेस, सामान, धूळ, फर्निचर, मूव्हर्स, क्लीनर्स, जुनं घर सोडायचं दुःख, आणि मध्येच कुठेतरी आठवणीतली मुंबई, समुद्र, कबुतरं, अतिरेकी वगैरे वगैरे

---------

शनिवार दुपार.

सगळं काही वेळच्या वेळी झालेलं. मूव्हर्स वेळेवर आले. मदतीला सगळे मित्र त्याचे. सगळं सामान न तुटता न फुटता नव्या घरात येऊन पोचल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर.

एका मित्राचा फोन वाजतो.

" मारले. शेवटी मारले"
" काय? "
" अतिरेकी मारले. संपलं"
" किती लोक मेले असतील निरपराध? "
" दीडशेच्या आसपास."
" हं"
" बरं झालं बुवा आपण इथे आहोत. मुंबईचं लाईफ म्हणजे काय लाईफ राहिलं नाही. सकाळी बाहेर गेलेला माणूस संध्याकाळी घरी परत येईल की नाही ह्याची खात्री नाही."
" अरे पण"
" दहा अतिरेकी एवढा दारुगोळा बंदुका घेऊन होड्यांनी येतात एवढ्या लोकांना मारतात, पोलिसांना मारतात, काय डिफेन्स आहे की तमाशा? "
" .... "
" बरं ते जाऊदे. घर झकास आहे हं तुझं. फक्त बागेची जरा काम आहे तेवढंच"

उरलेला दिवस पोचलेलं सामान लावण्यात जातो.

नव्या घरातला पहिला दिवस संपतो. नव्या घरातल्या पहिल्याच रात्री झोपी जाण्याच्या प्रयत्नात असताना तो विचार करत राहतो. तो आनंदी आहे की दुःखी. स्वतःच्या घरात जाणं ही आयुष्यातली फार मोठी घटना. पण मुंबईवरचा हमला. त्यात मेलेले दोनशे लोकं. हे सगळं होत असताना जगाच्या दुसऱ्या भोकात सुरक्षित ठिकाणी वैयक्तिक सुखाचं सेलेब्रेशन करणं चांगलं की वाईट?

विचारांच्या गुंगीने झापड यायला लागते. आजूबाजूच्या निरव शांततेतून आलेला एखादा आवाज दचकवून जाग आणतो. घर आठवतं, मुंबई आठवते, ताज आणि ओबेरॉयही आठवतं. आणि दचकून उठल्यावर आपण अखेरीस आपल्या स्वतःच्या घरात येऊन पोचलो हेही आठवतं.

वैऱ्याची रात्र सरत जाते.

-------