"हा"मी - एक छानसं नातं.
"तो"मी - नातं?
"हा"मी - नात्याला नाव काय? नावंच नाही? शब्दकोश धुंडाळले तरी सापडलं नाही.
"तो"मी - नातं कसलं?
"हा"मी - एक तो. भारतातून श्रीलंकेत कामानिमित्त आलेला. एक ती. श्रीलंकन. तो ज्यासाठी आला त्या कामाचा आणि तिचा दूरान्वयेही संबंध नाही.
"तो"मी - बरोबर, मग कसलं नातं? कसलंच नाही.
"हा"मी - नाही कसं? तो आणि त्याची टीम जिथे बसतात त्याच मजल्यावर ती बसते.
"तो"मी - मी बसतो त्या माझ्या ऑफिसच्या मजल्यावर शंभर लोकं बसतात. काही नातं नाही माझं त्यांच्याशी. कुठल्याही ऑफिसच्या एखाद्या मजल्यावर कित्येक लोकं बसतात. त्यांच्यात कसलं आलंय नातं?
"हा"मी - हं बरोबर. पण तरीही नातं आहे. तो तिला काचेच्या खिडकीतून पाहतो आणि तीही कधीकधी. पण तिने त्याला पाहताना, त्याने जर तिला पाहिलं, तर मात्र ती पटकन आपलं डोकं कामात खुपसते.
"तो"मी - नीटसं कळलं नाही. पण नक्की दाल मे कुछ काला है. प्रेम वगैरे?
"हा"मी - नाही नाही. प्रेम नाही. तिचं तर लग्न झालंय.
"तो"मी - त्याचं?
"हा"मी - नाही. त्याचं नाही झालं.
"तो"मी - मग? विवाहबाह्य संबंध?
"हा"मी - काय शब्द पण शोधलाय? विवाहबाह्य संबंध. मऊ भात खाताना खडा दाताखाली यावा असा हा शब्द. विवाहबाह्य संबंध. नाही. तसलं काही नाही. तसा बाह्यात्कारी आतला बाहेरचा कसलाही संबंध नाही.
"तो"मी - म्हणजे नातंदेखील नाही.
"हा"मी - अंहं. नातं आहे. पण तोच तर लोचा आहे ना. ह्या नात्याला म्हणायचं काय?
"तो"मी - नुसतं एकमेकांकडे बघणं हे कसलं आलंय नातं?
"हा"मी - पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. कभी शाम जवाँ थी. मिल बैठे थे यार, आप मै और... तोच तो. बघ ना दारू देशांच्या सीमा जाणत नाही. कुठल्याही देशातले लोक कुठेही एकत्र येऊन टून होऊ शकतात. तसा तो आणि त्याच्या ऑफिसमधले श्रीलंकन मित्र. तमिळ इलम वरून घसरत घसरत गाडी पोरी बाळींवर येते. त्याचे श्रीलंकन मित्र त्याला विचारतात, आणि केवळ त्यांनी विचारलं, म्हणून आणि म्हणूनंच तो सांगतो. की त्या ऑफिसमधली सर्वात सुंदर मुलगी तीच.
"तो"मी - मग त्यात कसलं आलंय नातं? ऐश्वर्या राय सुंदर आहे. हे एक माझं मत मी दहा मित्रांना दहादा सांगितलं. मला खरं आवडलं असतं, पण माझं आणि ऍशचं नाही बुवा कसलं नातं.
"हा"मी - नाही. ऐश्वर्या राय ला सुंदर म्हणणारे एकटेच नसतो ना आपण. आणि आपण तिला सुंदर म्हटलं, हे तिला कळतही नाही. इथेच तर सगळी गंमत झाली. म्हणजे तो तिला ऑफिससुंदरी म्हणाला हे तिला कुणीतरी सांगितलं.
"तो"मी - मग काय त्यात घाबरायचं? सांगितलं तर सांगितलं.
"हा"मी - हं. पण इथेच तर नातं तयार झालं ना.
"तो"मी - कसलं नातं?
"हा"मी - सगळे शब्दकोश धुंडाळले तरी नाव नाही मिळालं.
"तो"मी - बरं पुढं? ती चिडली?
"हा"मी - नाही. ती नाही चिडली. त्याला वाटलं ती चिडेल. पण नाही चिडली.
"तो"मी - नक्की. विवाहबाह्य....
"हा"मी - नाही रे. तसलं काहीच नाही. तिला तिच्या ऑफिसख्या चिडवायच्या त्याच्यावरून. आणि त्याला त्याचे ऑफिसवंगडी तिच्यावरून. पण सगळं गमती गमतीत.
"तो"मी - असं गमतीत काही नसतं. कुणीतरी कुणालातरी कुणावरूनतरी चिडवत असेल आणि त्या कुणालातरी त्याचा राग येत नसेल ते ज्यांना चिडवतायत आणि ज्यांच्यावरून चिडवतायत त्यांचं प्रेम झालं असं समजावं.
"हा"मी - प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. डोंबलाचं प्रेम? ती शादीशुदा आणि तिच्या संसारात समाधानी. तो त्याच्या देशातल्या मुलींवर समाधानी. प्रेम बीम काही नव्हतं रे.
"तो"मी - अरे मग होतं काय?
"हा"मी - तोच तर ओरिजिनल प्रश्न आहे, की होतं काय?
"तो"मी - बरं मग पुढे काय झालं?
"हा"मी - काही नाही. त्याचा प्रोजेक्ट संपला. ते शहर सोडायची वेळ आली. सगळ्यांना भेटला तसा तो तिलाही भेटला जायच्या आधी. तिने त्याला ऑल द बेस्ट केलं. त्याने थँक यू म्हटलं. जसं तो उरलेल्या चार लोकांशी बोलला तसंच तो तिच्याशी बोलला. ते बोलून झाल्यावर आणखी बोलायचं काही शिल्लकच राहिलं नाही. तो वाक्य शोधत राहिला, पण मिळाली नाहीत. त्यामुळे त्याला जावंच लागलं. तिलाही वाटत होतं की त्याने अजून दोन वाक्य बोलावीत, पण ती त्याला सुचली नाहीत आणि तो गेला. दोन डोळ्यांच्या कडा, हलकेच ओल्या झाल्या.
"तो"मी - बरोबर. त्याला वाईट वाटलं असणार.
"हा"मी - त्याला नाही. तिलाही वाटलं. म्हणून दोन डोळे म्हटलं. एक तिचा, एक त्याचा.
"तो"मी - मग?
"हा"मी - मग काय? ईमेल मधून ते बोलत राहिले मधून मधून.
"तो"मी - सुचलं.
"हा"मी - काय?
"तो"मी - नात्याला नाव सुचलं.
"हा"मी - कोणतं?
"तो"मी - इ-मित्र.
"हा"मी - नाही रे. मित्र नाही. मित्र म्हणजे वेगळं, हे वेगळं.
"तो"मी - हे बघ, बुवा आणि बाई हे जर एकमेकांचे नातेवाईक नसतील, तर आपल्याला फक्त दोनंच नाती कळतात. प्रेम नसेल तर मैत्री आणि मैत्री नसेल तर प्रेम. ऍक्च्युअली मैत्री वगैरे सुद्धा झूटंच आहे. खरंतर प्रेम किंवा नथिंग.
"हा"मी - पण हे प्रेम नाही, मैत्री नाही आणि नथिंगही नाही. सगळे शब्दकोश धुंडाळले पण नाव नाही सापडलं.
"तो"मी - संपली स्टोरी?
"हा"मी - नाही. मग पुढे त्याचं लग्न झालं. त्याने तिला लग्नाला बोलावलं. ती आली नाही. शक्यच नव्हतं.
"तो"मी - संपली?
"हा"मी - जाऊदे. तुला ऐकायचंच नाही तर ...
"तो"मी - हं बरोबर, झालं सगळं रामायण आणि म्हणे रामाची सीता कोण? तुला त्यांचं नातं नक्की कोणतं हे कळलं की मला कळव.
"हा"मी - अजिबात नाही. प्रेम किंवा नथिंग ही दोनच नाती तुझ्यासाठी ठीक आहेत.
"तो"मी - मग सांग ना त्यांचं नातं कोणतं? प्रेम की नथिंग?
"हा"मी - नथिंग.
Subscribe to:
Post Comments (Atom)
19 comments:
Mast ahe samvaad...kharach aplyala relationships la "Label" chitkavaychi kiti savay aste na...label shivay relationship asu shakte he acceptch karat nahi apan.
निलेश भाय - सही है बाप!
मी सुरुवातीला हा मी, तो मी वाचायचा प्रयत्न केला - मग सोडुन दिलं आणि नुसतंच वाचत गेलो.
Somehow मला वाटत राहिलं कि तुला हे शेवटपर्यंत झेपणार नाही (मला तर अजिबातच नसतं झेपलं). पण उंचावर नेऊन सही सोडुन दिलयस तू!
आता घरी जाऊन बायकोचा मार खा.
सही है भिडू!!
मस्त लिहीलंयेस. आणि बाठेंची कॉमेण्टही सही.
घरी जाऊन बायकोचा मार खा! खी..खी..खी..खी... :-))
ultimate! wonder why we want to compartmentalize relations, especially between the different sexes.
aamhi college madhe ekaa mitraalaa asach mhantla hota - instead of "prem" or "nothing" - we had used the terms "bayko" kinva "bahin" :))))
tyaachi aathvan jhaali.
bathe chi comment suddha first-class!!
all the best when u face the music at home! :)
hmm malaa majhi ranful navachi kavita athavali...
pratyek natyala nav denyachaa hatt ka karato apan?
...Sneha (shodh swatahacha)
सुरेख!
कुसुमाग्रजांची कविता आठवली,
"नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सार्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
व्यवहार कोविदांचा होईल रोष, होवो
व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वहात जाई.
..."
तुमच्या लिखाणावरून तुम्ही उपमांच्या पाटया टाकल्या नसा्व्यात...
आणि असले तरी कुठे अडले???
प्रत्येकाचा perspective वेगळा, आवड वेगळी, प्रकत व्हायची पद्धत वेगळी...
कोणा बापड्याला भावना सरळ सरळ व्यक्त करता येत नाही म्हणून तो उपमा वापरतो...
चाहत मधले हे गाणे आवडणारे माझ्या माहितीतले बरेच आहेत..
ते सगळे थिल्लर आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही...
हा ’माझा’ view' होता..
श्रद्ध..’शब्द-पट’वाली..
"मग सांग ना त्यांचं नातं कोणतं? प्रेम की नथिंग?"... :-) Even I tried finding a word that could catch it. But in vain. Shevatacha 'Nothing' Khaas. :-D
Great.Felt like reading the post again and I did.:-)
Really a good one.
-Vidya.
sahi lihilay!!! flow,technique evrything!! Mast!!!!
तो मी नव्हेच हो!!
तरीसुद्धा मिळणाऱ्या माराची आठवण करून दिल्ल्यांबद्दल धन्यवाद.
नात्यांची गोची नेहमीचीच. ते कनफ्युजन लिहायचा विचार होता आणि अचानक हा फॉर्म सापडला. खरंतर संवादात्मक नाटकासारखं काही लिहायचं होतं. ते असं लिहून झालं. एनीवे, तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
निलेश भाय - सही है बाप!
मी सुरुवातीला हा मी, तो मी वाचायचा प्रयत्न केला - मग सोडुन दिलं आणि नुसतंच वाचत गेलो.
...असंच वाटलं म्हणून अभिजितची comment ढापली.
काय आहे, आपल्याकडे चांगल्या पोरी/पोराला चांगलं, especially पोरा/पोरी (अनुक्रमे!)म्हणण्याची सोयच नाही. लगेच "काय रे/गं" सुरुच होतं. अरे कुणी चांगलं दिसतं तर दिसतं, झडझडून म्हणा नां तसं....नाही तर शोधत बसा नातं
nothing!! good one!
Kahi farsa nahi awadla yaar - jara ajun rangwaycha hotas...
@ bathe: Bathe saheb tumcha blog vachnyachi iccha ahe. pan majhaykade invite nahi. majha email id: sarolkar.anand@gmail.com
jamala tar invite pathava.
(Sorry...hee jaga nahi hya commentchi pan I don't know a better place)
wow! सही लिहीलंयस...
मला पण ’नात्यास नाव अपुल्या...’ आठवली.
अगदी आवडलं.छानच लिहीलंस!
Very nice ...I especially liked concept and format.
Keep it up.
Atishay Chaan Lihile Aahe.
Ani mast khup rojchya topic var mast view ni lihilay.
---------
Dhanashree V Phatak
Khup chaan lihil ahe.
Kharach pratyek natyala nav nahi deta yet aplyala. :)
Post a Comment