Tuesday, June 07, 2011

अपूर्णा

पांढरी खोली एकदम शांत पहुडलेली होती आणि मीही पांढऱ्या खाटेवर. मालक नसलेलं कुत्रं जसं येणाऱ्या जाणाऱ्याची तमा न बाळगता शेपटी हालवत बसलेलं असतं अगदी तशी.

खालच्या लाकडी फ्लोअरवर कुणाच्या टोकदार बुटांचा आवाज झाला तेवढाच. ओळखीचा आवाज, ओळखीचा चेहरा. कुणाचा? कुणाचाही असेना का? आपलं ते शांततेचं चाललं होतं. कुणाला बोलू नका पण खरं सांगायचं तर मला शांततेचाही आवाज येतो. सगळं शांत असताना कानात कुईं करून आवाज येतो. येतो की नाही? अपर्णाला वाटतं माझ्या कानात प्रॉब्लेम आहे. तिच्यासाठी तीन वेळा डॉक्टराकडे पैशाचा पाऊस पाडून आलो, पण तरीही येतोच. अर्थात तिला आता मी सांगितलंय की आवाज यायचा बंद झालाय म्हणून आणि तसाही आला थोडा शांततेचा आवाज तर बिघडलं कुठं. तेवढीच जरा ओक्या खोलीतली बोकी वर्दळ.

बाकी अपर्णानं काळजी करणं काही चुकीचं नाहीये. दोन वेळा शिंक आली की तिसरी यायच्या आत डॉक्टरांच्या दवाखान्यात पोचणारी ती. ती डॉक्टरकडे जा म्हणून माझ्या मागे लागली नाही तरच नवल. वर तिला म्हटलं डॉक्टरकडे पैसे टाकणं बंद कर तर मलाच बोलेल, मला काही तिची काळजीच नाही म्हणून. काळजी नाही कशी? आहे म्हणजे आहेच, पण आठवड्यातून दोनदा ती डॉक्टरकडे गेली तर अजूनच काळजी वाटणार की नाही? त्यात त्या डॉक्टरचं काही खरं नाही. उंचापुरा, नाकी, डोळी नीटस. त्याला काय अपर्णासारखी देखणी पेशंट नक्कीच आवडत असणार. मग तोही देत असेल थातुर मातुर औषध म्हणजे हिचं आपलं तिथे जाणं चालूच.

जाऊदे. मी सांगितलं तर तिला समजायचं नाही. पण एकंदरीत डॉक्टरांची जमात तशी लबाडंच. तो कानाचा डॉक्टरही तसाच. अरे हो कानावरून आठवलं. ते कानातलं सोनाराकडून आणायचं राहिलंय. पॉलिश करायला दिलंय अपर्णानं. आज आणायचं होतं की उद्या? बहुतेक आजच. आता माझी काही खैर नाही. ह्या बायकांचं ना मला काही कळतच नाही. म्हणजे बघा, कानातलं, नाकातलं, गळ्यातलं ही सगळी कसली लक्षणं आहेत? बैलाच्या नाकातून वेसण घालतात, त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी. गुलामगिरीची प्रतीक आहेत हे दागिने वगैरे. अपर्णासारख्या पुरोगामी बाईलाही ती आवडावीत म्हणजे कमाल आहे.

पण काय करा बाबांनो, पुरुषाचा नवरा झाला की त्याचा वेसण न घातलेला बैल होतो. मग तो आपल्याच शिंगानं आपली पाठ खाजवायचा प्रयत्न करीत राहतो. शिंग पाठीला लागत नाही, खाज काही जात नाही. मग काय करेल, फिरत राहतो बिचारा गोल गोल गोल गोल खळात. आणि बायको? बायको नवऱ्याची मजा तेवढी बघत राहते. आणि वर धान्य मळून घेते ते वेगळंच.

हो हल्ली धान्याच्या दारूवर लक्ष केंद्रित करणारेत म्हणे. कालच पेपरात वाचलं. करा लेको, धान्याची दारू करा, ऊसाची दारू करा, अजून कसली करा. ती दारू पिऊन लोकं होऊदेत दारुडे. बरं, दारुड्या लोकांची गरज सर्वात जास्त कुणाला असते सांगा? म्हणजे तुम्हाला, मला, त्यांच्या घरच्यांना, कुणाला? नाही ना ओळखलंत. अहो व्यसनमुक्ती केंद्रांना. दारुडेच नसतील तर व्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांनी करायचं काय? बरं प्रश्न नुसता त्यांनी करायचं काय हा नाही. प्रश्न आपण दारुड्यांवर केलेल्या उपकाराने स्वतःच फुलून जाऊन स्वतःची कॉलर ताठ करण्याचा आहे. तरी मी अपर्णाला सांगत असतो. कॉलरवाले खादीचे पंजाबी ड्रेस घालत जा म्हणून.

कॉलरवले पंजाबी ड्रेस? नवी फॅशन आहे की काय आज कालची ही. अपर्णाला विचारून पाहिलं पाहिजे. खादीच्या फॅशन्स तिला चांगल्या माहीत असतात. खादीचे सदरे, खादीचे लेंगे, खादीच्या टोप्या. परवा असंच झालं, काहीतरी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी वगैरे. म्हणून म्हणे खादी घालावी. म्हटलं हे लेंगे सदरे वगैरे ठीक आहेत, पण खादीची अंतर्वस्त्र कुठे मिळतात? मिळतात का? नाहीच मिळत. मग हे खादीवाले घालतात काय आत? घालतात की घालतंच नाहीत? त्यावर उत्तर नव्हतं तिच्याकडे. म्हटलं कसलीही घाल, काढणार तर मीच आहे ना.

कसलं कसलं रोमँटिक बोलून गेलो मी. पण अपर्णाचं दुसरंच. रागावली. फुरंगटून बसली. फुरंगटून. जबरी शब्द आहे. हगल्या पादल्या फुरंगटून बसायला अपर्णाला आवडतं. आवडतं म्हणजे तिचा छंदच आहे तो. तिला म्हटलं डॉक्टरकडे जाणं कमी कर, लोकं काही बाही बोलतात बसली फुरंगटून. घराकडे लक्ष दे, लोकांची व्यसनं मग सोडव, बसली फुरंगटून. आता घरी आली आणि तिची 'नाकातली वेसण', आपलं ते हे, 'कानातलं कानातलं' मी आणलेलं नाही हे लक्षात आलं की बसेल फुरंगटून. कानातलं कानातलं? काहीतरी चुकल्यासारखं नाही का वाटत?

असूदे. चुका काय माणसाच्या होतंच असतात. चुका माणसांच्या होतात, चुका बायकांच्या होतात. नको त्या वेळी नको ती चूक झाली की त्यातून अजून माणसं आणि बाया तयार होतात. तयार झालेल्या हा माणसांच्या आणि बायांच्या अजून चुका. चुकांवर चुका. चुकांवर चुका. उंच चुका, बुटक्या चुका, गोऱ्या चुका, काळ्या चुका. जाड चुका बारीक चुका. अपर्णाला कानी कपाळी ओरडून सांगितलं अचूक काहीच नसतं ग या जगात. असतात त्या फक्त चुकाच. नाही पटलं. दारुड्यांची चुकलेली आयुष्य सुधारणं जास्त महत्त्वाचं आहे का?

अजून कशी आली नाही ही? गेली की काय त्या सोनाराकडे कानातलं आणायला? कानातलं? वेसण, बैल. खाज. होय खाज, मग शिंगं, माझी. खाज माझी, पाठही माझीच. सोनाराकडे नसेल. गेली असेल त्या डॉक्टराकडे. उंचा, पुरा, नाकी डोळी नीटस. खादीचा कॉलर नसलेला सदरा, खादीचा लेंगा आणि खादीची. पण ती तर मी उतरवणार. डॉक्टर तुला सोडणार नाही मी. परवा माझ्या कानात मळ काढायच्या बहाण्याने सुरा खुपलास आणि माझ्या कानाचा पडदा फाडलास हरामखोरा. आता कसा ऐकणार मी शांततेचा आवाज?

खालच्या लाकडी फ्लोअरवर पुन्हा कुणाच्यातरी टोकदार बुटांचा आवाज. ओळखीचा आवाज, ओळखीचा चेहरा, खादीचा कुर्ता, खादीचा लेंगा, सोन्याचे कानातले, नसलेली कॉलर. कोण ही?