Wednesday, November 05, 2008

मित्रा हॅप्पी दिवाळी

दोन अडीचशे लोकं जमलीत. बाया माणसांनी ठेवणीतल्या साड्या, दागिने बाहेर काढलेत. पुरुषांनीसुद्धा ठेवणीतले कपडे. पोरा टोरांना ह्या दिखाऊपणाशी काहीही देणं घेणं नाही. ती आपली इकडून तिकडे सैरावैरा पळण्यात गुंतलेली आहेत. बाया नसलेले बाप्ये आणि बाप्ये नसलेल्या पोरी एकमेकांना शोधणाऱ्या नजरा भिरभिरवतायत.

टेबला टेबलावर दिवाळीचा फराळ मांडून ठेवलाय. कडाक करून मोडणारी पण जिभेवर विरघळणारी चकली. रव्या बेसनाचे लाडू, खमंग चिवडा ह्यांचे बकणेच्या बकणे भरले जातायत. सुखावलेल्या जिभा बनवणाऱ्या हातांचं कौतुक करतायत.

मध्येच कुठंतरी, कुणाच्यातरी साडीचं कौतुक. कुठेतरी जगाच्या खिशाची चिंता. कुठे काय अन कुठे काय?

एकंदरीतच दिवाळी जोरात साजरी होतेय.

दिवाळीनंतरच्या शनिवारी.

होय शनिवारीच. कारण इथे सुट्टी कुठे असते लोकांना दिवाळी साजरी करायला? मग सवडीने करायची. शनिवारी हक्काची सुट्टी ना. मग बनवायचं एक आपलं विश्व. म्हणायचं एकमेकांना शुभ दीपावली. खायचा फराळ अन वाजवायचे फटाके.

लाथ मारीन तिथं पाणी काढीन, म्हणत परदेशी येऊन राहिलेली ती सगळी, हव्या त्या दिवशी दिवाळी नाही साजरी करू शकत? नक्कीच. म्हणून दिवाळीनंतरच्या शनिवारीही दिवाळी होतेय साजरी.

दिवाळी बिवाळी सब झूट आहे मित्रा. आपण दिवे लावू तेव्हा दिवाळी आणि आपण फटाके वाजवू तेव्हा दिवाळी. काउन्सिल ची परमिशन घेतली का राव? नाहीतर फुकट खिशाला भुर्दंड. लाथ मारीन तिथं पाणी काढीन पण ते त्या मूर्ख इनिस्पेक्टरला कोण समजावणार. त्याला काय माहीत आम्ही फटाके लावतो तेव्हा दिवाळी असते ते.

जरा थंड घे मित्रा. नाहीतर हा लाडूच खा ना. बघ कसं मस्त वाटेल. एकदम देशात गेल्यासारखं. देशातल्या नरक चतुर्दशीची पहाट उगाचच अंगावर काटा आणेल मित्रा, कुठंतरी गुदमरत घेतलेला फटाक्याचा वास आठवेल मित्रा. घे हा लाडू खाच.

मनामनात चाललेला हा मित्रा मित्रांचा खेळ. खेळ मांडियेला वाळवंटी बाई, नाचती वैष्णव भाई रे. खेळ मांडियेला वाळवंटी बाई, नाचती वैष्णव भाई रे.

मित्रा चकली? मित्रा चिवडा? मित्रा शुभ दीपावली. मित्रा हॅप्पी दिवाळी. मित्रा रांगोळी. भिजवलेल्या तांदळाच्या पिठाची रांगोळी माणूस मेल्यावर घालतात भोसडीच्यांनो. लाडू खा मित्रा. थंड घे मित्रा.

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया....

मेंटल मास्टरबेशन. काल्पनिक मैथुन आहे हा सगळा. जे अस्तित्वातच नाही ते असल्याचा आभास निर्माण करायचा आणि सांगत राहायचं. सुख मिळतंय मला, सुख मिळतंय.

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती ह्या. नाचती वैष्णव भाई रे. लाडू, चिवडा, फटाके, कंदील, भुईनळे, कौन्सिलची परवानगी, मैथुन, दिवाळी.

अरे हट. हा एक लाडू खातोच.

मित्रा हॅप्पी दिवाळी.

हॅप्पी दिवाळी.

11 comments:

sjoglekara said...

काल्पनिक असली तरी सुख देतेच ना मग दिवाळीच ती।

Bhagyashree said...

khara sangu same asach vatla mala ya veli.. gharat bharpur kay kay karu ho.. pan baher gelyavar kay? shantata..

narak chaturdashila jorrat uthlo pahate. utana,abhyang snan.. pan to utsah tevdyapurtach tikla..

pudhche 2 diwas indiatli diwali athvnyat geli. ani ithlya weekend chya diwali shi compare karnyat. pan tuka mhane tyatlya tyat sarkha tyatlya tyat anand manun ghetla, zala.. !

happy diwali! :|

प्रशांत said...

हॅपी दिवाली

प्रिया said...

*sigh*

Sumedha said...

तू नवीन नोंद लिहिली आहेस अशी "बातमी" पोचली! उत्साहानी बघते तर काय! Why so cynical, my friend?

Mints! said...

gele 10 varshe diwali bharatabaher sajari karatey aani sagale christmas deshat. pan utaka tras nahi karun ghet kaaran aahe he ase aahe he samajun ghetaley.

diwali/ gaNapati aapaapalya paddhatine sajare karato. maajha mala tari anand hotoch. aapan deshabaher aahot mhanun diwali hot nahi mhanun suskare takayache ani asel nasel tya utsahavar pani Taakayache. he jamalech nahi kadhi. jashi jamel tashi me tarI sajarI karate agadI utsahane. agadI ekaTine pan keliy me diwali ti yaach vicharane.

Sonali Deshpande said...

१००% पटलं.... असंच झालं होतं... मागच्या ४ दिवाळ्या आमच्या शनीवार रवीवार बघून साजर्‍या झाल्या.. यंदाची दिवाळी मात्र मस्त आई पपांसोबत आणि आत्या मामा मंडळीं सोबत निवांत ज्या दिवशीची त्या दिवशी अशी साजरी केली... काय मजा आली!
दिवाळीच्या अनेकोत्तम शुभेच्छा!

Samved said...

असो!

ऍडी जोशी said...

या परत.

Sangram said...

मित्रा ... जे काही बोललास ते सगळं मान्य ... पण ईतका त्रागा वगैरे काही होत नाही बाबा!

थंड घे ... :)

Samved said...

निलेशराव, लिहा की पुढे...किती काय काय सुरु आहे जगात