Tuesday, June 21, 2016

कॉफी टेबल

फर्निचरच्या मोठ्या शोरूमच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात सई आणि सदा काचेच्या कॉफी टेबलावर कोपरं टेकवून एकमेकांकडे पाहत बसलेले. बाजूला उभी असलेली सेल्स गर्ल, पलीकडचा सोफ्यावर आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी असल्यासारख्या उड्या मारणारा छोटा मुलगा, बेडच्या कडेला बसून कोणता बेड घ्यायचा ह्यावर हुज्जत घालणारे नवरा बायको, ह्यांचं अस्तित्वच त्यांच्या लेखी नसायचं. त्यांचं छोटंसं घर, नवं आणि त्यातल्या हॉलमध्ये एकदम सेंटर पीस असावं असं हे कॉफी टेबल एवढंच त्यांच्या गावी

- हेच घेऊ, तो 
- हे छान आहे, पण महाग आहे.
- मग काय झालं? एकदाच आपण टेबल घेणार मग चांगलं घेऊया.
- पण बजेट?
- आवडलंय ना तुला?
- हो.
- घेऊया मग.

----

त्यांचं नवं घर, त्याचं असणं ह्या टेबलाच्या सभोवतालचं. सर्व घराच्या मध्यात हे टेबल आणि त्याभोवती त्यांचा संसार.  सदाने रात्री उशीराने घरी यायचं आणि बॅग, चावी, पैसे, पाकीट टेबलावर पसरायचं. मग सईने येऊन त्याला ओरडायचं.

- अरे किती हा पसारा?
- टेबल असतं कशाला? सामान ठेवायलाच ना? सदाने प्रतिवाद करायचा.
- नाही टेबल असतं घर  बांधून ठेवायला, त्याच्याभोवती बसायला, गरम गरम कॉफीचे मग ठेवून तासंतास गप्पा मारायला, तंगड्या पसरून पुस्तकं वाचायला. हे असलं सामान टाकून माझं टेबल फुकट घालवायचं नाही. 
- माझ्यापेक्षा तुला टेबल आवडतं? ह्या टेबलावरचं सामान उचलून दुसऱ्या कुठल्यातरी टेबलावर ठेवत सदाने हे टेबल रिकामं करायचं.
- नाही,
- मग मला किती ओरडतेस ह्या टेबलापायी.
- मग मी काय टेबलाला ओरडू?
- आता तू काही करू नकोस. असं म्हणत त्यानं त्यानं आपली तर्जनी तिच्या ओठावर ठेवायची.

मग पुढे कुणीच काही बोलायचं नाही. टेबलानं तेवढं गालातल्या गालात हसायचं.

------

- कोण कडमडलंय एवढं रात्रीचं? 

पाठ खाजवत अर्ध्या झोपेत सदानं उठून दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडल्यावर बाहेर त्याचं पूर्णं मित्रमंडळ बघून "आ" करून पाहायचं. सर्वांनी त्याला हॅपी बर्थ डे विश करायचा. टेबलावर कापलेला केक खवून आपापल्या घरी निघून जायचं. मग फक्त ती, तो आणि ते उरायचं. 

- कसं जमतं तुला हे सगळं. सदाने सईला विचारायचं.
- जमवलं की जमतं, टेबलावरचा उरलेला केक उचलत तिनं म्हणायचं.
- माझ्या डोक्यातही आलं नसतं.
- डोकं असेल तर येईल ना?
- हं.

हॉलमधले दिवे बंद करून झोपायला जाताना, केकचा एक छोटासा तुकडा टेबलवर पडलेला त्याला दिसायचा, तो तुकडा उचलून कचरापेटीत टाकायचा सोडून सदानं तो तसाच तोंडात टाकायचा आणि तळव्याने टेबलावरचा डाग पुसून टाकायचा आणि तळवा शर्टावर घासत स्वच्छ करायचा. हळूच सई तर पाहत नाही ना हे बघून झोपायला जायचं.

------

- सदा अरे बाळाला असं टेबलावर ठेवू नको, त्याला थंडी वाजेल. सईने सदाला ओरडायचं
- अगं असूदे एकंच मिनिट. काचेच्या टेबलावर कसला सही फोटो येईल.
- किती हालतोय बघ तो, पडेल.
- असा कसा पडेल मी आहे ना. 
- बस आता. उचल त्याला.

उचलता उचलता बाळाने शू करायची आणि आपल्या लंगोटासकट टेबल भिजवून काढायचं. सईने सदाला खूप झापायचं आणि कपडे बदलायला बाळाला आत घेऊन जायचं. सदानं मग पोतेऱ्याने टेबल साफ करायचं. 

------

- सई, लवकर बाहेर ये. सदानं उड्या मारत मारत तिला बोलवायचं
- .... समोरचं दृश्य बघून सईनं निःशब्द व्हायचं.

बाळाने काचेच्या टेबलाला धरलेलं असायचं आणि त्याच्या आधाराने ते उभं राहिलेलं असायचं. एका निर्णायक क्षणी टेबलाचा आधार सोडून बाळाने पहिलं स्वतंत्र पाऊल टाकलेलं असायचं. 

- सदा, आपण आता टेबल इथे ठेवायला नको.
- का गं?
- बाळ आता चालायला लागेल, खेळेल धडपडेल. उगाच त्याचं डोकं त्या टेबलावर आपटेल, टेबलाचे कोपरे लागतील त्याला.
- नाही काही होणार. असूदे आहे तिथे. 

पण सईने त्याचं ऐकायचं नाही. मग सदाने मोठ्या कष्टाने ते टेबल उचलून दुसऱ्या खोलीत टाकायचं. टेबल हिरमुसलं होऊन ठेवल्या जागी बसून राहायचं. 

-------

- करू ना सही नक्की? जमिनीवर गुडघ्यावर बसून टेबलवर ठेवलेल्या पेपरकडे पाहत सदाने सईला विचारायचं.
- कर आता. ठरवलंयस ना?
- हो. पण हे घर सोडायचं, हे शहर सोडायचं आणि दुसरीकडे जायचं खूप जीवावर येतंय गं.
- हं. पण अशी संधी पुन्हा मिळणारय का? यायचं असेल तर परत येऊच की इथे.

त्याने नेहमीप्रमाणे तिच्या शब्दांनी आश्वस्त व्हायचं आणि टेबलावरच्या कागदावर सही करून टाकायची. 

-------

- ह्या शहरात येऊनही एक वर्ष झालं. सोफ्यावरून टेबलापर्यंत पाय पसरत त्यानं म्हणायचं.
- हो ना. पण आपलं सामान सगळं आपण घेऊन आलो म्हणून बरं झालं.
- अगदी त्याच घरात असल्यासारखं वाटलं. सेटल होणं खूप सोपं गेलं.
- हं.

टेबलही आता नव्या घरात रमलेलं असायचं.

-------

- अरे किती गोंधळ घालताय रे? सईने किचनमधून मैत्रिणींच्या घोळक्यातून बाहेर हॉलमध्ये खेळत असलेल्या मुलांवर ओरडायचं.
- वा.... बाल्कनीमधून सदाने उगाचच ओरडल्यासारखं करायचं.

मुलांच्या आरडा ओरड्याने घर भरून जायचं.

मग एकदम खळ्ळ असा आवाज. सईने घाबरून बाहेर  धावत यायचं, सदानेही तसंच करायचं. कुठलंतरी काहीतरी टेबलावर आदळलेलं असायचं आणि काचेच्या टेबलाचे दोन तुकडे झालेले असायचे.

सदानं ते तुटकं टेबल घराबाहेर नेऊन ठेवायचं. मुलांचे खेळणं पुन्हा सुरू झालेलं असायचं. सदाने आत येऊन सईकडे बघायचं. त्याच्या डोळ्यातला ओलावा फक्त तिलाच दिसायचा. तिनं त्याला डोळ्यानंच धीर द्यायचा आणि दोघांनीही खोटं हसू तोंडावर आणत पाहुण्यांना सामोरं जायचं.

बाहेर पडलेल्या टेबलानं असहायपणे तसंच पडून राहायचं. 

-------

- कोहम

Monday, June 13, 2016

जळ (2)

जळ (१) गाडी तशीच गेटपाशी सोडून पुन्हा गुडघाभर पाण्यातनं चालत आम्ही जिन्यापाशी पोहोचलो. पाऊस आताशा उतरला होता पण पाणी उतरलं नव्हतं. तसेच ऑफिसात गेलो. माझं ऑफिस आहे छोटंसंच. बाहेर मुलांना बसायला थोडी जागा आणि पलीकडे माझं केबिन. अभ्राला आत जाऊ दिलं आणि तिच्यामागे मी आत शिरलो. ओल्या कपड्यांमुळं तिचं आखीव  रेखीवपण चांगलंच डोळ्यात भरत होतं. "काका, आत येताय ना? पाठी वळून न बघताच ती म्हणाली." पाठीला डोळे तर नसतील ना हिच्या? माझ्या मनात आलं. 
"हा काय, आलोच." तिच्यामागे मी आत शिरलो आणि ऑफिसचा दरवाजा लावून घेतला.  "आज कुणी नव्हतं का आज ऑफिसात?" "नाही. सगळे बाहेरंच होते आज. मीही घरी निघालोच होतो, पण..." "माझ्यासाठी थांबलात." "हो. हा असा पाऊस आणि तू नवखी इथे. म्हणून थांबलो" " आणि अडकलात माझ्याबरोबर" माझ्याकडे रोखून बघत ती म्हणाली. तिच्या डोळ्यात आव्हान होतं की आवाहन होतं कोण जाणे. कोड्यात बोलण्यात अभ्राचा हातखंडा असल्याचं मला इतक्या दिवसाच्या तिच्या ओळखीनं माहीत झालेलंच होतं. पण तिचं असं माझ्याशी आता बोलणं मला थोडं ऑकवर्ड करत होतं. " असं का म्हणतेस? माझं कर्तव्यच आहे ते" काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलून गेलो. " हो ना. वाफेला पोटात घेऊन गर्भार व्हायचं ढगांचं कर्तव्य. ढग असा फुटला की पृथ्वीला झोडपून काढायचं पाण्याचं कर्तव्य, नाल्यांची साफसफाई न करण्याचं आपल्या राजकारण्यांचं कर्तव्य, साचणाऱ्या पाण्यात घरी जाण्याऐवजी तुम्हाला फोन करणं हे माझं आणि मी फोन केला म्हणून इथे थांबणं तुमचं. आपण सगळे आपापली कर्तव्यच तर पार पाडतोय" असं म्हणून ती हसली. तिच्या सौंदर्याला एक वेडसर बाज आहे. ह्यामुळेच झाला असेल का हिचा घटस्फोट? " काका, खूप थंडी वाजतेय हो" तिनं विषय बदलला.  " ते झालंच. तू पूर्ण भिजलेयस" असं म्हणत असताना भिजलेल्या तिला नखशिखान्त निरखायची संधी मी सोडली नाही. " तुम्हीही भिजलायत काका" काका वर खास जोर देऊन ती म्हणाली. मला थोडंसं वरमल्यासारखं झालं. " हो पण. मी ठीक आहे. तू मात्र.... " " छत्री कुठे ठेवू?" तिच्या हातातली छत्री तशीच खालच्या लादीवर पाऊस पाडत होती. " बाहेर ठेव." ती छत्री ठेवायला वळली. ती परत आत आली तोवर मी केबिनमधून एक टॉवेल घेऊन बाहेर आलो. " हा घे" टॉवेल तिच्या हाती देत मी म्हणालो. " अय्या टॉवेल? ऑफिसात? " काहीतरी प्रचंड आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडल्यासारखी ती म्हणाली. " हो असतात. एकदोन." " एक की दोन? " "... " " नाही. तुम्ही पण ओले झाला आहात म्हणून विचारलं. एकंच असेल तर तुम्हाला ओलं राहावं लागेल किंवा हा टॉवेल वापरावा लागेल? " " तू काळजी नको करू. आत अजून एक आहे. " " बरं काका मी थोडं केबिन वापरू का? माझ्याकडे माझे कपडे आहेत. रोज संध्याकाळी जिमला जाते ना तिथे वापरायचे. तुमची हरकत नसेल तर मी कपडे बदलते." " माझी काही हरकत नाही. पण एक काम कर. तू इथेच कपडे बदल. मी केबिनमध्ये जातो. दार लावून घेतो. तुझं झालं की बोलाव मला. "
तिच्या होकाराची वाट न पाहता मी आत गेलो आणि दरवाजा लावून घेतला. कपाटातला दुसरा टॉवेल काढून मी माझे ओले झालेले पाय पुसायला लागलो. टेबलवर प्रिया आणि विद्याचा फोटो ठेवलेला होता. पाय पुसण्यासाठी मी टेबलवर बसलो आणि माझं लक्ष समोर गेलं. माझ्या केबिनचा दरवाजा हा वन वे मिरर आहे. आतून बाहेरचं सर्व दिसतं पण बाहेरून आतलं काहीच दिसत नाही. मी अभ्राला आत का नाही येऊ दिलं? पण हे मी मुद्दाम केलेलं नाहीये, मी स्वतःला समजावलं. पण नजर दरवाज्यावरून हटत नव्हती. तिचं ते खानदानी रूप, पाण्याने भिजलेले पण टॉवेलने पुसल्यावर कुरळे झालेले केस, नितळ त्वचा, हरवलेले डोळे. कपड्यांची आवरणं निघाली, त्याही स्थितीत आड येणारा टॉवेल नकोसा वाटायला लागला.  नजर तिथून हटवावी असं अनेकदा वाटलं पण डोळे काही हालले नाहीत. कानशिलं गरम झाली. बाहेर जावं आणि तिला आवळावं असं मनात आलं आणि दुसऱ्याच क्षणाला असे विचार आपल्या मनात कसे आले असं वाटून वरमायलाही झालं. नवे कपडे चढले आणि नवी अभ्रा दिसायला लागली. आता ती अधिकच आकर्षक दिसत होती. तिने केस पुन्हा एकदा पुसले, हलकेच झटकून पाठीवर सोडले आणि ती केबिनच्या दिशेने वळली. तिला आत येऊ देणं योग्य नव्हतं, मी लगबगीने दरवाज्यापाशी गेलो आणि तिने नॉक करताच ताबडतोब दरवाजा उघडून बाहेर गेलो. " काका, मी दरवाजा नॉक करायची वाट पाहत बसला होतात की काय? " " नाही तसं काही नाही" " मग  क्षणार्धात कसा उघडलात? " ती हसली. " ..... " " इटस ओके काका, एवढे कॉन्शस कशाला होताय? मी नाही जाणार तुमच्या केबिनमध्ये. काही सिक्रेटस आहेत का आत? " " नाही. तसं काही नाही. पण क्लायंट्सची माहिती असते. प्रायव्हसी लॉ. यू नो. " मी उगाच काहीतरी बोलून गेलो. " हो ते तर झालंच. आमच्या कंपनीतही ते खूप स्ट्रिक्ट आहे. " " बस ना" समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत मी तिला बसायला सांगितलं. आता कपड्यानं झाकलेलं शरीर मघा कसं दिसत होतं ह्याचा विचार मी करत होतो. " काका तुमच्याकडे आहेत का ग्लास इंडस्ट्रीमधले क्लायंट्स? " तिनं विचारलं. " नाही. का बरं? " " अहो मी ग्लास कंपनीतच कामाला आहे.  त्याचाच तर सेल मी बघते. वन वे मिरर्स असतात ना, ते माझं स्पेशलायझेशन आहे. आमच्या डिस्ट्रिब्युशन चॅनेल्सचं सगळं मीच हँडल करते. " "... " मी फक्त चमकून तिच्याकडे पाहिलं. माझ्या ऑफिसच्या दरवाज्यावर वन वे मिरर आहे हे तिच्या लक्षात नाही आलं? " असं काय बघताय काका? वन वे मिरर. म्हणजे आतून बाहेरचं सगळं दिसतं पण बाहेरून आतलं काहीच दिसत नाही. तसं. आलं का लक्षात तुमच्या?" असं म्हणून ती एकदम खळखळून हसली. मला काय बोलावं हे सुचेना. मला आतून दिसतंय हे तिला माहीत होतं? तरीही तिनं कपडे बदलले? पुन्हा एकदा हे आव्हान होतं की आवाहन? " काका तुम्ही तर एकदम शांत झालात. आर यू ओके? " बाजूच्या टेबलवर ठेवलेली पाण्याची बाटली तिनं मला दिली. मी ती घेतली आणि दोन घोट पाणी प्यायलो. " आता बरं वाटतंय का?" ती काळजीनं म्हणाली. " हो. तसं काही झालं नव्हतं" मी तिची नजर चुकवत म्हणालो.  " तुला हवंय का पाणी? " मी तिला विचारलं. ती मानेनंच नको म्हणाली. " पाण्यात आकंठ भिजलेय मी काका, नको मला अजून पाणी. काका तुमच्या मुलीचं नाव काय हो? " " प्रिया" " हं, कॉलेजात जाते ना?" " हो. कसे दिवस भुर्रकन उडून जातात पाहा. काल परवापर्यंत मीही शिकत होते असं वाटतंय. शिक्षण संपलं आणि घरच्यांनी लग्न लावून दिलं. नवऱ्यानं नवरेपणा गाजवला. दारू पिऊन घरी यायचा. झोपेत असेन तरी तशीच्या तशी उठवून बाथरूममध्ये शॉवरखाली उभी करायचा. पूर्ण भिजले की  टॉवेल टाकायचा अंगावर म्हणायचा पूस अंग आणि बदल कपडे माझ्यासमोर. नाही ऐकलं तर बेदम मारायचा. काही वर्ष सहन केलं मग पुढे असह्य झालं. सोडलं त्याला. घरच्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, नवऱ्याने, शॉवरने आणि टॉवेलने त्यांचं, मी माझं" "... " " नकोय काका पाणी नकोय मला. खूप झालं पाणी" मी पाण्याची बाटली जागेवर ठेवली, मला काय बोलावं ते सुचत नव्हतं.  " सॉरी हं. मला हे सगळं माहीत नव्हतं" तिनं माझ्याकडे वळून पाहिलं. तिच्या नजरेत कुठे दुःख, असूया, सूड दिसतंय का ते मी शोधत होतो पण मला त्यातलं काहीच सापडलं नाही. ती एकदंम मोठालं हसली. " काका तुमचं नाव काय? " मघा मुलीचं नाव विचारलं आता माझं? " कारण तुमचं आडनाव तेवढं माहीत आहे पण नाव कधी कळलंच नाही. " " अरविंद" " म्हणजे कमळ ना? चिखलात उगवणारं पण कसं चिखलापासून दूर छान छोकी गोंडसवाणं दिसणारं" "... " " मी अभ्रा. म्हणजे ढग, सगळ्या जगातल्या वाफेने संपृक्त झालेला ढग कधीही फुटू शकेल असा. आजच्यासारखा" असं म्हणून ती पुरुषी हसली. तिच्या सौंदर्याला तसं ते हसणं शोभत नव्हतं. मग ती एकदम हसायची थांबली. " काका तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज्ड? " " लव्ह" " वाह. ज्यांचं लव्ह मॅरेज होतं ना त्यांचा मला हेवा वाटतो. एक ती आणि एक तो. दोघांचं एकमेकांशिवाय पान हालत नाही. ती त्याला अचानक भेटायला येते. तो पुरता गोंधळतो. तिचं येणं त्याला आवडत असतं पण तरीही तो बावरत असतो" असं म्हणून ती खुर्चीवरून उठली आणि  तिनं स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि माझ्या खुर्चीमागं गेली. " तो तिची नजर चुकवत इकडे तिकडे पाहत राहतो. मग ती हळूच मागून येते त्याच्या डोळ्यावर हात ठेवते आणि म्हणते मला पाहणार नसशील तर दुसरं काहीच पाहायचं नाही. " असं म्हणून तिनं तिचे तळवे माझ्या डोळ्यांवर टेकवले. शरीरातून एकदम शहारा गेला, " झालं होतं का काका कधी तुमचं असं" माझ्या डोळ्यावरचे हात काढून तिचे निरागस असलेले किंवा दिसणारे डोळे माझ्यावर रोखून ती म्हणाली. "... " " असंच असतं ना प्रेम? लांब असून जवळ असणं. ती अशी डोळ्यासमोर नसणं पण सतत डोळ्यासमोर दिसणं." ती तिच्या खुर्चीत बसली आणि माझ्या अगदी समोर आली. " ती अशी, तुम्ही असे. म्हटलं तर एक फूट म्हटलं तर मैलोन मैल. कुणी कापायचं हे अंतर? तुम्ही की तिनं? ती होईल वीतभर पुढे, रोखून पाहील तुमच्या डोळ्यात. देईल तुम्हाला आव्हान डोळ्यानं. मग तुम्ही व्हाल थोडेसे पुढे धराल तिचे दंड, ओढाल तिला आणखी पुढे. तिचा दंड तुमचा हात. तिचे ओठ तुमचे ओठ मध्ये अंतर फक्त एक बोट." मी तिच्या दंडाला धरलं आणि तिला तिनं म्हटल्याप्रमाणं तिला जवळ ओढलं. " तुम्ही असे, ती अशी. तुम्ही बाजी, ती काशी. तुम्ही कृष्ण, ती राधा, तुम्ही ती आणि ती तुम्ही, अंगभर रक्त, रक्तात खाज, सुटले सांड, माजावर आज, अंगात पसरले वासनेचे लोण, तुम्ही आग तर मी कोण? " तिच्या ओठात आणि माझ्या ओठात खरोखरच बोटभर अंतर होतं. मघा पाहिलेलं तिचं ते गोरटेलं शरीर माझ्या हातात होतं. आता फक्त मला शेवटचा घाव घालायचा होता.
" बोला ना. तुम्ही आग तर मी कोण? " मला भानावर आणत तिनं पुन्हा विचारलं. "..... " मला काहीच सुचलं नाही. दोन क्षण असेच गेले. तिच्या ओठाची हालचाल झाली. तिचे ओठ माझ्या ओठावर ती  टेकवणार असं वाटून मी डोळे बंद केले.
" तुम्ही आग तर मी पाणी" ती म्हणाली. माझ्या हातातनं तिने तिचे दंड सोडवले आणि ती दूर झाली मी तसाच डोळे बंद बरून ओशाळल्यासारखा बसून राहिलो. " मी पाणी. खळखळत येणारं आणि आलं तसं जाणारं. भावनांनी उचंबळून यावं पाण्यासारखं आणि पाणी हातात पकडायला जावं तर जसं मुठीतून निसटून जातं, तसं निघून जावं आल्या पावली. तशीच आहे मी. पाण्यासारखी." ती आली तशी ती निघून गेली. पुन्हा कधीच दिसली नाही, भेटली नाही. मीही तिला कधी फोन केला नाही आणि तिनंही. तिचं पाणी असणं आणि मला योग्य वेळी विझवून जाणं मात्र कायम माझ्यासोबत राहिलं. 
- कोहम