Wednesday, July 02, 2008

पार्टी

तो - पार्टी कधी?

ती - कसली?

तो - कसली काय? प्रमोशन कुणाला मिळालं? मला की तुला?

ती - मला.

तो - मग पार्टी कुणी द्यायची? मी की तू?

ती - तू.

तो - कसली कंजूस आहेस तू. अगं तोंडावर तरी हो म्हण. माझ्या ऍड ऑन कार्डावरून पैसे भर हवंतर. म्हणजे मलाही समाधान आणि तुलाही.

ती - म्हणजे मी मारल्यासारखं करते तू लागल्यासारखं कर.

तो - चालेल.

ती - अरे? चिडतोस काय? देईन मी पार्टी.

तो - नको.

ती - चिडका बिब्बा.

तो - मी? तूच चिडकी बिब्बी. उगाच नाही हिंदीत बायकोला बिब्बी म्हणत.

ती - प्रॉब्लेम काय आहे? तोंड का वाकडं तुझं? खूश व्हायला पाहिजेस तू.

तो - कुठे काय? सगळं छान तर आहे. मला चांगली नोकरी. तुला चांगली नोकरी. मला प्रमोशन तुला प्रमोशन. मला गाडी, तुला गाडी. मला..

ती - हे रे काय? तुझं माझं, तुझं माझं. आपलं म्हण.

तो - बरं आपलं.

ती - मग छानच तर आहे सगळं. तू असा का झालायस? स्वतःची शेपटी पकडण्यासाठी गोलगोल फिरणाऱ्या भूभू सारखा?

तो - हं. झालोय खरा.

ती - पण का?

तो - लग्नानंतर माणसाचं असंच होतं.

ती - बरं. मग नव्हतं करायचंस लग्न? का केलंस?

तो - शादी के लाडू. खाये तो पचताये न खाये तो पचताये. म्हटलं, पचतवायचंच आहे तर खाऊन पचतवा.

ती - तुझं लाडकं वाक्य आठवलं.

तो - कोणतं?

ती - खाऊन माजा पण टाकून माजू नका.

तो - इथे थोडं उलटं आहे. शादी चे लाडू खाणारा कधीच माजत नाही. ज्याच्या नावाने लाडू खातो ते माजतात.

ती - म्हणजे मी?

तो - मी तसं म्हटलेलं नाहीये.

ती - न म्हणता, दुसऱ्याला जे ऐकायला आवडत नाही ते म्हणण्याची कला तूच जाणे. तुला काय वाटलं? मला पचतवायला होत नाही?

तो - तुझ्याकडे बघून तरी तसं वाटत नाही.

ती - अरे मी म्हणून तुला सहन करते. दुसरी कुणी असती ना, मग कळलं असतं तुला.

तो - काय कळलं असतं ते कळलं असतं. पण आता काय उपयोग? हे सगळं आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं असं आहे. आता कसं काय कळणार? कितीही कळावं असं वाटलं तरी.

ती - ओ काका विथ मिशा. तुमचं स्वप्नरंजन बंद करा. आणि तुमचा असा स्वतःची शेपटी पकडणारा कुत्रा का झालाय ते सांगा?

तो - कुत्रा? आता खरा शब्द बाहेर निघाला. सुरवातीला भूभू म्हणाली होतीस. आता एकदम कुत्रा झालो काय मी?

ती - हे बघ हा वाक्प्रचार आहे.

तो - आता बघा कशी मराठी तांडवनृत्य करायला लागलेय जिभेवर? एरवी एक वाक्य सरळ बोलता येत नाही. मला शिव्या द्यायला मात्र मराठी.

ती - असं काही नाहीये?

तो - मग कसं आहे?

ती - तुला मी कुठल्याही भाषेत शिव्या देऊ शकते.

तो - इथेच प्रूव्ह झालं की तू मला शिव्या देतेस.

ती - त्यात प्रूव्ह करण्यासारखं काय आहे? मी खुलेआम हे मान्य करते.

तो - पण का?

ती - का म्हणजे? तू जर शिव्या देण्यासारखं वागलास तर मी शिव्या देईन नाहीतर काय ओव्या म्हणीन? तुझ्या सन्मानार्थ.

तो - हे अती होतंय.

ती - बरं होवूदे. अर्धा तास झाला मी तुला विचारतेय प्रॉब्लेम काय आहे? असं तोंड वाकडं करून बसायला काय झालं तर तू उत्तर देत नाहीयेस. कोण करतंय अती? मी की तू?

तो - मी.

ती - हं. मग काय झालं तरी काय?

तो - कुठं काय?

ती - तोंड.

तो - ओह ते. दात दुखतोय.

ती - अरे माणसा, मग हे पहिल्या वाक्याला सांगितलं असतंस तर इतकं भांडण कशाला झालं असतं.

तो - भांडण? कसलं भांडण?

ती - अत्ता आपण केलं ते?

तो - नाही दात जास्तच दुखत होता. लक्ष उडवायचं होतं त्याच्यावरून म्हणून. असं म्हणतात की कसला त्रास होत असेल, आणि त्यापेक्षा अधिक त्रासदायक काही घडलं की पहिल्या त्रासाचा विसर पडतो. म्हणून.

ती - टू मच.

तो - थ्री मच.

ती - बस बोंबलत आता दात घेऊन. पार्टी बिर्टी काही नाही.

तो - अगं गंमत केली.

ती - मीही गंमतच करणारे आता. ज्या दिवशी तो दात उपटून घेशील ना,त्याच दिवशी माझी पार्टी.

तो - अगं पण.

ती - ...

तो - बरं.

----------------------------------------------------------
चिकटवा चिकटवी करणाऱ्यांसाठी तळटीप. कृपया कुठून उचललेत त्याची लिंक द्यावी. मलाच माझं गेलं पोस्ट निनावी फॉरवर्ड म्हणून आलं. आता बोला?
http://nileshgadre.blogspot.com
----------------------------------------------------------

Wednesday, May 21, 2008

शिकरण

तो - झाल्या का पोळ्या? खूप भूक लागलेय.

ती - झाल्या ना. मलाही भूक लागलेय पण पोळ्या करायला वेळ लागतो.

तो - म्हणूनच सांगत होतो, लवकर स्वैपाकाला लाग.

ती - आणि तू काय करशील? सोफ्यावर बसून टी. व्ही. बघशील?

तो - तसं नाही गं. जरा जास्तच भूक लागली होती म्हणून जरा. ते जाऊदे. कसली भाजी आहे.

ती - नाही

तो - ही कोणती नवी भाजी? नाही?

ती - म्हणजे भाजी नाही.

तो - भाजी नाही? मग काय नुसत्याच पोळ्या खायच्या काय आज?

ती - हे बघ मला स्वैपाक करायला वेळ लागतो. सवय नाही. आणि तुला भात, भाजी, आमटी, पोळी सगळं लागतं. आज भाजी चिरायला वेळच मिळाला नाही.

तो - मला सांगायचं

ती - सांगितलं. पण कॉम्प्युटर समोर बसलास की तुझ्या कानाची होते फुंकणी. नळी फुंकिली सोनारे. इकडून तिकडे गेले वारे.

तो - मी फुंकणी आणि तू सोनार? जरा जोरात फुंकायचं ना. ऐकू आलं असतं.

ती - जेवायचंय ना? की फुंकर मारू अजून एक? माझ्या ऑफिसमधल्या लोकांना मी केलेल्या पोळ्या खूप आवडतात. तुला नसतीलच खायच्या तर ते खातील.

तो - नको. एवढं अन्नदान नको.

ती - कंजूस.

तो - मुद्दा तो नाही आहे. तू आज पोळ्या केल्यास म्हणून तुझे जाहीर आभार. पण आता त्या पोळ्या पाण्याबरोबर खायच्या का?

ती - नाही.

तो - हवेबरोबर?

ती - शिकरण केलंय. ते वाढून घे आणि गीळ किती गिळायच्यात त्या पोळ्या.

तो - शिकरण केलंय? अरेरेरे, काय ही भाषा. शिकरण स्त्रीलिंगी. ती शिकरण, ते शिकरण नाही.

ती - ई.... ती शिकरण काय. ते शिकरणच बरोबर आहे. ते केळं आणि त्याचं ते शिकरण.

तो - फालतू लॉजिक सांगू नकोस हं. तुला गाणं आठवतं का ते? केळ्याची शिकरण करायला गेली धुपकन पडली आत?

ती - आठवतं.

तो - मग मान्य कर की चूक झाली.

ती - चूक तुझी होतेय. मला आठवतंय, केळ्याचे शिकरण करायला गेली धुपकन पडली आत. चुकलायस तू मी नाही.

तो - हे बघ तू मला बाकी कशाचंही लेक्चर दे, पण मराठीचं देऊ नकोस.

ती - का बरं का? मी तुला कसलंही काही सांगायला लागले की तुझं हेच. हा विषय सोडून दुसरं कशाचंही लेक्चर दे. असे काय दिवे लावलेस रे तू मराठीत? पु. ल. देशपांडेच की नाही तू? की आचार्य अत्रे?

तो - अगदी तितका नसलो तरी थोडं फार लिहितोच की मी

ती - कुठे? ब्लॉगवर? काळं कुत्रंतरी वाचता का रे तुझा तो ब्लॉग? अरे ब्लॉग लिहिण्यापेक्षा जरा घरातली कामं कर, म्हणजे शिकरण खायची वेळ येणार नाही. मी एकटीने काय काय म्हणून करायचं.

तो - मुद्दा मी कुठे काय लिहितो हा नाहीये. मुद्दा हा आहे की माझं मराठी तुझ्यापेक्षा चांगलं आहे.

ती - हे आपलं तुझं मत. तुझ्या मताला मी किंमत देत नाही.

तो - ते माहितेय मला. आजचं का आहे ते. पण हे माझं मत नाही. दहावीत मला मराठीत ऐंशी मार्क मिळाले होते.

ती - मला एटीटू मिळाले होते.

तो - अगंपण माझी फर्स्ट लँग्वेज होती मराठी.

ती - लँग्वेज होती ना? मग तर झालं. मार्क कुणाला जास्त होते? मला. मग मराठी कुणाला जास्त येतं? मला? मग ती शिकरण का ते शिकरण? ते.

तो - च्यायला. तुला शिकवणारे धन्य आणि तुला मार्क देणारे त्याहून धन्य.

ती - ए. जास्त बोलू नकोस हां. माझी आईच शिकवायची मला. आणि तिला तिच्या आईने शिकवलं.

तो - तरीच.

ती - लाज नाही वाटत माझ्या माहेरच्यांना नावं ठेवायला?

तो - नावं ठेवायची नाहीत म्हणूनच तर लग्नात तुझं नाव नाही बदललं.

ती - फार उपकार केलेस हं. बदललं असतंस तर बदडलं नसतं तुला?

तो - पुन्हा विषयांतर करू नकोस. मुद्दा वेगळाच आहे.

ती - ते शिकरण

तो - ती शिकरण

ती - मी जेवतेय तुला हवंय?

तो - हो.

ती - पोळीबरोबर ते..... शिकरण देऊ का?

तो - मला ती शिकरण दे तू ते शिकरण खा.

ती - आता कसं शहाण्या मुलासारखं बोललास.

तो - थांब पोळ्या थंड झाल्यात मायक्रोव्हेव करून आणतो.

ती - शहाणा माझा बाळ.

तो - हं.

------------------------

हा फॉर्म (मला) भलताच आवडला असल्याने अजून एक संवाद

------------------------

Wednesday, April 16, 2008

नातं

"हा"मी - एक छानसं नातं.

"तो"मी - नातं?

"हा"मी - नात्याला नाव काय? नावंच नाही? शब्दकोश धुंडाळले तरी सापडलं नाही.

"तो"मी - नातं कसलं?

"हा"मी - एक तो. भारतातून श्रीलंकेत कामानिमित्त आलेला. एक ती. श्रीलंकन. तो ज्यासाठी आला त्या कामाचा आणि तिचा दूरान्वयेही संबंध नाही.

"तो"मी - बरोबर, मग कसलं नातं? कसलंच नाही.

"हा"मी - नाही कसं? तो आणि त्याची टीम जिथे बसतात त्याच मजल्यावर ती बसते.

"तो"मी - मी बसतो त्या माझ्या ऑफिसच्या मजल्यावर शंभर लोकं बसतात. काही नातं नाही माझं त्यांच्याशी. कुठल्याही ऑफिसच्या एखाद्या मजल्यावर कित्येक लोकं बसतात. त्यांच्यात कसलं आलंय नातं?

"हा"मी - हं बरोबर. पण तरीही नातं आहे. तो तिला काचेच्या खिडकीतून पाहतो आणि तीही कधीकधी. पण तिने त्याला पाहताना, त्याने जर तिला पाहिलं, तर मात्र ती पटकन आपलं डोकं कामात खुपसते.

"तो"मी - नीटसं कळलं नाही. पण नक्की दाल मे कुछ काला है. प्रेम वगैरे?

"हा"मी - नाही नाही. प्रेम नाही. तिचं तर लग्न झालंय.

"तो"मी - त्याचं?

"हा"मी - नाही. त्याचं नाही झालं.

"तो"मी - मग? विवाहबाह्य संबंध?

"हा"मी - काय शब्द पण शोधलाय? विवाहबाह्य संबंध. मऊ भात खाताना खडा दाताखाली यावा असा हा शब्द. विवाहबाह्य संबंध. नाही. तसलं काही नाही. तसा बाह्यात्कारी आतला बाहेरचा कसलाही संबंध नाही.

"तो"मी - म्हणजे नातंदेखील नाही.

"हा"मी - अंहं. नातं आहे. पण तोच तर लोचा आहे ना. ह्या नात्याला म्हणायचं काय?

"तो"मी - नुसतं एकमेकांकडे बघणं हे कसलं आलंय नातं?

"हा"मी - पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. कभी शाम जवाँ थी. मिल बैठे थे यार, आप मै और... तोच तो. बघ ना दारू देशांच्या सीमा जाणत नाही. कुठल्याही देशातले लोक कुठेही एकत्र येऊन टून होऊ शकतात. तसा तो आणि त्याच्या ऑफिसमधले श्रीलंकन मित्र. तमिळ इलम वरून घसरत घसरत गाडी पोरी बाळींवर येते. त्याचे श्रीलंकन मित्र त्याला विचारतात, आणि केवळ त्यांनी विचारलं, म्हणून आणि म्हणूनंच तो सांगतो. की त्या ऑफिसमधली सर्वात सुंदर मुलगी तीच.

"तो"मी - मग त्यात कसलं आलंय नातं? ऐश्वर्या राय सुंदर आहे. हे एक माझं मत मी दहा मित्रांना दहादा सांगितलं. मला खरं आवडलं असतं, पण माझं आणि ऍशचं नाही बुवा कसलं नातं.

"हा"मी - नाही. ऐश्वर्या राय ला सुंदर म्हणणारे एकटेच नसतो ना आपण. आणि आपण तिला सुंदर म्हटलं, हे तिला कळतही नाही. इथेच तर सगळी गंमत झाली. म्हणजे तो तिला ऑफिससुंदरी म्हणाला हे तिला कुणीतरी सांगितलं.

"तो"मी - मग काय त्यात घाबरायचं? सांगितलं तर सांगितलं.

"हा"मी - हं. पण इथेच तर नातं तयार झालं ना.

"तो"मी - कसलं नातं?

"हा"मी - सगळे शब्दकोश धुंडाळले तरी नाव नाही मिळालं.

"तो"मी - बरं पुढं? ती चिडली?

"हा"मी - नाही. ती नाही चिडली. त्याला वाटलं ती चिडेल. पण नाही चिडली.

"तो"मी - नक्की. विवाहबाह्य....

"हा"मी - नाही रे. तसलं काहीच नाही. तिला तिच्या ऑफिसख्या चिडवायच्या त्याच्यावरून. आणि त्याला त्याचे ऑफिसवंगडी तिच्यावरून. पण सगळं गमती गमतीत.

"तो"मी - असं गमतीत काही नसतं. कुणीतरी कुणालातरी कुणावरूनतरी चिडवत असेल आणि त्या कुणालातरी त्याचा राग येत नसेल ते ज्यांना चिडवतायत आणि ज्यांच्यावरून चिडवतायत त्यांचं प्रेम झालं असं समजावं.

"हा"मी - प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. डोंबलाचं प्रेम? ती शादीशुदा आणि तिच्या संसारात समाधानी. तो त्याच्या देशातल्या मुलींवर समाधानी. प्रेम बीम काही नव्हतं रे.

"तो"मी - अरे मग होतं काय?

"हा"मी - तोच तर ओरिजिनल प्रश्न आहे, की होतं काय?

"तो"मी - बरं मग पुढे काय झालं?

"हा"मी - काही नाही. त्याचा प्रोजेक्ट संपला. ते शहर सोडायची वेळ आली. सगळ्यांना भेटला तसा तो तिलाही भेटला जायच्या आधी. तिने त्याला ऑल द बेस्ट केलं. त्याने थँक यू म्हटलं. जसं तो उरलेल्या चार लोकांशी बोलला तसंच तो तिच्याशी बोलला. ते बोलून झाल्यावर आणखी बोलायचं काही शिल्लकच राहिलं नाही. तो वाक्य शोधत राहिला, पण मिळाली नाहीत. त्यामुळे त्याला जावंच लागलं. तिलाही वाटत होतं की त्याने अजून दोन वाक्य बोलावीत, पण ती त्याला सुचली नाहीत आणि तो गेला. दोन डोळ्यांच्या कडा, हलकेच ओल्या झाल्या.

"तो"मी - बरोबर. त्याला वाईट वाटलं असणार.

"हा"मी - त्याला नाही. तिलाही वाटलं. म्हणून दोन डोळे म्हटलं. एक तिचा, एक त्याचा.

"तो"मी - मग?

"हा"मी - मग काय? ईमेल मधून ते बोलत राहिले मधून मधून.

"तो"मी - सुचलं.

"हा"मी - काय?

"तो"मी - नात्याला नाव सुचलं.

"हा"मी - कोणतं?

"तो"मी - इ-मित्र.

"हा"मी - नाही रे. मित्र नाही. मित्र म्हणजे वेगळं, हे वेगळं.

"तो"मी - हे बघ, बुवा आणि बाई हे जर एकमेकांचे नातेवाईक नसतील, तर आपल्याला फक्त दोनंच नाती कळतात. प्रेम नसेल तर मैत्री आणि मैत्री नसेल तर प्रेम. ऍक्च्युअली मैत्री वगैरे सुद्धा झूटंच आहे. खरंतर प्रेम किंवा नथिंग.

"हा"मी - पण हे प्रेम नाही, मैत्री नाही आणि नथिंगही नाही. सगळे शब्दकोश धुंडाळले पण नाव नाही सापडलं.

"तो"मी - संपली स्टोरी?

"हा"मी - नाही. मग पुढे त्याचं लग्न झालं. त्याने तिला लग्नाला बोलावलं. ती आली नाही. शक्यच नव्हतं.

"तो"मी - संपली?

"हा"मी - जाऊदे. तुला ऐकायचंच नाही तर ...

"तो"मी - हं बरोबर, झालं सगळं रामायण आणि म्हणे रामाची सीता कोण? तुला त्यांचं नातं नक्की कोणतं हे कळलं की मला कळव.

"हा"मी - अजिबात नाही. प्रेम किंवा नथिंग ही दोनच नाती तुझ्यासाठी ठीक आहेत.

"तो"मी - मग सांग ना त्यांचं नातं कोणतं? प्रेम की नथिंग?

"हा"मी - नथिंग.

Friday, April 04, 2008

का?

रात्रीचे साधारण अकरा वाजलेले. नुकताच ऑफिसमधून परतलेला मी. दिवसभराच्या कामाने जीव कंटाळलेला. पण एक अनामिक समाधान. काहीतरी पूर्णत्वाला जात असल्याचं. खरंच आपण काम कशासाठी करतो? पगार मिळावा, पैसा मिळावा म्हणून की कामातून एक समाधान मिळतं म्हणून? कुठे आपलं कौतुक होतं, कुठे आपला अहं सुखावतो, म्हणून?

तितक्यात आतून ललित येतो. ललित म्हणजे इथल्या कंपनीने आमच्या मदतीला दिलेला हरकाम्या. गंमत म्हणजे आम्हाला तो हरकाम्या वाटतंच नाही. मित्रच वाटतो. त्याला इंग्लिश येत नाही, आम्हाला सिंहली येत नाही, त्यामुळे बराचसा व्यवहार खाणाखुणांनीच चालतो. तो खरंतर झोपेतूनच उठलाय, पण चेहऱ्यावर कंटाळा नाही. का करत असेल हा काम? समाधान मिळतं म्हणून? लोकांची धुणी धुण्यात कसलं आलंय समाधान?

त्याला आता आम्ही काही इंग्रजी शब्द शिकवलेत. तो मला डिनर आणि पाठी प्रश्नचिन्हात्मक उद्गार एवढंच विचारतो. मी त्याला मान हालवून नाही सांगतो. तो त्याची नाराजी सिंहलीतून ऐकवतो. मला काहीच कळत नाही. बहुतेक त्याने जे काय बनवलंय ते फुकट जाणार असा काहीसा त्याचा सूर. मी त्याला डिनर येस म्हणून सांगतो.

तो मस्त केळ्यासारखं ह्या गालापासून त्या गालापर्यंत हसतो. देवाची रंगसंगती बघा. काजळासारखा काळा त्याचा रंग आणि मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात. झटकन आत जाऊन तो जे काही बनवलेलं असतं ते घेऊन येतो. मला देतो आणि निघून जातो. खुणेनेच ताट किचनमध्ये ठेवून जा, हे सांगायला विसरत नाही.

मी नको असलेलं ते अन्न चिवडत बसतो. आपण नको असलेल्या गोष्टी का करतो? पैशासाठी? स्वतःच्या समाधानासाठी की दुसऱ्याच्या समाधानासाठी? जसा मी आज हे नको असलेलं विचित्र श्रीलंकन जेवण जेवतोय, पोटभर जेवण झालेलं असतानाही?

आम्ही दिवसभर काम करून दमतो, म्हणून आमच्या समाधानासाठी ललितने जेवण बनवायचं, आम्हाला पोटभर जेवल्याचं समाधान मिळावं म्हणून. आणि बाहेर पोटभर जेवण झाल्यावर आम्ही घरी यायचं आणि त्याने केलेलं न रुचणारं जेवायचं, त्याचं समाधान व्हावं म्हणून. का नाही मी सांगत त्याला? की बाबारे नाही आवडत तू जे काय बनवतोस ते. नको बनवू?

सगळंच मोठं विचित्र आहे. भारताच्या चार कोपऱ्यातून आलेले आम्ही चार श्रीलंकेत येतो काय, आणि हा त्याच्या गावाबाहेर सुद्धा कधी न पडलेला ललित आम्हाला येऊन मिळतो काय. जर शक्यता बघितल्या तर अशा पाच व्यक्ती एकत्र येण्याची शक्यता किती? नगण्य. पण अशा व्यक्ती एकत्र येतात. नुसत्या येतच नाहीत तर मैत्री होते त्यांची. तो नोकर आम्ही मालक असं कधी वाटतंच नाही. तोही आमच्यातलाच एक होतो. खुणांनी गप्पा मारतो, प्रसंगी ओरडतो, आम्हाला सिंहली शिकवतो आणि आम्ही त्याला इंग्लिश शिकवतो.

नको असलेलं जेवण कसंबसं पोटात ढकलून मी बाहेर हॉलमध्ये येतो आणि बाल्कनीत जाऊन उभा राहतो. बाहेरचा दमटपणा मुंबईची आठवण करून देणारा. रस्ते दिशाहीन वाटतात. परके वाटतात. मध्येच एखादी गाडी शांततेचा भंग करीत जाते. झोप डोळ्यात पेंगत असते पण तरीही झोपावंसं वाटत नसतं.
हातातल्या फोनवरून मी कॉलिंग कार्डाचा नंबर फिरवतो. समोरून एक यंत्रबाई पाचशे रुपये बॅलन्स आणि दहा मिनिटं वेळ असल्याचं सांगते. बराच वेळ कंटाळवाणं संगीत ऐकल्यावर एंगेज टोन. पुन्हा नंबर, पुन्हा बॅलन्स, पुन्हा संगीत, पुन्हा एंगेज टोन.

मी माझ्या घराला सोडून इकडे येऊन राहिलो कशासाठी? पैशासाठी कदाचित. कदाचित सेल्फ ग्रॅटिफिकेशनसाठी, कदाचित अहं कुरवाळण्यासाठी. आणि ललित का इथे येऊन राहिला? कदाचित त्याच कारणांसाठी. त्याचं घर त्याच्या गावात, आमचं घर भारतात. मिस करत असू का आम्ही सगळे आमचं घर? तो त्याचं, आम्ही आमचं. आणि मग त्यातूनच होत असेल का एक प्रयत्न. आपलं घर सिम्युलेट करण्याचा. नाती सिम्युलेट करण्याचा. आपण कुणासाठीतरी काहीतरी करतो हे समाधान ढापण्याचा किंवा कुणीतरी आपल्यासाठी काही करतो ह्यात समाधान मानून घेण्याचा?

पुन्हा नंबर, पुन्हा बॅलन्स, पुन्हा संगीत, पुन्हा एंगेज टोन. मी फोन बंद करतो आणि झोपायला जातो.

Wednesday, March 19, 2008

भीती

रात्रीचा तीनाचा सुमार. त्याच्या आलिशान बंगल्यातल्या स्विमिंग पुलामधलं पाणी वाऱ्याच्या झुळकेसरशी चुळुक चुळुक वाजत होतं. स्विमिंग पूलच्या शेजारीच दोन माणसं पेंगत बसली होती. बंगल्याच्या दरवाज्यापाशी आणखी दोघं होते. ते मात्र सावध होते. आपल्या अजस्र बेडरूममध्ये बिछान्यावर तो पडला होता. सगळीकडे साखरझोपेची बेदरकार शांतता पसरली होती आणि त्या प्रचंड बंगल्यातल्या कुठल्याश्या कोपऱ्यात असणाऱ्या घड्याळाने तीनाचे टोल दिले.

पहिला टोल पडून दुसरा पडायच्या आतच तो चपापून जागा झाला. नकळत हात उशीखाली गेला. तीक्ष्ण नजरेने त्याने आजूबाजूला पाहिलं. कुठंच काही हालचाल दिसली नाही. तसाच तो खिडकीपाशी गेला. स्विमिंग पुलापाशी पेंगत बसलेले ते दोघे तसेच डुलक्या देत बसले होते. एकदा जोरात ओरडून त्यांना उठवावं असं त्याला वाटलं. हेवा वाटला त्याला त्यांचा. सगळं शांत आणि आपल्याच कोशात गुरफटलेलं वाटलं. तरीही तो दबकत गॅलेरीपर्यंत गेला. बाहेरच्या दरवाज्यावरचे दोघं दबक्या आवाजात बोलत होते. त्याने डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहिलं. पहिला दुसऱ्याच्या सिगारेटवरून स्वतःची सिगरेट पेटवून घेत होता. एकंदरीत सगळं नेहमीसारखंच होतं. हृदयाची धडधड कमी झाली. तो तसाच बिछान्याकडे परत आला.

... भोसडीच्यांना हजार वेळा सांगितलं ते घड्याळ काढून टाका म्हणून. साला एक ऐकेल तर शपथ.....

झोपायच्या आधी तो बिछान्यावर कडेला बसला. टेबलावर ठेवलेली झोपेच्या गोळ्यांची बाटली उघडून एक गोळी त्याने तोंडात टाकली. एक आवंढा गिळून ती तशीच गिळून टाकली आणि बाजूला ठेवलेली बाटली तोंडाला लावून त्यातलं पाणी तो गटागट प्यायला. झोपेच्या गोळीचा परिणाम होईल की नाही होईल ह्याचा विचार करत करत तो बिछान्यावर पडला. डोळे टक्क उघडे होते आणि छताला लटकवलेलं उंची झुंबर त्याच्याकडे दुर्लक्ष करून झोपलंय असं त्याला वाटलं.

... बाप झुंबराच्या कारखान्यात काम करायचा. काचेच्या भट्ट्या, लाल बुंद तापलेली काच. सगळीकडे गरमी भरून राहिलेली. जिंदगीभर तिथेच सडला साला. लोकांच्या घरातली छतं सजवत राहिला आणि स्वतःच्या घरी? घर कसलं, झाटभर झोपडी साली.....

झोप न येणाऱ्या डोळ्यांत नको त्या जुन्या आठवणी जाग्या व्हायला लागल्या.

.... झोपडपट्टीच्या बाजूला असलेली रेल्वे लाइन, रात्री बेरात्री धडधडत जाणाऱ्या गाड्या, पहाटेच्या वेळी दिवस उगवायच्या आत ट्रॅकवर छत्र्या घेऊन हगायला बसलेल्या बायका. साला काय घर म्हणायचं त्याला. संडास होता संडास. एक भला मोठा संडास. तो उकिरडा म्हणजेच शाळा, म्हणजेच खेळायचं मैदान. तो राजा, किश्या आणि तो मी. दहा दहा दिवस अंघोळ न केल्याने त्यांच्या शरीराला येणारी घाण. केसांच्या जटा. त्यावर राजरोस फिरणाऱ्या उवा. ती रोजची भांडणं, मारामाऱ्या. पाच वर्षाचा मी आणि माझ्यापेक्षा मोठी ती पोरं. मारायची मला. बेदम कुदकायची आणि मी जायचो घरी रडत. बाप म्हणायचा, भडव्या मुलींसारखा घाबरतोस त्या पोरांना. वर मलाच मारायचा. एक दिवस खोपडीच सणकली साला आपली, घेतला एक दगड आणि घातला किश्याच्या डोक्यात. साला रडायला लागला. म्हटलं, भेंचोत रडतोस काय मुलीसारखा? घाबरतोस काय मला? आपण बघ. आपण कुणाला घाबरत नाही. कुणाच्या बापाची भीती नाही आपल्याला. धडधणाऱ्या ट्रेनच्या आवाजात त्याचं रडू हरवलं होतं नाही? ......

आपल्या पराक्रमाचं कौतुक त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. पण अजूनही झोप लागली नसल्याचं त्याला लक्षात आलं.

...... आईघाल्या साला. एक औषध बरोबर देईल तर शपथ. साला झोप येण्याची गोळी आहे का झोप जाण्याची? आणि वर म्हणे दारू पिऊ नका. अरे दारू प्यायची नाही तर झोपायचं कसं. ह्या तुझ्या झुरळाच्या लेंड्यांसारख्या दिसणाऱ्या गोळ्या खाऊन?....

पाण्याच्या बाटलीशेजारी असलेली दारूची चपटी बाटली त्याने तोंडाला लावली. पुन्हा टक्क डोळ्यांनी तो झुंबराकडे पाहायला लागला.

..... असंच एक झुंबर होतं रहमानच्या ऑफिसमध्ये. हुशार होता साला. मला सांगायचा पाकीट घेऊन जा आणि अण्णाकडे पोचतं कर म्हणून. आपल्याला काय माहीत आत काय आहे ते. पंधरा वर्षाचा छोकरा होतो तेव्हा मी. पण तिथला तो छोकरा, तंबी म्हणायचे त्याला. चुणचुणीत होता साला. त्यानेच मला पहिली सुपारी मिळवून दिली ना. रहमानची. अजून आठवतं. दोघांनी मिळून बेदम चोपलं रहमानला. साला हरामी माफ करो माफ करो म्हणून रडायला लागला. तंबीने मला घोडा दिला. म्हणाला मार. पिस्तूल हातात घेतली. पण घोडा ओढायचा धीर होईना. तंबी म्हणाला चुत्या मार. अभी इसको नही मारा तो वो तेरी मारेगा. मार भडवेको. तो मला मारणार? चड्डी ओली होते की काय वाटायला लागलं. प्रचंड भीती वाटायला लागली. हा भोसडीचा मला मारणार? नाही. नाही. मीच ह्याला मारणार. एकदम रग डोक्यात गेली. चाप ओढला. गोळी बरोबर रहमानच्या डाव्या बाजूला छातीत लागली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रहमान तडफडत तडफडत मेला. मेंदू हल्लक झाला. तंबी केव्हाच तिथून सटकला होता. पोलिसांच्या सायरनचा आवाच झाला. मी घाबरलो धावत सुटलो. धावलो. धावलो. किती वेळ कुणाला माहीत. तेवढ्यात पोटात एक गुद्दा बसला. पोलिसच. मायझंवे. बदडून काढला साल्याला. अरे आपण पोलिसाला पण भीत नाही......

सायरनच्या आवाजाने तो भानावर आला. आता? पोलिस? सायरनचा आवाज जसा जसा जवळ यायला लागला तसा मनातून तो घाबरला. पण सायरनचा आवाज जसा जवळ जवळ आला तसाच लांब लांब निघून गेला. अजूनही त्याला झोप लागली नव्हती. पुन्हा तो स्वतःच्या विचारांच्या गुंत्यात गुंतत गेला.

...... रहमानला मारून आणि पोलिसांना चकवून आपण किती दिवस काढले. पुढे गफूर भेटला. गफूरच साला. हरामजादा. रंडीबाजीचा नाद साल्याला. तोच घेऊन गेला मला कमाठीपुऱ्यात पहिल्यांदा. म्हटलं आपण हे असलं काही करत नाही. तर म्हणाला बाईला घाबरतोस साल्या. छक्का आहेस का? पुरूष असून बाईला घाबरतोस. भीती? मला? त्याला म्हटलं, साल्या मी कुणालाही भीत नाही. डोक्यात खून चढला. समोर दिसली ती पहिली रांड उचलली आणि ओरबाडून काढली रात्रभर. मी घाबरतो म्हणे .....

आवेगाने बिछान्यात त्याने कूस बदलली. गुडघ्याची जखम चादरीवर घासली आणि डोक्यात एकच कळ गेली आणि तो कळवळला.

...... आईगं. आईची लहानपणापासून भीती वाटायची. चूक केली की तिच्या लक्षात येणार माहीत होतं. पहिला राडा केला तेव्हापण वाटलं आई घरी गेल्यावर ओरडेल. भीती वाटली. तंबीला सांगितलं तर तंबी म्हणाला आईला घाबरतोस? दुधपीता बच्चा है क्या तू? मी कुणालाच घाबरत नाही. त्यानंतर आईसमोर गेलोच नाही. अगदी शेवटपर्यंत. ती गेली तेसुद्धा महिन्याने कळलं........

पांघरूण घेऊनसुद्धा कुडकुडायला होत असल्याचं त्याला जाणवलं. बेडरूमच्या भिंतीवर एसी घुमत असलेला त्याने ऐकला. एवढा वेळ एसीचा आवाज त्याला जाणवला पण नव्हता पण आता तोच आवाज त्याला त्रासदायक वाटायला लागला. तो बिछान्यातच पडलेला एसीचा रिमोट कंट्रोल उचलून तो एसी बंद करायचा प्रयत्न करू लागला. एसी बंद झाला. त्याला हायसं वाटलं. आता खुट्ट झालं तरी त्याला ऐकू येणार होतं. काही केल्या झोप मात्र येत नव्हती. गेले काही दिवस असंच चाललं होतं.

..... साला दिवस फिरले की काहीच चालत नाही. माझ्या पैशावर जगणारे, माझी पायताणंसुद्धा डोक्यावर घेऊन नाचायला तयार असणारे मंत्री. सगळे सगळे फिरले. छोटा मासा आणि मोठा मासा. कालपर्यंत मी मोठा मासा होतो. आज मी छोटा मासा म्हणून सगळे माझ्या मागे. नाही पण हेही दिवस जातील. म्हणून तर इथे आलोय. कुणालाच माहिती नाहीये हे ठिकाण. फक्त मला आणि......

बाजूच्या मशीदीतली अजान अचानक सुरू झाली आणि तो भानावर आला. सकाळ होत आली म्हणून त्याला बरंही वाटलं आणि झोप लागली नाही म्हणून वाईटही. तो बिछान्यावर उठून बसला. आणि तो बिछान्यातून उठणार इतक्यात सायरनचा आवाज ऐकू यायला लागला. नक्कीच पोलिसांचा सायरन होता तो. चारी बाजूंनी आवाज यायला लागला. खिडकीपाशी जाऊन त्याने पाहिलं तर खरंच पोलिसांच्या गाड्या समोर दिसत होत्या. मागच्या बाजूच्या खिडकीशी तो गेला तिथेही पोलिस दिसत होते. गोळ्यांचा आवाज यायला लागला धुमश्चक्री सुरू झाली. तो मटकन खाली बसला. समोरची खिडकीची काच खळकन फुटून त्याच्या समोर पडली. चकचकीत पांढऱ्या फरशीवर बंदुकीची गोळी टकटक आवाज करीत शांत झाली. तो तसाच रांगत पलंगाकडे गेला. उशीखाली हात घातला. त्याचं पिस्तूल तिथेच होतं. ते त्याने हातात घेतलं. क्षणभर सुन्न होऊन तो तसाच बसून राहिला. बाहेरून गोळ्यांचे आवाज येतंच होते. खिडक्यांच्या काचा फुटत होत्या. आजूबाजूला काचांचा सडा पडला. घाबरून तो पलंगाखाली शिरला. थोड्या वेळाने बंदुकांचा आवाज थांवला.

..... गेले. चारही गेले. मागचे दोन आणि पुढच्या दरवाज्याकडचे दोन. आता मी एकटा आणि पोलिस......

पलंगाखालून तो बंदूक घेऊन बाहेर आला. बेभान होऊन तो खोलीभर फिरू लागला. पायाला लागणाऱ्या काचांचीसुद्धा जाणीव त्याला होत नव्हती. अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. तो थरथर कापत होता.

..... मरण. माझं मरण. मरणाची भीती? कुणाच्या बापाला घाबरत नाही मी साल्यांनो. या. एकेकाचा मुडदा पाडतो की नाही ते बघा. हरामखोर साले. खाल्ल्या अन्नाला जागा कुत्र्यांनो. मला पकडणार? मला मारणार? मला भीती घालता? अरे जा रे जा. नाही हात हालवत परत जायला लागलं तुम्हाला तर नाव नाही सांगणार. मरण माझं मरण. नाही. नाही. नाही. अग आईगं .....

जिन्यावर बुटांचा खडखडाट झाला. पोलिस त्याच्या बेडरूममध्ये घुसले. काचा इतस्ततः विखुरल्या होत्या आणि त्यांचा मध्ये तो आडवा पडला होता. डोक्यातून रक्ताची धार लागली होती आणि हातात पिस्तूल होतं. त्याचे डोळे सताड उघडे होते आणि डोळ्यात दिसत होती फक्त भीती. आयुष्यभराची साठून राहिलेली भीती.