Tuesday, June 21, 2016

कॉफी टेबल

फर्निचरच्या मोठ्या शोरूमच्या एका छोट्याश्या कोपऱ्यात सई आणि सदा काचेच्या कॉफी टेबलावर कोपरं टेकवून एकमेकांकडे पाहत बसलेले. बाजूला उभी असलेली सेल्स गर्ल, पलीकडचा सोफ्यावर आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी असल्यासारख्या उड्या मारणारा छोटा मुलगा, बेडच्या कडेला बसून कोणता बेड घ्यायचा ह्यावर हुज्जत घालणारे नवरा बायको, ह्यांचं अस्तित्वच त्यांच्या लेखी नसायचं. त्यांचं छोटंसं घर, नवं आणि त्यातल्या हॉलमध्ये एकदम सेंटर पीस असावं असं हे कॉफी टेबल एवढंच त्यांच्या गावी

- हेच घेऊ, तो 
- हे छान आहे, पण महाग आहे.
- मग काय झालं? एकदाच आपण टेबल घेणार मग चांगलं घेऊया.
- पण बजेट?
- आवडलंय ना तुला?
- हो.
- घेऊया मग.

----

त्यांचं नवं घर, त्याचं असणं ह्या टेबलाच्या सभोवतालचं. सर्व घराच्या मध्यात हे टेबल आणि त्याभोवती त्यांचा संसार.  सदाने रात्री उशीराने घरी यायचं आणि बॅग, चावी, पैसे, पाकीट टेबलावर पसरायचं. मग सईने येऊन त्याला ओरडायचं.

- अरे किती हा पसारा?
- टेबल असतं कशाला? सामान ठेवायलाच ना? सदाने प्रतिवाद करायचा.
- नाही टेबल असतं घर  बांधून ठेवायला, त्याच्याभोवती बसायला, गरम गरम कॉफीचे मग ठेवून तासंतास गप्पा मारायला, तंगड्या पसरून पुस्तकं वाचायला. हे असलं सामान टाकून माझं टेबल फुकट घालवायचं नाही. 
- माझ्यापेक्षा तुला टेबल आवडतं? ह्या टेबलावरचं सामान उचलून दुसऱ्या कुठल्यातरी टेबलावर ठेवत सदाने हे टेबल रिकामं करायचं.
- नाही,
- मग मला किती ओरडतेस ह्या टेबलापायी.
- मग मी काय टेबलाला ओरडू?
- आता तू काही करू नकोस. असं म्हणत त्यानं त्यानं आपली तर्जनी तिच्या ओठावर ठेवायची.

मग पुढे कुणीच काही बोलायचं नाही. टेबलानं तेवढं गालातल्या गालात हसायचं.

------

- कोण कडमडलंय एवढं रात्रीचं? 

पाठ खाजवत अर्ध्या झोपेत सदानं उठून दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडल्यावर बाहेर त्याचं पूर्णं मित्रमंडळ बघून "आ" करून पाहायचं. सर्वांनी त्याला हॅपी बर्थ डे विश करायचा. टेबलावर कापलेला केक खवून आपापल्या घरी निघून जायचं. मग फक्त ती, तो आणि ते उरायचं. 

- कसं जमतं तुला हे सगळं. सदाने सईला विचारायचं.
- जमवलं की जमतं, टेबलावरचा उरलेला केक उचलत तिनं म्हणायचं.
- माझ्या डोक्यातही आलं नसतं.
- डोकं असेल तर येईल ना?
- हं.

हॉलमधले दिवे बंद करून झोपायला जाताना, केकचा एक छोटासा तुकडा टेबलवर पडलेला त्याला दिसायचा, तो तुकडा उचलून कचरापेटीत टाकायचा सोडून सदानं तो तसाच तोंडात टाकायचा आणि तळव्याने टेबलावरचा डाग पुसून टाकायचा आणि तळवा शर्टावर घासत स्वच्छ करायचा. हळूच सई तर पाहत नाही ना हे बघून झोपायला जायचं.

------

- सदा अरे बाळाला असं टेबलावर ठेवू नको, त्याला थंडी वाजेल. सईने सदाला ओरडायचं
- अगं असूदे एकंच मिनिट. काचेच्या टेबलावर कसला सही फोटो येईल.
- किती हालतोय बघ तो, पडेल.
- असा कसा पडेल मी आहे ना. 
- बस आता. उचल त्याला.

उचलता उचलता बाळाने शू करायची आणि आपल्या लंगोटासकट टेबल भिजवून काढायचं. सईने सदाला खूप झापायचं आणि कपडे बदलायला बाळाला आत घेऊन जायचं. सदानं मग पोतेऱ्याने टेबल साफ करायचं. 

------

- सई, लवकर बाहेर ये. सदानं उड्या मारत मारत तिला बोलवायचं
- .... समोरचं दृश्य बघून सईनं निःशब्द व्हायचं.

बाळाने काचेच्या टेबलाला धरलेलं असायचं आणि त्याच्या आधाराने ते उभं राहिलेलं असायचं. एका निर्णायक क्षणी टेबलाचा आधार सोडून बाळाने पहिलं स्वतंत्र पाऊल टाकलेलं असायचं. 

- सदा, आपण आता टेबल इथे ठेवायला नको.
- का गं?
- बाळ आता चालायला लागेल, खेळेल धडपडेल. उगाच त्याचं डोकं त्या टेबलावर आपटेल, टेबलाचे कोपरे लागतील त्याला.
- नाही काही होणार. असूदे आहे तिथे. 

पण सईने त्याचं ऐकायचं नाही. मग सदाने मोठ्या कष्टाने ते टेबल उचलून दुसऱ्या खोलीत टाकायचं. टेबल हिरमुसलं होऊन ठेवल्या जागी बसून राहायचं. 

-------

- करू ना सही नक्की? जमिनीवर गुडघ्यावर बसून टेबलवर ठेवलेल्या पेपरकडे पाहत सदाने सईला विचारायचं.
- कर आता. ठरवलंयस ना?
- हो. पण हे घर सोडायचं, हे शहर सोडायचं आणि दुसरीकडे जायचं खूप जीवावर येतंय गं.
- हं. पण अशी संधी पुन्हा मिळणारय का? यायचं असेल तर परत येऊच की इथे.

त्याने नेहमीप्रमाणे तिच्या शब्दांनी आश्वस्त व्हायचं आणि टेबलावरच्या कागदावर सही करून टाकायची. 

-------

- ह्या शहरात येऊनही एक वर्ष झालं. सोफ्यावरून टेबलापर्यंत पाय पसरत त्यानं म्हणायचं.
- हो ना. पण आपलं सामान सगळं आपण घेऊन आलो म्हणून बरं झालं.
- अगदी त्याच घरात असल्यासारखं वाटलं. सेटल होणं खूप सोपं गेलं.
- हं.

टेबलही आता नव्या घरात रमलेलं असायचं.

-------

- अरे किती गोंधळ घालताय रे? सईने किचनमधून मैत्रिणींच्या घोळक्यातून बाहेर हॉलमध्ये खेळत असलेल्या मुलांवर ओरडायचं.
- वा.... बाल्कनीमधून सदाने उगाचच ओरडल्यासारखं करायचं.

मुलांच्या आरडा ओरड्याने घर भरून जायचं.

मग एकदम खळ्ळ असा आवाज. सईने घाबरून बाहेर  धावत यायचं, सदानेही तसंच करायचं. कुठलंतरी काहीतरी टेबलावर आदळलेलं असायचं आणि काचेच्या टेबलाचे दोन तुकडे झालेले असायचे.

सदानं ते तुटकं टेबल घराबाहेर नेऊन ठेवायचं. मुलांचे खेळणं पुन्हा सुरू झालेलं असायचं. सदाने आत येऊन सईकडे बघायचं. त्याच्या डोळ्यातला ओलावा फक्त तिलाच दिसायचा. तिनं त्याला डोळ्यानंच धीर द्यायचा आणि दोघांनीही खोटं हसू तोंडावर आणत पाहुण्यांना सामोरं जायचं.

बाहेर पडलेल्या टेबलानं असहायपणे तसंच पडून राहायचं. 

-------

- कोहम

2 comments:

Geeta said...

sahaj, office madhe 'saheb' nahit mhanun on the job sutti ghetli ani tumcha blog bhetla. i have fallen for it. keep writing. all the best

shivraj260 said...

Bhari.... Jashi Kahi mazich gosht vatatey....