Sunday, April 22, 2007

बरखा बॆरी भयो.....

बरखा बॆरी भयो.....सजनवा....गॊड मल्हार रागातील हा ख्याल बाई गायला लागतात. बाईंचा फुरशासारखा गिरकी लागलेला आवाज, सुरवातीच्या ताना आणि समेवर बरोबर... बॆरी भयो सजनवा....लाजवाब. त्या तानांमधे, गॊड मल्हारामध्ये आणि त्रितालाच्या साथीमध्ये मी बुडून जातो. बरखा बॆरी भयो....क्या बात हॆ...बरखा बॆरी भयो......

संध्याकाळचा सुमार आहे पण रात्रीलाही लाजवेल असा अंधार झालाय. पाऊस धुवांधार कोसळतोय. समोरच्या रस्त्याचा तलाव झालाय. गटारं चुकवण्यासाठी मी रस्त्यामधल्या divider वर चालतोय कारण रस्ता दिसतंच नाहीये. मीच नाही माझ्याबरोबर असंख्य लोकं चालतायत. मुंग्यांची रांग लागावी तशी माणसांची रांग लागलेय. पाऊस कोसळतोच आहे. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर फक्त एकच भाव आहे. चिंता.

अहाहा! बॆरी भयो.....बरखा बॆरी भयो.......क्या बात हॆ....वाह......बहोत खूब...

कुणाचीतरी किंवा स्वतःची चिंता. घरी पोहोचायचं कसं? माझं बाळ घरी एकटं असेल. एक आई तडफडून सांगतेय. सगळ्यांचीच अवस्था थोड्याफार फरकाने सारखीच आहे. कुणाची पिल्लं घरी, तर कुणी पिल्ल स्वतः रस्त्यावर, घरट्यापासून दूर. Mobiles चालत नाहीयेत, दिवे चालत नाहियेत, ट्रेन, बसेस, गाड्या काहीच चालत नाहीये. चालतायत फक्त पाय. पाण्यातून रस्ता काढत काढत आपापल्या घरांकडे निघालेले लाखो पाय.

......जाने न देत मोहे पी की नगरिया.......जाने न देत.....वाहवा........समेवर परत बॆरी भयो.......बरखा बॆरी भयो........

कोणीतरी ओरडतं. पाय, पाय. पांव. समोरच्या तळं झालेल्या रस्त्यातून दोन पाय तरंगताना दिसतात. रांगेतली एखादी धीट मुंगी पाण्यात उडी मारते. चार हात मारून त्या पाय़ांपर्यंत पोहोचते. पोचल्यावर कळतं. ते पाय चालायचे कधीच थांबलेत. उलटं तरंगणारं प्रेतच हाताला लागतं. पोरंसोरं घाबरतात. आयामायांचे हात हुंदका आवरण्यासाठी तोंडाकडे जातात. मी मात्र चालत राहतो. मुंगीसारखा रांगेमध्ये. हूं की चू न करता.

......काय तान आहे.....सुरेख....बरखा बॆरी भयो.......सजनवा.....

नऊशे चव्वेचाळीस मि.मि. पाऊस अवघ्या काही तासांत. चारशेसहा लोकं त्या पावसांत गेली. कायमची. बुडून, वाहनात अडकून. रेटारेटीत. चारशे पन्नास करोड रुपयांचं नुकसान. पाण्यात. मी मुंग्यांची रांग सोडून माझ्या वारुळाकडे चालायला लागतो. तळ मजल्यावरच्या वारुळातल्या मुंग्या वरच्या मजल्यांवर सरकल्यायत. त्यांची घरं पाण्याने भरलेयत. कसा बसा मी माझ्या वारुळात पोहोचतो.

......बरखा बॆरी भयो......बाई पुढच्या ओळींना हात घालतात. गरज गरज बरसे बदरिंया......चमकन लागी पापी बिजुरिया, जाने न देत मोहे पी की नजरियां........बरखा बॆरी भयो.........बरखा बॆरी भयो......सजनवा......

आमची गाडी डोंगरावरून खाली उतरतेय. समोरचा विस्तीर्ण परिसर फक्त एकाच रंगात माखलाय. तांबड्या. हिरवा रंग नावालाही नाही. गाडी डोंगर उतरते. रस्त्याच्या कडेला पिवळं, वाळून गेलेलं गवत दिसतंय. झाडांचे नुसते वठलेले बुंधे आणि फांद्या. पानं कधीतरी असावीत अशी शंकासुद्धा येत नाहीये. तहानेने घसा कोरडा झालाय. समोरच्या धुराळलेल्या गावात गाडी शिरते. गावठाणातली एक विहीर. गाडी थांबते. उतरून बघतो तो कोरडी ठणठणीत. बाजूला टॅंकरच्या वेळा लिहिल्यायत. शेजारच्या दुकानातून मी बिस्लेरी ची बाटली आणि थोडं खाणं विकत घेतो.

......बरखा बॆरी भयो......आता बाईंचा आवाज चांगलाच तापलाय. मुडात येऊन तो सुंदर हरकती घेतोय. त्रितालाची लय वाढायला लागली आहे. एक जोरकस तान मारून बाई समेवर अलगद....बॆरी भयो...... वर येतात.......

गाडी पुढे जाते. मधे कुठे पाण्याचा हातपंप दिसतोय. मुलं त्याच्यावर काहीतरी खेळतायत. त्या पंपाचं तोंडच समोरच्या मातीच्या ढिगार्‍यात बुडलंय. आजूबाजूला मोकळी जमीन. जमीन नव्हे, शेत आहे ते. उन्हाने रापलेली. मोकळी ढाकळी ढेकळं डोळ्यात भरून राहतात. शेताच्या बांधावर एक शेतकरी उकिडवा बसलाय. आभाळाकडे डोळे लावून. त्याच्या डोळ्यांत रडायलासुद्धा पाणी नसावं.

.......बरखा बॆरी भयो.......सुभानल्ला......काय हरकती....वाहव्वा.....वाह्व्वा....जाने न देत मोहे.......

गावातून बाहेर पडताना शेवटी गावदेवीच असावं असं एक देऊळ आहे. त्याच्यापुढे गावाची वेस आणि वेशीच्या बाहेर एका मेलेल्या बॆलाचं धूड पडलंय. चारा नाही, पाणी नाही. रोगामुळे कसाईसुद्धा गिर्‍हाईक नाही. गिधाडं त्याच्या अंगाचे लचके तोडतायत. माझ्या हातांत गावात विकत घेतलेल्या खाण्याच्या पदार्थाची पुडी आहे. त्या पुडीला बांधणार्‍या वर्तमानपत्रावर दुष्काळ, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, कर्ज, जवाहर रोजगार योजना ह्यांबद्दल काही लिहिलंय. मघाशी घेतलेली बिस्लेरीची बाटली फोडून आता मी पाणी पितोय. आता कसं थंडगार वाटतंय.

.....बॆरी भयो........क्या बात हॆ.......तबल्याची गत....झकास......शेवटच्या अणुकुचिदार ताना घेऊन बाई शेवटची तिहाई घेतात. बरखा बॆरी भयो........बरखा बॆरी भयो........बरखा बॆरी भयो.......

Sunday, April 15, 2007

नशा...

ह्या रिक्षावाल्याचा काय problem आहे कळंत नाही. मझ्या आणि मंजूच्या का असा मागे लागलाय? सूखाने जगू देत नाही साला. ह्याला बरोबर वठणीवर आणला पाहिजे. पण सहजशक्य आहे का ते? युद्धच पुकारावं लागेल.

टेह्ळणी करा, टेहळणी करा, शत्रू केव्हा नेम साधेल सांगता येत नाही. चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त हवा..... पण कसा बंदोबस्त ठेवणार? सामान तरी कितीसं आहे इथे? सहज माझी नजर खुर्चीकडे जाते. मी झटकन जावून खुर्ची उचलतो आणि खिडकीसमोर ठेवतो. इथूनच दिसतो साल्यचा रिक्षास्टॅंड. पण नुसत्या खुर्चीनं भागणार नाही. मी परत टेबलाजवळ जातो आणि त्यच्यावरची पुस्तकं खुर्चीवर रचतो......... हं, आता झाली भिंत चिरेबंद. आता ये म्हणावं साल्याला. आणि बरं का रे साल्या, मी काही रंगांधळा नाही. तुमचे खाकी कपडे बरोबर ओळखतो मी.

अजून काय बरं हवं होतं.......... हं, दुर्बिण. दुर्बिण कुठे ठेवलीत बहिर्जी?....... मिळत कशी नाही? मी टेबलावरचं वर्तमानपत्र घेतो, त्याची गुंडाळी करतो. झाली दुर्बिण. खुर्चीवर पाय ठेवून आता मी दुर्बिणीतून खिडकीबाहेर बघतो....... हं. हा रस्ता, हा रस्त्यावरचा विजेचा खांब, ह त्याला तेकून पथारी पसरून बसलेला चांभार आणि हा बसस्टॉप. हा रिक्षास्टॅंड, आणि ही मंजू. ही कशाला मरायला चाललेय तिथे? हजार वेळा सांगितलं रिक्षाने जावू नको म्हणून. ए, तो फसवेल तुला, गटवेल तुला. Thank God वाचलो. ती बस स्टॉपवर जावून उभी राहिली.

हा कुणी मला धक्का मारला? अरे, हा रिक्षावाला इथे काय करतोय? आणि साला मला बाजूला ढकलून माझ्याच दुर्बिणीतून बघतोय. बाहेरचं वर्णन मला ऎकायचं नाहिये रे. कोण बाई? आपल्या बाई? हरामखोरा ती बायको आहे माझी. आपल्या बाई म्हणू नकोस साल्या........... हिला पण आत्ताच गॅस संपल्याची वर्दी द्यायचेय. घरात स्टोव्ह आहे, रॉकेल आहे. .........माझं त्याच्याकडे लक्ष जातं. तो अजूनही माझी दुर्बिण वापरतोय. मी त्याला पुन्हा बजावतो. ऎकत नाही म्हणजे काय? मझा राग अनावर होतो. मी त्याला जीवाच्या आकांताने ढकलतो.

साला तो चिडला बहुतेक. उठून अंगावर येतोय. ढकलतोय. अरे साल्या जबरदस्ती करतोस काय? अजून मला तो पाठी ढकलतोय. सुशिक्षित म्हणून माज आला का असं विचारतोय. अरे बाबा माझा तसा हेतू नव्हता. शी. काय ही भाषा..... म्हणे बायको राखायची जमत नाही तुम्हाला आणि सुशिक्षित म्हणून चांगले नग उचलता? तुमच्यासारख्या छक्क्यांनी खरंतर लग्नच नाही केली पाहिजेत. म्हणे गरज असेल तर अशा बायकांशी लग्न करा ज्यांना पाहून पुरुषांच्या माना खाली गेल्या पाहिजेत. गांडीत दम नाही तर आणली कशाला बायको? का पाहू नये आम्ही वाईट नजरेने तुमच्या बायकांकडे? आम्हाला माहितेय तुम्ही झाट वाकडं करू शकत नाही आमचं....... अरे जा ना साल्या आता बोललास तेवढं पुरे नाही का? परत का येतोय हा? शी, पुन्हा गलिच्छ भाषा.......... म्हणे बाईंना स्कर्ट का काय ते घालायचा आग्रह करा. ते क्रीम बीम पायाला लावून केस झाडायचं.

गेला साला. पण काय ही घाणेरडी भाषा. त्याचे शब्द माझ्या कानांत वावटळीसारखे घुमतायत. असह्य. असह्य होतंय सगळं. अगतिकता का नपूंसकत्व? त्याचा आवाज चारही बाजूंनी माझ्यावर हल्ला करतोय. सहनशक्तीपलिकडे आहे माझ्या हे सगळं. असहाय होवून मी जोरात किंचाळतो. गेले, त्याचे घुमणारे आवाज गेले. आता फक्त नीरव शांतता.

मी थरथरतोय. थरथरतच मी खिशातली सिगरेट काढतो. पेटवतो. .........आम्ही तुमचं झाट वाकडं करू शकत नाही काय? आम्हीही तुमचं वाकडं करू शकतो.......... हातातली सिगरेट जमीनीवर आपटून मी ती चिरडतो........... असा चिरडेन मी तुला साल्या. शिपाईगिरी रक्तात आहे आमच्या. थोरल्या आबांचे वारस उगीच नाही आम्ही. ही सगळी पृथ्वी रिक्षारहित करेन आणि मगच प्राण सोडेन. अरे, ह्या छोट्या मोठ्या लढाया? ह्या हरल्या म्हणून काय झालं. The ultimate Victory is ours. माझ्यासारखी अठ्ठावीस वर्षाची कोवळी पोरं गंडवता?

हे मला एकट्याला झेपेलसं वाटत नाही. आबा आणि थोरल्या आजोबांची मदत घ्यायला हवी. पण ते तर मृत आहेत. मग? प्लॅंचेट. प्लॅंचेट करून त्यांना बोलावता येईल. मी टेबलावरचा खडू उचलतो आणि एका बाटलीचं झाकण घेतो. जमीनीवर एक गोल काढून त्याच्या मध्यभागी ते झाकण ठेवतो. आता पूर्वजांना मदतीचं आव्हान करायला हवं.

.......हे स्वर्गस्थ पूर्वजांनो, तुमच्या ह्या भाग्यशाली कुळातला नव्या दमाचा शिलेदार तुम्हाला आवाहन करीत आहे. या, आणि तुमच्या ह्या कुलदीपकाला तुमच्या दिव्य शक्तिस्रोताने भारून टाका. शक्ती द्या मला लढण्यासाठी कारण हे युद्ध साधंसुधं नाही. हे महायुद्ध आहे. नाही हे दोन व्यक्तींतलं, नाही वर्गातलं, हे महायुद्ध आहे दोन प्रवृत्तींतलं. एकीकडे आपला म्हणून मी तर दुसरीकडे त्यांचा म्हणून तो. रिक्षावाला. उन्मत्त, उद्दाम, उथळ, उलट्या काळजाचा रिक्षावाला. ज्याच्या नसानसांत भरलेय गुंडगिरी, दादागिरी. मिटरप्रमाणे पॆसे घेत नाही साला.

हा रुद्राचा आवज कुठून येतोय? प्रकाशही कमी झालाय. प्लॅंचेटचा परिणाम? .............या आबा, या थोरले आजोबा तुम्हीही या. शक्ती द्या मला लढण्यासाठी शक्ती द्या मला Please शक्ती द्या मला. Oh Its moving टोपण हललं प्लॅंचेट्ने येणार असा कॊल दिला. ते येणार शक्तीचे घट भरून आणणार, ते येणार, ते आले, ते आले, ते आले........... हा कसला आवाज? कोण टाळ्या वाजवतंय? छे.

रुद्राच्या मंत्रोच्चारात काही क्षण कसे गेले कळंत नाही. प्रकाशही पूर्ववत होतोय असं वाटतंय. सारं कसं शांत शांत वाटतंय........ मंजू, माझी मंजू. किती स्वप्न होती आपल्या दोघांची. कॉलेज संपण्याआधी लग्न केलं ते ही सगळी स्वप्न. प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच. वेळ कमी पडू नये म्हणून. पण प्रत्यक्षात मात्र, प्रत्यक्षात मात्र मी असा विचित्र वागायला लागलो. पण मी तरी काय करणार मंजू. त्याने आपल्याला जगूच द्यायचं नाही असं ठरवलं होतं ना. आपल्या प्रत्येक सुखाच्या आड येत होता तो रिक्षावाला. घरी, ऑफिसात, बाजारात, दुकानात. पण आता तू काळजी करू नकोस. आज त्या रिक्षावाल्यचा पुरता बंदोबस्त झालाय.

हरामखोरा, आम्ही चांगले नग उचलतो म्हणून तुमचं फावतं. आज थोरले आबा उभे आहेत तिच्या परतीच्या वटेवर. मंजूच्या. पाय बघायचेत काय तुला साल्या तिचे? पाय बघायचेत? बघ म्हणावं किती बघतो लुळे पाय ते. तिला कमरेखाली निकामी करण्याचं आश्वासन दिलंय थोरल्या आबांनी. कुबड्या देणारेत तिच्या हातांत. मंजूच्या. हो, काहीही करू शकतात ते. स्वर्गस्थ आहेत ते. आणि यदानकदा नाही जमलं, तर आबांनी गॅस सिलेंडर एवढ्यात मिळणार नाही ह्याची व्यवस्था केलेय. अरे, आबा म्हणजे आजोबा, वडील नाहीत मठ्ठा. ते अजून स्वर्गस्थ नाहीत. आणि मी इथे स्टोव्ह ला रॉकेल ची आंघोळ घालून ठेवलेय. पेटवला की भडका. आता सिलेंडर मिळाला नाही म्हणजे बाई स्टोव्ह पेटवणारच ना? बाई चांगल्या दिसतात म्हणून माना वळतात ना तूमच्या? आता वळवा माना, आता दाखवा हिम्मत मान वर करून बाईंकडे बघायची. मांजरासारखे सरळ व्हाल रे. ढुंगणाला पाय लावून पळूनंच जाशील तू.

विजयाचा कॆफ आता माझ्या नसानसांतून भिनलाय. रिक्षावाल्याचा पुरता बंदोबस्त झालाय. आबा आणि थोरल्या आबांनी मिळून त्याची पुरती वाट लावलेय........... सहा नंबरचा प्रतिकार काय आमचा? आता पहा आमची शिपाईगिरी............. शिपाई सावधान म्हणून मी सावधान पवित्रा घेतो. कोणी दरवाजा वाजवतंय का? असेल. आता कोणीही दरवाजा वाजवूदे. लढाई महत्त्वाची. शिपाईगिरी महत्त्वाची. युद्ध, महायुद्ध महत्त्वाचं.

..........ही मंजू माझ्या शेजारी येवून काय बरळतेय? सिलेंडर वर उचलून आणायला रिक्षावाल्याने मदत केली म्हणून सांगतेय. काय डोकं बिकं फिरलं का हिचं? ती बेअक्कल आहे. आपण आपली कवायत करावी. .......मी जोरात घोषणा देत कवायत करतो आणि मंजूच्या समोर येवून तिला एक salute ठोकतो impression मारायला. ती का रडतेय? आपला विजय झालाय मंजू. आपण जिंकलोय..... ती रडत रडत घराबाहेर निघून जाते...........

आला का हा रिक्षावाला पुन्हा. साल्या तुझं म्हणजे कुत्र्याच्या शेपटासारखं आहे. वाकडं ते वाकडंच. बायको सोडून गेली म्हणून मला डिवचू नकोस हरामखोरा. तुझ्या कुजकट बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मी एक दहा रुपायाची नोट त्याच्या अंगावर भिरकावतो आणि त्याला get out चा आदेश देतो. तो जवळ्जवळ घाबरूनच निघून जातो.......... हं, आता मी शांतपणे शिपाईगिरी करू शकेन. शिपाई salute कर. असं म्हणून मी एक salute ठोकतो.

समोरून एक लाल प्रकाश माझ्यावर एकवटतो. बिगुल वाजल्याचं पार्श्वसंगीत सुरू होतं. प्रकाश कमीकमी होत जातो, तसे समोरचे प्रेक्षक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करतात. पडदा हळू हळू बंद होतो. टाळ्यांचा कडकडाट चालूच रहातो. मी माझ्या नशेमेधे धुंद तिथेच उभा असतो. मघाशी मला धमकावणारा रिक्षावाला विंगेतून धावत येतो. मला आलिंगन देतो. नाटक संपलेलं असतं, मी भानावर येत असतो. पण नाटकाची ही नशा मात्र अधिकाधिक चढत जात असते.

___________________________________________________________________

हे वर्णन डॉ. चंद्रशेखर फणसळकर ह्यांच्या "रिक्षावाला" ह्या एकांकिकेतील शेवटच्या प्रवेशाचे आहे. वर्णनात असलेली संवादात्मक वाक्य ही त्या प्रवेशातून थेट उचलली आहेत.

___________________________________________________________________

Sunday, March 25, 2007

झोप

संध्याकाळचे साडेसहा सात वाजलेत. नुकताच अंधार होवू घातलाय. संधिप्रकाशाने आसमंत व्यापलाय. आजूबाजूची गर्द हिरवाई जाग्या होत असलेल्या अंधारामुळे अधिकच गर्द दिसू लगलेय. आम्ही अकरा जण रांगेत उभे आहोत. सगळ्यांच्या चेहेर्‍यावर "दमणूक" हीच चार अक्षरं दिसतायत.... आम्ही बसत का नाही? छे, शक्यच नाहीये ते..... एका बाजूला कडा आणि दुसर्‍या बाजूला दरी. मेधे जेमतेम दोन पावलं मावतील एवढी जागा एकामागोमाग अकरा जागा व्यापून आम्ही उभे....काय गरज होती trek ला यायची? तोपण इतका अवघड. घरी आरामात तंगड्या वर करून बसलो असतो आणि TV पाहिला असता....

थोडावेळ आजूबाजूचं भानच जातं. कालपासूनचा घटनाक्रम डोळ्यासमोर येतो. काल अनंतचतुर्दशी, शुक्रवार. घर ते ठाणे, संध्याकाळी साडेसातची लोकल. ठाणे ते पुणे रात्रीची एस्टी......छे लाल डब्यात झोप काही ती मिळत नाही....मग दगडूशेटची मिरवणूक. दोन तीन तास पायपीट. सकाळी लेट झालेली एस्टी. तोरण्याचा पायथा. सापांपासून सावध रहायला सांगणारा तो पोलिस. तीन तासांत तोरणा सर. जेवण. समोर दिसणारा राजगड. तोरण्यावरचा बुधला आणि बुधल्याच्या डव्या बाजूने खाली उतरणारी पायवाट. मग जीतोड चाल. फक्त चाल चाल आणि चालच.........जांभई येतेय का? इथे? अत्ता? कधी झोपलो होतो शेवटी? परवा. बरोबर, जांभई.....

पुढे गेलेल्या दोघांच्या हाका उरलेल्या अकरांची गुंगी उडवतात. राजगड तर समोर आहे, अगदी समोर. कड्यापर्यंत जावू शकतो, पण वर जायला वाट नाही. दहा जणांची गुंगी आणि अकराव्याची झोप उडते.......जेवढं अंतर आलो तेवढं परत चालायला लागणार. मघाशी वाटलं होतं वाट चुकलो म्हणून.........सव्वीस पावलं माघारी वळतात. समोर एक आदिवासी पाडा दिसतोय. सर्वानुमते थांबायचा निर्णय होतो......पण त्या पाड्यापर्यंत जायचं म्हणजे अजून एक तास तरी जाणार, मग गडावरच का जावू नये.....

तेवढ्यात एक मावळा समोरून येताना दिसतो. तो तेराही जणांना गडावर पोहोचवायचं आश्वासन देतो, अवघ्या शंभर रुपयात.....फक्त शंभर रुपये? गंडवत तर नहिये ना? नसेल.......आता तेरामधे दोन तट पडतात. काही म्हणतात आज राजगड शक्य नाही. खाली राहूया. दुसरे म्हणतात. ही तर हार. राजगड सर करायचाच...... थांबावं की जावं?.....पाय म्हणतात थांबावं, मन म्हणतं जावं. मी पायांना थोपवतो आणि मनाला मानतो.

आता आम्ही चवदा. पुढे मावळा, मागे तेरा.......हा कुठे चालला झाडीत? ह्याला तरी माहिती असेल ना राजगडाचा रस्ता? बहुतेक असेल......झाडीत शिरल्यावर अंधार. विजेर्‍या बाहेर येतात. चवदा जणांकडे मिळून तीन. पहिली मावळ्याच्या हातात. दुसरी तेरव्याकडे आणि तिसरी मधे कुठेतरी.......कुठे चाललोय? चढतोय खरे म्हणजे वरंच जात असणार....

एक छोटंसं पठार. दोघंतिघं विश्रांती मागतात. दिली जाते. पाणी. पाणी संपतंय. रेशन करायला हवंय. सातव्याच्या पायांत गोळा आलाय. सातवा सगळं पाणी पितो. उरलेल्यात मीठ घालून त्याच्या हातात दिलं जातं..... नक्की पायांत गोळा आलाय का पाण्यासाठी? छे, सातवा असं करणं शक्य नाही......

पुन्हा मावळा पुढे आणि तेरा मागे. सातवा मधून मधून रडतोच आहे. पुन्हा चवदा उतरायला लागतात.....उतरणं नको. जेवढं उतरू तेवढंच पुन्हा चढायला लागणार.......पाय नाराज. मावळा समोरचा डोंगर दाखवतो. ही टेकडी पार केली की चिकटलोच गडाला. पायांची नाराजी थोडीशी कमी.....ह्याला नक्की रस्ता माहितेय का?...

टेकडी पार होते. छोटंसं पाठार.....दिवे? हा दिवा कसला? रायगडावर दिवे होते माहित होतं राजगडावर कधी?.......झुडुपांतून बाहेर पडल्यामुळे वाढलेल्या प्रकाशाला डोळे सरावतात. पांढर्‍या दिव्याच्या जागी पॊर्णिमेचा चंद्र दिसायला लागतो..... अप्रतिम. पांढरा शूभ्र दूधासारखा. डागही किती स्पष्ट दिसतायत. अरे कुठे गेला? झाडाआड?.... चवदा पुढे चालत रहातात. आता शेवटचा वाटावा असा खडा चढ. पाय पुन्हा रडतात. सातवाही रडतो. दोघांना वर असलेल्या थंड पाण्याच्या टाक्यांची गाजरं.

...पोचलो....संजीवनी माची. पाण्याच्या टाक्या....चांगलं असेल का पाणी? कसंही का असेना....ग्लुकोजचे पुडे आणि त्यावर हवंतेवढं पाणी. पाय शांत, पोट शांत, मन शांत. विडीकाडीवाले विड्या शिलगावतात. मावळा पण एक विडी घेतो. पांढर्‍या विडीचं त्याला नवल. तो सगळं पाकीट ठेवून घेतो. दुसर्‍याला खरं तर त्याचं पाकीट परत हवं असतं. पण गडावर पोहोचल्याच्या खुषीत तो दिलदार होतो.

मावळा परततो. आता पहिला परत पहिला होतो. त्याच्या पाठून बारा बालेकिल्ल्याच्या दिशेने निघतात. बालेकिल्ला बाजूला ठेवून तेरा पद्मावतीच्या दिशेने चालतात. थोडा वेळ चालल्यावर पद्मावती माची येते.....देवळात रहायचं होतं पद्मावतीच्या. आहे का जागा? आत लोकं झोपलेयत. आता काय ह्या थंडीत उघड्यावर झोपावं लागणार की काय? दारूखाना बघूया. दारूखान्यात एक दोनच आहेत.....

सगळे तेरा दारूखान्यात शिरतात. मी माझी सॅक खाली ठेवतो. उघडून आतलं हंतरूण, पांघरूण काढतो. पांघरूण जमिनीवर पसरतो. हंतरूण पांघरायला घेतो......चला पोचलो एकदाचे. आहाहा. पाठ टेकल्यावर जमिनीला काय बरं वाटतंय........................................पुढे? सकाळ......

Saturday, March 10, 2007

मी, the "I"

लहानपणी समुद्रावर गेलो की नेहेमी वाळूचे किल्ले बनवायचो. फार मजा यायची. त्याचा तो खड्डा खणून बनवलेला मोठा दरवाजा, बुरूज, खोटेखोटे सॆनिक, वाळूचे रस्ते. सगळा मनासारखा संसार. क्षणभर वाटायचं, की आपण तर राजेच झालो. तास दोन तास चांगला खेळ रंगायचा. भरतीचं पाणी चढायला लागायचं आणि मी चक्क तिथून निघून यायचो, किल्ला मोडायच्या आत.

आपलं आयुष्यपण ह्या वाळूच्या किल्ल्यासारखंच आहे की नाही? दोन घटकांची करमणूक. आपण आपलं म्हणायचं मी ह्यॅव केलं नी मी त्यॅव केलं. शेवटी भरती आली की किल्ला मोडणारंच ना? कुणीही तो किल्ला बांधला असला तरीही.

हा 'मी' तरी आपल्या बोलण्यात कितिदा असतो नाही. दहा वाक्य बोलली जातात तेव्हा पंधरा वेळा त्यात 'मी' येतो. आणि ह्या 'मी' च्या कथा तरी किती सुरस. एखादा 'मी' शाळेत पहिला नंबर काढतो. कोणता 'मी' शर्यतीत पहिला येतो. एखाद्या 'मी' ला दुसर्‍या एखाद्या 'मी' ची शाबासकी मिळते. कोण 'मी' बोर्डात येतो. कोण 'मी' engineer किंवा doctor होतो. एखादी 'मी' दुसर्‍या एखाद्या 'मी' शी लग्न करते. पुढे त्यांना एखादा किंवा एखादी 'मी' होतो किंवा होते. काही 'मी' एकत्र येतात, घरं बांधतात, संस्था काढतात, राजकीय पक्षसुद्धा काढतात. थोड्या वेळापुरते त्यांचे 'आम्ही' होतात. पण शेवटी 'आम्ही' मध्ये सुद्धा 'मी' हा असतोच.

जगामध्ये 'मी' एकटाच आहे, असं माझ्यासारख्या बर्‍याच खुळ्यांना वाटतं. पण जगामधे 'मी' सोडून दुसरे आहेत तरी कोण? सगळे प्रथम 'मी'च असतात. आपण फक्त त्यांना वेगवेगळी नावं ठेवतो.

कुठे कधी सुनामी येते, भूकंप येतो. कुठे accident होतो, तर कुठे दहशतवादी हल्ला होतो. किड्या मुंग्यांसारखी माणसं मरतात, नव्हे किड्या मुंग्यांसारखे असंख्य 'मी' मरतात. जगात किती 'मी' रोज मरत असतील नाही? आपल्यासारखेच त्या 'मीं'चे देखिल plans असतील. कुणाचं लग्न ठरलं असेल, कुणाला बाळ होणार असेल, कुणाचा result असेल, आपल्यासारखं त्या 'मीं'च विश्व असेल. पण नशीबाची एक लाट आणि काल परवापर्यंत 'मी' असणारे ते सगळे 'मी' रहातच नाहीत. क्षणात कायमचे 'ते' होवून जातात. अंगावर काटा उभा रहातो. आपणही कधी वृत्तपत्रातल्या बातमीतले आकडे झालो तर? जे त्या 'मीं'च झालं तेच आपलंही होईल. मझ्या मनात ते बातमीतले आकडे 'मी' म्हणून फेर धरतात.

कशासाठी करत असू आपण ही 'मी'गिरी. किती अतिसूक्ष्म भाग आहोत आपण ह्या अंतराळातले. समुद्राच्या एका थेंबालाही असेल एवढं अस्तित्वही आपल्याला नाही. तरीही. कदाचित तो जीवसृष्टीचाच नियम असेल. ती माकडीण आणि तिचं ते पायाखाली धरलेलं पिल्लू.

बरं उद्यापासून 'मी'गिरी सोडून द्यावी, तर संतपण घेण्याइतकं वय पण नाही झालेलं. मग मझ्यासारख्या पामराने करावं तरी काय? मी सांगतो मी काय केलं. (बघा हा पठ्ठ्या 'मी' पुन्हा दोन वेळा आला) एक दीर्घ श्वास घेतला, मग एक छानसं गाणं ऎकलं. सगळे मी दूर पळाले. इतकंही करून नाही जमलं, तर बायकोला "तू किती सुंदर दिसतेस" असा म्हणा. झकास लाजेल ती. तुम्ही बायको असाल, तर नवरा असं म्हणतोय अशी कल्पना करा. आणि लग्नच झालं नसेल तर (करू नका!!!), तुमचं तुम्हीच ठरवा.

अहो तास दोन तासाचा खेळ असला म्हणून काय झालं? किल्ला व्यवस्थित बांधून स्वतःला घटकाभर का होईना राजेपद देण्यात काय हरकत आहे. भरती काय येणारच आहे तुम्ही किल्ले बांधा नाहीतर नका बांधू. किल्ला वाहून गेला तर जाउदे की, शेवटी दोन तास आनंदात घालवणं महत्त्वाचं नाही का? तेव्हा माझ्यापुरतं तरी मी ठरवलंय, ह्या 'मी' theory of relativity मध्ये पडायचंच नाही. बेंबीच्या देठापासून ओरडून जगाला सांगायचं, मी, the I...........

Saturday, March 03, 2007

मी, माझा देश आणि डॉक्टर..

परदेशात रहायला आल्यापासून कोणत्या गोष्टीची मला सर्वाधिक भिती वाटली असेल तर ती म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची. तसं वरवर पहिलं तर इथले डॉक्टर प्रेमळ वगॆरे वाटतातच आणि त्यात जर डॉक्टरीण बाई असतील, तर हे प्रेम जरा जास्त जाणवतंसुद्धा. आपलं गुलजार हसू रोग्यावर फेकून, त्याचा निम्मा आजार बरा होतो अशी कोणती पाश्चात्य उपचारपद्धती असेल तर माहित नाही.

सहसा दवाखान्यात आपण गेलो, की आपलं स्वागत होतं "Hello, how are you today?" ने. आता मला सांगा, मी जर "Good" असतो, तर मी मरायला दवाखान्यात आलो असतो का? मग असा प्रश्न विचारयचाच कशाला? पण एक आपली सवय. मग मीपण मुळातच वाकडं असलेलं आणि आजारपणामुळे आणखी वाकडं झालेलं माझं मुखकमल शक्य तितकं सरळ करून "Good" असं उत्तर देतो. वर तिला तोच "How are you today?" परत विचारतो. त्यावर तत्परतेने "Good" असं उत्तर येतं. ही good नसायला काय झालंय? माझा निम्मा खिसा थोड्याच वेळात हिच्या खिशात रिकामा होणारे. मी खिसा शोधत रहातो.

मग थोड्या शिळोप्याच्या गप्पा मारून झाल्या, म्हणजे आजची हवा कशी छान किंवा वाईट आहे अशा असंबद्ध सदराखाली मोडणार्‍या, की मग मूळ विषयाला हात घातला जातो. आता आपण पडलो, मराठीतून English बोलणारे. मी तिला, मला चक्कर येतेय मधेमधे, हे विविध english शब्दांच्या सहाय्याने सांगायचा प्रयत्न करतो. बराच वेळ अशी शाब्दिक कबड्डी रंगल्यावर, ती मला ह्याला Vertigo म्हणतात असं सांगते. त्या चक्करलेल्या अवस्थेतसुद्धा मी तो शब्द पाठ करून टाकतो. पुढच्या वेळी पोपट व्हायला नको म्हणून.

मग ती बाई मला अजून काही होतंय का हे जाणून घेण्याचा विफल प्रयत्न करून पहाते. शेवटी मला जो काही रोग झालाय त्याचं ती नाव सांगते. ते अर्थातंच माझ्या डोक्यावरून जातं. पण तशाही अवस्थेत मी धिटाई दाखवून तिला एक प्रश्न विचारतो. तिला वाटतं की मला तिचं निदान पटलेलं नाही. ती सरळ उठते बाजूच्या कपाटातलं पुस्तक काढते आणि मला एक पान काढून दाखवते आणि म्हणते, हे बघ, मला वाटत होतं तसंच झालंय. तुझे symtoms ह्या आजारशीच मॅच होतायत. डॉक्टर लोकंसुद्धा पुस्तकांत बघून रोगाचं निदान पक्क करतात हे पाहून मला अजून जोरात चक्कर येते आणि पडता पडता मी (मराठीत) बरळतो........डॉक्टर तुम्हीसुद्धा?.....

असंच एकदा, एका कठीण trek नंतर गुढगा दुखंत असल्याची तक्रार घेवून, मी डॉक्टरकाडे जातो. नेहमीप्रमाणं जुजबी ऒषधांनी काही उपयोग होत नाही हे पाहिल्यावर तो मला X-ray काढायला पाठवतो. X-ray पाहून त्याला माझ्या गुढग्यात काहीच problem दिसत नसल्याचं तो मला सांगतो. मला ऎकून आनंद होतो. पण तो आनंद जास्त काळ टिकू न देता, तो, माझा गुडघा कधीच बरा होणार नसल्याचं सांगतो. आणि वर, शक्यतो सपाट रस्त्यांवर चाल. उंच सखल भागात फिरू नको. जिने चढू नको, अशी जाचक पथ्य सुचवतो. मी वेडाच होतो. तसाच चालत (tram न घेता) सात किलोमीटर चालत येतो. गुढगा Solid दुखतो. पण दुसर्‍या दिवशी मात्र सबकुछ Normal. आता काय म्हणावं ह्याला?

तेव्हापासून डॉक्टरची भिती जी मनात बसली, ती कायमची. अगदी कालपर्यंत. कुठेच बरेच दिवस धडपडण्याच योग आला नव्हता, तो एका गाडीवानाच्या कृपेने, दुचाकीवरून रस्त्यावर पडून, जुळून आला. डावा खांदा त्यच्या असण्याची नको तितकी जाणीव करून देत होता. इतकी की रात्री झोपेतसुद्धा तो मला त्रास देत होता. शेवटी पुन्हा एकदा inevitable करायचं ठरवलं. डॉक्टरकडे पोचलो. त्यांनी How are you? विचारलंच नाही. सरळ "काय होतंय" असं मराठीतच विचारलं. त्यमुळे english मध्ये काही explain करण्याचा प्रश्नच उरला नाही. त्यांनी पुस्तक वगॆरे न उघडता मला काय झालंय ते सांगितलं ऒषध लिहून दिलं ते घेवून माझा खांदापण शांत झाला आणि चक्क मी काहीही त्रास न होता हा post type करतोय.

शेवटी शरीरालासुद्धा आपल्या देशातला, आपली भाषा बोलणारा, आपल्यासारखा वागणारा डॉक्टरंच अधिक भावला. माझा doctorofobia गेला आणि मनातली डॉक्टरची भीती कुठल्याकुठे पळाली. परदेशस्थ भारतीयांना, भारतीय अन्न, भारतीय कपडे, भारतीय भाषा, भारतीय संस्कृती आणि भारतीय डॉक्टर ह्यांच्याशिवाय पर्याय नाही, हेच खरं.