Sunday, March 25, 2007

झोप

संध्याकाळचे साडेसहा सात वाजलेत. नुकताच अंधार होवू घातलाय. संधिप्रकाशाने आसमंत व्यापलाय. आजूबाजूची गर्द हिरवाई जाग्या होत असलेल्या अंधारामुळे अधिकच गर्द दिसू लगलेय. आम्ही अकरा जण रांगेत उभे आहोत. सगळ्यांच्या चेहेर्‍यावर "दमणूक" हीच चार अक्षरं दिसतायत.... आम्ही बसत का नाही? छे, शक्यच नाहीये ते..... एका बाजूला कडा आणि दुसर्‍या बाजूला दरी. मेधे जेमतेम दोन पावलं मावतील एवढी जागा एकामागोमाग अकरा जागा व्यापून आम्ही उभे....काय गरज होती trek ला यायची? तोपण इतका अवघड. घरी आरामात तंगड्या वर करून बसलो असतो आणि TV पाहिला असता....

थोडावेळ आजूबाजूचं भानच जातं. कालपासूनचा घटनाक्रम डोळ्यासमोर येतो. काल अनंतचतुर्दशी, शुक्रवार. घर ते ठाणे, संध्याकाळी साडेसातची लोकल. ठाणे ते पुणे रात्रीची एस्टी......छे लाल डब्यात झोप काही ती मिळत नाही....मग दगडूशेटची मिरवणूक. दोन तीन तास पायपीट. सकाळी लेट झालेली एस्टी. तोरण्याचा पायथा. सापांपासून सावध रहायला सांगणारा तो पोलिस. तीन तासांत तोरणा सर. जेवण. समोर दिसणारा राजगड. तोरण्यावरचा बुधला आणि बुधल्याच्या डव्या बाजूने खाली उतरणारी पायवाट. मग जीतोड चाल. फक्त चाल चाल आणि चालच.........जांभई येतेय का? इथे? अत्ता? कधी झोपलो होतो शेवटी? परवा. बरोबर, जांभई.....

पुढे गेलेल्या दोघांच्या हाका उरलेल्या अकरांची गुंगी उडवतात. राजगड तर समोर आहे, अगदी समोर. कड्यापर्यंत जावू शकतो, पण वर जायला वाट नाही. दहा जणांची गुंगी आणि अकराव्याची झोप उडते.......जेवढं अंतर आलो तेवढं परत चालायला लागणार. मघाशी वाटलं होतं वाट चुकलो म्हणून.........सव्वीस पावलं माघारी वळतात. समोर एक आदिवासी पाडा दिसतोय. सर्वानुमते थांबायचा निर्णय होतो......पण त्या पाड्यापर्यंत जायचं म्हणजे अजून एक तास तरी जाणार, मग गडावरच का जावू नये.....

तेवढ्यात एक मावळा समोरून येताना दिसतो. तो तेराही जणांना गडावर पोहोचवायचं आश्वासन देतो, अवघ्या शंभर रुपयात.....फक्त शंभर रुपये? गंडवत तर नहिये ना? नसेल.......आता तेरामधे दोन तट पडतात. काही म्हणतात आज राजगड शक्य नाही. खाली राहूया. दुसरे म्हणतात. ही तर हार. राजगड सर करायचाच...... थांबावं की जावं?.....पाय म्हणतात थांबावं, मन म्हणतं जावं. मी पायांना थोपवतो आणि मनाला मानतो.

आता आम्ही चवदा. पुढे मावळा, मागे तेरा.......हा कुठे चालला झाडीत? ह्याला तरी माहिती असेल ना राजगडाचा रस्ता? बहुतेक असेल......झाडीत शिरल्यावर अंधार. विजेर्‍या बाहेर येतात. चवदा जणांकडे मिळून तीन. पहिली मावळ्याच्या हातात. दुसरी तेरव्याकडे आणि तिसरी मधे कुठेतरी.......कुठे चाललोय? चढतोय खरे म्हणजे वरंच जात असणार....

एक छोटंसं पठार. दोघंतिघं विश्रांती मागतात. दिली जाते. पाणी. पाणी संपतंय. रेशन करायला हवंय. सातव्याच्या पायांत गोळा आलाय. सातवा सगळं पाणी पितो. उरलेल्यात मीठ घालून त्याच्या हातात दिलं जातं..... नक्की पायांत गोळा आलाय का पाण्यासाठी? छे, सातवा असं करणं शक्य नाही......

पुन्हा मावळा पुढे आणि तेरा मागे. सातवा मधून मधून रडतोच आहे. पुन्हा चवदा उतरायला लागतात.....उतरणं नको. जेवढं उतरू तेवढंच पुन्हा चढायला लागणार.......पाय नाराज. मावळा समोरचा डोंगर दाखवतो. ही टेकडी पार केली की चिकटलोच गडाला. पायांची नाराजी थोडीशी कमी.....ह्याला नक्की रस्ता माहितेय का?...

टेकडी पार होते. छोटंसं पाठार.....दिवे? हा दिवा कसला? रायगडावर दिवे होते माहित होतं राजगडावर कधी?.......झुडुपांतून बाहेर पडल्यामुळे वाढलेल्या प्रकाशाला डोळे सरावतात. पांढर्‍या दिव्याच्या जागी पॊर्णिमेचा चंद्र दिसायला लागतो..... अप्रतिम. पांढरा शूभ्र दूधासारखा. डागही किती स्पष्ट दिसतायत. अरे कुठे गेला? झाडाआड?.... चवदा पुढे चालत रहातात. आता शेवटचा वाटावा असा खडा चढ. पाय पुन्हा रडतात. सातवाही रडतो. दोघांना वर असलेल्या थंड पाण्याच्या टाक्यांची गाजरं.

...पोचलो....संजीवनी माची. पाण्याच्या टाक्या....चांगलं असेल का पाणी? कसंही का असेना....ग्लुकोजचे पुडे आणि त्यावर हवंतेवढं पाणी. पाय शांत, पोट शांत, मन शांत. विडीकाडीवाले विड्या शिलगावतात. मावळा पण एक विडी घेतो. पांढर्‍या विडीचं त्याला नवल. तो सगळं पाकीट ठेवून घेतो. दुसर्‍याला खरं तर त्याचं पाकीट परत हवं असतं. पण गडावर पोहोचल्याच्या खुषीत तो दिलदार होतो.

मावळा परततो. आता पहिला परत पहिला होतो. त्याच्या पाठून बारा बालेकिल्ल्याच्या दिशेने निघतात. बालेकिल्ला बाजूला ठेवून तेरा पद्मावतीच्या दिशेने चालतात. थोडा वेळ चालल्यावर पद्मावती माची येते.....देवळात रहायचं होतं पद्मावतीच्या. आहे का जागा? आत लोकं झोपलेयत. आता काय ह्या थंडीत उघड्यावर झोपावं लागणार की काय? दारूखाना बघूया. दारूखान्यात एक दोनच आहेत.....

सगळे तेरा दारूखान्यात शिरतात. मी माझी सॅक खाली ठेवतो. उघडून आतलं हंतरूण, पांघरूण काढतो. पांघरूण जमिनीवर पसरतो. हंतरूण पांघरायला घेतो......चला पोचलो एकदाचे. आहाहा. पाठ टेकल्यावर जमिनीला काय बरं वाटतंय........................................पुढे? सकाळ......

7 comments:

Tulip said...

एकदम झकास वर्णन.

मला कळसूबाई आठवला आमचा. अशीच डोळ्यात झोप वर जायला त्राण नाही आणि खाली उतरायला प्राण नाही:)).

Abhijit Bathe said...

गुड!
मग? सकाळी कसं वाटलं?

Parag said...

masta.. :) rajgad khup masta ahe.. amhi gelo hoto tevha chor vateni jatana khup vaat lagali hoti.. pan experince was awesome.. !

स्नेहल said...

mast lihil aahes :) to "saatava" mhanaje tuch kaa? :P

कोहम said...

ट्युलिप, अभिजीत, पराग, स्नेहल, प्रतिसादाबद्धल धन्यवाद. thankfully तो सातवा मी नव्हतो. पण असूही शकलो असतो. सकाळी एकदम छान वाटलं, मग बालेकिल्ला, सुवेळा माची आणि तिथलं प्रसिद्ध नेढं बघून परतलो.

HAREKRISHNAJI said...

राजगडाची मौज खरच न्यारी आहे. मे महिन्यात मी तेथे कडाक्याची थंडी अनुभवली आहे.

Deepak said...

... मस्त लिहितोस रे..! ..... "दहा जणांची गुंगी आणि अकराव्याची झोप उडते......." अगदी रास्त..!
ब-यापैकी असाच अनुभव आमचा होता.. पण एक मात्र आहे - गड,किल्ले यांच्या भेटीनंतर मी फार मनःशांती आणि आनंद अनुभवतो... जरुरी नाही की प्रत्येकाचा अनुभव वा विचार माझ्यासारखेच असतील/ असावेत...