Saturday, March 10, 2007

मी, the "I"

लहानपणी समुद्रावर गेलो की नेहेमी वाळूचे किल्ले बनवायचो. फार मजा यायची. त्याचा तो खड्डा खणून बनवलेला मोठा दरवाजा, बुरूज, खोटेखोटे सॆनिक, वाळूचे रस्ते. सगळा मनासारखा संसार. क्षणभर वाटायचं, की आपण तर राजेच झालो. तास दोन तास चांगला खेळ रंगायचा. भरतीचं पाणी चढायला लागायचं आणि मी चक्क तिथून निघून यायचो, किल्ला मोडायच्या आत.

आपलं आयुष्यपण ह्या वाळूच्या किल्ल्यासारखंच आहे की नाही? दोन घटकांची करमणूक. आपण आपलं म्हणायचं मी ह्यॅव केलं नी मी त्यॅव केलं. शेवटी भरती आली की किल्ला मोडणारंच ना? कुणीही तो किल्ला बांधला असला तरीही.

हा 'मी' तरी आपल्या बोलण्यात कितिदा असतो नाही. दहा वाक्य बोलली जातात तेव्हा पंधरा वेळा त्यात 'मी' येतो. आणि ह्या 'मी' च्या कथा तरी किती सुरस. एखादा 'मी' शाळेत पहिला नंबर काढतो. कोणता 'मी' शर्यतीत पहिला येतो. एखाद्या 'मी' ला दुसर्‍या एखाद्या 'मी' ची शाबासकी मिळते. कोण 'मी' बोर्डात येतो. कोण 'मी' engineer किंवा doctor होतो. एखादी 'मी' दुसर्‍या एखाद्या 'मी' शी लग्न करते. पुढे त्यांना एखादा किंवा एखादी 'मी' होतो किंवा होते. काही 'मी' एकत्र येतात, घरं बांधतात, संस्था काढतात, राजकीय पक्षसुद्धा काढतात. थोड्या वेळापुरते त्यांचे 'आम्ही' होतात. पण शेवटी 'आम्ही' मध्ये सुद्धा 'मी' हा असतोच.

जगामध्ये 'मी' एकटाच आहे, असं माझ्यासारख्या बर्‍याच खुळ्यांना वाटतं. पण जगामधे 'मी' सोडून दुसरे आहेत तरी कोण? सगळे प्रथम 'मी'च असतात. आपण फक्त त्यांना वेगवेगळी नावं ठेवतो.

कुठे कधी सुनामी येते, भूकंप येतो. कुठे accident होतो, तर कुठे दहशतवादी हल्ला होतो. किड्या मुंग्यांसारखी माणसं मरतात, नव्हे किड्या मुंग्यांसारखे असंख्य 'मी' मरतात. जगात किती 'मी' रोज मरत असतील नाही? आपल्यासारखेच त्या 'मीं'चे देखिल plans असतील. कुणाचं लग्न ठरलं असेल, कुणाला बाळ होणार असेल, कुणाचा result असेल, आपल्यासारखं त्या 'मीं'च विश्व असेल. पण नशीबाची एक लाट आणि काल परवापर्यंत 'मी' असणारे ते सगळे 'मी' रहातच नाहीत. क्षणात कायमचे 'ते' होवून जातात. अंगावर काटा उभा रहातो. आपणही कधी वृत्तपत्रातल्या बातमीतले आकडे झालो तर? जे त्या 'मीं'च झालं तेच आपलंही होईल. मझ्या मनात ते बातमीतले आकडे 'मी' म्हणून फेर धरतात.

कशासाठी करत असू आपण ही 'मी'गिरी. किती अतिसूक्ष्म भाग आहोत आपण ह्या अंतराळातले. समुद्राच्या एका थेंबालाही असेल एवढं अस्तित्वही आपल्याला नाही. तरीही. कदाचित तो जीवसृष्टीचाच नियम असेल. ती माकडीण आणि तिचं ते पायाखाली धरलेलं पिल्लू.

बरं उद्यापासून 'मी'गिरी सोडून द्यावी, तर संतपण घेण्याइतकं वय पण नाही झालेलं. मग मझ्यासारख्या पामराने करावं तरी काय? मी सांगतो मी काय केलं. (बघा हा पठ्ठ्या 'मी' पुन्हा दोन वेळा आला) एक दीर्घ श्वास घेतला, मग एक छानसं गाणं ऎकलं. सगळे मी दूर पळाले. इतकंही करून नाही जमलं, तर बायकोला "तू किती सुंदर दिसतेस" असा म्हणा. झकास लाजेल ती. तुम्ही बायको असाल, तर नवरा असं म्हणतोय अशी कल्पना करा. आणि लग्नच झालं नसेल तर (करू नका!!!), तुमचं तुम्हीच ठरवा.

अहो तास दोन तासाचा खेळ असला म्हणून काय झालं? किल्ला व्यवस्थित बांधून स्वतःला घटकाभर का होईना राजेपद देण्यात काय हरकत आहे. भरती काय येणारच आहे तुम्ही किल्ले बांधा नाहीतर नका बांधू. किल्ला वाहून गेला तर जाउदे की, शेवटी दोन तास आनंदात घालवणं महत्त्वाचं नाही का? तेव्हा माझ्यापुरतं तरी मी ठरवलंय, ह्या 'मी' theory of relativity मध्ये पडायचंच नाही. बेंबीच्या देठापासून ओरडून जगाला सांगायचं, मी, the I...........

7 comments:

अनु said...

"बरं उद्यापासून 'मी'गिरी सोडून द्यावी, तर संतपण घेण्याइतकं वय पण नाही झालेलं. मग मझ्यासारख्या पामराने करावं तरी काय? मी सांगतो मी काय केलं. (बघा हा पठ्ठ्या 'मी' पुन्हा दोन वेळा आला) एक दीर्घ श्वास घेतला, मग एक छानसं गाणं ऎकलं. सगळे मी दूर पळाले. इतकंही करून नाही जमलं, तर बायकोला "तू किती सुंदर दिसतेस" असा म्हणा. झकास लाजेल ती. तुम्ही बायको असाल, तर नवरा असं म्हणतोय अशी कल्पना करा. आणि लग्नच झालं नसेल तर (करू नका!!!), तुमचं तुम्हीच ठरवा.
"
ha para jast avadala.
Mazya blogacha duva tumachya blogavar dilyabaddal mi tumhala "duva" (davaon ki nahi, duvaon ki jarurat hai vala duva)dete.

Priyabhashini said...

वा! मस्त आहे लेख. आपण या "मी"ला जन्मभर लेबलं लावत असतो. अशी आणि तशी, आणि त्या लेबलांच्या मागचा मी एक दिवस दिसेनासा होतो.

संतपद घेऊही नका, सामान्य माणूस असण्यात (म्हणजे पैसे, विद्या यात नाही पण भलेमोठे विचार करण्यात) आणि सामान्य, सरळ साधे विचार करण्यातही आगळीच मजा असते.

ता.क. - लग्नाला दोन-चार वर्षे झाली असतील तर बायको "तू किती सुंदर दिसतेस" या वाक्याने लाजेल. ८-१० वर्षांनी तुमच्याकडे संशयाने पाहिल आणि २०-२५ वर्षांनी न ऐकल्यासारखं दाखवेल. :D (हे आपलं उगीच. हलकेच घ्या)

मनोगत आवडले.

Unknown said...

tuez manogat aawadale.

HAREKRISHNAJI said...

लहानपणी समुद्रावर गेलो की नेहेमी वाळूचे किल्ले बनवायचो मी सुद्धा.

'मी'गिरी वर आपण छान लिहिले आहेत.मी म्हणजे कोण ? भलेभले ह्याच्या कचाट्यातुन सुटलेले नाहीत. "मी सुद्धा" ह्याच मुळे मला फार त्रास सहन करायला लागतो.

ता.क माझ्या बायकोला "तू किती सुंदर दिसतेस" असे म्ह्टले तर ती आता संशय घेउ लागते. मी का बरे कश्यासाठी मस्का लावतो आहे ?

कोहम said...

अनु, आशीष, प्रतिसदाबद्धल धन्यवाद. प्रीयभाषिणी आणि हरेकृष्णाजी, आपला अनुभवी सल्ला ऎकल्यावर हल्ली रोज न चुकता बायकोला ती सुंदर दिसते हे सांगतो, उगाच काही वर्षांनी संशय यायला नको..

Unknown said...

फारच छान ! आवडलं मनोगत....

Ranjeet said...

आपण सम्पुर्ण आयुष्य ’मी’, ’मला’, ’माझे’ ह्या मध्ये घालवतो...अमेरिका हा देश तर ’मी’ वर बसलेला देश आहे. They support indivisuality and glorify selfishness in their society.

Often, when we face challenges / obstaces in our life, we are intimidated by those things and challenges at that point in time...but when we pass that and look back, we find those very challenges to be very small, easy and silly.

बहुदा मरण हे माणसाला उत्तर देइल की ’मी’ किती छोटा होतो.