Saturday, March 03, 2007

मी, माझा देश आणि डॉक्टर..

परदेशात रहायला आल्यापासून कोणत्या गोष्टीची मला सर्वाधिक भिती वाटली असेल तर ती म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची. तसं वरवर पहिलं तर इथले डॉक्टर प्रेमळ वगॆरे वाटतातच आणि त्यात जर डॉक्टरीण बाई असतील, तर हे प्रेम जरा जास्त जाणवतंसुद्धा. आपलं गुलजार हसू रोग्यावर फेकून, त्याचा निम्मा आजार बरा होतो अशी कोणती पाश्चात्य उपचारपद्धती असेल तर माहित नाही.

सहसा दवाखान्यात आपण गेलो, की आपलं स्वागत होतं "Hello, how are you today?" ने. आता मला सांगा, मी जर "Good" असतो, तर मी मरायला दवाखान्यात आलो असतो का? मग असा प्रश्न विचारयचाच कशाला? पण एक आपली सवय. मग मीपण मुळातच वाकडं असलेलं आणि आजारपणामुळे आणखी वाकडं झालेलं माझं मुखकमल शक्य तितकं सरळ करून "Good" असं उत्तर देतो. वर तिला तोच "How are you today?" परत विचारतो. त्यावर तत्परतेने "Good" असं उत्तर येतं. ही good नसायला काय झालंय? माझा निम्मा खिसा थोड्याच वेळात हिच्या खिशात रिकामा होणारे. मी खिसा शोधत रहातो.

मग थोड्या शिळोप्याच्या गप्पा मारून झाल्या, म्हणजे आजची हवा कशी छान किंवा वाईट आहे अशा असंबद्ध सदराखाली मोडणार्‍या, की मग मूळ विषयाला हात घातला जातो. आता आपण पडलो, मराठीतून English बोलणारे. मी तिला, मला चक्कर येतेय मधेमधे, हे विविध english शब्दांच्या सहाय्याने सांगायचा प्रयत्न करतो. बराच वेळ अशी शाब्दिक कबड्डी रंगल्यावर, ती मला ह्याला Vertigo म्हणतात असं सांगते. त्या चक्करलेल्या अवस्थेतसुद्धा मी तो शब्द पाठ करून टाकतो. पुढच्या वेळी पोपट व्हायला नको म्हणून.

मग ती बाई मला अजून काही होतंय का हे जाणून घेण्याचा विफल प्रयत्न करून पहाते. शेवटी मला जो काही रोग झालाय त्याचं ती नाव सांगते. ते अर्थातंच माझ्या डोक्यावरून जातं. पण तशाही अवस्थेत मी धिटाई दाखवून तिला एक प्रश्न विचारतो. तिला वाटतं की मला तिचं निदान पटलेलं नाही. ती सरळ उठते बाजूच्या कपाटातलं पुस्तक काढते आणि मला एक पान काढून दाखवते आणि म्हणते, हे बघ, मला वाटत होतं तसंच झालंय. तुझे symtoms ह्या आजारशीच मॅच होतायत. डॉक्टर लोकंसुद्धा पुस्तकांत बघून रोगाचं निदान पक्क करतात हे पाहून मला अजून जोरात चक्कर येते आणि पडता पडता मी (मराठीत) बरळतो........डॉक्टर तुम्हीसुद्धा?.....

असंच एकदा, एका कठीण trek नंतर गुढगा दुखंत असल्याची तक्रार घेवून, मी डॉक्टरकाडे जातो. नेहमीप्रमाणं जुजबी ऒषधांनी काही उपयोग होत नाही हे पाहिल्यावर तो मला X-ray काढायला पाठवतो. X-ray पाहून त्याला माझ्या गुढग्यात काहीच problem दिसत नसल्याचं तो मला सांगतो. मला ऎकून आनंद होतो. पण तो आनंद जास्त काळ टिकू न देता, तो, माझा गुडघा कधीच बरा होणार नसल्याचं सांगतो. आणि वर, शक्यतो सपाट रस्त्यांवर चाल. उंच सखल भागात फिरू नको. जिने चढू नको, अशी जाचक पथ्य सुचवतो. मी वेडाच होतो. तसाच चालत (tram न घेता) सात किलोमीटर चालत येतो. गुढगा Solid दुखतो. पण दुसर्‍या दिवशी मात्र सबकुछ Normal. आता काय म्हणावं ह्याला?

तेव्हापासून डॉक्टरची भिती जी मनात बसली, ती कायमची. अगदी कालपर्यंत. कुठेच बरेच दिवस धडपडण्याच योग आला नव्हता, तो एका गाडीवानाच्या कृपेने, दुचाकीवरून रस्त्यावर पडून, जुळून आला. डावा खांदा त्यच्या असण्याची नको तितकी जाणीव करून देत होता. इतकी की रात्री झोपेतसुद्धा तो मला त्रास देत होता. शेवटी पुन्हा एकदा inevitable करायचं ठरवलं. डॉक्टरकडे पोचलो. त्यांनी How are you? विचारलंच नाही. सरळ "काय होतंय" असं मराठीतच विचारलं. त्यमुळे english मध्ये काही explain करण्याचा प्रश्नच उरला नाही. त्यांनी पुस्तक वगॆरे न उघडता मला काय झालंय ते सांगितलं ऒषध लिहून दिलं ते घेवून माझा खांदापण शांत झाला आणि चक्क मी काहीही त्रास न होता हा post type करतोय.

शेवटी शरीरालासुद्धा आपल्या देशातला, आपली भाषा बोलणारा, आपल्यासारखा वागणारा डॉक्टरंच अधिक भावला. माझा doctorofobia गेला आणि मनातली डॉक्टरची भीती कुठल्याकुठे पळाली. परदेशस्थ भारतीयांना, भारतीय अन्न, भारतीय कपडे, भारतीय भाषा, भारतीय संस्कृती आणि भारतीय डॉक्टर ह्यांच्याशिवाय पर्याय नाही, हेच खरं.

6 comments:

शैलेश श. खांडेकर said...

सहीच! लेख सुंदर जाहलाहे. बाकी, प्रकृती सांभाळा (लवकर बरे व्हा).

अनु said...

Shevatache vakya tantotant patale.Mazya datachi dantkatha kahishi ashich hi ethe:
http://www.manogat.com/node/5069

sangeetagod said...

हाऊ आर यु टु डे कोहम? just kidding...
अगदी खरं आहे. मी डॉक्टरकडे जाण्याआधी माझी तक्रार नवर्‍याला सांगून बघते - म्हणजे इंग्रजी शब्दांची जुळवाजुळव आधीच झालेली असते.
डॉक्टर देशी हवा आणि त्यातून देशात प्रॅक्टिस केलेला असेल तर दुधात साखर.
गेट वेल सून.

Bhagyashree said...

हा लेख खूपच मस्त आहे! आवडला..
btw thanks for commenting on my blog..mala rajkaraNatla kahi kalat nahi, ani mi tasa v4 hi kadhi navta kela, pan ata tumacha patatay.. sakal ha 'rashtravadi' asu shakto.. pratap pawar ahet na tithe.. :)

HAREKRISHNAJI said...

तरी बरे थोड्क्यात आटपले. मी सिंहगडवर rock climbing करताना पडलो व पायाचा घोटा सुजला. पुण्यात डॉक्टर प्लास्टर घालायला निघाले. दोन पाच हजाराची काशी.थेट मुबंइला पळत सुटलो.

कोहम said...

शॆलेष, अनु, संगीता, भाग्यश्री आणि हरेकृष्णाजी, आपल्या प्रतिसादाबद्धल मनापासून धन्यवाद. मी अजूनही बरा होतोच आहे, पण पूर्वीपेक्षा बराच बरा आहे. डॉक्टराम्ची कृपा आणखी काय?