ती मीटिंग रूम मधून बाहेर पडली. डोक्यात नुसता विचारांचा गलका झाला होता. गेल्या महिन्यातली सुखीलाल ची कॅंपेन, त्यातलं तिचं आर्टवर्क, ते कौतुक, ती प्रसिद्धी, रात्र रात्र जागून केलेली डिझाइन्स, बॉसने अचानक पाठवलेला इ-मेल, आताची मीटिंग आणि बेंगलोरच्या ऑफिसमध्ये चालून आलेली, भरभक्कम पगाराची बढती. क्षणभर तिचा कानांवर विश्वासच बसला नाही की तिला ही संधी देण्यात आलेय.
अवघ्या दीड वर्षात एवढी प्रगती? बेला होण्याआधी नोकरी सोडली. जरा कुठे नोकरीत बस्तान बसत होतं, पण बेलाचा जन्म ही पण गरजच होती. ती टाळता येण्यासारखी नव्हती. लहान मुलगी आईवाचून नको म्हणून चांगली तीन वर्ष घरी राहिली. मग ही नोकरी. लहान मुलगी, घर सगळं सांभाळून केलेली नोकरीची कसरत. सगळं, सगळं तिला आठवलं. कामाचं चीज झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलं.
आपल्या डेस्क पाशी येताच तिने तिचा मोबाईल पाहिला. घरून तीन वेळा फोन आला होता. अचानक तिला वास्तवाची जाणीव झाली. हातातल्या घड्याळात तिने नजर टाकली. सात वाजून गेले होते. म्हणजे बेला घरी पोचली असणार आणि अनीषही. घाईघाईने तिने आपला काँप्यूटर बंद केला आणि ती जिने उतरू लागली.
मुंबईच्या फोर्ट एरिआमधलं कोणतंही ऑफिस असावं तसंच तिचंही होतं. आतून चकचकीत पण जिने मात्र कळकट. त्यात जिन्यातला बल्ब फुटला होता. लाकडी कठड्याला घट्ट धरून एकेक लाकडी पायरी ती उतरायला लागली. उगाचच जिनाभरल्या अंधारानं तिला घाबरायला झालं. कठड्यावरची पकड अजूनही घट्ट झाली. एकटेपणाची जाणीव अधिकच वाढली. डोळ्यासमोर आई उभी राहिली. नेहमी ओरडायची आई, एकटीने उशीरापर्यंत बाहेर राहू नको म्हणून. कारण मुलीची जात. त्या क्षणीही तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. उगीच का कोणी बाहेर राहतं उशीरापर्यंत? काम असतं, गरज असते, म्हणून राहायला लागतं. आईला काही शेवटपर्यंत पटलं नाही आपलं.
शेवटची पायरी उतरून ती इमारतीच्या बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला मोकळं वाटलं. समोरच फ्लोरा फाउंटन पसरलं होतं. हुतात्मा चौक. हुतात्मा चौकात अनाहूत आत्म्यांची गर्दी. स्वतःचीच कोटी आठवून तिला हसायला आलं. चालत चालत ती पासष्ट नंबरच्या बस स्टॉपवर पोहोचली. कोपऱ्यावर फुटपाथवरंच पुस्तकं मांडून विक्री चालली होती. तिला वाटलं, जरा जावं, दोन पुस्तकं चाळावीत, एखादं घ्यावं, एखादं बेलासाठी, एखादं अनीषसाठी. बेला आणि अनीषचा विचार आल्यावर मात्र पटकन घरी पोहोचायला हवं हे तिच्या ध्यानात आलं.
टॅक्सीनं जावं का? नकोच. बसनेच जाऊ. पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल. डबल डेकर बसचं तिला भयंकर आकर्षण होतं. लहान असताना ठीक होतं पण अजूनही? ती आपल्याच तंद्रीत होती. बस समोर थांबल्यावरच तिच्या लक्षात आलं. गर्दी नसेल असं वाटलं होतं पण बस खच्चून भरली होती. आजूबाजूच्या शरीरांना चुकवत ती वरच्या डेक वर पोहोचली. तिथंही बसायला जागा नव्हती. वरच्या काळ्या दांडीला धरून ती तशीच लोंबकळत राहिली.
बस सुरू झाली आणि पुन्हा तिला तिची मीटिंग आठवली. बंगलोरला बढती, मोठा पगार. पण कसं शक्य आहे? इथे अनीषची नोकरी, बेलाची शाळा. कसं जमणार हे सगळं? नाहीच होणार शक्य. पण अशी संधी पुन्हा मिळणार नाही. माझ्यासाठी तो त्याची नोकरी सोडून किंवा बदलीही मिळवून बेंगलोरला कसा येणार? हजार कारणं सांगेल. मग करायचं तरी काय? एकटीने काही दिवस तिथे काढले तर, बेलाला घेऊन? मग नंतर पुन्हा इथे येता येईल, पण ही संधी हातची जाता कामा नये. माझंच असं का होतं? आधीची नोकरी ऐन भरात आलेली असताना बेलासाठी सोडावी लागली. तेव्हा मी नाही म्हटलं नाही. तीन वर्ष घरी वसून राहिले. बाई म्हणून एवढं पडतं घेतलं. नाही घ्यावंच लागलं. पण अजूनही..
बसने जोरात ब्रेक दाबला आणि ती भानावर आली. बस गर्दीनं खच्चून भरली होती आणि तिच्या मागे असलेला माणूस तिच्या जास्तच चिकटून उभा असल्याचं तिला जाणवलं. तिचा स्टॉपही जवळ येत होता. ती पटकन जिन्याच्या दिशेने निघाली. त्या माणसाचा निसटता घाणेरडा स्पर्श तिला चुकवता आला नाही. क्षणभर तिला तिचीच कीव आली. स्वतःची. एक बाई म्हणून, एक स्त्री म्हणून.
सुखीलाल ची कॅंपेन तिला आठवली. काहीही जाहिरात करा पण त्यात एक बाई पाहिजे. कशाला? बाईचं काम फक्त सुंदर दिसणं, घर सांभाळणं एवढंच आहे का? चूल आणि मूल म्हणे. अरे बाईकडे एक माणूस म्हणून बघा ना. फक्त मादी म्हणून, पुनरुत्पादनाचं यंत्र म्हणून का बघता? तिलाही काही आकांक्षा असतील, अपेक्षा असतील, त्यांची काळजी कोणी घ्यायची. एकेक विचारासरशी तिच्या डोक्यात घणाचे घाव बसायला लागले. आजूबाजूचं सगळं जग पुरुषांनी भरलंय आणि ते सगळेजण आपल्याकडे माना वेडावून हसतायत आणि आपल्याला "स्त्री", "स्त्री" म्हणून हिणवतायत असं तिला वाटलं.
तंद्रीतच ती आपल्या स्टॉपवर उतरली, घराकडे चालायला लागली. घर जसं जवळ येऊ लागलं तसं तिला बरं वाटायला लागलं. चावीने तिने घराचं लॅच उघडलं आणि ती आत शिरली. अनीष, म्हणून तिने हाक मारली. सुखीलाल च्या कॅंपेनबद्धल तिचं झालेलं कौतुक, आजची मीटिंग, सगळं, सगळं तिला त्याला सांगायचं होतं. चपला उचलून तिने स्टँडवर ठेवल्या आणि ती बेडरूमकडे गेली. तीही रिकामीच होती.
ती बेलाच्या खोलीत शिरणार, इतक्यात अनीष तिथूनच बाहेर आला. मघाशी पडणारे घणाचे घाव कधीच थांबले होते. आता तिला त्याला सगळं सांगायचं होतं. ती काही बोलणार इतक्यात त्याने खुणेनेच तिला शांत राहायला सांगितलं आणि तो तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेला.
आत शिरताच ती काही बोलणार इतक्यात अनीषच सुरू झाला
"कुठे होतीस इतका वेळ. अरे, काही घर, दार, नवरा, मुलगी ह्यांची आठवण आहे की नाही? का त्या फर्मला पूर्ण वाहून घेतलंयस तू? मोबाईल कशाला दिलाय? कधीही फोन करता यावा म्हणून ना? मग तो बंद का असतो नेहमी?"
"अरे पण मीटिंग...."
"मीटिंग गेली खड्ड्यात. कधीही फोन करा ही आपली मीटिंगमध्ये. काय चालवलंयस काय तू हे. मी घरी आलो, तर बेला पाय धरून बसलेली, खेळताना पडली, पायातून भळभळा रक्त येत होतं. म्हणाली आईला फोन केला पण आई फोन उचलत नाही. अरे हजारदा सांगितलंय तिला एकटं ठेवणं बरोबर नाही. उद्या तिला काही झालं तर काय करशील? त्यात तो फोन नुसता नावाला घेतलाय, कधी उचलतच नाहीस..."
"अनीष, सुखीलाल ची......"
"ए, आता त्या सुखीलाल चं नाव काढू नको हं. फार दिवस ऐकतोय. बघायलाच पाहिजे एकदा हा कोण सुखीलाल आहे ते. साला, माझ्यापेक्षा माझी बायको ह्याचंच नाव जास्त घेते."
"अनीष...."
"तुला काय वाटलं, मी न बोलता सगळं सहन करतो म्हणजे मला हे सगळं मान्य आहे? लग्नानंतर मी तुला नोकरी करू दिली. तुझ्या आशा आकांक्षा, तुझं करिअर, तुझ्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, ह्याची कल्पना होती म्हणून. प्रत्येक गोष्टीत तुला साथ दिली. एकटीला तुला परदेशी पण पाठवलं. पण बेला झाल्यावर तरी तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव नको का व्हायला? आता ती महत्त्वाची की तुझा सुखीलाल महत्त्वाचा?"
"अरे पण लग्न झाल्यावर तीन वर्ष होते ना मी घरी?"
"काय उपकार केलेस? आई म्हणून तुझं कर्तव्यच आहे ते. खरंतर मला हे असं तिला एकटं ठेवणं अजिबात मान्य नाही. तासाभरासाठी का होईना, ती एकटी राहता कामा नये. तू लवकर का नाही येत ऑफिसमधून?"
"अनीष, जेव्हा शक्य असतं तेव्हा येतेच ना?"
" हे बघ, जेव्हा शक्य असतं तेव्हा नाही. रोज यायला हवं. आता तूच ठरव बेला की तुझी नोकरी आणि काय तो निर्णय घे. तिथे ऑफिसात बॉसची कटकट आणि इथे घरी आल्यावर तुझी. नकोसं झालंय सगळं"
तिलाही सगळं नकोसं झालं होतं. आपण अजून बेलाला पाहिलंच नाही हे तिच्या ध्यानात आलं. अनीषला तिथेच सोडून ती बेलाच्या खोलीत गेली. बाजूचा दिवा जळत होता. आणि तिच्या छोट्याश्या बेडवर बेला झोपली होती. पायाला बँडेज लावलेलं दिसत होतं, पण चेहऱ्यावर मात्र हास्य होतं.
...कसली स्वप्न बघत असेल ही. चॉकलेटच्या बंगल्याची, चमचमणाऱ्या चांदण्यांची, ढगांच्या दुलईची आणि राजकुमाराची आणि राजकन्येची. आहेच माझी बेला राजकन्येसारखी. अगदी माझ्यासारखीच दिसते नाही. मोठी झाली की माझ्यासारखीच... नको. माझ्यासारखी नको. पण तिही एक स्त्रीच ना. मी तिला सांगणारच, एकटी उशीराने घराबाहेर राहू नको. सातच्या आत घरात ये. तिलाही लग्न करावं लागणारंच, मुलं होणार, मग ती, ती राहणारच नाही. मग ती होणार एक बाई, बायको, मादी, आई. हे सगळं पहिलं. तिची स्वप्न, तिच्या आशाआकांक्षा हे सगळं दुय्यम. सतत दुसऱ्यांचा विचार....
नकळत तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. दिवसभर जगाबरोबर भांडायचं, आणि घरी आल्यावर नवऱ्याशी. काय आयुष्य झालंय आपलं. हाताला झालेल्या कुणाच्यातरी स्पर्शाने ती भानावर आली. बेलाने तिचा हात हातात घेतला होता. तिच्या डोळ्यातही अश्रू उतरले होते.
"रडू नको ना आई. काय झालं?"
बेलाच्या ह्या एका प्रश्नानं तिच्या रडक्या चेहऱ्यावर हसू फुटलं. आवेगाने तिने बेलाला जवळ घेतलं.
"नाही रडणार हं बाळा. तुला लागलं ना म्हणून मला रडायला आलं. मी नव्हते ना घरी तेव्हा, माझ्या बाळाची काळजी घ्यायला"
"आई, मी तुला फोन केला तीनदा. तू उचलाच नाहीस. मला इतका राग आला होता ना तेव्हा. तितक्यात बाबा आला. मला डॉक्टर काकांकडे घेऊन गेला. मी त्याला सांगितलं मला आईचा राग आला म्हणून. पण तो म्हणाला, आईवर असं रागावायचं नाही, आईला खूप काम असतं ना म्हणून नाही घेता येत तिला फोन. त्याने मला तुझी नवी ऍडपण दाखवली पेपरमधली. मस्त आहे हं फोटो. मग माझा राग कुठल्या कुठे पळून गेला"
तिच्याकडे बोलायला काही उरलंच नव्हतं. इतक्यात मागून अनीष आला. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणाला
"सॉरी. मघाशी जरा जास्तच बोलून गेलो. खरंच सॉरी. राग तुझ्यावर नव्हता. पण तुझ्यावर निघाला. शेवटी मला हक्काची तूच आहेस ना? सॉरी."
तिने डोकं त्याच्या हाताला टेकलं. खूप खूप बरं वाटलं तिला. अनीष आणि बेला असे जवळ असताना आणखी काय पाहिजे? मनात एकदा आलं की अनीषला सुखीलालचं कौतुक, बॉसने दिलेली ऑफर सांगावी. पण ही वेळ तिला योग्य वाटली नाही.
तिला दोन्ही हवं होतं. चांगलं करिअर आणि सुखी संसार. आणि तिच्या बाबतीत तरी दोन्ही एकाच वेळी घडणं शक्य नव्हतं. आता खरंच तिला निर्णय घ्यायचा होता. खरंच ती निर्णय घेऊ शकणार होती का? की सतत असं शक्यतांच्या झोपाळ्यांवर झोके घेत राहणार होती? कोणताही निर्णय न घेता?
Subscribe to:
Post Comments (Atom)
24 comments:
I was hoping for an answer at the end. पण नंतर लक्षात आलं थोड्या दिवसानी का होईना शेवटी निर्णय मलाच घ्यायचा आहे. :-) ’ती’ च्यासारखा आतापुरता मीही तो निर्णय थोडे दिवस पुढे ढकलतेय. :-) नंतर काय ते बघू.
खूप दिवसांनी तुझी पोस्ट वाचली. Good to read it.
-Vidya.
:-)
Is there ever an answer? ;-)
मस्तच....एक स्त्रीच हे लिहु शकते असं वाटलं मला. स्त्रीच्या मनात इतकं उतरता येतं?
ग्रेट. दिल्खुलास दाद देतो आहे. एकदम छान स्टोरॊ.
वपु काळ्यांचीच कथा वाचतो आहे असे वाटले.
I liked the end...incomplete.
mast jamale aahe. nehamehcha prashna baykaansaathi! baryaachadaa anuttraeet!
nice end.
Apratim....-:)
good story. pan uttar kay?
nahi lihilas te khup bara kelas, are satat focus shift hot rahanarya skeptical baykanch asach hote. priorities jar dokyatch clear nasatil tar ase prashna udbhavane sahjikach aahe na?
chan lihitos.
nirottar prashnaana prashn tari kaa mhanaayach re?
anyways khup chan..
Mastch ahe , story , saglya sriyanche lagnananter asech hote , mi pan tyatlich ahe , 1 ter carrer nahi ter sansar pan mi marg shodhla ahe WORK FROM HOME , which is the BEST option for like this type women.
Mastch ahe , story , saglya sriyanche lagnananter asech hote , mi pan tyatlich ahe , 1 ter carrer nahi ter sansar pan mi marg shodhla ahe WORK FROM HOME , which is the BEST option for like this type women.
Mastch ahe , story , saglya sriyanche lagnananter asech hote , mi pan tyatlich ahe , 1 ter carrer nahi ter sansar pan mi marg shodhla ahe WORK FROM HOME , which is the BEST option for like this type women.
Mastch ahe , story , saglya sriyanche lagnananter asech hote , mi pan tyatlich ahe , 1 ter carrer nahi ter sansar pan mi marg shodhla ahe WORK FROM HOME , which is the BEST option for like this type women.
It's good that a man is writing from a woman's perspective!
पुरुष असून स्त्री च्या मनातल्या घालमेली चं अगदी तंतोतंत वर्णन केलंय . वास्तविक समस्ये चा वास्तववादी अंत.
cool yaar ... मस्त झालीये गोष्ट. बऱ्याच गोष्टी ईकडे तिकडे रिलेट झाल्या आणि म्हणून वाचताना बरीच आजूबाजूची पात्रं या कथेत दिसायला लागली. बाकी कमेंट्स वाचूनपण मजा आली ... खास करून Work From Home वाला कमेंट. ठासून सांगण्यासाठी कदाचीत ४ वेळा कमेंट टाकलीये. Definitely girl! ;-) kidding ... बाकी वरती शाल्मलीची कमेंट जरा घातक वाटली. असा प्रश्न एखाद्या "प्रकारच्या" बायकानाच असतो वगैरे जरा जास्टिच टाईपकास्टींग वाटलं.
असो ... लिखते रहो.
apratim....................mast goshta ahe pan ha pratyek "stri" la bhedsavnara prashna ahe...good u didnt chose to give an answer...........
tumchi goshtahi chhan hoti ani ti mandnyachi paddhatahi aavadli...pan mala vatta jevha ticha navra yeun tila sorry mhanala tithech tila ticha uttar milala asnar !!! nahi ka? very positive...
shevti navra bayko he natach asa aahe ki tumhi nyal tasa te janar..tyat konacha ekacha phayda ani dusryacha nuksan asa ganit shakyach nahi..sukh doghanna nahi tar dukhahi doghanna...
शेवट खूप अनपेक्षित पण सुखद होता. मन:पूर्वक धन्यवाद!
वाचून धन्य झाले एवढयासाठी की हे एका अनपेक्षित दृष्टिकोनातून होतं.
वर काहींनी म्हटल्याप्रमाणे शेवट अनपेक्षित वाटला असेल; पण उलट वाचायला सुरुवात केल्यावरच वाटलं याचा शेवट नक्कीच तू उत्तराचं क्षणभंगुर समाधान देउन करणार नाहीस.
आवडलं :)
तुमच्या पोस्टमधून अगदी रोजचाच प्रश्न, पण जरा वेगळ्या तर्हेने मांडलेला पाहून अगदी भरून आलं.
इतरांना वाटला, तेवढा शेवट मात्र मला पूर्णपणे ओपन एण्डेड नाही वाटला. "तिला दोन्ही हवं होतं. चांगलं करिअर आणि सुखी संसार. आणि तिच्या बाबतीत तरी दोन्ही एकाच वेळी घडणं शक्य नव्हतं."
ह्या वाक्यात बायकांनीच शेवटी तडजोड करायची, करीयर दुय्यम मानायचं-- हे कुठेतरी गृहितच नाही का?
Sunder... no words !!!
कथा आवडली. माफ कर (की रा?) पण हे प्रश्न कायम स्त्रीनेच सोडवायचे का? दोन्ही गोष्टी मिळणार नाहीत असा जर का दृष्टीकोन असेल तर नाहीच मिळणार ना? आणि ही मुस्कटदाबी काय नवी आहे का? सतत पडणारे प्रश्न कुणीतरी (एकानेच?) एकीने सोडवले निदान तसा प्रयत्न तरी केला अस दाखवलं असत तर सॉरी ह्या कथेत बदल सुचवण्याची इच्छा नाहीये पण जे मनात आलय ते सांगतोय!
नो ऑफेन्स मेंट!
It's good that a man is writing from a woman's perspective!>> Without the firm answer to the Questions created ;)
Post a Comment