Wednesday, May 06, 2009

आम्ही मतकरी.

नाही. मतकरी हे आमचं आडनाव नाही.

खरंतर मतकरी ही व्यक्ती नसून मतकरी ही एक प्रवृत्ती आहे असं एक टाळ्या खेचणारं वाक्य टाकायची आम्हाला तीव्र इच्छा झाली होती, पण ती आम्ही दाबली. सांगायचा मुद्दा हा की मतकरी म्हणजे येता जाता, इथे तिथे, हगल्या पादल्या, आमच्यासारख्या, ज्या लोकांना आपल्या मताची पिंक टाकायची सवय असते ती लोकं. पिंक ह्या शब्दाचा राम सेनेच्या मुतालिकांना स्त्रीवर्गाने पाठवलेल्या चड्ड्यांच्या रंगाशी काहीही संबंध नाही हा खुलासा करणं आवश्यक आहे. पिंक म्हणजे पान खाऊन टाकल्याने जिच्यामुळे भिंती छान रंगवून काढता येतात ती.

असो नमनालाच घडाभर तेल झालेलं आहे. मूलस्थान पुणे असल्याने आणि आपल्याला सगळं कळतं असा आमचा समज (गैरसमज नव्हे) असल्याने येता जाता मतांच्या पिंका टाकणं हा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे. पण मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आपली मुंबई स्वच्छ मुंबई ह्या नाऱ्याला ( नारा म्हणजे घोषणा. ह्या वाक्याचा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांशी काहीही संबंध नाही हा खुलासा) जागून, आम्ही पिंका टाकून भिंती रंगवणं थांबवलेलं आहे, आणि आमच्या मतांच्या वैचारिक इ-पिंका टाकून समस्त मराठी इ-वाचकवर्गाला इ-रंगवण्यासाठी ह्या ब्लॉगचा वापर सुरू केलेला आहे.

तर अशा ह्या आमच्या मताला कुणीही अजिबात किंमत देत आलेलं नाही. लहान असताना आमची मुलं देत असत. पण आपल्या आईने (पक्षी आमच्या हिने) रुपयाच्या अवमूल्यनाला स्पर्धा म्हणून चालवलेल्या, माझ्या मताच्या अवमूल्यनाने, प्रभावित होऊन, त्यांनीही आमच्या मताला किंमत देणं सोडलं. तसं आमच्यासारख्या चिरगूट माणसाच्या मतात किंमती काही नसतंच असा आमच्या एव्हाना समज होऊन गेलेला.

पण अचानक काय झालं कळलं नाही. जादूची कांडी फिरावी तसे दिवस फिरले. कालपर्यंत आमचा यथेच्छ बाजा बजावणारे लोकं आम्हाला राजा म्हणू लागले. कारणही तसंच झालं, निवडणुका जाहीर झाल्या. उभ्या देशाचा पंतप्रधान निवडायची जबाबदारी कुणीतरी आमच्यावर टाकली. आमच्या मतांच्या पिंका झेलायला अचानक बड्या बड्या आसामी (पक्षी मोठी माणसं. ह्या शब्दाचा आसाम राज्याशी काहीही संबंध नाही हा खुलासा) पिकदाण्या घेऊन कंबरेत वाकून अजिजीने उभ्या असलेल्या दिसायला लागल्या.

आम्हाला तर चक्क लॉटरी लागल्यासारखंच बाटू लागलं. पण आमच्या डोक्यावरचा ताण एकदम वाढला. देशाचा पंतप्रधान निवडण्यारासखं अवघड काम आमच्या खांद्यावर येऊन पडलं. मुळातच चिरगूट माणूस असल्याने आमचे खांदे पडलेले. त्यात हे मणामणाचं ओझं येऊन पडल्याने आमचे खांदे अधिकच पडल्यासारखे दिसू लागले. कशा कशात म्हणून लक्ष लागेना. रात्र रात्र झोप लागेना आणि रात्री झोप न लागल्याने दिवसा झोपा काढण्याची वेळ आली. अर्थात आम्ही वर्षानुवर्ष आमच्या कार्यालयात हेच करत आलोय असं आपलं आमच्या हिचं मत.

असो तर एकंदरीत परिस्थिती गंभीर झाली. असं काही झालं, आणि आम्हाला काहीही सुचलं नाही की आम्ही चक्क दूरचित्रवाणीकडे वळतो. नाही, नाही. आमच्या चाळीच्या कोपऱ्यावर असलेल्या वाण्याचं नाव "दूरचित्र" असं नाहीये. ज्याला आपण शुद्ध मराठीत टीव्ही म्हणतो त्याला अतिशुद्ध मराठीत दूरचित्रवाणी असे म्हणतात. असो, तर सांगायचा मुद्दा हा की तिथे आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. आमच्या एका लाडक्या अभिनेत्याने आम्हाला चक्क मुद्द्यांवर मतदान करायचं आवाहन केलं.

झालं. उत्तर मिळालं. आमच्या खांद्यावरचं मणामणाचं ओझं उतरलं आणि आम्ही झोकात आमची पंतप्रधान निवडण्याची जबाबदारी पार पाडतोय, अशी स्वप्न बघत, आम्ही निवांत झोपी जातो न जातो तोच, प्रकरण मुद्द्यावरून गुद्द्यावर आलं. सकाळी न अलेल्या पाण्याने, आणि भारनियमनाने बंद पडलेल्या पंपामुळे, तोंडाचं पाणी पळालेली आमची ही, भयंकर संतापली आणि आम्हाला झोपलेलं पाहून चांगलीच खवळली, आणि गुद्द्यावर गुद्दे हाणून आम्हाला जागं करायला लागली. जनता मुद्द्यावरून गुद्द्यावर इतक्या पटकन का उतरते ह्याचा थोडासा खुलासा आमच्या चिरगूट बुद्धीला झाल्याचा आम्हाला भास झाला. पण झोपल्याला जागं करता येते, झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही, हे आम्ही चाणाक्षपणे शिकून घेतल्यामुळे आम्ही गुद्दाप्रहार सहन करत मुद्द्यांचा विचार करता करता पडून राहिलो.

पण हे मुद्दे शोधायचं काम भलतंच कठीण निघालं हो. अर्थात आमच्यासारख्या चिरगूट माणसाच्या बुद्धीची झेप ती किती? ह्या आपल्या अभिनेत्यांना आणि त्यांच्यापेक्षाही अधिक चांगला अभिनय करणाऱ्या आपल्या नेत्यांना समजणाऱ्या गोष्टी. तरीही आम्ही बातम्यांतून, भाषणातून, वर्तमानपत्रांतून मुद्दे शोधत राहिलो. ते काही आम्हाला मिळाले नाहीत. हे लपलेले मुद्दे हुडकून काढण्यासाठी करमचंद किंवा परमवीर वगैरे छापाचा एखादा हेर नेमावा असंही आम्हाला वाटलं, पण आमच्यासारख्या चिरगूट माणसाला ते परवडण्यासारखं नसल्याने तो विचार आम्ही सोडून दिला.

दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय नेतृत्व असलेल्या एका पक्षाला आम आदमीचा पुळका आला. आम्हाला मराठी सोडून कुठलीही भाषा कळत नाही. त्यात निवडणुका एप्रिल मेच्या महिन्यात. आंब्यांचा सीझन. त्यामुळे हा पक्ष निवडून आला तर सर्व आदम्यांना आम वाटणार असा समज करून घेऊन आमच्या तोंडाला पाणी सुटलं. पण फुकटचे आम खाण्याचे मनातले मांडे मनातच राहिले. ह्या आमचा त्या आमशी काही संबंध नाही हे कळताच आमचा हिरमोड झाला.

दुसऱ्या एका धर्मपरायण आणि गेल्या काही वर्षात मनमिळाऊ झालेल्या पक्षाला रामाचं मंदिर आठवलं. अयोध्येत रामाचं मंदिर बांधायच्या विचाराने ते एकदम भगवेच झाले. पण आम्ही गिरगावातल्या राम मंदिरात गेलो तरी हे गोऱ्या रामाचं का काळ्या रामाचं ह्याचा खुलासा आमच्या बालबुद्धीला मूर्तीचा रंग पाहिल्याशिवाय होत नाही. त्यात अयोध्येत बांधलं जरी ह्यांनी राम मंदिर तरी तिथे सहकुटुंब सहपरिवार रामरायाचं दर्शन घेऊन येण्याचीही ऐपत आम्ही आयुष्यभरात कमावली नसल्याने त्या राममंदिराचा आम्हाला फायदा कोणत्या खात्यावर लिहिणार?

इतरही काही निळे, लाल, हिरवे, पिवळे आणि अलीकडेच भगव्यातून जन्याला आलेले रंगीबेरंगी पक्ष होते. कुणी आम्हाला मराठी म्हणत होता, कुणी मराठा म्हणत होता, कुणी कुणबी, कुणी कोळी, आग्री, भय्या, मुसलमान, शीख आणि कुणी अजून काही म्हणत होता. पण वेगवेगळ्या जातीचा त्यांना आलेला पुळका सोडला तर एकजात कुणाकडेही कसलाही मुद्दा शोधूनही सापडला नाही.

आता मात्र आमची पंचाईत झाली. मतदानाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. उद्या आम्ही चुकीचा पंतप्रधान तर निवडणार नाही ना ह्या विचाराने रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. चुकून माकून लागलीच डुलकी तर कमळात बसलेल्या हत्तीवर सायकल चालवत एका हाताने धनुष्य पेलून दुसऱ्या हाताने इंजिनावर बाण मारणाऱ्या माणसाची भयानक स्वप्न मला पडायला लागली.

होता होता मतदानाचा दिवस उजाडला. आमच्या मित्रवर्यांना घेऊन मतदानास जावे म्हणून आम्ही त्यांच्या घरी पोचलो तर त्यांची सामानाची आवरा आवर चाललेली. चार दिवस सलग सुटी म्हणून ते फिरायला म्हणून बाहेर निघालेले. फार आनंदात दिसत होते. आम्हालाही एकदा वाटलं की झटकून द्यावी जबाबदारी आणि पळून जावं कुठेतरी.

पण ते शक्य नव्हतं. मनाची चलबिचल लपवत लपवत आम्ही मतदान केंद्राकडे चालायला लागलो. चालीत एक वेगळाच आत्मविश्वास आलेला. चिरगूटपणाचं लक्षण असलेले आमचे पडेल खांदे वर आलेले. एका राजासारखे आम्ही भारदस्त चालत केंद्राकडे जायला लागलो. वाटेत दिसणारे सगळेच आपल्या काह्यात आहेत असं वाटायला लागलं. कोणे एके काळी तरुण बिरुण असताना लाथ मारीन तिथे पाणी काढीन असं वाटायचं, तसंच आज वाटायला लागलं. त्या तंद्रीतच आम्ही केंद्रावर पोचलो. केंद्रावरचे सरकारी अधिकारीही कधी नव्हे ते अदबीने वागत असल्याचं जाणवलं.

ज्याचसाठी केला होता अट्टहास हाच तो दिवस. आमच्या पत्रिकेत राजयोग होता तो असा मतदानाच्या दिवशी सिद्ध झाला. आम्ही आडोशाला गेलो. आम्हाला राजासारखं आधीच वाटू लागल्याने आम्ही एकदम खूश होतो, आता कुणीही निवडून आला तरी काय फरक पडणार होता? आम्ही कुठलंसं बटण दाबलं आणि धुंदीतच बाहेर पडलो.

जसे आम्ही बाहेर पडलो तसे आमचे खांदेही पूर्ववत पडले. गेले काही दिवस माझ्या मताची पिंक झेलायला पिकदाण्या घेऊन आतुरतेने उभे असलेले लोकं कुत्ता जाने आणि चमडा जाने अशा आविर्भावात माझ्याकडे पाहत होते. घरी पोचलो. आजही पाण्याची बोंब होती, विजेचा लपंडाव चालला होता. नळाला न आलेलं पाणी आमची ही आमच्या डोळ्यात काढणार अशी सगळी परिस्थिती होती.

पण मघा मला लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा आत्मविश्वास वाटला होता, त्या भरातच आम्ही घरातल्या नळाला एक जोरदार लाथ हाणली आणि पाठीत जळकं लाकूड मारून हाकलवलेल्या कुत्र्यासारखं केकाटलो.

तेवढाच एक निरर्थक केकाटण्याचा आवाज कानात राहिला.

बाकी सारं कसं शांत शांत होतं.

10 comments:

Abhi said...

too good!!!
khrach khup parinam karak jhale aahe.

Sumedha said...

सही! आता कसं एकदम कडक ’कोहम्’ इश्टाइल, बरं वाटलं वाचून :)

"चुकून माकून लागलीच डुलकी तर कमळात बसलेल्या हत्तीवर सायकल चालवत एका हाताने धनुष्य पेलून दुसऱ्या हाताने इंजिनावर बाण मारणाऱ्या माणसाची भयानक स्वप्न मला पडायला लागली." जबरी!

Prajakta said...

Aprateem! Farach khochak ani rochak lihilayt :)

यशोधरा said...

आम्हांला हा तुमचा लेख फारच आवडला! :D

Sneha said...

sahich barka... manal tula... mast shabdhik khe'tar'.. udavalis...

sonal m m said...

well written...tumche lekh nehmich vachaniya astat !!

आशा जोगळेकर said...

वा मस्तच जमलाय लेख . सॉलिड व्यंग.

सखी said...

मस्त,उपरोधिक झालंय!सहीच!!

AB said...

classic!!

Unknown said...

शब्दांचे खेळ फार छान जमले आहेत. लगे रहो . .