Saturday, January 27, 2007

एक शून्य माधव आपटे....

अत्ताच "डोंबिवली फास्ट" बघितला. मनामधे एक वादळ उधळलं. तो चित्रपट कसा आहे हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच नव्हे. तो चित्रपट बघताना काही प्रश्न मनांत उभे राहीले. कल्पना आहे की सर्वच प्रश्नांना उत्तरं नसतात. पण परिक्षेतला अख्खाच्या अख्खा पेपर कोरा द्यावा? माधव आपटे शेवटी एक शून्यच व्हावा? का म्हणून?

खरंतर आपण सगळेच माधव आपटे आहोत. शक्यतो सरळ मार्गाने सामान्य जीवन जगण्याचा आपल्या सर्वांचाच प्रयत्न असतो. नियम पाळावे अशी आपल्या सर्वांचीच ईच्छा असते. पण त्या इच्छेला प्रत्यक्षात आणायचं कुणी? त्या माधव आपटेने?

का आपण असं बुळ्यासारखं सहन करत जगायचं? सिग्नल तोडला म्हणून भरायला लागणार्‍या पाचशे रुपये दंडातले साडेचारशे रुपये वाचावेत म्हणून? का सगळेच नियम तोडतात, आम्ही एकटे काय जग बदलणार म्हणून?

मी बोललो कोणाविरुद्ध तर मलच मुस्काटात पडेल म्हणून शेपूट घालून आपण गप्प बसायचं? किती दिवस? ह्यापेक्षा किडे मुंग्यांचं आयुष्य बरं. आपल्याकडे ह्यावर एक रामबाण उत्तर आहे. सगळी system च सडलेली आहे असं म्हणायचं आणि आपण स्वतः त्या system चा एक अविभाज्य घटक बनत जायचं. कधी लाच देताना, तर कधी लाच घेताना. कधी सिग्नल तोडताना तर कधी जास्त पॆसे देवून licence बनवून घेताना.

कोणाची बनली आहे ही system? चंद्रावरचे का मंगळावरचे लोकं बनवतात आणि चालवतात ही system? तुम्ही आम्हीच बनलोय ना ह्या system ची चाकं, रस्ते, इंजिन आणि इंधन? मग का नाही आपण सगळे मिळून ही system सुधरवू शकत? का नाही आपण एका नागरिकाची कर्तव्य पार पाडू शकत. सगळा दोष इतरांवर तरी का मारायचा? उद्या इतरांनी express tower मधून उडी मारली, आपण मारू?

किती संवेदनाशून्य बनत चाललो आहोत आपण? माझं काम झालं नं, दुनिया गई भाड मे असं आपलं का व्हावं? आपण आपल्या समाजाचे, देशाचं काही देणं लागतो असा विचार का नाही येत आपल्या मनामधे. कायदा वाकवून केलेली कामं एका माणसाचा फायदा करून देतील, पण त्यमुळे इतर अनेकांचं नुकसान होईल हा विचार कोणी करायचा? तुम्ही मी म्हणू, की आम्ही काहीच बेकायदेशीर काम करत नाही. पण अरे दुसरा बेकायदेशीर काम करत असताना आपण त्याकडे काणाडोळा करणं चूक नाही का? कोण भांडणार आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी? माधव आपटे?

जावूदे तुम्ही आम्ही तरी काय, भावनेच्या भरात मी काहीतरी खरडणार, तुम्ही ते वाचणार आणि घरातल्या सुरक्षित वतावरणात शेपूट घालून बसणार. शेवटी माधव आपटे एक शून्यच रहाणार. एक भलं मोठं शून्य. ना आपल्यासाठी त्याची धन बाजू ना ऋण. ना त्याच्यामुळे आपली total वाढणार ना कमी होणार. कोणी झालाच माधव आपटे तर त्याच्यासाठी आपण एक सुस्कारा टाकणार आणि त्याला एक शून्य ठरवून आपापल्या कामांना लागणार.......

3 comments:

Anonymous said...

Gr8.... Hope one day we all change this

Anonymous said...

मला स्वत:ला माधव आपटेचे आक्रस्ताळे मार्ग पटले नाहीत. त्यातून फ़ायदा तर नाहीच पण नुकसानच झालं. त्याच्या त्या 'actions'मुळे लोक-मिडियाने चर्चा केली, बदल शून्य झाला, लोक त्याला विसरुनही गेले आणि तो शवटी मेलाच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कुटुंब suffer झालं जी त्याची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे!अगदी आजूबाजूच्या अन्यायी जगापेक्षाही.
यापेक्षा यावर उपाय हाच की सिस्टिममध्ये 'शक्य तिथे' व 'शक्य त्या मार्गाने' 'शक्य ते बदल' घडवणे. उदा. दुकानदार colddrinkसाठी २ रुपये जास्त लावतोय? तेव्हा त्याला शिवीगाळ करुन/दुकानाची काच फ़ोडून काय साध्य होणार? तुमच्या या कार्यात तुम्हाला कोणीही साथ देणार नाही वर तुमच्यावरच पोलिस केस होईल! यापेक्षा, पुन्हा त्या दुकानात स्वत: कधीही न जाणे, त्या दुकानदाराबद्द्लची 'सत्य परिस्थिती' इतर मंडळींना सांगून त्यांनाही त्या दुकानात जाण्यापासून परावृत्त करणे या गोष्टी करणे तुमच्या हातात आहे आणि त्याचा नक्कीच फ़ायदा होतो. Infact तुम्ही स्वत: त्या दुकानावर बहिष्कार घालून त्याचं xx रु.चं नुकसान करताच की! and so if someone else also joins you that *does* affect business of the person as his reputation goes down.

Sunil Kashikar said...

आपल्या भावना बोथट झाल्याचा हा परिणाम आहे. आपल्या सगळ्य़ांमधे एक "माधव" आहे. पण आपण सगळे त्याला दाबुन जगायला शिकलो आहोत. असो.