Tuesday, January 23, 2007

रडुबाई....

एक मुलगा होता. सगळ्याच मुलांसारखा तो एक साधासुधा मुलगा. लहान होता, तेव्हा त्याचे गोरे गोरे गाल टॉमॅटोसारखे लाल लाल होत. त्याच्या आजुबाजुची मोठी मोठी माण्से मग आपला मोठेपणा सोडून देत आणि त्याला त्याच्या गालांचे टॉमॅटो मागीत. त्याला वाटे की खरंच कोणी आपल्या गालांचे टॉमॅटो घरी नेवून आमटीत टाकले तर? ह्या विचारानेच तो घाबरा घुबरा होई आणि रडंत रडंत धुम ठोके. लहान झालेले मोठे आपापल्या कामाला लागले, की तो हळूच जावून आरशात पाही आणि गालांची लाली शाबूत असल्याची खात्री करून घेई. मगच त्याचा जीव भांड्यात पडे.

जशी सगळी लहान मुलं जातात तसा तोही शी-शू वर्गात जाई. त्याच्या बाई त्याला खूप आवडत आणि त्यांचाही तो अतिशय लाडका होता. त्याल त्या रडुबाई म्हणत आणि आपला हा हिरो बाईंनी दिलेल्या नावाला नक्की जागत असे. दुसर्‍या बाई वर्गावर आल्या की ह्याने भोकाड पसरलेच म्हणून समजा.

पण तसा हा आपला रडुबाई लबाडही होता. रोजच्या अभ्यासात पाटीवर काढायचे पाढे तो पंधरा दिवसांतून एकदाच काढत असे. पाटीवरची तारीख बदलली की झाले ह्याचे काम.

आपला हा "रडुबाई" मुळातच उत्सवप्रीय. गणपती आले म्हणजे त्याचा आनंद गगनात मावेनसा होई. दहा दिवस नुसता आनंदसोहळा असे. मग कधीतरी हा सांस्कृतिक कार्यक्रमातही भाग घेई. स्टेजवर गेल्यावर त्याचे हात-पाय लटपटंत. मग हा १० मिनिटांत करायचा कार्यक्रम दोनच मिनिटांत संपवे आणि स्टेजवरून धुम ठोके.

त्याला माहित असे की आपला कार्यक्र्म चांगला नाही झाला. तरीदेखील त्यला वाटे की आपल्याला बक्षिस मिळेल. मग उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बक्षिस समारंभ संपेपर्यंत तो त्याचं नाव घेतलं जण्याची वाट पाही. त्याला ते बक्षिस हवं असे, कारण त्याच्या मित्रांना कोणतं ना कोणतं बक्षिस मिळालेलं असे. त्याला वाईट वाटे, रडू येई. पण ते कुणालाही न जाणवू देता, हा कुठेतरी धुम ठोके.

थोड्या वेळानी गणपती बप्पा निघायची वेळ होई. उत्तरपूजा झाल्यावर कोणीतरी जाणता देवाला साकडं घाली की सर्वांच्या ईच्छा पूर्ण होवूदेत म्हणून. सगळीकडे गंभीर शांतता पसरून राही. आपल्या ह्या रडुबाईच्या डोळ्यात टचकन पाणी येई. मांडवाची आवराआवर तो दुरूनच पहात राही. मखरात नसलेली गणपतीची मूर्तीमात्र त्याला अस्वस्थ करून सोडी. मग तो नेहमीप्रमाणेच तिथुन धुम ठोके.

असा हा रडुबाई लहानाचा मोठा कधी झाला ते इतरांनाच काय पण त्यालासुद्धा कळलं नाही. आणि एक दिवस त्याला नोकरीसाठी परदेशी जायची वेळ आली. रडुबाईच नाही तर त्याच्या घरातली सर्वजण हरखून गेली. जाण्याचा दिवस आला. रडुबाई आता मोठा झाला असल्याने रडू शकला नही. घरातून निघता निघता आईच्या डोळ्यातलं पाणी त्याला बघवलं नाही. पण तरीसुद्धा तो निर्धाराने रडला नही. बाबांनी त्याला नीट रहा, एकटाच जातोयस तेव्हा काळजी घे असं सांगितलं तरीपण तो रडला नाही. बहिणीला समजावता समजावता त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याने ते अश्रू निर्धाराने थोपवून धरले.

परदेशी पोचल्यावर तो मात्र ओक्साबोक्शी रडला. गाल खेचणारे शेजारी, बाई, गणपती बप्पा, आई, बाबा, बहीण सगळे सगळे त्याला अजूनही आठवतात आणि तोही त्यांना आठवून मनातल्या मनातच रडतो. आता तो मोठा झालाय ना? मग तो कधीकधी आपल्या आठवणी लिहून काढतो. लिहिता लिहिता डोळे कधी भरून येतात त्याचं त्यालपण समजंत नाही. धुरकट डोळ्यांत त्याला लहानगा रडुबाई दिसू लागतो......

8 comments:

Anonymous said...

kharach manala bhaval he........

Gayatri said...

अफाट! तुमचं सगळंच लिखाण खूप छान आहे. आणि ही गोष्ट सांगायची शैली खूप आवडली :)

Yogesh said...

मस्तच! सगळे लेख आवडले :)

Kamini Phadnis Kembhavi said...

छान लीहीलय,
आवडल :-)

Anonymous said...

he wachta wachta mazya dolyat pani aala...

रोहित said...

तुम्ही लिहिलेलं मनाला भावलं. इतकं नितळ, मनापासूनचं लिहिलेलं वाचलं की किती बरं वाटतं ते कसं सांगू? हा लाल लाल गाल वाला मुलगा कायम लक्षात राहील, हे नक्की.

Ranjeet said...

सुन्दर लिहिले आहेस....मनापासुन आवडले...

Tejaswini Lele said...

मस्तचं!! माझ्यामधला "रडुबाई" मला आठवला वाचून!!
खुपचं छान लिहिलय!!