Friday, January 30, 2009

निर्णय

ती मीटिंग रूम मधून बाहेर पडली. डोक्यात नुसता विचारांचा गलका झाला होता. गेल्या महिन्यातली सुखीलाल ची कॅंपेन, त्यातलं तिचं आर्टवर्क, ते कौतुक, ती प्रसिद्धी, रात्र रात्र जागून केलेली डिझाइन्स, बॉसने अचानक पाठवलेला इ-मेल, आताची मीटिंग आणि बेंगलोरच्या ऑफिसमध्ये चालून आलेली, भरभक्कम पगाराची बढती. क्षणभर तिचा कानांवर विश्वासच बसला नाही की तिला ही संधी देण्यात आलेय.

अवघ्या दीड वर्षात एवढी प्रगती? बेला होण्याआधी नोकरी सोडली. जरा कुठे नोकरीत बस्तान बसत होतं, पण बेलाचा जन्म ही पण गरजच होती. ती टाळता येण्यासारखी नव्हती. लहान मुलगी आईवाचून नको म्हणून चांगली तीन वर्ष घरी राहिली. मग ही नोकरी. लहान मुलगी, घर सगळं सांभाळून केलेली नोकरीची कसरत. सगळं, सगळं तिला आठवलं. कामाचं चीज झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरलं.

आपल्या डेस्क पाशी येताच तिने तिचा मोबाईल पाहिला. घरून तीन वेळा फोन आला होता. अचानक तिला वास्तवाची जाणीव झाली. हातातल्या घड्याळात तिने नजर टाकली. सात वाजून गेले होते. म्हणजे बेला घरी पोचली असणार आणि अनीषही. घाईघाईने तिने आपला काँप्यूटर बंद केला आणि ती जिने उतरू लागली.

मुंबईच्या फोर्ट एरिआमधलं कोणतंही ऑफिस असावं तसंच तिचंही होतं. आतून चकचकीत पण जिने मात्र कळकट. त्यात जिन्यातला बल्ब फुटला होता. लाकडी कठड्याला घट्ट धरून एकेक लाकडी पायरी ती उतरायला लागली. उगाचच जिनाभरल्या अंधारानं तिला घाबरायला झालं. कठड्यावरची पकड अजूनही घट्ट झाली. एकटेपणाची जाणीव अधिकच वाढली. डोळ्यासमोर आई उभी राहिली. नेहमी ओरडायची आई, एकटीने उशीरापर्यंत बाहेर राहू नको म्हणून. कारण मुलीची जात. त्या क्षणीही तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. उगीच का कोणी बाहेर राहतं उशीरापर्यंत? काम असतं, गरज असते, म्हणून राहायला लागतं. आईला काही शेवटपर्यंत पटलं नाही आपलं.

शेवटची पायरी उतरून ती इमारतीच्या बाहेर आली. बाहेर आल्यावर तिला मोकळं वाटलं. समोरच फ्लोरा फाउंटन पसरलं होतं. हुतात्मा चौक. हुतात्मा चौकात अनाहूत आत्म्यांची गर्दी. स्वतःचीच कोटी आठवून तिला हसायला आलं. चालत चालत ती पासष्ट नंबरच्या बस स्टॉपवर पोहोचली. कोपऱ्यावर फुटपाथवरंच पुस्तकं मांडून विक्री चालली होती. तिला वाटलं, जरा जावं, दोन पुस्तकं चाळावीत, एखादं घ्यावं, एखादं बेलासाठी, एखादं अनीषसाठी. बेला आणि अनीषचा विचार आल्यावर मात्र पटकन घरी पोहोचायला हवं हे तिच्या ध्यानात आलं.

टॅक्सीनं जावं का? नकोच. बसनेच जाऊ. पाच मिनिटं उशीर झाला तरी चालेल. डबल डेकर बसचं तिला भयंकर आकर्षण होतं. लहान असताना ठीक होतं पण अजूनही? ती आपल्याच तंद्रीत होती. बस समोर थांबल्यावरच तिच्या लक्षात आलं. गर्दी नसेल असं वाटलं होतं पण बस खच्चून भरली होती. आजूबाजूच्या शरीरांना चुकवत ती वरच्या डेक वर पोहोचली. तिथंही बसायला जागा नव्हती. वरच्या काळ्या दांडीला धरून ती तशीच लोंबकळत राहिली.

बस सुरू झाली आणि पुन्हा तिला तिची मीटिंग आठवली. बंगलोरला बढती, मोठा पगार. पण कसं शक्य आहे? इथे अनीषची नोकरी, बेलाची शाळा. कसं जमणार हे सगळं? नाहीच होणार शक्य. पण अशी संधी पुन्हा मिळणार नाही. माझ्यासाठी तो त्याची नोकरी सोडून किंवा बदलीही मिळवून बेंगलोरला कसा येणार? हजार कारणं सांगेल. मग करायचं तरी काय? एकटीने काही दिवस तिथे काढले तर, बेलाला घेऊन? मग नंतर पुन्हा इथे येता येईल, पण ही संधी हातची जाता कामा नये. माझंच असं का होतं? आधीची नोकरी ऐन भरात आलेली असताना बेलासाठी सोडावी लागली. तेव्हा मी नाही म्हटलं नाही. तीन वर्ष घरी वसून राहिले. बाई म्हणून एवढं पडतं घेतलं. नाही घ्यावंच लागलं. पण अजूनही..

बसने जोरात ब्रेक दाबला आणि ती भानावर आली. बस गर्दीनं खच्चून भरली होती आणि तिच्या मागे असलेला माणूस तिच्या जास्तच चिकटून उभा असल्याचं तिला जाणवलं. तिचा स्टॉपही जवळ येत होता. ती पटकन जिन्याच्या दिशेने निघाली. त्या माणसाचा निसटता घाणेरडा स्पर्श तिला चुकवता आला नाही. क्षणभर तिला तिचीच कीव आली. स्वतःची. एक बाई म्हणून, एक स्त्री म्हणून.

सुखीलाल ची कॅंपेन तिला आठवली. काहीही जाहिरात करा पण त्यात एक बाई पाहिजे. कशाला? बाईचं काम फक्त सुंदर दिसणं, घर सांभाळणं एवढंच आहे का? चूल आणि मूल म्हणे. अरे बाईकडे एक माणूस म्हणून बघा ना. फक्त मादी म्हणून, पुनरुत्पादनाचं यंत्र म्हणून का बघता? तिलाही काही आकांक्षा असतील, अपेक्षा असतील, त्यांची काळजी कोणी घ्यायची. एकेक विचारासरशी तिच्या डोक्यात घणाचे घाव बसायला लागले. आजूबाजूचं सगळं जग पुरुषांनी भरलंय आणि ते सगळेजण आपल्याकडे माना वेडावून हसतायत आणि आपल्याला "स्त्री", "स्त्री" म्हणून हिणवतायत असं तिला वाटलं.

तंद्रीतच ती आपल्या स्टॉपवर उतरली, घराकडे चालायला लागली. घर जसं जवळ येऊ लागलं तसं तिला बरं वाटायला लागलं. चावीने तिने घराचं लॅच उघडलं आणि ती आत शिरली. अनीष, म्हणून तिने हाक मारली. सुखीलाल च्या कॅंपेनबद्धल तिचं झालेलं कौतुक, आजची मीटिंग, सगळं, सगळं तिला त्याला सांगायचं होतं. चपला उचलून तिने स्टँडवर ठेवल्या आणि ती बेडरूमकडे गेली. तीही रिकामीच होती.

ती बेलाच्या खोलीत शिरणार, इतक्यात अनीष तिथूनच बाहेर आला. मघाशी पडणारे घणाचे घाव कधीच थांबले होते. आता तिला त्याला सगळं सांगायचं होतं. ती काही बोलणार इतक्यात त्याने खुणेनेच तिला शांत राहायला सांगितलं आणि तो तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेला.

आत शिरताच ती काही बोलणार इतक्यात अनीषच सुरू झाला

"कुठे होतीस इतका वेळ. अरे, काही घर, दार, नवरा, मुलगी ह्यांची आठवण आहे की नाही? का त्या फर्मला पूर्ण वाहून घेतलंयस तू? मोबाईल कशाला दिलाय? कधीही फोन करता यावा म्हणून ना? मग तो बंद का असतो नेहमी?"
"अरे पण मीटिंग...."
"मीटिंग गेली खड्ड्यात. कधीही फोन करा ही आपली मीटिंगमध्ये. काय चालवलंयस काय तू हे. मी घरी आलो, तर बेला पाय धरून बसलेली, खेळताना पडली, पायातून भळभळा रक्त येत होतं. म्हणाली आईला फोन केला पण आई फोन उचलत नाही. अरे हजारदा सांगितलंय तिला एकटं ठेवणं बरोबर नाही. उद्या तिला काही झालं तर काय करशील? त्यात तो फोन नुसता नावाला घेतलाय, कधी उचलतच नाहीस..."
"अनीष, सुखीलाल ची......"
"ए, आता त्या सुखीलाल चं नाव काढू नको हं. फार दिवस ऐकतोय. बघायलाच पाहिजे एकदा हा कोण सुखीलाल आहे ते. साला, माझ्यापेक्षा माझी बायको ह्याचंच नाव जास्त घेते."
"अनीष...."
"तुला काय वाटलं, मी न बोलता सगळं सहन करतो म्हणजे मला हे सगळं मान्य आहे? लग्नानंतर मी तुला नोकरी करू दिली. तुझ्या आशा आकांक्षा, तुझं करिअर, तुझ्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, ह्याची कल्पना होती म्हणून. प्रत्येक गोष्टीत तुला साथ दिली. एकटीला तुला परदेशी पण पाठवलं. पण बेला झाल्यावर तरी तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव नको का व्हायला? आता ती महत्त्वाची की तुझा सुखीलाल महत्त्वाचा?"
"अरे पण लग्न झाल्यावर तीन वर्ष होते ना मी घरी?"
"काय उपकार केलेस? आई म्हणून तुझं कर्तव्यच आहे ते. खरंतर मला हे असं तिला एकटं ठेवणं अजिबात मान्य नाही. तासाभरासाठी का होईना, ती एकटी राहता कामा नये. तू लवकर का नाही येत ऑफिसमधून?"
"अनीष, जेव्हा शक्य असतं तेव्हा येतेच ना?"
" हे बघ, जेव्हा शक्य असतं तेव्हा नाही. रोज यायला हवं. आता तूच ठरव बेला की तुझी नोकरी आणि काय तो निर्णय घे. तिथे ऑफिसात बॉसची कटकट आणि इथे घरी आल्यावर तुझी. नकोसं झालंय सगळं"

तिलाही सगळं नकोसं झालं होतं. आपण अजून बेलाला पाहिलंच नाही हे तिच्या ध्यानात आलं. अनीषला तिथेच सोडून ती बेलाच्या खोलीत गेली. बाजूचा दिवा जळत होता. आणि तिच्या छोट्याश्या बेडवर बेला झोपली होती. पायाला बँडेज लावलेलं दिसत होतं, पण चेहऱ्यावर मात्र हास्य होतं.

...कसली स्वप्न बघत असेल ही. चॉकलेटच्या बंगल्याची, चमचमणाऱ्या चांदण्यांची, ढगांच्या दुलईची आणि राजकुमाराची आणि राजकन्येची. आहेच माझी बेला राजकन्येसारखी. अगदी माझ्यासारखीच दिसते नाही. मोठी झाली की माझ्यासारखीच... नको. माझ्यासारखी नको. पण तिही एक स्त्रीच ना. मी तिला सांगणारच, एकटी उशीराने घराबाहेर राहू नको. सातच्या आत घरात ये. तिलाही लग्न करावं लागणारंच, मुलं होणार, मग ती, ती राहणारच नाही. मग ती होणार एक बाई, बायको, मादी, आई. हे सगळं पहिलं. तिची स्वप्न, तिच्या आशाआकांक्षा हे सगळं दुय्यम. सतत दुसऱ्यांचा विचार....

नकळत तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. दिवसभर जगाबरोबर भांडायचं, आणि घरी आल्यावर नवऱ्याशी. काय आयुष्य झालंय आपलं. हाताला झालेल्या कुणाच्यातरी स्पर्शाने ती भानावर आली. बेलाने तिचा हात हातात घेतला होता. तिच्या डोळ्यातही अश्रू उतरले होते.

"रडू नको ना आई. काय झालं?"

बेलाच्या ह्या एका प्रश्नानं तिच्या रडक्या चेहऱ्यावर हसू फुटलं. आवेगाने तिने बेलाला जवळ घेतलं.

"नाही रडणार हं बाळा. तुला लागलं ना म्हणून मला रडायला आलं. मी नव्हते ना घरी तेव्हा, माझ्या बाळाची काळजी घ्यायला"
"आई, मी तुला फोन केला तीनदा. तू उचलाच नाहीस. मला इतका राग आला होता ना तेव्हा. तितक्यात बाबा आला. मला डॉक्टर काकांकडे घेऊन गेला. मी त्याला सांगितलं मला आईचा राग आला म्हणून. पण तो म्हणाला, आईवर असं रागावायचं नाही, आईला खूप काम असतं ना म्हणून नाही घेता येत तिला फोन. त्याने मला तुझी नवी ऍडपण दाखवली पेपरमधली. मस्त आहे हं फोटो. मग माझा राग कुठल्या कुठे पळून गेला"

तिच्याकडे बोलायला काही उरलंच नव्हतं. इतक्यात मागून अनीष आला. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला म्हणाला

"सॉरी. मघाशी जरा जास्तच बोलून गेलो. खरंच सॉरी. राग तुझ्यावर नव्हता. पण तुझ्यावर निघाला. शेवटी मला हक्काची तूच आहेस ना? सॉरी."

तिने डोकं त्याच्या हाताला टेकलं. खूप खूप बरं वाटलं तिला. अनीष आणि बेला असे जवळ असताना आणखी काय पाहिजे? मनात एकदा आलं की अनीषला सुखीलालचं कौतुक, बॉसने दिलेली ऑफर सांगावी. पण ही वेळ तिला योग्य वाटली नाही.

तिला दोन्ही हवं होतं. चांगलं करिअर आणि सुखी संसार. आणि तिच्या बाबतीत तरी दोन्ही एकाच वेळी घडणं शक्य नव्हतं. आता खरंच तिला निर्णय घ्यायचा होता. खरंच ती निर्णय घेऊ शकणार होती का? की सतत असं शक्यतांच्या झोपाळ्यांवर झोके घेत राहणार होती? कोणताही निर्णय न घेता?

Wednesday, January 07, 2009

फॉरमेशन इन केऑस

१३ डिसेंबर २००८, मुंबई.

मुंबई विमानतळावर विमानातून बाहेर शिरतानाच हवा जड झाल्याचं जाणवतं. प्रदूषण. हा प्रदूषणाचाच परिणाम. विमानतळातून बाहेर पडता पडता समोर पसरलेली अस्ताव्यस्त गर्दी दिसते. केवळ समोर लावलेल्या बॅरिकेडसमुळेच त्या गर्दीला काहीसा आकार आलेला. विस्कटलेल्या गर्दीतून आपली माणसं शोधताना डोळ्यांची दमछाक होते. पॉप्युलेशन एक्स्प्लोजन.

दुपारच्या उन्हात रापलेली धूळ आकाशात अस्ताव्यस्त उडत असतानाच आमची टॅक्सी आम्हाला दिसते. आडवा झालेला टॅक्सीवाला उठून सामान टपावर चढवतो आणि आम्ही मार्गस्थ होतो. केवळ वाहनं जातायत म्हणून त्याला रस्ता म्हणायचं. शिस्त नाही. लेन आखूनही पाळायच्या नाहीत. भरपूर हॉर्न वाजवायचा. ड्रायव्हिंग मॅनर्स अजिबात पाळायचे नाहीत. लोकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचतात हेच आश्चर्य आहे.

गल्लीत पोचतो तर तिथे सार्वत्रिक गोंधळ. रस्त्यावर एक माणूस बेंबीच्या देठापासून ओरडून बोलतोय. मुलं दंगा करतायत. त्यांची मारामारी चाललेय, एक भाजीवाला गाडी लावून रस्ता अडवतोय.

व्हॉट अ केऑस.

२ जानेवारी, २००९, मुंबई.

विमानतळावर जाण्यासाठी मी घर सोडतो. सुट्टी संपल्याचं दुःख आणि प्रियजनांपासून दूर जाण्याचं दुःख.

गल्लीत नेहमीची दुपारची शांतता पसरलेय. भाजीवाला आपली गाडी तशीच सोडून कुणाचीतरी भाजी पोचवायला बिल्डिंगमध्ये शिरलाय. रस्त्याच्या तोकड्या जागेत मध्ये नेट लावून मुलं बॅडमिंटन खेळतायत. तिसऱ्या मजल्यावरच्या लिमयांच्या मुलाशी त्याचा मित्र रस्त्यावरून अभ्यासाबद्दल बोलतोय.

त्या गडबडीतच मी गाडीत बसतो गाडी चालवायला लागतो. गल्लीच्या तोंडापर्यंत पोचायलाच चार पाच हॉर्न्स होतात. रस्त्यावर गाड्यांची गर्दी ओसंडून वाहतेय. प्रत्येकालाच आपल्या ठिकाणी पोचायचंय. रस्ते थोडे वाहनं फार झालेयत. पण सगळं कसं शिस्तीत चाललंय. लोकं लेन बदलतायत रेटारेटी करतायत मध्येच गाड्या घुसवतायत आणि मीही.

मजल दरमजल करत आम्ही एअरपोर्टला पोचतो. गर्दी ओसंडून वाहतेय. आपापल्या लोकांना निरोप देऊन लोकं चालू पडतायत. आणि मीही.

४ जानेवारी २००९, मेलबर्न.

जगाच्या कुठल्यातरी भोकात जाऊन मी वर्षभर बसलो की परत भारतात आल्यावर सार्वत्रिक गोंधळ असल्यासारखं वाटतं खरं, पण दिवस जातात आणि त्या गोंधळाच्या पडद्याआड लपलेली एक संघटना दिसायला लागते.

India is a beautiful formation in the midst of chaos.

.