Friday, September 14, 2007

बाजार

कालचा अख्खा दिवस सततच्या पावसाने भिजून गेला. घरी असताना छान छान वाटणारा पाऊस बाहेरगावी फिरायला गेल्यावर मात्र नकोसा होतो.

पण "आज" तसा नव्हताच. सकाळी सकाळी सूर्यनारायणानं दर्शन दिलं आणि आज त्याचंच राज्य असल्याची ग्वाही दिली. चला, म्हंटलं आल्या उनाचं सोनं करून घेऊया, म्हणून सकाळी लवकरच घराबाहेर पडलो.

खरंतर होबार्ट हे गाव असं आहे, की सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळा सोडल्या तर इथे गर्दी म्हणून दिसत नाही. इथे सगळे दर्दीच. अगदी मला आवडतं तस्सं गाव. शांत, सुंदर आणि स्वच्छ. म्हणजे निरभ्र आभाळाच्या कॅनव्हासवर हिरवे डोंगर, निळं पाणी. निसर्गाची भव्यता आणि यःकश्चित आपण. त्यामुळे शनिवारी सकाळी बाहेर पडल्यावर फार लोक दिसतील अशी अपेक्षाच नव्हती. पण होबार्टने एक सुखद धक्का दिला. होबार्टचं शनिवारी भरणारं सालामांका मार्केट लोकांनी तुडुंब भरलं होतं.

बऱ्याच लोकांना गर्दी आवडत नाही. मला मनापासून आवडते. कारण गर्दीत मिळतो तसा एकांत कुठेच मिळत नाही. डोकं विचारांनी भणभणलं की सरळ मुंबई व्ही.टी. च्या गर्दीत स्वतःला झोकून द्यावं. इतके लोक असतात तिथे की तुम्ही एक समुद्राचा थेंब होऊन जाता. क्षुल्लक, यःकश्चित. मग तुमचा चेहेरा काळजीने किती का लंबा चौडा होईना. नोबडी बॉदर्स. किंवा अत्यानंदाने तुम्ही स्वतःशीच हसलात आणि तुमचं हास्य तुमच्या चेहेऱ्यावर उमटलं, तरी कोणी विचारत नाही, काय वेड्यासारखा हसतोयस म्हणून.

गर्दीतलाच एक बनून गेलो. समोर पसरला होता एक रंगीबेरंगी बाजार. काय नव्हतं तिथे? उदबत्तीपासून हत्तीपर्यंत सर्व गोष्टी मिळतात अशीच ती जागा. विचारांचं विमान उडायला ह्यापेक्षा चांगला रन-वे कुठचा असणार. कुठे शोभेच्या वस्तू होत्या, कुठे मेणबत्त्या, कुठे जुनी पुराणी पुस्तकं, खाण्याच्या वस्तू, पिण्याच्या गोष्टी, पिशव्या, फोटो, पेंटिंग्ज, कपडे, खेळणी, दागिने. म्हणाल ते समोर हजर.

आणि माणसांच्या फक्त दोनच जमाती तिथे होत्या. विकणारा आणि विकत घेणारा. काळा असो वा गोरा, पिवळा असो वा सावळा. सगळे ह्या दोन जमातीत मोडणारे.

काही दुकानं गर्दीनं भरून चालली होती. इतकी लोकं की गर्दी आवरत नव्हती. काही दुकानं उदासवाणी रिकामी रिकामी होती. आलाच एखादा वाट चुकलेला तरी त्यालाही दूर पळवेल असा रिकामपणा. आणि सगळ्यांची धावपळ एकच. काहीतरी विकायचंय, काहीतरी विकत घ्यायचंय. विकणाऱ्याला अधिकाधिक किंमत हवी. विकत घेणाऱ्याला कमीत कमी किंमतीत ती वस्तू हवी.

आपण तरी दुसरं काय करतो म्हणा. माझी पहिली नोकरी सोडून मी दुसरी नोकरी पकडली तेव्हाचा इंटरव्ह्यू आठवला. घासाघीस. अगदी कोथींबिरीची जुडी विकत घेताना व्हावी इतकी घासाघीस. मी सांगायचं मी किती चांगला आहे, त्यांनी सांगायचं तू चांगला आहेस पण तितकाही नाहीस. कशाचा बाजार? कोण विकतोय आणि कोण विकत घेतोय? काय विकलं जातंय? वेळ? गुणवत्ता? छ्याट. मी विकल्या होत्या माझ्या प्रायॉरिटीज. माझ्यासाठी त्या लाख मोलाच्या होत्या. म्हणून मी मागत होतो लाखाचं मोल त्यांच्यासाठी. आणि त्यांच्या दृष्टीने माझ्या प्रायॉरिटीज ची किंमत शून्य. म्हणून ते करत होते घासाघीस. काय विकून बसलो? रात्री नाटकांच्या तालमींच्यावेळी न झाडलेल्या स्टेजवरून नाकातोंडात जाणारी धूळ, गणपतीच्या गर्दीत आलेला वीट. मागच्याच महिन्यात आजीशी बोललो. ती बोलवत होती गणपतीला. यंदा पन्नासावं वर्ष आहे गणपतीचं मामाकडे. माझ्या आयुष्यातलं मामाच्या गणपतीचं पन्नासावं वर्ष विकून बसलो ना मी? बाजार. विकायचं आणि विकत घ्यायचं.

रस्त्यावरच आपली पंधरा वाद्य घेऊन बसलेल्या एकानं आपलं काम सुरू केलं आणि नकळत पावलं तिथं वळली. माणूस एक आणि वाद्य बरीच. आणि आळीपाळीनं तो एकटाच सगळी वाद्य वाजवत होता. बरीच लोकंही जमली तिथे. नकळत पायांनी ठेका धरला.

किती वाद्य वाजवतो हा एकटा? आपल्याला एकतरी आलं असतं तर काय बहार आली असती ना? शाळेत असताना तबला शिकायला जायचो. सर म्हणायचे हात चांगला बसतोय. रियाज करत राहा. मधे दहावी आली. दहावीला चांगले मार्क हवेतच. मग बारावी, आय. आय. टी., आय. आय. एम. आणि शेवटी अमेरिका, ह्या सगळ्यासाठी दहावी महत्त्वाची. तबला काय कधीही शिकता येईल. आय. आय. टी., आय. आय. एम. आणि अमेरिका ढगातच राहिले आणि तबला तेवढा हातचा गेला. काय कमावण्यासाठी काय विकलं? कसला बाजार?

त्या अवलियाला तिथेच सोडून मी पुढच्या दुकानाकडे वळलो. पुस्तकांचं दुकान. म्हणजे माझं आवडतं ठिकाण. आत बाबा आदमच्या काळातली काही पुस्तकं ठेवली होती. काही उगाचच चाळून बघितली. जुनी पुस्तकं बघताना माझी एक खोड आहे. पुस्तकाचं शेवटचं कोरं पान आणि पहिलं नाव घालायचं पान बघायचं. पहिल्याच पानावर लिहिलं होतं "सोमी" कडून "गोम्या" ला. आता सोमी कोण आणि गोम्या कोण? शेवटचं पान पाहिलं त्यावर बदामातून गेलेला बाण, पुढे सोमीचं नाव. बहुदा गोम्या सोमीच्या प्रेमात पागल झाला असणार. पुस्तकाचं नाव "घोस्ट टाऊन्स ऑफ ऑस्ट्रेलिया". बहुतेक सोमीचा दुसरा कोणीतरी सोम्या असणार.

प्रत्येक पुस्तकाला स्वतःचा असा इतिहास असेल नाही? अगदी इतिहासाच्या पुस्तकाला देखील. कुठल्या पानात एखादं मोरपीस, कुठे वर्षानुवर्ष ठेऊन विरलेलं पिंपळपान, कुठे सांडलेला पदार्थ. माझी शाळेची पुस्तकं कुठे असतील आता? असतील माझ्या कपाटात असतील अजूनही. म्हणजे आहेतच. ब्राऊन पेपर्स ची कव्हर्स. माझं नाव सांगणारं लेबल. घरी गेल्यावर चाळून पाहिली पाहिजेत एकदा. बरं झालं ठेवलीत नाहीतर कधीच त्यांचा बळी देऊन खाऱ्या दाण्याच्या पुड्या बांधल्या असत्या कुणीतरी.

चालत चालत पुढे आलो तर एक "स्कॉटिश बँड" आपले बॅगपाईपर्स लावत बसला होता. तबल्या तंबोऱ्यासारखे बॅगपाईपर्सही सुरात लावत असावेत. त्यांच्या बँडला पैशाची गरज होती. ही कला टिकवण्यासाठी. त्या वाद्यात काही वेगळीच मजा आहे. म्हणजे जुनं पण आवेशपूर्ण असं काहीतरी.

एक छोटा मुलगा आणि त्याच्या समोर त्याच्या बापाच्या वयाचा असावा असा माणूस. एकमेकांकडे तोंड करून बॅगपाईपर वाजवायला लागले. नजर एकमेकांच्या डोळ्यात. मानेच्या शिरा तट्ट फुगलेल्या. तो बापच असणार त्याचा. त्याच्या डोळ्यात कौतूक ओसंडून वाहत होतं. मुलाबद्दलचा अभिमान. आणि मुलाच्या चेहेऱ्यावर बापाच्या तोडीचं आपण वाजवू शकतो ह्याचं समाधान. शाळेत स्कॉलरशीप मिळाल्यावर माझ्या बाबांच्या चेहेऱ्यावर पण असेच भाव उमटलेले अजुनही आठवतात.

नकळत खिशाकडे हात गेला. जी सुटी नाणी हाताला लागली ती सगळी त्यांनी ठेवलेल्या टोपीत टाकली. मदत. मदत कसली? मी थोडं समाधान विकत घेतलं तिथे पैसे टाकून. माझ्या मनाला सुखावणारं समाधान. कदाचित माझा अहं कुरवाळणारं समाधान. मी काहीतरी परोपकारी केलं ह्याचं समाधान विकत घेतलं मी. शेवटी बजारच होता तो.

तासभर कधी निघून गेला कळलंच नाही. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत आलो. शेवटचं दुकान मागे पडलं. मी परत एकदा वळून बाजाराकडे पाहिलं. पुन्हा तीच माणसांची गर्दी दिसली. दोन जमातींत मोडणारी. विकणारी किंवा विकत घेणारी. घासाघीर करणारी. मी त्यांच्या खिजगणतीतही नव्हतो. मला मीच दिसत होतो त्यांच्यात. विकणाराही आणि विकत घेणाराही.

माझ्या पाठीमागेच एक रस्ता होता. रस्त्याच्या कडेला बाक होता. बाकावर एक आजीबाई बसल्या होत्या आणि त्यांच्या बाजूला त्यांची चार-पाच वर्षाची नात. दोघींच्या काहीतरी गप्पा चालू होत्या.

तो बाजार त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. एक बहुदा त्यातून बाहेर पडली होती आणि एकीला अजून आत शिरायचं होतं.

- कोहम

19 comments:

Samved said...

Cool dude..किती सहजपणे लिहीलस..
माझी एक लाडकी theory आहे; ज्या मिनीटाला जगातल्या पहिल्या माणसाने साठवणूक सुरु केली, आपण आपला बाजार सुरु केला. नंतर नुस्ती स्पर्धा कोण किती साठवतं त्याची..
जीओ

Tulip said...

सुंदर!

जावेद अख्तर च्या ओळी आठवल्या तरकश मधल्या.

शहर के दूकांदारो! कारोबरे-उलफ़त में
सूद क्यां जियां क्यां है तुम न जान पाओगे
दिल के दाम कितने हैं ख्वाब कितनें महेंगे हैं,
और नक्रदे-जां क्यां है, तुम न जान पाओगे

कोई कैसे मिलता हैं फ़ूल कैसे खिलता हैं
आंख कैसे झुकती हैं सांस कैसे रुकती हैं
कैसे राह निकलती है कैसे बात चलती हैं
शौक की जबां क्या है, तुम न जान पाओगे!

Monsieur K said...

Nilesh,
apratim maandla aahes. baazaaraatun phirtaanaa manaat honaari cal-bical mast capture keli aahes.
the trade continues. every new day brings some new exchanges.
keep trading.
n keep writing about your trades. :)

पूनम छत्रे said...

wow. mast lihilay.
en faarach aawadalaa. best!

Meghana Bhuskute said...

mastach...

HAREKRISHNAJI said...

बऱ्याच दिवसाने आपल्या बॉगवरअसे काही मस्त वावायला मिळाले.

Parag said...

Apratim.. !!!
Khup divsanni kahitari chan vachayla milala..
Keep it up..

-Parag.

Vidya Bhutkar said...

वाह! खूपच छान. सगळेच संदर्भ आवडले. बॅगपाईपर वाजवणारे बाप-मुलगा, वाद्य शिकायची अर्धवट इच्छा. आणि सर्वात आवडलेलं आणि पटलेलं,'मी विकल्या होत्या माझ्या प्रायॉरिटीज'. प्रत्येकवेळी नवीन नोकरी शोधताना वेगवेगळ्या प्रायॉरिटीज होत्या.असो, छानच लिहिले आहेस. टुलिपने इथे दिलेल्या ओळीही खूप आवडल्या.या आधी कधी वाचल्या नव्हत्या.
-विद्या.

A woman from India said...

फारच छान. नेहेमीप्रमाणेच.
बॅग पाईप हे सतारीसारखे रेझोनेटिंग वाद्य आहे. त्यामुळे तारा जुळवतात तसेच जुळवावे लागते.
त्या पंधरा वाद्य वाजवणार्‍याला माझा साष्टांग दंडवत! निरनिराळ्या वाद्यांचा संग्रह करण्याचं माझं एक जुनं स्वप्नं आहे - जमेल तितकं पूर्ण करायचं आहे.
मात्रं स्वप्नं जी वास्तवात उतरली नाहीत ती आपण कायमची विकली असं समजु नये. फार तर गहाण ठेवली असतील. कदाचित अजुनही वेळ गेलेली नसावी एखादा तबल्याचा क्लास लावण्याची.
ट्युलिपने लिहिलेल्या ओळी फारच छान.

a Sane man said...

lovely!!!

Dhananjay said...

Lekh Avadala!

Nandan said...

surekh lihila aahes, nilesh. khas karun shevatacha parichchhed vishesh aavadla.

Samved said...

Tulip, Sangam? WoW...I immediately played Nusrat after reading your comment on Nilesh's blog. Perfect !

Ranjeet said...

SUndar lihile aahes! Khupach avadale!

Abhijit Bathe said...

सही लिहिलंयस!
यावर कमेंट म्हणुन एक अल्टिमेट गोष्ट लिहायचा मोह होतोय, पण ती गोष्ट आणखी कुठेतरी वापरायचिए म्हणुन तो टाळतो. पण आता ती गोष्ट न लिहिता लिहिलेल्या कमेंट मध्ये काही दम नाही राहिला. म्हणुन मग ट्युलीपची री ओढत जावेद -

आजकल मै राशन की कतारोंमें नजर आता हुं
अपने खेतोंसे बिछडनेकी सजा पाता हुं....

शेर पोस्टला सुट होत नाहिए ना?....

ऐक मग -

ही ऍक्चुअली एक शॉर्ट फिल्म होती -

एक शहर.
मोकळं.
त्यात एक मोकळा रस्ता.
रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुमजली, तिमजली घरं.
माणसाचा लवलेश नाही.
यातल्या एका घरातल्या एका मजल्यावरच्या एका खिडकीत एक लहान मुलगा.
खिडकीतुन निरुद्देश बाहेर बघत.
अचानक रस्त्यापलिकडच्या दुसऱ्या घरातल्या दुसर्या मजल्यावरच्या दुसर्या खिडकीत हालचाल!
लहान मुलगी!
मुलगा तिला पहातो.
हसावं कि न हसावं या झोल मध्ये लाजतो.
खाली पहातो.
मग हळुच वर!
तर मुलगी त्याच्याकडेच बघत!!
मग मुलगीच हसते!
मुलगा य खुष!
मुलगी हात हलवते.
मुलगाही! - अर्धवट उचललेला हात अर्धवट हलवतो.
मुलगी हातानेच ’इकडे ये’ म्हणते.
मुलाचा ’आ’ वासलेला!
मुलगी पुन्हा ’ये’ म्हणते!
मुलगा खिडकितुन स्वत:ला फाडत, धाडधाड जिना उतरत खाली.
रस्त्यावर.
रस्ता अजुनही रिकामा.
वेल....ऑल्मोस्ट.
एक घोडा दौडत येतोय.
आला.
डावीकडुन.
आला आणि निमिषात उजवीकडे गेलाही....
अजुन त्याच्या टापांचा आवाज, ते मानेवरचे पांढरेशुभ्र केस, ती उमेद, तो डौल, ती ताकद, ते बेभान भान.....मुलाच्या डोक्यात.
भिनलेलं.
तगडक तगडक.
तगडक तगडक.
पाहिजे.
घोडा पाहिजे.
टापांनी खेचल्यासारखा मुलगा घोड्यामागे.
एक चौक.
दोन चौक.
रस्ता बदल.
इकडुन तिकडे.
आला आला.
सापडला सापडला.
वेल.....ऑल्मोस्ट.
बळवंतात पोचल्यावर मुलाच्या डोक्यात -
भेंचोत!
चुत्या घोडा!
नाय पायजे!
थकला भागला मुलगा चौकांची शिवण उसवत गल्लीत परत.
आई शपत!
पोरीला विसरलो!
मग धाडधाड जिना वाजवत पोरगा पोरीच्या दारात.
आता टेन्शन.
कपाळावर घाम.
काखेत घाम.
हाताची थरथर.
’टकटक’ करावी का?
कशी?
त्यातनं माझं कुठलं फीलिंग दिसेल?
कुठलं दिसावं?
मग डोकं गुंत्यात आणि स्वत:चं मन असल्याप्रमाणे हात दारावर - टकटक करत....

पुढचं नीट आठवत नाहिए.
कि विसरायचा प्रयत्न करतोय?
पण विसरणार तरी कसं?
ती मोकळी खिडकी.
तो उडणारा पडदा.
नकोसा लूभरला वारा.
आणि म्हातारीचे शब्द -

खूप वर्ष लावलीस यायला....’बाजारात’ अडकलास?

Samved said...

आधीच ब्लॉग भारी, त्यात ट्युलिपची कॉमेंट भारी आणि आता तर अभिजीतनं २०-२० असल्यागत सिक्सरच मारला राव...सब लोग- जिओ!!!!

Meghana Bhuskute said...

jabarat Abhijit.

Vidya Bhutkar said...

आईशप्पथ!! :-) आवडली गोष्ट. सर्वात जास्त आवडलेलं वाक्य,
'थकला भागला मुलगा चौकांची शिवण उसवत गल्लीत परत.'
चौकांची शिवण उसवण्याची कल्पना भारी आहे. एकदम इथे येते ती Propel Fitness Water ची जाहीरात आठवली. ही लिंक आहे बघ त्याची. :-)
http://www.youtube.com/watch?v=vqT3Et17-x4&mode=related&search=

-विद्या.

Chakrapani said...

Gadre Saaheb,
what i like the most about almost all your post is the honest acceptance of being frustrated and/or compromised aani aatuun waatanaarii cheed kii aapalyaalaa kalate sagale, waatate tyaachyaahii pekshaa hii jaast kaahii tarii but tariihii aapan ek kalasuutrii baahule jhaaloy aani mechanically jagtoy jeevan .. as yet another phase of some natural progression...
well written !!! i am too impressed to comment anything more!