Saturday, May 26, 2007

कौन कम्बख्त...

स्मॉल लाटे घेऊन ऑफिसच्या कँटिनमधून बाहेर पडताना पाऊस पडत असेल तर काय झकास दिसतो. आज छान पाऊस पडतोय. छान म्हणजे कसा? छत्री सोबत घ्यायला लागणार नाही इतका. पडतोय नाही पडतोय असा. मुसळधार पाऊस मला आवडतो. मनापासून. तो नुसते रस्तेच नाही मनाची मरगळही धुऊन काढतो. पण हा पाऊस कसा? कारंज्याच्या बाजूला उभं राहिलं तर तुषार उडतात ना तसा. आल्हाददायक. जावं का थोडं पावसात? भिजायला होईल. होऊदे ना. सगळी दुनियाच तर भिजलेय. हातातला थर्माकोलचा कप सांभाळत सांभाळत मी गच्चीत शिरतो.

खरंतर किती डिप्रेसिंग वाटतं ना? संघ्याकाळची अंधारत चाललेली वेळ, असा थेंबटलेला पाऊस. पण आज नाही वाटत. का? करड्या स्वेटरवर आता थेंबांचं डिझाइन झालंय. ते डिझाइन न बिघडवण्यासाठी का होईना, मी आत येतो. सगळं ऑफिस रिकामं झालंय. का बरं? घरी गेलेले लोकं जाता जाता आपलं रिकामपण सोडून गेले की काय? मी माझ्या डेस्क वरचं माझं सामान उचलतो आणि चालता होतो. विसरलो का काही? असूदे, सोमवारी बघू. तसंही आपलं कोण काय घेणार?

खरंतर मी सायकलने जायला हवं घरी. पण आज नको. पाऊस आहे ना. आज ट्रॅम. ऑफिसचा मागचा जिना उतरून मी रस्त्यावर येतो. खांद्यावर बॅग, एका हातात कॉफी आणि दुसऱ्या हातात छत्री. नकोच ती उघडायला. पण भिजायला झालं तर? अरे इथे दुनिया भिजलेय, मग आपण का नाही? चालत चालत मी पोरांच्या स्केट पार्कपाशी येतो. एरवी माझं त्यांच्याकडे जराही लक्ष नसतं. पण आज मी मुद्दाम बघतो. वाटतं आपणही एकदा स्केट बोर्डिंग करून बघावं. पडेन च्यामारी. पाऊस म्हणून आज कोणी नाहीये. नही. एक आहे सायकलवर. घसरून पडायचंय का रे तुला? लागेल लेका. मी मराठीत बोलल्याने त्याला काहीच कळत नाही. तो तिथून हात करतो. आपल्याला काय? आपण इथून करतो. हात करायला काय पैसे पडतात होय?

त्याला हात दाखवत दाखवतच मी मुख्य रस्त्याच्या फुटपाथवर येतो. हा रिव्हर्सडेल रोड. काय छान नाव आहे ना? डेल म्हणजे टेकडी. रिव्हर्सडेल म्हणजे नदीसमोरची टेकडी. नदी नाही दिसत म्हणा इथून आता. पण नाव झकास आहे. कुणा मूर्खानं समोरच्या इमारती बांधल्या इथे? कधीतरी दिसत असेल नदी इथूनही. शांत, संथ हिरवी "यारा". आणि आता तर काय अप्रतिम दिसली असती. पावसाच्या थेंबांचं डिझाइन घेऊन. मरूदे. आपण ट्रॅमदेवीची आराधना करावी हे बरं.

स्टॉपवर पण कोण दिसत नाही आज. पाऊसामुळे असेल. तेवढ्यात एक आजीबाई हातातली छत्री सांभाळत सांभाळत येतात. मला विचारतात की मी छत्री विसरलो का? मी त्यांना हातातली छत्री दाखवतो. त्या हसतात. पण त्यांच्या हसण्यात खिन्नतेची झाक दिसतेय का? कदाचित कधीतरी त्याही फिरल्या असतील पावसात, छत्री हातात घेऊन. भिजण्याची चिंता न करता, कारण साला सगळी दुनियाच भिजत असेल तेव्हा. लांबून ट्रॅम येताना दिसते. अंधारलेल्या वातावरणात तिचे उघड मीट होणारे दिवे अधिकच छान दिसतात. हातातली कॉफी सांभाळत मी ट्रॅममध्ये चढतो. चार पाचच टाळकी असतात. मी खिडकीजवळ जाऊन बसतो.

जगाची चिंता नसते नाही ह्या ट्रॅम ला? आपल्या वेगाने जात असते. रस्ता ठरलेला, स्टॉपही ठरलेले. वेगवेगळ्या आचारांची विचारांची माणसं गुडुप पोटात घेऊन स्थितप्रज्ञासारखी चाललेली असते. अव्याहत. हातात लाटे असली की माझ्या विचारांना पाय फुटतात वाटतं? मी ट्रॅमचे धक्के एन्जॉय करत राहतो. छान डुलकी काढावी असं वाटून जातं. पण तेवढ्यात माझा स्टॉप येतो.

साला ही ट्रॅमपण माझ्यासारखीच आहे. भिजत चाललेय. बरोबर आहे, तिला जगाची चिंताच नसते. आणि आज तर अख्खी दुनिया भिजलेय. मी आणि ट्रॅमने काय घोडं मारलंय मग? असो. मी उतरतो. एखाद्या जीवाभावाच्या मैत्रिणीला करावा तसा तिला आच्छा करावा असं वाटत राहतं. ती मात्र निघून जाते. भिजत. स्थितप्रज्ञासारखी. पुन्हा. गेली तर गेली. ती काय एकटीच आहे. घरी पोहोचायला अजून दोन ट्रॅम बदलायच्यात. त्यांना आच्छा करू.

नकोच ती ट्रॅम. साधा अच्छा पण करत नाही. जावं का चालत? नको. भिजायला होईल. पण तेच तर हवंय. हातातल्या निवत चाललेल्या कॉफीचा अजून एक घोट घेऊन मी चालायला लागतो. स्वॉन स्ट्रीट वर उतरतो. राजहंसासारखीच आहे ती. लांबूनच ती यारा नदीवर डोळा ठेवून असते. दोघीही अशाच शहरापर्यंत जातात. रेल्वे लाइन ओलांडून मी बर्नली ब्रिज च्या दिशेनं चालायला लागतो. रेल्वे फाटकांना रेल्वे फाटक न म्हणता रस्ता फाटक म्हटलं पाहिजे. रेल्वेचा रस्ता सदोदित मोकळाच असतो. च्या मारी, फाटक आम्हा रस्त्यावरच्या लोकांना. असो.

हा रस्ता थोडासा कंटाळवाणा आहे. पण तेवढ्यात समोरून एक सुंदर तरुणी जॉगिंग करत येते. कशाला मरायला धावतेय पावसात? नाही. आज शुक्रवार आहे. आज उद्याकडे डेट असेल तिची. धावूदे. रोल्स रॉईसला जायला खटारा अँबॅसेटर ने जागा द्यावी तशी मी तिला जागा देतो. ती टाळू आणि दात ह्यांच्या बरोबर मध्ये जीभ लावून "थँक यू" म्हणते. सुभानल्ला. गुदगुल्याच होतात जणू.

आता समोर "यारा" दिसायला लागते. संथ वाहते यारा माई. तिरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही. तिच्या शेजारून ऍलेक्झांड्रा ऍव्हेन्यू वाहतोय. यारा आणि ऍलेक्झांड्रा, एकमेकीत जीव गुंतलेल्या बहिणीच जश्या. यारा वळते म्हणून ऍलेक्झांड्रा वळते का ऍलेक्झांड्रा वळते म्हणून यारा वळते हेही कळू नये. फक्त एकच फरक आहे. एक वन वे आहे आणि दुसरी बोथ वेज. अशा ह्या दोन सुंदर बहिणींनी बखोटीला धरून दोन्ही बाजूंनी उचलावा असा त्यांच्या मध्ये बाइक ट्रॅक आहे. मी इथूनच जातो रोज. सायकलने. पण आज चालत.

समोरून एक सायकल स्वार येतोय. दमलाय लेकाचा. घामाघूम झालाय. वर पावसात भिजलाय. अरे भिजूदे ना. इथे तर सगळी दुनिया भिजलेय. ह्याला थोडावेळ सायकल चालवून देऊ का? नको. कॉफीच्या शेवटच्या काही घोटांपैकी एक घेऊन मी तो विचार उडवून टाकतो. खरंतर कॉफी संपलेलीच आहे, पण घरी पोहोचेपर्यंत पुरवायचेय. उगीचच मी एका लाकडी बाकावर बसतो. बाक ओलाच असतो. मरूदे फार फारतर काय? ओला पार्श्वभाग बघून लोक हसतील. हसूदेत लेकाचे. आपल्याला काय त्याचं. आज साला ही दुनिया भिजलेय तिथे माझ्या पार्श्वभागाची काय कथा?

नदीच्या बाजूला असलेल्या एका धक्क्यावर जाऊन मी उभा राहतो. वाटतं अशीच पाण्यात उडी मारावी. पोहत राहावं. नदी संपेपर्यंत. मग समुद्र येईल. तरीही थांबू नये. एक ते सात एका पाठोपाठ पोहावेत. पृथ्वी गोल आहे. इथेच परत पोहोचू. समजा नाही पोचलो, तर सिद्ध होईल, पृथ्वी गोल नाहीये म्हणून.

चेहरा वर करून मी आकाशाकडे बघतो. चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडतात. एकदम सकाळच्या दव पडलेल्या फुलागत वाटत. सपशेल. अररररर स्पेशल. तसाच मी चालत राहतो घर येईपर्यंत. रस्ते वळत असतात त्यांना हवे तसे. पण मी मात्र रस्ता चुकत नाही. मला जिथे वळायचं तिथे मी पण वळतो. शुक्रवार संध्याकाळ चढायला लागलेली असते. शुक्रवारी संध्याकाळी रस्त्यावरच्या सिग्नलचे लाइट पण डिस्कोत लावल्यासारखे वाटतात नाही? विल्यम्स रोडचा चढ पार करता करता माझे पाय दुखायला लागतात.

घर येतं. मी बरोबर दोन जिने चढून माझ्याच घराची बेल वाजवतो. कोणीच दार उघडत नाही, मग मी माझ्याकडच्या चावीने दरवाजा उघडतो. टेबलावर कागदावर काहीतरी खरडून ठेवलेलं असतं. "ऑफिसच्या ड्रिंक्समुळे तुला उशीर होणार आहे हा निरोप मिळाला. मोबाईल नेहमीप्रमाणे सायलेंट वर ठेवून आपण कुठेतरी भटकत असाल. म्हणून ही चिठ्ठी. मी मैत्रिणीकडे जात आहे. यायला उशीर होईल." अरेच्च्या? खरंच की. आज ड्रिंक्स होती ऑफिसमध्ये. पण मला तर अजिबात चढल्यासारखी वाटत नाहीये.

जानदो. कौन कंबख्त नशेकेलीये पीता है? हम तो पीतेहै क्यों की?........ क्यों की?........ काहीच सुचत नाहीये. जानदो.

12 comments:

Meghana Bhuskute said...

काय सुरेख मूड पकडलाय... भरकटलेली संध्याकाळ. प्रत्येक संध्याकाळीचा स्वभाव वेगळा हे खरंच... गुलजारच्या कितीतरी संध्याकाळींची आठवण करून दिली या लेखानं. मस्तच.

Vidya Bhutkar said...

शुक्रवारची दुपार उलटलीय आणि long weekend ची नशा हळूहळू चढतेय त्यात हा लेख. :-) मस्तच ! मलाही असंच पावसात भिजत जावसं वाटू लागलंय हे वाचून. फारच छान लिहिलं आहे. :-)
एका प्रसंगाची आठवण झाली. एकदा ओफिसातून बाहेर पडताना खूप पाऊस पडत होता, एक माणूस बराच वेळ दाराशी उभा राहिला पाऊस कमी होईल म्हणून. १५ मिनिटांनी स्वत:च म्हणाला,'What the heck, its just water' आणि पळतपळत निघून गेला. :-))
But this post was 'more than just water'. :-) Have a good weekend.
-Vidya.

Samved said...

या मेघनाचा स्पीड माझ्याहुन जास्त आहे. ही blog माझ्या आधी वाचते आणि सगळ्या चांगल्या comments आधीच देऊन टाकते...तीव्र निषेध!!

निलेश...सुरेख!! मला पाऊस मुड नुसार आवडतो. पुण्यात पाऊस म्ह्णजे दुर्दैवाने आधी रस्त्यांची दुर्गतीच आठवते त्यामुळे पाऊस उपभोगायचा कसा हेच मी मुळात विसरलो होतो. तुझ्या सुरेख लेखाने ती आठ्वण करुन दिली..आम्ही बडोद्यात असताना एका मुसळधार पावसात बाईक वर ट्रीपलसीट मारली होती. जनता आवाक होऊन बघत होती आणि आम्ही पाऊस लुटत होतो..तुझ्यामुळे आज सारं आठवलं...thanks friend..

ओहित म्हणे said...

शुक्रवार संध्याकाळ!! हाये जालीम ये किसकी याद दिला दी! सुरेख लिहीलेयस. कुठेतरी कसेतरी हे अनुभवल्यासारखे वाटतेय. रवीवार संध्याकाळ जितकी रटाळ वाटते तितकीच शुक्रवार संध्याकाळ रसाळ वाटते. आणि हा योगायोग ... मी हे सगळे रवीवारी संध्याकाळी वाचतोय. पण असो ... छान वाटले. :-)

Anand Sarolkar said...

>>संथ वाहते यारा माई. तिरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही.<<

Mast vatala he vachun."yara" aso va "Krushna" aso sarva nadyancha mul dharm ekach.

Brilliant post!

Ranjeet said...

Mastach lihile aahes! Kudos!

TheKing said...

असते एखादी संध्याकाळ अशी सुरेख. खरंतर त्यात विशेष असे काहीच नसते पण आपल्याखेरीज इतरांचे अस्तित्त्व जाणवते तेव्हा नाविन्याचा पुन:प्रत्यय एक नविन आनंद देतो!

Sneha Kulkarni said...

paus ani sandhyakal donhihi ekdum 'dil ko choo janewale'!! Hurhur aani aathvani jage karnarya, ho na? Mast lihile aahes!

Sneha Kulkarni said...

Tumhala jar kharach interest asel DreamIndiachya kamat participate karaycha, tar tumhi te US madhunhi karu shakata. Bakiche details have asatil tar mee mail takte. Btw commentbaddal dhanyvaad.

Yogesh said...

sundar.

Unknown said...

अरे अख्खी दुनिया भिजली रे या पोस्ट नी!!!
अप्रतीम लेख.... तु भयंकर सुंदर लिहीतोस.. इतकं छान कधी लिहीता येणार मला ?!!?

Anonymous said...

chayla.. kay zakkas lihitos re... bharawun geloy bhagh...

atta mi pan ek blog suru karava mhanatoy....

kedar