Saturday, May 05, 2007

मी CD Player आणि मी

अवघा चौदा वर्षाचा मी, स्टेजवरून जादूचे प्रयोग करतोय. माझ्या माकडचेष्टांना ऊत आलाय. लोकं जादू सोडून मला पोट धरधरून हसतायत आणि मी ही ते सगळं enjoy करतोय. आजच्या बरोबर अर्ध होतं नाही माझं वय तेव्हा? समोरच्या T.V. वर जुन्या रेकॉर्डिंगमध्ये मलाच स्वतःला बघताना काय मजा वाटतेय? Time Freeze की काय म्हणतात ते हेच असावं. जुने मंतरलेले दिवस झर्रकन डोळ्यासमोरून उडून गेले. एक नाही दोन नाही उणीपुरी चौदा वर्ष झाली. पण तो स्टेज, तो उत्सव आणि आमची चाळ तशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहते............

माझी चाळ. माझ्यासाठी ती फक्त एक इमारत नाहीयेच मुळी. खरंतर हे नातं वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे. कधी आईच्या मायेचं, कधी आजीच्या प्रेमाचं, कधी वडिलांच्या धाकाचं, जीवाभावाच्या मित्राचं आणि कधीकधी शत्रूचंसुद्धा. पण तरीसुद्धा हवंहवंसं वाटणारं. शेवटी ज्या नात्याच्या आठवणीनं टचकन डोळ्यांत पाणी येतं ते खरं नातं. त्याला नाव देण्याची गरजच काय?

अजूनही आठवतो चाळीच्या स्टेजवरचा माझा पहिला Stage Appearance. मी सांगितलेली लाकुडतोड्याची गोष्ट. खूपच लहान होतो तेव्हा, पण मी असे काही माकडचाळे केल्येयत की काय सांगू? पण माझा उत्साह वाढवण्यासाठी किती बक्षिसं दिली होती लोकांनी? नुसतं तेव्हाच नाही, पण कधीही चाळीत कोणत्याही कार्यक्रमात भाग घ्या, चांगला झाला तर कौतुकाची थाप मिळायचीच. पण वाईट झाला तर सूचनांबरोबर प्रोत्साहनपर कौतुक व्हायचंच. वडिलधाऱ्या मंडळींनी दिलेलं ते प्रोत्साहन तेव्हाच नाही तर आजही उपयोगी पडतं.

मग माझी दहावीची परीक्षा. सगळ्या घरांघरांत जाऊन नमस्कार करून आलो होतो. मी परीक्षेला निघालो तेव्हा अर्धी चाळ माझा धीर वाढवत होती. खरंतर कोण होतो मी त्यांचा? ना नात्याचा ना गोत्याचा. खरंतर कुणीच नाही. चौपन्न बिऱ्हाडातल्या एका बिऱ्हाडातला मुलगा. आणि मी तरी कशाला केला त्या सर्वांना नमस्कार? ते काही माझे नातेवाईक नव्हते. पण कधीकधी त्याहीपेक्षा जवळचे होते. पडलो तर हात द्यायला येणारे, चुकलो तर पाठीत धपाटा घालणारे.

अजूनही घरी सुट्टीवर गेलो की परतताना अगदी सगळ्या चाळीच्या नाही पण मजल्यावरच्या वडिलधाऱ्या मंडळींना नमस्कार केल्याशिवाय घर सोडत नाही. शक्यच नाहीये ते. उद्या आमच्या पुढच्या पिढीतली मुलं "All the Best" च्या गजरात परीक्षेला जातील, पण त्यांना नमस्कार करायला आणि आशीर्वाद द्यायला कोण असतील? मुळात ती आपल्या पालकांनातरी नमस्कार करतील का?

प्रत्येक माणसात काहीनं काही गुण आढळून येईल. गुणांची खाण होती आजूबाजूला फक्त पाहण्याला नजर हवी, नळावरच्या भांडणांच्या आणि common संडासांच्या पलीकडे जाऊन बघायची. कुणी माझ्यात शास्त्रीय संगीताची आवड निर्माण केली, तर कुणी गणितं घालून माझ्या मेंदूला कामाला लावलं. कुणी ओरडलं, भांडलं, पण आम्ही मुलांनी चांगलं वागावं असाच त्यांचा हेतू होता. कोणत्या आजींनी त्यांच्याकडे गेल्यावर न चुकता खाऊ दिला. अगदी अजूनही देतात. माझी आजी आज हयात नाही. पण तीच पाठीवरून हात फिरवतेय असं वाटतं.

आणि चाळीतले मित्र, त्यांचं तर काय सांगावं? अजूनही परत गेल्यावर, काय गद्रे, काय म्हणताय? अशी जोरदार हाक कुठूनतरी ऐकू येते. जुने दिवस आठवतात. किती ते खेळ. लंगडी, हुतुतू, खो खो, क्रिकेट. घरात अभ्यास नसेल तर आम्ही अंगणातच असू. भांडणं होत. मारामाऱ्यासुद्धा होत. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी पहिले पाढे पंचावन्न. आज चाळीत एवढ्या गाड्या झाल्यायत की मुलांना खेळायला अंगणच नाही. ही परिस्थिती पाहून चाळीला नक्की दुःख होत असेल.

तुम्ही बाहेर कितीही मोठे असाल. तो सगळा मोठेपणा बाजूला ठेवून वावरायची नम्रता चाळीने शिकवली. कोण डॉक्टर, आपला सगळा मोठेपणा बाजूला ठेवून उत्सवात अंगणंच झाडेल. कुणी मोठ्या पगारावर आणि हुद्द्यावर असलेली मुलगी किंवा सून, सार्वजनिक हळदीकुंकवासाठी सतरंजी घालण्यापासून तयारी करेल. असे धडे घेत घेत आम्ही मोठे झालो. पुढच्या पिढीचं शिक्षण हे त्यांच्या घराच्या चार भिंतीत computer च्या साहाय्याने होईल. जगाची सगळी माहिती त्यांना उपलब्ध असेल. पण पालकांच्या अपरोक्ष आगाऊपणा केल्याबद्दल टपलीत मारणारे हात असतील का त्या computer ला?

आताशा चाळीतदेखील बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सगळ्या चाळी पाडून उंच इमारतींचं complex बांधायचं चाललंय. माझ्यासारखी मुलंच त्यात पुढाकार घेतायत. आता आम्हाला चाळीच्या common संडासांची लाज वाटायला लागलेय. कोणतीही पूर्वसूचना न देता, काय वहिनी आज पाव भाजी वाटतं असं म्हणत स्वैपाकघरापर्यंत घुसणारे शेजारी आता आम्हाला Intruding वाटायला लागलेत. आमच्या गाड्यांसाठी चाळीचं अंगण अपुरं पडायला लागलंय आणि चाळीच्या सार्वजनिक कामांत भाग घेणं आम्हाला आता Below Dignity वाटायला लागलंय. कुणी विचारला कुठे राहत होता मुंबईत तर आम्ही शिताफीने चाळीत राहत होतो हे सांगायचं टाळू लागलोय.

चाळही आत थकलेली आहेच. म्हाडाचे टेकू लावून लावून तिला तरुण ठेवण्याचा अट्टहास अपुरा पडत चाललेला आहे. त्यामुळे ती स्वतःहून जरी कोसळली नाही तरी आमच्यातलाच कोणीतरी तिच्यावर बुल्डोझर फिरवणार हे निश्चित आहे. उद्या तिथे sky scrapper उभी राहील. आणि काल चाळीच्या अंगणात खेळणारी आम्ही मुलं आमच्या Flat चे दरवाजे बंद करून आमच्या मुलांना computer बरोबर खेळायला बसवू. शेजाऱ्यांकडे जाताना पूर्वीसारखं थेट घरांत घुसणं तिथे असभ्यपणाचं लक्षण मानलं जाईल. तुम्ही आमच्या घरातले नाही, परके आहात असं सांगणारे जाळीचे दरवाजे आणि दरवाज्यावरच्या घंटा तिथे असतील. सगळं काही छान छान आणि आनंदी असेल. पण आमच्या त्या उंच इमारतीखाली चाळीचं थडगं तिच्याच संस्कारांची होळी पाहून अश्रू गाळीत असेल.

अजूनही आठवतं. नोकरीसाठी घर सोडायची वेळ आली, रात्री उठून एकट्यानेच चाळ बघून घेतली होती. उगाचच लहान मुलासारखा कठड्यावर हात ठेवून ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गॅलेरीत फिरलो होतो. जिन्याच्या पायऱ्यांवर बसून एकटाच रडलो होतो. पुन्हा कधी परत येईन माहीत नव्हतं. गाडीत बसताना गॅलेरीत उभ्या असलेल्या लोकांना अच्छा करताना मनातल्या मनात चाळीलाही अच्छा केला होता. मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारताना मनातला आवंढा गिळला होता.

ह्या आठवणी येतात, मन एवढं एवढंसं होतं. वाटतं सोडून द्यावे जिंकलेले सारे किल्ले, परत जावं. चाळीच्या अंगणातल्या सगळ्या गाड्या केराच्या टोपलीत टाकाव्यात. सगळ्या मित्रांना परत अंगणात बोलवावं. एक जोरदार फटका मारून तळ मजल्यावरच्या काकूंच्या तावदानांची काच फोडावी. काकूंनी चेंडू विळीवर कापून द्यावा. संध्याकाळी त्याच काकूंचं दळण मी त्यांना आणून द्यावं. त्यांबद्दल त्यांनी मला खाऊ द्यावा आणि पुन्हा काच फोडणार नाही असं वदवून घ्यावं. गोकुळाष्टमीला यथेच्छ खेळावं, होळीला जीव तोडून रंगावं. उत्सवात लहान मूल होऊन हुंदडावं. पुन्हा एकदा चाळकरी व्हावं. पुन्हा एकदा चाळकरी व्हावं.

..........CD Player मधली CD संपलेली असते. बायको मला जेवण्यासाठी बोलावते. आज जेवण नीटसं जात नाही. ती का म्हणून विचारते. मी निरुत्तर होतो..........

11 comments:

Prashant Uday Manohar said...

नमस्कार,
हा लेख वाचून जवळ जवळ दोन शतके मागे गेल्यासारखं वाटलं. मी चाळीत वाढलेलो नाही. वाड्यात वाढलो. पण तिथेही अनेक बिर्‍हाडं एकत्र राहत असल्यामुळे, अगदी चाळीतलं वातावरण असायचं. पु. ल. देशपांडे यांच्या बटाट्याच्या चाळीचीच आठवण झाली.
-प्रशांत

sangeetagod said...

छान वर्णन. अगदी डोळ्यासमोर चित्रं उभं राहिलं

Ranjeet said...

Super!!! Kharokhar ' batatyachi chaal' athavali - aani aamchi Thanya madhli "Anandashram" suddhha! Nostalgia!

Chhan lihile aahes!

Anand Sarolkar said...

Aathvani astatach ashya! agdi hath dharun bhutkalat gheun jatat. Mag vartamanat yayla khup tras padto!

Chhan vatala vachun. Chal ha prakar fakt vachun ani TV serials madhunch mahit hae. Pan majha balpan athavla mala!

Rohit said...

वा सुरेख! बऱ्याच गोष्टी ईतक्या सहज बदलतात की बदलेपर्यंत कळतच नाहीत! हे सगळे वाचून बऱ्याच आठवणी ताज्या झाल्या. लिहीत रहा.

तसा आपला परीचय नाही ... पण दिलेल्य प्रोत्साहनाबद्दल हा लेखक आपला आभारी आहे :-)

archanaa said...

majhya likhanawar pratikriyebaddal khoop dhanyawaad.

tu hi sureeekh lihila ahes. kharach athawale june diwas... pan kalaji karu nakos... apali mula... infact pudhachi pidhi namskar karel fakta all the best mhananr nahi. Mi jithe rahate mumbai madhe tisuddha ek modern building complex ahe pan sudaiwaane amhi ithe chali sarakhe rahato mhanje darawaaje ughade nastat pan amachi mule ekamekat misalaleli ahet ani amhi suddha... amhala ekamekanchya gharatla sagla mahiti ahe.... amhi ek mekanna mulanchya aai ani baba mhanoon olakhato :) ani ithe tar bara gawachi mandali ahet marathi manasa kami... sagal apan sawayee lawnyawar ahe...

archana

रोहित said...

कोहम, तुम्हाला हा प्रश्न खरोखरच पडलाय का? तुमच्या नोंदी वाचून मला वाटतं तुम्हाला या प्रश्नाची एकच नव्हे, तर अनेक उत्तरं मिळाली आहेत आणि त्यापैकी कुठलं निवडावं हा प्रश्न आहे!

ही नोंदही अफाट होती. मी मुंबईत राहिलो नाही. तिथल्या fabled चाळी मी त्रयस्थ म्हणूनच पाहिल्यात. त्या पाहून अनेक प्रश्नही पडले, पण त्यावर चर्चा करायचं हे स्थान नव्हे.
तुमचं लिखाण वाचून मात्र एकदम विचित्रसं वाटलं. सगळ्याचा पुन्हा एकदा विचार करावासा वाटला. नाती, पैसा, घर, प्रगती, संस्कृती यांच्यामधले तिढे सोडवण्यातच आपली आयुष्यं जायची का? या सगळ्या गोष्टी एकदम कधीच नाही मिळू शकत? ही ओढाताण नको वाटते अगदी.

आणखी एक अनोखा अनुभव दिलात, त्याबद्दल धन्यवाद.

Monsieur K said...

mast lihila aahe! :)
they say change is inevitable, but it is hard for those who have to undergo it personally.

Poonam said...

mast lihile ahe. me pan vaaDyaatach vaaDhale. kutumbanchi sankhya kami, baki vatavaraN chaaLisaarakhach! :) tumache baaki lekhahi chaan aahet. aawadale.

mazhya blog war aawarjoon aalaat ani kathewar pratikriya dilit ya baddal aabhaari aahe.

anuradha said...

Wah nilesh...mastach lihila aahes..chalit mi agadi lahan asatana hote tevachi athavan zali..too good..

Caroline said...

Thanks for writing this.