Wednesday, May 02, 2007

रोहिंग्या आणि डान्सिंग विथ द स्टार्स...

एक घाणीने बरबटलेलं गटार, खरंतर रस्ताच. बाजूला झोपडपट्टी. समोर थोडी मोकळी जागा. निळ्या गणवेषातला एक पोलिस काठी आपटंत येतो. मोकळ्या जागेत खेळणारी मुलं उधळून पळतात. एक पांगळं मूल मागेच रखडतं. पोलिस त्याच्यावर काठी उगारून त्याला धमकावतो. कदाचित पोलिसालाही त्या मुलाची दया येते. त्या मुलाला तसंच सोडून तो पुढे जातो. ते पांगळं मूल तसंच गटारात पडून रहातं. त्याचे टपोरे डोळे पाण्याने भरतात. अश्रू नाही, ते संताप, दुःख, असहायता, अपमान ह्याने भरतात. कोणी लहानपणीच मोठं केलं ह्या लहान मुलांना?

.......रोहिंग्या. बांग्लादेश आणि बर्मा ह्यांच्यातल्या एका वादाचं कारण. बर्मामधल्या एका मुस्लिम जमातीला रोहिंग्या म्हणतात. ते आश्रित म्हणून बांग्लादेशात रहातात. Official Number बावीस हजार. विस्थापित, आश्रित, Refugee......

शाळा. शाळेत मुलं काहितरी घोकतायत. काहितरी नाही, English आहे ते. "I am something" असं काहिसं. एक पोरगेलसा शिक्षक शिकवतोय. चक्क लूंगी लावून. कारणंच तसं आहे. तो Refugee असल्याने त्याने Pant घालणं त्याच्या दर्जाला साजेसं नाही. लुंगी ऎवजी Pant घातल्यामुळे खाव्या लागलेल्या माराचे व्रण अजूनही त्याच्या पाठीवर ताजे आहेत.

......मुसलमान म्हणून ते बर्मामधे वेगळे काढले जातात. लोकशाही नाही, व्यक्तीस्वातंत्र्य नाही. बांग्लादेश मुसलमान देश, लोकशाही देश म्हणून रोहिंग्यांचे लोंढेच्या लोंढे बांग्लादेशात येतात. पण त्यांच्यासाठी तरी कुठे ते आपले आहेत? उपरे म्हणून त्यांच्यावर लोकांचा आणि system चा सुद्धा राग आहे.......

एक धडधाकट माणूस चक्क ढसाढसा रडतोय. त्याच्या बायकोसमोर, मुलांसमोर. मुलांना दोन वेळेला जेवायला पण मिळत नाही असं डोळ्यात आर्जव आणून आणून सांगतोय. तो एक भांडं दाखवतो. त्यात जेवण म्हणून बनवलेलं काहीतरी असतं. हे मिश्रण आणि भात. सकाळ संध्याकाळ हेच खायचं. तेसुद्धा जर पुरेशी धनधान्याची मदत मिळाली तर. वर पोलिसांचा मार आहेच. आता त्याच्या बायकोलाही रडू येतंय. पोरगं मात्र मातीशी खेळण्यात दंगलंय. एक बचाकभर माती उचलून ते सरळ तोंडात टाकतं.

......बावीस हजार रोहिंग्या बांग्लादेश बर्मा सीमेवरच्या Refugee Camp मधे रहातात. संयुक्त राष्ट्रांकडून हे Camps चालवले जातात. पण अनधिकृतपणे बांग्लादेशात रहाणार्‍या रोहिंग्यांची संख्या एक लाखाहूनही अधिक आहे. त्यांना Refugee Camp मधे ज्या काही तुटपुंज्या सोयी मिळतात त्याही मिळंत नाहीत......

एक बाई आपल्या झोपडीसमोर बसलेय. तिची मुलं कसलासा पाला समोरच्या रानातून तोडून आणतात. तोच पाला ती शिजवतेय अन्न म्हणून. सात मुलं आहेत तिला. नवर्‍याला बर्मा मधे मारलं म्हणून ती मुलांना घेवून बांग्लादेशात पळून आली. पण ती अनधिकृत Refugee आहे. मुलं अधाशासारखी त्या पाल्याकडे बघतायत. ती बाई डोळ्यात असवं आणून सांगतेय. तिला आणि तिच्या नवर्‍याला बर्मिज सॆनिकांनी कॆदेत टाकलं. सतत बलात्कार. सातातली किती मुलं नवर्‍याची आणि किती दुसर्‍यांची हे सांगणंदेखील तिला शक्य नाही. तिला तिच्या मुलीची अशी अवस्था करायची नाहीये. चवदा वर्षाची आहे तिची मुलगी. पण तिला ती कुठेही जावू देत नाही. आजूबाजूचे लोक अचकट विचकट बोलतात, घरापर्यंत येवून तिला पाठव म्हणून धमकावतात.

.....रोहिंग्या लोकांविरुद्ध बांग्लादेशींमध्ये असंतोष खदखदतोय. ते स्वस्तात कामं करतात आणि स्थानिकांचा रोजगार पळवतात. ह्यामुळे स्थानिकांकडून त्यांना काही मदत मिळणं अशक्य आहे. सरकारही ते उपरे असल्याने त्यांच्यासाठी काहीही करू इच्छित नाही. बर्मा सरकारने तर त्यांचं राष्ट्रियत्व नाकारलंय. हा तिढा इतक्यात सुटण्याची चिन्ह नाहीत म्हणून मदत देणार्‍या देशांनीही हात आखडता घ्यायचं ठरवलंय. पण तरीही एक आशेचा किरण अद्याप आहे......

एका छोट्या hall मधे अनेक लहान लहान मुलं आणि त्यांच्या आया बसल्यायत. प्रत्येकीच्या हातात एक चंदेरी पिशवी आहे. ती एका बाजूने फोडून त्यातलं चाटण आया मुलांना खायला घालतायत. Medecins Sans Frontieres (MSF) अर्थात Doctors without Borders ह्या संस्थेचा एक स्वय़ंसेवक सांगतोय की रोहिंग्या विस्थापितांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण खूप आहे. कारण कुपोषण. म्हणून MSF तर्फे हे पोषक अन्न बालकांना दिलं जातंय. ते बालकांना तर आवडतंच आणि त्याचा पुरवठा करणंही तितकसं अवघड नाही. हळूहळू इथल्या बालकांचं पोषण ह्यामुळे सुधारेल.

......असा आहे हा तिढा. ना घरका न घाटका. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. एकोणिसशे नव्वद सालापासून लोक Refugee म्हणून रहातायत. पंधरा वर्ष झाली. लहानांचे तरूण झाले. त्यांनी बाहेरचं जग पाहिलंच नाही. तरूण उताराला लागले उद्याच्या आशेवर. म्हातारे मेले चांगल्या कबरीची स्वप्न पहात. पण बांग्लादेश, बर्मा आणि त्यांच्यातला हा तिढा आहे तसे आहेत. आणि रोहिंग्या आहेत कायमस्वरूपी Refugee......

निवेदक आपलं निवेदन संपवतो. श्रेयनामावली सुरू होते. आम्ही बघणारे मात्र सुन्न. कशा अवस्थेत लोकं रहातात? आणि आपण फालतू कारणांसाठी रडत असतो. हे विषय पण गुंतागुंतीचे. रोहिंग्या बांग्लादेशात refugee. बांग्लादेशी भारतात refugee. आणि भारतीय पश्चिमी देशांत. Refugee नसले तरी तसलंच काहीतरी. विचारांची वावटळ मनात सुरू होते.

इतक्यात श्रेयनामावली संपून जाहिराती सुरू होतात. मी चटकन भानावर येतो. घड्याळाकडे लक्ष जातं. साडेसात. मी जवळ जवळ किंचाळतोच बायकोच्या अंगावर. अगं "Dancing with the stars" सुरू झालं असेल. तार्‍यांच्या भाऊगर्दीत रोहिंग्या अस्पष्ट होत जातात.

10 comments:

HAREKRISHNAJI said...

छान लिहिले आहेत

A woman from India said...

रोहिंग्यांबद्दल मला अजिबात माहिती नव्हती. आधी मला वाटले हे कुठल्या पक्ष्याचंच नाव आहे.
"रोहिंग्या बांग्लादेशात refugee. बांग्लादेशी भारतात refugee. आणि भारतीय पश्चिमी देशांत. Refugee नसले तरी तसलंच काहीतरी. विचारांची वावटळ मनात सुरू होते." - खरंय.
मनुष्यप्राणी फार विचित्रं आहे.

Abhijit Bathe said...

भाई!
मला मी कधीमधी बरं लिहितो म्हणुन अहंगंड वाटतो.
पण तू जे लिहिलयस ते थोर आहे!!
याला ’सुंदर पोस्ट’ म्हणणार कि सुन्न होऊन (गप्प) बसणार अशा काहीशा निरुत्तर करणाऱ्या घोळात मी अडकलोय.
’इंजीनियर्स विदाऊट बॉर्डर्स’ या ग्रुप बरोबर काम करण्याबद्दल मी त्यांच्या चीफ इंजीनियरशी मागच्या महिन्याभरात दोनदा बोललो, पण कुठे इथियोपिया, उगांडा मधले लल्लु-पल्लु प्रोजेक्ट्स डिझाईन करा....म्हणत मी कंटाळा केला.

तुझं पोस्ट वाचल्यावर - बाकी काही नाही तर नाही पण येत्या आठवड्यात मी त्यांचा सदस्य होतोय आणि कुठलेही पैसे न घेता काही प्रोजेक्ट्स डिझाईन करतोय.

Yogesh said...

आपल्या स्वत:च्या गावात राहूनही यापेक्षा हलाखीची परिस्थिती महाराष्ट्रातल्या कित्येक खेड्यांत आहे.

इंडिया शायनिंग असं बोंबलणार्‍या सरकारचे डोळे या शायनिंगमुळं इतके दिपलेत की रोज आत्महत्या करणार्‍या शेतकरी त्यांना दिसतच नाहीत.

गावात लाईट नाही म्हणून शेतीला असून पाणी देता येत नाही आणि इथं पुण्यात एका लॅपटॉपच्या दुकानाचं उद्घाटन होतं त्याने दुकानाबाहेरच्या झाडांवर पण २ आठवडे लायटिंग केली होती.

स्नेहल said...

सुन्न करणारं आहे हे. योगेश म्हणतो त्यात बरंच तथ्य आहे...

अनु said...

Bapare!
Tumhi lihile khup prabvhavi ahe.
Likhanatil paristhitibaddal: Mazya nusatya vait vatanyane tyanche bhale hoil ase vatat nahi,pan tarihi vait vatate.

Ranjeet said...

डोळे उघडणारा लेख आहे. Broadens the perspective and saddens the heart. Thanks for sharing this.

कोहम said...

सर्वांना प्रतिसादाबद्धल धन्यवाद. मला जे मनाला स्पर्शून जातं, ते इथे मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. ते तुम्हालाही स्पर्शून गेलं. ह्यातच सर्व भरून पावलं.

अभिजीत, तुझा प्रतिसाद वाचून खूप बरं वाटलं, मी नाही तर नाही, पण कोणीतरी काहीतरी करायला उद्युक्त झालं.

योगेश, तुझं म्हणणं रास्त आहे. त्यांचे problems मोठे, आपले लहान असं मला म्हणायचं नव्हतं. problems सगळीकडेच आहेत. माझ्यासारख्या लोकांच्या जाणीवा फक्त बोथट झाल्यायत, त्यामुळे stars च्या मांदियाळीत आम्ही रोहिंग्याच काय, पण त्या तोडीचे भारतातले प्रश्नही विसरून बसलोय.

sushama said...

Thanks for the comment...u know?..this I hav written abt my grandson,12 days old...

madhura said...

bhayakar aahe.
kay pratikriya or comment denar?
aangavar yenare aahe.
chan