Saturday, February 17, 2007

प्रेमाला उपमा नाही...

आज V-day. V-day म्हणून आज मुद्दाम लिहायला बसलोय. पण काहीच सुचत नाहीये. बघा ना, प्रेमासारखी विश्वव्यापी गोष्ट आहे. किती लिहिण्यासारखं आहे त्यावर? कितीही. पण परत विचार केल्यावर असं वाटतं की प्रेम म्हणजे "तुमचं आमचं एकदम Same" असतं की. मग मी माझे "प्रेम"ळ अनुभव तुम्हाला सांगण्यात तरी काय अर्थ आहे?

मुळात प्रेम म्हणजे काय असतं तरी काय? प्रेम म्हणजे कदाचित एखादा बासरीचा सूर असेल. अगदी "Call of the Valley" मधून उच्लून आणलेला. कानाला गोड भासणारा, मनाला हळुवार बनवणारा. इतर वाद्यवृंदातलाच असणारा पण तरीदेखील आपलं वेगळेपण जाणवून देणारा.

की असेल प्रेम म्हणजे पाण्यात भिजवलेलं पीठ. जे अश्वत्थाम्याला त्याच्या आईने दूध म्हणून दिलं होतं? दिसतं तसं नसतं च्या सदरात मोडणारं.

किंवा असेल प्रेम म्हणजे एक खुर्ची. सत्तेची, अधिकाराची. आपला विचार लोकाम्वर लादायला वापरायची. दुसर्‍याच्या सुखाच्या नावाखाली, त्याला टोपी घालून आपली पोळी भाजून घेण्यासाठीची.

कदाचित प्रेम असेल एखादी भिकारीण, एखाद्या कळकट, मळकट रस्त्याशेजारच्या गटारात पाय पसरून बसलेली. जिच्या कनवटीला असेल शिळ्या भाकरीचा अर्धा तुकडा आणि पोटात भुकेचा आगडोंब. असतील जिच्या झोपडीत वाट पहाणारी भुकेली मुलं.

की प्रेम म्हणजे असेल एखादी मादक तरुणी? नाहीतरी म्हणतातच ना की प्रेम विचारशून्य असतं म्हणून. विचारशून्य असतं हे मान्य. पण विकारशून्य असतं का? सांगता येत नाही...

किंवा असेल प्रेम म्हणजे एखादा सॆनिक. मनात एकच लक्ष्य ठेवून समोरच्या शत्रूला सामोरा जाणारा. गोळ्या छातीवर घेत मृत्यूला कवटाळणारा.

की असेल प्रेम म्हणजे अफूची गोळी? घेतली एकदा की सर्व दुःख दडपणारी. मनाला मूर्ख बनवत सर्व दुःखांच्या संवेदना कमी करणारी. थोड्या वेळा करता.

प्रेम कशात नाही सांगा? रामात प्रेम आहे, कामात प्रेम आहे. किड्यात प्रेम आहे, विड्यात प्रेम आहे. Phone प्रेम आहे, engaged tone सुद्धा प्रेम आहे. गुलाबी पाकिट प्रेम आहे, सिनेमाचं तिकिट प्रेम आहे. पाण्याबाहेरचा मासा म्हणजे प्रेम आहे, द्युतातला फासा म्हणजे प्रेम आहे. कुणाला पाणी म्हणजे प्रेम आहे, कुणाला नाणी म्हणजे प्रेम आहे. कधी मी म्हणजे प्रेम, कधी ती म्हणजे प्रेम. तुम्ही म्हणजेसुद्धा प्रेम आणि आम्ही म्हणजेसुद्धा प्रेम. प्रेम म्हणजे फक्त प्रेम. Absolute प्रेम. तुमचं आणि आमचं सेम सेम...

प्रेमाला उपमा नाही हेच खरं.......

3 comments:

Bhagyashree Kulkarni said...

इतक्या मस्त ब्लॊगपोस्टला एकही कमेंट कशी काय नाही??
खुपच सही लिहिलय.. शेवटचा paragraph खासच!

sachin said...

ho kharach premala upma nahi prem manal tyacyat ahe,dukkhat ahe sukhat ahe asvat ahe hasvat ahe.ananadane swikar kela tar premach prem ahe je tumche amche same ahe.

awyakta said...

"किंवा असेल प्रेम म्हणजे एक खुर्ची. सत्तेची, अधिकाराची. आपला विचार लोकाम्वर लादायला वापरायची. दुसर्‍याच्या सुखाच्या नावाखाली, त्याला टोपी घालून आपली पोळी भाजून घेण्यासाठीची."


Khaas !