Wednesday, November 14, 2007

गर्ता

सर्व वाचकांना आणि ब्लॉगर्सना दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी आणि येते नववर्ष सर्वांना मजेचे, आनंदाचे आणि मनस्वी जावो.

मनोगताच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या कथेची लिंक देत आहे. दिवाळीच्या फराळाचा अस्वाद घेता घेता जरूर वाचावी.

http://www.manogat.com/diwali/2007/node/27.html

अंक जमून आला आहे असे वाटले. जमल्यास जरूर वाचावा.

- कोहम

Friday, November 02, 2007

घर असावे घरासारखे

फुललेल्या गुलाबांवरून नजरेला बळजबरीने खेचतच मी घरात शिरतो. लाल, पिवळे आणि पांढरे गुलाब. त्याच्या सोबतीने, कसली माहीत नाही, पण पांढरी फुलं पिवळा मध्य असलेली. कुंपणाशेजारी फुललेली जास्वंद आणि जमिनीवर गवताचा हिरवा गालिचा. म्हणजे, नजर जाताक्षणी पायताण बाजूला काढून अनवाणी चालावसं वाटायला लावणारा.

आतमध्ये गेल्यावर दिसताक्षणी लक्ष वेधून घेतं ते समोरच्या मोठ्या भिंतीवर लावलेलं पेंटिंग. नदीकाठी असलेली एक सुंदर झोपडी. भिंतीच्या शेजारी ओपन प्लान किचन, त्यातला ओव्हन नवा कोरा. भिंतीच्या दुसऱ्या बाजूला चढत जाणारा जिना, वर दोन बेडरुम्स, समोर प्रशस्त बाल्कनी. बाल्कनीतून लक्ष वेधून घेणारं एक झाड आणि झाडाच्या सर्वात वरच्या खोबणीत मॅग्पाइ चं घरटं. त्यातली काळी पांढरी पिल्लं स्पष्ट दिसतायत. वाह! घर असावं तर असं.

असं म्हणजे कसं? सुंदर बाग असलेल्या ह्या घरासारखं की चित्रातल्या त्या नदीबाजूच्या झोपडीसारखं की समोरच्या घरट्यासारखं?

कही गोष्टी आपण किती गृहित धरतो नाही? घर ही त्यातलीच एक गोष्ट. जन्माला येताना आपल्याला घराचा चॉइस असतो का? नाही. जिथे आपण जन्मतो ते आपलं घर.

माझं घर कसं? बाग असलेल्या घरासारखं नाहीच नाही. झोपडीसारखं? असेलही पण तितकसं निसर्गरम्य वगैरे काही नाही. मग घरट्यासारखं? असेल कदाचित ह्या समोरच्या घरट्यासारखंच असेल.

आभाळ पेलती पंखांवरी पप्पांना घरटे प्रिय भारी....पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे.

हं. माझ्या हया आवडत्या ओळी होत्या एके काळी. अजूनही आहेत. ही पूर्ण कल्पनाच किती रोमॅन्टिक आहे ना? जगाच्या दृष्टीने यःकश्चित असणारा बाप, आभाळासारख्या समस्या आपल्या खांद्यावर पेलतो पण त्याचं घरटं मात्र सुरक्षित ठेवतो. म्हणून जगाच्या दृष्टीने यःकश्चित असलेली व्यक्ती, घराच्या नजरेत बाप असते.

असं होतं का माझं घर? होतं. आभाळ पेलणाऱ्या पंखांखाली सुरक्षित असलेलं. होतं का? अजूनही आहे. पण पंखाच्या संकल्पना बदलल्या आणि आभाळाच्याही.

तसं पाहिलं तर माझं घर काही सुंदर वगैरे नव्हे. निसर्गरम्य तर नव्हेच नव्हे. म्हणजे ते सुंदर वगैरे करण्याच्या ज्या काही शक्यता होत्या त्यांचा आम्ही पुरेपूर पाठपुरावा केला. नाही असं नाही. पण आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठे येणार. ह्या गोष्टी माझ्या घरात नाहीत किंवा कमी आहेत ही जाणीवच कधी झाली नाही? का बरं?

कदाचित घर हे दगडविटांचं बनलेलं नसतंच मुळी. घर बनलेलं असतं आभाळ पेलणाऱ्या पंखांचं. तापलेल्या फणफणणाऱ्या कपाळावर ठेवलेल्या थंड पाण्याच्या घडीचं. डोळ्यात टचकन जमणाऱ्या पाण्याचं, पाठीत मारलेल्या सणसणीत रट्ट्याचं, भावाबहिणींच्या भांडणाचं, त्यांना ओरडणाऱ्या आईचं, समजावणाऱ्या आजीचं, एकत्र बसून केलेल्या दिवाळीच्या कंदिलाचं, घरात येणाऱ्या गणपतीचं, संध्याकाळी म्हटलेल्या शुभंकरोतीचं आणि रात्री झोपताना एकलेल्या अंगाईचं.

आज मागे वळून माझ्याच घराकडे बघताना कसं वाटतं माहितेय? घरट्यातून उडून गेलेल्या पिल्लासारखं. म्हणूनच म्हटलं. आभाळ आणि पंख ह्यांचे संदर्भ तेवढे बदलले. घर होतं तसंच आहे.

ह्या घरट्यातून पिल्लू उडावे
दिव्य घेऊनी शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती

हे गाणं आता माझ्याच घराचंच वाटायला लागतं.

मग माझं घर कसं? ह्या बागवाल्या घरासारखं? चित्रातल्या झोपडीसारखं? की समोरच्या घरट्यासारखं?

माझं घर फक्त माझ्या घरासारखं.