Friday, June 22, 2007

लायसन्स, एक गुलबकावलीचे फूल

समजा आपण चालवत असलेलं वाहन, सिग्नल लाल झाल्यावरही न थांबता पुढे गेलं. म्हणजे अशी चूक आपल्याकडून होणं शक्यच नसतं, पण गाडीच वेळेत थांबू शकली नाही (चूक नेहमी गाडीचीच असते) आणि आडवळणाला बसलेला समस्त वाहनचालकांचा मामा, हातवारे करत आपल्याला थांबवायला लागला, (आणि आपण थांबलोही) तर तो आपल्याकडे सर्वप्रथम कोणती वस्तू मागेल? अचूक ओळखलंत. ड्रायव्हिंग लायसन्स.

भारतात असेपर्यंत ते लायसन्स मिळवणे आणि ऐच्छिकरीत्या ते जवळ बाळगणे किंवा न बाळगणे ह्यात कठिण असं काही नव्हतंच. त्या सर्वातलं काठिण्य "चिरी मिरी" ह्या एका संकल्पनेनं नष्ट करून टाकलं होतं. पण भरताबाहेर अशी संकल्पना अस्तित्वात असल्याची खात्री नव्हती आणि असलीच तरी ती आपल्या खिशाला परवडणार नाही ह्याची खात्री होती. त्यामुळे इथे माझ्या किंवा गाडीच्या चुकीने सिग्नल तुटलाच, इथल्या मामाने (खरंतर अंकलच म्हणायला हवं) थांबवलंच, तर त्याला भारतीय लायसन्स कसं दाखवायचं?

मुळात तसं मी ते दाखवलंच तर ते लाल रंगाचं पुस्तक म्हणजेच लायसन्स असल्याचं त्याला पटवून द्यावं लागेल. समजा त्याला ते पटलंच आणि त्याने ते उघडून वाचलं, तर आत लिहिलेली अगम्य लिपी त्याला समजावी तरी कशी? आणि समजा ती लिपी रोमन असून भाषा इंग्रजी आहे, हेही मी त्याला पटवलं. तरी काय लिहिलंय हे फक्त लिहिणाऱ्यालाच कळावं (बहुदा त्यालासुद्धा कळू नये) अशा सांकेतिक पद्धतीने लिहिलेलं असल्यामुळे, ते वाचणं किंवा वाचून दाखवणंही अशक्य कोटीतलं होतं.

राहून राहून माझा फोटो मात्र त्या अंकलला दिसला असता. पण तो अठराव्या वर्षी काढलेला असल्याने, आणि माझ्या आणि त्या फोटोच्या वयोमानात आणि माझ्या आकारमानात आणि वस्तुमानात बराच फरक झालेला असल्याने, त्या फोटोतला तो मीच हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा माझ्याजवळ नसल्याने, इथे नवं ड्रायव्हिंग लायसन्स काढावं हे उत्तम, हे मी ठरवलं.

त्या अनुषंगाने मी माहिती काढायला सुरवात केली. काही अनुभवी व्यक्तींनी मला ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून लायसन्स काढायचं सुचवलं. पण मला गाडी चालवता येत असताना, असल्या कोणत्याही स्कूलचा विद्यार्थी होणं माझ्या तत्त्वात बसणारं नव्हतं. आणि ते ड्रायव्हिंगचे धडे आणि परीक्षेकरता आकारत असलेली फी बघून, मी ही फी वाचवली तर तेवढ्यात एक सेकंड हँड खटारा गाडी येऊ शकेल, हे माझ्यातल्या एकारांताने बरोबर ताडलं. त्यामुळे मिशन लायसन्स स्वतःच पूर्ण करण्याचं मी ठरवलं.

पुढे अशी माहिती हाती आली की लायसन्स मिळवण्याकरता तीन परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. देशात लायसन्स मिळवण्यासाठी द्यावयाच्या परीक्षेशी तुलना करता, बहुतेक इथे लायसन्स म्हणून बॅचलर ऑफ ड्रायव्हिंगची पदवी देत असावेत असा एक विचार मनात येऊन गेला आणि मी काळी कोट टोपी घालून लायसन्सदान समारंभात माझं लायसन्स स्वीकारतोय वगैरे बाष्कळ विचार माझ्या मनात तरळायला लागले. अपुरी स्वप्न अशी नको तिथे डोकं वर काढतात बघा.

मग पुढे असं कळलं की पहिली परीक्षा म्हणजे थिअरी. म्हणजे सगळे नियम वगैरे पाठ करून जायचे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची संगणकावर उत्तरं द्यायची. म्हणजे करोडपती कार्यक्रमाप्रमाणे काँप्युटरजी आपल्याला एक प्रश्न आणि चार उत्तरं देणार आणि आपण त्यातून योग्य पर्याय निवडायचा. फक्त दुर्दैवाने लाइफलाइन्स उपलब्ध नव्हत्या. दुसरी परीक्षा म्हणजे ड्रायव्हिंग सिम्युलेशनची. तुम्ही कधी गाडीचा व्हिडिओगेम खेळलायत का? तसाच व्हिडिओगेम समजा. फक्त हा गेम खेळायला घसघशीत रक्कम फी म्हणून भरायला लागते आणि पहिल्या प्रयत्नात चांगला खेळता आला नाही. म्हणजेच खेळता खेळता आपलाच गेम झाला, तर पुन्हा पुन्हा खेळावा लागतो, पुन्हा पुन्हा ऐसे भरून.

तर अंगभूत हुशारीमुळे म्हणा किंवा बालपणापासून व्हिडिओगेम्स खेळायच्या सवयीमुळे म्हणा, शंभरातील नव्याण्णव लोकांप्रमाणे मी पहिल्या दोन परीक्षा उत्तीर्ण झालो. म्हणजे खेळाडू जसे मुख्य सामान्याआधी सराव करतात तसा हा मुख्य ड्रायव्हिंगच्या परीक्षेचा सराव होता.

आता ड्रायव्हिंगची परीक्षा द्यायची म्हणजे पहिली सोय गाडीची करायला हवी. गाडी नाही तर मी मरायला लायसन्स का काढत होतो असा क्षुद्र विचार काही अतिउच्च बुद्धिमत्तेच्या वाचकांना पडल्यावाचून राहणार नाही. पण गंमत अशी होती, की माझे भारतीय लायसन्स इथे चार महिन्यावर चालत नाही, त्यामुळे गाडी नसली तरी घाईघाईने लायसन्स काढणे आवश्यक होते. पुन्हा तुम्ही अतिउच्च बुद्धिमत्ता असलेले वाचक असाल, तर तुम्हाला प्रश्न पडेल की, जर हाती गाडीच नाही, तर भारतीय लायसन्स नाही चालले तर बिघडते कुठे?

पण इथेच तर खरी गोम आहे. जर माझे भारतीय लायसन्स निरुपयोगी झाले असते तर ड्रायव्हिंगची परीक्षा देण्याकरता मला शिकाऊ म्हणजेच लर्निंग लायसन्स काढून महिनाभर चिपळ्या वाजवत बसावे लागले असते आणि मगच परीक्षा देता आली असती. शिवाय ह्या सगळ्या प्रकाराला बरेच पैसेही जास्त पडले असते. मी पडलो गरीब बिचारा नवखा स्थलांतरित (मायग्रंट) आणि त्यात एकारांत (म्हणजे आधीच मर्कट तशातही मद्य प्याला अशी अवस्था), म्हणूनच पैसे वाचवण्याकरता ही सगळी घाई. काहींना का कंजूषपणाही वाटू शकेल. पण बऱ्याचशा परदेशस्थ देशी आणि एकारांत अतिउच्च बुद्धिमत्तेच्या लोकांची समजूत पटली असेल. कारण शेवटी हे पटायला, तेथे पाहिजे जातीचे.

आता संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी ह्या न्यायाने माझ्या लायसन्ससाठी गाडीपासून तयारी सुरू करणे आवश्यक होते. इंटरनेटवर बरीच शोधाशोध करून स्वस्तोत्तम अशी एक गाडी भाड्याने देणारी कंपनी शोधून एक गाडी परीक्षेच्या दिवसापुरती भाड्यावर घेण्याचे ठरवले. त्या कंपनीला तसे कळवले. परीक्षेसाठी फी भरली आणि वेळ घेतली. आता सगळी तयारी झाली. दिवसामागून दिवस गेले आणि शेवटी परीक्षेचा दिवस उद्यावर येऊन ठेपला.



(क्रमशः)

3 comments:

Meghana Bhuskute said...

plz lawkar lihi....dhamal maja yetey...

स्नेहल said...

mast lihito aahes :) lavkar lihi ata pudhach

Kamini Phadnis Kembhavi said...

अरे पुढे काय?????????????
लवकर लिही की