कितीतरी वेळ तो देवयानीकडे टक लावून बघत होता. अगदी एखाद्या लहान मुलाने फुलावर बसलेल्या फुलपाखराकडे पहावं तसा. आणि आपल्या किंचितश्यासुद्धा हालचालीने फुलपाखरू उडून जाऊ नये म्हणून लहान मुलाने स्तब्ध उभं रहावं तसा तो स्तब्ध उभा होता. त्याच्या किंचितश्यासुद्धा हालचालीनं तिची समाधी भंग पावेल असं त्याला वाटत होतं. किती निरागस दिसत होती देवयानी? सकाळी बांधलेल्या अंबाड्यातून निसटलेले चुकार केस चेहेर्यावर पसरले होते. त्या काळ्याभोर बटांखाली तिची गौर त्वचा अधिकच खुलून दिसत होती. वसंतच्या आगमनाबरोबर फुललेल्या कळीसारखी गालावरची खळी खुलली होती. मूर्तिमंत सौंदर्य वगैरे जे काय म्हणतात ते हेच असावं असं त्याला वाटलं. तो असाच तिच्याकडे बघत राहिला असता पण पानांच्या सळसळीनं त्याला जागं केलं.
अंगात शर्ट न चढवताच तो गॅलरीत आला. दुपारचा चार साडेचाराचा सुमार असेल पण नावालासुद्धा ऊन दिसत नव्हतं. सगळीकडे हिरवा रंग विखुरला होता आणि त्या हिरवाईतून एक तांबडी वाट फुरशासारखी नागमोडी वळणं घेत गेस्ट हाऊसपर्यंत येत होती. सौंदर्याचे दोन भिन्न आविष्कार तो अनुभवत होता. देवयानी अधिक सुंदर का हे दृश्य अधिक सुंदर? विचारांच्या वावटळीत तो गुरफटत असताना एकाएकी कोणीतरी ओरडलं. क्षणार्धात त्याला लक्षात आलं की दुसरं तिसरं कुणी नाही तर तो स्वतःच ओरडला होता. हाताला चिकटलेल्या लालबुंद मुंगळ्याला सोडवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि शेवटी खेचलाच. मुंगळ्याचे दोन तुकडे झाले. हाताला चिकटलेला भाग तसाच वळवळत राहिला. निष्प्राण झाल्यावर त्याने तो हलकेच दूर केला. मेलेल्या मुंगळ्याचं अस्तित्व त्याच्या हातावर उतरलं.
त्याच्या ओरडण्यानं जागी झालेली देवयानी धावतंच बाहेर आली. तिच्या चेहेर्यावर चुकार बटांबरोबर काळजीही पसरली. नकळत त्याने त्याचा हात पुढे केला.
- अरे काय झालं रे हे?
- काही नाही. मुंगळा चावला झालं.
- पण एवढा मुंगळा चावेपर्यंत थांबावंच का माणसाने. आधीच त्याला दूर करावं.
- अगंपण कळायला तर हवं ना मुंगळा हातावर आहे ते?
- वा, म्हणजे झोपला बीपला होतास की काय?
तिच्या लाडिक प्रश्नावर त्याने तिला जवळ घेतली.
- हा समोरचा निसर्ग पाहतेस? विचार करत होतो की तो जास्त सुंदर का तू? आणि तेवढ्यात हा मुंगळा कडमडला. आता मला सांग, ह्याला काय म्हणावं? एका क्षणी मी समोरच्या दृश्याने बेभान झालो होतो, आणि मला भानावर आणलं कोणी? एका यःकश्चित मुंगळ्याने? आणि ह्या क्षणी मला ह्या नितांतसुंदर निसर्गापेक्षा हा मुंगळा अधिक वास्तव वाटतो आहे. अंतिम अस्तित्व कोणाचं असावं तर एका मुंगळ्याचं?
क्षणभर तिने त्याच्या बोलण्यावर विचार केला. अशा बोलण्याचं तिला नेहमीच आव्हान वाटत असे.
- अंतिम अस्तित्व त्या मुंगळ्याचं नाही, तुझंही नाही आणि माझंही नाही. खरंतर तुला जाणवणारं त्याचं अस्तित्व ही फक्त संवेदना आहे. ह्या क्षणी तुला त्याची संवेदना अधिक म्हणून त्याचं अस्तित्व तुला जाणवतं. आणि एखादी गोष्ट आपल्याला तीव्रतेने जाणवली की दुसर्या क्षणी आपण तिच्या अस्तित्वाचा शोध घेत राहतो. जसा तू ह्या मेलेल्या मुंगळ्याच्या अस्तित्वाचा घेतोयस.
तो ह्या उत्तरावर विचार करत असतानाच,
- चल हो तयार आपल्याला बाहेर जायचंय ना?
असं तिने Crash Landing केलं. शब्दांच्या भरार्या मारून अचूक क्षणी जमिनीवर यायची देवयानीची ही अदा त्याला अतिशय प्रिय होती. त्याच्याशी बोलून ती आत निघूनही गेली. पण हा मात्र अजून तिच्या बोलण्यावर विचार करत होता.
- खरोखरच देवयानी मला सापडलेय का? की मी अजूनही तिचा शोध घेत आहे?
थोड्या वेळाने दोघं बाहेर पडले. मघाच्याच त्या नागमोडी वाटेवरून तो देवयानीबरोबर चालला होता. मघाशी पाहिलेल्या वाटेवर ते दोघं कसे दिसत असतील ह्याचा तो विचार करू लागला. त्या विचारात मुंगळ्याचं अस्तित्व कुठच्या कुठे नाहीसं झालं.
- एक प्रश्न विचारू? तो तिला म्हणाला.
- विचार ना.
- नेहमी मनात विचार येतो की देवयानी मला खरंच समजली का? की अजूनही मी तुझाच शोध घेत असतो?
- असं का वाटावं तुला?
- माहीत नाही. पण सतत मी तुलाच शोधतोय असं वाटतं.
- हे बघ, काही गोष्टी न शोधताच समजतात. तो मुंगळा तुला क्षणात समजला की नाही, मग मला तू किती दिवस ओळखतोस?
- हो. मुंगळ्याने ज्या पद्धतीनं ओळख पटवली त्या पद्धतीने नक्कीच ओळख पटकन पटते. तुझी पण पटव ना. असं म्हणून त्याने आपला हात तिच्यापुढं केला.
- चल काहीतरीच.
लाजतंच तिने त्याचा हात दूर केला. मनातल्या मनांत ती मुंगळा झाली.
चालत चालत दोघंजणं देवळात पोहोचली. त्याचा देवावर कधीच विश्वास नव्हता पण देवयानीचा होता. त्याने तिच्याबरोबर देवळात यावं असा तिचा आग्रहही नव्हता. अजून अर्ध्या तासाने बरोबर सात वाजता देवळासमोर भेटायचं ठरलं.
पूर्णपणे अंधार झाला नव्हता. पण ऊनही नव्हतं. सगळा परिसर संधिप्रकाशांत नाहून निघाला होता. पश्चिमेकडे चाललेली रंगपंचमी समुद्राच्या पाण्यात उतरली होती. त्या पार्श्वभूमीवर काळ्या पत्थरातून घडलेला डोंगर अधिकच काळा दिसत होता. पायवाट त्याला डोंगराच्या दिशेनं नेत होती. डोंगर तसा उंच नव्हता आणि पायवाटही मळलेली होती. तसाही कुठेतरी अर्धा तास घालवायचाच होता. त्याने डोंगर चढायचं ठरवलं. पायवाट घट्ट पकडून तो डोंगर चढायला लागला. पंधरा मिनिटांतच तो डोंगर माथ्यावर पोहोचणार होता. मळलेली वाट अधिकाधिक कोरी होत होती. श्वासाचा भाता अधिकाधिक फुलत चालला होता. पायांबरोबरच विचारांनीही गती घेतली होती.
विचारांच्या सोबतीनं तो डोंगरमाथ्यावर कधी पोहोचला हे त्याचं त्यालासुद्धा कळलं नाही. क्षणभर श्वास घेण्यासाठी तो तिथेच बसला. परत फिरण्याअगोदर पलीकडल्या बाजूला काय आहे ते पाहण्यासाठी तो गेला आणि त्याने जे दृश्य पहिलं त्याने त्याचं भानच हरपलं.
सुमारे शंभर सव्वाशे पायर्या त्या काळाकभिन्न डोंगरातून थेट समुद्रात उतरत होत्या. देवळाकडून डोंगरावर येण्यास पायर्या नसाव्यात, पण डोंगरातून पाण्यात उतरणार्या पायर्या असाव्यात ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं. त्या पायर्या डोंगरातून कोरलेल्या होत्या. फेसाळ समुद्राच्या पार्श्वभूमीवर त्या अधिकच उदास आणि एकट्या वाटत होत्या. त्याच्या नकळतच तो पायर्या उतरायला लागला. आपण एका खोल खोल विहिरीत उतरत आहोत असा त्याला भास होवू लागला. तिन्ही बाजूने काळा डोंगर आणि समोर समुद्र.
पायर्या जिथे समुद्रात उतरत होत्या तिथे एक विचित्र कोपरा तयार झाला होता. एकच भरतीची लाट आणि त्या कोपर्यात असलेल्या कशाचीही समुद्राहूती घडणार होती. पाणी अजून तेथे पोचलं नव्हतं. भरतीला अजून अवकाश होता. पायर्या उतरून तो त्या कोपर्याच्या डोंगराकडच्या भागात जाऊन उभा राहिला. त्या पार्श्वभूमीचं वर्णन रौद्र ह्या एकाच शब्दाने करण्याजोगं होतं. पण त्या रुद्रतेतही सौंदर्य होतं, जे खिळवून ठेवणारं होतं, आकर्षक होतं, खेचणारं होतं. पाण्याचे अगणित तुषार येणार्या प्रत्येक लाटेसरशी त्याच्या अंगावर उडत होते. तरीसुद्धा त्याचं समाधान होत नव्हतं. अजून थोडं पुढे जाणं धोक्याचं असणार होतं, तरीदेखील त्याला पुढे जाण्याचा मोह झाला.
तो पुढे होणार इतक्यात समोर त्याला काही हालचाल दिसली. एक तरुणी काळ्या पत्थराला पाठ टेकून समुद्राकडे एकटक पाहत असलेली त्याला दिसली. खरंच कोणी तिथे आहे का आपल्याला भास होतोय, हेही त्याला कळेना. आता अंधारही पडायला लागला होता. नीट काहीच दिसत नव्हतं. अस्पष्ट ते स्पष्ट होण्यासाठी म्हणून त्याची पावलं तिथेच थबकली. सागराकडे खेचली गेलेली पावलं आता तिच्याकडे खेचली जाऊ लागली.
तो तिच्या दिशेने वळणार इतक्यात कुणीतरी त्याला हाक मारलेली त्याने ऎकली. तो आवाजच्या दिशेनं वळला. देवयानी शेवटच्या पायरीवर उभी होती. खरंतर ती शेवटची पायरी नव्हती. त्या पायरीखाली अजून दोन पायर्या होत्या पण वाढलेल्या भरतीच्या पाण्यात त्या हरवल्या होत्या. देवयानी चिंब भिजली होती आणि त्याच्या लक्षात आलं की तोही चिंब भिजलाय. हरवलेल्या जाणीवा परत आल्या आणि त्याचा लक्षात आलं की तो गुडघाभर पाण्यात उभा आहे.
जीवाच्या आकांताने तो पायर्यांच्या दिशेनं धावला. पाण्याबाहेर आल्यावर त्याला हायसं वाटलं, पण मघाशी पाहिलेली तरुणी अजूनही पाण्यातच असल्याचं त्याचा लक्षात आलं. तो तिला पाहण्यासाठी वळला. त्याची नजर तिथे पोहोचेपर्यंत एक अजस्र लाट त्या कोपर्यात येऊन धडकली. आवेगाने तो देवयानीकडे वळला. देवयानीने त्याला मिठीत घेतलं. तिच्या मिठीत खूप सुरक्षितता वाटली. लहान मूल होवून तो तिच्या मिठीत रडला........
- अरे ऊठ आपल्याला बाहेर जायचंय ना? उशीर होईल नाहीतर. लहान मुलाने निरागसपणे आईच्या कुशीत झोपावं तसं तिच्या कुशीत झोपलेल्या त्याला ती म्हणाली.
............ तो दचकून जागा झाला. स्वप्नाची सीमा ओलांडून तो सत्याच्या साम्राज्यात आला. क्षणभर आपण कोण आहोत, कुठे आहोत, ह्याचं त्याला भानंच राहिलं नाही. हळूहळू सगळं लक्षात आलं. ती तीच होती पण तो मात्र अजूनही स्वप्नातल्या देवयानीला शोधत होता. ती मात्र काळाच्या लाटेबरोबर कधीच खूप खूप दूर निघून गेली होती. खरंच बराच उशीर झाला होता...........
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
हा लेख आधी कुठे तरी वाचलेला आहे.....नक्की कुठे हे आठवत नाही. तुझ्याच ब्लोग वर आधी पोस्ट केला होतास का?
mast
Post a Comment