जात्याच ती क्रिएटिव्ह. रात्र रात्र कॉफीचे मग रिचवत ऍड कॉन्सेप्टस क्रिएट करण्यात घालवायची आणि मग दिवस दिवस झोपा काढत घरी बसून राहायची. मी आपला सरळ साधा सोपा आयटी वाला. मायबाप ऑनशोअर जसं सांगेल तसं आणि तसंच करायचं आपलं डोकं चालवायचं नाही. वेळ संपली की काम बंद, मग सगळा वेळ आपलाच. कधी कधी मला स्नेहाचं आश्चर्यच वाटायचं. कसं काय तिने मला हो म्हटलं तेव्हा?
हातातला ग्लास केव्हा संपला काही कळलंच नाही. अजून एखादा? नको आताशा झेपत नाही इतकी. रात्रीचे बारा वाजले. समोर अख्खा शनिवार आणि रविवार आ वासून उभे आहेत. काय करायचं काय? समोरंच सकाळचं एन्व्हलप पडलेलं. उचलून उगाचच उघडून पाहिलं. स्नेहानं नोटिस पाठवलेय घटस्फोटाची. हे घर. तिचं माझ्या भोवताली असलेलं आणि नसलेलं अस्तित्व आणि समोरचे दोन रिकामे दिवस. नकोच इथे राहणं.
फोन उचलला, कॉन्टॅक्ट्स, फेवरिटस, मिलिंदा. बेल वाजली. हा बहुतेक हळद दूध पिऊन झोपलेला असणार. उचलला.
- काय करतोयस?
- झोपायची तयारी.
- बरं
- ह्या अवेळी कुठे आठवण झाली.
- झाली आता. आठवण काय परवानगी मागून येते.
- बरं बोला.
- मी येतोय आता.
- तू मुंबईत आहेस?
- नाही मी आहे पुण्यातच. पण मी आता मुंबईला येतोय.
- तुझं डोकं फिरलंय का? बारा वाजून गेलेत.
- माझ्याकडे घड्याळ आहे. उगाच वेळ सांगू नकोस.
- अरे पण इतक्या रात्री येण्यासारखं काय घडलंय? उद्या सकाळी ये.
- मला आता घरातून बाहेर पडायचंय. तुला त्रास होणार असेल तर मुंबईला येऊन कुठल्यातरी बाकड्यावर झोपतो, सकाळी घरी येईन तुझ्या.
- हे बघ इतक्या रात्री गाडी घेऊन कशाला येतोयस?
- मी रात्रीच गाडी चांगली चालवतो असं तूच म्हणतोस ना? मी निघतोय. एक चावी वॉचमनकडे देऊन ठेव. मी आरामात थांबत थांबत येणारे. पहाटे पहाटे तुझी झोपमोड नको.
- बरं
भोवती घर सगळं अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. स्नेहा असताना असायचं तसंच. पण ती असताना मला ते आवरून ठेवावंसं वाटायचं. आता आवरून आवरून आवरायचं कुणासाठी. बेडवर बाईंनी वाळलेले कपडे नीट घडी घालून ठेवलेले. कपाटातली सॅक काढली. दोन दिवसासाठीचे असतील, दिसतील ते कपडे त्यात कोंबले. म्हणे रात्री गाडी चालवू नको. ह्या मिलिंदाबरोबर अगदी कन्याकुमारीपर्यंत गाडी घालून फिरलो. रात्री गाडी चालवायची. दिवसा थोडा आराम, फिरणं. रात्री परत गाडी. हा आळशी झोपून जायचा शेजारी नाहीतर पेंगत राहायचा. गाडी हे माझं पहिलं प्रेम आणि दुसरं स्नेहा.
लिफ्ट थांबली, मी बाहेर पडलो, गाडीकडे गेलो. वॉचमन त्याच्या खुर्चीत शांतपणे झोपला होता. मी त्याच्या खांद्याला हात लावला तसा दचकून उठला. गडबडून उभा राहिला आणि सलाम ठोकला. त्याला चावी दिली, म्हटलं बाईंना द्यायला सांग सकाळच्या वॉचमनला आणि घरीच सोडायला सांग काम झाल्यावर. तो जरा वरमला. मी गाडीत बसून गाडी चालू करून पार दिसेनासा होईपर्यंत उभा राहून पाहत राहिला. गाडी साडेबाराची वेळ दाखवत होती. हायवेकडे गाडी वळवली. पण मग असं वाटलं की कडकडून भूक लागलेय. ऑफिसातून आल्यापासूनचकल्या सोडल्या तर बाकी काही पोटात गेलेलं नव्हतं.
तशीच गाडी वळवली. पुणं निद्रिस्तंच होतं. तुरळक गाड्या रस्त्यावर होत्या तेवढ्याच. आता पार दहा किलोमीटर आत जायचं भुर्जी खायला. बऱ्याच वेळा मी ऑफिसातून खूप उशीरा यायचो. घाईघाईने हात पाय धुऊन बाहेर यायचो आणि स्नेहाला म्हणायचो. स्नेहा, खूप भूक लागलीय जेवायला वाढ. स्नेहा तिचा तो जाड फ्रेमचा चष्मा घालून टेबलाशी बसलेली असायची. तो नाकावर खाली ओढून ती माझ्याकडे हरवल्यासारखी पाहायची. म्हणायची मी विसरले रे. जेवण बनवायचं विसरायची आणि जेवायचंही. सगळी हॉटेल्स बंद. मग काय बसा गाडीतआणि चला भुर्जी पाव खायला. तोही ती म्हणेल तिथेच. अगदी दहा किलोमीटर आत गावात जायला लागलं तरीही.
रिकाम्या रस्त्यातसुद्धा स्नेहाच. प्रत्येक कोपऱ्यावर तिची आठवण. हे दुकान, तो मॉल, हे रेस्टॉरंट, तो पब. एक ना अनेक. तिच्या प्रॅक्टिसेस, नाटकं, थिएटर्स, पुस्तकं. अगदी तो रस्त्यावर नसलेला पण रोज तिथे बसणारा तो जुनी पुस्तकं विकणारा. त्याचं अर्ध दुकान स्नेहानं आमच्या घरी भरून ठेवलेलं. पुस्तकाच्या कपाटात माझा एक कप्पा होता, बाकी सगळं तिचं. चित्र विचित्र पुस्तकं, मराठी, इंग्रजी, घरभर पसरलेली. एका वेळी दहा पुस्तकं वाचण्याची तिची सवय, त्यावरून तिच्याशी भांडण, समजूत, पुन्हा तेच. अरे मरायचाय का रे? काच खाली करूनसमोरून धावत रस्ता क्रॉस करणाऱ्यावर मी कावलो. त्यानं माझ्याकडं नेहमीसारखं दुर्लक्ष केलं.
हातातली सिगारेट रस्त्यावर तशीच टाकून मी गाडीत येऊन बसलो. आता पोट शांत झालेलं होतं. रात्रीचा दीड वाजलेला. मिलिंदा किती चिडला आता येतो म्हटलं तर. जावं का परत घरी? उद्याच जावं मुंबईला. पण मग घरभर भरलेली स्नेहा रात्रभर छळत राहील. नकोच. रस्ताच बरा. मोकळा. एकटा म्हटलं तर इतर गाड्या, म्हटलं तर नाही, रफी, भीमसेन, अमीर खॉ, मारवा. मारवाच. पिया मोरे.
गाडी हायवेला लागली. आता वीसच मिनिटात एक्सप्रेस वे. हा नव्हता तेव्हा फार गंमत होती. पाच पाच तास घाटात अडकून पडायचं. मी, मिलिंदा आणि स्नेहा अनेक वेळा आमच्या दोन स्कूटर्स घेऊन लोणावळ्याला जायचो. एकदा स्नेहाला काय लहर आली माहीत नाही. म्हणाली की आज घाट उतरायचा. त्या वेळची माझी ती कायनेटिक होंडा, घाट तोऱ्यात उतरली खरी पण वर येताना बिघडली. भंगाराच्या ट्रकमध्ये घालून आणायला लागली. स्नेहावर मी इतका चिडलो. तर म्हणते कशी, भंगाराच्या ट्रकमध्ये बसून खंडाळ्याचा घाट मिळाला असता का चढायला तुला?
टोलचे दिवे दिसायला लागले तसा गाडीचा वेग आपोआपच कमी झाला. दोनशे दिल्यावर पाच सुट्टे नसल्याचं त्यानं मला सांगितलं आणि राहूदे म्हणून मी पुढे निघालो.
- असं कसं राहूदे म्हणतोस. अशाने ते सोकावतात. स्नेहा म्हणायची.
- पण नाहीयेत ना त्याच्याकडे सुट्टे. मग? इथेच थांबू का?
- नको.
ती पर्समधून पाच चॉकलेट्स काढणार.
- ही दे त्याला, म्हणावं दहा परत दे
- स्नेहा?
- दे रे दे
म्हणून ती मला ते नाटक करायला लावणार. मग तो टोल्या माझ्याकडे कुठून कुठून येतात कोण जाणे चा आविर्भाव करून पाहणार आणि कुठूनतरी पाच रुपये निर्माण करून मला परत देणार. असे आम्ही दोघं. खूप वेगळे.
टोल गेला. कामशेटचे बोगदे गेले, लोणावळं जवळ यायला लागलं. आताशा बकाल झालंय पण पूर्वी तसं नव्हतं. मी आणि स्नेहा यायचो तेव्हा. कोपरा न कोपरा पायाखाली घातलाय. मनात येईल तेव्हा ड्युकच्या नाकावर टिच्चून यायचं, नाहीतर लोहगड हक्काचा. अशाच एका ट्रेकमध्ये नेहमीप्रमाणे स्नेहा पुढे आणि मी मागे. एकदम रस्ता जंगलात शिरला. उन्हापासून सुटका मिळाली म्हणून मला बरं वाटलं. स्नेहा थांबली, वळली आणि माझ्याकडे पाहत राहिली. मला कळेना काय झालं. आणि काही कळायच्या आतच तिचे ओठ माझ्या ओठांवर. तिचं ते इतकं जवळ येणं, अचानक, अंगावर उभे राहिलेले रोमांच. तिच्या जिवणीवर लखलखणारा घाम. तिचे मिटलेले डोळे, तिच्या अंगाअंगाचा झालेला स्पर्श. मनस्वी, अकारण, वाटलं म्हणून वाटेल ते करणं, म्हणजेच स्नेहा असणं. पण मग ह्या मनस्वितेतच थोडासाच बसणारा मी?
लोणावळं गेलं तसा सरळ रस्ता नागमोडी वळायला लागला. गेले दोन आठवडे पावसानं दडी मारलेली तो आठवण झाल्यासारखा एकदम कोसळायला लागला. पाऊस, खंडाळ्याचा घाट, टायगर पॉइंट, धबधबे, कांदा भजी, चहा. एक ना अनेक आठवणी. ह्या डोंगराने मला मोठं होताना पाहिलं, प्रेमात पडताना पाहिलं, स्नेहाशी एकरूप होताना पाहिलं आणि आता दूर जाताना...
प्रत्येक वळणावर थांबायचं असा तिचा हट्ट, लवकर पोहोचायचं असा माझा हट्ट. पण तिचंच जिंकणं, आमचं थांबणं, मग तिचं हावरटासारखे फोटो घेणं. प्रत्येक फोटोत मीही तिच्यासारखं काहीतरी वेडं विद्र करावं हा तिचा आग्रह. एक वळण, दोन वळणं, तीन वळणं. मग समोरून घाट चढणाऱ्या ट्रकचे, हायबीमवर ठेवलेले, असह्य होणारे हेडलाईट्स. मग न दिसणारा रस्ता, मग डोळे किलकिले करून पाहण्याचा प्रयत्न, बाजूला बसलेली स्नेहा, बाजूला नसलेली स्नेहा, विचारांचा हलकल्लोळ, वळण, विचार, वळण विचार, वळण.
आणि मग सपाट रस्ता. घाट संपला. पूर्वेकडे तांबडं फुटायला लागलेलं. आता गाडी जोरात हाकायची आणि मिलिंदाकडे पोहोचायचं. चहा मिळाला तर बरं पण बहुतेक नाहीच मिळणार. नवापर्यंत झोपून राहायची ह्याची जुनी सवय. शंभर, एकशे दहा, एकशे वीस. बस. ह्याउप्पर नको. गाडीला वेग आला. रात्रभर घाट चढून थकले भागलेले ट्रक्स पाठी पडायला लागले.
माझंच कुठे चुकलं का? स्नेहा ही अशी. मीच थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं का? गेले सहा महिने तिच्याशी वरचेवर होणारी भांडणं, अबोला. मला हवं असलेलं आणि तिला नको असलेलं मूल. आणि काल मला स्नेहानं पाठवलेली नोटीस ह्यात कुठेतरी आमचं आम्ही असणंच नाहीसं होत गेलं. मी असा आहे आणि ती तशी आहे, म्हणूनच आम्ही एकमेकांवर प्रेम केलं आणि म्हणूनच आम्ही एकमेकांपासून दूरंही गेलो.
पहिला बोगदा गेला आणि गाडी अल्लद दुसऱ्या बोगद्यात शिरली. हजार्ड लाइट्स बंद करून मी गाडी पुन्हा दामटवली. कुणीतरी माघार घ्यायला हवीच होती. ती मीच का घेऊ नये? स्नेहा माझ्या रक्तात भिनलेय, इतकी की ती इथं नाही तरी तिच्याशिवाय मला दुसरं काहीही सुचत नाहीये, मग मीच पडतं का घेऊ नये? विचारांच्या घोटाळ्यातच टोल आला. सगळ्यात डाव्या बाजूच्या रांगेत कमीत कमी गर्दी असते असा माझा समज, पण आज खरंच कुणीच नव्हतं. मी गाडी तशीच दामटवली आणि टोल पार केला.
कधी एकदा स्नेहाला भेटतो असं झालं. मिलिंदा चहा देणार नव्हताच तो स्नेहाकडंच घ्यावा. तिला सरप्राइज. पहाटेची तुरळक वर्दळ सुरू झालेली. एक्स्प्रेस वे संपला आणि रस्ता काटकोनात वळला. तेवढ्यापुरता वेग कमी करून मी पुन्हा एकदा तो वाढवला तो थेट चांदणी चौकापर्यंत, गाडी कोथरुडात स्नेहाच्या बंगल्यासमोर थांबवली. सगळं शांत होतं. मी दरवाज्यापाशी गेलो, बेल वाजवली. बेल बंद करून ठेवलीय वाटतं झोपमोड नको म्हणून? आता काय करावं ह्या विचारात असतानाच, दुधाच्या पिशव्या घेऊन पोऱ्या आला. त्यानंही बेल वाजवली आणि तो निघून गेला.
अर्ध्या मिनिटात दार उघडलं. समोर साक्षात स्नेहा. नुकतीच झोपेतून उठलेली, कपाळावर सांडलेली बट. तीच ती जिवणी, तोच बेदरकारपणाचेहऱ्यावर. मी तिच्याकडे पाहिलं. तिनं मला पाहून न पाहिल्यासारखं केलं. दरवाजा सताड उघडा ठेवून ती आत गेली, मीही तिच्यापाठोपाठ गेलो. टेबलावर तिचा फोन ठेवलेला, तो वाजायला लागला. मिलिंदा? ह्या माणसानं हिला आता का फोन केला? नवापर्यंत लोळत पडायची ह्याची सवय. तिने फोन घेतला. तिनं फोन घेतला तसा मी तिच्यासमोर उभा राहिलो आणि डोळ्यात डोळे घालून पाहिलं.
तिनं माझ्याकडे पाहिलं. फोन तसाच कानाला लावलेला. तिच्याही नकळत तिच्या डाव्या डोळ्यातून एक अश्रू गालावर ओघळला आणि गालावरून तो जमिनीवर पडणार इतक्यात तो अलगद तळहातावर झेलण्यासाठी मी हात पुढे केला. अश्रू माझ्या तळव्याला छेदून थेट तिच्या पावलावर पडला.
मी माझ्या तळव्याकडे आणि त्यावर न पडलेल्या तिच्या अश्रूकडे पाहत राहिलो....
- कोहम