Wednesday, September 02, 2009

वेटिंग रूम

लांबच्या लांब पसरलेला रेल्वेचा प्लॅटफॉर्म. त्यच्या दूरच्या टोकाला असलेला पिवळ्या रंगाचा आणि काळ्या अक्षरांनी लिहिलेला स्टेशनच्या नावाचा बोर्ड. डोक्यावर काळंभोर आकाश आणि आकाशाच्या काळ्या रंगाला लागलेली पौर्णिमेच्या चंद्राची तीट. एकदम छोटंसंच पण टुमदार स्टेशन. स्टेशनमध्ये शिरायच्या ठिकाणी असलेली पत्र्याची शेड. त्या शेडच्या वरच्या बाजूला असलेलं स्टेशन मास्तरचं घर कम ऑफिस. पुढची गाडी सकाळीच यायची असल्याने तिथेही सामसूमंच. शेडच्या एका कोपऱ्यात बिरजू भंगी अंगाची मुटकुळी करून झोपलेला.

त्याच्या उजव्या अंगाला वेटिंग रूम. "प्रतीक्षा कक्ष" अशी पाटी वर लिहिलेली. आत मिणमिणता उजेड. स्टेशनच्या बाहेरून पावलांचा आवाज. कोल्हापुरी वाहणा करकरवत एक माणूस स्टेशनच्या आत शिरला. हातात एक छोटीशी बॅग. स्वच्छ धुतलेला पांढरा शुभ्र सदरा, काळी विजार. डोळ्याला लावलेला जाड काळ्या फ्रेमचा चश्मा.

बिरजूच्या डोक्यावर तेवत असलेला साठ डीग्रीचा बल्ब सोडला तर बकी सगळा अंधारच. वेटिंग रूम कुठे आहे ते बिरजूला विचारण्यासाठी तो बिरजूकडे गेला.

" अहो शुक शुक" त्याने हळूच पुकारलं. बिरजूचं पूर्ण दुर्लक्ष.
" माफ करा तुम्हाला झोपेतून उठवतोय, पण तेवढी वेटिंग रूम कुठे आहे ते सांगता का? " बिरजू तसाच पडलेला.
" अहो मिस्टर, तुमच्याशी बोलतोय मी." ह्याचा आवाज थोडासा चढा. बिरजू एकदम घोरायला लागलेला.

घोरणाऱ्या बिरजूकडे निराश होऊन पाहत माणूस स्टेशनात शिरला. बाजूलाच "प्रतीक्षा कक्ष" असल्याचं त्याला समजलं. पण प्रतीक्षा कक्ष उघडून द्यायला स्टेशन मास्तर कुठे शोधायचा ह्या विचारात असतानाच त्याला दरवाजा उघडा असल्याचं दिसलं. कुणीतरी दुसरंही तिथे आहे ह्याचं त्याला आश्चर्यच वाटलं. पण स्टेशन मास्तरला धुंडायचा त्रास वाचला म्हणून बरंही वाटलं.

तो घाईघाईने आत शिरला. अख्या रूममधला एकमेव दिवा आपल्यापरीनं उजेड पाडण्याच्या प्रयत्नात. दिव्याच्या खालच्या आरामखुर्चीत कुणीतरी बाई.तिच्या तोंडावर पुस्तक ठेवलेलं. बहुतेक दिव्याच्या प्रकाशाला अडथळा करून झोपण्याचा तिचा प्रयत्न. कमीत कमी आवाज करीत तो समोरच्या बकड्यावर आपली बॅग टाकतो आणि बाजूच्या खुर्चीत जाऊन बसतो. कुठल्या काळातली ती खुर्ची त्याच्या वजनासारशी कडकन मोडते. पडता पडता तो वाचतो पण आवाजाने बाई एकदम जागी होते.

" काय झालं? कोण आहे? " ती ओरडली.
" कुणी नाही मी आहे"
" कोण तुम्ही? "
" तुमच्यासारखाच. वेटिंग फॉर नेक्स्ट ट्रेन"
" ओह, माफ करा. आवाजाने एकदम दचकले आणि ओरडले"

मोडलेल्या खुर्चीवरचं लक्ष त्याने तिच्याकडे नेलं. मघा बाई वाटलेली ती बाई म्हणण्याएवढीही मोठी नव्हती. फार फार तर पंचविशीच्या आत बाहेरचं वय. कोवळा चेहरा, कपाळावरची काळी टिकली. तोंडावर ठेवलेल्या पुस्तकाने विस्कटलेले केस. आणि अतिशय भावपूर्ण तरल डोळे. आपल्या निम्म्या वयाच्या असलेल्या मुलीकडे असं पाहणं बरं नाही हे लक्षात येईपर्यंत बरेच क्षण गेले. चटकन स्वतःला सावरत तो दुसऱ्या खुर्चीकडे गेला. ती भक्कम असल्याची खात्री करून बसला.

" माफ करा, माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली" तो म्हणाला
" नाही हो. तशीही झोप येणार नव्हतीच म्हणून वाचत बसले होते. वाचायचा कंटाळा आला म्हणून डोळ्यावर पुस्तक घेऊन शांत बसलेले. झोपले नव्हते. विचार करत होते, सकाळपर्यंत वेळ कसा काढायचा? "
" कुठे निघालात"
" तुम्ही मला अहो जाहो नका हो करू, प्लीज"
" अहो पण असं... "
" प्लीज काका"

तिने काका म्हटल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आलेली निराशा अंधारात झाकायचा असफल प्रयत्न त्याने केला

" बरं नाही अहो जाहो करणार. पण मला काका नाही म्हणायचं"
" ... "
" हो हो मला माहितेय मी तुझ्या काकाच्या वयाचा नक्की आहे. पण उगाच कशाला आठवण करून द्यायची म्हाताऱ्याला वयाची"
" बरं. काका नाही म्हणत. मग म्हणू काय पण? "
" धोत्रे म्हण"
" धोत्रे? "
" हो धोत्रे. माझं नाव धोत्रे"
" छान नाव आहे हं.... धोत्रे"
" कर चेष्टा कर म्हाताऱ्याची"
" धोत्रे. चेष्टा नाही. पण एकदम अनपेक्षित नाव होतं बाकी काही नाही"
" हं"

धोत्र्यांनी उगाचंच आपली बॅह उघडली, बॅगेतलं सामान इथे तिथे केलं. डोक्याला तेल लावावं म्हणून ते तेलाची बाटली शोधत राहिले. पण ती काही त्यांना मिळाली नाही. मग तसेच ते खुर्चीत पुन्हा येऊन बसले. त्यांच्या सगळ्या हालचली ती बघत राहिली.

" रात्री कशी तू इथे? "
" काय सांगू काका.... सॉरी सॉरी धोत्रे, रात्रीची मेल गाठायची होती, ती चुकली. मग काय करते? बसलेय सकाळच्या गाडीची वाट पाहत. आणि तुम्ही? "
" माझं काय? रेल्वेने फुकट पास दिलाय. फिरत असतो इकडून तिकडे. आपली एक बॅग असते सोबत. मिळाली तर गाडी नाहीतर वेटिंग रूम. आहे काय अन नाही काय"
" असा बरा तुम्हाला फुकट पास दिला. आम्हाला नाही कधी दिला तो"

निरागसपणे तिने विचारलं. धोत्र्यांना तिच्या प्रश्नाचं हसूच आलं. भुवयांचं धनुष्या झालेलं. नाकपुड्या थोड्याशा फुगलेल्या.

" हो मग तुला का देतील ते फुकट पास?"
" पण तुम्हाला तरी का देतील ते"
" हं"
".... "
" आगगाडी पाहिल्येस? "
" हो"
" त्याला एक इंजीन असतं. कधी कधी दोनही असतात. कधी कोळशाचं असतं, कधी डिजेलवर चालणारं असतं, कधी विजेवर, तर कधी... "
" धोत्रे, मला इंजिनाचे प्रकार सांगू नका. तुम्हाला फुकट पास का मिळाला ते सांगा"
" हा. सांगतो. तर ते इंजीन जो ड्रायव्हर चालवतो... "
" ड्रायव्हर काय हो. मोटरमन"
" हं मोटरमन. तो होतो मी. म्हणून मला फुकट पास"
" अय्या, तुम्ही मोटरमन होता धोत्रे? मला एकदा तरी इंजिनात बसून जायचं होतं, नाही नेलं कुणी. "
" मी नेलं असतं"
" अजूनही नेऊ शकाल मनात आणलंत तर"
" नाही. आता मी नाही चालवत इंजिन"
" का? "
" बस. नाही चालवत सांगितलं ना?" धोत्र्यांचा आवाज किंचीत चढला.

तिने माघार घेतली. उगिचंच तिने आपलं डोकं पुस्तकात खुपसलं. वाचनात तिचं लक्ष नव्हतं. हा माणूस एकदम का भडकला हेच तिला कळेना. पण उगाच आगीत तेल नको म्हणून ती गप्प बसली. धोत्र्यांनी आपला जाड काळ्या फ्रमच्या चश्मा काढला आणि शर्टाच्या टोकाने तो ते साफ करायला लागले.

" एवढा स्वच्छ शर्ट खराब होईल ना" काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली
" स्वच्छ शर्ट खराब होतात पण परत धुता येतात. आठवणी.. "
" हो मान्य. तुम्हाला नसेल लागत धुवायला पण बायकोला लागत असेलच ना"
" नाही. आता नाही लागत. मी असा भटक्या. शर्ट धुवायला घरी जाऊ का? "
" .... "
" आणि तू गं? तुझं घर? "
" ..... "
" काय झालं? बोल की? "
" ..... "
" कट्टी आहे का? "
"...... "
" ..... "
" सासर ह्याच गावात आहे माझं"
" अच्छा म्हणजे माहेरी निघालीस. कुठे? "
" ...... "
" अगं सासर ह्याच गावात आहे म्हणतेस मग वेटिंग रूममध्ये कशाला?"
" माझी मर्जी" तिने उत्तर झटकलं आणि विषय संपवला.

धोत्रे तिच्याकडे बघत राहिले. अतिशय कुलीन शालीन असं सौंदर्य. अशा ह्या मुलीला आपल्या घरी न राहता वेटिंग रुममध्ये रात्र काढाविशी का वाटावी? तिच्याकडे बघता बघता त्यांची तंद्री लागली.

" पळून आलेय" ती म्हणाली.
" पळून? का? "
" माझी मर्जी"
" बरं"
" बरं नाही. नवरा म्हणाला माहेरी चालती हो"
" तुला? शक्यच नाही. अगं पोरी भांडणं सगळ्याच नवरा बायकोची होतात. रागाच्या भरात बोलून जातं माणूस. पण म्हणून काही कुणी.... "
" रागाच्या भरात नाही"
" मग"
" मग काय मग धोत्रे? नशिबाचे भोग दुसरं काय? "
" मला वाटायचं नशिबाचे भोग फक्त आमच्यासारख्यांच्याच वाट्याला येतात. पण... "
" हं. दृष्ट लागण्यासारखा संसार होता माझा. जिवापाड प्रेम करणारा नवरा. घर आवार शेजार सगळं सगळं होतं"
" मग? "
" जाऊदे हो माझं. तुम्ही सांगा. तुम्ही का घर सोडून भटकताय असे? "
" मी? माझंही घर होतं. संसार होता. साधी का असेना नोकरी होती. रेल्वेचा फुकट पास वर. काळजी घेणारी बायको"
" .... "
" अचानक सगळं बदललं बघ. नोकरीवरून सस्पेंड केलं. अगदी वेड लागायची पाळी आली"
" का? "
" ऍक्सिडेंट"
" कुणाचा? "
" सकाळी सकाळी स्टेशनात शिरतानाच एक मुलगी गाडीखाली आली. सरळ सस्पेंड केलं. निग्लिजन्स म्हणून. नोकरीचं काही नाही पोरी, पण आपल्यामुळे कुणाचा जीव गेला, ह्याच दुःखाने वेडापिसा झालो आणि एक दिवस..."

धडधड धडधड करीत एक मालगाडी स्टेशनात शिरली आणि तिचा एकेक डबा वेटिंग रुमसमोरून जाऊ लागला. जवळ जवळ पाचेक मिनिटं ती लांबच लांब डब्यांची माळ जात राहिली. दोघंही निःशब्द होऊन तिच्याकडे पाहत बसले. आगगाडी गेली तसे धोत्रे भानावर आले. तिची तशीच तंद्री लागलेली.

" मालगाडीही चालली असती. पण नेमका डोळा लागला आणि सकाळपर्यंत.. " ती म्हणाली.
" काय? काय म्हणालीस"
" नाही काही नाही. मालगाडी स्टेशनवर थांबली असती तर त्यानेही जायची तयारी होती माझी"
" अगं पण असं झालं तरी काय? चांगला नवरा आहे म्हणतेस"
" हं"
" मग? "
" काही नाही धोत्रे, कशाला जुन्या आठवणी?"
" ... "
" सगळं सुरळीत चाललं होतं, आणि कुणाची दृष्ट लागली माहीत नाही धोत्रे, पण पाठीवर बरोबर मध्यभागी एक पांढरा डाग उमटला. कोड होता तो. हळू हळू, पाठीवरून तो इतरत्रही पसरला, अगदी चेहऱ्यावरही"

अंधारातही चेहऱ्याची एक बाजू तिने केसांनी झाकलेय हे धोत्र्यांच्या लक्षात आलं

" पहिल्यांदा नवऱ्याने सहानुभूती दाखवली. डॉक्टर केले, वैदू केले. घोरी अघोरी सगळे उपाय केले. देवाचं केलं. पण काहीही होईना कोड वाढतंच चाललेलं. शेवटी त्याचा संयम सुटला. म्हणाला अशी बायको मला नको. तू हे घर सोडून जा"
" ... "
" मी खूप विनवण्या केल्या धोत्रे, गया वया केली कशाचाही परिणाम झाला नाही. एक दिवस रात्री उठले इथे आले. रात्रीची गाडी हुकली. इथेच ह्या वेटिंग रूममध्ये रात्र काढली. सकाळची गाडी आली तशी समोर रुळावरच उडी मारली. गाडी सरळ अंगावरून गेली. सगळा खेळच संपला. धोत्रे"

शॉक लागल्यासारखे धोत्रे ताडकन उभे राहिले.

" काय झालं धोत्रे? घाबरलात? "
" नाही"
" मग? "
" ज्या ऍक्सिडेंटने माझी नोकरी गेली, मी जवळ जवळ वेडा झालो आणि वेडाच्या भरात बेगॉन पिऊन आत्महत्या केली, तो ऍक्सिडेंट ...."

धडधड करीत गाडी स्टेशनात शिरली. गाडीच्या आवाजासरशी बिरजू जागा झाला. गाडी गेल्यावर रोजच्या शिरस्त्याप्रमाणे वेटिंग रूममध्ये शिरला. समोरची मोडकी खुर्ची पाहिली. रातभर कुत्र्यांनी ओरडून ओरडून जीव हैराण केला. बहुतेक इथेच येऊन धुमाकूळ घातला असणार अशी मनाची समजूत करून घेऊन तो खोली झाडायला लागला.

37 comments:

अनिकेत वैद्य said...

मस्त जमल्ये कथा.
शेवटचा ट्विस्ट मस्त आहे अगदी.

सिद्धार्थ said...

मस्त जमलीय गोष्ट. शेवट सही...

Anonymous said...

व्वा काय भन्नाट ट्विस्टलंय शेवटी!

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

superb!
fantabulous...

hundred% cha next chapter kadhi yetoy tyachi waat baghte aahe.

प्रशांत said...

गज़लेत शेराच्या दुस-या ओळीत चमत्कृती असते ती चमत्कृती या कथेत, आणि पूर्वीच्या "कॉफ़ी" आणि "राम नाम सत्य है" या पोस्टांमध्ये आहे - शेवटपर्यंत सस्पेन्स टिकतो आणि शेवटाजवळ येताच "क्या बात है!" अशी दाद घेऊन जातात हे तिन्ही लेख आणि ते तुझ्या लेखनशैलीचं एक शक्तिस्थान आहे असं मला वाटतं.
बाकी कथा मस्तच जमली आहे.

Aniket said...

Ekdam bhannat masta story ahe

Vinay said...

Ek number goshta aahe!! shevat paryant baandhun thevla hota!!

Samved said...

शाब्बास! सहीच...

D D said...

कथा मस्त जमली आहे!

kishor said...

yar anand tu tar ratnakar matkari cha chela hy r.mast suspence kelay matkari saheba sarkha.keep it up.

kishor said...

lage raho.

Unknown said...

you r great
mast story aahe

Suhas Diwakar Zele said...

अप्रतिम मित्रा, खूप सुंदर

मी रेश्मा said...

Jabardasttttttttttt Lihaliye Storyyyy

यशोधरा said...

ज ब री!

सखी said...

Turning point shi chan soot julalela disatay :)
mastt flow hota!

Tulip said...

मस्त जमलीय कथा! सही.

दिपक said...

सुंदर कथा नेहमीप्रमाणे :)

ओहित म्हणे said...

आई शप्पथ! मस्तच संपवली गोष्ट!

विशाखा said...

मज्जा आली अगदी!
एरवी मला सस्पेन्सचा वास लवकर येतो, पण तुम्ही वाचकांना चकवलंय पार. आधी वाटलं ही कथा "Mr. & Mrs. Iyer" च्या वळणाने जाणार, पण त्यामुळे शेवट खूपच परिणामकारक झाला.
मस्त!!!

Monsieur K said...

absolutely fantastic :)

आशा जोगळेकर said...

कमाल आहे ही काय हैलोवीन स्पेशल का .

सखी said...

kava livnar???

रोहन... said...

तुझ्या पुढच्या लिखाणाची वाट बघतोय .... कधी लिहिणार आहेस ?

Unknown said...

khup sundar...
va.pu.kalenchi athavan zali...

SUSHMEY said...

khup sundarrrrrrrrrr

prasad bokil said...

आवडली गोष्ट.
निम्म्यात अंदाज आला की तीनेच आत्महत्या केली असणार पण त्यानेही!! हे शेवटीच उलगडले.
फक्त शेवटी मोडक्या खुर्चीचे बिरजूच्या मनातले स्पष्टीकरण दिले नसते तरी चालले असते असे वाटले

माझी ब्लॉग शाळा ! said...

मराठी भाषेची ताकद काय असते ते अशा लिखाणातूनच दिसू शकते यात काहीच दुमत नाही ... एकदा का पहिल्या शब्दावर नजर टिकली की माणूस कसा हरवत जातो त्याचं मूर्तिमंत उदाहरण जर पहावयाचे असेल तर ते याच ठिकाणी

प्रशांत said...

kuthe aahes? barech divas jhaale kaahii lihila naahiis....

yashwant kulkarni said...

mast....let me know KOHAMS mail id...!

कोहम said...

my email ID is

gadre.nilesh@gmail.com

Please feel free to contact me anytime

Unknown said...

मेलेल्या भुतांची मनस्थिती वाचतांना जिवंत भुते मरत का नाहीत ह्या प्रश्नाने सतावले.

Karan Ratnaparkhi said...

sexy ending

Kiran said...

मस्त कथा ! खूप आवडली.

Anonymous said...

mast shevat...

samrat said...

Nice Movement ..

vishal said...

मस्तच राव, शेवटला बॉम्बच टाकलात तुम्ही ..सलग दोन बॉम्ब ..एक ती तरुणी भूत म्हटल आता धोत्रेच काही खरं नाही तर लगेच धोत्रे पण तसाच.
मजा आली.