एक आटपाट नगर होतं. त्या नगरात सर्वकाही होतं. चांगली कसदार जमीन, भरपूर पाणी, नद्या, निसर्ग. पण तरीही आटपाट नगरात सूख काय ते नव्हतं. नगरातली सर्व माणसं ढेकणांनी त्रस्त झलेली होती. जिथं पहावं तिथं ढेकूण, आणि साधेसुधे ढेकूणही नाहीत. एकदंम चिवट, त्रासदायक ढेकूण. नुसतं पाच मिनटं स्वस्थ बसावं तर ह्यांचा उपद्रव सुरू. खाकी ढेकूण, हिरवे ढेकूण, भगवे ढेकूण, तिरंगी ढेकूण, देशी ढेकूण, विदेशी ढेकूण सर्वांनीच अगदी त्या नगरातल्या व्यक्ती हॆराण झाल्या होत्या.
आम्हीपण त्या आटपाट नगराचे रहिवाशी होतो. सर्वांप्रमाणेच आम्हालाही ढेकणांनी छळलं होतं. बरेचसे लोकं ह्या ढेकणांचा त्रास नको म्हणून दूर दूरच्या अधिक आटपाट नगरांत जावून राहू लागले. मधेमधे ते लोक आमच्या नगरातील लोकांना पत्रे पाठवीत. त्यात न चुकता ते आपले अनुभव कळवीत. काही जण लिहीत की आमच्या नगरांत ढेकूणंच नाहीत, त्यामुळे आमचं आयुष्य सुखाचं झालं आहे. काही जण लिहीत की आमच्या नगरांत ढेकूण आहेत पण कमी चवतात. काही अतिआटपाट नगरांत म्हणे, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन किंवा हुजूर किंवा मजूर जातीचे ढेकूण होते. ते म्हणे आलटून पालटून त्या त्या अतिआटपाट नगरांतील लोकांना सतावत असत. पण त्यांनादेखील आमच्या आटपाट नगरातील ढेकणांची सर नव्हती.
आम्हीदेखील ह्या निरनिराळ्या प्रकारच्या ढेकणांना कंटाळलो होतो. म्हणून आम्हीदेखील ठरवलं की पहुया दुसर्या नगरांत जावून कसं काय वाटतं ते. जाताजातासुद्धा आम्हाला ढेकणांनी थोडाबहुत त्रास दिला, पण तरीदेखील आम्ही मजल दरमजल करीत दुसर्या आटपाट नगरात पोहोचलोच.
ते आटपाट नगर आमच्या नगरापेक्षा खूपंच छान होतं. रुंद रस्ते, बागा, नद्या झालेले नाले, सोनेरी केस असलेल्या युवती आणि रुबाबदार बलदंड युवक, सारेच कसे निरळे होते आणि अतिशय सुंदर. पहिल्याच दिवशी आम्ही आमचे नगर विसरून गेलो आणि एक अख्खा दिवस ढेकणांनी त्रास न दिल्याने ढेकूणही विसरून गेलो. पण जुन्या मित्रांची ओळख इतक्या सहजासहजी थोडीच जाते? राहून राहून कधितरी आम्हाला ढेकणांची आठवण येई. मग आम्ही आमच्या नगराकडून येणार्या लोकांना आमच्या नगरीच्या वार्ता विचारत असू आणि झांलच तर ढेकणांचीही चॊकशी करीत असू. मझ्या जुन्या आटपाट नगरातले काही लोक मला ह्या नव्या अतिआटपाट नगरांत भेटले. आम्ही सर्वजण एकत्र जमलो की जुन्या नगरातल्या ढेकणांच्या गप्पा रंगवत असू. कोणाला तिरंगी ढेकूण आवडत नसत तर कुणाला भगवे. मग त्यावरूनही वादावादी होई. पण शेवटी ह्या नगरांत येवून आपण कसे सुखी झालो ह्याच्या सुरस कथा सर्वजण सांगत. वर इथले ढेकूण त्रासदायक नसतात ह्यावर शिक्कामोर्तब होई.
माझाही अनुभव तसाच होता. इथले ढेकूण फारच निरुपद्रवी आणि सज्जन होते. हळुहळु माझी इथल्या सोनेरी केसांच्या युवतींशी आणि रुबाबदार बलदंड तरुणांशी ओळख झाली. त्यांना मी म्हंटलं की तुमची नगरी फार छान आहे, इथे ढेकणांचा अजिबात त्रास नाही, तर म्हणाले खरं आहे, आम्हाला ढेकणांचा अजिबात त्रास नाही. पण इथे कावळ्यांचा भारी उपद्रव आहे. काळे कावळे, सावळे कावळे, बारीक डोळ्यांचे चपटे कावळे, सगळे बाहेरून येतात आणि आमच्या नगरीची वाट लावतात. मी त्यांना म्हंटले की मला कावळे म्हणजे काय प्राणी असतात तेच माहित नाही. तर म्हणतात कसे, तुमच्या आरशात जावून पहा म्हणजे तुम्हाला दिसतील सावळे कावळे. आमच्या जुन्या नगरांत आरसा नवाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. तेव्हा आम्ही आमच्याच एका रुबाबदार मित्राकडून ती उधार घेतली. मग आम्ही सगळे जुन्या नगरांतले स्नेही आमच्या घरी जमलो आणि आम्ही आरसा ह्या वस्तूमधे पाहू लागलो. आरसा सर्वप्रथमच पहिल्यामुळे, सर्वांनाच उत्सुकता होती की काय दिसेल. सर्वांनी त्यात डोकावून पाहिले तर आम्हाला काही प्राणी दिसले. म्हंटले हेच बहुदा कावळे असावेत. पण त्यात्सुद्धा एक चमतकृती होती. मला ते सर्व कावळे माझ्या स्नेह्यांसारखे दिसत होते. एकच कावळा काय तो अनोळखी वाटंत होता. माझ्या स्नेह्यांचाही अनुभव हाच होता. पण त्यांना म्हणे एक कावळा माझ्यासारखा दिसत होता. पण मला मात्र एखादा कावळा मझ्यासारखा असेल असे वाटत नव्हते.
शेवटी वादावादी होवून आम्ही असे ठरविले की आम्ही आणलेली आरसा ही वस्तू बरोबर काम करत नसावी आणि म्हणुनच आम्हाला कावळे आमच्यासारखे असल्याचा भास होत असावा. म्हणून आम्ही अधिक महागाची आरसा ही वस्तू आणली. पण तरीसुद्धा मागले पाढे पंचावन्न. शेवटी आरसा ह्या विषयावर बरेच संशोधन केल्यावर आम्हाला असे लक्षात आले की त्यात दिसत होतो ते आम्ही सर्वच होतो. आणि इथल्या नागरिकांना त्रास देणारे कावळा नावाचे प्राणी आम्हीच होतो. पुढे अशीही माहिती उजेडात आली की आम्ही सावळे कावळे आहोत. अजून काही आफ्रिका खंडीय नगरांतून इथे काळे कावळे येतात. पीत प्रदेशांतील नगरांतील कावळे बारीक डोळ्यांचे आणि चपटे असतात. आमच्या जुन्या नगराच्या आजुबाजूच्या नगरांतून येणार्या कावळ्यांचा रंग, सावळा असतो. काही पूर्व युरोपीय नगरांतून पांढरे कावळेही येतात म्हणे.
आता फक्त एकच प्रश्न आमच्या मनांत घोळत राहिला, की आपल्या जुन्या आटपाट नगरांत जावून ढेकणांचा त्रास सहन करत माणूस म्हणून जगायचं की नव्या अतिआटपाट नगरांत कावळा बनून आपले आयुष्य सुखात घालवायचं?
अशी ही साठा उत्तराची कहाणी साता उत्तरी सुफळ पण तरीही अपूर्णच.....
Sunday, October 08, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
8 comments:
Good one... :)
jhakkas ekdam..
खूपच छान.
खरं तेच लिहिलयंस..पटलं.
chhan lihilayes! :) very thoughtful.!
लई खास.. जोरदारच लिहीतोस रे तू !!
काही कावळे बनून राहतात, तर काही माणसे बनून परत येतात...individual decision असते, शेवटी दिवसा आरश्यात बघु शकले, आणि रात्री गाढ झोप लागल्याशी कारण.
Jabardsat post.
Aj google var kahitari shodhat asatana sapadali.
(Dhekun sahavasat)Anu
Post a Comment