Saturday, February 10, 2007

आम्ही वेडे

जगतो असे मदमस्त आम्ही, नाही कधी जगला कुणी
म्हणती वेडे, खुळे आणिक म्हणती वेडे पीर कुणी

कोणी कोणा सांगायचे, कोण शहाणे अन कोण वेडे,
शहाणे वेड्यांस दिसती, जसे दिसती शहाण्यांस वेडे

Thursday, February 01, 2007

एक होता राजा.......

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला लागले आणि तुम्हा आम्हा सर्वांनाच आपण राजे असल्याची आठवण झाली. फक्त आपल्यालाच नाही तर आपली कधीही आठवण न ठेवणार्‍या लोकप्रतिनिधींना आणि राजकीय पक्षांनादेखील आपली आठवण झाली, आपण मतदार राजे असल्याची.

ह्या निवडणुकांची पार्श्वभूमीच तशी निराळी पण खास आहे. शिवसेना ह्या एकमेव पक्षाने गेली कित्येक वर्ष मुंबईवर अनभिषिक्त राज्य केलं. पण हाच पक्ष आता खिळखिळा होत चाललेला आहे. सर्वप्रथम नारायण राणे आणि मग राज ठाकरे ह्यांनी शिवसेना सोडली आणि ह्या वाघाचं मांजर झालं की काय? अशी शंका येवू लागलेय. त्यात गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधे मिळालेल्या अनपेक्षित यशाने कॉग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांची मांजरं वाघाचा आव आणंत आहेत. तिसर्‍या आघाडीचं खूळही यंदा आहेच. राज ठाकरेपण ह्या निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार ह्यात वादंच नाही.

आता ह्या सर्व प्रकरणात आपली भूमिका सर्वात महत्वाची आहे, कारण आपण इथले राजे (?) आहोत. वर म्हंटल्याप्रमाणे आपल्यासमोर बरेच पर्याय आहेत. शिवसेना आणि त्यांच्या केसात खोवलेलं भाजप चं कमळ. वाघासारखी इतरांवर आणि एकमेकांवर गुरगुरणारी कॉंग्रेसची मांजरं, जिच्याबद्धल काहीच कल्पना नाही अशी मनसे, आणि बेडकीसारखी फुगून बॆल होवू पहणारी तिसरी आघाडी. वर थंडोबा आणि बंडोबा ह्यांनी मिळून झालेले, आणि कोणताही पक्षीय भेदाभेद (मुख्यतः सत्तेत सहभागी होताना) न पाळणारे अपक्षही आहेत. आता इतक्या सगळ्या पर्यायांतून म्या पामराने एकाला निवडावं तरी कसं?

शिवसेनेला मुंबईने आतापर्यंत न चुकता साथ दिली होती. आतापर्यंत म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईने शिवसेनेला धोभीपछाड घातली. यंदा मुंबई काय करणार? सांगता येत नाही. शिवसेना म्हणते की आम्ही Fly Overs केले. आम्ही म्हणतो चांगलं केलत. Express Way केला. आम्ही म्हंटलं चांगलं केलत. पण लेकांनो त्याचं Credit मागच्या निवडणुकांच्यावेळी घेतलत ना? मग पुन्हा पुन्हा तेच काय सांगता? एक काम करायचं आणि पुढच्या दहा लोकसभा निवडणुकांत, पंधरा विधानसभा निवडणुकीत आणि वीस महापालिका निवडणुकीत तेच टुमणं वाजवायचं? खरं तर शिवसेनेने आम्हाला संभ्रमातच पाडलं आहे. आम्हाला हा आमचा वाटणारा हा पक्ष. पण त्याने आम्हाला Identity Crisis मधेच टाकलं आहे. आता आम्हाला समजंतच नाही की आम्ही नक्की मराठी, मुंबईकर का हिंदू? मी मराठी म्हणत आम्ही वाढलो, गर्व से कहओ हम हिंदू हॆ म्हणत मोठे झालो, आणि आता मी मुंबईकर म्हणून आम्हाला सर्वसमावेशक करता? हा विषय खरंतर महापलिका निवडणुकांसाठी गॆरलागू आहे. ते सोडा, आपण आता सत्ताधार्‍यांनी काय कामं केली ते पाहू.

उद्धव ठाकरे काही आठवड्यांपूर्वी म्हणत होते की आम्ही ऎंशी टक्के वचननामा पूर्ण केला. परवाच्या सभेत म्हणाले पंच्याहत्तर टक्के पूर्ण केला. काय चाललय काय? काही दिवसांमध्ये तुम्ही दिलेली वचनं वाढली की तुम्ही केलेली कामं कमी झाली. ह्या वेगाने दोन फ़ेब्रूआरीला तुम्ही म्हणाल आम्ही काहीच केलं नाही पाच वर्षात. आणि जर तुम्ही आम्हाला शंभर टक्के वचनं दिलीत तर त्यातली ऎंशी टक्केच पूर्ण झाली हे सांगायला तुम्हाला लाज नाही वाटंत? का एवढं तरी काम केलंत म्हणजे आभाळाला हात टेकले तुमचे?एक अख्खं वर्ष काय झोपा काढल्या का तुमच्या नगरसेवकांनी? बरं तुम्ही सांगत सुटलाय की आम्ही पंच्याण्णव पर्यंतच्या झोपड्या अधिकृत केल्यात. आम्हीच मुंबईत येणारे लोंढे थोपवू शकलो असतो. आम्ही सहमत आहोत. उत्तरभारतीय आणि इतर झोपडपट्टीवासी ह्यांची मतं मिळवण्यासाठी तुम्ही पंच्याण्णव पर्यंतच्या झोपड्या अधिकृत केल्या नसत्यात आणि फुकट घरांची योजना जाहीर केली नसतीत, तर त्यांनंतर मुंबईत दुपटीने येणारे लोंढे थांबले नसते का?

बरं, शिवसेनेवर आम्ही नाराज मग आम्ही इतर पर्यायांचा विचार करायला लागलो. कॉंग्रेस हा जरी मोठा पक्ष असला तरी आमच्या दृष्टीने Next Best पर्याय म्हणजे म.न.से. राज ठाकरे ह्यांनी ज्या पद्धतीने शिवसेना सोडली आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी म्हणून नवा पक्ष काढला त्याने आम्ही प्रभावित झालो. महराष्ट्राला तारणहार मिळाला असं आम्हाला वाटलं. त्यांनी सुरूवातही छान केली. सर्वांना बरोबर घेवून जायची तयारी दाखवली. त्यांचा सर्वधर्मसमभावसुद्धा आम्हाला भावला. पण सध्या बघावं तर त्यांचा One Word Agenda चालू आहे. शिवसेना. बाळासाहेबांच्या विरुद्ध म्हणे हे काही बोलणार नाहीत पण शिवसेने विरुद्ध बोलणार. बरं आम्हाला आणखी एक गोष्ट समजत नाही, ती म्हणजे आम्ही आमचं मत म.न.से. ल का द्यावं? काय केलंय त्यांनी अद्याप? गेलं वर्षभर वाट बघतोय, पण काही काम चाललंय असं दिसत तरी नाही. त्यमूळे त्यांना मत दिलं तर ते फुकटच जाण्याची शक्यता अधिक, त्यमुळे आमचं मत त्यांनाही जाणार नाही.

रहाता र्‍हायल्या दोन कॉंग्रेस आणि तिसरी आघाडी. कॉंग्रेस म्हणे महाराष्ट्रात मजबूत झालेय. नारायण राणे कॉंग्रेसमध्ये आल्यापासून तर प्रभा राव आणि मार्गारेट अल्वा ह्यांना, निवडणुका म्हणजे कुस्तीचा फड असून नारायण राणे नामक हिंदकेसरी पॆलवान आपल्या गटात आल्यासारखं वाटतय. विधानसभा पोटनिवडणुकांतला विजयही त्यांना भलताच चढलाय. पण मुंबईत नारायण राण्यांची मात्रा चालणं तसं अवघडंच आहे. वर गेल्या नऊ वर्षात त्यांच्या सरकारने काय दिवे लावलेत तेही आम्ही पहातोच आहोत. झोपडपट्ट्या बनतच आहेत आणि हे दोन हजार पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करायला निघालेत. ही युक्ती चांगली आहे. २००५ मध्ये २००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करायच्या. २०१० मध्ये २००५ पर्यंतच्या आणि असंच पुढे. म्हणजे प्रत्येक निवडणुकीत वाढणार्‍या झोपडपट्ट्यांची मतं कॉंग्रेसलाच नाही का? आता झोपड्याच नाहीत तर अनधिकृत बांधकामंही अधिकृत करायला निघालेत हे. SEZ चा वाद आहेच. त्यात बरेचसे मंत्री मंत्र्यालयात बसून काम करण्याऎवजी उकीरडा फुंकण्यातच धन्यता मनतात. कुणी पोटनिवडणुकांची जबाबदारी घेतय तर कूणी आणखी कशाची. कामाची जबाबदारी कोण घेणार? हे शिवसेनेला सांगतायत की काम दाखवा आणि मतं मिळवा. मग तुम्ही काय दाखवून मतं मागणार? आणि तुम्ही दाखवलंतही तरी भलतं सलतं बघायला लोकांना वेळतरी आहे का? त्यामुळे आमचं मत तुम्हाला तर नाहीच नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेस्बद्धल काय बोलावे? त्यांची काही ताकत मुंबईत आहे असं तर आम्हाल अजिबात वाटत नाही. आम्ही बारामतीचे रहाणारेही नाही त्यमुळे राष्ट्रवादीने काय काय विकासकामं केली ते आम्हाला माहीतही नाही. बरं ह्याच्या भाषाणांतही कुठे मुंबईचा उल्लेख येत नाही. आबा पाटील म्हणतात की स्वच्छ उमेदवाराला निवडून द्या. स्वतः मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देतात. आता काय म्हणायचं ह्याला? शरद पवार म्हणतात ज्यांना आपलं घर सांभाळता येत नाही ते मुंबई काय सांभाळणार? खुद शीशेके घरमे रहनेवाले दुसरों पर पत्थर नही फेका करते पवार साहब. जरा पुण्यात जावून बघा. धाकले पवार दादा आणि थोरले आबा ह्यांच्यात कलगी तुर्‍याचा सामना रंगलाय.

आता उरली, बलानुक्रमे सहावी असणारी तिसरी आघाडी. प्रामुख्याने दलित आणि मुसलमान ह्यांची मतं विभागण्यासाठी बनवलेली. स्वतःच्या हिमतीवर काही करण्याची कुवत नाही आणि दुसरा काही करत असेल तर त्याला ते करू द्यायचं नाही ही ह्यांची विचारसरणी. तसं आम्ही जतिभेद वगॆरे मानत नाही. प्ण सखेद असं म्हणावं लागतं की आम्ही ना मुसलमान ना दलित, त्यामुळे आमच्याकडे तिसरी आघाडी मत मागणारही नाही, त्यमुळे मत देण्याचा प्रश्नच नाही. आणि असतो जरी आम्ही दलित किंव मुस्लिम, तरी अबू आझमी आणि आठवलेंना मत देण्याइतके मूर्ख तर नक्कीच नाही.

सुरवातीला निवडणुका आल्याने आपण राजे असल्याची आठवण होवून मला हर्षवायू झाल्याचं आपण वाचलंतच. पण आता सर्वच पर्यायांचा फडशा पडला आहे आणि आमच्यासमोर शेवटचा पर्याय राहिला आहे. तो म्हणजे आमचं मत बाद करण्याचा. तुम्ही आमच्याशी सहमत असाल तर तुम्हीही आपलं मत बाद करू शकता. निवडणूक आयोगानं तशी सोयच केली आहे यंदा.

पण मला सांगा असं मत कोणालाच न देवून कसं चालेल? खरंतर आम्हाला हे मानवत नाही पण आमच्यासमोर दुसरा पर्यायच नाही. आम्ही करायचं तरी काय? टीका करणारे लेख लिहायचे की स्वतः पुढे होवून काहीतरी करायचा प्रयत्न करायचा बदल घडवण्यासाठी? आमच्याप्रमाणेच तुम्हालाही आजच्या राजकारण्यांबद्धल घृणा वाटत असेल. तुम्हीही आमच्याप्रमाणे आजच्या राजकारण्यांना शिव्यांची लाखोली वहात असाल. पण आपण राजकारण्यांना शिव्या देवून त्यांना काय ओव्या ऎकू येणारेत का? आम्ही घरात आमची खुर्ची गरम करून कागदावर कितीही गरम झालो तरी त्याचा कोणावर काय परिणाम होणार आहे? अयोग्य लोकं राजकारणात आहेत असं आम्ही सतत म्हणंत रहायचं पण योग्य लोकं कोण ते मात्र सांगायचं नाही. आमच्याप्रमाणेच तुम्हालाही वाटत असेल की राजकारणात चांगल्या लोकांनी असणं गरजेचं आहे. ही गरज आपल्या सर्वांनाच दिसते मग आपणच त्याबाबत काही करू नये? का शेजार्‍यांच्या घरात कधीतरी शिवाजी जन्माला येईल म्हणून आपण वाट बघत बसायचं. आपणच ठरवायला हवं आपण खरोखरंच राजे होवू शकतो का?

Saturday, January 27, 2007

एक शून्य माधव आपटे....

अत्ताच "डोंबिवली फास्ट" बघितला. मनामधे एक वादळ उधळलं. तो चित्रपट कसा आहे हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच नव्हे. तो चित्रपट बघताना काही प्रश्न मनांत उभे राहीले. कल्पना आहे की सर्वच प्रश्नांना उत्तरं नसतात. पण परिक्षेतला अख्खाच्या अख्खा पेपर कोरा द्यावा? माधव आपटे शेवटी एक शून्यच व्हावा? का म्हणून?

खरंतर आपण सगळेच माधव आपटे आहोत. शक्यतो सरळ मार्गाने सामान्य जीवन जगण्याचा आपल्या सर्वांचाच प्रयत्न असतो. नियम पाळावे अशी आपल्या सर्वांचीच ईच्छा असते. पण त्या इच्छेला प्रत्यक्षात आणायचं कुणी? त्या माधव आपटेने?

का आपण असं बुळ्यासारखं सहन करत जगायचं? सिग्नल तोडला म्हणून भरायला लागणार्‍या पाचशे रुपये दंडातले साडेचारशे रुपये वाचावेत म्हणून? का सगळेच नियम तोडतात, आम्ही एकटे काय जग बदलणार म्हणून?

मी बोललो कोणाविरुद्ध तर मलच मुस्काटात पडेल म्हणून शेपूट घालून आपण गप्प बसायचं? किती दिवस? ह्यापेक्षा किडे मुंग्यांचं आयुष्य बरं. आपल्याकडे ह्यावर एक रामबाण उत्तर आहे. सगळी system च सडलेली आहे असं म्हणायचं आणि आपण स्वतः त्या system चा एक अविभाज्य घटक बनत जायचं. कधी लाच देताना, तर कधी लाच घेताना. कधी सिग्नल तोडताना तर कधी जास्त पॆसे देवून licence बनवून घेताना.

कोणाची बनली आहे ही system? चंद्रावरचे का मंगळावरचे लोकं बनवतात आणि चालवतात ही system? तुम्ही आम्हीच बनलोय ना ह्या system ची चाकं, रस्ते, इंजिन आणि इंधन? मग का नाही आपण सगळे मिळून ही system सुधरवू शकत? का नाही आपण एका नागरिकाची कर्तव्य पार पाडू शकत. सगळा दोष इतरांवर तरी का मारायचा? उद्या इतरांनी express tower मधून उडी मारली, आपण मारू?

किती संवेदनाशून्य बनत चाललो आहोत आपण? माझं काम झालं नं, दुनिया गई भाड मे असं आपलं का व्हावं? आपण आपल्या समाजाचे, देशाचं काही देणं लागतो असा विचार का नाही येत आपल्या मनामधे. कायदा वाकवून केलेली कामं एका माणसाचा फायदा करून देतील, पण त्यमुळे इतर अनेकांचं नुकसान होईल हा विचार कोणी करायचा? तुम्ही मी म्हणू, की आम्ही काहीच बेकायदेशीर काम करत नाही. पण अरे दुसरा बेकायदेशीर काम करत असताना आपण त्याकडे काणाडोळा करणं चूक नाही का? कोण भांडणार आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी? माधव आपटे?

जावूदे तुम्ही आम्ही तरी काय, भावनेच्या भरात मी काहीतरी खरडणार, तुम्ही ते वाचणार आणि घरातल्या सुरक्षित वतावरणात शेपूट घालून बसणार. शेवटी माधव आपटे एक शून्यच रहाणार. एक भलं मोठं शून्य. ना आपल्यासाठी त्याची धन बाजू ना ऋण. ना त्याच्यामुळे आपली total वाढणार ना कमी होणार. कोणी झालाच माधव आपटे तर त्याच्यासाठी आपण एक सुस्कारा टाकणार आणि त्याला एक शून्य ठरवून आपापल्या कामांना लागणार.......

Tuesday, January 23, 2007

रडुबाई....

एक मुलगा होता. सगळ्याच मुलांसारखा तो एक साधासुधा मुलगा. लहान होता, तेव्हा त्याचे गोरे गोरे गाल टॉमॅटोसारखे लाल लाल होत. त्याच्या आजुबाजुची मोठी मोठी माण्से मग आपला मोठेपणा सोडून देत आणि त्याला त्याच्या गालांचे टॉमॅटो मागीत. त्याला वाटे की खरंच कोणी आपल्या गालांचे टॉमॅटो घरी नेवून आमटीत टाकले तर? ह्या विचारानेच तो घाबरा घुबरा होई आणि रडंत रडंत धुम ठोके. लहान झालेले मोठे आपापल्या कामाला लागले, की तो हळूच जावून आरशात पाही आणि गालांची लाली शाबूत असल्याची खात्री करून घेई. मगच त्याचा जीव भांड्यात पडे.

जशी सगळी लहान मुलं जातात तसा तोही शी-शू वर्गात जाई. त्याच्या बाई त्याला खूप आवडत आणि त्यांचाही तो अतिशय लाडका होता. त्याल त्या रडुबाई म्हणत आणि आपला हा हिरो बाईंनी दिलेल्या नावाला नक्की जागत असे. दुसर्‍या बाई वर्गावर आल्या की ह्याने भोकाड पसरलेच म्हणून समजा.

पण तसा हा आपला रडुबाई लबाडही होता. रोजच्या अभ्यासात पाटीवर काढायचे पाढे तो पंधरा दिवसांतून एकदाच काढत असे. पाटीवरची तारीख बदलली की झाले ह्याचे काम.

आपला हा "रडुबाई" मुळातच उत्सवप्रीय. गणपती आले म्हणजे त्याचा आनंद गगनात मावेनसा होई. दहा दिवस नुसता आनंदसोहळा असे. मग कधीतरी हा सांस्कृतिक कार्यक्रमातही भाग घेई. स्टेजवर गेल्यावर त्याचे हात-पाय लटपटंत. मग हा १० मिनिटांत करायचा कार्यक्रम दोनच मिनिटांत संपवे आणि स्टेजवरून धुम ठोके.

त्याला माहित असे की आपला कार्यक्र्म चांगला नाही झाला. तरीदेखील त्यला वाटे की आपल्याला बक्षिस मिळेल. मग उत्सवाच्या शेवटच्या दिवशी बक्षिस समारंभ संपेपर्यंत तो त्याचं नाव घेतलं जण्याची वाट पाही. त्याला ते बक्षिस हवं असे, कारण त्याच्या मित्रांना कोणतं ना कोणतं बक्षिस मिळालेलं असे. त्याला वाईट वाटे, रडू येई. पण ते कुणालाही न जाणवू देता, हा कुठेतरी धुम ठोके.

थोड्या वेळानी गणपती बप्पा निघायची वेळ होई. उत्तरपूजा झाल्यावर कोणीतरी जाणता देवाला साकडं घाली की सर्वांच्या ईच्छा पूर्ण होवूदेत म्हणून. सगळीकडे गंभीर शांतता पसरून राही. आपल्या ह्या रडुबाईच्या डोळ्यात टचकन पाणी येई. मांडवाची आवराआवर तो दुरूनच पहात राही. मखरात नसलेली गणपतीची मूर्तीमात्र त्याला अस्वस्थ करून सोडी. मग तो नेहमीप्रमाणेच तिथुन धुम ठोके.

असा हा रडुबाई लहानाचा मोठा कधी झाला ते इतरांनाच काय पण त्यालासुद्धा कळलं नाही. आणि एक दिवस त्याला नोकरीसाठी परदेशी जायची वेळ आली. रडुबाईच नाही तर त्याच्या घरातली सर्वजण हरखून गेली. जाण्याचा दिवस आला. रडुबाई आता मोठा झाला असल्याने रडू शकला नही. घरातून निघता निघता आईच्या डोळ्यातलं पाणी त्याला बघवलं नाही. पण तरीसुद्धा तो निर्धाराने रडला नही. बाबांनी त्याला नीट रहा, एकटाच जातोयस तेव्हा काळजी घे असं सांगितलं तरीपण तो रडला नाही. बहिणीला समजावता समजावता त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण त्याने ते अश्रू निर्धाराने थोपवून धरले.

परदेशी पोचल्यावर तो मात्र ओक्साबोक्शी रडला. गाल खेचणारे शेजारी, बाई, गणपती बप्पा, आई, बाबा, बहीण सगळे सगळे त्याला अजूनही आठवतात आणि तोही त्यांना आठवून मनातल्या मनातच रडतो. आता तो मोठा झालाय ना? मग तो कधीकधी आपल्या आठवणी लिहून काढतो. लिहिता लिहिता डोळे कधी भरून येतात त्याचं त्यालपण समजंत नाही. धुरकट डोळ्यांत त्याला लहानगा रडुबाई दिसू लागतो......

Monday, December 04, 2006

पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा....

आज इथे खूप पाऊस पडतोय. का कुणास ठावूक पण पावसाने माझ्या मनातला एक कोपरा अलगद ओला करून ठेवलाय. माणसाचा अनूभव आपण त्याने बघितलेल्या पावसाळ्यांत मोजतो. मी मात्र आयुष्याच्या अनुभवांमधे हरवलेले पावसाळे शोधतो. कधी ते सापडतायत असं वटतं तर कधी त्यांचा अजिबात थांग लागत नाही. धो धो आला की आपल्याला चिंब करून सोडतो, त्याचा अनुभव त्या एका क्षणापुरता. तो आपण साठवून ठेवू शकत नाही. साठवून ठेवायचा प्रयत्न केला की मग त्याचं पाणी होतं, तो पाऊस रहात नाही. आणि मग आपण त्यला जुन्या आठवणींतच शोधायला लागतो.

धो धो पाऊस कोसळतोय, मी शाळेतून घरी येतोय. हातात छत्री आहे पण ती वार्‍याने उडतेय. मी रस्त्याबाजूच्या दुकानाच्या शेडमधे थांबतो. दप्तरातून लपवून आणलेली मोठ्ठी प्लास्टिक ची पिशवी काढतो. त्या पिशवीत दप्तर सरकवतो. पाठीवरचं दप्तर प्लास्टिकच्या पिशवीत लपतं आणि माझ्या हातात येतं. मी छत्री बंद करून खुशाल शेडबाहेर येतो. दप्तरातली पुस्तकं माझ्या हुशारीला दाद देत असतात. मी पावसात मनसोक्त भिजतो. रस्त्यात साठलेलं पाणी खुशाल माझ्या गमबुटांमधे जावू देतो. शक्य झालं तर साठलेल्या पाण्यात उडी मारण्याचा आनंद घेतो. त्या गमबुटांत साठलेल्या पाण्याने मनातला एक कोपरा कायमचा भारून जातो. घर जवळ येतं तस प्लस्टिकच्या पिशवीतलं दप्तर हळूच बाहेर येतं. पिशवी कचर्‍याच्या टोपलीत जाते आणि वारा खूप असल्याने भिजल्याचं कारण आजीला सांगितलं जातं. आजच्यासारखा कधी पाऊस आला की पावसाबरोबर ते दप्तर, ती पुस्तकं, ती छत्री आणि आजीसुद्धा खूप खूप मागे रहिल्याचं जाणवतं

दर आठवड्यात यावा तसा ह्या आठवड्यातही रविवार येतो. रविवार म्हंटला की संध्याकाळी क्रिकेट खेळायचा कार्यक्रम ठरलेला असतो. नेहमी हवाहवासा वाटणारा पऊस रविवारी मात्र नकोसा झालेला असतो. एकदा का अंगण ओलं झालं की संध्याकाळपर्यंत ते नक्कीच वाळणार नसतं. मी दर पंधरा मिनिटांनी बाहेर येवून ढगांकडे पहात असतो. हे माझंच नाही तर सगळ्याच मुलांचं चाललेलं असतं. खेळाची वेळ जवळ येते तसं मनाला बरं वाटायला लागतं. आता पाऊस येणार नाही ह्याची हळूहळू खात्री पटू लागते, आणि अचानक सरींवर सरी कोसळू लगतात. पावसावर सगळी मुलं कावतात, बिचारा पऊस आमच्यासठी थांबतो. तशाच ओल्या अंगणात काही उत्साही मुलं क्रिकेट सुरू करतात, टेनिसचा चेंडू अवघा पाऊस स्वतःमधे साठवतो. मी तो जोरदार फटकावतो आणि तो सरळ सान्यांच्या घरात जातो. विळीवर दोन तुकडे झालेला चेंडू घेऊन साने आणि चाळीतली मुलं तेव्हा थांबलेला खेळ आता मझ्या मनात सुरू करतात.

नवरात्रातले धामधुमीचे दिवस असतात. संध्याकाळी सर्वांना रात्री होवू घातलेल्य नाटकाची चाहूल लागलेली असते. हॊशी कलाकारांना कार्यक्रमाचा ताण आलेला असतो. मनातल्या मनात संवादांची उजळणी चालू असते. अचानक आभाळ लाल होवू लागतं. चाळीतला कुणी जाणता सर्वांना सांगतो, हे ढग तर पावसाचेच. मग ह्या पावसाला कसंतरी कटवण्यासाठी मखरातल्या देवीच्या विनवण्या केल्या जातात. बर्‍याचदा पाऊस शहाण्या मुलासारखा आल्यापावली परततो. मखरातल्या देवीला नारळ वाहीला जातो. तेव्हाच्या त्या नाटकाचा पडदा अलगद अत्ता माझ्या मनात वर जावू लागतो. स्टेजवरच्या पत्रांमध्ये मी स्वतःला शोधत रहातो.

पंधरा ऑगस्टचा दिवस असतो. स्वातंत्र्यदिनानिमित्त, पाऊस धो धो कोसळत असतो. मी भीमाशंकराच्या डोंगराला भिडलेला असतो. गणेश घाटाची वाट सोपी पण न संपणारी म्हणून शिडी घाटाची चटचट पोहोचणारी वाट पकडलेली असते. हाताने एका मोठ्या दगडाचा आधार घेतलेला असतो. पाय खालच्या वाटेला घट्ट धरून असतात. कानांमध्ये तुफ़ान वारा घोंघावत असतो आणि पावसाच्या धारा मला झोडपून काढत असतात. वार्‍यावर स्वार होवून आलेल्या पावसाचे धपाटे खावून असं वाटतं की ह्या क्षणी जर आपण इथे न येता घरी थांबलो असतो, तर किती बरं झालं असतं. आज मन असा कोणताही विचार न करता सरसर सह्याद्री चाढू लागतं.

मी आणि ती समुद्र्किनारी फिरत असतो. न बोलावून्सुद्धा पाऊस माझ्या मदतीला धावून येतो. अर्थातच आमच्या दोघांकडे एकच छत्री असते. एका छत्रीतून दोन जणांनी जाण्याची एरवी नकोशी वाटणारी कसरत हवीहवीशी वाटायला लागते. मरीन लाइन्सच्या कट्ट्यावर लाटा जोरजोरात आपटत असतात. हातात गरमागरम कणीस असतं आणि त्याला लावलेल्या मसाल्यापेक्षासुद्ध लज्जतदार असा तिचा चोरटा स्पर्श असतो.

विचार करता करता पाऊस थांबून उन्हं कधी पसरली कळलंच नाही. पावसाची साठवण करता येत नसली तरी आठवण आपण मात्र नक्कीच करू शकतो.