Sunday, March 25, 2007

झोप

संध्याकाळचे साडेसहा सात वाजलेत. नुकताच अंधार होवू घातलाय. संधिप्रकाशाने आसमंत व्यापलाय. आजूबाजूची गर्द हिरवाई जाग्या होत असलेल्या अंधारामुळे अधिकच गर्द दिसू लगलेय. आम्ही अकरा जण रांगेत उभे आहोत. सगळ्यांच्या चेहेर्‍यावर "दमणूक" हीच चार अक्षरं दिसतायत.... आम्ही बसत का नाही? छे, शक्यच नाहीये ते..... एका बाजूला कडा आणि दुसर्‍या बाजूला दरी. मेधे जेमतेम दोन पावलं मावतील एवढी जागा एकामागोमाग अकरा जागा व्यापून आम्ही उभे....काय गरज होती trek ला यायची? तोपण इतका अवघड. घरी आरामात तंगड्या वर करून बसलो असतो आणि TV पाहिला असता....

थोडावेळ आजूबाजूचं भानच जातं. कालपासूनचा घटनाक्रम डोळ्यासमोर येतो. काल अनंतचतुर्दशी, शुक्रवार. घर ते ठाणे, संध्याकाळी साडेसातची लोकल. ठाणे ते पुणे रात्रीची एस्टी......छे लाल डब्यात झोप काही ती मिळत नाही....मग दगडूशेटची मिरवणूक. दोन तीन तास पायपीट. सकाळी लेट झालेली एस्टी. तोरण्याचा पायथा. सापांपासून सावध रहायला सांगणारा तो पोलिस. तीन तासांत तोरणा सर. जेवण. समोर दिसणारा राजगड. तोरण्यावरचा बुधला आणि बुधल्याच्या डव्या बाजूने खाली उतरणारी पायवाट. मग जीतोड चाल. फक्त चाल चाल आणि चालच.........जांभई येतेय का? इथे? अत्ता? कधी झोपलो होतो शेवटी? परवा. बरोबर, जांभई.....

पुढे गेलेल्या दोघांच्या हाका उरलेल्या अकरांची गुंगी उडवतात. राजगड तर समोर आहे, अगदी समोर. कड्यापर्यंत जावू शकतो, पण वर जायला वाट नाही. दहा जणांची गुंगी आणि अकराव्याची झोप उडते.......जेवढं अंतर आलो तेवढं परत चालायला लागणार. मघाशी वाटलं होतं वाट चुकलो म्हणून.........सव्वीस पावलं माघारी वळतात. समोर एक आदिवासी पाडा दिसतोय. सर्वानुमते थांबायचा निर्णय होतो......पण त्या पाड्यापर्यंत जायचं म्हणजे अजून एक तास तरी जाणार, मग गडावरच का जावू नये.....

तेवढ्यात एक मावळा समोरून येताना दिसतो. तो तेराही जणांना गडावर पोहोचवायचं आश्वासन देतो, अवघ्या शंभर रुपयात.....फक्त शंभर रुपये? गंडवत तर नहिये ना? नसेल.......आता तेरामधे दोन तट पडतात. काही म्हणतात आज राजगड शक्य नाही. खाली राहूया. दुसरे म्हणतात. ही तर हार. राजगड सर करायचाच...... थांबावं की जावं?.....पाय म्हणतात थांबावं, मन म्हणतं जावं. मी पायांना थोपवतो आणि मनाला मानतो.

आता आम्ही चवदा. पुढे मावळा, मागे तेरा.......हा कुठे चालला झाडीत? ह्याला तरी माहिती असेल ना राजगडाचा रस्ता? बहुतेक असेल......झाडीत शिरल्यावर अंधार. विजेर्‍या बाहेर येतात. चवदा जणांकडे मिळून तीन. पहिली मावळ्याच्या हातात. दुसरी तेरव्याकडे आणि तिसरी मधे कुठेतरी.......कुठे चाललोय? चढतोय खरे म्हणजे वरंच जात असणार....

एक छोटंसं पठार. दोघंतिघं विश्रांती मागतात. दिली जाते. पाणी. पाणी संपतंय. रेशन करायला हवंय. सातव्याच्या पायांत गोळा आलाय. सातवा सगळं पाणी पितो. उरलेल्यात मीठ घालून त्याच्या हातात दिलं जातं..... नक्की पायांत गोळा आलाय का पाण्यासाठी? छे, सातवा असं करणं शक्य नाही......

पुन्हा मावळा पुढे आणि तेरा मागे. सातवा मधून मधून रडतोच आहे. पुन्हा चवदा उतरायला लागतात.....उतरणं नको. जेवढं उतरू तेवढंच पुन्हा चढायला लागणार.......पाय नाराज. मावळा समोरचा डोंगर दाखवतो. ही टेकडी पार केली की चिकटलोच गडाला. पायांची नाराजी थोडीशी कमी.....ह्याला नक्की रस्ता माहितेय का?...

टेकडी पार होते. छोटंसं पाठार.....दिवे? हा दिवा कसला? रायगडावर दिवे होते माहित होतं राजगडावर कधी?.......झुडुपांतून बाहेर पडल्यामुळे वाढलेल्या प्रकाशाला डोळे सरावतात. पांढर्‍या दिव्याच्या जागी पॊर्णिमेचा चंद्र दिसायला लागतो..... अप्रतिम. पांढरा शूभ्र दूधासारखा. डागही किती स्पष्ट दिसतायत. अरे कुठे गेला? झाडाआड?.... चवदा पुढे चालत रहातात. आता शेवटचा वाटावा असा खडा चढ. पाय पुन्हा रडतात. सातवाही रडतो. दोघांना वर असलेल्या थंड पाण्याच्या टाक्यांची गाजरं.

...पोचलो....संजीवनी माची. पाण्याच्या टाक्या....चांगलं असेल का पाणी? कसंही का असेना....ग्लुकोजचे पुडे आणि त्यावर हवंतेवढं पाणी. पाय शांत, पोट शांत, मन शांत. विडीकाडीवाले विड्या शिलगावतात. मावळा पण एक विडी घेतो. पांढर्‍या विडीचं त्याला नवल. तो सगळं पाकीट ठेवून घेतो. दुसर्‍याला खरं तर त्याचं पाकीट परत हवं असतं. पण गडावर पोहोचल्याच्या खुषीत तो दिलदार होतो.

मावळा परततो. आता पहिला परत पहिला होतो. त्याच्या पाठून बारा बालेकिल्ल्याच्या दिशेने निघतात. बालेकिल्ला बाजूला ठेवून तेरा पद्मावतीच्या दिशेने चालतात. थोडा वेळ चालल्यावर पद्मावती माची येते.....देवळात रहायचं होतं पद्मावतीच्या. आहे का जागा? आत लोकं झोपलेयत. आता काय ह्या थंडीत उघड्यावर झोपावं लागणार की काय? दारूखाना बघूया. दारूखान्यात एक दोनच आहेत.....

सगळे तेरा दारूखान्यात शिरतात. मी माझी सॅक खाली ठेवतो. उघडून आतलं हंतरूण, पांघरूण काढतो. पांघरूण जमिनीवर पसरतो. हंतरूण पांघरायला घेतो......चला पोचलो एकदाचे. आहाहा. पाठ टेकल्यावर जमिनीला काय बरं वाटतंय........................................पुढे? सकाळ......

Saturday, March 10, 2007

मी, the "I"

लहानपणी समुद्रावर गेलो की नेहेमी वाळूचे किल्ले बनवायचो. फार मजा यायची. त्याचा तो खड्डा खणून बनवलेला मोठा दरवाजा, बुरूज, खोटेखोटे सॆनिक, वाळूचे रस्ते. सगळा मनासारखा संसार. क्षणभर वाटायचं, की आपण तर राजेच झालो. तास दोन तास चांगला खेळ रंगायचा. भरतीचं पाणी चढायला लागायचं आणि मी चक्क तिथून निघून यायचो, किल्ला मोडायच्या आत.

आपलं आयुष्यपण ह्या वाळूच्या किल्ल्यासारखंच आहे की नाही? दोन घटकांची करमणूक. आपण आपलं म्हणायचं मी ह्यॅव केलं नी मी त्यॅव केलं. शेवटी भरती आली की किल्ला मोडणारंच ना? कुणीही तो किल्ला बांधला असला तरीही.

हा 'मी' तरी आपल्या बोलण्यात कितिदा असतो नाही. दहा वाक्य बोलली जातात तेव्हा पंधरा वेळा त्यात 'मी' येतो. आणि ह्या 'मी' च्या कथा तरी किती सुरस. एखादा 'मी' शाळेत पहिला नंबर काढतो. कोणता 'मी' शर्यतीत पहिला येतो. एखाद्या 'मी' ला दुसर्‍या एखाद्या 'मी' ची शाबासकी मिळते. कोण 'मी' बोर्डात येतो. कोण 'मी' engineer किंवा doctor होतो. एखादी 'मी' दुसर्‍या एखाद्या 'मी' शी लग्न करते. पुढे त्यांना एखादा किंवा एखादी 'मी' होतो किंवा होते. काही 'मी' एकत्र येतात, घरं बांधतात, संस्था काढतात, राजकीय पक्षसुद्धा काढतात. थोड्या वेळापुरते त्यांचे 'आम्ही' होतात. पण शेवटी 'आम्ही' मध्ये सुद्धा 'मी' हा असतोच.

जगामध्ये 'मी' एकटाच आहे, असं माझ्यासारख्या बर्‍याच खुळ्यांना वाटतं. पण जगामधे 'मी' सोडून दुसरे आहेत तरी कोण? सगळे प्रथम 'मी'च असतात. आपण फक्त त्यांना वेगवेगळी नावं ठेवतो.

कुठे कधी सुनामी येते, भूकंप येतो. कुठे accident होतो, तर कुठे दहशतवादी हल्ला होतो. किड्या मुंग्यांसारखी माणसं मरतात, नव्हे किड्या मुंग्यांसारखे असंख्य 'मी' मरतात. जगात किती 'मी' रोज मरत असतील नाही? आपल्यासारखेच त्या 'मीं'चे देखिल plans असतील. कुणाचं लग्न ठरलं असेल, कुणाला बाळ होणार असेल, कुणाचा result असेल, आपल्यासारखं त्या 'मीं'च विश्व असेल. पण नशीबाची एक लाट आणि काल परवापर्यंत 'मी' असणारे ते सगळे 'मी' रहातच नाहीत. क्षणात कायमचे 'ते' होवून जातात. अंगावर काटा उभा रहातो. आपणही कधी वृत्तपत्रातल्या बातमीतले आकडे झालो तर? जे त्या 'मीं'च झालं तेच आपलंही होईल. मझ्या मनात ते बातमीतले आकडे 'मी' म्हणून फेर धरतात.

कशासाठी करत असू आपण ही 'मी'गिरी. किती अतिसूक्ष्म भाग आहोत आपण ह्या अंतराळातले. समुद्राच्या एका थेंबालाही असेल एवढं अस्तित्वही आपल्याला नाही. तरीही. कदाचित तो जीवसृष्टीचाच नियम असेल. ती माकडीण आणि तिचं ते पायाखाली धरलेलं पिल्लू.

बरं उद्यापासून 'मी'गिरी सोडून द्यावी, तर संतपण घेण्याइतकं वय पण नाही झालेलं. मग मझ्यासारख्या पामराने करावं तरी काय? मी सांगतो मी काय केलं. (बघा हा पठ्ठ्या 'मी' पुन्हा दोन वेळा आला) एक दीर्घ श्वास घेतला, मग एक छानसं गाणं ऎकलं. सगळे मी दूर पळाले. इतकंही करून नाही जमलं, तर बायकोला "तू किती सुंदर दिसतेस" असा म्हणा. झकास लाजेल ती. तुम्ही बायको असाल, तर नवरा असं म्हणतोय अशी कल्पना करा. आणि लग्नच झालं नसेल तर (करू नका!!!), तुमचं तुम्हीच ठरवा.

अहो तास दोन तासाचा खेळ असला म्हणून काय झालं? किल्ला व्यवस्थित बांधून स्वतःला घटकाभर का होईना राजेपद देण्यात काय हरकत आहे. भरती काय येणारच आहे तुम्ही किल्ले बांधा नाहीतर नका बांधू. किल्ला वाहून गेला तर जाउदे की, शेवटी दोन तास आनंदात घालवणं महत्त्वाचं नाही का? तेव्हा माझ्यापुरतं तरी मी ठरवलंय, ह्या 'मी' theory of relativity मध्ये पडायचंच नाही. बेंबीच्या देठापासून ओरडून जगाला सांगायचं, मी, the I...........

Saturday, March 03, 2007

मी, माझा देश आणि डॉक्टर..

परदेशात रहायला आल्यापासून कोणत्या गोष्टीची मला सर्वाधिक भिती वाटली असेल तर ती म्हणजे डॉक्टरकडे जाण्याची. तसं वरवर पहिलं तर इथले डॉक्टर प्रेमळ वगॆरे वाटतातच आणि त्यात जर डॉक्टरीण बाई असतील, तर हे प्रेम जरा जास्त जाणवतंसुद्धा. आपलं गुलजार हसू रोग्यावर फेकून, त्याचा निम्मा आजार बरा होतो अशी कोणती पाश्चात्य उपचारपद्धती असेल तर माहित नाही.

सहसा दवाखान्यात आपण गेलो, की आपलं स्वागत होतं "Hello, how are you today?" ने. आता मला सांगा, मी जर "Good" असतो, तर मी मरायला दवाखान्यात आलो असतो का? मग असा प्रश्न विचारयचाच कशाला? पण एक आपली सवय. मग मीपण मुळातच वाकडं असलेलं आणि आजारपणामुळे आणखी वाकडं झालेलं माझं मुखकमल शक्य तितकं सरळ करून "Good" असं उत्तर देतो. वर तिला तोच "How are you today?" परत विचारतो. त्यावर तत्परतेने "Good" असं उत्तर येतं. ही good नसायला काय झालंय? माझा निम्मा खिसा थोड्याच वेळात हिच्या खिशात रिकामा होणारे. मी खिसा शोधत रहातो.

मग थोड्या शिळोप्याच्या गप्पा मारून झाल्या, म्हणजे आजची हवा कशी छान किंवा वाईट आहे अशा असंबद्ध सदराखाली मोडणार्‍या, की मग मूळ विषयाला हात घातला जातो. आता आपण पडलो, मराठीतून English बोलणारे. मी तिला, मला चक्कर येतेय मधेमधे, हे विविध english शब्दांच्या सहाय्याने सांगायचा प्रयत्न करतो. बराच वेळ अशी शाब्दिक कबड्डी रंगल्यावर, ती मला ह्याला Vertigo म्हणतात असं सांगते. त्या चक्करलेल्या अवस्थेतसुद्धा मी तो शब्द पाठ करून टाकतो. पुढच्या वेळी पोपट व्हायला नको म्हणून.

मग ती बाई मला अजून काही होतंय का हे जाणून घेण्याचा विफल प्रयत्न करून पहाते. शेवटी मला जो काही रोग झालाय त्याचं ती नाव सांगते. ते अर्थातंच माझ्या डोक्यावरून जातं. पण तशाही अवस्थेत मी धिटाई दाखवून तिला एक प्रश्न विचारतो. तिला वाटतं की मला तिचं निदान पटलेलं नाही. ती सरळ उठते बाजूच्या कपाटातलं पुस्तक काढते आणि मला एक पान काढून दाखवते आणि म्हणते, हे बघ, मला वाटत होतं तसंच झालंय. तुझे symtoms ह्या आजारशीच मॅच होतायत. डॉक्टर लोकंसुद्धा पुस्तकांत बघून रोगाचं निदान पक्क करतात हे पाहून मला अजून जोरात चक्कर येते आणि पडता पडता मी (मराठीत) बरळतो........डॉक्टर तुम्हीसुद्धा?.....

असंच एकदा, एका कठीण trek नंतर गुढगा दुखंत असल्याची तक्रार घेवून, मी डॉक्टरकाडे जातो. नेहमीप्रमाणं जुजबी ऒषधांनी काही उपयोग होत नाही हे पाहिल्यावर तो मला X-ray काढायला पाठवतो. X-ray पाहून त्याला माझ्या गुढग्यात काहीच problem दिसत नसल्याचं तो मला सांगतो. मला ऎकून आनंद होतो. पण तो आनंद जास्त काळ टिकू न देता, तो, माझा गुडघा कधीच बरा होणार नसल्याचं सांगतो. आणि वर, शक्यतो सपाट रस्त्यांवर चाल. उंच सखल भागात फिरू नको. जिने चढू नको, अशी जाचक पथ्य सुचवतो. मी वेडाच होतो. तसाच चालत (tram न घेता) सात किलोमीटर चालत येतो. गुढगा Solid दुखतो. पण दुसर्‍या दिवशी मात्र सबकुछ Normal. आता काय म्हणावं ह्याला?

तेव्हापासून डॉक्टरची भिती जी मनात बसली, ती कायमची. अगदी कालपर्यंत. कुठेच बरेच दिवस धडपडण्याच योग आला नव्हता, तो एका गाडीवानाच्या कृपेने, दुचाकीवरून रस्त्यावर पडून, जुळून आला. डावा खांदा त्यच्या असण्याची नको तितकी जाणीव करून देत होता. इतकी की रात्री झोपेतसुद्धा तो मला त्रास देत होता. शेवटी पुन्हा एकदा inevitable करायचं ठरवलं. डॉक्टरकडे पोचलो. त्यांनी How are you? विचारलंच नाही. सरळ "काय होतंय" असं मराठीतच विचारलं. त्यमुळे english मध्ये काही explain करण्याचा प्रश्नच उरला नाही. त्यांनी पुस्तक वगॆरे न उघडता मला काय झालंय ते सांगितलं ऒषध लिहून दिलं ते घेवून माझा खांदापण शांत झाला आणि चक्क मी काहीही त्रास न होता हा post type करतोय.

शेवटी शरीरालासुद्धा आपल्या देशातला, आपली भाषा बोलणारा, आपल्यासारखा वागणारा डॉक्टरंच अधिक भावला. माझा doctorofobia गेला आणि मनातली डॉक्टरची भीती कुठल्याकुठे पळाली. परदेशस्थ भारतीयांना, भारतीय अन्न, भारतीय कपडे, भारतीय भाषा, भारतीय संस्कृती आणि भारतीय डॉक्टर ह्यांच्याशिवाय पर्याय नाही, हेच खरं.