Tuesday, June 07, 2011
अपूर्णा
खालच्या लाकडी फ्लोअरवर कुणाच्या टोकदार बुटांचा आवाज झाला तेवढाच. ओळखीचा आवाज, ओळखीचा चेहरा. कुणाचा? कुणाचाही असेना का? आपलं ते शांततेचं चाललं होतं. कुणाला बोलू नका पण खरं सांगायचं तर मला शांततेचाही आवाज येतो. सगळं शांत असताना कानात कुईं करून आवाज येतो. येतो की नाही? अपर्णाला वाटतं माझ्या कानात प्रॉब्लेम आहे. तिच्यासाठी तीन वेळा डॉक्टराकडे पैशाचा पाऊस पाडून आलो, पण तरीही येतोच. अर्थात तिला आता मी सांगितलंय की आवाज यायचा बंद झालाय म्हणून आणि तसाही आला थोडा शांततेचा आवाज तर बिघडलं कुठं. तेवढीच जरा ओक्या खोलीतली बोकी वर्दळ.
बाकी अपर्णानं काळजी करणं काही चुकीचं नाहीये. दोन वेळा शिंक आली की तिसरी यायच्या आत डॉक्टरांच्या दवाखान्यात पोचणारी ती. ती डॉक्टरकडे जा म्हणून माझ्या मागे लागली नाही तरच नवल. वर तिला म्हटलं डॉक्टरकडे पैसे टाकणं बंद कर तर मलाच बोलेल, मला काही तिची काळजीच नाही म्हणून. काळजी नाही कशी? आहे म्हणजे आहेच, पण आठवड्यातून दोनदा ती डॉक्टरकडे गेली तर अजूनच काळजी वाटणार की नाही? त्यात त्या डॉक्टरचं काही खरं नाही. उंचापुरा, नाकी, डोळी नीटस. त्याला काय अपर्णासारखी देखणी पेशंट नक्कीच आवडत असणार. मग तोही देत असेल थातुर मातुर औषध म्हणजे हिचं आपलं तिथे जाणं चालूच.
जाऊदे. मी सांगितलं तर तिला समजायचं नाही. पण एकंदरीत डॉक्टरांची जमात तशी लबाडंच. तो कानाचा डॉक्टरही तसाच. अरे हो कानावरून आठवलं. ते कानातलं सोनाराकडून आणायचं राहिलंय. पॉलिश करायला दिलंय अपर्णानं. आज आणायचं होतं की उद्या? बहुतेक आजच. आता माझी काही खैर नाही. ह्या बायकांचं ना मला काही कळतच नाही. म्हणजे बघा, कानातलं, नाकातलं, गळ्यातलं ही सगळी कसली लक्षणं आहेत? बैलाच्या नाकातून वेसण घालतात, त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी. गुलामगिरीची प्रतीक आहेत हे दागिने वगैरे. अपर्णासारख्या पुरोगामी बाईलाही ती आवडावीत म्हणजे कमाल आहे.
पण काय करा बाबांनो, पुरुषाचा नवरा झाला की त्याचा वेसण न घातलेला बैल होतो. मग तो आपल्याच शिंगानं आपली पाठ खाजवायचा प्रयत्न करीत राहतो. शिंग पाठीला लागत नाही, खाज काही जात नाही. मग काय करेल, फिरत राहतो बिचारा गोल गोल गोल गोल खळात. आणि बायको? बायको नवऱ्याची मजा तेवढी बघत राहते. आणि वर धान्य मळून घेते ते वेगळंच.
हो हल्ली धान्याच्या दारूवर लक्ष केंद्रित करणारेत म्हणे. कालच पेपरात वाचलं. करा लेको, धान्याची दारू करा, ऊसाची दारू करा, अजून कसली करा. ती दारू पिऊन लोकं होऊदेत दारुडे. बरं, दारुड्या लोकांची गरज सर्वात जास्त कुणाला असते सांगा? म्हणजे तुम्हाला, मला, त्यांच्या घरच्यांना, कुणाला? नाही ना ओळखलंत. अहो व्यसनमुक्ती केंद्रांना. दारुडेच नसतील तर व्यसनमुक्ती केंद्रातल्या लोकांनी करायचं काय? बरं प्रश्न नुसता त्यांनी करायचं काय हा नाही. प्रश्न आपण दारुड्यांवर केलेल्या उपकाराने स्वतःच फुलून जाऊन स्वतःची कॉलर ताठ करण्याचा आहे. तरी मी अपर्णाला सांगत असतो. कॉलरवाले खादीचे पंजाबी ड्रेस घालत जा म्हणून.
कॉलरवले पंजाबी ड्रेस? नवी फॅशन आहे की काय आज कालची ही. अपर्णाला विचारून पाहिलं पाहिजे. खादीच्या फॅशन्स तिला चांगल्या माहीत असतात. खादीचे सदरे, खादीचे लेंगे, खादीच्या टोप्या. परवा असंच झालं, काहीतरी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी वगैरे. म्हणून म्हणे खादी घालावी. म्हटलं हे लेंगे सदरे वगैरे ठीक आहेत, पण खादीची अंतर्वस्त्र कुठे मिळतात? मिळतात का? नाहीच मिळत. मग हे खादीवाले घालतात काय आत? घालतात की घालतंच नाहीत? त्यावर उत्तर नव्हतं तिच्याकडे. म्हटलं कसलीही घाल, काढणार तर मीच आहे ना.
कसलं कसलं रोमँटिक बोलून गेलो मी. पण अपर्णाचं दुसरंच. रागावली. फुरंगटून बसली. फुरंगटून. जबरी शब्द आहे. हगल्या पादल्या फुरंगटून बसायला अपर्णाला आवडतं. आवडतं म्हणजे तिचा छंदच आहे तो. तिला म्हटलं डॉक्टरकडे जाणं कमी कर, लोकं काही बाही बोलतात बसली फुरंगटून. घराकडे लक्ष दे, लोकांची व्यसनं मग सोडव, बसली फुरंगटून. आता घरी आली आणि तिची 'नाकातली वेसण', आपलं ते हे, 'कानातलं कानातलं' मी आणलेलं नाही हे लक्षात आलं की बसेल फुरंगटून. कानातलं कानातलं? काहीतरी चुकल्यासारखं नाही का वाटत?
असूदे. चुका काय माणसाच्या होतंच असतात. चुका माणसांच्या होतात, चुका बायकांच्या होतात. नको त्या वेळी नको ती चूक झाली की त्यातून अजून माणसं आणि बाया तयार होतात. तयार झालेल्या हा माणसांच्या आणि बायांच्या अजून चुका. चुकांवर चुका. चुकांवर चुका. उंच चुका, बुटक्या चुका, गोऱ्या चुका, काळ्या चुका. जाड चुका बारीक चुका. अपर्णाला कानी कपाळी ओरडून सांगितलं अचूक काहीच नसतं ग या जगात. असतात त्या फक्त चुकाच. नाही पटलं. दारुड्यांची चुकलेली आयुष्य सुधारणं जास्त महत्त्वाचं आहे का?
अजून कशी आली नाही ही? गेली की काय त्या सोनाराकडे कानातलं आणायला? कानातलं? वेसण, बैल. खाज. होय खाज, मग शिंगं, माझी. खाज माझी, पाठही माझीच. सोनाराकडे नसेल. गेली असेल त्या डॉक्टराकडे. उंचा, पुरा, नाकी डोळी नीटस. खादीचा कॉलर नसलेला सदरा, खादीचा लेंगा आणि खादीची. पण ती तर मी उतरवणार. डॉक्टर तुला सोडणार नाही मी. परवा माझ्या कानात मळ काढायच्या बहाण्याने सुरा खुपलास आणि माझ्या कानाचा पडदा फाडलास हरामखोरा. आता कसा ऐकणार मी शांततेचा आवाज?
खालच्या लाकडी फ्लोअरवर पुन्हा कुणाच्यातरी टोकदार बुटांचा आवाज. ओळखीचा आवाज, ओळखीचा चेहरा, खादीचा कुर्ता, खादीचा लेंगा, सोन्याचे कानातले, नसलेली कॉलर. कोण ही?
Sunday, September 14, 2008
चिऊ आणि काऊ
तो - उशीर? मी वेळेवरच आलोय. माझ्या वेळेवर.
ती - मग तुझी वेळ सांगायची की मला. मीही त्याच वेळेवर आले असते.
तो - बरं.
ती - फक्त बरं?
तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम? मी जर सांगितलं असतं की ट्रॅफिक खूप होता, किंवा बस उशिरा आली, किंवा बॉसने सोडलाच नाही, तरीही तुला पटलं नसतं. हो की नाही? म्हणून बरं म्हणालो.
ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू?
तो - म्हणजे कसा?
ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो.
तो - डोकं फिरलंय त्याचं?
ती - त्याचं की तुझं?
तो - त्याचंच. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला?
ती - हो रे बाबा. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब होतं?
तो - नाही.
ती - मग? दोन वर्ष झाली आपण भेटतोय, पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस? अगदीच हा आहेस तू.
तो - हा? मी? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये लागणार.
ती - इ.... असा कसा रे तू? पंचवीस रुपयात हल्ली एखादं फुल येतं, गुच्छ नाही.
तो - हो का? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये.
ती - अरे देवा
तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट. त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार.
ती - बरं
तो - असं काय गं चिऊ. चिडतेस काय?
ती - मग काय? मलाही असं वाटतं की माझ्या बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं.
तो - अगं मला जमत नाही ना. तू मला सांग, पार्काला पंचवीस फेऱ्या मार, मारीन. सिंहगड दिवसात दोन वेळ चढून उतर. उतरीन. पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां.
ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार.
तो - आता?
ती - हं आता.
तो - बरं जातो.
ती - ए काऊ थांब रे.
तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब.
ती - हं. तू ना गाढव आहेस. मी गंमत गेली रे.
तो - बरं तू गाढवी आहेस. अशी गाढवासारखी गंमत कशी केलीस. मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या.
ती - काऊ तू मला खूप आवडतोस.
तो - मला माहितेय.
ती - काव्या! तुला किती वेळा सांगितलं, मी तू मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं.
तो - बरं.
ती - अरे आता म्हण.
तो - चिऊ तू मला खूप..... शी! हे असं कृत्रिम वाटतं. असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं? तुला माहितेय की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही, मग पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस.
ती - असं काय रे काऊ. म्हण ना रे.
तो - बरं.
ती - ...
तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस. इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच सुचत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही. आता सुचलंच आहे तर ऐकून घे.
ती - ऐकलं. काऊ, तूही मला खूप आवडतोस.
तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया.
ती - चल.
- कोहम
Wednesday, July 02, 2008
पार्टी
ती - कसली?
तो - कसली काय? प्रमोशन कुणाला मिळालं? मला की तुला?
ती - मला.
तो - मग पार्टी कुणी द्यायची? मी की तू?
ती - तू.
तो - कसली कंजूस आहेस तू. अगं तोंडावर तरी हो म्हण. माझ्या ऍड ऑन कार्डावरून पैसे भर हवंतर. म्हणजे मलाही समाधान आणि तुलाही.
ती - म्हणजे मी मारल्यासारखं करते तू लागल्यासारखं कर.
तो - चालेल.
ती - अरे? चिडतोस काय? देईन मी पार्टी.
तो - नको.
ती - चिडका बिब्बा.
तो - मी? तूच चिडकी बिब्बी. उगाच नाही हिंदीत बायकोला बिब्बी म्हणत.
ती - प्रॉब्लेम काय आहे? तोंड का वाकडं तुझं? खूश व्हायला पाहिजेस तू.
तो - कुठे काय? सगळं छान तर आहे. मला चांगली नोकरी. तुला चांगली नोकरी. मला प्रमोशन तुला प्रमोशन. मला गाडी, तुला गाडी. मला..
ती - हे रे काय? तुझं माझं, तुझं माझं. आपलं म्हण.
तो - बरं आपलं.
ती - मग छानच तर आहे सगळं. तू असा का झालायस? स्वतःची शेपटी पकडण्यासाठी गोलगोल फिरणाऱ्या भूभू सारखा?
तो - हं. झालोय खरा.
ती - पण का?
तो - लग्नानंतर माणसाचं असंच होतं.
ती - बरं. मग नव्हतं करायचंस लग्न? का केलंस?
तो - शादी के लाडू. खाये तो पचताये न खाये तो पचताये. म्हटलं, पचतवायचंच आहे तर खाऊन पचतवा.
ती - तुझं लाडकं वाक्य आठवलं.
तो - कोणतं?
ती - खाऊन माजा पण टाकून माजू नका.
तो - इथे थोडं उलटं आहे. शादी चे लाडू खाणारा कधीच माजत नाही. ज्याच्या नावाने लाडू खातो ते माजतात.
ती - म्हणजे मी?
तो - मी तसं म्हटलेलं नाहीये.
ती - न म्हणता, दुसऱ्याला जे ऐकायला आवडत नाही ते म्हणण्याची कला तूच जाणे. तुला काय वाटलं? मला पचतवायला होत नाही?
तो - तुझ्याकडे बघून तरी तसं वाटत नाही.
ती - अरे मी म्हणून तुला सहन करते. दुसरी कुणी असती ना, मग कळलं असतं तुला.
तो - काय कळलं असतं ते कळलं असतं. पण आता काय उपयोग? हे सगळं आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं असं आहे. आता कसं काय कळणार? कितीही कळावं असं वाटलं तरी.
ती - ओ काका विथ मिशा. तुमचं स्वप्नरंजन बंद करा. आणि तुमचा असा स्वतःची शेपटी पकडणारा कुत्रा का झालाय ते सांगा?
तो - कुत्रा? आता खरा शब्द बाहेर निघाला. सुरवातीला भूभू म्हणाली होतीस. आता एकदम कुत्रा झालो काय मी?
ती - हे बघ हा वाक्प्रचार आहे.
तो - आता बघा कशी मराठी तांडवनृत्य करायला लागलेय जिभेवर? एरवी एक वाक्य सरळ बोलता येत नाही. मला शिव्या द्यायला मात्र मराठी.
ती - असं काही नाहीये?
तो - मग कसं आहे?
ती - तुला मी कुठल्याही भाषेत शिव्या देऊ शकते.
तो - इथेच प्रूव्ह झालं की तू मला शिव्या देतेस.
ती - त्यात प्रूव्ह करण्यासारखं काय आहे? मी खुलेआम हे मान्य करते.
तो - पण का?
ती - का म्हणजे? तू जर शिव्या देण्यासारखं वागलास तर मी शिव्या देईन नाहीतर काय ओव्या म्हणीन? तुझ्या सन्मानार्थ.
तो - हे अती होतंय.
ती - बरं होवूदे. अर्धा तास झाला मी तुला विचारतेय प्रॉब्लेम काय आहे? असं तोंड वाकडं करून बसायला काय झालं तर तू उत्तर देत नाहीयेस. कोण करतंय अती? मी की तू?
तो - मी.
ती - हं. मग काय झालं तरी काय?
तो - कुठं काय?
ती - तोंड.
तो - ओह ते. दात दुखतोय.
ती - अरे माणसा, मग हे पहिल्या वाक्याला सांगितलं असतंस तर इतकं भांडण कशाला झालं असतं.
तो - भांडण? कसलं भांडण?
ती - अत्ता आपण केलं ते?
तो - नाही दात जास्तच दुखत होता. लक्ष उडवायचं होतं त्याच्यावरून म्हणून. असं म्हणतात की कसला त्रास होत असेल, आणि त्यापेक्षा अधिक त्रासदायक काही घडलं की पहिल्या त्रासाचा विसर पडतो. म्हणून.
ती - टू मच.
तो - थ्री मच.
ती - बस बोंबलत आता दात घेऊन. पार्टी बिर्टी काही नाही.
तो - अगं गंमत केली.
ती - मीही गंमतच करणारे आता. ज्या दिवशी तो दात उपटून घेशील ना,त्याच दिवशी माझी पार्टी.
तो - अगं पण.
ती - ...
तो - बरं.
----------------------------------------------------------
चिकटवा चिकटवी करणाऱ्यांसाठी तळटीप. कृपया कुठून उचललेत त्याची लिंक द्यावी. मलाच माझं गेलं पोस्ट निनावी फॉरवर्ड म्हणून आलं. आता बोला?
http://nileshgadre.blogspot.com
----------------------------------------------------------
Thursday, January 24, 2008
ठोका - पडलेला आणि चुकलेला
तो तिथे एकटाच बसला होता कारण तो एकटाच होता. अगदी एकटा. सरकारी नोकरीमागे ह्या आडगावात तो कसा येऊन पोचला, त्याचं घर, मित्र, आई वडील सगळं सगळं त्याला आठवलं. तशी आठवण त्याला रोजच येई पण आजच्या दिवशी ह्या वेळी खासच. त्यात साडेअकरा होऊन गेलेले, बाराचा ठोका जवळ येत चाललेला, जुन्या आठवणींचा महापूर आला, दिव्याजवळच्या भिंतीवर काजळीची पुटं चढावी तशी निराशेची पुटं त्याच्या मनात चढायला लागली. सोबतीला अमावास्येची काळी रात्र, घोंघावणारा वारा आणि समुद्राची गाज.
तो एकटा आणि त्याच्यासाठी असलेला हा डाक बंगला. दोघेही एकटेच. गावाबाहेर असलेला हा अवाढव्य डाक बंगला खरंतर त्याला नको होता पण दुसरा पर्यायच नव्हता. आताशा त्या डाक बंगल्यासारखीच त्यालाही एकटेपणाची सवय झाली होती. दिवसाचा प्रश्न नव्हता, पण रात्री खायला उठतं, त्यात अशी अमावास्येची भयाण रात्र.
राहून राहून एकच दिलासा होता, तो म्हणजे फोन. अजून कसा आला नाही फोन? त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने हातातल्या रिस्ट वॉच मध्ये पाहिलं. घड्याळ दहा ची वेळ दाखवत होतं. दिवाणखान्यातून तो त्या झाडाला विळखा घातलेल्या सापासारख्या गोलाकार जिन्याच्या पायऱ्या चढून वर आला तेव्हा तर साडे अकरा वाजले होते. म्हणजे घड्याळानं ऐन वेळेला दगा दिला होता.
पण एव्हाना बारा वाजायला पाहिजे होते. अजून कसा फोन आला नाही. खाली जाऊन वेळ पाहून येण्याची त्याची इच्छा नव्हती. त्या गोलाकार जिन्याचा तर त्याला तिटकाराच होता. शिसवी जिना तो पण पुरता खिळखिळा झाला होता. आणि भयानकही. अगदीच नाईलाज होता म्हणून तो जिना वापरात होता. खरंतर हा बंगलाच.
गेल्या वर्षी ह्याच दिवशी त्याने तिला आपलं मनोगत सांगितलं होत. गोरखगडावरची ती गुहा, आजूबाजूला असलेली मित्र मंडळी, त्यातच तिला भर रात्री तो वरती अवघड वाटेने देवळाच्या इथे घेऊन गेला होता. सगळं सगळं त्याला आठवलं. ते खाली आल्या नंतरचं सेलेब्रेशन. सगळे मित्र त्याचं अभिनंदन करीत होते, पण कुणालाच त्यांचं गुपित माहीत नव्हतं. त्याचं मित्रांच्या बोलण्याकडे नसलेलं लक्ष, त्यावरून पडलेल्या शिव्या. सगळं सगळं. तिला आपल्या मनातलं सांगण्याआधी झालेली हृदयाची धडधडही आता स्पष्ट आठवली.
आठवली की ऐकू आली? क्षणभर तो गोंधळला. काय ऐकलं मी? कसली धडधड. मनातले विचार आणि आणि सत्य ह्याची त्याच्या मनात गफलत तर नाही ना झाली? अचानक त्याच्या मेंदूला कोडं सुटलं, आवाज त्या शिसवी जिन्याचा होता. पण मी इथे असताना कोण? आवाज तर नक्की ऐकला. नक्की. की धडधड? माझ्याच हृदयाची? मी घाबरलोय? कोणाला? जोरात ओरडावं असं त्याला वाटलं. पण ओरडून उपयोग नव्हता कारण ऐकायला कोण होतं?
मनाचा हिय्या करून तो आत जिन्याच्या दिशेनं गेला. आत शिरताच जिन्याजवळच्या दिवा लावायला बटणाकडे त्याचा हात गेला. बटण हाताला लागताच तो चपापला कारण दिव्याचं बटण चालू होतं, पण दिवा बंद होता. गेले वाटतं दिवे? त्याने कारण शोधलं. पण मी गॅलेरीत येताना दिवा बंद करून आलो नेहमीप्रमाणे. मग हा दिवा चालू कसा? गॅलेरीच्या दरवाज्यातून गारवा आत सांडत होता, पण त्याचा सदरा मात्र घामाने भिजून गेला.
समोर खाली तो अवाढव्य दिवाणखाना पसरला होता. अमावास्येच्या अंधारात घरातल्या वस्तू विचित्र दिसत होत्या. भिंतीवर लावलेल्या वाघाच्या कातडीला पाहून तो चपापला, बाजूचं तरसाचं तोंड हालतंय की काय असं त्याला वाटायला लागलं. त्याने जरा निरखून पाहिलं. तो सावलीचा खेळ होता. सगळ्या वस्तू ठेवल्या जागी होत्या. जिनाही आपल्याच गुर्मीत वेटोळे घालून पडला होता. त्याला थोडं हायसं वाटलं.
वाजले असतील का बारा? गॅलेरीत ठोके ऐकू येत नाहीत पण वाजायचे असतील अजून तर बाराचे ठोके नक्की ऐकू येतील. फोन पण आला नाही, पण एव्हाना वाजायला हवे होते बारा. तो हळू हळू जिना उतरून खाली आला. शेवटच्या पायरीलगत असलेल्या खांबावर सिंहाचं तोंड कोरलं होतं, तिथे त्याने घट्ट पकडलं आणि भिंतीवर तो खालच्या दिव्याचं बटण शोधायला लागला. हाताला बटण लागलं आणि तो घाबरलाच. कारण हेही बटण चालू होतं. वीज गेल्येय. मघाशीही त्याला हे लक्षात आलं होतं? मग? पण मी वर येताना दिवा नक्की बंद केला होता, कुणी चालू केला? चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी घाम गळायला लागला. त्या घामाच्या थेंबांच्या चेहऱ्याला झालेल्या स्पर्शानेसुद्धा तो दचकला.
तेवढ्यात स्वयंपाकघरातून काहीतरी पडल्याचा आवाज झाला. त्याही अवस्थेत, खिशात विजेरी असल्याचं त्याला लक्षात आलं. त्याने विजेरी चालू केली आणि तो स्वयंपाकघरात घुसला. जमिनीवर चाकू पडला होता. हा माझ्या हातून इथं पडणं शक्यच नाही. तितक्यात बाहेरून कसलासा आवाज आला. तो बाहेर धावला. बाहेर सगळं सामसूम होतं. त्याने विजेरी मारून इथे तिथे पाहिलं, काही हालचाल नव्हती.
नक्की ऐकला, वरूनच आला हा आवाज. तो विजेरी घेऊन पायऱ्या चढायला लागणार इतक्यात किचन मधून आवाज आला. तो होता त्या जागी थबकला. दुसऱ्या खोलीच्या दिशेनेही आवाज आला. मग तिसऱ्या खोलीतून, पुन्हा वरून, किचनमधून. घामाची अंघोळ झाली, मनातला ताण असह्या झाला आणि तो जिवाच्या आकांताने ओरडला आणि कानावर हात ठेवून खाली वाकला. क्षणभर सन्नाटा पसरला. त्या शांततेला उभा आडवा कापत एक आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचला. तो कसला हे कळायला त्याला दोन क्षण लागले. त्याचा फोन वाजत होता. त्याही अवस्थेत फोन आला ह्याचं त्याला बरं वाटलं.
तो हळू हळू फोनच्या दिशेने निघाला. पुन्हा मगाचचे आवाज सुरू झाले, तो प्रचंड घाबरला. आवाज अधिकाधिक वाढायला लागले, आता तो खोलीच्या मध्यावर पोचला. फोन वाजायचा बंद झाला आणि दिवाणखान्यातल्या घड्याळाने बाराचे टोल द्यायला सुरवात केली. टोल सुरू होताच मगाचचे ते आवाज बंद झाले, बाराचा बारावा टोल झाला आणि साटकन घरातले सगळे दिवे लागले, एकदम डोळ्यावर आलेल्या प्रकाशाने त्याने डोळे मिटून घेतले आणि मटकन तो खाली बसला.
Haappy Birth Day to You!!!
सगळ्यांनी एकच गिलका केला. त्याची सगळी गँग मुंबईहून खास त्याच्या वाढदिवसासाठी आली होती. साने, बाल्या, अंडू, पराग, काणी, मृदुल सगळे होते. त्याला वास्तवात यायला थोडा वेळ लागला. तितक्यात किचनमधून तीही आली, हातात केक घेऊन आणि तो कापायला मघाशी जमिनीवर पडलेला सुरा. साल्यांनो फाटली ना माझी, म्हणत तो उठला, फोन बघितला. मिस्ड कॉल फ्रॉम आई बाबा. सगळ्यांचे वाढदिवस बरोबर बारा वाजता साजरा करायची त्यांच्या ग्रुपची परंपरा अशा प्रकारे चालूच राहिली.
पडलेल्या बाराच्या ठोक्याला त्याच्या छातीचा ठोकाही चुकला होता. पण त्याला आता परवा नव्हती. आता तो वाढदिवस झोकात साजरा करणार होता.
Friday, June 08, 2007
राम नाम सत्य है
हां पण एक येळ व्हती जेव्हा ही हिर पाण्याने तुडुंब भरायची. माझा बाप मोट मारायचा आणि मी पाणी चारायचो ऊसाला. दुपारच्याला सगळे लोक इस्वाटयाला पडले मी हळूच हिरीत उतरायचा. पवायला. ह्या हिरीनंच आपल्याला पवायला शिकिवलं. बाहेर रणरणतं ऊन असलं तरी आत गारेगार वाटायचं. इथंच अख्खा दिवस पडून राहावंसं वाटायचं. पण पुन्हा ऊनं उतरली की परत पाण्याला लागायचं. बाप पुन्हा मोटंला भिडायचा, मी माझ्या हीरीचं थंडगार पाणी ऊसाला चारायचा.
मंग? काय सोपं हुतं का राव? जरा हाताबुडी आलो, तसा मोट माराया शिकिवली बापानं. पयल्यांदा लै मजा यायची. वाटायचं, आता आपण बापया मानूस झालो. मोट माराया लागलो. हळुहळू त्याचाही कट्टाळा यायला लागला. पण बामनाला पोट अन मळेकऱ्याला मोट कधी चुकलेय का? न्हाई न वं? मग मोट मारता मारताच मी माझ्या हीरीवर पंप बसवून घ्यायची सपान बघायचो. घरात बिजली, हीरीवर बिजली, आताच्या डबल टेपल रान. बराचसा ऊस, थोडी पालेभाजी, कधी रानं फिरवायला टमाटं. एकदम पाटलाच्या रानावानी सगळं फुलल्यालं दिसायचं. बैलं हिसडा द्याया लागली की माजी तार मोडायची.
मंग एक दिवस ह्या हीरीसमोरच्या खोपीत बसल्यालं असताना माय म्हणाली, लगीन ठरावलंय माजं. काय सांगू पाव्हणं? गुदगुल्याच झाल्या जणू. शेताच्या बांधाव पाय सोडून बसल्यावर पायाशी एकदम मांजराचं पिलू बिलगावं तशा गुदगुल्या. गावंदरीजवळचं रान करणाऱ्या महादू जाधवाची लेक, चंद्राक्का. काय लाजाया झालं मला? तसाच उठून हिरीकडे आलो. आपल्याला कुठलं जीवलग दोस्तं? ही हिर आणि दोन बैलं हीच आमची दोस्तं. त्यांनाच पहिली सांगिटली ही बातमी. मी न्हवरा अन चंद्री नव्हरी. पुढं चंद्राशी भांडाण झालं की हिरीलाच सांगायचो की मी. मग माझी चूक असंल, तर दुपारची भाकरी चंद्री कोणाबरोबर तरी लावून द्यायची रानाकडं. तिची चूक असंल तर मात्र सवता याची रानाकडं बुट्टी घेऊन. ती रांड, शाळंत शिकलेली. विंग्रजीत सोरी म्हणायची. मग मिरचीच्या ठेच्याबरोबर भाकरी ग्वाड ध्वाड लागायची. वर मी माझ्या हिरीचं पाणी गटागटा प्यायचा.
अशीच एकदा नांगरणीची धावपळ चालली होती. आभाळ उतराया झालं होतं. बरंच काम अडून राहिलेलं. दुपारच्याला खोपीत मी भाकरी खाऊन इस्वाट्याला पडलेला. पाण्याला म्हणून हीरीकडं आलो. माय तेव्हा शेवंतीकडं गेली होती शेवगावाला. शेवंती म्हणजे थोरली बहीण माझी. तर चंद्री हीरीपाशी आली नि म्हणाली मायला बलवून घ्या, अन येताना चिच्चा, बोरं घेऊन या. मी धाडलं बलवणं. हे चिच्चा, बोरं काय मला समजेनात. मग एकदम डोक्यात बिजली चमकली. कालपर्यंत पोरया असलेला मी आता बाप व्हणार होतो.
मोट मारता मारता परत इचार सुरू व्हायचे. मुलगा झाला तर बरं हुईल. त्याला मी शाळंत घालेन आमच्या चंद्रीवाणी. मग तो हाताबुडी येईल. शिकून सायब हुईल. हां, पण तो रान करायचा सोडणार नाही. शेतीपण करेल. हिरीवर पंप बसवेल. मंग मला मोट नाही माराया लागणार. मग पंप पाणी खेचेल, मी शेताला पाणी पाजेन आणि तो गावाची सगळी कामं बघेल. नांगरणी, पेरणीला आम्ही दोघं झटक्यात रान उरकून टाकू. सोबतीनं कुळव हाणू, बैलांना पाला कापू, शेणं भरू. जीवाला थोडा इस्वाटा पडेल. पण कसचं काय राव? झाली पहिली बेटीच. पण फुलासारखी नाजूक, मोगरीच्या फुलासारखी. आणि मधावानी ग्वाड लेक. पण हिच्या आईला काय धाड भरली जणू. रांडेनं दगडू नाव ठिवलं पोरीचं. नजर लागाया नगं म्हणून.
मग एकापाठोपाठ एक पाच पोरं झाली. चार लेकी आणि योक ल्योक. घरचं रान कमी पडाया लागलं मंग शेजारचं रान फाळ्यावर घेतलं. तरीपण पैसं कमी पडाया लागलं. वाटलं पोरांची शाळा काही हुईत नाही. पण हिमतीनं पोरींना चवथी केलं. मंग काय करायची त्यांना शाळा. दुसऱ्याचं धन ते. पोराला मात्र फूडच्या शाळंत घातलं. येगळं मास्तर लावलं शिकवणीला. पोरगा शिकिवला पायजे. मग तो हीरीवर पंप आणेल. माझं कंबरडं तर पार मोडून गेलं की हो जलमभर मोट मारून मारून.
हळूहळू साठवणीचं पैसं संपाया लागलं. घरच्या रानातबी काही राम राहिला नाही. त्येच्या आईला त्येच्या, पूर्वीसारखं पीक देईना झालं. शेजारच्या रानाच्या मालकाने रानाचा फाळाबी वाढावला. त्या रानाच्या पिकात वरीसाचा फाळाबी निघेना झाला. मंग करावं तरी काय? बरं पावासाचं पण पूर्वीसारखं राहिलं नाही. खतं, चांगलं बी बियाणं आणाया पैसं नाहीत. आलेलं पीक शेरातला दलाल म्हणेल त्या भावाला इकायचं. शेवटी हातात काही उरायचंच नाही.
फार घोर लागून राहिला बघा जीवाला. घर ढांकंला लागलं जणू. अन हा घोर सांगणार तरी कोणाला? हल्ली मी माझं घोर या हिरीला सांगायचं बी बंद केलाय. ती बिचारी काय करनार? तेव्हा शेजारच्या रानातला शिरपा तिथं आला हुता. म्हणाला मायबाप सरकार कर्ज देणार आहे मळेकऱ्यांना. निविडणुका आल्या हुत्या ना तेव्हा. ईजबी फुकाट मिळणार म्हणून सांगत होता. पाटलाला म्हणे तेव्हा फुकाट रकमेचं बिल मायबाप सरकारनं पाठिवलं होतं. कितीबी ईज वापरा पैसं द्याया लागनार न्हाई. त्येच्या आयला त्येच्या ह्या शिरप्याच्या बेणं नको त्या वाटंनं घिवून गेलं मला. आणि सुक्कळीचं हे मायबाप सरकार, निविडणुका सरल्याव फुकाट इजबी बंद करून टाकली.
मग शिरप्यासंगं मी ब्यांकेत गेलो. कर्ज मिळिवलं. एक सपान पुरं झालं. मी पंप घातला हिरीवर. इजेची लाईनबी घीतली. फुकाट इज म्हणून खोपीत, हीरीवर पण झगमाग दिवं लावलं. बरे दिवस आले. जीवाला थोडा इस्वाटा पडायला लागला. ल्योकबी हाताबुडी आला. त्याची शाळा तर बंद झालीच हुती. त्येच्या आयला त्येच्या, बेणं शाळंत जायला मगायचंच न्हाई. पळून जायचं उकिरडा फुकायला. त्यालाबी रानात घेतला. त्या वरसी पीकपण चांगलं झालं. पंपाचं पाणी पिऊन पिऊन ऊस तरारला. वाटलं जीवन रांकेला लागलं.
पुढच्या सालापासनं पावसाने दडीच मारली जणू. त्यात एकापाठोपाठ एक पाच पोरींची लग्न. खर्चाचा मेळ जुळविता जुळविता कंबर खचली. त्यात मायबाप सरकारनं इज फुकाट द्येणार न्हाई म्हणून सांगिटलं. आता झाली का पंचाईत. इथून तिथून, सावकाराकडून कर्ज काढून बिलं भरली. पण हितं आभाळंच फाटलं तिथं ठिगळंतरी किती मारायची अन कशी?
त्यात मागल्या महिन्यात चंद्री आजारी पडली. दवाखाने झाले. भगत झाले. सगळं झालं. इथं दातावर माराया पैसा उरला नाही, औशिदासाठी पैसं आणणार कुठून? मुलगा इथं तिथं रोजावर काम करून पैसं मिळवित होता. गांड खंजाळायला बी कुणाला सवड हुईत न्हवती, तिथं हिच्याकडं बघायचं तरी कोनी? पिकाचा सगळा पैसा तर कर्जाचे हप्ते देण्यात जात होता. आणि ल्योकाची बेगारी हिच्या औशिदात. शेवटी गेल्या हफ्त्यात रान इकायचं ठरिवलं. निदान चंद्रीला शेरात चांगल्या डागदर ला दाखिवता येईल. परवाच रानाचं पैसं मिळालं. पोराला अन चंद्रीला शेराकडे लावून दिलं. त्याना म्हटलं तुम्ही हे पैसे घेवा आन तिथेच ऱ्हावा. मी मागचं सगळं आवरून येतो.
अहो पाटील मघाधरनं एवढं बोलून राहिलोय तुम्ही लक्षच देईना झालाय? सकाळधरनं पाहतोय जे बेणं येतंय ते सुक्कळीचं पहिलं हिरीत बघतंय चुक चुक करतंय अन वाटेला लागतंय. मी एवढं बोलतंय तर बोला की वाईस.....
............हे कोणाचं मढं निघालं आणिक. अरे, ही चंद्री का रडून राहिल्येय तिथं. रांड मी मेल्याव रडावं तशी रडतिय.....................
राम नाम सत्य है. राम नाम सत्य है...................