Monday, December 04, 2006

पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा....

आज इथे खूप पाऊस पडतोय. का कुणास ठावूक पण पावसाने माझ्या मनातला एक कोपरा अलगद ओला करून ठेवलाय. माणसाचा अनूभव आपण त्याने बघितलेल्या पावसाळ्यांत मोजतो. मी मात्र आयुष्याच्या अनुभवांमधे हरवलेले पावसाळे शोधतो. कधी ते सापडतायत असं वटतं तर कधी त्यांचा अजिबात थांग लागत नाही. धो धो आला की आपल्याला चिंब करून सोडतो, त्याचा अनुभव त्या एका क्षणापुरता. तो आपण साठवून ठेवू शकत नाही. साठवून ठेवायचा प्रयत्न केला की मग त्याचं पाणी होतं, तो पाऊस रहात नाही. आणि मग आपण त्यला जुन्या आठवणींतच शोधायला लागतो.

धो धो पाऊस कोसळतोय, मी शाळेतून घरी येतोय. हातात छत्री आहे पण ती वार्‍याने उडतेय. मी रस्त्याबाजूच्या दुकानाच्या शेडमधे थांबतो. दप्तरातून लपवून आणलेली मोठ्ठी प्लास्टिक ची पिशवी काढतो. त्या पिशवीत दप्तर सरकवतो. पाठीवरचं दप्तर प्लास्टिकच्या पिशवीत लपतं आणि माझ्या हातात येतं. मी छत्री बंद करून खुशाल शेडबाहेर येतो. दप्तरातली पुस्तकं माझ्या हुशारीला दाद देत असतात. मी पावसात मनसोक्त भिजतो. रस्त्यात साठलेलं पाणी खुशाल माझ्या गमबुटांमधे जावू देतो. शक्य झालं तर साठलेल्या पाण्यात उडी मारण्याचा आनंद घेतो. त्या गमबुटांत साठलेल्या पाण्याने मनातला एक कोपरा कायमचा भारून जातो. घर जवळ येतं तस प्लस्टिकच्या पिशवीतलं दप्तर हळूच बाहेर येतं. पिशवी कचर्‍याच्या टोपलीत जाते आणि वारा खूप असल्याने भिजल्याचं कारण आजीला सांगितलं जातं. आजच्यासारखा कधी पाऊस आला की पावसाबरोबर ते दप्तर, ती पुस्तकं, ती छत्री आणि आजीसुद्धा खूप खूप मागे रहिल्याचं जाणवतं

दर आठवड्यात यावा तसा ह्या आठवड्यातही रविवार येतो. रविवार म्हंटला की संध्याकाळी क्रिकेट खेळायचा कार्यक्रम ठरलेला असतो. नेहमी हवाहवासा वाटणारा पऊस रविवारी मात्र नकोसा झालेला असतो. एकदा का अंगण ओलं झालं की संध्याकाळपर्यंत ते नक्कीच वाळणार नसतं. मी दर पंधरा मिनिटांनी बाहेर येवून ढगांकडे पहात असतो. हे माझंच नाही तर सगळ्याच मुलांचं चाललेलं असतं. खेळाची वेळ जवळ येते तसं मनाला बरं वाटायला लागतं. आता पाऊस येणार नाही ह्याची हळूहळू खात्री पटू लागते, आणि अचानक सरींवर सरी कोसळू लगतात. पावसावर सगळी मुलं कावतात, बिचारा पऊस आमच्यासठी थांबतो. तशाच ओल्या अंगणात काही उत्साही मुलं क्रिकेट सुरू करतात, टेनिसचा चेंडू अवघा पाऊस स्वतःमधे साठवतो. मी तो जोरदार फटकावतो आणि तो सरळ सान्यांच्या घरात जातो. विळीवर दोन तुकडे झालेला चेंडू घेऊन साने आणि चाळीतली मुलं तेव्हा थांबलेला खेळ आता मझ्या मनात सुरू करतात.

नवरात्रातले धामधुमीचे दिवस असतात. संध्याकाळी सर्वांना रात्री होवू घातलेल्य नाटकाची चाहूल लागलेली असते. हॊशी कलाकारांना कार्यक्रमाचा ताण आलेला असतो. मनातल्या मनात संवादांची उजळणी चालू असते. अचानक आभाळ लाल होवू लागतं. चाळीतला कुणी जाणता सर्वांना सांगतो, हे ढग तर पावसाचेच. मग ह्या पावसाला कसंतरी कटवण्यासाठी मखरातल्या देवीच्या विनवण्या केल्या जातात. बर्‍याचदा पाऊस शहाण्या मुलासारखा आल्यापावली परततो. मखरातल्या देवीला नारळ वाहीला जातो. तेव्हाच्या त्या नाटकाचा पडदा अलगद अत्ता माझ्या मनात वर जावू लागतो. स्टेजवरच्या पत्रांमध्ये मी स्वतःला शोधत रहातो.

पंधरा ऑगस्टचा दिवस असतो. स्वातंत्र्यदिनानिमित्त, पाऊस धो धो कोसळत असतो. मी भीमाशंकराच्या डोंगराला भिडलेला असतो. गणेश घाटाची वाट सोपी पण न संपणारी म्हणून शिडी घाटाची चटचट पोहोचणारी वाट पकडलेली असते. हाताने एका मोठ्या दगडाचा आधार घेतलेला असतो. पाय खालच्या वाटेला घट्ट धरून असतात. कानांमध्ये तुफ़ान वारा घोंघावत असतो आणि पावसाच्या धारा मला झोडपून काढत असतात. वार्‍यावर स्वार होवून आलेल्या पावसाचे धपाटे खावून असं वाटतं की ह्या क्षणी जर आपण इथे न येता घरी थांबलो असतो, तर किती बरं झालं असतं. आज मन असा कोणताही विचार न करता सरसर सह्याद्री चाढू लागतं.

मी आणि ती समुद्र्किनारी फिरत असतो. न बोलावून्सुद्धा पाऊस माझ्या मदतीला धावून येतो. अर्थातच आमच्या दोघांकडे एकच छत्री असते. एका छत्रीतून दोन जणांनी जाण्याची एरवी नकोशी वाटणारी कसरत हवीहवीशी वाटायला लागते. मरीन लाइन्सच्या कट्ट्यावर लाटा जोरजोरात आपटत असतात. हातात गरमागरम कणीस असतं आणि त्याला लावलेल्या मसाल्यापेक्षासुद्ध लज्जतदार असा तिचा चोरटा स्पर्श असतो.

विचार करता करता पाऊस थांबून उन्हं कधी पसरली कळलंच नाही. पावसाची साठवण करता येत नसली तरी आठवण आपण मात्र नक्कीच करू शकतो.

Sunday, October 15, 2006

क्षितीज आणि घर.....

क्षितिजाला पकडण्यासाठी, मी धाव धाव धावलो
मुक्काम तर आलाच नाही, पण घरही हरवून बसलो

दमलो भागलो थकलो, पण तरीही नाही थांबलो
अनेक गावं, अनेक रस्ते, तुडवतंच मी रहिलो

मनात एकदा विचार आला, कशासाठी धावलो?
धावून धावून शेवटी मी जिंकलो का हरलो?

एकच क्षण विचार करत, होतो तिथे थांबलो
दुसर्‍या क्षणी मत्र, पुन्हा जीवाच्या आकांताने धावलो

क्षितीज मिळत नाही म्हणून, कुणी धावायचं थांबतं का?
घर मागे राहिलं म्हणून कोणी थांबायचं म्हणतं का?

मी परतलो नाही म्हणून, घर माझं रडलं.
मझ्याकडे पहून मात्र क्षितीज छद्मी हसलं.

Sunday, October 08, 2006

ढेकूण आणि कावळे...

एक आटपाट नगर होतं. त्या नगरात सर्वकाही होतं. चांगली कसदार जमीन, भरपूर पाणी, नद्या, निसर्ग. पण तरीही आटपाट नगरात सूख काय ते नव्हतं. नगरातली सर्व माणसं ढेकणांनी त्रस्त झलेली होती. जिथं पहावं तिथं ढेकूण, आणि साधेसुधे ढेकूणही नाहीत. एकदंम चिवट, त्रासदायक ढेकूण. नुसतं पाच मिनटं स्वस्थ बसावं तर ह्यांचा उपद्रव सुरू. खाकी ढेकूण, हिरवे ढेकूण, भगवे ढेकूण, तिरंगी ढेकूण, देशी ढेकूण, विदेशी ढेकूण सर्वांनीच अगदी त्या नगरातल्या व्यक्ती हॆराण झाल्या होत्या.

आम्हीपण त्या आटपाट नगराचे रहिवाशी होतो. सर्वांप्रमाणेच आम्हालाही ढेकणांनी छळलं होतं. बरेचसे लोकं ह्या ढेकणांचा त्रास नको म्हणून दूर दूरच्या अधिक आटपाट नगरांत जावून राहू लागले. मधेमधे ते लोक आमच्या नगरातील लोकांना पत्रे पाठवीत. त्यात न चुकता ते आपले अनुभव कळवीत. काही जण लिहीत की आमच्या नगरांत ढेकूणंच नाहीत, त्यामुळे आमचं आयुष्य सुखाचं झालं आहे. काही जण लिहीत की आमच्या नगरांत ढेकूण आहेत पण कमी चवतात. काही अतिआटपाट नगरांत म्हणे, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन किंवा हुजूर किंवा मजूर जातीचे ढेकूण होते. ते म्हणे आलटून पालटून त्या त्या अतिआटपाट नगरांतील लोकांना सतावत असत. पण त्यांनादेखील आमच्या आटपाट नगरातील ढेकणांची सर नव्हती.

आम्हीदेखील ह्या निरनिराळ्या प्रकारच्या ढेकणांना कंटाळलो होतो. म्हणून आम्हीदेखील ठरवलं की पहुया दुसर्‍या नगरांत जावून कसं काय वाटतं ते. जाताजातासुद्धा आम्हाला ढेकणांनी थोडाबहुत त्रास दिला, पण तरीदेखील आम्ही मजल दरमजल करीत दुसर्‍या आटपाट नगरात पोहोचलोच.

ते आटपाट नगर आमच्या नगरापेक्षा खूपंच छान होतं. रुंद रस्ते, बागा, नद्या झालेले नाले, सोनेरी केस असलेल्या युवती आणि रुबाबदार बलदंड युवक, सारेच कसे निरळे होते आणि अतिशय सुंदर. पहिल्याच दिवशी आम्ही आमचे नगर विसरून गेलो आणि एक अख्खा दिवस ढेकणांनी त्रास न दिल्याने ढेकूणही विसरून गेलो. पण जुन्या मित्रांची ओळख इतक्या सहजासहजी थोडीच जाते? राहून राहून कधितरी आम्हाला ढेकणांची आठवण येई. मग आम्ही आमच्या नगराकडून येणार्‍या लोकांना आमच्या नगरीच्या वार्ता विचारत असू आणि झांलच तर ढेकणांचीही चॊकशी करीत असू. मझ्या जुन्या आटपाट नगरातले काही लोक मला ह्या नव्या अतिआटपाट नगरांत भेटले. आम्ही सर्वजण एकत्र जमलो की जुन्या नगरातल्या ढेकणांच्या गप्पा रंगवत असू. कोणाला तिरंगी ढेकूण आवडत नसत तर कुणाला भगवे. मग त्यावरूनही वादावादी होई. पण शेवटी ह्या नगरांत येवून आपण कसे सुखी झालो ह्याच्या सुरस कथा सर्वजण सांगत. वर इथले ढेकूण त्रासदायक नसतात ह्यावर शिक्कामोर्तब होई.

माझाही अनुभव तसाच होता. इथले ढेकूण फारच निरुपद्रवी आणि सज्जन होते. हळुहळु माझी इथल्या सोनेरी केसांच्या युवतींशी आणि रुबाबदार बलदंड तरुणांशी ओळख झाली. त्यांना मी म्हंटलं की तुमची नगरी फार छान आहे, इथे ढेकणांचा अजिबात त्रास नाही, तर म्हणाले खरं आहे, आम्हाला ढेकणांचा अजिबात त्रास नाही. पण इथे कावळ्यांचा भारी उपद्रव आहे. काळे कावळे, सावळे कावळे, बारीक डोळ्यांचे चपटे कावळे, सगळे बाहेरून येतात आणि आमच्या नगरीची वाट लावतात. मी त्यांना म्हंटले की मला कावळे म्हणजे काय प्राणी असतात तेच माहित नाही. तर म्हणतात कसे, तुमच्या आरशात जावून पहा म्हणजे तुम्हाला दिसतील सावळे कावळे. आमच्या जुन्या नगरांत आरसा नवाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. तेव्हा आम्ही आमच्याच एका रुबाबदार मित्राकडून ती उधार घेतली. मग आम्ही सगळे जुन्या नगरांतले स्नेही आमच्या घरी जमलो आणि आम्ही आरसा ह्या वस्तूमधे पाहू लागलो. आरसा सर्वप्रथमच पहिल्यामुळे, सर्वांनाच उत्सुकता होती की काय दिसेल. सर्वांनी त्यात डोकावून पाहिले तर आम्हाला काही प्राणी दिसले. म्हंटले हेच बहुदा कावळे असावेत. पण त्यात्सुद्धा एक चमतकृती होती. मला ते सर्व कावळे माझ्या स्नेह्यांसारखे दिसत होते. एकच कावळा काय तो अनोळखी वाटंत होता. माझ्या स्नेह्यांचाही अनुभव हाच होता. पण त्यांना म्हणे एक कावळा माझ्यासारखा दिसत होता. पण मला मात्र एखादा कावळा मझ्यासारखा असेल असे वाटत नव्हते.

शेवटी वादावादी होवून आम्ही असे ठरविले की आम्ही आणलेली आरसा ही वस्तू बरोबर काम करत नसावी आणि म्हणुनच आम्हाला कावळे आमच्यासारखे असल्याचा भास होत असावा. म्हणून आम्ही अधिक महागाची आरसा ही वस्तू आणली. पण तरीसुद्धा मागले पाढे पंचावन्न. शेवटी आरसा ह्या विषयावर बरेच संशोधन केल्यावर आम्हाला असे लक्षात आले की त्यात दिसत होतो ते आम्ही सर्वच होतो. आणि इथल्या नागरिकांना त्रास देणारे कावळा नावाचे प्राणी आम्हीच होतो. पुढे अशीही माहिती उजेडात आली की आम्ही सावळे कावळे आहोत. अजून काही आफ्रिका खंडीय नगरांतून इथे काळे कावळे येतात. पीत प्रदेशांतील नगरांतील कावळे बारीक डोळ्यांचे आणि चपटे असतात. आमच्या जुन्या नगराच्या आजुबाजूच्या नगरांतून येणार्‍या कावळ्यांचा रंग, सावळा असतो. काही पूर्व युरोपीय नगरांतून पांढरे कावळेही येतात म्हणे.

आता फक्त एकच प्रश्न आमच्या मनांत घोळत राहिला, की आपल्या जुन्या आटपाट नगरांत जावून ढेकणांचा त्रास सहन करत माणूस म्हणून जगायचं की नव्या अतिआटपाट नगरांत कावळा बनून आपले आयुष्य सुखात घालवायचं?

अशी ही साठा उत्तराची कहाणी साता उत्तरी सुफळ पण तरीही अपूर्णच.....

Wednesday, September 27, 2006

आप कतारमें हॆ.....

आमचं विमान कतारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं आणि कुणीही जाणीव करून न देताच आपण एका खूप वेगळ्या प्रदेशात आल्याची जाणीव झाली. जिथे पहावं तिथे वाळू आणि नजर पोचेपर्यंत वाळूच. अधुन मधुन छोट्या छोट्या इमारती होत्या पण त्यांनासुद्धा रंग वाळूचाच. आपल्यासारख्या फ़क्त चॊपाटीभर वाळू फायची सवय असलेल्याला इतक्या वाळूचं अजीर्ण झालं नसतं तरच नवल. सगळं अगदी रुक्ष वाटंत होतं. त्यात लोकांनी, त्यांना आखाती देशांबाबत असलेली थोडीथोडकी आणि नसलेली बरीचशी माहिती पुरवलेली होती. जाणारा माणूस पहिल्यांदाच चाललाय हे पाहून तर लोकं काहीही सांगतात. ते सगळं आठवलं आणि उगाचच आपल्या सुजलाम सुफलाम देशाची आठवण झाली.

उतरल्या उतरल्या immigration officer ची आणि आमची भेट झाली. तिथे विमानतळ अधिकारीसुद्धा लष्करासारख्या ग्णवेषात असतात. त्यांची भाषा अरबी आणि आपली इंग्रजी. (खरंतर आपली भाषा मराठीच, पण इथे अगदीच पर्याय नाही म्हणून इंग्रजी). आपली भाषा त्यांना कळत नाही आणि आपली भाषा त्यांना कळंत नाही. (अर्थात त्यांना इंग्रजी येत नसल्याने आपण ती सुखाने बोलू शकतो हेही तितकंच खरं). त्यात तो गणवेषधारी असल्याने आपण back foot वर. थोडावेळ अरबी आणि इंग्रजीचा हुतुतू रंगल्यावर, तो आम्हाला आमचे papers clear आहेत आणि आम्ही बाहेर जावू शकतो, असं सांगत आसल्याचं उमजलं. त्याच्या बोलण्याचा मतितार्थ समजल्यावर आमचा जीव भांड्यात पडला. अजून दोन महिने इथे रहायचं होतं. किती वेळा जीव भांड्यातून बाहेर पडणार ह्याचा हिशेब करंत करंतच आम्ही विमानतळातून बाहेर पडलो. पण एक गोष्ट मात्र मी मनाशी नक्की ठरवली, की ह्यापुढे, देव न करो, पण इथल्या गणवेषधारी माणसाशी गाठ पडलीच, तर त्याच्याशी मराठीत बोलायचं, आपलं इंग्रजी काय आणि मराठी काय, त्याला सारखंच.

आखाती देश म्हंटला की सर्वप्रथम आपल्याला आठवतो तो तिथला उकाडा. पण तिथे मात्र अगदी विरुद्ध अनुभव आला. नव्हेंबर डिसेंबर असल्याने तिथे गुलाबी थंडी होती. मध्ये मध्ये ती अधिक गुलाबी झाली की आम्हा मुंबईकरांना दणका देवून जाई. थंडीचं सोडा, पण अरबस्तानातला पाऊस पाहूनतर अगदी माझी "आजि म्या ब्रम्ह पाहिला", अशी अवस्था झाली. आणि नुसता पाऊस नाही, तर बदाबदा कोसळणारा पाऊस बघूनतंर मला भरूनंच आलं. तर असा हा तिथे कधीमधी हजेरी लावणारा पाऊस, आमच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सकाळी धो धो कोसळायला लागला. (मी प्रशिक्षण द्यायला कतारला गेलो होतो, ह्यावर माझ्या ओळखीच्या ब‍र्‍याच लोकांचा अजुनही विश्वास नाही.) बरं पहिला दिवस असल्याने बरंचसं साहित्यही माझ्याकडेच होतं. एका हातात माझी laptop ची bag, दुसर्‍या हातात training material ची पिशवी आणि धो धो कोसळणारा पाऊस अशा अवस्थेत मी taxi ची वाट पहायला लागलो. द्दहा मिनिटं झाली, पंधरा मिनिटं झाली, अर्धा तास झाला, तरी taxi नाही. आता करायचं काय? training सुरू व्हायची वेळ झालेली. पाऊस थोडा कमी झालेला, म्ह्टलं चालायला सुरूवात करूया, मिळेल taxi. नवा देश नवं शहर, रस्ता कुठून माहित असायला? तेवढ्यात एक माणूस आडोशाला उभा असलेला दिसला. दक्षिण भारतीय वाटत होता. त्याला रस्ता विचारला. सुदॆवाने त्यालाही मला जायचं होतं तिथेच जायचं होतं. म्हणाला मिळेल taxi. पुन्हा पंधरा मिनिटं taxi ची आराधना करूनही taxi काही आली नाही आणि आम्ही पुन्हा चालायला लागलो. बोलता बोलता कळ्लं की तो श्रीलंकन आहे. दोन्ही हातांत भरपूर सामान घेवून चालताना होणरी माझी तारांबळ त्याच्या लक्षात आली. आपण होवून त्याने माझी bag घेतली. यथावकाश taxi मिळाली आणि मझं ठिकाणही आलं. मी त्याला पॆसे देवू केले. "I don't accept money from friends". अरे? एका तासाच्या ओळखीत ह्याने तर मला आपला मित्र करून टाकलं? जाताना मला तो आपलं personal card द्यायला विसरला नाही. म्हणाला, कोलंबोला आलास की नक्की घरी ये. फ़िश करी खायला घालीन. त्या न खाल्लेल्या फ़िश करीची चव अजूनही तोंडात रेंगाळतेय.

पण त्या दिवसापासून taxi चा मात्र मी धसकाच घेतला. बरं तिथे taxi ला दुसरा पर्याय नाही. कारण तोच एकमेव public transport. Train तर सोडाच पण कतारमध्ये school bus सोडून दुसरी कोणती bus ही दिसली नाही. पण एकदा taxi मिळाली की त्या सारथ्याबरोबर गप्पा मारण्यात वेळ कसा जायचा ते कळायचं नाही. असाच एकदा एक पाकिस्तानी सारथी मिळाला. मी सवयीनेच त्याला विचारलं,
- आप कहांके हॆ? (आश्चर्याची गोष्ट म्हणजे. माझं खास ठेवणीतलं, अस्सल मराठमोळं हिंदी त्याला समजलं.)
- पाकिस्तानके. आप कहांके हॆ. त्याचा प्रतिप्रश्न.
- आपके पडोसी हॆ, इंडियासे. (भारताबाहेर कुठल्याही भाषेत भारताला "इंडिया" च म्हणतात. अगदी मराठीतसुद्धा.)
क्षणभर त्याने एक छोटा pause घेतला.
- ख्रिश्चन हॆ क्या? (मी हिंदू किंवा मुसलमान नाही असं त्याला का वाटलं ते तोच जाणे.)
- हिंदू. माझं संक्षिप्त उत्तर.
हिंदू म्हटल्यावर तो ज्या त्वेशाने वळला ते पाहून जवळजवळ माझी बोबडीच वळली होती, पण त्यपूर्वीच तो म्हणाला,
- हिंदू हो ना तो बिलकूल डरनेका नही.
मी बहुदा "डरलो" हे त्याने ओळ्खलं असावं, पण मी आपण त्या गावचेच नाही हे दर्शवणारा अभिनय केला. पण त्यच्यावर माझ्या अभिनयाचा काहीही परिणाम झाला नाही.
- मॆ हूं ना? कुछ जरूरत पडे तो मुझे बोलिये, मॆ जरूर मदत करुंगा.
त्याचं हे भारतप्रेम समजायला मलाच थोडा वेळ लागला. माझ्या चेहेर्‍यावरचा गोंधळलेला भाव बहुदा त्याने ओळ्खला.
- एक काम किजिये, आप पॆसेही मत दिजिये. आपसे क्या पॆसा लेना?

हे मात्र अतीच झालं. आमच्या मुंबईला taxi ने बरोबर पॆसे संगितले तरी आम्ही धन्य होतो, इथे त्याचा पकिस्तानी व्यवसाय बंधू साक्षात पॆसे नकोच म्हणंत होता. बळेबळेच त्याच्या खिशात पॆसे कोंबून मी बाहेर पडलो. अशा गोष्टीही घडू शकतात? का हे फ़क्त भारतीय उपखंडबाहेरच घडू शकतं?

असाच एकदा पाऊस पडत असताना, एक पाकिस्तानी taxi वाला मला म्हणाला होता, सांभाळून रस्ता cross कर, इथे पावसात गाड्या घसरून बरेच अपघात होतात. का कोण जाणे पण इथले taxi वाले फ़ार प्रेमाने वागतात असं वाटलं. भाडं जास्त असतं, कदाचित त्याचा परिणाम असेल.

आम्हाला रहायला जे अपार्टमेंट दिलं होतं, त्या बिल्डिंगच्या शेवटच्या मजल्यावर एक पूल टेबल होतं. तिथून मी आणि माझा एक सहकारी घरी परतंत होतो. lift मधे आमच्या बरोबर एक अरब त्यांचा तो पांढरा झगा वगॆरे घालून उभा होता. माझा सहकारी त्याचा मजला आल्यावर उतरला. तोपर्यंत आम्ही एकमेकांशी मराठीत बोलत होतो. आता lift मधे मी आणि तो पांढरा झगा, दोघेच होतो. lift सुरू झाल्यावर त्याने मला विचारलं,

- कुठचे तुम्ही?
पांढर्‍या झग्याकडून अरबी किंवा अरबाळलेली इंग्रजी ह्याशिवाय दुसरं काहीच अपेक्षित नसतं, त्यामुळे तो काय म्हणाला ते मला कळलंच नाही. मी त्याला अगादी "pardon me" म्हटलं. तो पुन्हा म्हणाला
- कुठचे तुम्ही?
एक क्षणभर माझा विश्वासच बसेना. पांढरा झागा घातलेला, दाढी वाढवलेला, आणि कुकरच्या रिंगसारखी रिंग डोक्यावर घालून डोक्यावरचं फडकं सांभाळणारा अरब, शुद्ध, अस्खलित मराठीत मला विचारतो, की मी कुठचा? हा प्रश्न ऎकल्यावर मी कोण हे मी विसरलॊ नाही हेच माझं नशिब.
- मुंबई.
माझ्या नकळंतच मी त्याला उत्तर दिलं. माझा उडालेला गोंधाळ त्याला कळंला असावा.
- तसा मी रत्नागिरिचा, पण मुंबईला होतो.
असं म्हणुन त्याने मला जे काही पठाणी आलिंगन दिलं, त्यानेच मी भानावर आलो. तो त्याचा मजला आल्यावर उतरलाही. मी मात्र ह्या सांस्कृतिक धक्क्यातून लिफ्ट तळ मजल्यावर आल्याशिवाय बाहेर आलो नाही.

बकी तिथले अरब एकदम खुशालचेंडू असतात. त्यांचे concepts clear आहेत. त्यांच्याजवळ चिक्कार पॆसा आहे, त्यामुळे काम करणं, हे आपलं काम नाही, हे त्यांनी पक्का ओळखलय. काम करायलाच तर बाहेरून इथे लोकं येतात. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, फिलिपिन्स, एवढंच काय पण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रिलियातूनसुद्धा लोकं येतात. पण ह्या सर्वांच्यात सरळ सरळ वर्गवारी आहे. सावळ्या किंवा काळ्या कातडीला जेवढा पगार मिळतो त्यच्या दुप्पट पगार गोर्‍या कातडीला मिळतो. सरळ सरळ हिशेब. तुम्हाला काय येतं, किती येतं ह्याला काही विशेष अर्थ नाही.

- पहिले काही दिवस ह्या गोष्टीचा त्रास होतो. पण मग सवय होते. आमचे एक स्नेही सांगत होते.
- Gulf ची नोकरी म्हणजे trap आहे. सुरवातीला रग्गड पॆसा मिळतो म्हणून लोकं येतात. परत गेलं तर इतका पगार मिळत नाही. अगदी इथला experience सुद्धा count होत नाही. पुढेपुढे सवय होवून जाते. वर्षातून एकदा एक महिना India ला जाय्ला मिळतं त्यावर वर्ष काढायचं.

तिथे सुबत्ता खूप आहे. ऎश्वर्य आहे. पण तरीसुद्धा काहीतरी कमी आहे. बाहेरून, भारतातून आलेली माणसं हसतात खिदळतात, पण कुठेतरी त्यांना आपण आपल्या देशापासून दूर आहोत ह्याचा दुःख असतं. आणि तिथले नियमही असेच आहेत की प्रत्येक क्षणाला ते तुम्हाला बजावत असतात की तुम्ही इथे परके आहात.
- मुंबईच्या airport वर उतरलं की एकदम घारी आल्यासारखं वाटतं. कोचिनचा जॉर्ज आम्हाला सांगत होता.

तसे आमच्या training मधे काही अरबी लोकही होते. काही दिवसांनंतर आमची त्यांच्याशी मॆत्रीही झाली. इतकी की मी त्यांच्याशी इस्लामवरूनसुद्धा गप्पा मारल्या. त्यांनाही मी भारताबद्धल आणि हिंदू धर्माबद्धल (मला असलेली) माहिती दिली. त्यांच्यातच मला, आपल्या डोक्यावरची रिंग माझ्या डोक्यावर ठेवून ती balance कशी करायची हे शिकवणारा युसुफ भेटला. माझ्या दहा मुलांपॆकी सर्वात मोठ्या मुलाएवढा आहेस आणि तरीसुद्धा मला शिकवण्याइतका अनुभव आहे असं म्हणुन कौतूक करणारा खलील भेटला. स्वतःच्या घरी जेवायला बोलावणारा पकिस्तानी मुहम्मद भेटला.

एक गोष्ट मात्र खरी, की कतारच्या वाळवंटातसुद्धा माणसाला माणसाबद्धल प्रेम आहे, ओलावा आहे. कदाचित वाळवंटातला शुष्कपणाच तो ओलावा माणसांमधे निर्माण करत असावा. मनात फक्त एकच विचार येतो की हा आपलेपणा आपल्या स्वतःच्या देशात का मिळत नाही? का आजुबाजूला असुनही, तो जाणवण्यासाठी, आपल्या घरापासून, देशापासून, फार फार दूर जावं लागतं, जिथे थोडासा ओलावासुद्धा मन सुखावून जातो.

Sunday, September 24, 2006

कोहम कोहम?

नमस्कार मंडळी,
आज माझा ब्लॊग लिहिण्याचा पहिलाच दिवस. गेले तीन आठवडे मी ब्लॊग न लिहिण्यासाठी कारणं शोधतोय. पण आज मात्र कोणतही कारण शिल्लक राहिलं नाही, त्यामुळे हा ब्लॊग सुरू करण्यावाचून दुसरा पर्यायही नाही. प्रत्येक गोष्ट करताना ती आपण का करतो, ह्याचा पक्का विचार मनाशी करणं हा खरंतंर माझा स्वभाव नव्हे, पण हा ब्लॊग सुरू करताना का कोण जणे पण पहिल्यांदा हाच विचार येतो, की मी हा ब्लॊग का बरं लिहित आहे? वरवर पहिलं तर हा प्रश्न तसा सोप्पा आहे. पण खरं सांगतो बाबांनो, बराच विचार करुनही उत्तर सापडेना.
एकदा वाटलं, मी माझी रोजनिशी लिहिणार आहे. पण, ते वाटतं तितकं सोपं नाही. आपलं आयुष्य, आपंणच जगासमोर तटस्थपणे मांडणं, ह्यासारखं अवघड काम नाही. आणि असली अवघड कामं करणं मला तितकसं लाभत नाही असा माझा पूर्वानुभव आहे. मग काय बरं कारण असावं? कदाचित माझा असा गॆरसमज झाला असावा का, की आपण थोडं बरं लिहितो, आणि म्हणून आपण लिहित रहावं? माझं अत्तापर्यंतच लिखाण वाचून सुज्ञांस मी कसे लिहितो, ह्याचा अंदाज आला असेलचं आणि त्यामुळे, मी बरे लिहितो हे माझ्या ब्लॊग लिहिण्याचे कारण नसावे, हेही त्यांनी ओळ्खले असेलंच.
शेवटी, मी स्वतःशीच माझ्या ब्लॊग लिहिण्याचं कारण ठरवलं. माणूस जन्माला येतो तोच मुळी कोहम कोहम करत येतो. आणि मरताना जरी तो कोहम कोहम करीत मरत नसला तरी, जन्माला येताना पडलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालेलं असतंच असं नाही. त्यात तसं काही गॆर आहे असंही मला वाटंत नाही. जीवनाचा प्रवासंच मुळी आपलं स्वत्व शोधण्यसाठी असावा असं वाटतं. ज्याला तो कोण हे समंजलं, त्याला त्याचं आयुष्य समजलं, आणि ज्याला त्याचं आयुष्य समजलं त्याच्या आय़ुष्यात मजा काय ती राहिली. हे म्हणजे, पहिलेलं नाटक पुन्हा पाहिल्यासारखं आहे. त्यामुळे माणसाने कोहम कोहम करीतच जगावं, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सापडलं तर ताबडतोब मरून जावं. जेवढं ह्या प्रश्नाचं उत्तर कठीण, तेवढंच आयुष्य समृद्ध.
मग म्हंटलं चला, ब्लॊग लिहिण्याचं एकतरी कारण मिळालं. कोहम चा शोध घेत रहायचं. हा शोध घेताना, जगाच्या प्रयोगशाळेत आयुष्याचे प्रयोग करंत रहायचे, आणि निरिक्षणं ह्या ब्लॊग्मध्ये नोंदवायची. फारफारतंर अनुमान नोंदवायचं. निष्कर्श मात्र काढायचे नाहीत. कुणी वाचंलाच हा ब्लॊग, तर त्यांचा निष्कर्श काढायला ते मोकळे आसतील.......