Thursday, October 27, 2011

बदाबदा वाहणारं बूच

बऱ्याच दिवसांनी ब्लॉगकडे फिरकलो. बऱ्याच लोकांनी लिहिलेलं बरंच काही वाचून माझेही बाहू स्फुरणं पावू लागले. कॉम्प्युटर उघडला. आता असं जबरदस्त काही तरी टाइप करूया की बस्स. आय ऍम बॅक ची लै कानठळ्या बसवणारी अनाउंस्मेंट वगैरे करणारं काही बाही लिहून सुखानं झोपी जावं असा एक जबरदस्त विचार मनात येऊन गेला. पण त्यापलीकडे आणि लिहिण्यासारखं असं काहीच सुचलं नाही.

मग मी स्वतःला समजावलं की थोरा मोठ्यांना नाहीका रायटर्स ब्लॉक येतो, तसा तो मलाही आला असावं. रायटर्स ब्लॉक रायटर्स ब्लॉक म्हणजे तरी काय? मराठी लेखकाला बसलेलं बूच. म्हणजे मराठी लेखक वगैरे म्हणवणाऱ्यांना दोन दिवस परसाकडे जायची वेळ आली नाही किंवा जाऊनही झाली नाही की होते तशी होणारी अंतर्बाह्य तगमग? जाऊदे ब्लॉगर्सना अजून मराठी लेखकांच्या पंक्तीला बसवायला बऱ्याच लोकांची बरीचशी हरकत आहे. त्यात ब्लॉगर्स तसं नरम गरमंच खाणारे म्हणजे बद्धकोष्ठ व्हायची शक्यता तशी कमीच. तरीही माझं असं का व्हावं?

माझ्या आजूबाजूला प्रतिभेचा असा महापूर आलेला असताना आम्ही कोरडे पाषाण कसे काय राहिलो ह्याचा विचार करत असतानाच मला विषय झाला. बरोबर, मला विषय सुचत नाही. मला विषय होतो. वरती केवढ्या प्रसववेदना झाल्या ते वाचलंत ना, अशा बेसुमार कळा येऊन गेल्यावर एकदाचा विषय झाला. विषय झाला म्हणजे खरा प्रॉब्लेम सुरू झाला. नुसतं बाळ जन्माला घालून थोडंच भागतं, त्याचं पालनपोषण करावं लागतं. कपडे लत्ते, अगदी काही नाही तर नाही गेलाबाजार ग्रोसांच्या गणतीने नॅपीज आणावे लागतात.

ते हे बाळावरनं आठवलं. माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी कुणीतरी लाडात येऊन आता लवकरच नवा पाहुणा येणार हं. वगैरे म्हणालं. तोंडदेखलं मी तोंडभर हसलो आणि हो म्हटलं. पण लगेच मनात आलं पाहुणा आला की स्वतःची बॅग घेऊन येतो, हा कसला पाहुणा? ह्याची बॅग घेऊन आम्हीच त्याच्या स्वागताला हास्पिटलात जायचं. मग त्या विनोदावर मनातल्या मनात तोंडभर हसून आणि जाहीर तोंडभर हसण्याचा कार्यक्रम तीन सेकंद आधी उरकल्यामुळे मनातल्या मनातलं हसू जाहीर न करण्याचा अट्टहास करीत असताना, खाली हात आया है खाली हात जायेगा वगैरे जबरदस्त फिलॉसॉफिकल गाणी आठवायला लागली.

माझं हे असं होतं. मी बोलत होतो झालेल्या विषयाबद्दल आणि हे खाली हात आया जाया व्हायला लागलं. अर्थात एकदम चुकीचं नाहीये ते. कारण माझ्या विषयांचं पण असंच असतं खाली हातच ते येतात आणि लिहून संपल्यावर लक्षात येतं अजून हातात काही आलंच नाही. पण हल्ली माझं असं भयंकर होतं. मन थाऱ्यावर नाही.

मन थाऱ्यावर नसण्याची अनेक कारणं आहेत. पण माझी पक्की खात्री आहे की माझ्या थाऱ्यावर नसलेल्या मनाचं कारण माझी साडेसाती आहे. परवाच कुठल्यातरी फोरमवरच्या माणसानं मेल केला होता म्हणे. तूळ राशीच्या लोकांना साडेसाती सुरू. ते वाचल्यापासून असं चाललंय बघा. गेलाबाजार नेटवर सगळ्या साडेसात्या सर्च केल्या. आता पुढची साडेसात वर्ष आमच्यावर शनीदेवांची कृपा, सॉरी अवकृपा असणार. ते शनीवरून आठवलं. कधीही कुणी शनीदेवांचं नाव घेतलं की मला पुनीत इस्सार आठवतो. होय होय तोच. महाभारतात ज्याने दुर्योधनाचं काम केलेलं आणि महाभारतातल्या समस्त ऋषिमुनींच्या दाढ्यांना लाजवतील असे अंगावरचे केस वागवत जो बेंबीच्या देठापासून ओरडून बोलायचा तोच तो. त्याला पुढे कुणीतरी सूर्यपुत्र शनीदेव पिक्चरात शनीदेव म्हणून घेतलं होतं. त्यामुळे शनीदेव, दुर्योधन आणि पुनीत इस्सार ह्यांचं काहीतरी जबरदस्त लिंकेज माझ्या बालमनावर ठसलेलं आहे.

लिंकेज वरून आठवलं. मी आता जे काही लिहिलं त्याचा मूळ विषयाशी काही संबंध होता का? नसावा. नसला तरी जोडता येईल. मी असंच ऍब्स्ट्र्रॅक्ट लिहितो असं मी उगाचच सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही विषयाचा मी कशाशीही संबंध जोडू शकतो अगदी पुनीत इस्सारशी देखील.

जी पेंटिंग्ज मला कळत नाहीत ती मला जास्त आवडल्याचं मी मान्य करतो. एका सुंदर कन्येबरोबर आर्ट गॅलेरीत एका अगम्य, चित्रविचित्र चित्राच्या समोर उभं राहून कन्यकेला इम्प्रेस करायला म्हणून वाह क्या बात है असं मी बोलून गेलो. कन्यका जवळ येऊन म्हणाली. वा, तुला समजलं मलाही समजाव ना. तेव्हाची फजिती वगळता माझी ही स्ट्रॅटेजी चांगली यशस्वी झालेली आहे. खरंतर मराठी माणसानं क्या बात है अशी दाद द्यायची काही गरज आहे का? पण हल्ली मी पाहतो ही परवलीची दाद आहे. आणखी मराठी दादा किंवा दादी (दाद चं अनेकवचन) म्हणजे माइंड ब्लोइंग, फँटास्टिक, फँटाब्युलस वगैरे वगैरे.

तर मी म्हणत काय होतो? काय म्हणत होतो ते नक्की समजत नाहीये, पण मी ऍबस्ट्रॅक्ट लिहितो ना, त्यामुळे मला नाही समजलं तरी वाचकांना त्यातून काहीतरी समजेल. माझी पेंटिंग स्ट्रॅटेजी वापरून कुणी वाहवा करणारी कमेंट करेल. मग एकाची दोन, दोनाच्या तीन, तीनाच्या वीस. वीस कमेंट्स येतील. दहाच्या वर कमेंट्स म्हणजे ब्लॉग सुपर डुपर हीटंच म्हणायचा, पुरुष ब्लॉगरांनी तरी. असं यश उगाचच मिळत नाही. तेवढं पी आर सांभाळावं लागता. आपली वाहवा करणाऱ्याची आपणंही व्याजासकट वाहवा करायची. कावळ्याने म्हणायचं गाढवाला, अहाहा काय हा तुझा आवाज, गाढवाने म्हणायचं कावळ्याला अहाहा काय रे तुझे हे दिसणे वर तुझी काव कावही खासंच.

असो तर मला सुचलेला विषय होता. काय होता? जो होता तो होता. म्हणजे तो होताही आणि नव्हताही. किंवा होत्याचं नव्हतं करणारा होता, नव्हे नव्हत्याचं होतं करणारा होता. हा आठवलं, रायटर्स ब्लॉक. लेखकाला बसलेलं बूच.

हे रे कसलं बदाबदा वाहणारं बूच?