Sunday, May 30, 2010

कर्णिक बाई.

कर्णिक बाई.

पाचाच्या आसपासची उंची. लांब असावेत असे केस. केसाला चापून चोपून तेल लावलेलं आणि घातलेली वेणी. अदमासे पन्नाशीच्या आसपासचं वय. डोळ्याला लावलेला, बहुतेक काळ्या किंवा कुठल्यातरी जाड डार्क बॉर्डरचा चष्मा. चष्म्यापाठचे मोठ्ठे, टपोरे डोळे, किडकिडीत शरीरयष्टी, लांबसडक बोटं आणि बोटांवरून गिरक्या घेत फिरत जाणाऱ्या हाताच्या नसा. अशा आमच्या कर्णिक बाई.

साधारण पंचवीस वर्ष उलटून गेली, त्यामुळे कर्णिक बाईंचं माझ्या डोक्यातलं चित्र कदाचित धूसर झालं असेल. झालं असेल नव्हे झालं आहेच. पण पंचवीस वर्ष उलटून गेली तरी मनाचा एक कोपरा त्यांनी अजूनही व्यापून ठेवलेला आहे.

अगदी लहान चार पाच वर्षाची मुलं, त्यांच्या आई बापांचे हात घट्ट पकडून, रडत भेकत, बाहेरच्या जगाला घाबरत शाळेत येत. मुलांच्या घट्ट हातांची पकड सोडवताना, त्यांचे रडवेले चेहरे पाहता पाहता त्यांना टाटा करताना, आई बापांना यातना नक्की होत असतील. पण आपण आपल्या मुलांना एका तेवढ्याच प्रेमळ, आपुलकीनं करणाऱ्या हातांत सोपवून जात आहोत हे समाधान त्यांना कर्णिक बाईंनी दिलं असेल.

मातीपासून मडकं बनवण्याचं काम, माती मळून त्या मातीचा गोळा करण्यापासून सुरू होतं. फिरत्या चाकावर तो मातीचा गोळा ठेवून त्याला आकार देणाऱ्याचं नेहमी कौतुक होतं. पण मातीत योग्य तितक्या प्रमाणात पाणी मिसळून, मातीला आकार द्यायची लायकी मिळवून देणाऱ्याचं काय? आमच्या कर्णिक बाई अशांच एक होत्या. आम्ही सर्व मुलं, पुढे मोठी झालो. कुणी डॉक्टर, इंजिनिअर झाले, कुणी उद्योगधंद्यात नाव कमावलं. खारीचा का होईना पण आमच्या कर्णिक बाईंचा त्यात वाटा होता? त्याची पोच आम्ही कधी त्यांच्यापर्यंत पोचवली का?

अजून तो दिवस लख्ख आठवतो. दहावीचा रिसल्ट नुकताच लागला होता. पेढे वाटप जोरात चालू होतं. मी अतुलला म्हणजे माझ्या सख्ख्या मित्राला म्हटलं की आपण कर्णिक बाईंकडे जायला हवं. त्यानंही ती कल्पना उचलून धरली. आम्ही दहावीला धडकेपर्यंत कर्णिक बाई रिटायर झालेल्या होत्या. तरी शाळेतून त्यांचा पत्ता मिळवला. पत्ता सहज सापडण्यासारखा नव्हता. विचारत विचारत आम्ही माग काढत गेलो. दार वाजवलं. बाईंनी स्वतःच दार उघडलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाईंनी बघताक्षणी आम्हाला ओळखलं. आत बोलावलं, अगदी लहान मुलांना द्यावा तसा आम्हाला खाऊही दिला. बाईंना पेढे देऊन वाकून नमस्कार केला. बाईंचे पाणावलेले डोळे बघून मला कसंसंच झालं.

त्यांच्या वर्गात होतो तेव्हा त्या मला रडूबाई म्हणायच्या. कोणत्याही फालतू कारणासाठी किंवा त्याशिवायही मी भोकांड पसरायचो. बाई प्रेमाने रडूबाई म्हणायच्या, पुसटसं आठवतं, तेव्हाही एक आनंद व्हायचा. दोन क्षण बाई नजरेआड झाल्या तरी माझे डोळे भरून यायचे. आई नजरेआड झाली म्हणून रडल्याचं मला आठवत नाही पण कर्णिक बाई नजरेआड झाल्या की मुसमुसून रडलेलं माझ्या अजूनही चांगलंच स्मरणात आहे.

तर बाईंकडे पेढे देऊन आलो. दोन दिवसांनी माझ्याच शाळेत जाणाऱ्या माझ्या बहिणीबरोबर बाईंनी एक पत्र पाठवलं आणि मला आणि अतुलला म्हणून दोन पेनंही पाठवली. अतुलचं पेन मी अतुलला दिलं, पण पत्र मात्र दिलं नाही. वाचायला नक्की दिलं पण परत मागून घेतलं. अजूनही ते पत्र माझ्याजवळ आहे. बाईंनी लिहिलं होतं, की आम्हाला पाहून त्या एकदम गोंधळून गेल्या. काय बोलावं तेही त्यांना सुचलं नाही. पुढे हेही लिहिलं की आम्ही त्यांची आठवण ठेवून त्यांना पेढे द्यायला गेलो ह्याचा आनंद त्यांना सर्वोत्तम शिक्षकाच्या सरकारी पुरस्कारापेक्षाही जास्त आहे. अजूनही घरी गेलो. चुकून कपाट उघडलं तर ते पत्र हाती लागतं. बाईंना भेटल्याचा आनंद होतो.

त्यांचा पत्ता अजूनही लक्षात आहे. म्हणजे बिल्डिंगचं नाव लक्षात आहे. बाकी घर नंबर वगैरे विसरलो. शिवाजी पार्कला गेलो की हमखास बाईंची आठवण यायची. अगदी लग्नाचं आमंत्रणही त्यांना पाठवलं. लग्नाआधी फार थोडे दिवस भारतात आल्यानं स्वतः जाऊन आमंत्रण करणं शक्य झालं नाही. खरं सांगायचं तर कर्णिक बाई आहेत का नाहीत हीसुद्धा माहिती मला नव्हती. अर्धवट पत्त्यावर पत्रिका पोचेल की नाही ह्याची खात्री नव्हती. लग्नाच्या गडबडीत कर्णिक बाई आल्या नाहीत हे लक्षातही आलं नाही. काही दिवसांनी एक मनी ऑर्डर घरच्या पत्त्यावर आली बाईंनी मला लग्नाचा आहेर म्हणून पाठवली होती. त्या आहेरापेक्षा बाई अजून आहेत हे समजल्यानं मला खूप बरं वाटलं होतं. मनाशी खूणगाठ बांधली, की पुढच्या वेळी आलो की जाऊन बाईंना नक्की भेटायचं.

एक वर्ष गेलं. दोन गेली. करता करता चार वर्ष गेली. चारदा भारतात जाऊन आलो. अनेकदा शिवाजी पार्कलाही गेलो असेन पण काही ना काही कारणाने आठवण येऊनसुद्धा मी बाईंना भेटायचं जमवलं नाही. आता अपघाताने कळलं, बाई देवाघरी जाऊनही दोन वर्ष झाली. कुणीतरी कानफटात मारावी तसं मला झालं. बाईंना भेटायचं राहूनच गेलं.

घराच्या चार भिंतीच्या बाहेर पडल्यावर हरवून जाण्याची वेळ पुढे अनेकदा आली, पण प्रत्येक वेळी हात धरायला कर्णिक बाई भेटल्याच असं नाही. पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कधी मित्रांशी बोलताना, कधी बायकोला माझ्या लहानपणाबद्दल सांगताना, कधी मनातल्या मनात जुन्या आठवणीत रमताना कर्णिक बाई भेटतच राहिल्या. पण आता त्या पुन्हा कधीच भेटणार नाहीत ह्या कल्पनेनं, त्या दोन क्षण नजरेआड झाल्यावर पंचवीस वर्षापूर्वी जसं मुसमुसून रडायला यायचं.

अगदी तसंच.