Wednesday, April 16, 2008

नातं

"हा"मी - एक छानसं नातं.

"तो"मी - नातं?

"हा"मी - नात्याला नाव काय? नावंच नाही? शब्दकोश धुंडाळले तरी सापडलं नाही.

"तो"मी - नातं कसलं?

"हा"मी - एक तो. भारतातून श्रीलंकेत कामानिमित्त आलेला. एक ती. श्रीलंकन. तो ज्यासाठी आला त्या कामाचा आणि तिचा दूरान्वयेही संबंध नाही.

"तो"मी - बरोबर, मग कसलं नातं? कसलंच नाही.

"हा"मी - नाही कसं? तो आणि त्याची टीम जिथे बसतात त्याच मजल्यावर ती बसते.

"तो"मी - मी बसतो त्या माझ्या ऑफिसच्या मजल्यावर शंभर लोकं बसतात. काही नातं नाही माझं त्यांच्याशी. कुठल्याही ऑफिसच्या एखाद्या मजल्यावर कित्येक लोकं बसतात. त्यांच्यात कसलं आलंय नातं?

"हा"मी - हं बरोबर. पण तरीही नातं आहे. तो तिला काचेच्या खिडकीतून पाहतो आणि तीही कधीकधी. पण तिने त्याला पाहताना, त्याने जर तिला पाहिलं, तर मात्र ती पटकन आपलं डोकं कामात खुपसते.

"तो"मी - नीटसं कळलं नाही. पण नक्की दाल मे कुछ काला है. प्रेम वगैरे?

"हा"मी - नाही नाही. प्रेम नाही. तिचं तर लग्न झालंय.

"तो"मी - त्याचं?

"हा"मी - नाही. त्याचं नाही झालं.

"तो"मी - मग? विवाहबाह्य संबंध?

"हा"मी - काय शब्द पण शोधलाय? विवाहबाह्य संबंध. मऊ भात खाताना खडा दाताखाली यावा असा हा शब्द. विवाहबाह्य संबंध. नाही. तसलं काही नाही. तसा बाह्यात्कारी आतला बाहेरचा कसलाही संबंध नाही.

"तो"मी - म्हणजे नातंदेखील नाही.

"हा"मी - अंहं. नातं आहे. पण तोच तर लोचा आहे ना. ह्या नात्याला म्हणायचं काय?

"तो"मी - नुसतं एकमेकांकडे बघणं हे कसलं आलंय नातं?

"हा"मी - पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. कभी शाम जवाँ थी. मिल बैठे थे यार, आप मै और... तोच तो. बघ ना दारू देशांच्या सीमा जाणत नाही. कुठल्याही देशातले लोक कुठेही एकत्र येऊन टून होऊ शकतात. तसा तो आणि त्याच्या ऑफिसमधले श्रीलंकन मित्र. तमिळ इलम वरून घसरत घसरत गाडी पोरी बाळींवर येते. त्याचे श्रीलंकन मित्र त्याला विचारतात, आणि केवळ त्यांनी विचारलं, म्हणून आणि म्हणूनंच तो सांगतो. की त्या ऑफिसमधली सर्वात सुंदर मुलगी तीच.

"तो"मी - मग त्यात कसलं आलंय नातं? ऐश्वर्या राय सुंदर आहे. हे एक माझं मत मी दहा मित्रांना दहादा सांगितलं. मला खरं आवडलं असतं, पण माझं आणि ऍशचं नाही बुवा कसलं नातं.

"हा"मी - नाही. ऐश्वर्या राय ला सुंदर म्हणणारे एकटेच नसतो ना आपण. आणि आपण तिला सुंदर म्हटलं, हे तिला कळतही नाही. इथेच तर सगळी गंमत झाली. म्हणजे तो तिला ऑफिससुंदरी म्हणाला हे तिला कुणीतरी सांगितलं.

"तो"मी - मग काय त्यात घाबरायचं? सांगितलं तर सांगितलं.

"हा"मी - हं. पण इथेच तर नातं तयार झालं ना.

"तो"मी - कसलं नातं?

"हा"मी - सगळे शब्दकोश धुंडाळले तरी नाव नाही मिळालं.

"तो"मी - बरं पुढं? ती चिडली?

"हा"मी - नाही. ती नाही चिडली. त्याला वाटलं ती चिडेल. पण नाही चिडली.

"तो"मी - नक्की. विवाहबाह्य....

"हा"मी - नाही रे. तसलं काहीच नाही. तिला तिच्या ऑफिसख्या चिडवायच्या त्याच्यावरून. आणि त्याला त्याचे ऑफिसवंगडी तिच्यावरून. पण सगळं गमती गमतीत.

"तो"मी - असं गमतीत काही नसतं. कुणीतरी कुणालातरी कुणावरूनतरी चिडवत असेल आणि त्या कुणालातरी त्याचा राग येत नसेल ते ज्यांना चिडवतायत आणि ज्यांच्यावरून चिडवतायत त्यांचं प्रेम झालं असं समजावं.

"हा"मी - प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. डोंबलाचं प्रेम? ती शादीशुदा आणि तिच्या संसारात समाधानी. तो त्याच्या देशातल्या मुलींवर समाधानी. प्रेम बीम काही नव्हतं रे.

"तो"मी - अरे मग होतं काय?

"हा"मी - तोच तर ओरिजिनल प्रश्न आहे, की होतं काय?

"तो"मी - बरं मग पुढे काय झालं?

"हा"मी - काही नाही. त्याचा प्रोजेक्ट संपला. ते शहर सोडायची वेळ आली. सगळ्यांना भेटला तसा तो तिलाही भेटला जायच्या आधी. तिने त्याला ऑल द बेस्ट केलं. त्याने थँक यू म्हटलं. जसं तो उरलेल्या चार लोकांशी बोलला तसंच तो तिच्याशी बोलला. ते बोलून झाल्यावर आणखी बोलायचं काही शिल्लकच राहिलं नाही. तो वाक्य शोधत राहिला, पण मिळाली नाहीत. त्यामुळे त्याला जावंच लागलं. तिलाही वाटत होतं की त्याने अजून दोन वाक्य बोलावीत, पण ती त्याला सुचली नाहीत आणि तो गेला. दोन डोळ्यांच्या कडा, हलकेच ओल्या झाल्या.

"तो"मी - बरोबर. त्याला वाईट वाटलं असणार.

"हा"मी - त्याला नाही. तिलाही वाटलं. म्हणून दोन डोळे म्हटलं. एक तिचा, एक त्याचा.

"तो"मी - मग?

"हा"मी - मग काय? ईमेल मधून ते बोलत राहिले मधून मधून.

"तो"मी - सुचलं.

"हा"मी - काय?

"तो"मी - नात्याला नाव सुचलं.

"हा"मी - कोणतं?

"तो"मी - इ-मित्र.

"हा"मी - नाही रे. मित्र नाही. मित्र म्हणजे वेगळं, हे वेगळं.

"तो"मी - हे बघ, बुवा आणि बाई हे जर एकमेकांचे नातेवाईक नसतील, तर आपल्याला फक्त दोनंच नाती कळतात. प्रेम नसेल तर मैत्री आणि मैत्री नसेल तर प्रेम. ऍक्च्युअली मैत्री वगैरे सुद्धा झूटंच आहे. खरंतर प्रेम किंवा नथिंग.

"हा"मी - पण हे प्रेम नाही, मैत्री नाही आणि नथिंगही नाही. सगळे शब्दकोश धुंडाळले पण नाव नाही सापडलं.

"तो"मी - संपली स्टोरी?

"हा"मी - नाही. मग पुढे त्याचं लग्न झालं. त्याने तिला लग्नाला बोलावलं. ती आली नाही. शक्यच नव्हतं.

"तो"मी - संपली?

"हा"मी - जाऊदे. तुला ऐकायचंच नाही तर ...

"तो"मी - हं बरोबर, झालं सगळं रामायण आणि म्हणे रामाची सीता कोण? तुला त्यांचं नातं नक्की कोणतं हे कळलं की मला कळव.

"हा"मी - अजिबात नाही. प्रेम किंवा नथिंग ही दोनच नाती तुझ्यासाठी ठीक आहेत.

"तो"मी - मग सांग ना त्यांचं नातं कोणतं? प्रेम की नथिंग?

"हा"मी - नथिंग.

Friday, April 04, 2008

का?

रात्रीचे साधारण अकरा वाजलेले. नुकताच ऑफिसमधून परतलेला मी. दिवसभराच्या कामाने जीव कंटाळलेला. पण एक अनामिक समाधान. काहीतरी पूर्णत्वाला जात असल्याचं. खरंच आपण काम कशासाठी करतो? पगार मिळावा, पैसा मिळावा म्हणून की कामातून एक समाधान मिळतं म्हणून? कुठे आपलं कौतुक होतं, कुठे आपला अहं सुखावतो, म्हणून?

तितक्यात आतून ललित येतो. ललित म्हणजे इथल्या कंपनीने आमच्या मदतीला दिलेला हरकाम्या. गंमत म्हणजे आम्हाला तो हरकाम्या वाटतंच नाही. मित्रच वाटतो. त्याला इंग्लिश येत नाही, आम्हाला सिंहली येत नाही, त्यामुळे बराचसा व्यवहार खाणाखुणांनीच चालतो. तो खरंतर झोपेतूनच उठलाय, पण चेहऱ्यावर कंटाळा नाही. का करत असेल हा काम? समाधान मिळतं म्हणून? लोकांची धुणी धुण्यात कसलं आलंय समाधान?

त्याला आता आम्ही काही इंग्रजी शब्द शिकवलेत. तो मला डिनर आणि पाठी प्रश्नचिन्हात्मक उद्गार एवढंच विचारतो. मी त्याला मान हालवून नाही सांगतो. तो त्याची नाराजी सिंहलीतून ऐकवतो. मला काहीच कळत नाही. बहुतेक त्याने जे काय बनवलंय ते फुकट जाणार असा काहीसा त्याचा सूर. मी त्याला डिनर येस म्हणून सांगतो.

तो मस्त केळ्यासारखं ह्या गालापासून त्या गालापर्यंत हसतो. देवाची रंगसंगती बघा. काजळासारखा काळा त्याचा रंग आणि मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात. झटकन आत जाऊन तो जे काही बनवलेलं असतं ते घेऊन येतो. मला देतो आणि निघून जातो. खुणेनेच ताट किचनमध्ये ठेवून जा, हे सांगायला विसरत नाही.

मी नको असलेलं ते अन्न चिवडत बसतो. आपण नको असलेल्या गोष्टी का करतो? पैशासाठी? स्वतःच्या समाधानासाठी की दुसऱ्याच्या समाधानासाठी? जसा मी आज हे नको असलेलं विचित्र श्रीलंकन जेवण जेवतोय, पोटभर जेवण झालेलं असतानाही?

आम्ही दिवसभर काम करून दमतो, म्हणून आमच्या समाधानासाठी ललितने जेवण बनवायचं, आम्हाला पोटभर जेवल्याचं समाधान मिळावं म्हणून. आणि बाहेर पोटभर जेवण झाल्यावर आम्ही घरी यायचं आणि त्याने केलेलं न रुचणारं जेवायचं, त्याचं समाधान व्हावं म्हणून. का नाही मी सांगत त्याला? की बाबारे नाही आवडत तू जे काय बनवतोस ते. नको बनवू?

सगळंच मोठं विचित्र आहे. भारताच्या चार कोपऱ्यातून आलेले आम्ही चार श्रीलंकेत येतो काय, आणि हा त्याच्या गावाबाहेर सुद्धा कधी न पडलेला ललित आम्हाला येऊन मिळतो काय. जर शक्यता बघितल्या तर अशा पाच व्यक्ती एकत्र येण्याची शक्यता किती? नगण्य. पण अशा व्यक्ती एकत्र येतात. नुसत्या येतच नाहीत तर मैत्री होते त्यांची. तो नोकर आम्ही मालक असं कधी वाटतंच नाही. तोही आमच्यातलाच एक होतो. खुणांनी गप्पा मारतो, प्रसंगी ओरडतो, आम्हाला सिंहली शिकवतो आणि आम्ही त्याला इंग्लिश शिकवतो.

नको असलेलं जेवण कसंबसं पोटात ढकलून मी बाहेर हॉलमध्ये येतो आणि बाल्कनीत जाऊन उभा राहतो. बाहेरचा दमटपणा मुंबईची आठवण करून देणारा. रस्ते दिशाहीन वाटतात. परके वाटतात. मध्येच एखादी गाडी शांततेचा भंग करीत जाते. झोप डोळ्यात पेंगत असते पण तरीही झोपावंसं वाटत नसतं.
हातातल्या फोनवरून मी कॉलिंग कार्डाचा नंबर फिरवतो. समोरून एक यंत्रबाई पाचशे रुपये बॅलन्स आणि दहा मिनिटं वेळ असल्याचं सांगते. बराच वेळ कंटाळवाणं संगीत ऐकल्यावर एंगेज टोन. पुन्हा नंबर, पुन्हा बॅलन्स, पुन्हा संगीत, पुन्हा एंगेज टोन.

मी माझ्या घराला सोडून इकडे येऊन राहिलो कशासाठी? पैशासाठी कदाचित. कदाचित सेल्फ ग्रॅटिफिकेशनसाठी, कदाचित अहं कुरवाळण्यासाठी. आणि ललित का इथे येऊन राहिला? कदाचित त्याच कारणांसाठी. त्याचं घर त्याच्या गावात, आमचं घर भारतात. मिस करत असू का आम्ही सगळे आमचं घर? तो त्याचं, आम्ही आमचं. आणि मग त्यातूनच होत असेल का एक प्रयत्न. आपलं घर सिम्युलेट करण्याचा. नाती सिम्युलेट करण्याचा. आपण कुणासाठीतरी काहीतरी करतो हे समाधान ढापण्याचा किंवा कुणीतरी आपल्यासाठी काही करतो ह्यात समाधान मानून घेण्याचा?

पुन्हा नंबर, पुन्हा बॅलन्स, पुन्हा संगीत, पुन्हा एंगेज टोन. मी फोन बंद करतो आणि झोपायला जातो.