Wednesday, March 19, 2008

भीती

रात्रीचा तीनाचा सुमार. त्याच्या आलिशान बंगल्यातल्या स्विमिंग पुलामधलं पाणी वाऱ्याच्या झुळकेसरशी चुळुक चुळुक वाजत होतं. स्विमिंग पूलच्या शेजारीच दोन माणसं पेंगत बसली होती. बंगल्याच्या दरवाज्यापाशी आणखी दोघं होते. ते मात्र सावध होते. आपल्या अजस्र बेडरूममध्ये बिछान्यावर तो पडला होता. सगळीकडे साखरझोपेची बेदरकार शांतता पसरली होती आणि त्या प्रचंड बंगल्यातल्या कुठल्याश्या कोपऱ्यात असणाऱ्या घड्याळाने तीनाचे टोल दिले.

पहिला टोल पडून दुसरा पडायच्या आतच तो चपापून जागा झाला. नकळत हात उशीखाली गेला. तीक्ष्ण नजरेने त्याने आजूबाजूला पाहिलं. कुठंच काही हालचाल दिसली नाही. तसाच तो खिडकीपाशी गेला. स्विमिंग पुलापाशी पेंगत बसलेले ते दोघे तसेच डुलक्या देत बसले होते. एकदा जोरात ओरडून त्यांना उठवावं असं त्याला वाटलं. हेवा वाटला त्याला त्यांचा. सगळं शांत आणि आपल्याच कोशात गुरफटलेलं वाटलं. तरीही तो दबकत गॅलेरीपर्यंत गेला. बाहेरच्या दरवाज्यावरचे दोघं दबक्या आवाजात बोलत होते. त्याने डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहिलं. पहिला दुसऱ्याच्या सिगारेटवरून स्वतःची सिगरेट पेटवून घेत होता. एकंदरीत सगळं नेहमीसारखंच होतं. हृदयाची धडधड कमी झाली. तो तसाच बिछान्याकडे परत आला.

... भोसडीच्यांना हजार वेळा सांगितलं ते घड्याळ काढून टाका म्हणून. साला एक ऐकेल तर शपथ.....

झोपायच्या आधी तो बिछान्यावर कडेला बसला. टेबलावर ठेवलेली झोपेच्या गोळ्यांची बाटली उघडून एक गोळी त्याने तोंडात टाकली. एक आवंढा गिळून ती तशीच गिळून टाकली आणि बाजूला ठेवलेली बाटली तोंडाला लावून त्यातलं पाणी तो गटागट प्यायला. झोपेच्या गोळीचा परिणाम होईल की नाही होईल ह्याचा विचार करत करत तो बिछान्यावर पडला. डोळे टक्क उघडे होते आणि छताला लटकवलेलं उंची झुंबर त्याच्याकडे दुर्लक्ष करून झोपलंय असं त्याला वाटलं.

... बाप झुंबराच्या कारखान्यात काम करायचा. काचेच्या भट्ट्या, लाल बुंद तापलेली काच. सगळीकडे गरमी भरून राहिलेली. जिंदगीभर तिथेच सडला साला. लोकांच्या घरातली छतं सजवत राहिला आणि स्वतःच्या घरी? घर कसलं, झाटभर झोपडी साली.....

झोप न येणाऱ्या डोळ्यांत नको त्या जुन्या आठवणी जाग्या व्हायला लागल्या.

.... झोपडपट्टीच्या बाजूला असलेली रेल्वे लाइन, रात्री बेरात्री धडधडत जाणाऱ्या गाड्या, पहाटेच्या वेळी दिवस उगवायच्या आत ट्रॅकवर छत्र्या घेऊन हगायला बसलेल्या बायका. साला काय घर म्हणायचं त्याला. संडास होता संडास. एक भला मोठा संडास. तो उकिरडा म्हणजेच शाळा, म्हणजेच खेळायचं मैदान. तो राजा, किश्या आणि तो मी. दहा दहा दिवस अंघोळ न केल्याने त्यांच्या शरीराला येणारी घाण. केसांच्या जटा. त्यावर राजरोस फिरणाऱ्या उवा. ती रोजची भांडणं, मारामाऱ्या. पाच वर्षाचा मी आणि माझ्यापेक्षा मोठी ती पोरं. मारायची मला. बेदम कुदकायची आणि मी जायचो घरी रडत. बाप म्हणायचा, भडव्या मुलींसारखा घाबरतोस त्या पोरांना. वर मलाच मारायचा. एक दिवस खोपडीच सणकली साला आपली, घेतला एक दगड आणि घातला किश्याच्या डोक्यात. साला रडायला लागला. म्हटलं, भेंचोत रडतोस काय मुलीसारखा? घाबरतोस काय मला? आपण बघ. आपण कुणाला घाबरत नाही. कुणाच्या बापाची भीती नाही आपल्याला. धडधणाऱ्या ट्रेनच्या आवाजात त्याचं रडू हरवलं होतं नाही? ......

आपल्या पराक्रमाचं कौतुक त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. पण अजूनही झोप लागली नसल्याचं त्याला लक्षात आलं.

...... आईघाल्या साला. एक औषध बरोबर देईल तर शपथ. साला झोप येण्याची गोळी आहे का झोप जाण्याची? आणि वर म्हणे दारू पिऊ नका. अरे दारू प्यायची नाही तर झोपायचं कसं. ह्या तुझ्या झुरळाच्या लेंड्यांसारख्या दिसणाऱ्या गोळ्या खाऊन?....

पाण्याच्या बाटलीशेजारी असलेली दारूची चपटी बाटली त्याने तोंडाला लावली. पुन्हा टक्क डोळ्यांनी तो झुंबराकडे पाहायला लागला.

..... असंच एक झुंबर होतं रहमानच्या ऑफिसमध्ये. हुशार होता साला. मला सांगायचा पाकीट घेऊन जा आणि अण्णाकडे पोचतं कर म्हणून. आपल्याला काय माहीत आत काय आहे ते. पंधरा वर्षाचा छोकरा होतो तेव्हा मी. पण तिथला तो छोकरा, तंबी म्हणायचे त्याला. चुणचुणीत होता साला. त्यानेच मला पहिली सुपारी मिळवून दिली ना. रहमानची. अजून आठवतं. दोघांनी मिळून बेदम चोपलं रहमानला. साला हरामी माफ करो माफ करो म्हणून रडायला लागला. तंबीने मला घोडा दिला. म्हणाला मार. पिस्तूल हातात घेतली. पण घोडा ओढायचा धीर होईना. तंबी म्हणाला चुत्या मार. अभी इसको नही मारा तो वो तेरी मारेगा. मार भडवेको. तो मला मारणार? चड्डी ओली होते की काय वाटायला लागलं. प्रचंड भीती वाटायला लागली. हा भोसडीचा मला मारणार? नाही. नाही. मीच ह्याला मारणार. एकदम रग डोक्यात गेली. चाप ओढला. गोळी बरोबर रहमानच्या डाव्या बाजूला छातीत लागली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रहमान तडफडत तडफडत मेला. मेंदू हल्लक झाला. तंबी केव्हाच तिथून सटकला होता. पोलिसांच्या सायरनचा आवाच झाला. मी घाबरलो धावत सुटलो. धावलो. धावलो. किती वेळ कुणाला माहीत. तेवढ्यात पोटात एक गुद्दा बसला. पोलिसच. मायझंवे. बदडून काढला साल्याला. अरे आपण पोलिसाला पण भीत नाही......

सायरनच्या आवाजाने तो भानावर आला. आता? पोलिस? सायरनचा आवाज जसा जसा जवळ यायला लागला तसा मनातून तो घाबरला. पण सायरनचा आवाज जसा जवळ जवळ आला तसाच लांब लांब निघून गेला. अजूनही त्याला झोप लागली नव्हती. पुन्हा तो स्वतःच्या विचारांच्या गुंत्यात गुंतत गेला.

...... रहमानला मारून आणि पोलिसांना चकवून आपण किती दिवस काढले. पुढे गफूर भेटला. गफूरच साला. हरामजादा. रंडीबाजीचा नाद साल्याला. तोच घेऊन गेला मला कमाठीपुऱ्यात पहिल्यांदा. म्हटलं आपण हे असलं काही करत नाही. तर म्हणाला बाईला घाबरतोस साल्या. छक्का आहेस का? पुरूष असून बाईला घाबरतोस. भीती? मला? त्याला म्हटलं, साल्या मी कुणालाही भीत नाही. डोक्यात खून चढला. समोर दिसली ती पहिली रांड उचलली आणि ओरबाडून काढली रात्रभर. मी घाबरतो म्हणे .....

आवेगाने बिछान्यात त्याने कूस बदलली. गुडघ्याची जखम चादरीवर घासली आणि डोक्यात एकच कळ गेली आणि तो कळवळला.

...... आईगं. आईची लहानपणापासून भीती वाटायची. चूक केली की तिच्या लक्षात येणार माहीत होतं. पहिला राडा केला तेव्हापण वाटलं आई घरी गेल्यावर ओरडेल. भीती वाटली. तंबीला सांगितलं तर तंबी म्हणाला आईला घाबरतोस? दुधपीता बच्चा है क्या तू? मी कुणालाच घाबरत नाही. त्यानंतर आईसमोर गेलोच नाही. अगदी शेवटपर्यंत. ती गेली तेसुद्धा महिन्याने कळलं........

पांघरूण घेऊनसुद्धा कुडकुडायला होत असल्याचं त्याला जाणवलं. बेडरूमच्या भिंतीवर एसी घुमत असलेला त्याने ऐकला. एवढा वेळ एसीचा आवाज त्याला जाणवला पण नव्हता पण आता तोच आवाज त्याला त्रासदायक वाटायला लागला. तो बिछान्यातच पडलेला एसीचा रिमोट कंट्रोल उचलून तो एसी बंद करायचा प्रयत्न करू लागला. एसी बंद झाला. त्याला हायसं वाटलं. आता खुट्ट झालं तरी त्याला ऐकू येणार होतं. काही केल्या झोप मात्र येत नव्हती. गेले काही दिवस असंच चाललं होतं.

..... साला दिवस फिरले की काहीच चालत नाही. माझ्या पैशावर जगणारे, माझी पायताणंसुद्धा डोक्यावर घेऊन नाचायला तयार असणारे मंत्री. सगळे सगळे फिरले. छोटा मासा आणि मोठा मासा. कालपर्यंत मी मोठा मासा होतो. आज मी छोटा मासा म्हणून सगळे माझ्या मागे. नाही पण हेही दिवस जातील. म्हणून तर इथे आलोय. कुणालाच माहिती नाहीये हे ठिकाण. फक्त मला आणि......

बाजूच्या मशीदीतली अजान अचानक सुरू झाली आणि तो भानावर आला. सकाळ होत आली म्हणून त्याला बरंही वाटलं आणि झोप लागली नाही म्हणून वाईटही. तो बिछान्यावर उठून बसला. आणि तो बिछान्यातून उठणार इतक्यात सायरनचा आवाज ऐकू यायला लागला. नक्कीच पोलिसांचा सायरन होता तो. चारी बाजूंनी आवाज यायला लागला. खिडकीपाशी जाऊन त्याने पाहिलं तर खरंच पोलिसांच्या गाड्या समोर दिसत होत्या. मागच्या बाजूच्या खिडकीशी तो गेला तिथेही पोलिस दिसत होते. गोळ्यांचा आवाज यायला लागला धुमश्चक्री सुरू झाली. तो मटकन खाली बसला. समोरची खिडकीची काच खळकन फुटून त्याच्या समोर पडली. चकचकीत पांढऱ्या फरशीवर बंदुकीची गोळी टकटक आवाज करीत शांत झाली. तो तसाच रांगत पलंगाकडे गेला. उशीखाली हात घातला. त्याचं पिस्तूल तिथेच होतं. ते त्याने हातात घेतलं. क्षणभर सुन्न होऊन तो तसाच बसून राहिला. बाहेरून गोळ्यांचे आवाज येतंच होते. खिडक्यांच्या काचा फुटत होत्या. आजूबाजूला काचांचा सडा पडला. घाबरून तो पलंगाखाली शिरला. थोड्या वेळाने बंदुकांचा आवाज थांवला.

..... गेले. चारही गेले. मागचे दोन आणि पुढच्या दरवाज्याकडचे दोन. आता मी एकटा आणि पोलिस......

पलंगाखालून तो बंदूक घेऊन बाहेर आला. बेभान होऊन तो खोलीभर फिरू लागला. पायाला लागणाऱ्या काचांचीसुद्धा जाणीव त्याला होत नव्हती. अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या. तो थरथर कापत होता.

..... मरण. माझं मरण. मरणाची भीती? कुणाच्या बापाला घाबरत नाही मी साल्यांनो. या. एकेकाचा मुडदा पाडतो की नाही ते बघा. हरामखोर साले. खाल्ल्या अन्नाला जागा कुत्र्यांनो. मला पकडणार? मला मारणार? मला भीती घालता? अरे जा रे जा. नाही हात हालवत परत जायला लागलं तुम्हाला तर नाव नाही सांगणार. मरण माझं मरण. नाही. नाही. नाही. अग आईगं .....

जिन्यावर बुटांचा खडखडाट झाला. पोलिस त्याच्या बेडरूममध्ये घुसले. काचा इतस्ततः विखुरल्या होत्या आणि त्यांचा मध्ये तो आडवा पडला होता. डोक्यातून रक्ताची धार लागली होती आणि हातात पिस्तूल होतं. त्याचे डोळे सताड उघडे होते आणि डोळ्यात दिसत होती फक्त भीती. आयुष्यभराची साठून राहिलेली भीती.