Friday, October 19, 2007

बये दार उघड...

आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो......

.... बाई अंबाबाई तूच ग आम्हाला तारू शकशील. काही काही म्हणून मनासारखं होत नाही बघ. गेल्या नवरात्रीपासून चाललंय, घरात नवं फर्निचर घेऊ पण पैशाची सोय होईल तर शप्पथ. किती दिवस गं असं तुला बोलवायचं आणि ह्या जुन्या टेबलावर ठेवायचं? बरं नाही वाटंत मनाला. त्यात गेल्या वर्षी ह्यांची बदली झाली दुसऱ्या ऑफिसात. तिथला साहेब कडक आहे म्हणे. वरची चिरीमिरीसुद्धा बंद झाली. आता तूच बघ ना. घरात दोन मुलं. मोठा असतो आपल्याच तंद्रीत. धाकटी अजून कॉलेजात आहे. पण आज ना उद्या तिचं लग्न करायला लागणार. त्याचे पैसे कुठून गं आणायचे आम्ही. त्यात हल्ली खर्च का कमी झालेत? आताच कांदा पदराला वांदा लावून गेला. गणपती नवरात्राच्या वर्गण्या. कसं गं व्हायचं आमचं? केबल वाले एक मधे पैसे वाढवतंच असतात. वीज, असते तेव्हा खर्चिकच असते की गं. बये आता तूच काहीतरी कर. ह्यांची बदली पुन्हा जुन्या ऑफिसात कर मी खणा नारळानी ओटी भरेन तुझी आणि पुढच्या वर्षी घटस्थापना नव्या कोऱ्या टेबलावर करेन मग तर झालं? बये दार उघड गं बये दार उघड......

उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो. उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उदो बोला...

..... तिच्या आयला आज पण सचिन खेळला नाही. दुर्गामाते आता तूच काहीतरी बघ. तू म्हणजे एकद ऑस्ट्रेलिअन असल्यासारखी वागतेस हल्ली. एखाद दुसरा तरी विजय आपल्या टीम ला मिळावा की नाही. बघ आम्ही तुला एवढे नवस बोललो आणि वर्ल्ड कपला आपल्या टीमला तू दाणकन आदळलंस. मग काय उपयोग आमच्या भक्तीचा आणि तुझ्या शक्तीचा अंबे? तू फक्त त्या हेडन आणि सायमंडस ला सांभाळ, बाकी सगळं आम्ही बघून घेतो काय? अगं शेवटी काहीही झलं तरी ती आपलीच टीम आहे. तुला जरी आम्ही जगन्माता म्हटलं तरी, पहिला प्रेफरन्स आपल्या भरतातल्या लेकरांना तू द्यायला पहिजे की नाही? बये दार उघड. नामुष्की व्हायची वेळ आलेय. ही सिरीज बरोबरीत तरी सोडव, बये दार उघड......

उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो....

......काय क्युट आहे ना तो? काय आरती म्हणतोय? काय आरती म्हणतोय वाह! जोडीदार पाहिजे तर असा. आपलं नशीबच फुटकं. एक मुलगा धड सांगून येईल तर शप्पथ. कुणी काळाच आहे, तर कुणी उंचच आहे. कुणाला पुणं सोडायचं नाही, तर कुणाला मुंबईत राहायचं नाही. देवी, शारदे आता तूच सांग माझं लग्न जमायचं तरी कसं ग. त्यात गेल्या आठवड्यात पाहिलेला मुलगा आवडला. तसा ठीकठाकच होता. पण चांगली नोकरी, स्वतःचं घर मुंबईत, बोलायलाही बरा होता. म्हणजे भेटले तेव्हा वाटलं की त्यालाही मी आवडलेय, पण एक आठवडा झाला तरी काही निरोप नाही. आतापर्यंत मी इतक्या मुलांना नकार दिले. आता मला आवडेल असा मुलगा सापडलाय तर तो मला नाही म्हणणार की काय? शारदादेवी, काहीतरी कर गं. लहांपणापसून मी तुला पुजत आले. आता माझं एवढं काम कर ना गं. आता नाही ते चहा पोह्यांचे कार्यक्रम सहन होत. बरा मुलगा मिळालाय आता त्याने हो म्हणुदे. प्लीज देवी. प्लीज, बये दार उघड...

भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो.....

..... आयला किती वेळ ही आरती चालणार आहे? चुकीच्या वेळेलाच आलो देवळात. मला वाटलं उशिरा आलो तर गर्दी थोडी कमी असेल. तर आता नेमकी आरती. नेमका साला आजच आमचा टोपी आला. तसं टोपीला टोपी घालणं एकदम सोपं आहे. पण काय आहे त्या छपरीला असं वाटतं की उशिरा बसतो तोच काम करतो. साला म्हणून आपण लेट. काय त्रास आहे. कालीमाते पाहिलंस. नीट तुझं दर्शन घेणं सुद्धा दुरापास्त झालंय. तिथे तो टोपी. तिथून सुटून आलो तर इथे आरती, आता आमच्या सारख्या भाविकानं काय करायचं तरी काय. माते, तूच काहीतरी कर आता. दोन चार ठिकाणी अप्लाय केलाय. एक इंटरव्ह्यूही झाला काल. बराच झाला. पण काय? तू मनात आणलंस तर काहीही होईल. पकलोय मी ह्या देशात. एखादं ऑन्साईट पोस्टिंग मिळुदे माते. त्यात अमेरिकेत मिळालं तर बरंच. काय आहे एच वन बी हाल्ली सहज ट्रान्स्फ़र होतो. मग ग्रीन कार्ड, एखदी झकास छोकरी बघुन लग्न. दर वर्षी न चुकता नवरात्रात तुझ्या देवळात येईन आई. बये माझ्या नशीबाचे दरवाजे उघड ग, बये दर उघड....

आनंदे प्रेम ते आलं सद्भावे क्रिडता हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो.....

....... टेन्शन, टेन्शन झालंय डोक्याला. ह्या शेअर बाजाराचं काही खरं नाही. म्हणजे मी एखादा शेअर घ्यावा आणि त्याचा भाव उतरावा हे हल्ली नेहमीचंच झालंय. त्या भार्गवराम धनसोखीलालनं दिलेल्या टिप्स सुद्धा हल्ली चुकतायत. संतोषीमाते, हे काय चाललंय काय. मला शक्ती दे माते. ह्या बाजारात विजयी होण्यासाठी मला बुद्धी दे. माझी धनसंपत्ती वाढली की मी तुला सोन्याचा मुकुट अर्पण करीन. काहीतरी करून मला चांगल्या टिप्स मिळूदेत माते. जन्माची सगळी कमाई ह्या बाजारात गुंतवून बसलोय. बाजार तेजीत असताना पैसे गुंतवले, त्यानंतर बाजार पडला. आता बाजार पुन्हा जोरात आहे माते, पण मी घेतलेले शेअर्स अजूनही खालीच आहेत माते. काहीतरी युक्ती कर आणि मला नफ्यात आण माते. दार उघड अंबे दार उघड.

जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो.....

भवानीमाते, तू तर सगळं जाणतेसंच. आमच्यासाठी परिस्थिती किती कठीण झालेय ते. विरोधी पक्ष आमच्या वाईटावर टपून बसलेले आहेतच. पण आमच्या पक्षातले अंतर्गत विरोधक, ते जास्त हैराण करतायत माते. दिल्लीशी जवळीक साधावी तर राज्यावरची पकड जाते. राज्य पकडून राहावं तर विरोधक दिल्लीश्वरांच्या कानांत चुगल्या करायला सरसावतात. माते तुझ्या कृपेने आजवर आमदारकी खासदारकी मंत्रीपदं सगळम सगळं मिळालं. आताच्या एवढ्या पेचप्रसंगातून मार्ग काढ माते. मला माहितेय खून, मारामारी, दंगली हे सगळं वाईट आहे. पण करायला लागतं ना माते. नाहीतर सत्ता मिळवून जनसेवा करणार तरी कशी. वाचव माते. तूच वाचव आता ह्यातून. स्वतः चालत प्रतापगडावर जाईन बये, दार उघ्ड आणि तुझ्या कृपेचा वर्षाव आमच्यावर कर, बये दार उघड......

......आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपेकरुनी हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो. उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो. टाळ, झांजा, टाळ्या आणि आवाज टिपेला पोहोचतात.....

....बये दार उघड. बये, मला गाडी, बये मला पैसा, मला नवरा, मला घर, मला खेळणी, मला पुस्तकं, मला सत्ता, मला खुर्ची, मला टेबल, मला रस्ते, मला आगगाडी, मला बैल, मला रान, मला पाणी, मला लोणी, मला पीठ, मला मरण, मला पुरण, मला नोकरी, मला छोकरी, मला जेवण, मला बंगला, मला लाईफ, मला वाईफ, मला शांतता, मला काय? मला? मला? अजून, मला अजून, अधिक, अधिकाधिक, पोट फुटेस्तोवर. बये दार उघड बये दार उघड.......

- कोहम