Friday, August 17, 2007

भारत अधुन मधुन माझा देश आहे

भारत माझा देश आहे? खरंच आहे का? असेल बहुदा.

आजच्या दिवशी म्हणे भारताला स्वतंत्र्य मिळालं. हं, स्वातंत्र्य. हे बाकी चांगलं झालं हं. म्हणजे काय की प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य हे हवंच. आत बघा आमची हयात गेली स्वातंत्र्य मिळवण्यात. म्हणजे लहान होतो तेव्हा अभ्यासापासून स्वातंत्र्य, थोडे मोठे झालो तसे पालकांच्या कटकटीपासून स्वातंत्र्य, मग वेगवेगळ्या गर्ल फ़्रेंड्स ना भेटताना ओळखीच्या माणसांच्या नजरांपासूनचे स्वातंत्र्य, लग्न करण्याचे स्वातंत्र्य, लग्नाआधी लग्नानंतरचे करायचे स्वातंत्र्य, आणि लग्नानंतर लग्नाआधीचे करायचे स्वातंत्र्य.

सगळ्या स्वातंत्र्याची भंकस झालेय यार, मग कसला स्वातंत्र्यदिन सेलेब्रेट करायचा. त्यात सेलेब्रेशन म्हणजे आधीपासूनच स्टॉक आणून ठेवायला लागतो. साला स्वातंत्र्यदिनाला तरी आम्हाला काय पाहिजे ते प्यायचे स्वातंत्र्य द्याल की नाही?

थोडक्यात काय? तर स्वातंत्र्य इज अ व्हेरी इंपॉर्टंट कमॉडिटी. म्हणजे कसं एकदम फ्री वाटलं पाहिजे यार. दारू पाहिजे तर दारू, गांजा पाहिजे तर गांजा, चरस पाहिजे तर चरस. काय? जे पाहिजे ते मिळालं पाहिजे. पण बघा ना. आता उद्या पकडलं मला गांजा पिताना तर माला आत घालणार पोलिस. माझ्या जागी कोणी इंफ्लुएंशियल पोरगा असला की पोलिस, त्याच्याबरोबर गांजा ओढणार. म्हणजे सगळ्या इंफ्लुएंशियल डुकरांना स्वातंत्र्य. पण आमच्या सारख्या नॉन इंफ्लुएंशियल..... घाबरू नका, माणसांचं म्हणत नाहीये......तर आमच्या सारख्या नॉन इंफ्लुएंशियल डुकरांचं काय? आम्हाला कसलं आहे स्वातंत्र्य? हे चिखलात लोळले तर हर्बल मड बाथ, आम्ही लोळलो की गटार काय?

रोजचंच झालंय यार. ये सिस्टिम ही साली सडेली आहे. काहीपण होणार नाही ह्या देशाचं. हं दर वर्षी स्वातंत्र्यदिन मात्र सेलेब्रेट करायचा आपण. सेलेब्रेशन्स तर काय चालूच असतात त्यात हे अजून एक सेलेब्रेशन.

सेलेब्रेशन वरून आठवलं. परवा आमच्या कॉल सेंटरमध्ये टार्गेट अचिव्हमेंट चं सेलेब्रेशन होतं. सगळे साले पिऊन टुन. पण एक आहे सालं, प्यायला ना की खोटं खोटं का होईना पण स्वातंत्र्य मिळाल्याचा भास होतो काय? सगळ्या कटकटीपासून मुक्ती. हं, तर तिथे ती सॅम भेटली. सालीचं नाव सीमा आहे पण हिला बोलवायचं सॅम. सॉलिड फटाकडी आहे.

तर मी सांगितलं तसं दारू पिऊन माला स्वतंत्र वाटतच होतं. म्हटलं बघूया स्वातंत्र्याचा काही उपयोग होतोय का तिला जरा खोपाच्यात घ्यायला. साली.. बिलकुल भाव दिला नाही. सतत त्या टकल्याबरोबर फिरत होती. टकल्या म्हणजे आमचा बॉस. यू.एस. ला पाठवतोय तिला ट्रेनिंगला. साली दिवसभर फोनवर कस्टमर्सची चाटते आणि संध्याकाळी बॉसची.

पण तेही बरोबरच आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी काय उपयोग. वो टकल्या गे थोडीना है. पण चांगलं झालं. स्वतंत्र झाली साली थोड्या दिवसांसाठी तरी. आता यू.एस. ला जायचं आणि एखादा गोरा टकल्या शोधायचा म्हणजे पर्मनंटली स्वतंत्र. शेवटी काय स्वातंत्र्य महत्त्वाचं, ह्या देशापासून, ह्या सिस्टिम पासून.

मरूदे. हम तो साला इधरिच सडेगा, पूरी जिंदगी. ते मरूदे. काल नवा नोकिया घेतला. तीस हजारको लिया बाप. पण मॉडेल कसलं आहे. आमचा तो घाट्या आहे ना, तो माला नेहमी म्हणतो की, थोड्या दिवसांनी घे म्हणजे स्वस्त होईल. त्या अनाड्याला कळत नाही, की माणसाने अप टू डेट असायला पाहिजे. नवीन मोबाईल, नवीन आयपॉड, नवीन ऍपल, नवीन ब्लु बेरी, अरे ह्यात जी मजा आहे ती काय चावून चोथा झालेली मॉडेल घेण्यात आहे. आपण नेहमी लेटेस्ट मॉडेल्स वापरतो काय, मोबाईल असो नाहीतर पोरगी.

कसं एकदम स्वतंत्र वाटतं. लहानपणापासून शिकत आलो, काटकसर करावी, जास्त पैसे खर्च करू नयेत. एकदम फ़्रस्ट्रेट व्हायचो यार. बांधल्यासारखं वाटायचं. वाटायचं काय नाकर्तबगार आहेत आपले पालक. शाळेतल्या पोरांचं सगळं नवीन, लेटेस्ट. आपलं सगळं जुनं. म्हणून आता स्वतंत्र वाटतं. आपणही त्या शाळेतल्या पोरांसारखे लेटेस्ट, अप टू डेट झालो असं वाटतं. तुला कळणार नाही यार काय फीलिंग आहे ते. असं समज, तू रात्रभर दारू पितोयस, पेगवर पेग. अप बॉटम्सवर बॉटम्स अप. कसं वाटतं? सगळी ऍग्विश आपल्या पोटात ठासून भरलेय असं वाटतं की नाही. तसं वाटायचं मला लहानपणी. आणि आता? ते सगळं असह्य होऊन भडभडा ओकल्यावर जसं वाटतं ना? तसं वाटतं. स्वतंत्र. मोकळं.

साल्या आज तू नुसती मजा बघ. न्यूज मध्ये भाषणं दाखवतील ना ती बघ. म्हणे तरुण पिढीने ह्यॅव केलं पाहिजे नि त्यॅव केलं पाहिजे. हे साले खादी चड्डी, ह्यांना कोण विचारणार त्यांच्या तरुणपणी त्यांनी काय केलं ते. साले आमच्या बळावर स्वतंत्र झाले स्वतःच्या गरिबीतून. एकेकाचे बंगले बघा. गाड्या बघा. स्वतःचा उत्कर्ष बरोबर साधला हरामखोरांनी. हे काय करत होते देशासाठी त्यांच्या तरुणपणी. काही केलं असतं त्यांनी तर झालो असतो का आपण असे. ह्यांनी केलेल्या बलात्कारातून जन्मलेली आहे आजची परिस्थिती आणि म्हणूनच आम्ही असे आहोत नपुंसक आणि हो स्वतंत्र.

जाऊदे यार. फार हाय लेव्हलचं मराठी बोललो. तुला नाही समजायचं. तुलाच काय कोणी मला ऐकवलं तर मलाही नाही समजायचं. शाळेत असताना पुस्तकं वाचायचो. टिळक, सावरकर, गांधीजी. बाबू गेनूची गोष्ट वाचून डोळ्यात पाणी यायचं. भगतसिंग, राजगुरूची गोष्ट वाचून अंगात स्फुरण चढायचं. वाटायचं आपणंही काही असंच करावं देशासाठी. मग वाटायचं त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं पण आपण?

कॉलेजात मुलींची छेड काढली म्हणून गुंडांना हटकायला गेलो. तिथेच त्यांनी धुतला माला. आणि आंघोळीनंतर पंचा वाळत टाकावा तसा माला कट्ट्यावर टाकून निघून गेले.

पुढेपुढे त्याचीही सवय झाली. आपण षंढ आहोत हे मी स्वीकारलं. मला काय करायचंय? माझ्या बहिणीची तर नाही ना छेड काढली, मग मुझको क्या? ही वृत्ती बळावली. स्वतंत्र आहोत ना आपण? मग आपला एकट्याचा स्वतंत्र विचार करायला मी शिकलो. दुनिया गेली गाढवाच्या गांडीत. देशभक्ती वगैरे सगळं झूट आहे रे. कसला देश? एकत्र केलेले जमिनीचे तुकडे आहेत हे. म्हणे देश. मी पहिला कोण भारतीय? का हिंदू, मुसलमान, ब्राम्हण आणि महार. पहिली माझी जात, पहिला माझा धर्म आणि मग मी, मग माझा देश. बरोबर आहे, स्वतंत्र आहोत ना आपण.

हे सगळं पहिलं की वाटतं, खरं स्वातंत्र्य मिळेल जेव्हा मी मरेन. ते खरं स्वातंत्र्य असेल. तोपर्यंत दर वर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू. काय? फुल टाईट होवून. चिअर्स. तोपर्यंत भारत अधुन मधुन माझा देश आहे. जेव्हा टीम इंडिया क्रिकेट मॅच जिंकते तेव्हा....

---------------------------------------

हे साहित्य पूर्णपणे काल्पनिक असून, लिखाणात व्यक्त केलेली मते ही माझी वैयक्तिक मते नाहीत. काल्पनिक व्यक्तिने केलेले प्रथमपुरुषी निवेदन ह्या स्वरूपातील हे लेखन आहे.

---------------------------------------

Thursday, August 02, 2007

ग्रेव्ह-डिगर

चर्चच्या गंभीर वातावरणाला शोभून दिसेल असाच परिसर. कॉर्क गावातलं हे एकमेव चर्च, कॅसलहेवन. खरोखरच स्वर्गीय वाटावा असा रमणीय परिसर. लाल विटांनी बनवलेली चर्चची इमारत. पावसाचं पाणी झटक्यात वाहून जाण्यासाठी लावलेली तपकिरी कौलं आणि समोरच्या बाजूला असलेला चर्चचा मनोरा. तोही लाल विटांनी बनवलेला. मनोऱ्याच्या कौलाखाली असलेली घंटा. अजूनही सूर्य रंगात आला की चकाकणारी. चर्चच्या मागच्याच बाजूला गावातली एकमेव नदी. चर्च आणि नदीच्या मध्ये पसरलेलं ग्रेव्हयार्ड. हो ग्रेव्हयार्डच, सिमेटरी नाही. कॉर्क गावात मेलेले कित्येक जण इथेच आहेत. कित्येक वर्ष. वातावरणाची शांतता भंगणारा एकच आवाज येतोय. खणण्याचा. ग्रेगरी, ग्रेगरीच आहे तो. चित्रासारख्या शांत असणाऱ्या परिसरात आवाज करण्याचं काम ते त्याचं. ह्या ग्रेव्हयार्डचा पिढीजात ग्रेव्ह-डिगर आहे तो. लोकांच्या कबरी खणणारा.

चर्चमध्ये आज नवीन पेस्टर आलाय, पलीकडचा गावातून. खरंतर मेंढ्या चरायला नेणं हे त्याचं काम. पण आता चर्चामध्ये मेंढ्याच नाहीत. त्यामुळे हा पोरगेलसा पेस्टर बहुदा प्रार्थनेच्या वेळी मदतनिसाचं काम करणार. लहानखुराच आहे. इव्हान त्याचं नाव. ग्रेव्हयार्डमधून नदीच्या दिशेने निघालाय. एकीकडे साडेसहा सात फूट उंचीचा, लांब केस आणि दाढी वाढलेला, ढेरपोट्या ग्रेगरी जमीन खणतोय तर समोरंच पाच फुटाच्या आताबाहेर असलेला इव्हान त्याच्याकडे बघतोय.

"काय रे पोरा? इकडे काय करतोयस?" आपल्या शरीराइतक्याच दणकट आवाजात ग्रेगरी त्याला दरडावतो.
"मी..मी इथला नवा पेस्टर आहे. आपण?"
आपली कुदळ बाजूला ठेवता ठेवता ग्रेगरी सात मजली हसतो. त्याच्या ह्या हसण्याने चिरनिद्रा घेत पडलेले आजूबाजूच्या थडग्यातील मुडदे तर उठून बसणार नाहीत ना? ह्याची इव्हानला काळजी वाटते.


"जा. तुझ्या बापाला विचार मी कोण ते. पोरा, एवढं साधं कळत नाही का तुला? ग्रेव्हयार्डमध्ये कुदळ, फावडं हाणणारा दुसरा, तिसरा कोण असणार? एकतर एखादा निद्रानाश झालेला मुडदा किंवा ग्रेव्ह-डिगर. तुला मी कोण वाटतो? मुडदा तर नाही ना?"
"नाही"
"असेन जरी मी मुडदा तरी तुला मी सांगणार नाही. समजलं? कारण मलाच कळणार नाही ह्या मुडद्यांच्या संगतीत राहून राहून आणि कबरी खणून खणून कधी मी स्वतःच मुडदा होईन ते. ह्या चर्चमधल्या फादर जेम्स ना मी किती वेळा सांगितलं की मला एक मदतनीस द्या. मला एकट्याला हे काम हल्ली झेपत नाही म्हणून. अडाणी माणसं. चर्चमध्ये मेंढ्या नाहीत तरी पेस्टर घेऊन येतात. उद्या मी मेलो की कळेल. जेव्हा कोणीच नसेल माझी कबर खणायला. माझं प्रेत सडून वास ह्यांच्या नाकात जायला लागला की त्यांना समजेल की चर्चला पेस्टर नकोय, ग्रेव्ह-डिगर हवाय"


"पण.." घाबरत घाबरत इव्हान ग्रेगरीला तोडतो.
"पण? पण बीण काही नाही. ठरलं तर मग, आतापासून तूच माझा नवा मदतनीस. काम एकदम सोपं आहे. मोकळ्या जमिनीचे पहिले दहा बाय पाच फुटाचे चौरस बनवायचे"
"चौरस?"
"हो हो, मला माहितेय माझी भूमिती कच्ची आहे ते. चौरस नाही, चौकोन बनवायचे. एका मुडद्याला एक चौकोन. समजलं? चौरस करायचे आणि वाट बघत बसायचं. काय? लगेच खड्डा खणायचा नाही. ती चर्चची घंटा दिसतेय?"
गोंधळलेला इव्हान वळून चर्चच्या घंटेकडे पाहतो.
"ती वाजली की खड्डा खणायला लागायचं. हम्म, पण पहिल्यांदा चर्चमध्ये जाऊन घंटा कसली वाजली ते विचारून यायचं समजलं? नाहीतर कुणाच्या लग्नासाठी घंटा वाजवतील आणि तू मेजवानी झोडायची सोडून, इथे खड्डा खणत बसशील. काय?
पण मित्रा एक गोष्ट ध्यानात घे. आपण चौकोन जरी पाच बाय दहाचे केले असले, तरी खड्डा मात्र तीन बाय आठ चा खणायचा. दोन मुडद्यांमध्ये सर्व बाजूंनी कमीत कमी चार फुटांचं अंतर हवं समजलं? नाहीतर एकमेकांत पाय अडकतात त्यांचे."
पुन्हा ग्रेगरी सात मजली हसतो. इव्हानला आता काय करावं हेच कळत नाही. तो ग्रेगरीने अर्धवट खणलेल्या खड्ड्याकडे बघत राहतो.

"पोरा, तू एवढा का विचारात पडलायस ते मला समजलं. खड्ड्याची खोली किती ठेवायची ते मी तुला सांगितलंच नाही. हे बघ, खोली कमीत कमी पाच फूट तरी हवी. मी खणत असताना जमीन माझ्या छाताडापर्यंत आली की मी थांबतो. पण तू तसं करू नको. तू पुरता जमिनीच्या आत जाईपर्यंत खणत राहा"
ग्रेगरीच्या एकंदरीत अवताराकडे पाहून घाबरूनच इव्हान हो म्हणतो.
"मुला, मदतनिसाची खूप गरज आहे बघ मला. मला स्वतःला मुलगा असता ना तर त्यालाच जुंपला असता बघ इथे. पण देवाची इच्छा. तो नाही तर तू. उन्हाळ्याच्या दिवसात ठीक आहे रे. पण पावसाळ्याच्या दिवसांत? खड्डा खणावा तर खाली दलदल होऊन जाते. एक माणूस काय काय करेल? खड्डा खणायचा का दलदल उपसायची मी? आताशा एकट्याने झेपत नाही दोन्ही. पण मित्रा, आता तू आलायस ना? आता काही चिंता नाही बघ. तू फादर जेम्स ला सांगून टाक. पेस्टरसारखी निरुपयोगी कामं मला नकोत. मला ग्रेव्ह-डिगर करा म्हणून."

"आपलं नाव काय? मी इव्हान." काहीतरी बोलायचं म्हणून घाबरलेला इव्हान बोलतो.
" मी ग्रेगरी. ग्रेगरी द ग्रेव्ह-डिगर. काय नाव म्हणालास तुझं? हं. इव्हान. तर इव्हान, हे काम म्हणजे खरंतर समाजकार्य आहे बघ. आणि सगळ्या समाजाला कधी न कधी उपयोगी पडणारं काम. राव असो वा रंक, श्रीमंत असो वा गरीब. शेवटी तो माझ्याकडेच येतो. मोठमोठी घरं, जमीन जुमले केले तरी माणसाला शेवटी किती जागा लागते?"
"पाच बाय दहा फूट" इव्हान उत्तरतो.
"चुकलास. मुडद्याला नेहमी आठ बाय तीन इतकीच जागा लागते. बाजूची तशीच सोडायची असते. वहीत लिहिताना आपण समास सोडतो ना? तशी. मुडद्यांचे पाय एकमेकांत अडकू नयेत म्हणून. किती वेळा तेच तेच सांगायला लागतं तुला? मन लावून सगळं काम करावं लागेल. हे काही पेस्टर सारखं सोपं काम नाही"

"लोक मुडदे घेऊन आपल्याकडे येतात. आपल्यासमोर ढसढसा रडतात. पण आपण रडायचं नाही. आपण फक्त खणायचं. काय? आधी आपण खणत खणत खड्ड्यात जायचं आणि मग मुडद्याला आत घालायचं. रडणारे एकेक मूठ माती टाकून घरी जातात. मग तो मुडदा आणि आपण. उरलेल्या मुठी आपल्याच भरायच्या. काल रडणारे उद्या हसत येतात. आपण बुजवलेल्या खड्ड्यावर फुलं ठेवायला. पण आपण हसायचं नाही. आपण खणत राहायचं, बुजवत राहायचं. त्या वेंधळ्यांना कळत नाही, उद्या त्यांचाही खड्डा खणावा लागणार आहे. हसतात लेकाचे. आपल्याला काय? जेवढे जास्त लोकं मरतील तेवढं चांगलं. जास्त खड्डे खणायचे, जास्त बुजवायचे"

"ग्रेगरी आता मला निघायला हवं. आपण नंतर कधीतरी बोलूया का?"
"पोरा, अशी घिसडघाई करून कसं चलेल? मी अजून तुला सगळी माहिती दिलीच नाही. आपल्या पंचक्रोशीत आणि आजूबाजूच्या गावांमध्ये फक्त मीच एकटा ग्रेव्ह-डिगर आहे. जिथे मुडदा तिथे जावं लागतं. कोणत्याही दिवशी अगदी ख्रिसमस असेल तरीही आणि ईस्टर असेल तरीही. मी गेलोय ना कित्येक वर्ष ख्रिसमस लंच करून कबर खणायला. दोन-दोन, तीन-तीन दिवस प्रवास करावा लागतो खेचरांच्या गाडीतून कधी कधी. खड्डे खणायचे, बुजवायचे, खणायचे बुजवायचे. माझी बायको मला रोज सांगते सोड हे काम. शेती कर. दुसरी नोकरी कर, काहीही कर, पण हे काम सोड. पण मी ऐकत नाही. शेवटी पिढीजात काम आहे हे माझं."

घाबरलेला इव्हान आता काहीही ऐकण्याचा मनस्थितीत नसतो. तो तिथून पळ काढायचा प्रयत्न करतो. ग्रेगरी चवताळून त्याच्या मागे धावतो आणि त्याला अडवतो.
"हरामखोरा, कुठे पळून चाललास? काय नाव म्हणालास तुझं? इव्हानच ना. इव्हान, लुच्च्या, लफंग्या, मला फसवून निघून चाललास? तुला नाही करायचं हे काम? भेकड. बायकोला घाबरतो. लंपट. माझ्यापासून पळतोस काय? पळून पळून किती पळशील? सगळ्या जगात कुठेही पळालास ना, तरी शेवटी इथेच येणार तू. सगळेच येतात. सगळे. तुझा तो फादर जेम्स पण येईल. काळजी करू नको. तुझ्यावरचा राग मी मनात ठेवणार नाही. तुझाही खड्डा खणेन. अरे, तुझा मुडदा असा उघड्यावर टाकला ना, तर सडेल. दुर्गंधी पसरेल इथे. कोल्ही, कुत्री खातील तुझा मुडदा. मी तसं होऊ देणार नाही. आणि हो तू मेलास म्हणूनही मी हसणार नाही आणि मला सोडून चाललास म्हणून मी रडणारही नाही. मी खणतच राहीन, खणतच राहीन आणि बुजवत राहीन. खणत राहीन, बुजवत राहीन. खणत राहीन, बुजवत राहीन. खणत राहीन, बुजवत राहीन."
ग्रेगरीची कुऱ्हाड अजूनच जोरात चालू लागते आणि खणत राहीन, बुजवत राहीन च्या किंकाळ्या.

इव्हान जीवाच्या आकांताने धावत चर्चमध्ये येतो. फादर जेम्स समोरूनच येत असतात. इव्हान त्यांना घडलेली घटना सांगतो. फादर जेम्स इव्हानच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे त्याला म्हणतात,
"इव्हान, ग्रेगरी हा आपल्या चर्चच्या ग्रेव्हयार्डचा ग्रेव्ह-डिगर होता. वीस वर्षापूर्वीच मागचं ग्रेव्हयार्ड बंद झालं. जावाबाहेर सिमेटरीही सुरू झाली. पण त्यापूर्वी एकदा ग्रेगरीला कबर खणायला गावाबाहेर जावं लागलं होतं. त्याची बायको गर्भार होती. तिची वेळ भरत आली होती. तरीही तो गेला, तिला एकटीला टाकून, पिढीजात काम करायला. बाळंतपणातच त्याची बायको मरण पावली आणि त्याचा नवजात मुलगाही. चार दिवसांनी तो परत आला तेव्हा त्यालाच त्याच्या बायकोची कबर खणावी लागली. चार दिवस तिचं प्रेत चिरनिद्रा घेण्यासाठी तिष्ठत होतं. तेव्हापासून तो भ्रमिष्ट झाला. ग्रेव्हयार्ड बंद झाल्यानंतरही तो रोज इथे येतो, खड्डे खणतो आणि खड्डे बुजवतो. त्याला घाबरू नकोस. तो तुला काहीही इजा करणार नाही."

कॉर्क गावातलं कॅसलहेवन चर्च अजूनही एखाद्या चित्रासारखं दिसत असतं आणि त्या शांतता भंगणाऱ्या, खणत राहीन, बुजवत राहीन, च्या किंकाळ्या.

- कोहम

------------------------------------------------------------

हे लिखाण पूर्णपणे काल्पनिक असून, कोणत्याही इंग्रजी कथेचे भाषांतर नाही. मुळात हे भाषांतर नसल्याने ही टीप लिहिण्याची गरज नव्हती, म्हणून आधी लिहिली नव्हती. शब्दयोजना मुद्दामच भाषांतरासारखी योजली आहे, जेणेकरून वातावरण निर्मिती करता येईल. पण बऱ्याच वाचकांना हे भाषांतर असल्यासारखे वाटले म्हणून हा खुलासा.

------------------------------------------------------------